बुधवार, २४ जुलै, २०२४

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!



सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️

जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना डे ह्यांच्या आवाजातलं ‘घन घन माला…’ ऐकायला भाग पाडणाऱ्या कोसळत्या धारा.

कवाड-अंगणानं कोणत्या गवळणीला अडवलंय का माहीत नाही. पण मी राहतो आहे, तिथल्या अतिथिगृहाच्या उपाहारगृहातला बल्लवाचार्य काही उगवलाच नाही.

इथं ‘कालिंदी’ नसली तरी विश्वामित्री नदी आहे. तिच्यात म्हणे भरपूर मगरी 🐊🐊 आहेत. त्यातल्या एका मगरीने मागच्या शनिवारी एका भटक्या कुत्र्याला मोक्ष दिला! त्याला बिचाऱ्याला वाचवायला कोणी धावलं नाही. हे चित्र असल्यामुळे तिच्या काठी कोणी बासरी घुमवायला आज तरी बाहेर पडणार नाही, एवढं खरं. 

ताजा कलम - पावसाचं एक दिवसाचं भयकारी रूप संपलं आणि ह्या मगरी खरंच रस्त्यावर आल्या. त्याचे व्हिडिओ बडोद्यामध्ये फिरत आहेत.

बंद खोलीच्या बाल्कनीतून पाऊस पाहायला मजा वाटते; पण मग पोटोबाचं काय? यजमानांना तीच काळजी. ते निघाले होते हालहवाल पुसायला. मना केलं त्यांना. म्हटलं, माझ्या खाण्याची काळजी मीच घेतो. फूड डिलिव्हरीचं असता ॲप, कशाला निष्कारण डोक्याला ताप!

पटकन् ॲप उतरवलं. संकष्टी एकादशी. खिचडी शोधली. चार-पाच ठिकाणी मिळाली. मागणी नोंदवेपर्यंत किमती वाढल्या - १०० रुपयांवरून १६०-१७०. त्यातली एक खिचडी निवडली, मागणी नोंदवली. पैसे द्यावेत म्हटलं तर पुढच्या मिनिटाला ती मागणीच गायब!

पावसाचा जोर बघून बहुतेकांनी डिलिव्हरी देणं बंद केलेलं. तशा सूचना झळकू लागल्या. 😩 खाऊची दुकानं ऑनलाईनची शटर धडाधड बंद करीत होती. जी उघडी होती, त्यांनी ‘भाव खाणं’  ⬆️  चालू केलेलं. स्वाभाविक गोष्ट आहे ही.

‘उपवासाला सुट्टी!’ असं ठरवलं आणि अन्य पदार्थांचा शोध चालू केला. हुश्श मिळालं एकदाचं. किंमत झाली होती अर्थातच उम्मीदसे दुगनी! 🤭

ॲप पहिल्यांदाच वापरत असल्यानं चाचपडत होतो. एका मागणीवर अर्धवटच पत्ता गेला. येईल की नाही, काळजी वाटत होती. आपण काही चुका तर केल्या नाहीत, अशीही शंका.

एवढा पाऊस कोसळत असतानाही दोन्ही ठिकाणचे  पदार्थ वेळेत आले! 😇 शंकासुर शांत बसला!


हे घरपोहोच आलेलं जेवण...
...........................
दोघंही तरुण. पावसात त्यांना फार त्रास नको म्हणून बाहेर दरवाजात जाऊन उभा राहिलो. पहिला आला तो रजतसिंह ठाकोर!

मनापासून आभार मानल्यावर रजतसिंह म्हणाला, “सर… उसमें क्या। हमारा काम ही तो है यह..!” 

विचारलं त्याला, रेटिंग किती देऊ? “आपकी मर्जी सर। चाहे वह दे दो।” पाचपैकी सहा देऊ का, असं विचारल्यावर मनापासून हसला! 😍 गडी खूश होऊन परतला.

नंतर आला चेतनकुमार चावडा. पूर्ण पत्ता नसल्यामुळे थोडासा गोंधळात पडलेला. पण वेळेत आला.
चेतनशीही असाच संवाद. रेटिंग आणि टिप डह्यामुळे दोघंही खूश 🥰🥰 दिसले. त्यांच्या खुशीनं अर्थातच आनंद झाला.

वडोदऱ्याचे रस्ते प्रशस्त. पण पाण्याशी मैत्री करणारे. आधीचे दोन दिवस पाहिलं की, थोड्या पावसानंतरही रस्त्यांच्या कडेला पाणी साचतं. आजच्या धो धो धुमाकुळानंतर त्यांना कालिंदी किंवा विश्वामित्री नदीचंच 🏞️ रूप आलं असणार नक्की. पाहायला कोण जातंय!


टक टक. कोण आहे?
वेळेच्या मागणीनुसार चहा हजर!
.......................
अशा हवेत खास गुज्जू मसाला चहा मिळाला तर? दोन-चार कप तर सहज पोटात जाईल. अतिथिगृहाचं व्यवस्थापन बघणाऱ्या काकांना विनंती केली. ‘तुम्हा मंडळींसाठी चहा मागवाल, तेव्हा माझ्यासाठीही आणाल कपभर? आल्यावर सांगा. खाली येईन मी…’

खोलीच्या दारावर पाचच मिनिटांत टकटक. गरमागरम चाय की प्याली ☕️☕️ घेऊन काका हजर!

तिथल्या एका प्रमुख अधिकाऱ्यानं तिथल्याच दीदींच्या घरचा चहा प्यायची इच्छा व्यक्त केली. वाफाळता चहा आला. त्यावर माझं नाव कोणी, कधी, कसं लिहिलं होतं? 🤗🙏

थोडा वेळ असाच गेला.
पुन्हा दरवाजावर टकटक.
पुन्हा एकदा तेच काका.
ह्या वेळी त्यांच्या हातात पेढ्यांचा द्रोण.

कोण्या अधिकारी बाईंच्या घरी बनविलेले गायीच्या दुधाच्या खव्याचे पेढे! चांगले सात-आठ.

आधी चहा, मग पेढे खोलीवर पोहोचते झाले. भरून आलं. काकांना आग्रह करून एक पेढा खायला लावला.

हे सगळं लिहीत असताना पाऊस थांबलेला नाही. त्याचा जोर वाढलेलाच आहे.

पण मी अतिशय सुरक्षित स्थळी आहे.

आता जेवणाचे डबे उघडीन.

पण त्या आधीच तृप्त झालो आहे. भर पावसात काम चोख बजावणारी मुलं, चहाची इच्छा बोलून दाखविताच ती पूर्ण करणारे काका ह्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं माझी आताची गरज आहे.

ह्या तिघांनी पोटाची भूक भागवलीच; पण मनाचीही भागवली!!
…….

#पाऊस #मुसळधार #वडोदरा #जेवण #चहा #delivery_boys #तृप्त_आणि_कृतज्ञ #विश्वामित्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!

सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️ जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना ...