Thursday 29 December 2022

स्पर्धा रंगतेय...

 


राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा नगरच्या वाडिया पार्क मैदानावर रंगली आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात फुललेली प्रेक्षक गॅलरी.


ही गोष्ट साधारण तीन दशकांपूर्वीची. नगरमध्ये बहुदा पहिल्यांदाच निमंत्रितांची राज्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय श्रीरामपुरातून नगरला येण्याची चाहूल लागली होती. पुण्यात ‘केसरी’ कार्यालयात भेटलेल्या कबड्डीमहर्षी बुवा साळवे ह्यांच्याकडून तसा दुजोरा मिळाला होता. त्याच स्पर्धेत मुंबई उपनगराचा बलदंड सुनील जाधव आणि महाकाय सागर बांदेकर ह्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली होती.

नगरच्या न्यू आर्ट्स मैदानाच्या प्रशस्त मैदानावर निमंत्रित संघांची स्पर्धा रंगली होती. त्यासाठी प्रसिद्ध खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर आल्या होत्या. त्यांची मी ‘केसरी’साठी मुलाखत मिळवली. मनमोकळेपणाने बोलल्या त्या. ‘मुलाखत प्रसिद्ध झालेला अंक पाठव बरं का,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.

आशियाई स्पर्धेत कबड्डीचा नुकताच समावेश झाला होता. त्याचा संदर्भ देत शकुंतला खटावरकर ह्यांनी भविष्याचं चित्र रंगवलं होतं - ‘आंतरराष्ट्रीय खेळ झाला म्हणजे कबड्डी आता मॅटवर खेळावी लागेल. पायात बूट-मोजे घालावे लागतील. जपानी, कोरियाई खेळाडू लवचीक असतात. त्यांचं तंत्र पाहून आपल्यालाही खेळात बदल करावा लागेल. तरच आशियाई स्पर्धेत आपल्याला सुवर्णपदक राखता येईल...’ असं बरंच काही त्या म्हणाल्या होत्या.


नगरची स्पर्धा मॅटवर खेळली जात आहे. शकुंतला खटावकर ह्यांनी
 तीस वर्षांपू्वी हे स्वप्न पाहिलं होतं.

शकुंतला खटावकर ह्यांच्या त्या मुलाखतीची आठवण होण्याचं कारण नगरमध्ये सध्या चालू असलेली पुरुष व महिला गटांची राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी स्पर्धा. शकुंतला खटावकर ह्यांना तेव्हा जे काही अपेक्षित होतं, ते सारं प्रत्यक्षात उतरलेलं आहे. नगरची ही स्पर्धा मॅटवर चालू आहे. सहभागी झालेले सगळेच संघ आकर्षक ‘कलर’मध्ये आहेत. त्यांच्या पाठीवर ठळकपणे क्रमांक दिसतात. आणि त्यांच्या संघाचं नावही. त्यामुळे कोणत्या संघांमध्ये सामना चालू आहे, हे विचारण्याची गरज भासणार नाही.  लवकरच प्रत्येक खेळाडूचं नावही त्याच्या पाठीवर टपोऱ्या अक्षरामध्ये दिसू लागेल.

मॅटवर खेळायचं असल्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या पायात आधुनिक ‘स्पोर्ट्स शूज’ आहेत. ‘टाईम आऊट’, बदली खेळाडू,  बाद झालेल्या व राखीव खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या अशा सोयी दिसतात. (त्यावरून आठवण झाली ती मुकुंदराव आंबर्डेकर ह्यांची. नगरला झालेल्या पुणे विद्यापीठ आंतरविभाग खो-खो स्पर्धेच्या वेळी त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. राखीव आणि बाद खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या हव्यात, असं त्यांचं आग्रही म्हणणं होतं. हे तरुण खेळाडू मैदानाच्या बाजूला उकीडवे बसतात, ते कसं तरीच दिसतं, अशी त्यांची मल्लीनाथी होती!)


करता अंगत-पंगत, वाढते जेवणाची लज्जत...
चविष्ट जेवणाचा स्वाद घेणाऱ्या महिला खेळाडू.

मैदानावर दिव्यांचा आणि प्रकाशझोतांचा लखलखाट आहे. संध्याकाळचे सामने विनाव्यत्य रंगत आहेत. वि. वि. क. काही वर्षांपूर्वी ज्याचा आग्रह धरत होते, तो धावता गुणफलक आहे. तो डिजिटल आहे. एका सामन्याचा एकच धावता गुणफलक असला, तरी बाद फेरीच्या सामन्यापासून मैदानाच्या दोन्ही बाजूंच्या प्रेक्षकांना तो दिसेल. sportvot.com ह्या संकेतस्थळावर स्पर्धेचा इत्थंभूत निकाल कळतो. संख्येनं मोठ्या असलेल्या त्यांच्या चमूतील सदस्यांचा वावर मैदानांमध्ये मोठ्या संख्येनं दिसतो आहे. थोडक्यात,  नव्या तंत्रज्ञानानं राज्य स्पर्धेला आपल्या विळख्यात घेतलं आहे. प्रो-कबड्डीची ही देणगी म्हणावी लागेल.

मॅटवरची ही पहिली राज्य अजिंक्यपद स्पर्धा म्हणतात खरं; पण वाटतं की, सांगलीच्या तरुण भारत व्यायाम मंडळानं २०१२मध्ये आयोजित केलेली राज्य स्पर्धा मॅटवर झाली होती. तशी बातमी मी दिली होती. मॅटवरच्या खेळाची वैशिष्ट्यं सांगणारी अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट ह्याची चौकट त्या बातमीत होती. नेमकं आता त्याचं कात्रण सापडत नाही. असो! पण तरीही कबड्डी मॅटवर आल्याचं श्रेय आशियाई क्रीडा स्पर्धेपेक्षा प्रो-कबड्डीलाच द्यावं लागेल, हे नक्की!

पूर्वी रणजी करंडकातील क्रिकेट सामने मोठी गर्दी खेचणारे असत. दोन्ही संघात कोण कोण कसोटीपटू आहेत, ह्याची चर्चा होई. आता राज्य कबड्डी स्पर्धेतील सामने पाहताना प्रेक्षक एकमेकांना सांगत असतात की, ह्या संघातला अमका तमका प्रो-कबड्डीत खेळतो; त्या संघात प्रो-कबड्डी खेळणारे तिघे आहेत. कबड्डीलाही ‘प्रो-ग्लॅमर’ आलं आहे तर...

राज्य अजिंक्यपद स्पर्धा वाडिया पार्कवर चाललीय. ह्या आधी पहिल्यांदा १९९७मध्ये कुमार-कुमारी गटाची राज्य स्पर्धा तिथे रंगली होती. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेलं वाडिया पार्कचं प्रशस्त मैदान फक्त क्रिकेटसाठी राखीव असू नये, तिथं अन्य खेळांच्या स्पर्धाही व्हाव्यात, म्हणून तेव्हा लेखणी झिजवत होतो. त्यामुळेच तिथे खो-खो आणि कबड्डी ह्या देशी खेळांच्या राज्य स्पर्धा झाल्या.


‘छत्रपती’, ‘अर्जुन’ आणि ‘पद्मश्री’...
स्पर्धास्थळी बुधवारी रात्रीच्या सत्रात निर्मलचंद्र थोरात, शांताराम जाधव आणि पोपट पवार
ह्यांच्या गप्पा रंगलेल्या पाहायला मिळाल्या

पण बघता बघता नगरचा केंद्रबिंदू पुढे सरकलाय. वाडिया पार्क आता तेवढं मध्यवर्ती राहिलेलं नसावं, प्रेक्षकांना ते तेवढं सोयीचं वाटत नसावं, असं उद्घाटनाच्या दिवशी असलेली गर्दी पाहून वाटलं. हे चित्र दुसऱ्या दिवशी बदललं. बुधवारी संध्याकाळी पश्चिमेकडची प्रेक्षक दीर्घा ओसंडून वाहत होती. पूर्वेकडेही चांगली गर्दी होती. ही गर्दी राहिलेल्या दोन दिवसांत वाढत जाईल, अशी आशा आहे.

पुरुष व महिलांचे प्रत्येकी दोन डझन संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नगरकरांना एकच औत्सुक्य आहे, यजमान संघ विजेतेपद कायम राखणार का? महाराष्ट्राचं कर्णधारपद भूषविणाऱ्या शंकर गदई ह्याच्या नेतृत्वाखाली नगरचा संघ भिवंडीतील कामगिरीची पुनरावृत्ती करील, असं नगरकरांना मनापासून वाटतंय. त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राहुल खाटीक, आदित्य शिंदे, राहुल धनवड सर्व ताकद पणाला लावूनच खेळतील. गटातले तिन्ही सामने जिंकून नगरने बाद फेरी गाठली आहेच.


सोलापूर संघाचं आव्हान यजमान नगरनं गटात सहज मोडून काढलं.

शंकरच्या संघानं सलामीच्या सामन्यात हिंगोलीवर अर्धा डझन लोण चढवित सहज बाजी मारली. पण काल रात्रीच झालेल्या दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने हवा तंग केली होती. सामना संपायला शेवटची साडेचार मिनिटं बाकी असताना कोल्हापूरकरांकडे एक गुणाची आघाडी होती. नगरकरांनी नंतर बाजी उलटविली. त्यांनी बुधवारी संध्याकाळी सोलापूरवर सहज विजय मिळवला.

उपान्त्यपूर्व फेरीचे सामने गुरुवारी रंगतील आणि रात्रीच्या सत्रात चित्र स्पष्ट होईल. स्पर्धेचा शेवटचा दिवस - शुक्रवार - सर्वच संघांसाठी ‘जिंका किंवा घरी जा’ असा असणार आहे. नगरकर विजेतेपद राखण्यात यशस्वी होतात का आणि किती दिमाखात ही कामगिरी करतात, हे पाहायला मजा येणार आहे.


#कबड्डी #कबड्डी_स्पर्धा #राज्य_अजिंक्यपद #नगर #वाडिया_पार्क #प्रो_कबड्डी #मॅटवर_कबड्डी

-------------------------------------

नगरच्या विजेतेपदाची कहाणी वाचा इथे - भिवंडीत घुमला नगरचा दम

https://khidaki.blogspot.com/2022/03/Nagarkabaddi.html

Monday 24 October 2022

महानायक

 


कर्णधाराकडून महानायकाचे कौतुक

दुबईत बरोबर ३६४ दिवसांपूर्वी इतिहास घडला होता. विश्वचषकाच्या कोणत्याही लढतीत भारतापुढं नांगी टाकण्याचा पराक्रम पाकिस्तानाच्या खात्यावर सलग बारा वेळा जमा होता. कोविडमुळं वर्षभर पुढं गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अव्वल साखळीमध्ये पाकिस्ताननं भारताला दहा गडी राखून हरवत उपान्त्य फेरी गाठली होती. स्पर्धा अखेरच्या टप्प्यात होती. कर्णधार बाबर आजम आणि यष्टिरक्षक महंमद रिजवान ह्यांनी दीडशे धावांचं आव्हान लीलया पेललं होतं.

हा विजय पाकिस्तानसाठी कसा आवश्यक आहे, हे सांगणारा छोटासा व छानसा लेख त्या वेळी ‘द डॉन’ दैनिकात प्रसिद्ध झाला होता. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल ही सलामीची जोडी तेव्हाही स्वस्तात बाद झाली होती. एक षट्कार आणि एक चौकार ठोकून मोठ्या धावसंख्येचं स्वप्न दाखवणारा सूर्यकुमार यादव दुहेरी धावसंख्येत गेल्यावर बाद झाला होता. तेव्हा लढला तो विराट कोहली. त्याचं अर्धशतक झालं होतं.

वर्षभरापूर्वी विराटचं अर्धशतक बाबर-महंमद जोडीच्या नाबाद अर्धशतकांपुढे व्यर्थ ठरलं होतं. मेलबर्नच्या भव्य स्टेडियमवर ९० हजार प्रेक्षकांच्या साक्षीनं आणि त्यांच्या कल्लोळात विराटनं झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाची सगळ्या क्रिकेटविश्वाला विशेष दखल घ्यावी लागली. अशक्यप्राय विजय प्रत्यक्षात आणणारी ही खेळी होती. त्यानं नियोजनपूर्वक केलेला खेळ, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची शेवटपर्यंत ठेवलेली जिगर ह्याची जगभरातल्या माध्यमांना स्वाभाविकपणे दखल घ्यावीच लागली. महानायक ठरला तो आज.

‘द डॉन’च्या ऑनलाईन आवृत्तीत सविस्तर बातमी आहे, ह्या सामन्याची. निकालाच्या वृत्तान्तामध्ये त्यांचा क्रीडासमीक्षक लिहितो - झटपट क्रिकेटच्या विश्वचषकातील एक झकास सामना. त्या लढतीत नायक होते, खलनायक होते, शेवटच्या षट्कातलं नाट्य आणि सगळंच काही होतं. ह्या नायकांमधला महानायक निःसंशयपणे होता विराट कोहली!


हुकुमी अर्धशतकी खेळी

कोहलीच्या खेळीचं वर्णन ‘ॲन इम्पीरीअस हाफ-सेंच्युरी’, म्हणजे हुकुमी अर्धशतकी खेळी असं करतानाच ‘द डॉन’च्या वृत्तान्तामध्ये म्हटलंय की, निर्णायक चेंडूच्या वेळी अश्विननं दाखवलेला शांतपणा प्रशंसनीय होता. सामन्यातील परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे शेवटचं षट्क. दोन्ही संघांसाठी फिरकी गोलंदाज म्हणजे गळ्यातलं लोढणं ठरलं असताना शेवटचं षट्क डावरा फिरकी गोलंदाज महंमद नवाजला देण्यात आलं, अशी टिप्पणीही त्यात आहे.

शेवटच्या षट्काबद्दल बराच वाद झाला. विशेषतः पाकिस्तानी चाहत्यांनी नाना आक्षेप घेतले. पहिला आक्षेप होता नो-बॉल देण्याचा. नंतर फ्री-हिटवरच्या तीन वाईडचा. त्याचाही सविस्तर आढावा वृत्तान्तामध्ये आहे. कोहलीचा त्रिफळा उडाला तो चेंडू ‘फ्री-हिट’ होता. त्यामुळं पंचांनी तो ‘डेड बॉल’ घोषित करण्याचा सवालच नव्हता.

पाकिस्तानमधील अजून एक महत्त्वाचं आणि उर्दूतून प्रसिद्ध होणार दैनिक म्हणजे ‘जंग’. त्यांनी विराटच्या खेळीच्या निमित्तानं तो आणि गंभीर ह्यांच्यातील वादालाच महत्त्व दिलं. त्यांच्या बातमीचं शीर्षक आहे - विराट कोहलीचे गौतम गंभीरला चोख उत्तर! त्यात लिहिलंय की, ह्या अप्रतिम खेळीनं त्यानं अनेक टीकाकारांची तोंडं बंद केली. त्याच बरोबर गौतम गंभीरलाही चोख उत्तर दिलं आहे.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना लढाईचं रूप मिळालं ते आखातातील लढतींमुळे. त्यामुळे आजच्या सामन्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीसह आखातातील अन्य देशांनाही कमालीचं स्वारस्य होतं. दुबईच्या दोन महत्त्वाच्या दैनिकांनी भारताच्या विजयाच्या बातम्या सविस्तर दिल्या आहेत. ‘गल्फ न्यूज’चे वरिष्ठ सहायक संपादक अश्फाक अहमद लिहितात की, शेवटच्या दोन षट्कांमध्ये भाग्यानं पाकिस्तानची साथ सोडली. त्याचं कारण होतं आक्रमक, विध्वंसक ‘किंग कोहली.’ टी-20 क्रिकेटमधली त्याची ही निःसंशय सर्वोत्तम खेळी होती. बाबर आजम ह्यानं शेवटचं षट्क फिरकी गोलंदाजाला देऊन घोडचूकच केली, असंही ‘गल्फ न्यूज’चं म्हणणं आहे.

‘खलीज टाइम्स’ हे दुबईतून प्रसिद्ध होणारं महत्त्वाचं दैनिक. त्यांच्या बातमीच्या मथळ्यात ‘विराट कोहली, द सुपरमॅन’ असं विशेष कौतुक करण्यात आलं आहे.

ब्रिटिश दैनिकांच्या संकेतस्थळांवरही सामन्याची बातमी ठळकपणे दिसते. ‘द गार्डियन’च्या वृत्तान्तामध्ये कौतुकानं लिहिलंय, कोहलीचा डाव अविस्मरणीय होता. काळाच्या कसोटीवर उतरणारा होता!

सामन्याला कलाटणी मिळाली शेवटच्या षट्कात. चेंडूगणिक विजयाचं पारडं इकडे वा तिकडे झुकत होतं. त्याबद्दल ‘द गार्डियन’चा क्रीडा समीक्षक लिहितो - सारं नाट्य शेवटच्या षट्कातलं. भारताला सहा चेंडूंमध्ये सोळा धावा हव्या होत्या. प्रत्यक्षात महंमद नवाजनं नऊ चेंडू टाकले. फ्री-हिटवर विराटचा त्रिफळा (आणि तीन बाय), षट्कार, नो-बॉल, दोन वाईड, एक झेल, एक यष्टिचित... असं खूप वैविध्य षट्कामध्ये दिसलं. आणि शेवटची धाव निघाल्यावर कोहली हात उंचावत धावत होता.

‘डेली मेल’च्या ‘मेल ऑनलाईन’ सेवेसाठी पॉल न्यूमन लिहितात - पांढऱ्या चेंडूवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला गेला. विराट कोहलीमुळं भारताला अत्यंत देदीप्यमान विजय मिळविता आला. सामन्यात भरपूर नाट्य घडलं आणि थोड्या वादविवादाची काळी तीटही लागली. पण सगळं काही संपलं, असं वाटण्याजोग्या विपरीत परिस्थितीत भारतानं विजय खेचून आणला. त्याचं कारण विराट कोहली! विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर बहुतेकांना वाटत होतं की, विराटची कामगिरी भूतकाळात जमा झाली. तो संपल्यासारखा आहे. आणि तोच विराट आजच्या नाट्याचं केंद्रस्थान ठरला.

‘विराट कोहली प्लेज वन ऑफ ग्रेट टी-20 वर्ल्ड कप इनिंग्स टू लीड इंडिया टू केऑटिक पाकिस्तान विन’ अशा शीर्षकानं ‘मिरर’चा वृत्तान्त प्रसिद्ध झाला. त्यांचा क्रीडा-समीक्षक हातचं न राखता विराटचं कौतुक करताना लिहितो की, विराटच्या विस्मयजनक खेळीने अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वोत्तम सामना.

‘संडे टाइम्स’लाही विराटचं कौतुक केल्याशिवाय राहावलं नाही. आधुनिक महावीर विराट कोहलीमुळं भारताचा पाकिस्तानवर नाट्यमय विजय, असे तिथले कौतुकाचे बोल आहेत. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तान्ताचं शीर्षकही विराटचं कौतुक करताना म्हणतं -  Virat Kohli brilliance carries India past Pakistan in instant classic 

ही स्पर्धा जिथं होत आहे, त्या ऑस्ट्रेलियाई माध्यमांनीही ह्या अविस्मरणीय खेळीची ठळकपणे दखल घ्यावी, ह्यात आश्चर्य मुळीच नाही. ‘सिडनी मॉर्निंग हेरल्ड’च्या संकेतस्थळावर स्कॉट स्पिट्स लिहितात, विराट कोहलीसारख्या असामान्य दर्जाच्या खेळाडूमुळेच एक उत्तम रंगलेला सामना अविस्मरणीय झाला. पाहा ह्या लढतीत काय झालं ते, शेवटच्या आठ चेंडूंमध्ये तीन षट्कार, दोन गडी बाद, एक नो-बॉल, दोन वाईड, चेंडू यष्ट्यांना लागल्यावर तीन बाय...अफलातून, चमत्कारिक!

‘न्यूज.कॉम.ऑ’ संकेतस्थळाचा मथळा आहे - विराटने एमसीजीवर चमत्कार घडवला!!

आधुनिक जगात क्रिया-प्रतिक्रियांचा पाऊस पाहायचा असेल, तर ‘ट्विटर’वर चक्कर मारणं आवश्यकच असतं. पाकिस्ताननं चालवलेला हॅशटॅग भारतीयांच्या प्रतिक्रियांमध्ये वाहून गेला. प्रसिद्ध समालोचक-समीक्षक हर्ष भोगले लिहितात की, मी विराटला खूप वर्षांपासून पाहतोय. त्याच्या डोळ्यांत कधीही अश्रू दिसले नाहीत. मी ते आज पाहिले!

अगदी खरंय. विराटनं आज कोट्यवधी भारतीयांना, क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांत पाणी आणलं - आनंदाश्रू होते ते.

.....

#टी20 #टी20_विश्वचषक #भारतxपाकिस्तान #विराट_कोहली #महानायक #आयसीसी #माध्यमे #परदेशी_माध्यमे #खलीज_टाइम्स #द_डॉन #द_गार्डियन #परदेशी_माध्यमे_कोहली 

#T20WC #Ind_Pak #SuperHero #Virat_Kohli #Khaleej_Times #Gulf_News #Mirror

.....

(छायाचित्रं विविध संकेतस्थळं व ट्विटर ह्यांच्याकडून साभार)

.....

सोबतच विराटच्या खेळीबद्दल वाचा -

https://khidaki.blogspot.com/2022/10/Virat22.html


Sunday 23 October 2022

अफाट, अचाट...अर्थात विराट!

 


एकच नंबर...

टी-20 विश्वचषकातील आपला पहिला सामना साडेपाच वाजता संपला. त्यानंतरच्या साडेतीन तासांत, आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून ‘विराट कोहली’ अशी अक्षरं लक्षावधी वेळा उमटली असतील. उमटत राहतील. विशेषणांचा वर्षाव झाला असेल. होत राहील. त्याची छायाचित्रं असंख्य क्रिकेटप्रेमींनी एकमेकांना पुढे पाठवली असतील. त्याच्या त्या दोन षट्कारांची क्लिप कोट्यवधी डोळ्यांनी पुनःपुन्हा पाहून, कितव्यांदा तरी दाद दिली असेल. विराटचं कौतुक होत आहे नि होत राहील.

कोणत्या तरी वृत्तपत्रात उद्या ‘‘विराट’ खेळी’, ‘कोहलीमुळे भारताचा ‘विराट’ विजय’ अशा शीर्षकांनी बातम्या प्रसिद्ध होतील. ती अनेक वेळा वापरली गेली असली, तरी उद्या मात्र शिळी वाटणार नाहीत.

विराटची आजची कामगिरीच तशी होती. अफाट, अचाट, विस्मयकारक, लाजवाब, अफलातून, खिळवून ठेवणारी... विशेषणं कमी पडावीत अशी. विशेषणांना विशेषणं लावावीत अशी.

सामन्याच्या आधी राष्ट्रगीत झालं. ते संपता क्षणी कर्णधार रोहित  भाववश झाला. त्याची ती छबी पाकिस्तानचा डाव संपेपर्यंत साथीसारखी सर्व दूर गेली. डावऱ्या, शिडशिडीत, तरण्याबांड अर्षदीप सिंग ह्यानं कर्णधार बाबर आजमला अगदी यष्ट्यांसमोर पकडलं. महंमद रिजवानला उसळत्या चेंडूच्या सापळ्यात बरोबर अडकवलं.

एखाद्या सज्जन, आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणं मैदानावर वावरणाऱ्या भुवनेश्वरकुमारनं पहिल्या दोन षट्कांत प्रतिस्पर्ध्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ दिला नाही.

अशा अवघड परिस्थितीतून शान मसूद आणि इफ्तिकार अहमद ह्यांच्या जोडीने वाट काढली. विराटसारख्या कसलेल्या क्षेत्ररक्षकाचा नेम चुकला नि जोडी फुटता फुटता राहिली. विराटच्याच उत्कट प्रयत्नांनंतरही झेल त्याच्या समोर काही अंतरावर पडला. रविचंद्रन अश्विन फूटभर आधीच थांबता झाला आणि सहज होणारा झेल निसटला. नंतर आपल्याच गोलंदाजीवर साभार परत आलेला फटकाही त्याला पकडता आला नाही. तेव्हा वैतागलेल्या रोहितचा चेहरा कॅमेऱ्याने टिपलाच.

अक्षर-अश्विन ह्या फिरकी जोडीची झालेली पिटाई, मग हार्दिक पंड्याचे तीन बळी, सूर्यकुमार यादवचे दोन झेल, भारतीय गोलंदाजांनी अलीकडच्या ‘लौकिकाला’ जागत एकोणिसाव्या षट्कात दिलेल्या चौदा धावा...

राहुलनं यष्ट्यांवर ओढवून घेतलेला चेंडू, उजव्या यष्टीवरून हलकेच बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेड काढण्याचा रोहितला न  आवरलेला मोह, पहिल्याच चेंडूवर खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार वसूल करणारा नि नंतर अपेक्षाभंग करणारा सूर्यकुमार...

चाळीस षट्कांच्या आणि जेमतेम साडेतीन-चार तासांचा अवकाश असलेल्या ह्या सामन्यांतील बहुतेक साऱ्या गोष्टी विसरल्या जातील.


स्टेडियममधला तो फलक आणि विराटचा उंचावलेला हात
सांगतोय - 'जिंकलो रे...'
लक्षात राहील विराट आणि हार्दिक ह्यांची शतकी भागीदारी. विराटनं शेवटच्या दोन षट्कांत टाकलेला टॉप गीअर.

लक्षात राहील कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला अटीतटीचा विजय.

लक्षात राहील दिवाळीच्या एकच दिवस आधी फटाक्यांचा दणदणाट करण्याची विराटने दिलेली संधी.

एखाद्या कुशल स्थापत्यविशारदाने डौलदार, टुमदार, देखणी इमारत टप्प्याटप्प्याने उभी करावी आणि अंतिमतः तिचं दर्शन झाल्यावर तोंडात बोट घालण्याला पर्याय नसावा, तशीच ही विराटची खेळी. मैदान मोठं आहे, हे समजून फटक्यांची आतषबाजी करण्याचा मोह टाळून एकेरी-दुहेरी आणि आता फार कमी वेळा पाहायला मिळणाऱ्या तिहेरी धावा घेण्यासाठीची त्याची ती चित्ता-चपळाई. संधी मिळताच तणाव दूर करणारे उत्तुंग फटके. अश्विनने फटका मारल्यावर  विजयी धाव पूर्ण केल्यानंतर यष्ट्यांभोवती थिरकलेले विराटचे पाय आणि जमिनीवर बसून काही करणारा विराट...

पाकिस्तानविरुद्धची लढत जिंकली. तब्येत खूश झालेले आपण भारतीय पुन्हा म्हणू - बस्स! आज विश्वचषक जिंकला!! पुढे काय व्हायचंय ते होऊ द्या...

तिसऱ्या-चौथ्या स्टंपातला फरक न कळणारे अनेक सोशल मीडिया पंडित विराटला संघाबाहेर बसवा, असं गेला काही काळ बोलत आहेत. त्यांच्यासह साऱ्या क्रिकेटरसिकांना विराटनं आज अप्रतिम भेट दिली.


काय खेळलाय गडी!
आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत, हे विराटनं आज (पुन्हा एकदा) सिद्ध केलं! त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम, सर्वाधिक आकर्षक आणि हुशारीने रचलेल्या डावांमध्ये आजचा डाव हुकुमाचा असेल, हे नक्की!

‘किंग कोहली’ कौतुकानं म्हणतात.

आजच्या खेळीनं ‘किमयागार’ दिसला. स्वच्छ. लखलखीत. खणखणीत.

......

#टी20 #टी20_विश्वचषक #भारतxपाकिस्तान #विराट_कोहली #विराट_खेळी #दिवाळी_भेट

...........

(छायाचित्रं सौजन्य : ईएसपीएनक्रिकइन्फो आणि आयसीसी ह्यांची संकेतस्थळं)

.........

सोबतच वाचा - परदेशी माध्यमांकडून कौतुकाचा वर्षाव 

https://khidaki.blogspot.com/2022/10/SuperHero.html

Monday 12 September 2022

दुःखाचा विसर, आशेचा बहर

 


विजयाचा जल्लोष, देशबांधवांना दिलासा!

देशबांधवांना खात्रीनं अन्नधान्याचा पुरवठा करता येईल, दैनंदिन गरजा पूर्ण होतील, आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करता येईल...अशा विविध तातडीच्या कारणांसाठी श्रीलंकेला आशियाई विकास बँकेकडून ७३ अब्ज रुपयांचं कर्ज मदतीच्या स्वरूपात हवं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ३७ राज्यमंत्री सचिवांविनाच काम करीत आहेत. जनतेच्या पैशाचा विनियोग अत्यावश्यक नि योग्य कामांसाठी व्हावा, ह्यासाठी त्यांनी आपल्या भत्त्यांवर पाणी सोडण्याची तयारी दाखविली आहे. सार्वजनिक क्षेत्रांतील कर्मचारी भरती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

पाकिस्तानचा जवळपास एक तृतीयांश भाग पुराच्या तडाख्याने हतबल झालेला दिसतो. चौदाशे नागरिकांचा मृत्यू, चल-अचल संपत्तीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ह्या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी पाकिस्तानला अब्जावधी रुपयांच्या मदतीची गरज भासेल. आमच्यापर्यंत मदत पोहोचलीच नाही, असा आक्रोश असंख्य पूरग्रस्त करताना पाहायला मिळतात.

.

,

,

‘If you play good cricket, a lot of bad things get hidden.’

...भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार कपिलदेव ह्याचे हे उद्गार आहेत म्हणे. श्रीलंकेतील सव्वादोन कोटी आणि पाकिस्तानातील २३ कोटी लोकसंख्येला बऱ्याच वाईट गोष्टींचा विसर पडला तर हवाच आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष रविवारी (११ सप्टेंबर) दुबईतील क्रिकेट स्टेडियमकडे लागलं होतं. अनेक दिवसांचं दुःख, तणाव ह्यातून थोडी सुटका मिळावी म्हणून आपल्या संघानं आशिया करंडक जिंकावा, अशी आस त्यांना होती. हीच भावना श्रीलंकेतील आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र ‘द संडे टाइम्स’ने रविवारी व्यक्त केली. दैनिकाचा क्रीडा समीक्षक लिहितो, ‘ही लढत जो संघ जिंकील, तो आपल्या देशबांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलवील. हे विजेतेपद आर्थिक, नैसर्गिक संकटांमुळे हताश झालेल्या, मोडून पडलेल्या देशवासींना दिलासा देईल.’

श्रीलंकेचे यश

देशबांधवांना असा दिलासा देण्यात दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ यशस्वी ठरला! लागोपाठ दुसऱ्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला धूळ चारली. ‘सुपर फोर’च्या शेवटच्या सामन्यात पाच गडी राखून आणि स्पर्धेच्या अंतिम लढतीत २३ धावांनी. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची गती विजेत्यांच्या तुलनेत षट्कामागे एका धावेहून किंचित जास्तच संथच राहिली.


यश एका पायरीने जवळ...श्रीलंकेच्या खेळाडूंचा आनंदोत्सव.

अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील बारापैकी नऊ सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ यशस्वी ठरला. खुद्द श्रीलंकेनेही अंतिम फेरी गाठताना सलग चार सामने जिंकले ते लक्ष्याचा पाठलाग करूनच. आज नाणेफेकीचा कौल विरुद्ध जाऊन आणि त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करावी लागूनही शनाकाच्या संघाने कच खाल्ली नाही. कोणतंही मोठं नाव नसलेल्या ह्या संघाने ही मोठी स्पर्धा जिंकली. एकही स्टार नसलेला संघ सुपरस्टार ठरला.

फिनिक्स-भरारी

आशिया करंडक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून आठ गडी राखून पराभूत झालेला श्रीलंकेचा संघ अशी फिनिक्स-भरारी घेईल, अशी अटकळ क्रिकेटपंडितांनी कितपत बांधली असले, ह्याची शंकाच आहे. त्यांची गटातील दुसरी लढत बांग्ला देशाशी होती. सामन्यापूर्वीच जोरदार शब्दयुद्ध झाले. बांग्ला देश संघाचे प्रशिक्षक खालेद महमूद आणि जखमी झाल्यामुळे स्पर्धेत न खेळणारा यष्टिरक्षक नुरूल हसन ह्यांनी श्रीलंकेला डिवचले. ‘दखल घ्यावी, असा एकही गोलंदाज श्रीलंकेच्या संघात नाही,’ असं महमूद म्हणाले होते. ह्याला श्रीलंकेनं मैदानात चोख उत्तर दिलं. बांग्ला देशाला दोन गडी राखून हरवून संघानं विजयी वाटचाल चालू केली.

‘सुपर फोर’मधील तिन्ही लढती जिंकताना श्रीलंकेचा खेळ सामन्यागणिक उंचावत गेला. स्पर्धेतील संभाव्य विजेता म्हणविल्या जाणाऱ्या भारतावर सहा गडी राखून विजय मिळवताना त्यांना लय गवसली. त्या सामन्यात कर्णधार शनाका व भानुका राजपक्षे ह्यांनी कसोटीच्या वेळी ३५ चेंडूंमध्ये ६४ धावा कुटत अवघड वाटणारा विजय मिळवून दिला.

स्पर्धेतील शेवटचे दोन सामने त्याच प्रतिस्पर्ध्यांमध्ये झाले - श्रीलंका व पाकिस्तान. ‘सुपर फोर’ आणि अंतिम लढत, दोन्ही वेळा पाकिस्तानचे दहाही गडी बाद करण्याची किमया श्रीलंकेच्या ‘अदखलपात्र’ गोलंदाजांनी केली! वानिंदू हसरंगा डी’सिल्वाचे लेगस्पिन आणि गुगली ओळखण्यात पाकिस्तानचे फलंदाज साफ अपयशी ठरले. त्याने दोन सामन्यांत मिळून सहा बळी मिळवले. तशीच कामगिरी प्रमोद मदुशान ह्यानं केली. त्याचं पदार्पणच मुळी शेवटून दुसऱ्या सामन्यात झालं.

मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला


निकडीच्या वेळी निर्णायक खेळी.

मोक्याच्या क्षणी सावरण्यात आणि खेळ उंचावण्यात श्रीलंकेचा संघ यशस्वी ठरला, हेच अंतिम सामन्याचं वैशिष्ट्य. डावातील नऊ षट्के संपलेली असताना निम्मा संघ तंबूत परतला होता आणि धावा होत्या ५८. इथे जोडी जमली प्रमोद भानुका राजपक्षे आणि हसरंगा ह्यांची. डावाच्या पूर्वार्धातील पाकिस्तानी गोलंदाजांचा वरचष्मा त्यांनी पार पुसून टाकला. ह्या दोघांनी ३६ चेंडूंमध्ये ५८ धावा जोडल्या, त्यात हसरंगाचा वाटा ३६ धावांचा. तो बाद झाल्यावर आलेल्या चमिका करुणारत्नेला साथीला घेऊन भानुका राजपक्षेने केलेल्या फलंदाजीला तोड नाही. चाळिशीनंतर मिळालेल्या दोन जीवदानांचा बरोबर फायदा उठवत त्याने खणखणीत ७१ धावा केल्या. स्वैर मारा आणि खराब क्षेत्ररक्षणाच्या रूपाने पाकिस्तान संघाने श्रीलंकेला जणू बोनसच देऊ केला. सामना संपल्यावर त्याची कबुली देताना बाबर आझम म्हणालाच की, आम्ही १५-२० धावा जास्त दिल्या.

पाकिस्तानी फलंदाजीची ताकद बघता आणि अफगाणिस्तावर त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी मिळविलेला सनसनाटी विजय ताजाच असल्यामुळे १७१ धावांचे लक्ष्य अशक्यप्राय वाटणारे नव्हते. इथे श्रीलंकेच्या मदतीला धावला दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा प्रमोद मदुशान लियानगामगे. आपल्या पहिल्या आणि डावातील तिसऱ्या षट्कांत त्याने आधी कर्णधार बाबर आझमला व त्या पाठोपाठच्या चेंडूवर फखर झमानला बाद केले.

यष्टिरक्षक महंमद रिझवान व इफ्तिकार अहमद ह्या जोडीने जम बसवला होता. त्यांची ७१ धावांची भागीदारी धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच श्रीलंकेच्या मदतीला पुन्हा धावला तो प्रमोद मदुशान. इफ्तिकारचा फसलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून डीप स्क्वेअर लेगच्या सीमेपर्यंत धावत जाऊन अशेन बंदारा ह्यानं चांगला पकडला. तरीही रिझवानला लय सापडलेली असल्यामुळे पाकिस्तानला अगदी अडचणीत आहे, असं म्हणता येत नव्हतं. पण सोळाव्या षट्कात महंमद नवाज बाद झाला आणि श्रीलंकेला विजयाचा वास लागला.

सतरावं षट्क धोक्याचं...


हसरंगाच्या गुगलीची कमाल.

सामन्याच्या शेवटच्या चार षट्कांमध्ये पाकिस्तानला ६१ धावांची गरज होती. पहिल्या तीन षट्कांत एकही बळी न घेता आलेला हसरंगाने सतराव्या षट्कात सामन्याचा नूरच बदलून टाकला. पहिल्याच चेंडूवर त्यानं अर्धशतकवीर महंमद रिझवानला बाद केलं. मग एकाआड एक चेंडूवर - दोन गुगलींवर, आधी त्यानं असिफ अलीला चकवलं आणि मग खुशदिलला झेल देणं भाग पाडलं. आता श्रीलंकेच्या विजयाचा केवळ उपचार बाकी होता. शेवटच्या दोन षट्कांत तळाच्या फलंदाजांनी थोडी बॅट चालवली खरी; पण त्यानं निकाल बदलणार नाही, हे तोपर्यंत नक्की झालं होतं. ‘आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील, असा विश्वास मला आहे. जलदगती, लेगस्पिन आणि ऑफस्पिन हे वैविध्य फलंदाजांच्या कोणत्याही फळीपुढे आव्हान निर्माण करण्यात यशस्वी होईल. तीच आमची जमेची बाजू,’ असं श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका सामन्यापूर्वी म्हणाला होता. हा विश्वास त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच बाबींत श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला वरचढच ठरला. विशेषतः त्यांचं क्षेत्ररक्षण फार सरस झालं. अंतिम सामन्याचा मानकरी हसरंगा की राजपक्षे, हा मोठा जटील प्रश्न होता. पण हसरंगा स्पर्धेचा मानकरी निवडला गेला आणि राजपक्षेच्या जबाबदारीने केलेल्या खेळीवर सामन्याचा मानकरी म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं. श्रीलंकेचं आठ वर्षांतलं हे पहिलंच महत्त्वाचं यश. देश अनंत अडचणींना तोंड देत असताना सामान्य माणसाला त्याचा काही काळापुरता विसर पडायला लावणारं झळझळीत यश!

ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. आशिया करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या सहापैकी चार संघांचा त्यातील प्रवेश निश्चित आहे. उरलेले दोन संघ म्हणजे विजेता श्रीलंका आणि तळाला राहिलेला हाँगकाँग. वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे ह्यांच्यासह श्रीलंकेलाही पात्रता फेरीत खेळून स्वतःला सिद्ध करणं भाग आहे. आशियाई विजेतेपद त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास नक्कीच मदत करील.

.........

(छायाचित्रे सौजन्य : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, ‘डेली न्यूज’, ‘डॉन’ ह्यांच्या संकेतस्थळावरून. माहितीस्रोत : विविध संकेतस्थळे.)

.........

#cricket #T20 #asia_cup22 #SriLanka #Pakistan #Wanindu_Hasaranga #Bhanuka_Rajapaksa #reliefforLanka

.........

सतीश स. कुलकर्णी 

संपर्क - sats.coool@gmail.com

.........

Tuesday 16 August 2022

१५ ऑगस्ट : नोंदी नि आठवणी

 


‘सोल्जर्स डिफेन्स एकेडमी’मधील ध्वजवंदन.

पंधरा ऑगस्ट! त्याचा उत्साह जाणवणारा असतोच एरवीही. चौक सजतात. कर्ण्यांवर ‘मेरे देश की धरती...’, ‘हम जियेंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए...’ ही आणि अशी गाणी ऐकू येत असतात. रेडिओ चालूच असतो. त्यावरही आठवडाभर देशभक्तिपर गाणी ऐकू येत असतात. यंदाचा उत्साह किती तरी अधिक. खूप आधीपासून दिसणारा, खुणावणारा, अंगात वेगळंच रसायन भिनवणारा.

ध्वजवंदनाला गेलो नाही, त्याला किती वर्षं झाली? आठवत होतो मागच्या आठवड्यात. मोजली नाहीत. कामाच्या वेळापत्रकामुळं अवेळी झोपायची नि अवेळी उठायची सवय लागलेली. ठरवूनही आणि गजर लावूनही सकाळी ठरल्या वेळी उठणं आणि आवरणं व्हायचं नाही. मग स्वाभाविकच चिडचिड. असे बरेच स्वातंत्र्यदिन नि प्रजासत्ताकदिन हुकले. मग दिवसभरात कुठल्या ना कुठल्या शाळेवर, सरकारी इमारतीवर, चौकातल्या तरुण मंडळाच्या मंडपावर डौलात फडकणारा तिरंगा दिसायचा. तो ओशाळेपणा पुन्हा जागा व्हायचा.

एरवी रस्त्यानं जाताना एखाद्या शाळेत प्रार्थना नि राष्ट्रगीत चालू असलेलं ऐकायला आलं की, आपोआप थांबतो. पाय जुळवून पावलांमध्ये पंचेचाळीस अंशांचा कोन, हात सरळ नि मुठी वळलेल्या. किती वेळ थांबावं लागतं? फार फार तर ५२ सेकंद. असं अचानक थांबल्याचं पाहून रस्त्याने जाणारे-येणारे काही जण थोडं आश्चर्यानं बघतात. काही जण थांबतात. शाळेला उशीर झाला असलेले विद्यार्थी धावत-पळत असतात. पण ‘जन गण मन...’ ऐकू आलं की, अर्जंट ब्रेक लावल्यासारखी तोल संभाळत थांबतात. जागेवरच. ‘सावधान’मध्ये!

टीव्ही.वर अधिकृत सरकारी कार्यक्रमाचं थेट प्रसारण असलं की, राष्ट्रगीताचा समावेश असतोच. मंत्रिमंडळाचा शपथविधी, विस्तार असला की, कार्यक्रमाची सुरुवात नि शेवट त्यानंच होतो. कितीही लोळत पडून पाहत असलो, तरी लष्करी बँडच्या सुरावटीवर राष्ट्रगीत वाजू लागताक्षणी ताठ उभं राहतो. डोळे बंद करतो. असं खूप जण करत असतील... माझ्यासारखं सांगत नसतील, एवढंच!

सैन्यदलाच्या सायकलिंग संघाचं प्रशिक्षण नगरमध्ये होतं. बऱ्याच वर्षांपासून. त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते सुभेदार सुमेरसिंग. (खरं तर आधी त्यांचं नाव ‘सुमेरसिंह’ असंच लिहीत होतो. कारण पंजाबी असेल तर ‘सिंग’ आणि हरयाणवी, राजस्तानी, उत्तर प्रदेशी असेल तर ‘सिंह’, अशी वृत्तपत्रीय सवय भिनलेली. पण सुमेरसरांचा आग्रह ‘सिंग’ असंच म्हणा, लिहा.) त्यांनी अलीकडंच निवृत्ती स्वीकारली आणि सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण देणारी स्वतःची संस्था उभी केली. भिंगारच्या थोडं पुढं, सलाबतखानाच्या कबरीच्या ऊर्फ चांदबीबी महालाच्या अलीकडं त्यांची ‘सोल्जर्स डिफेन्स एकेडमी’ आहे.

सुमेरसरांनी चार-पाच दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, ‘सर, अपनी एकेडमीमे स्वतंत्रता दिन मनाना है। आपको आना होगा। आपके हाथ से झंडा फहराएंगे...’ कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी रविवारी रात्री पुन्हा त्यांचा फोन. ‘माझ्या हस्ते कशाला ध्वजवंदन? मी येतो की नुसता...’ माझा गुळमुळीत शब्दांत विरोध. हरयाणवी हिंदीत ते म्हणाले, ‘‘आप आओ तो सही... देखेंगे किस के हाथ से झंडा फहराना है!’’

सुमेरसर भिवानी जिल्ह्यातले. सैन्यभरतीसाठी नगरला आले. इथं भरती झाले आणि २८ वर्षांची सेवा इथंच केली. सैन्यदलाच्या संघाला त्यांनी जागतिक स्पर्धेत पदकं मिळवून दिलेली आहेत. तर त्यांच्या बोलण्यातला ‘मैं देख्या...’, ‘मैं बोल्या...’ हा हरयाणवी ढंग तीन दशकांमध्ये काही गेलेला नाही. त्याबद्दल पुन्हा कधी तरी.

गजर लावून वेळेवर उठलो. ‘अजून फक्त पाचच मिनिटं...’ असं नेहमीसारखं मनाला सांगत लोळलो नाही. आळस केला नाही. पटापट आवरलं. नऊ वाजता तिथं पोहोचायचं होतं. घराच्या खिडकीत ध्वज लावला. त्या आधी त्याला कडक इस्त्री केली. सॅल्युट वगैरे न ठोकता नेहमीसारखाच दोन हात जोडून नमस्कार केला.

गाडी घेऊन निर्मल थोरात येणार होता. तिथपर्यंतचं एक-सव्वा किलोमीटर चालत जायचं होतं. घराबाहेर पडताक्षणी वातावरणातला सळसळता उत्साह जाणवला. बहुतेक घरांच्या सज्जात, खिडक्यांमध्ये किंवा गच्चीवर राष्ट्रध्वज फडकत होता. धावणाऱ्या रिक्षांवर झेंडे दिसत होते. आळसावलेले पालक मुलांना शाळेतून घेऊन घरी परतत होते. कडक गणवेषातली, तिरंग्याचा बिल्ला छातीवर लावलेली किंवा हातात छोटा झेंडा घेतलेली ही मुलं मोठ्या उत्साहात दिसत होती.


भेळेची गाडीवर अभिमानाचा झेंडा!
झपझप चालत असतानाच भेळेची एक हातगाडी जाताना दिसली. तरुण पोरगा पुढे आणि मध्यमवयीन मागे. आज सुटीच्या दिवशी इतक्या सकाळी हा कुठं चाललाय भेळेची गाडी लावायला? मनातल्या प्रश्नाचं उत्तर नंतर मिळालं. सहज पाहिलं तर गाडीच्या बाजूला छान ध्वज लावलेला. पुढच्या बाजूला वरही झेंडा फडकत होता. फोटो काढावा म्हटलं आणि खिशातून मोबाईल काढला. रस्त्याला किंचित उतार होता. भरगच्च भरलेल्या गाडीला स्वाभाविक गती मिळाली होती. मी फोटो काढतोय, हे लक्षात येताच मागं असलेल्या माणसानं - बहुतेक तो मालक असावा - पटकन् गाडी थांबवली. मला पुरेसा वेळ दिला. ‘फोटो झेंड्याचा काढायचाय, आपला नाही,’ अशा उपजत शहाणिवेनं पुढचा तरुण लगेच कॅमेऱ्याच्या बाहेर गेला. त्याला म्हटलं, तू असलास तरी हरकत नाही. किंबहुना येच तू गाडीजवळ.

दोन-तीन फोटो काढले. मालकानं खुशीत विचारलं, ‘भारी लागलाय ना आपला झेंडा? चांगलं दिसतंय ना!’ त्याच्या उत्साहाला एका जोरदार हास्याची पावती देऊन पुढे निघालो.


‘काढा की फोटा...
त्यात काय इचारायचं राव!’
रस्त्यावर गर्दी होतीच. चहाच्या टपऱ्या नुकत्यात चालू झाल्या होत्या. चौकातलं एक मोठं हॉटेल उघडत होतो. निर्मलसर यायला अजून थोडा अवकाश होता. तिथं थांब्यावर रिक्षा. तिरंगा डौलात मिरवणाऱ्या. एक रिक्षा निघणारच होती. फक्त एक पॅसेंजर हवा होता. रिक्षाचालक पुढच्या सीटवर आरामात रेललेला. त्याच्या कपाळावर भस्म-इबिताची तीन आडवी बोटं. सकाळीच महादेवाचं दर्शन घेऊन आला असणार. श्रावणी सोमवार ना! मागे एक ग्रामीण भागातले गृहस्थ बसलेले. ‘फोटो काढू का रिक्षाचा?’ असं विचारल्यावर चालकबुवा म्हणाले, ‘काढा की... त्यात काय इचारायचं राव!’

बाजूलाच असलेल्या टपरीमध्ये गॅसवर चहा उकळत होता. इकडे-तिकडे हवेनं टम्म भरलेल्या खाद्यपदार्थांच्या पिशव्यांच्या माळा लागलेल्या. त्या साऱ्याच्या वर होता तिरंगा. एका झाडाच्या फांद्यांमधून अलगदपणे वाट काढत सहज ताठपणे उभा असलेला.

निर्मलसरांच्या गाडीत बसून अकादमीकडं निघालो. भिंगारच्या आधी प्रसिद्ध भुईकोट किल्ला. तिथं तोबा गर्दी. वेगवेगळ्या वस्तू, फुगे, खेळणी विकणाऱ्या अनेक गाड्या. खाद्यपदार्थांच्याही गाड्या. प्रभाकर भेळवाले सकाळी सकाळी कुठं चालले होते, ह्याचा उलगडा झाला.

सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुक असलेले ‘कैडेट’ तयारच होते. प्रत्येकाची ‘पाय लागू’ची घाई... त्यांना आवरता आवरता दमछाक. अकादमी अलीकडेच सुरू झालेली. पण छान व्यवस्था असलेली. पावसामुळं नजर टाकावी तिकडे हिरवाई दिसत होती. मुलं, त्यांचे पालक आले. सुमेरसरांच्या जिवाभावाची आर्मीमधले कोचमंडळी आली. त्यातल्या धर्मेंद्र यांनी पांढरा सुळसुळीत झब्बा आणि पायजमा चढवला होता. पायात राजस्तानी मोजडी. बाकीचे त्यांना ‘एमएलए साब’ म्हणून चिडवत होते. सायकलिंग संघाचे प्रशिक्षक सतीशकुमार होते. रग्बीचे प्रशिक्षक अश्विनीकुमार, चरणजितसिंग आणि सेंदिलकुमार होते. रग्बीबद्दल सेंदीलकुमार ह्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता एकदा खेळ बघायला जायचंय.


अस्मादिकांच्या हस्ते ध्वजवंदन. रोमांचकारक...

सैन्यातल्या नोकरीनंतर आता पोलीस सेवेत असलेला खो-खोपटू राजू गालफाडेनं ध्वजवंदनाची सगळी चोख व्यवस्था केली. पुन्हा तपासून खातरी केली आणि मगच माझ्या हाती दोरी दिली. ध्वज हळुहळू वर चढत गेला. राष्ट्रगीत म्हणताना सवयीनंच माझे डोळे बंद झाले...

......

आणखी एक मनाला लागलं होतं. पण ती खंतही दूर झाली. घरात बिल्ला आहे तिरंगी. सुबक, छान पिन असलेला. आज कार्यक्रमाला जाताना तो नेमका सापडला नाही. पण कार्यक्रमात ती सोय होती. एक छान बॅज पाहुणा म्हणून लावण्यात आला छातीवर. तो दिवसभर मिरवला आज.

खूप वर्षांची रुखरुख दूर झाली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचा मुहूर्त त्याला लाभला. लक्षात राहील असा अमृतमहोत्सव.

......

मन्ना डे ह्यांच्या दमदार आवाजातलं ‘ए मेरे प्यारे वतन...’ कधीही, कुठंही कानी पडलं की, ते ऐकतोच. ‘ए मेरे वतन के लोगों...’एवढंच ते प्रिय. ह्या गाण्याची आठवण स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाशी जोडली गेलेली आहे.

ते वर्ष १९९७. ऑगस्टची १४ तारीख. वर्तमानपत्रांना त्या काळात वर्षभरातून जेमतेम चार सुट्या असत. त्यातली एक उद्या होती. काम जवळपास साडेनऊलाच संपलं होतं. पण साडेअकरापर्यंत थांबणं भाग होतं. वार्ताहर मंडळी निघून गेली सारी. एक कम्प्युटर ऑपरेटर, एक उपसंपादक आणि एक शिपाई.

पुण्यातून पावणेअकरा वाजता फोन आला - ‘अरे, उद्या स्वातंत्र्यदिन. सुवर्णमहोत्सवाची सांगता. नगरमध्ये काही कार्यक्रम नाहीत का? बातमी नाही दिली तुम्ही...’

कुणीच वार्ताहर नव्हता. सांगितलं, ‘दहा मिनिटांत देतो.’ वार्ताहरांच्या ट्रेमध्ये पाहिलं, काही पत्रकं होती. स्वातंत्र्यदिनानिमित्तचे कार्यक्रम. त्या मध्यरात्री भुईकोट किल्ल्यावर एक मिरवणूक जाणार, हे माहीत होतं. मेणबत्त्या किंवा मशाली हाती घेऊन. दहा मिनिटांत बातमी तयार. पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध होण्यासाठी. तिचं कात्रण अजून आहे. कधी वाचतो, तेव्हा वाटतं की, (टेबलावर बसून) लिहिलेल्या ह्या बातमीला आपण ‘बाय-लाईन’ घ्यायला हवी होती. तिची भट्टीच तेवढी जमून गेली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर गावाला जायचं होतं. झोपलो तर पहाटे जाग येण्याची शक्यता जवळपास शून्यात. ‘चला, उठा...’ असं सांगायला कुणी नव्हतं. मग रेडिओ लावला. मध्यरात्री बारापासून पहाटे पाच वाजेपर्यंत. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव आकाशवाणी मोठ्या उत्साहानं साजरा करीत होती. थोडं वर्णन, मग गाणं... असा छान कार्यक्रम चालला. एकाहून एक सुंदर गाणी ऐकली त्या रात्री. त्या कार्यक्रमाचं नाव होतं, ‘ए मेरे प्यारे वतन...’ पाच-सात मिनिटांनी एक छोटीशी विश्रांती व्हायची आणि मन्नादा आर्तपणे एकच ओळ गायचे - ‘ए मेरे प्यारे वतन...’ आधी अनेकदा ऐकलेलं आणि आवडलेलं गाणं. पण त्या रात्रीपासून ‘तुझपे दिल कुर्बान!’ अशी अवस्था झाली, ती अजून संपलेली नाही.

......

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाच्या अनेक आठवणी आहेत. इतरांप्रमाणेच. इस्त्रीचा गणवेश, ती कवायत... त्यात वेगळं काही नाही. एका प्रजासत्ताकदिनाला गेलो नव्हतो. त्याबद्दल वाटणारी खंत नंतर लेख लिहून आणि आमचं छान संचलन बसवणाऱ्या क्रीडाशिक्षकांची त्या लेखातून माफी मागून व्यक्त केली. मोकळं वाटलं ते लिहिल्यानंतर. एक ओझं कमी झालं मनावरचं.

स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा झाला, तेव्हाचं फार काही आठवत नाही. बांगला देशाला मुक्त करणारी लढाई आपण मोठ्या थाटात जिंकली होती. त्यामुळे तेव्हा मोठाच उत्साह असणार. आमच्या घरात एक महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेलं एक पुस्तक होतं. त्यात राष्ट्रध्वजाचा आकार व रंग, तो फडकावण्याची आचारसंहिता, विद्यार्थ्यांच्या उभ्या नि बैठ्या कवायतींचे प्रकार, लेझीम-डंबेल्स-काठीचे डाव... अशी खूप माहिती होती. शेवटच्या काही पानांमध्ये देशभक्तिपर गीतं होती. सानेगुरुजींचं ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो...’ हे गीत त्या पुस्तकात वाचून वाचूनच पाठ झालं.

खूप दिवसांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला जाता आलं आणि काही आठवणी मनाच्या तळातून वर आल्या.

........................

#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव #तिरंगा #राष्ट्रध्वज #सुमेरसिंग #ए_मेरे_प्यारे_वतन #मन्ना_डे #सोल्जर्स_डिफेन्स_एकेडमी 

........................

(हेही आवडेल वाचायला  ...हा माझाच देश आहे!)


Tuesday 31 May 2022

भाजीमंडई...ताजी टवटवीत, हिरवीगार शाळा


बिकानेरला जाताना मध्य प्रदेशातील नयागांव येथे चहासाठी थोडाच वेळ थांबलो.
पण तेवढ्या वेळात लक्ष वेधून घेतलं भाज्यांनीच. 

'तुमचा आठवड्यातला सर्वांत आवडता वार कोणता?'

ह्या प्रश्नाला बहुतेकांचं उत्तर 'रविवार' येईल. बहुदा हे माहीत असल्यामुळंच उमाकांत काणेकर ह्यांनी गाणं लिहिलंय पूर्वी - 'रविवार माझ्या आवडीचा...' बच्चेकंपनीप्रमाणं मोठ्यांचीही ही आवड आहे, ह्यात नवल नाही. त्याच्या मागचं कारण साधं-सोपं आहे. तो अनेकांच्या सुटीचा वार असतो. साप्ताहिक सुटी. आठवडाभर काम केल्यानंतर (किंवा तसं केल्याचं साहेबाला दाखवल्याची कसरत आठवडाभर केल्यानंतर) येणारा हमखास विश्रांतीचा दिवस. असं आवडत्या वाराबद्दल आजपर्यंत तरी कुणी विचारलेलं नाही. समजा, कुणी ते काढून घेण्याचा प्रयत्न केलाच, तर सांगीन, 'आधी शुक्रवार आणि आता मंगळवार.' हे दोन्ही देवीचे वार. तुळजाभवानीचे आणि जगदंबेचे. इतक्या वर्षांच्या आणि तीन-चार वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये ह्या दोन वारांना साप्ताहिक सुटी कधीच आली नाही. त्या दिवशी कधी लॉटरी वगैरे लागलेली नाही. आयुष्याला फार मोठी (सुखद) कलाटणी ह्याच दोन वारी कधी मिळाली, असंही काही घडल्याचं आठवत नाही. तरीही ते सुखाचे वार. होते, आहेत आणि असतीलही...

आधी शुक्रवार आणि अलीकडच्या काही वर्षांत मंगळवार हे महत्त्वाचे दिवस ठरले, त्याचं कारण राहत असलेल्या गावात-शहरात त्या दिवशी असलेला आठवडे बाजार. बाजाराचा दिवस म्हणजे मंडईचा दिवस.

जिवंत चित्र. सळसळता उत्साह

मंडई! शब्द नुसता ऐकला की, डोळ्यांसमोर उभं राहतं एक जिवंत चित्र. सळसळता उत्साह. दिसू लागतात हिरव्यागार, ताज्या ताज्या, कोवळ्या भाज्यांचे ढीग. स्वस्त नि मस्त भाज्या. जाणवते तिथली दाटी. ऐकू येतं भाजीवाल्यांचं ओरडणं. भरपूर पायपीट करायला लावणारं, बोलायला लावणारं, 'घेता किती घेशील दो करांनी...' अशा संभ्रमात पाडणारं, 'जड झाले ओझे...' म्हणायला भाग पाडणारं ठिकाण म्हणजे मंडई. तिथं रंगांची उधळण पाहायला मिळते. ओलसर ताजा वास छाती भरून टाकतो. माणसांचे हर तऱ्हेचे नमुने तिथं अगदी सहज दिसतात.

आपल्याकडे मंडई म्हणजे भाजीबाजार. शब्दकोशही तेच अर्थ सांगतात. मॅक्सिन बर्नसन ह्यांच्या शब्दकोशात मंडईचा अर्थ दिला आहे 'भाजीबाजार.' मोल्सवर्थ अधिक चित्रमयरीत्या तो अर्थ सांगतो. तो मंडईला 'A green market' म्हणतो. भाज्या आणि फळांची ठोक पद्धतीने विक्री होणारं शहरातलं स्थान, अशी मंडईची व्याख्या त्याच्या शब्दकोशात दिली आहे. 'भाजीपाल्याची जेथें मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते असें शहरांतील ठिकाण; भाजीपाल्याचा बाजार' म्हणजे मंडई, असं महाराष्ट्र शब्दकोशात (यशवंत रामकृष्ण दाते) सांगितलं आहे. उत्तर भारतात मात्र तसं नाही. तिथं अनेक प्रकारच्या 'मंडी' आहेत - अनाज मंडी, फल मंडी, कपास मंडी. आपण ज्याबद्दल बोलतोय ती सब्जी मंडी. 'मंडी' म्हणजे त्यांच्यासाठी बाजार. कानपुरात तर म्हणे 'कपड़ा मंडी'ही आहे.

शाळकरी वयात असल्यापासून ह्या स्थलमाहात्म्यानं भुरळ घातलेली आहे. एखादी भाजी खायला नकार असेल, पण भाजी आणायला तो कधीच नसतो. मंडईत जाऊन भाज्या पाहणं, शेलक्या भाज्या निवडणं, भाव करणं हे आवडीचं काम. करमाळ्याच्या मध्य वस्तीत असलेली मंडई मोठी छान होती. प्रशस्त जागेत असलेल्या ह्या मंडईला छान भिंतीचं संरक्षण होतं. तिच्या चारही दिशांना दारं होती. पश्चिमेच्या दारातून शिरलं की, समोर श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिराची सुबक इमारत दिसायची. तिथंही वर्दळ असायची; पण मंडईएवढी नाही. करमाळ्याचा बाजार शुक्रवारचा. त्या दिवशी मंडई चारही बाजूंनी भरलेली दिसायची. एरवी दक्षिण दिशेला, पूर्वेला फार कोणी नसायचं. शुक्रवारी मात्र रस्त्यावरही विक्रेते बसलेले. उत्तर आणि पूर्व दिशेला विक्रेत्यांसाठी बांधलेले ओटे. ते बहुतेक बागवानांच्या ताब्यात. बाकी शेतकरी विक्रेते खालीच बसलेले दिसत. गावोगावच्या मंडयांचं नामकरण झालेलं असतं. श्री संत सावता माळी, महात्मा फुले ह्यांची नावं प्रामुख्यानं दिसतात. करमाळ्याची मंडई मात्र अनामिक होती. अलीकडच्या काळात तिचं बारसं झालेलं असेल, तर माहीत नाही.


पावट्याच्या शेंगा सोलण्याचं काम किचकट.
ते चिकाटीनं केल्यावर चविष्ट उसळ खाण्याचा योग असतो.

तालुक्याच्या गावागावांतून शुक्रवारी भाजी विकायला शेतकरी यायचे. गवार, भेंडी, दोडके, वांगी, मेथी...अशी भाजी असायची. कोबी, फ्लॉवर ह्या शहरी भाज्या मानल्या जात. दुर्मिळ असत. कोबी तेव्हा श्रीमंतांची भाजी होती, हे आज खरंही वाटणार नाही. बहुतेक भाज्या देशी, गावरान असायच्या. गवार, वांगी, काकडी गावरान आहे, असा प्रचार विक्रेत्यांना करावा लागायचा नाही. कारण भाज्यांचं संकरित बियाणं गावोगावी पोहोचायचं होतं. भाजीपाला हे शेतीतलं, शेतकऱ्यांचं मुख्य उत्पन्न नव्हतं. तो माळवं घ्यायचा, जमेल तसं विकायचा, ते तेल-मीठ-मिरचीच्या खर्चासाठी. आठवड्याची हातमिळवणी करण्यासाठी.

काटेरी वांगी नि कोवळी गवार

एरवी कधी भाजी आणायला गेलो की नाही, हे आठवत नाही. शुक्रवार मात्र चुकवला नाही. त्या दिवशीची हमखास खरेदी म्हणजे छोटी-छोटी काटेरी वांगी. नुसत्या तेलावर परतावीत अशी. बोटानं मोडली तरी तुकडा पडेल अशी कोवळी गवार. गावरान गवार. निवडताना खाज सुटणारी. शनिवारी सकाळचा जेवणाचा बेत नक्की असायचा. भरलेली वांगी किंवा गवारीची भरपूर कूट घालून केलेली भाजी. वांग्याला सोबत भाकरीची नि गवारीला चपातीची. ही गवार खूपच कोवळी असली, तर तिची नुसती परतूनही भाजी फर्मास होई. अशी ही गवार सहसा कोणत्या हॉटेलात का मिळत नाही?

करमाळ्यानंतर पाहिलेली मंडई म्हणजे पुण्याची. पुण्याची मंडई थोरच. तिला तर साक्षात विद्यापीठाचा दर्जा! तिथं फार वेळा गेलो नाही. ह्या मंडईच्या बाहेरच्या 'मार्केट हॉटेल'नं अनेक रात्री पोटाला आधार दिलाय. त्याच्या जवळच रात्रभर खन्नाशेट पत्रकारांना घेऊन मैफल रंगवत असायचे. ह्या मैफलीत दोन-तीन वेळाच सहभागी झालो असेन, तेही थोडं कडेकडेनेच. बाजीराव रस्त्यावरून मंडईच्या दिशेनं जायला लागलो की, अनेक छोटे छोटे भाजीविक्रेते बसलेले दिसतात. त्यांच्याचकडून बऱ्याच वेळा भाजी घेतली. पुण्यातली लक्षात राहिलेला भाजीबाजार म्हणजे डेक्कन कॉर्नरचा. विमलाबाई प्रशालेच्या बसथांब्यापासून गरवारे पुलापर्यंतच्या भाजीविक्रेते बसलेले असायचे. बसथांब्याजवळ पौ़ड आणि जवळपासच्या गावांतून आलेले शेतकरी विक्रेते. त्यांच्याकडे ताज्या पालेभाज्या छान मिळायच्या. दीक्षितांच्या 'इंटरनॅशनल'जवळच्या एक आजीबाई अजूनही लक्षात आहेत. त्यांच्याकडे मिरची, कोथिंबीर आणि आलं एवढंच मिळायचं. त्याचे वाटे करून ठेवलेले. मिरचीचा एक वाटा घेतला की, त्यात त्या दोन-चार हमखास वाढवून टाकायच्या.

काकडी आणि मटार ह्यासाठी पुणे फार आधीपासून लक्षात राहिलेलं आहे. काकडी म्हणजे आमच्याकडे हिरव्यागार लांबलचक नि जाडजूड. पुण्याची मावळी काकडी म्हणजे छोटी. दोन घासांत संपवता येईल, अशी. पुण्यात असताना कधी मटार किंवा काकडी मंडईतून आणल्याचं मात्र आठवत नाही. आता काकड्या उदंड झाल्या. नगरला बाराही महिने काकडी मिळते. तिचे भाव तीन वर्षांत अगदी कमाल म्हणजे ४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मध्यंतरी एका विक्रेत्याकडे काकडी दिसली. सगळी साधारण एकसारखीच. गुळगुळीत दंडगोलासारखी. कुठेही बाक न आलेली. वेगळी दिसतेय म्हणून आणली. खाल्ल्यावर लक्षात आलं फसलो! तिला काही चवच नाही. मग कळलं ती म्हणे हरितगृहात पिकवलेली. निगुतीनं वाढवलेली. मग कधी तरी वाचलेलं आठवलं की, हाताची पाचही बोटं सारखी नसतात, तसं निसर्गातही एकसमान काही नसतं. एकाच रोपाची वांगी वेगवेगळ्या आकाराची असतात. काही लहान, मोठी. काही गोल, तर काही उभट. काही किडलेली, तर काही किडीला हरवून वाढलेली. म्हणून तर सगळं काही सारखं असावं, ह्याचा आग्रह धरायचा नाही. थोडं कमी, थोडं जास्त असणारच. समानता दिसली म्हणजे समजावं की, निसर्गनियमांत कुणी तरी हस्तक्षेप केलेला आहे. तो कधी माणसाचा असतो, कधी त्यानं थोडं अधिकच फवारलेल्या औषधांचा.

भाजीविक्रेत्यांचा चितळे रस्ता

पुण्याहून नगरला आलो. इथं मंडया भरपूर आहेत आणि त्या नावालापुरत्याच आहेत. हे कागदोपत्री महानगर असलं, तरी व्यवहार अगदी अस्सल नगरी! रावबहादूर चितळे ह्यांचं नाव दिलेला रस्ता प्रामुख्यानं भाजीविक्रेत्यांसाठीच आहे. तिथली नेहरू मंडई नावापुरती होती. ती मागेच पाडूनही टाकली. गंजबाजारातही मंडई आहे. तिथं मात्र विक्रेते असतात. कारण बाहेरच्या बाजूला भाजी विकायला बसावं अशी जागाच नाही. निव्वळ नाइलाज! वाडिया पार्कचं भव्य आणि निरुपयोगी स्टेडियम बांधून होण्याच्या आधी तिथल्या महात्मा गांधी उद्यानात भाजी बाजार स्थिरावला होता. तिला मंडई नाही म्हणता येणार. दर मंगळवारी तिथं तोबा गर्दी असायची. आजूबाजूच्या खेड्यांतून बरेच विक्रेते यायचे. आम्ही काही पत्रकार मैदानावर सकाळी क्रिकेट खेळायला जात होतो बरेच दिवस. तासभर खेळून झालं की, राम पडोळेच्या 'चंद्रमा'मध्ये चहा पिता पिता दीड तास जाई. मग भाजीची खरेदी. माझ्यामुळं तिथं भाजी घेण्याची सवय दोन-चार समव्यावसायिकांना लागली. त्यासाठी त्यांच्या गृहमंत्र्यांनी मला नक्कीच दुवा दिला असेल तेव्हा. नगर-मनमाड रस्त्यावर नागापूर औद्योगिक वसाहत आहे. तिथं संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेने भाजीवाले दिसतात. एखादा किलोमीटर अंतरात असतात ते. सावेडी भागातही असाच मोठा भाजीबाजार राहतो. ह्या सगळ्यांमुळे नगरकरांची चांगली सोय होत असली, तरी वाहतुकीच्या कोंडीची तक्रारही नेहमीच होते. चितळे रस्त्यावरची भाजीविक्रेत्यांची 'अतिक्रमणे' हटवण्याची कारवाई किती वेळा झाली असेल, ह्याची गणतीच नाही. 'चितळे रस्त्यानं घेतला मोकळा श्वास' अशा बातमीच्या शीर्षकाची शाई वाळत नाही, तोवर गुदमरायला सुरुवातही झालेली असते.

मंडईत जायचं, घरच्यांनी दिलेल्या यादीबरहुकुम भाजी घ्यायची, पैसे मोजायचे नि चालू पडायचं, अशा पद्धतीनं भाजी घेण्यात मजा नाही. सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास मस्त चहा-पाणी करून घराबाहेर पडावं. नाश्ता झालेला असेल तर उत्तमच. सोबत दोन दणकट पिशव्या असाव्यात. भाजीची यादी वगैरे करू नये. फक्त घरून सांगितलेल्या भाज्या न विसरण्याची काळजी घ्यावी. कुणी जोडीदार असेल तर उत्तमच. मंडईत गेल्यावर आधी एक चक्कर मारून यावी. कोणत्या भाज्यांची आवक किती आहे, त्यामुळे त्या कितपत स्वस्त मिळतील ह्याचा अंदाज त्यामुळे येतो. नेहमीच्या भाजीविक्रेत्या ताई-मावशी-मामा ह्यांच्या हाकेला हातानेच 'येतो परत' अशी खूण करत प्रतिसाद द्यावा. मग कुणाकडे काय घ्यायचं, हे ठरवून त्याप्रमाणे खरेदी करावी. कधी तरी आपण घेतलेली भाजी कोपऱ्यात बसलेल्या मावशीकडे फार चांगली नि स्वस्त असल्याचं समजतं. अशा वेळी फार हळहळ करत बसू नये. संपवायची ताकद असेल, तर तिथनंही घ्यावी ती. दोन्ही पिशव्या भरगच्च झाल्या, खिसा थोडा हलका झाला की, समाधानानं मंडईतून निघावं. एक-दोन भाज्या हव्या असूनही घेता आल्या नाहीत, ह्याची थोडी हळहळही वाटत राहावी.

'भाजीला आणायला निघालो/निघाले', 'भाजीला आणलं' हे प्रचलित नगरी शब्दप्रयोग आहेत. तर अशा ह्या भाजीला आणणाऱ्यांचे प्रामुख्याने तीन ढोबळ प्रकार दिसतात. ठरलेल्या विक्रेत्याच्या दुकानापुढे उभं राहायचं. भाजी पाहायची नि ही अर्धा किलो, ती एक किलो दे आणि 'हो लिंबं-मिरचीही टाका' असं फर्मान सोडायचं. तोलून दिलेली भाजी पिशवीत घ्यायची आणि विक्रेता सांगील तेवढे पैसे द्यायचे. गाडीला लाथ मारून लगेच पसार. ह्या वर्गातली मंडळी भाजीकडं आपुलकीनं, चिकित्सकपणे पाहत नाही. तिला हाताळत नाहीत की कौतुकानं पाहत नाहीत. भाव एवढा (कमी किंवा जास्त) कसा, असा प्रश्न त्यांना पडत नाही. ते भाजी निवडून घेत नाहीत. शेलकं तेच मिळेल, अशी त्यांची खातरी असते.

दुसरा वर्ग असतो तो हिंडून चार ठिकाणी भावाची चौकशी करून भाजी घेणारा. तो दर्जा आणि भाव ह्यातला समतोल साधत असतो. प्रसंगी मापात एखादं वांगं किंवा कारलं जास्त टाकावं म्हणून सांगत असतो. भावाची शक्य तेवढी घासाघीस करत असतो. ग्राहकांचा शेवटचा प्रकार म्हणजे बरंच हिंडून, मोजकीच भाजी घेणारा. तो सतत बजेट तपासत असतो. भरपूर घासाघीस करणारा हा ग्राहकवर्ग आर्थिकदृष्ट्या गरीबच असतो, असं काही मानायचं कारण नाही. घासाघीस करणं, त्यात विजय मानणं ही त्याची वृत्ती असते. आता ह्या साऱ्यांमध्ये उपप्रकार असतातच. 

ह्यातल्या कोणत्या प्रकारात अस्मादिक मोडतात, ह्याचा अंदाज लेख पूर्ण वाचूनच करावा. वाढपी ओळखीचा असल्यावर पंगतीत फायदा होतो म्हणतात. अगदी तसंच मंडईतही असतं. भाजीवाली मावशी, मामा, दादा ओळखीचा असणं चांगलंच असतं. एखादी कमी उपलब्ध असलेली, ठरावीक हंगामातच येणारी भाजी ते आठवणीनं आणतात आणि तुमच्यासाठी राखून ठेवतात. त्यामुळंच मी दलालांऐवजी शक्यतो शेतकऱ्यांकडूनच भाजी घेतो. ओळखीच्या भाजीवाल्या ताईंना एकदा शेवग्याचा कोवळा पाला आणायला सांगितला. पुढच्या आठवड्यात त्यांनी एवढी पानं आणली की, ती न्यायची कशी असा प्रश्न. पुढं तो घरी आणल्यावर 'हा ढीगभर पाला खायला एखादी शेळी का नाही आणली?' असा टोमणा! त्याच ताईंनी एकदा पाथरीची भाजी आणली. तिला त्या बावन्न गुणांची भाजी म्हणत होत्या. शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास ती उपयोगी आहे म्हणतात. तिलाही माझ्याशिवाय कुणी वाली नव्हता.


न दमता मंडईत थोडं फिरलं की
असं चांगलं फळ हमखास मिळतं!

भाज्या घेताना घासाघीस करायची नाही, असं पूर्वी कधी तरी ठरवलं आहे. ठरवलेलं पाळलंच जातं, असं फार थोडं. पण त्यात हे आहे. एखादी भाजी महाग वाटली, तर ती त्या दिवशी घेणं टाळायचं. पण घासाघीस करायची नाही. केळी आणि हंगामी फळं विकणाऱ्या दोन आजीबाई अशाच ओळखीच्या झाल्या. त्या सांगतील त्या दरानं आणि त्या सांगतील तेवढी फळं घ्यायची. त्यांचं ऐकल्याचं फळ चांगलंच मिळतं!

नेहमीच झुकतं माप

आणखी दोन-तीन गोष्टी पाळल्यामुळं भाजीखरेदी कायम आनंदाची होती. विक्रेत्यानं सांगितल्यावर 'काही कमी-जास्त नाही का?' असं हटकून विचारायचं. मग काही वेळा 'श्री ४२०'मधल्या राज कपूरच्या भूमिकेत जायचं. भाजी २० रुपये अर्धा किलो सांगितल्यावर विचारायचं २५ रुपयांनी नाही का देणार? मग ती मावशी किंवा मामा मनापासून हसतात. त्यांच्याकडून मग नेहमीच वाजवी भाव लावला जातो. हेच मापाबाबत पाळायचं. भाजीवाल्यांचं माप नेहमीच झुकतं असतं. पारडं फारच झुकायला लागलं, तर आपणच 'बास बास! किती टाकताय? माप झालं की...' असं म्हटल्यावर मामा-मावशीच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून येतंच. माप झाल्यावरही दोन भेंड्या, एक वांगं टाका म्हणणारी गिऱ्हाइकं त्यांच्या सवयीची असतात. 'मापात पाप नको', 'आपलं शेतकऱ्याचं माप असं असतंय...', 'राहू द्या की दोन जास्त...' असं म्हणणारेच दिसतात. ठरलेल्या भावापेक्षा मी रुपया-दोन रुपये जास्त देणार आहे का, असं विचारल्यावर त्याचंही उत्तर निर्मळ हास्यातून मिळतं.

मंडईत गेलं, दिसेल ती भाजी घेतली, पैसे मोजले, की आपलं काम संपलं, ही काही भाजी खरेदीची योग्य पद्धत नाही. भाज्या आणताना आपण काय घेतो, ह्याचं भान ठेवावंच लागतं. अंबाडीची कितीही कोवळी जुडी दिसली, तरी ती पटकन घेऊन चालत नाही. आधी मेथीच्या बारीक पानाच्या, बुटक्या रोपांच्या दोन जुड्या घेतल्यात. घरी हवा म्हणून पालकही घेतलेला आहे, ह्याचं भान ठेवावं लागतं. मुगाच्या शेंगा घेतल्यावर चवळीकडं ढुंकूनही पाहायचं नाही. मटार (नगरमधलं प्रचलित नाव 'वटाणा') घेतल्यावर फ्लॉवरचा एखादा गड्डा असू द्यावा. तुरीच्या आणि पावट्याच्या शेंगा घेतल्यावर त्या आपल्यालाच सोलायच्या आहेत, हे मनाला बजवावं लागतं. त्यामुळे अर्ध्याऐवजी एक किलो घेण्याचा मोह टळतो. काळ्या मसाल्याची भरून करायची म्हणून छोटी, काटेरी वांगी घेतल्यावर भरताची वांगी कितीही चांगली दिसली, तरी त्यांना त्या दिवसापुरता टाटा करायचा असतो. नसता घरी आपलंच भरीत होण्याची भीती असते. दुधी भोपळा, डांगर, चक्की अशी फळं एकाच वेळी कधीच घ्यायची नसतात. कारण त्या खरेदीचं केलेलं समर्थन अंतिमतः निष्फळच ठरणार असतं. अळूची गड्डी घेतल्यावर चुक्याची जुडी घेणं अनिवार्य असतं. पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या नि फळभाज्या ह्याचा समतोल साधला गेलाच पाहिजे. कालच्या जेवणात कोणती भाजी होती, हेही लक्षात राहात असेल तर बरंच. लिंबू, मिरची आणि कोथिंबीर घ्यायला विसरणं, ह्यासारखा दुसरा गुन्हा नाही! कारण खुद्द संत सावता माळी ह्यांनी सांगितलेलं आहे -

लसुण-मिरची-कोथिंबिरी। अवघा झाला माझा हरीं।।

भाज्यांची मापंही ठरलेली असतात. पालेभाज्यांची जुडीच असते किंवा वाटा असतो. क्वचित एखादीच पालेभाजी वजनावर विकली जाते. कांदे-बटाटे किंवा मटार कुणी पाव किलो मागताना दिसत नाही. ते किलोनेच घ्यावे लागतात. अळूची पानं कितीही स्वस्त असली, तरी त्याच्या अर्धा डझन जुड्या घेण्यात काही गंमत नसते. कोथिंबीर हिरवीगार, ताजी दिसली तरी तिच्या फार तर दोन जुड्या घ्याव्यात. कोथिंबीर वडीचाच बेत असेल तर गोष्ट वेगळी. पुण्यात मध्यंतरी आदेश काढण्यात आला होता की, पालेभाज्याही किलोवरच विकल्या जाव्यात. त्याची अंमलबजावणी काही झाली नाही. आलं, मिरच्या ह्यांचे पूर्वी वाटे विकले जायचं. फार झालं तर त्याची मागणी छटाक-दोन छटाक (पन्नास किंवा शंभर ग्रॅम) अशी मर्यादित असे. अलीकडे मिरच्या नि आलंही पाव-पाव किलो सहज घेतलं जातं. आपलं स्वयंपाकघर जास्त मसालेदार नि तामसी होत चालल्याचंच हे लक्षण. लसणाचंही तसंच. तो किलो-किलोनेच घेतला जातो. लिंबं पूर्वी नगावर मिळत. आता ती तोलून घ्यावी लागतात. डाळिंब, संत्री, मोसंबी ही फळंही वजन करूनच मिळतात. केळी आजही डझनावर दिली जातात. पण दक्षिणेतून येणारी बुटकी, पातळ सालीची केळी किलोच्या मापात घ्यावी लागतात. कलिंगड नगावर मिळतं, पण खरबुजाचा प्रवास वजनकाट्यातून होतो.

परवलीचा शब्द - गावरान

'गावरान' हल्ली मंडईतील परवलीचा शब्द बनला आहे. गावरान म्हणजे देशी वाण. छोट्या कांद्याएवढा दिसणारा लसूण गावरान आहे, म्हणून सांगितला जातो. लांबलचक हिरवीगार गवारीची शेंगही गावरान आहे, असं भाजीवाले सांगतात. मेथी गावरान असेल तर ती बुटकी असते. तिची पानं लहान आणि चवीला कडवट असतात. अळूची पानं फताडी नसतील, तरच गावरान. जाडजूड फोपशी आणि लांबलचक शेवग्याची शेंग गावरान नसण्याचीच शक्यता अधिक. गावरान भेंडी आता क्वचित पाहायला मिळते. तिच्या अंगाला काटे असतात आणि चिकट असल्यामुळे तिची भाजी करण्याचं काम चिकाटीचंच!

मंडयांचाही एक नूर असतो. बाजाराच्या दिवशी तो अधिक स्पष्टपणे जाणवून येतो. सकाळी आठ-नऊच्या सुमारास तिला नुकतीच कुठं जाग येऊ लागलेली असते. शेतकरी येत असतात, सोयीची जागा शोधत असतात. एखादी जागा बरी वाटली त्यांना, तर तिथून नेहमीची मंडळी उठवत असतात. मंडईत कायमस्वरूपी दुकान थाटलेल्या मंडळींचा माल ठोक बाजारामधून टेम्पो-रिक्षा ह्यातून येताना दिसतो. दहानंतर सूर जुळायला सुरुवात होते. मोठ्या संख्येने ग्राहक यायला सुरुवात होते. त्यात घरातले कर्ते, गृहिणी असतात, सख्ख्या शेजारणी मिळून आलेल्या असतात. काही आजोबा नातवंडांना बाजार दाखवायला घेऊन येतात. पण हल्ली ते चित्र दुर्मिळच. नातवंडं आजी-आजोबांना गाडीवरून सुळकन येऊन सोडून जातात आणि परत घेऊन जायला कधी येऊ असं विचारून तसंच वेगानं भुर्र होतात.

गर्दी, भाव, विक्री, आवक हे सारं नंतरचे दोन-तीन तास चरम सीमेवर असतं. साडेबारा-एकनंतर मंडई थोडी आळसावते. मंडळी जवळच्या शिदोऱ्या सोडतात. नेहमीचे विक्रेते घरून आलेल्या डब्यात जेवायला काय आहे ते पाहतात. कुणी तरी तिथलाच कांदा फोडून घेतो. कोणी एखादी मिरची कचकन् दाताखाली चावून जेवणाची मजा वाढवत असतो. इथून पुढचे दीड-दोन तास थोडे निवांत असतात. संध्याकाळी चारच्या सुमारास मंडईत पुन्हा हलचाल वाढते. ती संध्याकाळी साडेपाच-सहा वाजता दाटी होते. ऑफिसातून घरी परतणारे, सकाळी कामामुळं यायला न जमलेलं, थोड्या कमी दर्जाच्या राहिलेल्या भाज्या स्वस्तात मिळतील म्हणून आलेले कष्टकरी त्यात असतात. पण ही गर्दी सकाळसारखी ताजी टवटवीत नसते. तिला शिळेपण आलेलं असतं. काम पटकन उरकून जाण्याची घाई सगळ्यांनाच असते. कितीही पाणी मारलं तरी भाजी ताजी दिसत नाही तसं ह्या गर्दीचं असतं.

मंडईत बाजूला इतरही दोन-तीन दुकानं असतात. त्यातलं एखादं तरी सुक्या मासळीचं असतं. वाणसामान, मसाल्याचे पदार्थांचेही एक-दोन तंबू दिसतात. वडा-पावची एखादी गाडी बाजूला दिसते. चहावाला किटली आणि बुटकुले कागदी कप घेऊन सारखा फिरत असतो. बाजारकर वसूल करणारा महापालिकेचा कर्मचारीही सकाळी दिसतो.

भाजीबाजार रोजच्या आयुष्यात महत्त्वाचा असला तरी त्याला दुय्यम मानलं जातं. अन्य वस्तू खरेदी करताना दराबाबत कोणी कमी-जास्त करू लागलं की, दुकानदार फटकारतो, 'घासाघीस करायला ही काय भाजीमंडई आहे काय!' परवाच एक गमतीशीर अनुभव आला. चितळे रस्त्यावर नकली दागिने विकणाऱ्यानं स्टॉल थाटला होता. कानातलं, गळ्यातलं, हातातलं, चमकी-टिकल्या असं गृहिणी-उपयोगी साहित्य विकत होता. त्याच्या जवळ बसलेल्या महाविद्यालयीन वयाच्या भाजीविक्रेतीला काही तरी घ्यायचं होतं. भाव काही कमी नाही का, असं ती म्हणाल्याबरोबर तो फाटका विक्रेता म्हणाला, 'बाई, घ्यायचं तर घे. ही काही भाजी नाही भाव करायला...'


नारेश्वर (गुजरात) येथे नर्मदामय्याला भेटून परतताना
घाटावर दिसली ही माउली. तुरीच्या शेंगा विकणारी.

मंडईत जाणं, भाजी आणणं मला फार आवडतं. मध्यंतरी हासन (कर्नाटक) इथे मुक्काम असताना मी मुद्दाम भाजी आणायला मंडईत गेलो. भाषेचा प्रश्न होताच. शेजारी राहणारे मूळचे हुबळीचे कुलकर्णी काका सोबत होते. त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं आणि तो अनुभव सुखदच ठरला. मंदसौरहून बिकानेरला जाताना सकाळी नयागांव इथं चहा प्यायला थांबलो. कडाक्याची थंडी होती. बाजारपेठ अजून उघडत होती. तिथंही चौकातल्या एका भाजीवाल्यानं लक्ष वेधून घेतलं. त्याच्याशी गप्पा मारण्याचा आणि फोटो काढण्याचा मोह टाळता आला नाही. वर्षभरापूर्वी बेळगावला जाणं झालं. राम मारुती रस्त्यावर मित्राचं काम होतं. तिथं फिरता फिरता रस्त्याच्या कडेचा भाजीबाजार दिसला. तिथली वाळकं, बुटका मटार ह्यानं लक्ष वेधून घेतलं. ज्योतिबाचं दर्शन घेऊन उतरताना पावटा विकणाऱ्या (कोल्हापुरी भाषेत वरणाच्या शेंगा) मावशीबाई दिसल्या. मोह झाला, किलोभर तरी घ्याव्यात. वडोदऱ्याजवळच्या नारेश्वर येथे गेलो. नर्मदामाईचं दर्शन घेऊन येताना घाटावर दिसली एक महिला. तुरीच्या शेंगा विकत होती. बिकानेरहून परतताना मध्य प्रदेश-महाराष्ट्रच्या सीमेवर रस्त्याच्या कडेला मटार विकणारा दिसला. गाडी थांबवून किलोभर शेंगा घेतल्याच.

मंडई. पुण्यासारखं प्रत्येक गावातली मंडई म्हणजे विद्यापीठ नसेल. पण ती एक शाळा आहे, एवढं नक्की. काय खावं, केव्हा खावं हे शिकवणारी. बाजारभावाचा अंदाज देणारी. काय पिकतं नि काय विकतं हे सांगणारी. हिशेब करायला लावणारी, पण निव्वळ हिशेबी वागायला न शिकवणारी. शेतकऱ्याशी संबंध आणणारी. भाजी आता रोज मिळते. घरपोहोचही मिळते. मंडयाही भरलेल्या असतात. पण मंगळवार नि शुक्रवार माझे आवडते वार आहेत, ह्यावर त्याचा काही परिणाम होणार नसतो!

------------------------

(पूर्वप्रसिद्धी : 'शब्ददीप' दिवाळी अंक २०२१. आभार : श्री. प्रदीप कुलकर्णी व श्री. विनायक लिमये)

(छायाचित्रे : शब्दकुल)

....

#मंडई #भाजी #पालेभाजी #भाजी_मंडई #भाजीबाजार #शेतकरी #करमाळा #पुणे #नगर #गावरान #घासाघीस #vegetables #vegetable_market #green_market

Monday 9 May 2022

टकमक टकमक का बघती मला?

रोज ठरल्यानुसार संध्याकाळी फिरायला चाललो होतो. ‘मॉर्निंग वॉक’ आपल्या नशिबात नाही. अरुणोदयाऐवजी सूर्यास्त पाहावा लागतो. संध्याकाळी तर संध्याकाळी. चालणं महत्त्वाचं.

घरातून बाहेर पडताना नेहमीप्रमाणं आरशात डोकावलं. नीटनेटकं असण्यापेक्षा लोकांचं लक्ष वेधलं जाईल, एवढा काही अवतार नाही ना, हे तपासलं. डोळ्यांवर चष्मा, खिशात पाकीट आणि मोबाईल आहे, ह्याची खातरी करून घेतली.

ह्यातला मोबाईल सोडला सोडला तर बाकीच्या दोन गोष्टी तशा अनावश्यक. लांबचं बघायला आता चष्म्याची गरज नाही. (टक्केटोणपे खाऊन ती दूरदृष्टी आली आहे!) चालायला जायचं म्हणजे काही घ्यायचं नसतं. म्हणून पाकीट आणि त्यात पैसे असणंही फार महत्त्वाचं नाही.

मोबाईल मात्र पाहिजेच. फार काही महत्त्वाचे फोन येतात म्हणून नाही. किती पावलं चालली त्याचं मोजमाप करण्यासाठी. साधारण दहा हजार पावलांचं लक्ष्य असतं. त्याची बॅटरी पुरेशी आहे ना, हे पाहिलं होतंच.

घराबाहेर पडलो. ‘कोणता रस्ता घेऊ आज पायी?’, अशी नेहमीसारखीच द्विधा मनःस्थिती झाली. मग ठरवून किल्ल्याकडे कूच केली.

जाताना डाव्या हाताला पुस्तकाचं दुकान लागलं. दुकानदारानं ओळखीचं हसू फेकलं नि खुशीत हातही हलवला. हसणं ठीक आहे; हात का हलवला बुवा? किस खुशी में?

मान खाली घालून चालू लागलो. आवश्यक असतं ते. नसता खड्ड्यांमधल्या रस्त्यावर उगीच पाय लचकायचा. नगरकरांचे ‘पाऊल वाकडे’ पडेल, ह्याची महापालिका पुरेपूर काळजी घेत असते. त्यामुळे ‘तू जपून टाक पाऊल जरा, रस्त्यावरून चालणाऱ्या नगरकरा’ हे आमचं जणू ‘राष्ट्रीय गीत’ आहे. जगातली सर्वांत अव्वल नंबरची महापालिका, असा काही ‘युनेस्को’नं अजून आमच्या महापालिकेचा गौरव केला नाही. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या बहुसंख्या पालिका आहेत म्हणे.

चालताना उगीचंच जाणवत होतं, लोक बघताहेत आपल्याकडे. तो ‘सिक्स्थ सेन्स’ का काय असतो ना, त्यानुसारची जाणीव.

तोंडावर पावडर लावतच नाही. तरीही एकदा तोंडावरून हात फिरवला. मग थोडा बरा रस्ता लागला. आता आधीएवढं आज्ञाधारकपणे (म्हणजे मान खाली घालून) चालण्याची गरज नव्हती. थोडे खड्डे, इतस्ततः पसरलेली वाळू आणि खडी, कडेला टाकलेला कचरा, कुठूनही कुठं घुसणारे दुचाकीस्वार, अडेलतट्टू रिक्षा ह्यांच्याकडे ध्यान देत चालता चालता इकडं-तिकडं नजर टाकली तरी चालत होतं.

थोडं डावीकडे, थोडं उजवीकडे, थोडं सरळ पाहत चालत होतो. पुन्हा जाणवलं. येणारे-जाणारे आपल्याकडे बघताहेत. म्हणजे अगदी टक लावून नाही. पण न्याहाळतात.

शर्टची बटनं खाली-वर झालेली नाहीत ना? तपासून पाहिलं. खालची गुंडी वर नि मधलं काजं रिकामंच असं काही झालं नव्हतं. सगळं ठीकठाक.

दोन अवखळ कॉलेजकुमारी दुचाकीवरून बागडत चालल्या होत्या. माझ्या समोरून येत होत्या. जाणवलं की, त्या (आपल्यालाच!) न्याहाळताहेत. मागं बसलेलीनं तर बोट दाखवलं हो चक्क. खुसुखुसू हसल्या.

सुखावलो. म्हटलं वा! ही नव्या शर्टाची किमया दिसते. मग छाती किंचित बाहेर काढून आणि पोट शक्य तेवढं आत ओढून चालू लागलो. तसं करत चालणं एखाद्या मिनिटापेक्षा जास्त वेळ शक्य नव्हतं. पुन्हा नेहमीसारखंच खांदे पाडून, छाती आत घेऊन पदयात्रा चालू.

येणारे-जाणारे हळूच नजर टाकतच होते. त्यातले काही तर कुजबुजत होते, असा भास झाला. मग थोडी शंका आली. केस विस्कटलेले नाहीत ना, ह्याची खातरजमा केली. तरीही समाधान होईना.
चष्मा? जागेवर.
मोबाईल खिशातून डोकावतोय? नाही.
त्याचा टॉर्च चालूय का? बिलकूल नाही.
पँटची झिप? व्यवस्थित.

गर्दीचा चौक लागला. एरवी असतो तसा वाहतूक नियंत्रक दिव्यांखाली अंधार होता. पोलीसमामा होते. पायी चालणारे आम्ही काही जण शक्य तेवढं संकोचून पलीकडं जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे.

हवालदाराचं आमच्याकडे लक्ष गेलं. एका बाजूची वाहतूक एका हाताने थांबवून त्यानं आम्हा सहा-सात जणांना रस्ता ओलांडायची खूण केली. त्याच्या समोरून जाताना त्यानं एक प्रसन्न हास्य फेकलं.

पत्रकार असलो, तरी पोलिसांपासून कायम चार हात लांबच राहिलेलो. कधीही आत (म्हणजे पोलीस ठाण्यात!) गेलेलो नाही. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी, कर्मचाऱ्याशी घसट म्हणावी, अशी ओळख नाही. त्याची गरज भासली नाही. व्यावसायिकदृष्ट्या किंवा अन्य ‘उद्योगां’साठी म्हणूनही!

मग हवालदार का हसला? ओळखतो की काय आपल्याला? कसं काय बुवा? मनात पुन्हा शंका.

थोडंसं पुढे. एका उपाहारगृहासमोर स्कूटरवर एका दादामाणूस बसला होता.  रस्त्याच्या जवळपास मधोमध. लेफ्ट ऑफ द सेंटरच म्हणा की!

असा दादामाणूस दिसला की, मनात घाबरायला होतं. तसं झालंही. त्याच्यासमोरून पार होण्यासाठी अर्धा मिनिट लागला. तो डोळे ह्या टोकाकडे त्या टोकाकडे फिरवून न्याहाळत होता. चेहरा निर्विकार. पण त्यामागचा थंडपणा जाणवत होता. आपल्याला ‘गिऱ्हाईक’ म्हणून बघतोय की काय? मन चिंती ते वैरी न चिंती!

आता निवांत रस्ता लागला. माणसांची गर्दी संपली. तरीही अधूनमधून दिसणारी माणसं मलाच पाहाताहेत, हे जाणवत राहिलंच.

थोडं पुढं गेलो. भीती दाखवून एक मोटर पुढं गेली. रस्त्याच्या कडेनंच चालत होतो. तो पार कडेला गेलो. ती चार चाकी पुढे जाऊन दहा-पंधरा फुटांवर थांबली. गाडीचं दार धाडकन् उघडून बाहेर पडलेल्या सद्गृहस्थानं हाक मारली.

मित्र होता तो. मला पाहून थांबला. खूप दिवसांनी दिसत होतो आम्ही एकमेकांना.


हातात हात मिळवत म्हणाला, ‘‘अरे, कुठंयस तू? फिरणं चालू का अजून?’’

चौकशी थांबवत मित्र म्हणाला, ‘‘तोंडाला काय बांधलंय ते? गेला कोरोना, अब डरो ना! काढून टाक मास्क तो. कुणी तरी घातलाय का? ‘हा कोण वेडा’ अशा नजरेनं लोक बघतात तुझ्याकडे. दे फेकून!’’

... छोट्या प्रवासात जाणवलेल्या ‘सिक्स्थ सेन्स’चा पुरता उलगडा झाला! ‘टकमक टकमक का बघती मला?’, प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.

.........
(छायाचित्रं विविध संकेतस्थळांच्या सौजन्यानं)

#पदयात्रा #संध्याकाळचे_फिरणे #कोरोना #मास्क #येता_जाता #सिक्स्थ_सेन्स #Mask #walk #Mask_Walk
काही अधिक-उणे, बाकी सगळं ओक्के!

विश्व मराठी संमेलन – पर्व दुसरे, दिवस दुसरा व तिसरा कोणत्याही मराठी साहित्य संमेलनाच्या यशाचं मोजमाप अलीकडे दोन निकषांवर केलं जातं – गर्द...