Tuesday 30 January 2024

काही अधिक-उणे, बाकी सगळं ओक्के!

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस दुसरा व तिसरा


कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाच्या यशाचं मोजमाप अलीकडे दोन निकषांवर केलं जातं – गर्दी किती जमली 
आणि पुस्तकं किती खपली? हे दोन्ही निकष दुसऱ्या मराठी विश्व संमेलनाला लावणं अवघड आहे. आणि तसंही हे काही निव्वळ साहित्य संमेलन नाही. हे विश्व मराठी संमेलन असल्याचा विसर होऊ न देता निकष लावायला हवेत. पुस्तकांची विक्री न झाल्याची रडकथा एका मराठी दैनिकात मंगळवारी (दि. ३०) प्रसिद्ध झालीच आहे. पहिला म्हणजे अर्थात गर्दीचा निकष लावायचा झाला, तर समारोपाच्या दिवशी सभागृहात ती फार दिसली नाही.

भरगच्च कार्यक्रम असलेलं, रेंगाळलेलं, कार्यक्रमपत्रिका फारशी काटेकोरपणाने अमलात न आलेलं, आळसावलेलं असं हे संमेलन होतं. आणि असं असूनही त्यातले काही कार्यक्रम गाजले. त्यातील बातमीमूल्यामुळे माध्यमांना इच्छा असूनही दुर्लक्ष करता आलं नाही.

महत्त्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे शेवटचे दोन्ही दिवस संमेलनाच्या व्यासपीठावरून सरकारवर टीका झाली. ती कोणी कितपत गांभीर्याने घेतली, हे यथावकाश कळेल.

दोन वक्त्यांचा टीकेचा सूर
मराठीचा जागर आणि गजर असं बिरूद मिरविणाऱ्या ह्या संमेलनात मराठीबद्दल जनतेपासून राज्यकर्त्यांपर्यंत कोणालाच काही पडलेलं नाही, असा थेट आरोप केला श्री. मिलिंद शिंत्रे ह्यांनी. ते अमेरिकेतील शाळा वगैरे ठीक आहे. आधी महाराष्ट्राकडं लक्ष द्या, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी रविवारी सुनावलं. ह्या दोघांनाही टाळ्या पडल्या.
 
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचे मानकरी होते राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर. डॉ. माशेलकरांनी ४५ मिनिटांचं भाषण संपवलं, तेव्हा अवघ्या सभागृहातील श्रोत्यांनी उभं राहून त्यांच्याबद्दल वाटणारा आदर व्यक्त केला.
 
स्वतःचा कडवट मराठी असा सुरुवातीलाच उल्लेख करीत राज ह्यांनी मराठी तुमची ओळख आहे; तीच पुसून का टाकता?’ असं विचारलं. (कडवट आणि कडवा ह्या दोन्ही शब्दांच्या अर्थामध्ये फरक आहे, हे कोणी तरी कोणाला तरी एकदा गोडीगोडीत समजावून सांगायला हरकत नसावी!😇)
 
संमेलनात सर्वाधिक दाद मिळविली ती राज ह्यांनीच. त्यांना पाहण्यासाठी, त्यांचे फोटो काढण्यासाठी आधी व्यासपीठावर आणि नंतर मार्गिकेत तोबा गर्दी झाली होती. त्यांनी मांडलेले काही मुद्दे –
Ø  हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हे. राष्ट्रभाषेचा निवाडा झालेलाच नाही. हे मी १५-२० वर्षांपूर्वी बोललो तेव्हा लोक अंगावर आले माझ्या.
Ø  महाराष्ट्रातील शहरांमध्ये हिंदी कानावर पडते, तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते. मराठी समृद्ध भाषा आहे आणि ती घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे.
Ø  पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. अन्य जर्मन, फ्रेंच अशा कोणत्याही भाषा शिका हवं तर; पण स्थानिक भाषा शिकलीच पाहिजे. (असा निर्णय सरकारनं घेतल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ह्यांनी नंतर सांगितलं. त्याबद्दल त्यांचे राज ह्यांनी आभारही मानले.)
Ø  पंतप्रधानांना स्वतःचं राज्य, स्वतःची भाषा ह्याबद्दल प्रेम आहे. ते लपून राहत नाही. मग आपणच आपल्या राज्याबद्दलचं प्रेम का लपवतो? प्रत्येक राज्य व देश आपली भाषा आणि आपली माणसं जपतात. मग आपणच गोट्यासारखे घरंगळत का जातो? (ही टीका नाही, तर वस्तुस्थिती आहे.)
Ø  आपण मराठीतच बोलू. समोरच्याला मराठीत बोलायची सवय लावू. तो चुकला तर हसू नका आणि टिंगल करू नका. त्यामुळं ते मराठी बोलायचा संकोच करतात.
 
विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुडझेप असा परिसंवाद असल्याचा उल्लेख कार्यक्रमपत्रिकेत होता. वक्ता म्हणून एकट्या डॉ. माशेलकर ह्यांचं नाव होत. त्यांच्यापर्यंत विषय पोहोचविला होता की नाही, ह्याची शंका यावी. कारण ४५ मिनिटांच्या व्याख्यानात त्यांनी वारंवार मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती असाच उल्लेख केला.

तत्त्वाचा प्रश्न आला की भांडायचं
हळदीच्या  (जिंकलेल्या) लढाईचा डॉ. माशेलकर ह्यांनी आवर्जून उल्लेख केला. ती तत्त्वाची लढाई होती आणि तत्त्वाचा प्रश्न आला की भांडायचंच, हा मराठी बाणा ह्या त्यांच्या टिप्पणीला जोरदार दाद मिळाली. ज्ञानोपासना व देशभक्ती ह्यांचा संगम मराठी माणसांमध्ये आढळतो. तो बाहेर जातो, तेव्हा त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र पोहोचत असतो, असं ते म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी सहाच्या सुमारास संमेलनस्थळी आले. मी चांद्याचा आणि केसकर बांद्याचे. त्यामुळे हे संमेलन चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या मराठी माणसांचे आहे, अशी कोटी त्यांनी केली. त्यांच्या उपस्थितीत मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळालेल्या सनदी अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर ह्यांना आमच्या विदर्भाचे फडणवीस अशी ओळख सांगण्याचा मोह आवरता आला नाही! ‘सर्व नवीन गोष्टींना फडणवीस ह्यांचा पाठिंबा असतो. महाराष्ट्राला लाभलेल्या व्हीजनरी मुख्यमंत्र्यांपैकी एक, असा गौरव मंत्री व संमेलनाचे यजमान दीपक केसरकर ह्यांनी केला.
 
इंग्रजीच्या विरोधाचा सूर अशा संमेलनांच्या व्यासपीठावर कायमच लागताना दिसतो. त्याला छेद देत श्री. फडणवीस म्हणाले, इंग्रजी व्यवहारभाषा झाली आहे. मुलांना हवं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाका; पण घरी मराठीतच बोला.
 
मराठी मातीमध्येच वैश्विकता आहे. महाराष्ट्र जगाच्या पाठीवर कोठेही दिसतो. मराठी सनातन आणि शाश्वतही आहे. मराठी भाषा विद्यापीठाने जगभरातील मराठी माणसांशी आणि संस्थांशी जोडून घ्यावे, असं श्री. फडणवीस म्हणाले.
 
मराठी मानकांचं जतन
श्री. फडणवीस ह्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. मराठी माणसाच्या पराक्रमाच्या खुणा आणि मानके देशभर आहेत. ती आपला स्वाभिमान वाढविणारी आहेत. त्या मानकांचं जतन केलं जाईल.

व्यवहारात मराठीचा वापर आणि अर्थार्जनाची भाषा ह्या चांगल्या विषयावरची दोन वक्त्यांची चर्चा श्री. फडणवीस ह्यांचं स्वागत करण्यासाठी गुंडाळली गेली. हे वक्ते होते, भारतीय विदेश सेवेतील निवृत्त अधिकारी व ज्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलं आहे ते ज्ञानेश्वर मुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (पहिल्यांदाच) मराठी माध्यमातून देऊन तिसरा क्रमांक मिळविलेले श्री. भूषण गगराणी. ह्या दोघांचंही मूळ पीठ कोल्हापूर. त्याचा स्वाभाविकच उल्लेख झाला. श्री. गगराणी म्हणाले की, मराठीतून शिकण्याबद्दल न्यूनगंड वगैरे बाळगण्यासारखी स्थिती कोल्हापुरात नाही. तोच राजमार्ग आहे. तिथं कोणतीही भाषा मराठीतूनच बोलली जाते!
 
श्री. मुळे ह्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे –
Ø  जगात इंग्रजी महत्त्वाचं आहे, पण अनिवार्य नाही. आपली भाषा वापरणारे देशच (किंवा प्रदेशही) सर्वांगीण प्रगती करू शकतात. आपली अर्थार्जनाची भाषा मराठीच आहे. भाषेच्या प्रचारावर लक्ष केंद्रित न करता कला-संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करायला हवेत.
Ø  प्रभावशाली व्यक्ती व संस्था व्यापक प्रमाणात असणं आवश्यक आहे. आपली प्रभावी माणसे जगभर असावीत. दिल्लीत पूर्वी फार कमी मराठी अधिकारी होते. आता ही संख्या साडेतीनशेच्या घरात आहे.
Ø  भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकार व नागरिक ह्यांनी एकत्र आलं पाहिजे. देशातील महत्त्वाच्या १० विद्यापीठांमध्ये मराठी अध्यासन तातडीने सुरू करायला हवे. त्यासाठी काटकसरी स्वभाव बदलून पैसे खर्च करायला शिकायला हवं.
Ø  तुमचे राजदूत परदेशात आहेत, त्याही पेक्षा देशाच्या विविध प्रांतांमध्ये आहेत. ह्या जवळपास दोन कोटी मराठी माणसांचा आपण मराठीसाठी उपयोग करीत नाही. त्यामुळे ही माणसे, त्या प्रदेशातील संस्था बदलून अमराठी होत आहेत.
Ø  देशभरातील मराठी संस्थांना, शाळा-महाविद्यालयांना सरकारने (आर्थिक) बळ दिलं पाहिजे.
Ø  मराठी माणसं बहुसंख्येनं असतील, तिथे आपले लोकप्रतिनिधी असावेत.
Ø  मराठी माणूस व्याकरणाची उत्तम जाण असलेला आहे. इतर राज्यांहून आपल्याकडे ज्ञानाच्या अनेक शाखा उपलब्ध आहेत. मराठी माणसाचं पाऊल आत्मविश्वासानं पडलं पाहिजे.
 
श्री. गगराणी ह्यांनी मांडलेल्या ठळक गोष्टी -
Ø  अर्थार्जनाचा आणि भाषेचा काय संबंध? रोजगार, व्यवसाय वा अर्थार्जन केवळ भाषेमुळे करता येत नाही. त्यासाठी विविध क्षमता आवश्यक असतात. त्या वाढवाव्या लागतील.
Ø  केवळ भाषिक जाणीव किंवा अस्मिता वाढल्याने अर्थार्जन वाढणार नाही.
Ø  आघाडीवर असलेल्या देशाची भाषा आर्थिक विश्वाची भाषा असते. ती स्वीकारण्यात कमीपणा वाटू नये.
Ø  मराठी माणूस कमी तडजोड करणारा आणि भूमिका घेणारा.
Ø  भाषेच्या विकासात संस्थात्मक उभारणी महत्त्वाची. विश्वकोश मार्गी लावणं हे महाराष्ट्राचं फार मोठं काम आहे.
Ø  भाषा समाजाचा अंगभूत घटक आहे. तो केवळ सरकारचा विषय नाही. सरकार व्यवस्था करू शकतं, ती पुढे नेणं ही समाजाची जबाबदारी.
 
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात मराठी भाषा भवनाचं सादरीकरण झालं. श्री. दीपक केसरकर ह्यांनी तिन्ही दिवस सातत्यानं ह्या भवनाची माहिती दिली. मराठीविषयक सर्व कार्यालये ह्या एकाच इमारतीत असतील. मराठीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी ह्या भाषा भवनाचा उपयोग होईल, असं त्यांनी आग्रहानं सांगितलं.


ह्याच सत्रात श्राव्य ज्ञानेश्वरीचं प्रकाशन झालं. एकूण ५२ तास ऐकता येईल, अशी ही ९ हजार ३३ ओव्यांची ज्ञानेश्वरी राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण २२ गायकांच्या आणि ५० जणांच्या चमूच्या मदतीनं हे श्राव्य पुस्तक साकारणारे संगीतकार राहुल रानडे ह्यांनी त्यासाठी मदत केलेल्या सर्वांचा अतिशय कृतज्ञतेने उल्लेख केला. त्यांचं पुढचं स्वप्न आहे तुकाराममहाराजांची गाथा अशीच उपलब्ध करणं. त्याचा व्याप असेल – ४५ हजार अभंग, १५ संगीतकार आणि १०० गायक!
 
तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा वापरविषयावरचा परिसंवाद तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात झाला. त्यात मिलिंद शिंत्रे, डॉ. आशुतोष जावडेकर व सुयोग रिसबूड सहभागी झाले. तुम्ही मराठी लोक कोणत्या क्षेत्रात पुढं आहात? काही विचारलं की भूतकाळाकडे बोट दाखविता!’, ह्या अन्य भाषकांच्या सततच्या खिजवण्यामुळे आपण जगातलं सर्वांत मोठं शब्दकोडं बनवलं, असं श्री. शिंत्रे म्हणाले.
 
दृश्यात्मकतेचं आव्हान
ह्या व्यासपीठावर सर्व भाषा समभावाची भूमिका मांडताना डॉ. जावडेकर म्हणाले, जो माणूस कोणत्या एका भाषेवर प्रेम करतो, तो अन्य कोणत्या भाषेचा दुःस्वास करूच शकत नाही. कंटेन्टबद्दल मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते म्हणाले की, तुमची अभिव्यक्ती मनापासूनची असेल, तर समोरच्याला ती आवडतेच. तुम्ही मांडता, दाखविता ते सजीव आणि सच्चं असेल, तर त्याचा आस्वाद घेणाऱ्याची दाद मिळतेच. दृश्यात्मकतेची व्यापकता सर्वच भाषांसाठी वर्तमानातलं आणि भविष्यातलं मोठं आव्हान आहे.
 
मराठी भाषेपेक्षा मराठी जनांची भावना खूप महत्त्वाची वाटते, असं श्री. रिसबूड म्हणाले. स्मृतिरंजनाची भावना सर्व पिढ्यांतील लोकांना खेचून घेते. ह्या प्रवासात विविध प्रयोग केल्याचं त्यांनी सांगितलं.

कंटेन्ट तयार करताना प्रेक्षकवर्गाची गणितं कशी संभाळता, ह्याला उत्तर देताना श्री. शिंत्रे ह्यांनी षट्कारामागून षट्कार लगावले. त्यांनी व्यक्त केलेला संताप प्रामाणिक होता; त्या मागची चीड स्पष्टपणे दिसत होती. ते काय म्हणाले?
Ø  मराठी माणसांना भाषेबद्दल काही सांगणारे, प्रामाणिक प्रयत्न आवडत नाहीत. त्यांना सवंग मनोरंजन, अरबट-चरबट व्हिडिओ आवडतात.
Ø  प्रत्येक मराठी वृत्तपत्राला आणि वृत्तवाहिनीला आपल्या भाषेविषयी अनास्थाच आहे. ते फक्त धंदा करायला बसले आहेत. कोणत्याही वृत्तपत्राच्या कोणत्याही पानात भाषेविषयीच्या किमान पंचवीस चुका आढळतील. हे वर्षानुवर्षं चालू आहे. वृत्तपत्रे, वाहिन्या ह्यांना भाषेबद्दल अजिबात कळवळा नाही.
Ø  राजकीय पातळीवरही कोणाला भाषेचं काही पडलं नाही. मराठी दिनाच्या कार्यक्रमात मी मंत्रालयचा अर्थ विचारला. तो कोणालाच सांगता आला नाही. मंत्र्यांचं आलय असाच व्याकरणदृष्ट्या चुकीचा अर्थ त्यांनी सांगितला. मंत्र म्हणजे विचारविनिमय जिथे होतो ते मंत्रालय’!
Ø  शालेय पुस्तकांमध्येही चुकीचंच मराठी दिसतं.
 
ह्या संमेलनासाठी विविध देशांमधून आलेल्या मराठी माणसांनी तिन्ही दिवस आपले अनुभव सांगितले. त्यात मराठी शाळा आणि शिवछत्रपतींच्या विचाराचा गजर, हे दोन मुद्दे ठळकपण जाणवले. उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे, अर्थात बीबीएमचे उपक्रम अधिक व्यापक असल्याचं दिसलं. मराठी उद्यमशीलतेला गती देण्याचं उद्दिष्ट असलेल्या गर्जे मराठी ग्लोबलच्या कामाचं स्वरूपही सांगण्यात आलं. सध्या सर्वांमध्येच ज्याची चर्चा जोरात चालते, त्या कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) विषयाचं स्पष्टीकरण करणारं पुस्तक मराठीतून प्रकाशित होणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवे कल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं, श्री. माधव दाबके ह्यांनी सांगितलं.
 
सरकारी खाक्याची चुणूक
संमेलन सरकारी असल्याची जाणीव अवचितपणे होत होतीच. संमेलनास रोज येणाऱ्यांनी भ्रमणभाष क्रमांक लिहून स्वाक्षरीसह वहीत नोंद करणं आवश्यक होतं. संजय भास्कर जोशी व मंगला गोडबोले कार्यक्रमासाठी वाट पाहत प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या. त्यांच्यापुढेही ती नोंदवही सरकावण्यात आली. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे पहिल्याच सत्रातील परिसंवाद सहभागी होऊन परत निघाले होते. कोणी तरी त्यांना वाटेतच थांबवून ती वही पुढे केली आणि त्यांच्या उपस्थितीची कागदोपत्री अधिकृत नोंद केली! मराठी मराठी असा जयघोष चाललेल्या संमेलनासाठी आलेल्या अनेकांच्या ह्या नोंदवहीतील स्वाक्षऱ्या इंग्रजीत आणि भ्रमणभाष क्रमांक त्याच इंग्रजी आकड्यांत होते.

बाकी मग एवढं नक्की म्हणता येईल, काय संमेलन, काय जेवण, काय थाट... सगळं कसं एकदम ओक्के!’
…..
#मराठी #विश्व_मराठी_संमेलन #मराठी_माणूस #ज्ञानेश्वरी #डॉ._माशेलकर #देवेंद्र_फडणवीस #दीपक_केसरकर #राज_ठाकरे #ज्ञान_तंत्रज्ञान #मराठी_भाषा #अर्थार्जन
....
पहिला भाग इथे वाचता येईल -
https://khidaki.blogspot.com/2024/01/Vishwa-Marathi.html

Monday 29 January 2024

मराठीचा जागर, गजर वगैरे

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस पहिला

 

अनुदान देऊन उद्घाटनाच्या किंवा समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये समस्त उपस्थितांना खूश करून टाकणारी आश्वासने देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारमधील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ह्यांच्यावर असते ती साहित्य संमेलनात. त्याच राज्य सरकारनं संमेलनाचं यजमानपद भूषविण्याची जबाबदारी मागच्या वर्षापासून स्वीकारली. विश्व मराठी संमेलन. जगभरात स्थिरावलेल्या मराठी माणसांना मायभूमीत एकत्र आणणं, हे त्याचं उद्दिष्ट. त्याचं पहिलं पर्व मागच्या वर्षी मुंबईत पार पडलं. नवीन पर्व नव्या शहरात, म्हणजे नवी मुंबईत सुरू झालं आणि वर्षानुवर्षे जसं म्हणण्याची प्रथा आहे, त्यानुसार आज ह्या संमेलनाचं सूप वाजेल.
 
तांत्रिक कारणांमुळे यंदाचं संमेलन उशिरा आयोजित करावं लागलं, असं ह्या संमेलनाचे एक खांबी तंबू असलेले मराठी भाषामंत्री दीपक केसरकर ह्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमातच सांगितलं. तथापि ही तांत्रिक किंवा अन्य कारणं काय, ह्याचं बरंच चर्वितचर्वण माध्यमांमधून आधीच झालेलं आहे.
 
बहुसंख्य लोकांचा सहभाग किंवा हजेरी असलेले कार्यक्रम शक्यतो वेळेवर सुरू होणार नाहीत, ह्याची पुरेपूर दक्षता घेणं ही आपली प्रथा आहे. ती इथंही पाळली गेली. संमेलनाचं उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता होणार होतं. आंदोलन मिटवल्याचा गुलाल अंगावर घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तासभर उशिराने आले. साधारण पाच मिनिटं बोलून ते पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. सलग दुसऱ्या वर्षी मला ह्या संमेलनाचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं; पण तो मान राज्यपालांचा होता. तर ते असो!
 
संमेलनाच्या पहिल्याच दिवशी (प्रथेनुसारच!) भरगच्च कार्यक्रम होते. पण हा दिवस लक्षात राहील तो दोन गोष्टींसाठी – राज्यपालांचं मुद्द्याला धरून असलेलं फक्त १४ मिनिटांचं भाषण आणि मराठी पुस्तकांचं जग ही चर्चा. दोनच वक्ते असलेली ही चर्चा विषयाला धरून झाली. लेखक आणि मग पुस्तकविक्रेते बनलेले संजय भास्कर जोशी, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले ह्यांनी नेमकी मांडणी केली.
 
राज्यपालांची खंत
मला ओघवतं मराठी बोलता येत नाही, ह्याचं दुःख होतं, खेद वाटतो, असं राज्यपाल रमेश बैस ह्यांनी सुरुवातीलाच सांगितलं. मराठी बोललेलं कळणाऱ्या आणि वाचता येणाऱ्या राज्यपालांनी मराठीची शिकवणी लावलेली आहे. श्री. केसरकर ह्यांनी आधीच ते सांगितलं होतं. त्याला श्री. बैस ह्यांनी जाहीर दुजोरा दिला.
 
श्री. बैस लहानाचे मोठे झाले रायपूरमध्ये. मराठी संस्कृतीची थोडी-फार छाप असलेलं हे शहर. ते म्हणाले, मराठी कुटुंबं भरपूर असलेल्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो. त्या कुटुंबांमधल्या मुलांशी खेळलो. ती मुलं घरात मराठीमध्ये संवाद साधत. माझ्याशी मात्र हिंदीत किंवा छत्तीसगढी भाषेत बोलत. ते मराठीत बोलत नव्हते, ह्याची खंत आज वाटते. त्यातून एवढंच स्पष्ट झालं की, समोरच्याच्या भाषिक भावना दुखावू नयेत ह्याची काळजी इथून तिथून सगळीकडचा मराठी माणूस घेतो, हेच चिरंतन सत्य!
 
लोक इंग्रजीत का बोलतात? त्यांना त्याच भाषेतून संवाद साधणं आवश्यक वा गरजेचं का वाटतं? त्याचं उत्तर देताना श्री. बैस म्हणाले, प्रभावशाली व्यक्तींचं समाज अनुकरण करीत असतो. ते इंग्रजीत बोलतात म्हणून समाज त्याच भाषेत बोलू पाहतो. इंग्रजीच अभिजात भाषा असल्याचा गैरसमज शिक्षितांनी निर्माण केला.
 
आपल्या देशात प्रामुख्याने दोन वर्ग आहेत – इंग्रजी बोलणारा व न बोलणारा. भारतीय भाषांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची वेळ यावी, ह्याचा साधा सरळ अर्थ असा की, काळ तर मोठा कठीण आला..!’, असंही राज्यपाल म्हणाले.
 
मराठी तरुणांच्या यशकथा पोहोचवा
मराठीचं महत्त्व कसं वाढेल किंवा ते वाढविण्यासाठी काय करावं लागेल, असं विचारून श्री. बैस ह्यांनी त्याचं उत्तर सविस्तर दिलं. ते म्हणाले, मराठी तरुणांना नवोद्यमी बनवा. त्यांनी पैसे कमवायला (धननिर्मिती) सुरुवात केल्यावर मराठीला महत्त्व येईल. महाराष्ट्रातील नेत्यांनी तरुणांशी चर्चा करावी, संवाद साधावा. मराठी तरुणांच्या  यशकथा विविध माध्यमांतून समाजापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. बोलीतील साहित्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावं.
 
शालेय शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवं, ह्या मुद्द्यावर भर देत श्री. बैस ह्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाटी साक्ष दिली. राज्यपालांनी भाषणाचा समारोप जय मराठी!’ अशा घोषणेनं केला आणि त्याच्या पुढच्याच मिनिटाला  सूत्रसंचालक ताईंनी आभार मानण्यासाठी नव्हे, तर ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी कोणाला तरी व्यासपीठावर आमंत्रित केलं!
 
वाचन संस्कृती कमी होत आहे, मराठीचं (आणि ती बोलणाऱ्या माणसांचं) काही खरं नाही, अशी रडगाणी गाण्याचे काही मुहूर्त असतात – साहित्य संमेलन, मराठी भाषा दिन वगैरे. मराठी पुस्तकांचा खप तर वर्षानुवर्षं टिंगलीचा, उपहासाचा विषय आहे. ह्या साऱ्याला खणखणीत उत्तर मिळालं मराठी पुस्तकांचं जग ह्या परिसंवादातून. अशा महत्त्वाच्या विषयावरची चर्चा ऐकण्यासाठी कमीत कमी श्रोते सभागृहात असावेत, हे ओघानंच आलं. आधीचा गाण्याचा, कवितांचा सुश्राव्य कार्यक्रम ऐकल्यानंतर बरीच मंडळी पाय मोकळे करायला आणि चहाने घसा ओला करायला बाहेर पडली होती.
 
रडकथा थांबवा
मराठी वाचन-संस्कृतीचं काही खरं नाही, ही सांस्कृतिक रडकथा थांबवा, असं श्री. संजय भास्कर जोशी ह्यांनी सुरुवातीलाच खणखणीतपणे सांगितलं. सजग वाचक, लेखक आणि सात वर्षांपासून पुस्तकाचं दुकान चालविणारा विक्रेता ह्या नात्यानं पुढची १५-२० मिनिटं त्यांनी जे काही सांगितलं, ते फार दिलासा देणारं होतं.
 
रडणं फार सोपं आहे. समाजात नकारत्मकतेला बरेच बरे दिवस आहेत आणि सकारत्मकतेला अंग चोरून उभं राहावं लागतं, असं सांगून श्री. जोशी म्हणाले, पुस्तकांवर अपार प्रेम आणि अफाट कष्ट करण्याची तयारी असेल, तर चिंता करण्यासारखी परिस्थिती मुळीच नाही. वाचणारा वर्ग किती होता पूर्वी? साडेतीन-चार टक्क्यांच्या घरात. तीच टक्केवारी आजही कायम आहे. पण लोकसंख्या किती वाढली आहे, ह्याचा विचार कराल की नाही? म्हणजे टक्केवारी कायम असली, तरी वाचकसंख्या निश्चित वाढलेली. गेल्या १५-२० वर्षांत मोठा बदल झाला आहे आणि तो म्हणजे पालक आपल्या मुलांना खासप्रसंगी पुस्तकं भेट म्हणून देतात.
 
मराठी ग्रंथव्यवसायाची क्षमता किती आहे? श्री. जोशी ह्यांच्या म्हणण्यानुसार ती पाच ते सहा अब्ज रुपयांच्या घरात आहे. सध्या एक ते सव्वा अब्जाच्या दरम्यान हा व्यवसाय रेंगाळतो आहे. ती निश्चित वाढविता येईल आणि त्यासाठी परदेशस्थ मराठीमित्रांना जाहीरपणे निमंत्रण देत श्री. जोशी म्हणाले, ही बाजारपेठ वाढविण्यासाठी सर्जनशील प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी लेखक, वाचक, प्रकाशक, विक्रेते आणि समीक्षक ह्यांनी एकत्र आलं पाहिजे.
 
श्री. जोशी ह्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे असे –
ü  समस्या असल्या, चुका झाल्या असल्या तरी मराठी पुस्तकांचं जग भरपूर वाढविता येण्यासारखं आहे.
ü  धार्मिक आणि पाकक्रियेचीच पुस्तकं खपतात, हे धादांत खोटं आहे. मांडणी बदलून पाहा, निवड बदलता येईल.
ü  माझ्या दुकानात येणारी तरुण मुलं प्रामुख्याने कुरुंदकर, जी. ए. आणि नेमाडे ह्यांची पुस्तकं घेतात.
ü  महाराष्ट्रातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये (ललित) पुस्तकांचं एकही दुकान नाही, ही शरम वाटण्यासारखीच गोष्ट.
ü  सध्याची सर्वांत मोठी समस्या म्हणजे सुमार पुस्तकांची बेसुमार निर्मिती. आणि वाचकांची मागणी असणारी पुस्तकं उपलब्ध नाहीत.
ü  कॉस्ट अकाउंटंट ह्या नात्यानं सांगतो की, पुस्तकविक्रीचा व्यवसाय फार उत्तम आहे!
ü  समाज वाचायला चातकासारखा उत्सुक आहे. मराठी समाजात उत्तमोत्तम वाचक आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे.
ü  समाज सुंदर करण्याचा मार्ग म्हणजे मुलांच्या हाती पुस्तकं देणं. वाचणाऱ्या समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तुलनेने फार कमी उद्भवतात.
 
आयुष्यातली गेली ६५ वर्षं रोज नित्यनियमाने पुस्तक वाचणाऱ्या ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले ह्यांनी संयतपणे थोडी वेगळी भूमिका मांडली. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांची भूमिका (ह्या जगाच्या) अलीकडली, पलीकडली आणि चोहीकडली होती. आपल्या आयुष्यातल्या तीन टप्प्यांनुसार त्यांनी पुस्तकाचं जग दाखवलं.
 
तेव्हा लेखक हीरो वाटत
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तो पहिला टप्पा. तो साधारण १९९०पर्यंत गृहीत धरला त्यांनी. त्या टप्प्यात लेखक जमात छोटी होती. पुस्तकं रंगरूपानं सामान्य आणि दिसायला रुक्ष, नीरस. समाजाला, विशेषतः वाचणाऱ्यांना लेखक हीरो वाटत. समाजाचं मनोभान टिकविण्याचं काम लेखकांनी केलं.
 
दुसरा टप्पा म्हणजे जागतिकीकरण-उदारीकरणाचा, १९९०नंतरचा. त्याबद्दल मंगला गोडबोले म्हणाल्या, छपाईचं तंत्रज्ञान सुधारलं, जगभरातल्या कल्पनांच दर्शन झालं. परिणामी पुस्तकं आकर्षक, देखणी झाली. पुस्तकांचं जग व्यापक झालं. नाना विषय आले. फॅक्ट+फिक्शन असा फॅक्शन प्रकार रूढ झाला. वेगवेगळ्या जगांचा परिचय करून देणारा रिपोर्ताज नावाचा प्रकार लेखनात आला. पण सन २०००नंतर ललित लेखन बरंच कमी झालं. तरल आणि उत्कट प्रेमकथा आता वाचायला मिळत नाहीत, अशी हळहळ त्यांनी बोलून दाखविली.
 
दुर्मिळ झाले संपादक
तिसऱ्या टप्प्यात, २०१०नंतर सामाजिक माध्यमांचा वरचष्मा दिसू लागला. ह्या काळात मासिक नावाची संस्था लोप पावली आणि लेखनावर संपादनाचा संस्कार नसणं, ह्या दोन महत्त्वाच्या बाबी मंगला गोडबोले ह्यांना खटकतात. त्या म्हणाल्या, समाजमाध्यमावर जे लिहिलं जात, त्याची गुणवत्ता तपासणारी, दुरुस्ती करणारी कोणतीच यंत्रणा नाही. मराठीत संपादक आता फार दुर्मिळ झाले आहेत. लेखकही एवढे चतुर की, ते लेखन बदलण्याऐवजी संपादकच बदलतात!”
 
ह्या टप्प्याची काही वैशिष्ट्यंही मंगला गोडबोले सांगतात. विषयाची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे. विज्ञानावर रंजकपणे ललित शैलीत लिहिलं जातंय आणि त्याला वाचकही आहेत. अभ्यास करून लिहिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मानसशास्त्र, बालसंगोपन, ललितकला आदी विषयांवर पुस्तकं येत आहेत.
 

मंगला गोडबोले
(छायाचित्र सौजन्य - राजहंस प्रकाशन)
.................
पुस्तकांची गर्दी ह्या टप्प्यात वाढलेली दिसते, असं सांगून मंगला गोडबोले म्हणाल्या,
लेखकांची आता थोडंही थांबायची तयारी नाही. खूप लेखकांना आपलं लेखन सुमार आहे, हे वाटतच नाही. बक्षिसांची संख्याही वाढली आहे. बक्षीस न मिळालेलं पुस्तक दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी वेळ आली आहे. (त्या हे म्हणाल्या, तेव्हा मला वाटलं की, उठून त्यांना सांगावं की, पुस्तकाला बक्षीस न मिळालेला मी लेखक आहे आणि त्याबद्दल आता बक्षीस द्या! 😆)
 
मंगला गोडबोले ह्यांची काही महत्त्वाची निरीक्षणं –
ü  एकच चांगलं पुस्तक लिहून थांबणाऱ्यांची संख्या वाढली. सातत्य नाही, ही गंभीर गोष्ट.
ü  मराठीतील उत्तम प्रतिभा जास्त करून चित्रपटांकडे वळली आहे.
ü  मराठी पुस्तकांचं जग आकाराने विशाल झालं आहे आणि मराठी साहित्यसृष्टी अधिक उत्सवी बनली आहे.
ü  मराठी मासिकं नाहीत आणि चांगले संपादकही नाहीत.
ü  सरकारकडून अपेक्षा आहेतच – बक्षिसं देता ती पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवावीत, पुस्तकांच्या दुकानांना अनुदान द्यावं, पुस्तकांचा टपालखर्च कमी करा.
ü  मराठी भाषेचं सौंदर्य झपाट्यानं लयाला जाताना दिसतं.
ü  मोठ्या शहरांमध्येही पुस्तकाची दुकानं कमी होत चालली आहेत.
 
मंगलाताईंनी समारोप करताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली – अन्न-वस्त्र-निवारा ह्याप्रमाणं पुस्तकं हीही चौथी मूलभूत गरज आहे. रोजचा दिवस गोड करण्याची ताकद फक्त आणि फक्त पुस्तकांमध्ये आहे.
 
उद्घाटनानंतर झालेला पहिला कार्यक्रम म्हणजे जयू भाटकर ह्यांनी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे व साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे ह्यांच्याशी साधलेलेला संवाद. मराठीच्या वैश्विक प्रचारासाठी हा विषय होता.
 
डॉ. शोभणे म्हणाले, परदेशस्थ मराठी मंडळी मराठी साहित्यावर आणि संस्कृतीवर प्रेम करणारी आहेत. पण मराठई साहित्यामध्ये त्यांचं चित्रण प्रामुख्याने नकारात्मकच आलं. त्यांच्याही अडचणी आपण समजून घेणे आवश्यक आहे. आपली माणसं परदेशात जातात ह्यात गैर काही नाही. तो अनुबंध टिकवून ठेवणं आवश्यक आहे.
 
पाच ते दहा वयोगटातील मुलांना वाचनाकडे आकृष्ट करण्यासाठी त्यांच्या पातळीवरची पुस्तकं तयार करण्याची गरज डॉ. शोभणे ह्यांनी मांडली. क्रमिक पुस्तकांकडे गांभीर्याने पाहायला हवं, असं सांगताना त्यांनी जुन्या क्रमिक पुस्तकांचं व्यापक रूपाचं उदाहरण दिलं.
 
आपणच त्यांना दूर लोटतो?
उषा तांबे म्हणाल्या, परदेशात राहणाऱ्या मराठी माणसांची तिसरी पिढी आपल्यापासून तुटली, असं मानणं सोडून द्यावं. आपणच त्यांना दूर लोटतो आहोत का?”
 
वाचनसंस्कृतीबद्दल तांबे म्हणाल्या, वृत्तपत्रांचं वाचन कमी झालं, त्याची कारणं वेगळी आहेत. पुस्तकं आता सर्व स्तरांतील लोक वाचतात. मध्यमवर्गीय पुस्तकांपासून काहीसे दूर झाले असले, तरी नवशिक्षितांमध्ये वाचनाची भूक प्रचंड आहे. त्याचं दर्शन साहित्य संमेलनातील पुस्तक प्रदर्शनात घडतं.

कवितेचं गाणं होताना हा पहिल्या दिवशीचा सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम म्हणावा लागेल. कवी-गीतकार प्रवीण दवणे, गायिका पद्मजा फेणाणी आणि संगीतकार कौशल इनामदार त्यात सहभागी झाले होते. त्यात मजा आणली कौशल इनामदार ह्यांनी. परदेशातील मराठी माणसांनी आपले अनुभवही सांगितले. त्यातून उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचं कार्य किती व्यापक आणि विविध पातळ्यांवरचं आहे, हे समजलं.
 
संमेलनाचा पहिला दिवस उशिरा चालू झाला आणि उशिराच संपला. खंड न पडता एका मागोमाग एक कार्यक्रम होत राहिले. त्यामुळे जमलेली मंडळीच आपापल्या सोयीनुसार विश्रांती घेत होती, हे दिसलं.
...........
#मराठी #विश्व_मराठी_संमेलन #मराठी_साहित्य #वाचन_संस्कृती #राज्यपाल_बैस #मंगला_गोडबोले #मराठी_पुस्तके #परदेशस्थ_मराठी
.........
दुसरा भाग इथं आहे -

https://khidaki.blogspot.com/2024/01/Vishwa-Marathi2.html

Thursday 4 January 2024

नको नकोसा ‘विक्रम’ टळला


महंमद सिराज...स्वप्नवत मारा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा बळी. (छायाचित्र सौजन्य आयसीसी)
.....................................................
नवं वर्ष आणि नव्या (नकोशा) ‘विक्रमा’चा भोज्जा गाठण्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका ह्यांना लांबच राहावं लागलं. कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे पहिले डाव संपण्याचा हा विक्रम. एकाच दिवशी सर्वाधिक गडी बाद होण्याचा पराक्रम. काही फलंदाजांसाठी तर एकाच दिवसांत दोन वेळा बाद होण्याची नामुष्की.

केपटाऊनच्या द न्यूलँड्सच्या स्टेडियमची खेळपट्टी खिशात घेऊन जगभर फिरावं, असं बुधवारी (दि. ३ जानेवारी) काहींना वाटलं असेल. त्यात महंमद सिराज, कगिसो रबाडा, लुंगी इनगीडी, नांद्रे बर्गर, जसप्रीत बुमराह, मुकेशकुमार हे दोन्ही संघांतील गोलंदाज नक्की असणार.

त्याच वेळी अशा खेळपट्टीवर पुन्हा परीक्षा द्यायला लागू नये, अशीही काहींची भावना असेल. उदाहरणार्थ यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, डीन एल्गर, टोनी डी’झोरजी वगैरेंची.

तब्बल १२२ वर्षांपूर्वी...
ह्या चालू असलेल्या कसोटीत तब्बल १२२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडता मोडता राहून गेला. ही कसोटी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ह्यांच्यामध्ये मेलबर्न इथे १ ते ४ जानेवारी १९०२ खेळली गेली. वर्षाअखेरीच्या पार्टीत दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी काय खाल्लं (किंवा पिलं!) होतं कुणास ठाऊक! पहिल्याच दिवशी मेलबर्नच्या खेळपट्टीनं गोलंदाजांना भरभरून साथ दिली.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून २५ फलंदाज बाद झाले. एवढे फलंदाज बाद झाले म्हटल्यावर धावा कमीच असणार. तर तसंही नाही. अडीच डावांमध्ये २२१ धावा निघाल्या. फक्त त्यात कोणाचं शतक सोडाच अर्धशतकही नव्हतं. आठ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३२.१ षट्कांमध्ये ११२ धावांवर आटोपला. सातव्या क्रमांकावर आलेला उजव्या हाती फलंदाज रेजिनल्ड अलेक्झांडर डफ ह्याच्या धावा सर्वाधिक - ३२. अकराव्या क्रमांकावर आलेल्या अर्नी जोन्स ह्याच्याही धावा १४. ह्याशिवाय जो डार्लिग (कर्णधार), क्लेम हिल व ह्यू ट्रम्बल ह्यांनीच काय ती दुहेरी धावसंख्या गाठली. सलामीच्या व्हिक्टर ट्रम्परसह तिघांना भोपळा फोडता आला नाही.

अल्प वेळचा आनंद
यजमानांना झटपट गुंडाळल्याचा आनंद पाहुण्या इंग्लंड संघाला फार वेळ लाभला नाही. त्यांचाही डाव गडगडला. जेमतेम १५.४ षट्के चाललेल्या डावात त्यांना फक्त ६१ धावा करता आल्या. म्हणजे कांगारूंना ५१ धावांची आघाडी.

इंग्लंडकडून सर्वाधिक धावा (२७) गिल्बर्ट जेसप ह्यानं केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार आर्ची मॅकलॅरेन ह्याला एकट्यालाच दुहेरी धावसंख्या करता आली. चौघे शून्यावर बाद झाले असताना, तळाच्या तीन फलंदाजांनी मात्र खातं (कसंबसं) उघडलं.

कांगारूंच्या डावात चेंडू सात वेळा सीमापार गेला. त्यातले पाच डफचे आणि दोन डार्लिंगचे. इंग्लंडकडूनही दोनच फलंदाजांना चौकार मारता आले. त्यातले दोन जेसपचे व एक अकराव्या क्रमांकावर खेळणाऱ्या कॉलीन ब्लाईद ह्याचा. सामन्यातील एकमेव षट्कार जेसप ह्याचा. गमतीचा भाग म्हणजे दोन्ही संघांच्या इतर खात्यात सहा-सहा धावा आणि त्याही ‘बाय’च्या रूपाने.

दोनच गोलंदाज पुरेसे
प्रतिस्पर्ध्यांचे १०-१० गडी बाद करण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गोलंदाज पुरेसे ठरले. पण सगळेच बळी काही जलदगती गोलंदाजांनी मिळविले नाहीत. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज सिडनी बार्न्स (६/४२) ह्याला साथ मिळाली ती डावखुरा फिरकी गोलंदाज ब्लाईदची (४/६४). त्यांनी मिळून पाच षट्कं निर्धाव टाकली. बार्न्सने ब्लाईदपेक्षा फक्त एक चेंडू अधिक टाकला.


ऑस्ट्रेलियाचा माँटी नोबल
(सौजन्य विकिपीडिया)
..................
इंग्लंडचा डाव गुंडाळला ह्यू ट्रम्बल (३/३८) आणि माँटी नोबल (७/१७) ह्या उजव्या हातानं ऑफब्रेक टाकणाऱ्या गोलंदाजांनी. त्यामुळेच धावपुस्तिकेत यष्टिरक्षक जेम्स केली ह्याच्या नावावर दोन यष्टिचितचं श्रेय पाहायला मिळतं. नोबल मध्यमगती मारा करीत असल्याचीही नोंद मात्र आहे.

पहिल्याच दिवशी दुसऱ्या डावासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची फ्या फ्या उडाली ती सिडनी बार्न्सच्या आगखाऊ गोलंदाजीमुळे. त्यानं चौघांना बाद केलं, तर जेम्स केली धावचित झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था होती ५ बाद ४८.

ह्या पार्श्वभूमीवर केप टाऊन इथं चालू असलेल्या दक्षिण आफ्रिका व भारत ह्यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवसाच्या खेळाकडे पाहता येईल. इथे दोन्ही संघांचे डाव ७५.१ षट्कांत संपले आणि धावा निघाल्या २०८. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटीतील पहिल्या दोन डावांतील धावसंख्या ह्यापेक्षा कमी म्हणजे १७३. त्यासाठी लागलेली षट्कंही कमीच - ४७.५.

ह्या दोघांची पाटी कोरीच
त्या सामन्यात दोन-दोन गोलंदाजांनी हे काम केलं. ह्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या डावात प्रत्येकी चार गोलंदाजांचा उपयोग केला. त्यातील प्रसिद्ध कृष्ण आणि मार्को यानसेन ह्यांची पाटी कोरीच. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर चौकार चारच. भारताच्या चार फलंदाजांचे मिळून १९ चौकार व एक षट्कार.

आता पुन्हा त्या सामन्याकडे वळू या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने फलंदाजीच्या क्रमवारीत बरेच बदल केले. सलामीवीर ट्रम्पर आठव्या क्रमांकावर आला. पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या डफला तर त्यांनी दहाव्या क्रमांकावर पाठवलं. त्याचा अर्थातच उपयोग झाला.

पहिल्या दिवशी ६२.५ टक्के फलंदाज बाद होऊनही सामन्याचा निकाल लागण्यासाठी चौथ्या दिवशी खेळावं लागलं ते कांगारूंच्या चिवट फलंदाजीमुळं. दुसऱ्या दिवशीच्या खेळात त्यांनी आणखी चार गडी गमावताना २५२ धावांची भर घातली. डावखुऱ्या क्लेम हिलनं चिवट फलंदाजी केली. त्याचं शतक एका धावेनं हुकलं. नवव्या जोडीसाठी त्यानं डफच्या साथीनं ६७ धावा केल्या.

एकमेव शतकी भागीदारी
खरी कमाल केली ती डफ आणि वॉरविक आर्मस्ट्राँग ह्या अखेरच्या जोडीनं. सामन्यातील सर्वांत मोठी आणि एकमेव शतकी भागीदारी (१२०) ही त्यांची किमया. डफनं शतक झळकावलं, तर आर्मस्ट्राँग ४५ धावा काढून नाबाद राहिला.

इंग्लंडनं सहा गोलंदाजांचा वापर केला. बार्न्सला सात बळींसाठी १२१ धावा मोजाव्या लागल्या. लेगब्रेक टाकणाऱ्या लेन ब्राँड ह्यानं एका बळीसाठी ११४ धावांची किंमत चुकती केली. पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवूनही नंतर दोघांना शंभराहून अधिक धावा द्याव्या लागल्या, हीही ह्या सामन्यातली गंमतच की.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं ५३ धावा जोडूनच अखेरचा गडी गमावला. त्यांचा डाव ३५३ धावांवर संपला. दिवसभराचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं पाच गडी गमावले होते आणि लक्ष्य २५८ धावा दूर होतं.

जॉनी टिल्डसली अर्धशतक करून नाबाद होता, हाच काय तो इंग्लंडसाठी दिलासा. त्यानं विली क्वाईफ, जेसप आणि ब्राँड ह्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या भागीदाऱ्या केल्या. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. चौथ्या दिवशी टिल्डसली (६६) बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव १७५ धावांत संपला.

गोलंदाज सहा; यश दोघांनाच
इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव. त्यांनी दोन्ही डावांमध्ये मिळून केलेल्या धावांपेक्षा फक्त सात कमी! ऑस्ट्रेलियानंही दुसऱ्या डावात सहाच गोलंदाज वापरले. यश मात्र नोबल (६/६०) आणि ट्रम्बल (४/४९०) ह्यांनाच मिळालं.

कसोटी सामन्यात एकाच दिवशी ह्यापेक्षाही अधिक गडी बाद झाले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते इंग्लंड-ऑस्ट्रेलिया ह्याच आद्य प्रतिस्पर्ध्यांमधलं. क्रिकेटच्या पंढरीत म्हणजे द लॉर्ड्स मैदानावर झालेली ही कसोटी दोनच दिवसांत निकाली निघाली.

दि. १६ व १७ जुलै १८८८. पहिल्या दिवशी १३ गडी बाद आणि दुसऱ्या दिवशी तब्बल २७! दोन्ही संघांच्या चार डावांत धावपुस्तिकेत फक्त एकाच डावाची तीन आकड्यांत नोंद आहे. ऑस्ट्रेलिया पहिला डाव ११६. नंतरचे तिन्ही डाव साठीच्या घरात गुंडाळले गेलेले.

दोन्ही डावांत शतकाच्या आत
ह्या सामन्यात ६१ धावांनी पराभूत झालेल्या इंग्लंडच्या धावा पहिल्या डावात ५३ आणि दुसऱ्या डावात ६२. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव साठ धावांमध्ये संपलेला. डब्ल्यू. जी. ग्रेस (इंग्लंड) आणि जे. जे. फेरिस (ऑस्ट्रेलिया) ह्यांनाच दोन्ही डावांत दुहेरी धावसंख्या करता आली. बिच्चाऱ्या ॲलेक बॅनरमन ह्याला दोन्ही डावांत शून्यावरच तंबूत परतावं लागलं!

कसोटी इतिहासातील हा अठ्ठाविसावा सामना गोलंदाजांनीच गाजवला. ऑस्ट्रेलियाच्या चार्ली टर्नर ह्यानं दोन्ही डावांत पाच-पाच गडी बाद केले. फेरिसनं सात आणि इंग्लंडच्या बॉबी पील ह्यानं आठ बळी घेतले.

ह्याच दोन संघांमध्ये द ओव्हल मैदानावर १० ते १२ ऑगस्ट १८९६ ह्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात एकाच दिवशी तब्बल दोन डझन फलंदाज बाद झाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडनं पहिल्या डावातले नऊ आणि दुसऱ्या डावातले पाच फलंदाज गमावले. दरम्यान ऑस्ट्रेलियाचाही पहिला डाव संपलेला. एवढे गडी बाद होत असताना धावा मात्र २३५ निघाल्या.

दोन्ही संघांचे पहिले डाव शंभरीच्या पुढे आणि दुसरे डाव शतकाच्या आत. ऑस्ट्रेलियाच्या ह्यू ट्रम्बल ह्यानं दोन्ही डावांत सहा-सहा गडी बाद केले. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जॅक हर्न ह्यानं १० बळी मिळविले.

अफगाणिस्तानवर आफत
एकाच दिवशी दोन्ही डाव खेळावे लागून पराभूत होण्याची पाळी अफगाणिस्तानवर बंगळुरूमध्ये आली. १४ व १५ जून २०१८ रोजी झालेल्या ह्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २४ गडी बाद झाले. भारताचे पहिल्या डावातील चार आणि अफगाणिस्तानचे लागोपाठ २०. ‘फॉलोऑन’चं खरोखर पालन झालं.

दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनच्याच मैदानावर बारा वर्षांपूर्वी झालेल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी २३ फलंदाजांना तंबूचा रस्ता पकडावा लागला. दि. ९ ते ११ नोव्हेंबर २०११ दरम्यान झालेल्या ह्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव शतकाला चार धावा कमी असतानाच संपला. त्यानंतर त्यांनी कांगारूंना दुसऱ्या डावात ४७ धावांतच गुंडाळलं. ग्रीएम स्मिथ आणि हाशीम आमला ह्यांनी चौथ्या डावात झळकावलेली शतकं हे सामन्याचं अजून ऐक वैशिष्ट्य होय.

एका दिवसात २२ गडी बाद झाले असे सहा कसोटी सामने आहेत. त्यातील तीन सामने इंग्लंडचे व प्रत्येकी दोन सामने भारत आणि न्यूझीलंडचे आहेत. चार कसोटी सामन्यांमध्ये एकाच दिवशी २१ फलंदाज बाद झाले. आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या दहापैकी एकही सामना आशियाई देशांमध्ये खेळला गेलेला नाही. असे २० कसोटी सामने आहेत की, ज्यात कोणत्या तरी एका दिवशी २० गडी बाद झाले.

दक्षिण आफ्रिका - भारत ह्यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोणत्या वळणावर जातो, ह्याचं उत्तर दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या तासाच्या खेळात मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, काही झालं तरी हुकलेला ‘विक्रम’ करण्याची संधी साधणं ह्या सामन्यात तरी शक्य नाही. त्याचं वाईट वाटू नये म्हणून कदाचित असेल, एकही धाव न करता सहा फलंदाज गमावण्याचा पराक्रम भारतानं करून दाखवलेला आहेच.
.....
(सांख्यिकी तपशील सौजन्य https://www.espncricinfo.com)

.....

#क्रिकेट #भारत #दक्षिण_आफ्रिका #कसोटी_सामना #इंग्लंड #ऑस्ट्रेलिया #गोलंदाजी 


Friday 15 December 2023

मुंबई, मॅजेस्टिक, पुस्तकं...


पाहिली, चाळली आणि आवडली ती घेतलीही!
......................................................
मुंबईशी नातं तसं दूरचंच. त्यामुळंच की काय, आकर्षण कायमचं. कोविडची साथ येण्याच्या तीन महिने आधी ते ह्या वर्षातला हा अखेरचा महिना, ह्या चार वर्षांमध्ये मुंबईच्या सहा चकरा झाल्या.

ह्यातला काल-परवाचा (म्हणजे ११-१२ डिसेंबरचा) आणि वर्षाच्या पहिल्या महिन्यातील दौरा मुक्कामी होता. जानेवारीत विश्व मराठी संमेलनासाठी गेलो होतो. त्यामुळं बाहेर कोठे जाणं जमलंच नाही. तीन दिवस संमेलन एके संमेलन.

आता गेलो होतो ते एका गंभीर कौटुंबिक कार्यक्रमासाठी. त्यामुळे तिथे हजेरी लावण्याशिवाय बाकी काही ठरवलं नव्हतं.

सांगायचा मुद्दा हा की, चार वर्षांमध्ये सहा वेळा जाऊनही मनातली मुंबई पाहायचा योग काही जमून येत नाही. बरंच काही मनात आहे. ते प्रत्यक्षात यायला मुहूर्त हवा.

दादरला सेनापती बापट रस्ता, रानडे रस्ता ह्यांवरून फिरायचं आहे. बबनचा चहा प्यायचा आहे. मामा काणे, आहार इथं जाणं बाकी आहे. गिरगावला पणशीकरांकडे जायचं आहे. मरीन ड्राइव्हवर समुद्रकिनारी निरुद्देश चकरा मारायच्या आहेत.

नरिमन पॉइंटपासून चालण्याच्या अंतरावर असलेल्या नॅशनल बुक ट्रस्टच्या दुकानात वेळ घालवायचा आहे. ‘पुढच्या भेटीत नक्की...’ असं म्हणत ते राहूनच जातं दर वेळी.

आताच्या दौऱ्यातली ही गोष्ट. पश्चिम रेल्वेनं दादरला उतरायचं होतं. तिथून मग मध्ये रेल्वेची लोकल पकडून छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस इथं संध्याकाळी पावणेपाच वाजेपर्यंत पोहोचायचं होतं.

दादरला पोहोचल्यानंतर दोन-अडीच तास वेळ हाताशी होता. आहे वेळ तर म्हटलं, ‘मॅजेस्टिक’मध्ये जाऊन येऊ. पुस्तकं चाळू. बऱ्यापैकी जुन्या आवृत्त्यांची पुस्तकं मिळतील. सहज पाहायला न मिळालेली पुस्तकं दिसतील.

‘मॅजेस्टिक’चा शोध घेताना आधी वनमाळी सभागृह दिसलं. त्याच्या प्रवेशद्वारातच एका पुस्तक प्रदर्शनाचा फलक पाहायला मिळाला. वाटलं की जावं आणि पाहावीत थोडी पुस्तकं. तो मोह टाळून पुढे निघालो. कारण ‘मॅजेस्टिक’मध्ये पुरेसा वेळ देता येणार नाही म्हणून.

अजून चार पावलं पुढे आल्यावर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दिसलं. तिकडे वळणारे पाय मागं खेचले. एकच लक्ष्य - मॅजेस्टिक.

इंटरनेटच्या मदतीने पत्ता शोधला. त्यानुसार मॅजेस्टिक ग्रंथदालन ‘प्लाझा सिनेमा’समोर आहे. शोध घेत चाललो आणि ‘प्लाझा सिनेमा’चं दर्शन झालं. वाटलं, वा! सोपंय की काम. ‘मॅजेस्टिक’चं नाव आणि लौकिकही मोठा. त्यामुळं मोठी पाटी दिसेल, असा समज.

मोठीच काय छोटीही पाटी दिसली नाही. त्यामुळे पुढे पुढे चालत राहिलो. दुकान मागं सोडून फारच पुढे आलो, हे कळलं ‘मॅप’ची मदत घेतल्यावर. रिव्हर्स गीअर टाकणं भागच होतं.

भर दुपारची वेळ असूनही दादरच्या पदपथावर तोबा गर्दी होती. धक्का न खाता किंवा न देता चालणं मुश्किलच. त्यात परत हातातली बॅग संभाळण्याचं काम.

एका विक्रेत्याला विचारलं तर त्यानं सांगितलं, ‘शिवाजी मंदिरात जा. तिथं आहे ‘मॅजेस्टिक’चं दुकान.’ त्याचे आभार मानून गेलो आणि आत शिरल्यावर ‘मॅजेस्टिक’ची पाटी!

खूप मोठं, प्रशस्त आणि ऐसपैस दालन असेल, असं मनातलं चित्र. पण हा समज पहिल्या झटक्यातच दूर झाला. नाटकाचं तिकीट काढायला आलेली मोजकी मंडळी बसली होती.

उत्साहात दुकानामध्ये शिरलो. पण त्याच वेळी मनाला बजावलं, घड्याळाकडं लक्ष द्यायचं. फार वेळ रमायचं नाही. संध्याकाळची दख्खनची राणी गाठायची आहे.

आधी नव्या पुस्तकांच्या दालनात गेलो. बरीच पुस्तकं होती. पण हवीहवीशी वाटणारी त्यात फारच कमी होती. त्यांच्या किमतीही चांगल्या. प्रश्न तो नव्हता. ‘अर्रऽऽ, हे घेतलंच पाहिजे हं!’, असं वाटणारी कमी दिसली.

खट्टू झालो बराचसा. मनाशी म्हटलं आता निघू. काही न घेताच टाटा करू. काउंटरवर बसलेल्या दोघांच्या नजरेला नजर न देता बाहेर पडू.

मिठाईच्या दुकानातून, तयार कपड्यांच्या दालनातून आणि पुस्तक प्रदर्शनातून रिकाम्या हातांनी आणि खिसा हलका न होता बाहेर पडणं शास्त्रसंमत नाही, असं म्हणतात. ह्या ‘तत्त्वा’नुसार आजवर वागत आलो.

ह्या तत्त्वाला हरताळ फासला जाण्याचा योग आला होता. वाटलं की, चला पहिल्यांदाच असंच निघावं लागणार.

तसं काही व्हायचंच नव्हतं. पुढे आलो आणि मनात, डोक्यात असलेली (शिवाय सवलत मिळणारी!) बरीच पुस्तकं दिसली. मग रेंगाळू लागलो. वाकून, हात उंच करून, गुडघ्यावर बसून पुस्तकं काढू लागलो. चाळू लागलो.

अच्युत बर्व्यांचं ‘सुखदा’ संग्रहात होतं. मध्यंतरी कसे कुणास ठाऊक, त्याला पाय फुटले. त्याच्या अर्पणपत्रिकेतल्या ओळी मनात घर करून आहेत. अप्रतिम! बर्वे लिहितात - 
‘मी चालत होतो रस्त्यातून अनवाणी
डोळ्यांत माझिया म्हणून आले पाणी
संपलेच रडणे परंतु जेव्हा दिसला
शेजारी माणुस पायच नव्हते ज्याला!’


...बाकी काही नाही, तरी निव्वळ ह्या चार ओळींसाठी ते पुस्तक संग्रहात असणं फार महत्त्वाचं वाटतं. तर तिथल्या कप्प्यात ‘सुखदा’ दिसलं. सुखद धक्का. एक प्रत घ्यावी की दोन घ्याव्यात? मनात संभ्रम. मोह टाळत एकच घेतली.

तेवढ्यात लक्ष वेधलं ‘लँडमाफिया’च्या मुखपृष्ठानं. ‘लोकसत्ता’मधला जुना सहकारी बबन मिंड ह्याची ही कादंबरी. तीही घ्यायलाच हवी. नियोजित संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे ह्यांचं ‘पांढर’ही दिसलं. ते वाचलं की नाही आठवत नव्हतं. संग्रहात नाही, हे नक्की.


‘सेंट्रल बस स्टेशन’ लिहिणारे वसंत नरहर फेणे आवडते लेखक. त्यांची ‘शतकान्तिका’ आणि ‘निर्वासित नाती’ ह्यासह आणखी एक-दोन पुस्तकं सहज दिसली.  ‘शतकान्तिका’ बहुतेक संग्रहात आहे. पण नसलंच तर? सोडलेल्या संधीबद्दल नंतर हळहळ वाटायला नको. म्हणून ते आणि ‘निर्वासित नाती’ घेऊन ठेवलं.

अशी ही हवीहवीशी पुस्तकं चाळण्यात वेळ जाऊ लागला. यशवंत पाठक छान ललित लिहितात. त्यांचं ‘मोहर मैत्रीचा’ नजरेस पडलं आणि ‘हवंच हे’ असा मनाचा कौल मिळाला.


पुरुषोत्तम धाक्रसांचं ‘चित्तपावन’ दिसलं. लेखक म्हणून त्यांचं फारसं वाचलेलं नाही. पुस्तक पाहिलं की नाही, हेही आठवत नाही. त्यामुळेच ते दिसताक्षणी घेऊन टाकलं.

राजेन्द्र बनहट्टी ह्यांचे दोन-तीन संग्रह, एक कादंबरी कपाटात आहे. त्यांचं ‘गंगार्पण’ दिसलं. (हेही आधी आणलेलं असावं, असा संशय आहे! 🤔 😀). पुन्हा तेच. नंतर खेद नको म्हणून तेही घेतलं.


त्या दिवशीची खरेदी.
.......................
बघता बघता सात-आठ पुस्तकं झाली. आता बास झालं, असं स्वतःला बजावत होतो. तेवढ्यात अचानक ‘चिद्घोष’ डोकावलं. लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी. पन्नास वर्षांपूर्वीच्या कथांचा तो संग्रह. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं.

एका कोपऱ्यात ‘युद्धस्य कथा रम्या’ शीर्षकाचं छोटंसं ७६ पानांचं पुस्तक होतं. लेखकाचं नाव - चित्रकार डी. डी. रेगे! चित्रकार आणि लेखक असा संगम असल्यामुळं तेही घेतलं.

बघता बघता दहा पुस्तकं झाली की. बरोबरच्या ओझ्यात किती भर टाकायची हा प्रश्नच होता. कारण आपल्याच खांद्यावर आपलंच ओझं नंतरचे आठ ते दहा तास बाळगायचं होतं. साडेतीन-चार तासांच्या प्रवासानंतर गाडी बदलायची होती.

अजून बराच वेळ घालवायला आवडलं असतं. पाच-दहा पुस्तकांची भर टाकायलाही परवडलं असतं. कमी पडत असलेल्या वेळेचा आणि सामान वागवण्याच्या मर्यादेचा विचार केला. मनाविरुद्धच आवरतं घेतलं. गंमत म्हणजे घेतलेल्या पुस्तकांपैकी दोन तर निम्मी-अर्धी प्रवासात वाचूनही झाली.

‘मॅजेस्टिक’मध्ये जायचंच, पुस्तकं चाळायची असा हट्ट का बरं होता? स्वतःच्या पैशाने पुस्तकं खरेदी करण्याची सुरुवात त्यांच्या पुण्यातल्या नारायण पेठेतील दालनातून झाली. पुस्तकांवर लिहिलेल्या एका लेखात त्याचा उल्लेख केला आहेच.

... पुस्तकदिन असेल तेव्हा असेल. ‘मॅजेस्टिक’च्या दालनात माझ्यापुरता तो  छोट्या स्वरूपात साजरा झाला.
आणि हो, पुस्तकाच्या दुकानातून ‘रिकाम्या हातानं बाहेर पडायचं नाही’ हे तत्त्वही पाळलं गेलं! 👍
....
#पुस्तक #मॅजेस्टिक #सुखदा #मुंबई #वसंत_नरहर_फेणे #ज्ञानेश्वर_नाडकर्णी #पुस्तक_दिन

काही अधिक-उणे, बाकी सगळं ओक्के!

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस दुसरा व तिसरा कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाच्या यशाचं मोजमाप अलीकडे दोन निकषांवर केलं जातं – गर्द...