मुख्य सामग्रीवर वगळा

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

कोरोनातील गणेशोत्सव; राहू जपून, थोडं अजून..


कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर आलेला गणेशोत्सव - २०२१.
उत्सवाचा आनंद, त्यानिमित्त होणारी गर्दी, मास्क,
आरोग्याची काळजी ह्या सगळ्या विषयांकडे
बाप्पांनी मिश्कीलपणे साधलेला ‘भक्तांशी संवाद’.
----------------

मत्प्रिय भक्तांनो...

नमस्कार, प्रणाम, नमस्ते.

वणक्कम.

सलाम वालेकुम.

सत् श्री अकाल.

आणि, हाय..!

हे म्हणजे अगदी रेडिओवरच्या निवेदकांसारखं झालं ना? त्या 'एफ. एम.'वरच्या चिवचिव चिमण्या नि मिठूमिठू पोपट करतात तसं. एका दमात सगळ्यांना साद घालायची! अभिवादन करतानाच सगळ्यांना आपलंसं करायचं.

... तर सांगायचा मुद्दा तुम्ही सगळेच माझे आहात की. मांडवात आरती म्हणताना काय, विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचताना काय... तिथं कुणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नसतो. तिथं दिसतो तो माझा भक्तच. म्हणून मग मी पण थोड्या वेळासाठी 'आर. जे.' झालो. कसं वाटतंय 'आरजे गणेशा' किंवा 'आरजे विनायका' ऐकायला? की 'आरजे विघ्नहर्ता' अधिक योग्य राहील?

रेडिओवरनं आठवलं, खरं तर ठरवलं होतं की, तुम्हाला 'मित्रों...' अशी साद घालायची. नंतर विचार केला नको बुवा. तशी हाक मारली की, सावरून बसता तुम्ही. हातातलं सगळं काम सोडून रेडिओ, टीव्ही.पुढं ठाण मांडता. मग त्याच्यावरून पुढचे काही दिवस फेसबुक, ट्विटर इत्यादी माध्यमांतून एकमेकांवर तुटून पडता. 'भक्त'-'अंधभक्त'-'गुलाम' ही आणि अशी शेलकी विशेषणं वापरता. नको म्हटलं. तुम्ही सगळेच्या सगळे माझे लाडके भक्त. माझ्या 'मन की बात'वरून तुमच्यात लठ्ठालठ्ठी नको. ह्या उत्सवाच्या काळात तर नकोच.


छायाचित्र सौजन्य - www.devillierart.com
हे पत्र कशासाठी आणि तेही अगदी शेवटच्या क्षणी, असा प्रश्न पडला असेलच तुमच्यातल्या बऱ्याच जणांना. मनात बऱ्याच दिवसांपासून होतं संवाद साधण्याचं. मनातलं ओठांवर आलं. तेच सांगावं म्हटलं. 'होठों में ऐसी बात' म्हणणार होतो. पण लगेच तुम्हाला आठवायची त्या गाण्यावरची पुण्याच्या नातूबागेतली सजावट. नजरेसमोर यायचे त्या गाण्यावर थिरकरणारे शेकडो, हजारो रंगबिरंगी लखलखते दिवे. तुमचं, सार्वजनिक मंडळांचं आवडतं गाणंय ते. इतकी वर्षं ऐकून ऐकून मलाही पाठ झालंय.

असो! मुद्द्यावर येतो. ओठांवर आलेलं मी काही गिळून नाही टाकणार. भले-बुरे सगळे अनुभव पचवावेत, पोटात साठवावेत, असा माझ्या तुंदील तनूचा अर्थ आहेच. पण आता पोटातून ओठांवर आलेलं जे काही सांगतोय, त्यानं खळबळ वगैरे काही माजणार नाही. जे पाहायला मिळालं, जे ऐकायला मिळतंय त्यावरून मनात आलं ते सांगतो.

निघण्याची सगळी तयारी करून, आवरून बसलो होतो. अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी नवी पितांबरं, उपरणी भरून झाली. ह्या उत्सवाच्या दिवसात खिरापत, पंचखाद्य, फळं, पेढे, मोदक ह्याचा मारा होणार हे माहिती असल्यानं श्रावणात एकभुक्तच राहिलो होतो. मोदकांच्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं होतं.

पार्वतीआईनं नेहमीप्रमाणं मायेनं नि काळजीनं सल्ला दिलाच निघताना, 'थोडं जपून खा रे बाळा! तळलेलं कमी खा.' 'मोदक श्रेष्ठ कोणते? तळणीचे की उकडीचे?' तुमचा हा फेसबुकीय वाद आमच्या मातुःश्रींपर्यंत पोहोचलेला आहे बरं! आपला मतलब त्या तसल्या कळकट, शिळ्या वादाशी नाही; ताटभरून मोदक असल्याशी!!

मेघराजाच्या रूपात तांडव करून बाबा दमले होते. त्यामुळे लांबूनच त्यांचा निरोप घेतला. तेवढ्यात आमचे मूषकमहाराज आले नि म्हणाले, ''देवाधिदेवा, अहो काय चाललंय पृथ्वीवर, तुमच्या प्रिय भारतवर्षात! केवढी गर्दी बघा ती. तुमची मूर्ती, नारळ, फुलं-दूर्वा, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी रस्ते कसे वाहताहेत बघा. अहो, जिकडं बघावं तिकडं 'ट्राफीक ज्याम' दिसतंय. कसं काय होणार हो!''

मी म्हणालो त्याला, ''बा मूषका, इतकी वर्षं मला घेऊन जातोस आणि ही गर्दी, हा उत्साह पहिल्यांदाच पाहिल्यासारखं काय सांगतोस. नवं काही बोल.. ट्विटरवरचा नवा ट्रेंड सांग, फेसबुकवरचा खमंग रंगलेला वाद सांग...''

हा थट्टेचा सूर मूषकराजांना पटलेला नाही, हे त्यांच्या इवल्याशा चेहऱ्यावर लगेच दिसलं. ''गणराया, गांभीर्यानं घ्या मला कधी तरी. नेहमीसारखी परिस्थिती राहिलेली नाही सध्या. ती कोरोना महामारी आलेली लक्षात आहे ना तुमच्या. यंदा मार्च, एप्रिल, मे महिने कसे गेले आठवतंय ना?''

मूषकराजांचं ऐकावं म्हणून मग मीही एक नजर टाकली, तर काय. सांगत होता ते खरंच होतं की. केवढी गर्दी! नजर टाकावी तिकडं माणसंच माणसं दिसत होती. हातात पिशव्या, एकमेकांना धक्का देत, वाहनांची दाटी चुकवत वाट काढणारी.

गणेशोत्सव आणि कोरोना महामारीची चिंता
रस्त्याच्या कडेला बसलेले विक्रेते. कुणाच्या नाकावर मास्कच नाही, तर कुणी तो हनुवटीवर अडकवलेला. कुणी खोकतोय, तर कुणी थुंकतोय. अरे! एवढ्यात सगळं विसरलात की काय, सोळा-सतरा महिने अनुभवलेलं. तो कोरोनानामक राक्षस अर्धमेला झाल्यासारखा वाटत असला, तरी अजून पूर्णपणे खतम नाही झालेला. लस घेतली असेल तुम्ही. पण म्हणून काय झालं! कोरोनाला आव्हान न देता 'तू परत ये, तू परत ये...' असं आवाहन करत असल्यासारखंच वाटलं मला ते सगळं चित्र पाहून.

नाही म्हटलं तरी हे उघड्या डोळ्यांनी बघितल्यावर हादरलोच थोडा मी. म्हणूनच पत्र लिहायला बसलो लगेच. निघण्याची घाई-गडबड सुरू असताना, वेळ काढून लिहितोय. प्रत्येक मंगल कार्याची पहिली अक्षता देऊन तुम्ही मला मनोभावे आमंत्रण देता. उत्सवाचं तुमचं आमंत्रण मिळालंय. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं तुम्ही मागच्या वर्षी बऱ्यापैकी शांतपणे सांगितलं होतं. म्हणून यंदा थोडं निवांत जावं असं ठरवलं होतं. यायचं तर असतंच की दर वर्षी.

------
हेही वाचा - 
जगापासून लांब पळा...पहिल्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर
https://khidaki.blogspot.com/2020/03/Corona.html
------

कोरोनामुळं गेल्या वर्षी परिस्थिती नाजूकच होती. म्हणून उत्सव जपूनच साजरा केला ना तुम्ही. विनाकारण बाहेर पडायचं नाही, मोठ्या संख्येनं सगळ्यांनी जमायचं नाही. सूर्य मावळला की, आपापल्या घरात बसायचं... हे सगळे नियम तुम्ही पाळले ना गेल्या वर्षी पाच-सहा महिने? त्याचे चांगले परिणामही दिसले. हो ना? पण काय सांगावं, यंदाही परिस्थिती फार काही बदललेली नाही बुवा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण सगळे चांगलेच पोळून निघालो, आठवतंय ना? आत्ता आत्ताची तर गोष्टंय ती. तिसऱ्या लाटेचा इशारा सगळे तज्ज्ञ देत असताना एवढे कसे बेफिकीर! डॉक्टरचं, कंपौंडरचं कुणाचंही ऐका... पण भल्याचं असेल ते ऐकाच बुवा.


छायाचित्र सौजन्य - www.peepsburgh.com

गणेशोत्सवातील गर्दी, मंडप, आणि ढोल-ताशे
हे दिवस पावसाचे. आणि उत्सवाचे. दोन्हींत चिंब भिजण्याचे. माझी तुम्ही आतुरतेनं वाट पाहत असता. मीही तेवढाच उत्सुक असतो तुम्हाला भेटायला. एव्हाना गल्लीबोळात, रस्तोरस्ती मंडप उभे राहिलेले असतात. त्यावरून वृत्तपत्रांत बातम्या आलेल्या असतात, काही सजग, जागृत नागरिक पत्रंही लिहितात. मंडळांचे कार्यकर्ते थोडे जास्तच उत्साहात असतात. सजावटी ठरलेल्या असतात. ढोल-ताशा पथकांना सुपारी दिलेली असते. तुम्ही सगळे माझ्या उत्सवात दहा-अकरा दिवस धमाल करता. एक से बढकर एक देखावे असतात. लहान मुलांसाठी, त्यांच्या आई-बाबांसाठी, आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरं...असं खूप काही असतं. तुम्हाला नाचायचंही असतं बेफाम. आपला बुवा नाचण्याला बिल्कुल विरोध नाही. नाचायला काय पब किंवा डिस्कोथेकच हवा काय प्रत्येक वेळी? मिरवणुकीतल्या तुमच्यातल्या दोन-पाच जणांचा पदन्यास बघून माझेही पाय थिरकायला लागतात. तसं वागणं योग्य ठरणार नसतं ना. कारण 'उत्सवमूर्ती' असतो मी.

दर वर्षी एक तरी गाणं हिट होतच असतं उत्सवाच्या निमित्तानं. ते 'ज्वेल थीफ'मधलं गाणं तुम्हाला सांगितलंच. पुढं कधी तरी 'गाओ ओम शांति ओम...' आलं. शांतता पाळायला एवढं ओरडून, ढणढण वाजवतं सांगावं लागतं होय. त्या वर्षी हा शांतिजप ऐकताना कान किटून गेले माझे.

परत काय आहे की, मला एकाच वेळी अनेक गाणी ऐकणं भाग असतं. एका मंडपाचा ध्वनिवर्धक माझ्या समोर लताबाईंनी गायिलेली आरती ऐकवत असतो, तर दुसऱ्या मंडपाचा कर्णा 'चल छय्या, छय्या' म्हणत माझ्या कर्णाकडेच रोखलेला असतो. 'शांताबाई, शांताबाई...' असं कोण कुणाला पुकारतंय हे ऐकावं म्हटलं तर तिसरीकडून 'पार्वतीच्या बाळा...' अशी लडिवाळ हाक कानी पडते. 'देवा श्री गणेशा' एका बाजूला चालू असतं, तर लांबून कुठून तरी 'देवा हो देवा गणपति देवा...' असं मला आळवत कुणी 'हमसे बढकर कौन?' अशी प्रौढी मिरवत असतं.

हे उत्साहभारित वातावरण मलाही फार सुखद वाटत असतं. कधीच कंटाळा येत नाही. वर्तमानपत्रांत देखाव्याची पान भरून छायाचित्रं येतात. 'देखावे पाहता पाय थकले, पण डोळे नाही निवले' हे नेहमीचंच यशस्वी वाक्य कुणा बातमीदार-उपसंपादकाला द्यायचं असतं. एखादा उत्साही उपसंपादक 'रंग गुलाली ढोल वाजती, आले आले गणपती' असं उत्सवी शीर्षक देऊन बहार आणत असतो.


छायाचित्र सौजन्य - www.subpng.com

पण यंदाही, सलग दुसऱ्या वर्षी ह्या सगळ्यावर नाही, पण बऱ्याचशा कार्यक्रमांपुढं फुली मारायचीच. नियम पाळू. मला छान मखरात बसवा, गौरींची मस्त सजावट करा...पण हे सगळं आपल्यापुरतं; त्याला सार्वजनिक स्वरूप नको. यंदाही सजावटीचा भव्य मांडव नको. दर्शनाला आणि आरतीला गर्दी नकोच. तुम्ही मनोमन केलेला नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचणारच. आशीर्वादासाठी माझा हात उंचावलेलाच आहे. गाणी नको, ढोल-ताशे नको, पाय थिरकावणारा नाच नको आणि गर्दीचा उत्सवी उत्साह नकोच नको.
------
हेही वाचा - 
इटलीचे इंग्लडला पत्र...
https://khidaki.blogspot.com/2020/04/ItalyUK.html
------

हे सगळं मलाही थोडंच गोड वाटतं? खंत आहेच की. चुकल्यासारखं वाटतंय. लागोपाठ दुसऱ्या वर्षी भक्तांपासून थोडं लांबच राहायचं? पण इलाज नाही. मला सांगा, मास्क लावलेल्या रूपात माझं दर्शन तुम्हाला आवडेल का? तुमचे फुललेले चेहरे बघताना माझी अवस्था 'रूप पाहता लोचनी, सुख जालें वो साजणी' अशी होते. तुम्ही मास्क बांधूनच येणार. मग मला तुमचा फुललेला चेहरा कसा दिसणार? आणि मास्क न लावताच आलात, तर मला नाही हं आवडणार. नकोच ते! 

फ़िराक़ गोरखपुरीसाहेबांचा शेर आहे - 

तुम मुख़ातिब भी हो, क़रीब भी हो
तुमको देखें कि तुम से बात करें

दुरूनच साधतो संवाद
माझी अवस्था अगदी तशीच आहे मित्रांनो. पण सध्याचा काळ लक्षात घेऊन तुम्हाला जवळून पाहण्यापेक्षा हा दुरून संवाद साधणंच योग्य आहे, असं मला वाटतं. ती म्हण आहे ना, एका जत्रेनं देव काही म्हातारा होत नाही. एकच्या ऐवजी आपण दोन उत्सव म्हणू.

मला बोलावलंत, मी आलोय. दर वर्षीच्या उत्साहानंच तुम्ही 'आधी वंदू तुज मोरया' असं म्हणाच. ऐकताना छान वाटतं. पण तसं म्हणताना मी वर जे काही लिहिलंय ते ध्यानात घेऊन 'सगळं ऐकू तुझे मोरया' असंही वचन मला द्या. पुढच्या वर्षी धमाल करू. दोन वर्षांची कसर पुरेपूर भरून काढू. हो ना?

ऐक्यं बलं समाजस्य तदभावे से दुर्बल:
तस्मादैक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिण:||

... ह्या श्लोकाचा भावार्थ असा की, ऐक्य हीच समाजाची ताकद आहे. ऐक्य नसलेला समाज आणि पर्यायाने तो देश दुबळा ठरतो. म्हणूनच राष्ट्रहिताचा विचार करणारे ऐक्याला प्रोत्साहन देतात. ह्या महामारीला पिटाळून लावण्यासाठी आपल्याला असंच ऐक्य दाखवावं लागेल.

यंदा निश्चयच करू. दीड वर्ष ठाण मांडून बसलेल्या ह्या कोरोना-विघ्नाला हरवू या, पुढच्या वर्षी दुपटीनं आनंद साजरा करू या. तुम्ही म्हणता ना मला, 'पुन्हा पुन्हा तुम्ही यावे, विद्या ज्ञान आम्हा द्यावे'. आतापुरतं एवढं ज्ञान बास झालं की. 

काळजी करू नका, आवश्यक ती काळजी मात्र घ्या. बाकीचं पाहायला मी आहे ना समर्थ! 

तुमचा सगळ्यांचा,

बाप्पा

.....

------
ब्रिटिश अर्थतज्ज्ञाची वाङ्मयचौर्याबद्दलची मुलाखत तुम्हाला नक्की आवडेल - 

https://khidaki.blogspot.com/2020/05/Lilico-Loksatta.html

टिप्पण्या

  1. खूपच सुंदर लिहलय..
    अगदी जणू बाप्पाचं बोलतोय असच वाटलं क्षणभर..

    उत्तर द्याहटवा
  2. वा ! मामाश्री!! दिलीप वेंगसरकरच्या सहजसुंदर फलंदाजीसारखा सहज सुंदर लेख! आनंदी वातावरणाचा वेध घेत,खंत व्यक्त करता करता , समाजाला जागृत करणारा लेख! आपली खिडकी वरचेवर उघडावी!!! खिडकी उघडल्यावर येणारी झुळूक सुखावून जाते!!! श्रीकांत जोशी

    उत्तर द्याहटवा
  3. गणपती बाप्पा भक्तांना सुबुद्धी देवो!!
    💐💐🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  4. उत्साही भक्तांना कोपरखळ्या मारत, योग्य अयोग्य प्रथांचा निर्देश मार्मिकपणे करत, सध्याच्या स्थितीत औचित्य साधून उचित इशारा दिला आहे.खुसखुशीत वर्णनशैली आवडली.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ ळ ’ जाऊन तिथं ‘ ल ’ कसा येतो ? हिंदीमध्ये ‘ ळ ’ च्या जागी ‘ ल ’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू केले. ' ळ ' ऐवजी ' ल ' चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये ' ळ ' च वा...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

गावसकर नावाचं गारूड आणि 'क्रीडांगण'चा विशेषांक

  ते वर्ष महत्त्वाचंच होतं. आता इतिहासात स्थान मिळवलेल्या अनेक घडामोडी त्या वर्षात घडल्या. उदाहरणार्थ, इदी अमिन ह्यांनी लष्करी उठाव करून युगांडाची सत्ता ताब्यात घेतली. चीननं अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाला आमंत्रण देऊन ‘ पिंगपाँग डिप्लोमसी ’ सुरू केली. अमेरिकेनं सव्विसावी घटनादुरुस्ती करून मतदाराचं वय १८ वर्षावर आणलं. भारत आणि सोव्हिएत रशिया ह्यांनी २० वर्षांच्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ‘ द न्यू यॉर्क टाइम्स ’ नं ‘ पेंटॅगॉन पेपर्स ’ प्रसिद्ध करून युद्धखोर अमेरिकी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणला. ‘ वॉल्ट डिस्ने वर्ल्ड थीम पार्क ’ चं उद्घाटन झालं. वगैरे वगैरे... ते वर्ष होतं १९७१. हिमाचल प्रदेशाच्या रूपानं भारतात अठरावं राज्य निर्माण झालं. पश्चिम बंगालला महापुराचा आणि ओडिशाला (तेव्हा ओरिसा) वादळाचा महाभयंकर तडाखा बसला. वरच्या सगळ्या घटना-घडामोडी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याहून खूप खूप महत्त्वाचं असं ह्याच वर्षानं दिलं. पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनीच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या सैन्यदलानं पाकिस्तानची नांगी ठेचली ती हेच वर्ष संपता संपता. बा...