Monday 27 February 2023

शुभेच्छा आणि शुभेच्छा!


(कलाकार - ज्ञानेश शिंदे, नगर)

‘मराठी मुमूर्षू झाली आहे’,
ह्या शतकापूर्वीच्या विधानाला
पाठिंबा देणाऱ्यांना शुभेच्छा!

‘मराठीला ह्या जन्मात मरण नाही’,
मनाशी असा ठाम विश्वास
बाळगणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठी शिकून पैसे कमावणं,
जगणं कठीण आहे, असं
मानणाऱ्यांना शुभेच्छा!

तांत्रिक शब्दांना मराठी
प्रतिशब्द शोधू पाहणाऱ्यांची
टिंगल उडवणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठीच्या कमी होणाऱ्या
वापराबद्दल इतर भाषांना सदैव
दूषणं देणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठीबद्दल न्यूनगंड बाळगून
सार्वजनिक जीवनात परभाषा
बोलणाऱ्या मंडळींना शुभेच्छा!

मराठीबद्दल अहंगड कुरवाळत
परभाषांच्या आक्रमणाबद्दल
तलवार उपसणाऱ्यांना शुभेच्छा!

पोरा-नातवंडांना इंग्रजी माध्यमातून
शिकवून मातृभाषेतील शिक्षणाचं
महत्त्व तावानं सांगणाऱ्यांना शुभेच्छा!

मराठीच्या दुरवस्थेचं खापर
इंग्रजी, हिंदी भाषांवर
फोडणाऱ्यांना शुभेच्छा!

दिनाच्या मुहूर्तावर आठवण
येऊन माय-मराठीची
काळजी करणाऱ्यांना शुभेच्छा!

मुहूर्तावर विनोद करण्यासाठी
आंग्लाळलेले परिच्छेद लिहिणाऱ्या
‘विनोदवीरां’ना शुभेच्छा!

एकादशी, संकष्टी, पांढरा बुधवार
ह्याप्रमाणे मराठी गौरव दिनाच्या
शुभेच्छा देणाऱ्यांना शुभेच्छा!

व्हॉट्सॲप, फेसबुकवर
शुभेच्छांचे वेचक संदेश
पुढाळणाऱ्यांना शुभेच्छा!

ज्ञानोबा, तुकोबा, रामदास,
राजवाडे, कुसुमाग्रज आदींना
वेठीस धरणाऱ्यांना शुभेच्छा!

माय मराठीचा उमाळा येऊन
लेख-कवितांचा रतीब टाकणाऱ्या
माझ्यासारख्यांनाही शुभेच्छा!


परप्रांतांतून, परदेशांतून
इथं येऊन प्रेमापोटी
मराठी शिकणाऱ्यांना शुभेच्छा! 

ह्यातलं काहीच माहिती नसताना
रोज मराठी बोलून-वाचून-ऐकून
 भाषा वाढविणाऱ्यांनाच शुभेच्छा!
....
मराठी ‘आम आदमी’


#मराठी #मराठी_भाषा #मातृभाषा #माय_मराठी #मराठी_गौरवदिन #मराठी_राजभाषा 

#शुभेच्छा


थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...