दशकानंतर
पुन्हा एकदा हिवरेबाजार राज्यातले सर्वांत स्वच्छ गाव
जैसे आपण स्नान करावे। तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे।
सर्वच लोकांनी झिजुनी घ्यावे। श्रेय गावाच्या उन्नतीचे।।९।।
राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या ‘गीते’तील ही ओवी आहे. ही आहे ‘ग्रामगीता’. ग्रामीण जनतेच्या विकासासाठीचा महामंत्र त्यात आहे. याच महामंत्राचा जप
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे सातत्याने केला जातो. त्याचं फळ गावाला
मिळालं, मिळत आहे आणि मिळत राहीलही. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरेबाजारनं २५ लाख रुपयांचं
राज्यस्तरीय पहिलं पारितोषिक यंदा जिंकलं. या मोहिमेतलं गावाचं हे दुसरं यश;
बरोबर एक दशकानं मिळवलेलं. या आधी २००६-०७मध्ये हिवरेबाजारानं या
मोहिमेत पहिलं पारितोषिक मिळवलं होतं. त्यानंतर गावानं या स्पर्धेत भाग घेतला नाही; पण काम चालूच ठेवलं.
या
मोहिमेचं पारितोषिक वितरण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद येथे झालं. त्या
कार्यक्रमात बोलताना विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे म्हणाले, ‘स्वच्छतेचा पुरस्कार मिळवणाऱ्या गावांची पुढच्या वर्षी काय स्थिती आहे,
हे देखील विचारत जा; अन्यथा केवळ दर वर्षी
स्वच्छ गावांची संख्या वाढेल.’ दीर्घ काळ लोकप्रतिनिधी
राहिलेल्या श्री. बागडे यांच्या अनुभवातून आलेले हे बोल आहेत. तथापि नियमाला अपवाद
असतोच. इथं तो अपवाद हिवरेबाजारच्या रूपानं ठळकपणे पुढं आलेला दिसतो. आदर्श गाव
बनवण्याचं स्वप्न राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष श्री.
पोपटराव पवार यांनी साधारण तीस वर्षांपूर्वी गावकऱ्यांपुढं मांडलं. त्यांच्या
नेतृत्वाखाली आदर्शाकडे वाटचाल करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी सोडला. पुढं काय झालं,
हे सगळ्यांनाच माहीत आहे. संकल्पाची सिद्धी झाली, असं श्री. पवार आणि गावकरी मानत
नाहीत. विकासाच्या वाटेवर जे लक्ष्य गाठलं, त्याबद्दल त्यांना आनंद वाटतोच.
त्याचबरोबर अजून बरंच पुढं जायचं आहे, असं त्यांनी ठरवलेलं आहे.
आदर्श
गाव बनण्याच्या नियमांचं पालन करत असताना हिवरेबाजारनं १९९२-९३मध्ये ग्राम
अभियानात भाग घेतला. गावाला विभागीय पातळीवरंच पहिलं पारितोषिक मिळालं. सध्या
चतुर्मास सुरू आहे. त्यात कहाण्या वाचतात. कोणत्याही कहाणीत एक वचन मागितलं जातं -
‘उतणार नाही, मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही!’ हिवरेबाजारची कहाणी हेच सांगते. राज्य, राष्ट्रीय स्तरावरची विविध
बक्षिसं जिंकूनही गावानं वाटचाल थांबवलेली नाही. गाव स्वच्छ राखण्याचा जो वसा २५
वर्षांपूर्वी स्वीकारला, तो अजून टाकला नाही. एका छोट्या गावानं अंगीकारलेल्या
व्रताचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना, त्याचं फळ म्हणून पुन्हा एकदा राज्य पातळीवरचं
पहिलं बक्षीस मिळालं. सरपंच असलेले श्री. पवार आणि ‘गावचं
काम म्हणजे घरचंच काम’ असं मानून साऱ्या कामात स्वेच्छेने
सहभागी होणारे गावकरी यांचं हे यश आहे.
स्वच्छतेची
गरज आहे आणि त्या कामात सातत्य राहिलं पाहिजे, हे हिवरेबाजारला मनोमन पटलं आहे. संत
गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाला दहा वर्षांपूर्वी राज्य पातळीवरचं पहिलं
पारितोषिक मिळालं. कोणत्याही मोठ्या पारितोषिकानंतर कृतकृत्यतेची भावना निर्माण
होते. त्या आत्मसंतुष्टपणाच्या भावनेला गावानं रुजू दिलं नाही. पुढं स्पर्धेत भाग
न घेताही काम चालूच ठेवण्याचं सर्वांनी ठरवलं. सततच्या या कामामुळे तब्बल एक
दशकानंतर गाव पुन्हा अव्वल ठरलं. अर्थात जुन्याच अभ्यासावर या परीक्षेत पहिला
क्रमांक मिळविण्याचा बनचुकेपणा गावानं केला नाही. श्री. पोपटराव पवार मुद्दाम
सांगतातही की, जुन्याच कामावर नवीन बक्षीस आम्ही कधी मिळवत नाही! स्वच्छतेचं काम चालू होतंच, त्याला या अभियानानिमित्त अधिक गती मिळाली.
 |
हिवरेबाजार
गावाने ग्रामस्वच्छता अभियानात केलेल्या कामाची
खडान् खडा माहिती असलेली
त्रिमूर्ती.
पोपट बोरकर, रोहिदास पादीर आणि कुशाभाऊ ठाणगे.
|
पहिलं
बक्षीस मिळवण्याएवढं हिवरेबाजारनं नेमकं काय केलं आहे, हे जाणून घेण्यासाठी गावाला
भेट दिली. गावात फिरून पाहिलं, गावकऱ्यांशी गप्पा मारल्या आणि त्यातून सगळं चित्र
लख्ख स्पष्ट झालं. सेवानिवृत्त शिक्षक आणि ग्रामपंचायतीचे सदस्य रोहिदास पादीर,
सेवा संस्थेचे सचिव कुशाभाऊ ठाणगे आणि अस्सल कार्यकर्ता पोपट बोरकर यंदाच्या
अभियानाचे सूत्रधार होते. अभियानात काय काम केलं, कसं केलं, त्यातून काय फायदा
झाला, किती शोषखड्डे खोदले, किती शौचालयं बांधली, याचा सगळा तपशील त्यांच्या
जिभेवर आहे. सगळ्या कामांची खडानखडा माहिती ते देतात.
संत
गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावांची पाहणी करून निवड करण्यासाठी गुणांकन
पद्धती ठरलेली आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौचालयाचा १०० टक्के वापर व
व्यवस्थापन, घर आणि परिसराची स्वच्छता, सार्वजनिक जागेची स्वच्छता, वैयक्तिक
स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता व योजनेचे व्यवस्थापन हे गुणांकनाचे काही
प्रमुख निकष आहेत. या अभियानात भाग घ्यायचा सामूहिक निर्णय झाल्यावर
हिवरेबाजारमध्ये प्राथमिक पाहणी करण्यात आली. कोणत्या विषयात जास्त काम करावं
लागणार, हे त्यातून समजून घेण्यात आलं. प्रामुख्यानं घर आणि परिसराची स्वच्छता
यावर अधिक जोर द्यायचा ठरवण्यात आलं. कचऱ्याची आणि सांडपाण्याची विल्हेवाट,
शौचालयांची संख्या वाढविणं याचं नियोजन करण्यात आलं. गावात आधी घरापुढे शोषखड्डे
होतेच. आता ठरलं की, ‘घर तिथं शोषखड्डा’
हे काम करायचं. हे शोषखड्डे पूर्णपणे शास्त्रशुद्ध रीतीने बनवायचे. रोजगार हमी
योजनेच्या कामातून त्याचं नियोजन करण्यात आलं. लोकसंख्या वाढली, कुटुंब वाढली; त्यामुळे शौचालयांची संख्याही वाढवायचं ठरलं. त्या दृष्टीने नियोजन सुरू
झालं.
 |
प्रत्येक
घरापुढे नॅडेप आणि गांडूळ खताचे
युनिट आहे.
गांडूळ खत दाखवणारा
शेतकरी.
|
घनकचऱ्याचं
व्यवस्थापन नॅडेप आणि गांडूळ खत युनिटमधून करायचं ठरलं. प्रत्येक शेतकऱ्याच्या
घरापुढे नॅडेप आलं. दोन-चार जनावरे असणाऱ्या शेतकऱ्यांना गांडूळ खत युनिट देण्यात
आलं. परिणाम असा झाला की, गोठ्यांजवळ असणारी अस्वच्छता नाहीशी झाली. सगळा केरकचरा
नॅडेपमध्ये जाऊ लागल्यानं उकीरडेच दिसेनासे झाले. त्यातून आयतं खत मिळू लागल्यानं
त्यावरचा खर्च कमी झाला. ओला व सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला
दोन ड्रम देण्यात आले. हा कचरा टाकण्यासाठी गावातील मोक्याच्या ठिकाणीही दोन मोठे
ड्रम ठेवण्यात आले. त्यावर ठळक अक्षरात ‘ओला कचरा’ - ‘सुका कचरा’ असं लिहिलं.
 |
सांडपाणी
वाहतं नसलेला
गावातील
एक स्वच्छ रस्ता.
|
शोषखड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहणारं सांडपाणी एकदम बंद झालं. कोणत्याही शहरात-गावात
सकाळच्या वेळी फिरलं, तर रस्त्यांवर पाणी दिसतं. मी हिवरेबाजारमध्ये सकाळी दहाच्या
सुमारास फेरी मारली, तेव्हा कुठल्याही रस्त्यावरून असं पाणी वाहताना दिसलं नाही. हे चित्र कुणालाही, कधीही पाहता येईल, अशी परिस्थिती आहे.
सांडपाणी असं कुठंही सोडलं जात नसल्यामुळं त्याची डबकीही साठत नाहीत. डबकी नाहीत
म्हटल्यावर डास नाहीत. ‘डास दाखवा आणि शंभर रुपये मिळवा’, अशी गावाची घोषणाच आहे! प्रत्येक घराच्या परिसरात
शोषखड्ड्याच्या जवळ किमान दोन झाडं लावण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचा फायदा
झाला. शोषखड्ड्यांमुळं ही झाडं जगतात, वाढतात.
पिण्याचं
शुद्ध पाणी मिळणं, ही अनेक गावांची अडचण असते. विशेषतः महिलावर्ग त्यामुळं गांजून
जातो. ‘आम्हाला ड्रमनं पाणी आणावं लागायचं,’ असं सौ. अनिता बांगर सांगतात. पाण्याबाबत हिवरेबाजारनं वेगळा प्रयोग
केला. इथली पाणीयोजना पूर्णपणे महिलांच्या ताब्यात आहे. त्याचा खर्च, देखभाल सगळं
महिलाच बघतात. पाण्याला मोल किती, हे गावाला चांगलं कळलेलं आहे. त्यामुळे इथं
प्रत्येक घराला मीटरने मोजून पाणी दिलं जातं. त्याचा फायदा असा झाला की, पाण्याचा
अनावश्यक वापर कमी झाला. पाणी वाया जाणं आणि रस्त्यावरून वाहणं बंद झालं. शौचालयाच्या
वापराबाबतही थोड्या-फार अडचणी होत्या. वयोवृद्ध माणसं त्याचा वापर करण्यासाठी
टाळाटाळ करायचे. त्यांची समजून सांगण्याचं काम नातवंडांनी केले. त्यांना तसं शाळेत
शिकवलं जायचं ना! काही कुटुंबं मोठी झाली होती. तिथे दोन
शौचालयं देण्यात आली. काही शौचालयात गरजेनुसार कमोडचीही व्यवस्था करण्यात आली.
अभियानाच्या
गुणांकनाच्या निकषानुसार गावात समित्या करण्यात आल्या. निकषानुसार काम व्यवस्थित
आणि वेळेवर होतं का नाही, याचा आढावा दर आठवड्याच्या बैठकीत घेतला जाऊ लागला. कुठं
काम मागं पडतंय असं दिसलं की, त्यात काय अडचणी आहेत, यावर बैठकीत विचार होई. त्या
अडचणी लगेच दूर करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात. या सगळ्या कामात
विद्यार्थ्यांचीही मोठी मदत झाली. त्यातूनच हे यश मिळाल्याचं रोहिदास पादीर व
कुशाभाऊ ठाणगे सांगतात.
हिवरेबाजारनं
स्वच्छ ग्राम स्पर्धेत या आधी राज्य पातळीवरचं बक्षीस मिळवलं होतं दहा
वर्षांपूर्वी. त्यानंतर एक नवीन पिढी तयार झाली. तिला या कामाचं महत्त्व
कळण्यासाठी आणि स्वच्छतेच्या कामातलं सातत्य टिकविण्यासाठी गावानं पुन्हा एकदा
सहभागी होण्याचं ठरवलं. त्यातून कार्यकर्त्यांची नवीन टीमही तयार झाली. महिला व
तरुण यांचं आरोग्य महत्त्वाचं, हे गावानं समजून घेतलं आहे. ‘आजारमुक्त गाव’ असं पुढचं लक्ष्य आहे. त्यासाठी
गावातल्या प्रत्येकाची आरोग्यपत्रिका (हेल्थ कार्ड) तयार केली जाणार आहे.
हिवरेबाजारचा प्रवास सुरू आहे. अनेक टप्पे पार करीत लोकसहभागातून नवनवी उद्दिष्टं
गाठण्यासाठी गाव सज्ज आहे. राज्यातल्या गावांनी याचं अनुकरण केलं, तर राज्याचं
चित्र पालटण्यासाठी वेळ लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेसाठी आग्रही
आहेत. त्यांना या मोहिमेत साथ दिल्याचं समाधानही महाराष्ट्राला त्यामुळे नक्कीच
मिळेल.
.................
ओमचा
हट्ट पुरा झाला!
हिवरेबाजारच्या शाळेत शिक्षण तर मिळतंच; पण आदर्श नागरिकत्वाचे संस्कारही तिथे घडतात. स्वच्छतेचे धडे मुलांनी
तिथंच गिरवले आणि आपल्या पालकांनाही गिरवायला लावले. शाळेतल्या प्रत्येक वर्गात
नेलकटर, कंगवा, साबण, टॉवेल असं साहित्य दिसतं. या स्वच्छतेच्या सवयीचा परिणाम असा
झाला की, अवघ्या सात-आठ वर्षांचा मुलगा आई-बाबांना सोडून आजोळी राहायला आला.
तिसरीत शिकणाऱ्या ओम जाधवची ही कहाणी मोठी गंमतीशीर आहे. तो आजोळी म्हणजे
हिवरेबाजारला असताना पहिलीला शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर त्याला आई-बाबांनी
गावी, तळेगाव दाभाडे येथे नेले. तिथल्या शाळेत जायला काही ओम तयार होईना. ‘मला हिवरेबाजारच्याच शाळेत जायचं’ म्हणून तो
रडू लागला. बालहट्टापुढे कोण काय करणार? दुसरीचं वर्ष
कसंबसं संपवून ओम तिसरीसाठी पुन्हा हिवरेबाजारच्या शाळेत आला. असं का, हे
विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘तिथल्या शाळेत बाथरूम नाही.
लघवीला उघड्यावरच जावं लागायचं. बाकी सगळीकडे कचरा होता. मला ही शाळा आवडते. इथं
सगळं स्वच्छ आहे. मस्त गणवेश आहे, पायात बूट आहेत. हिवरेबाजारचीच शाळा मला आवडते!’’
----------------
घेतला
वसा गावकऱ्यांनी टाकला नाही...
आमच्या
गावात तुम्हाला कचरा दिसणार नाही, सांडपाणी दिसणार नाही आणि दुर्गंधीही जाणवणार
नाही, असं सौ. अनिता भीमराज बांगर अगदी अभिमानानं सांगतात. ग्रामस्वच्छता
अभियानामुळं झालेल्या फायद्याबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही
सर्वांनी हे काम केलं. त्यामुळे आजार एकदम कमी झाले. गावात आणि प्रत्येकाच्या घरात
दोन कचराकुंड्या आहेत – ओला वेगळा अन् सुका वेगळा. मुलांना इतकी शिस्त लागली आहे
की, बाहेर दिसलेला कचराही ती उचलून कुंडीत टाकतात. गावच्या पाणीयोजनेचं सगळं काम
आम्ही बायामाणसंच बघतो. दर १० तारखेला योजनेची बैठक होते. त्यात पैसे जमा करतो.
पाणी सोडण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लगेच त्याचे ठरलेले पैसे देऊन टाकतो.
तूटफूट काही झाली, तर दुरुस्तीही आम्हीच करून घेतो. रोज अडीच रुपयांत आम्ही ५००
लिटर पाणी प्रत्येक घराला मिळतं. आमचं गाव स्वच्छ तर आहेच; पण
एकदम सुरक्षितही आहे. इथे एकट्या बाईमाणसालाही काही त्रास होत नाही. त्यामुळे
आमच्या मुलींना हेच गाव सासर म्हणून मिळावं!’’
...
स्वच्छता
मोहिमेत जाणवणारी ठळक गोष्ट म्हणजे हिवरेबाजारच्या विद्यार्थ्यांचा स्वयंस्फूर्त
सहभाग. अंजली संजय ठाणगे (सातवी) त्यातलीच एक विद्यार्थिनी. गावाला
मिळालेल्या पारितोषिकामुळं ती अर्थातच खूश आहे. स्वच्छता गरजेची आहे. आम्ही हे काम
आपणहून आणि आनंदानं केलं, असं सांगताना अंजली म्हणाली, ‘‘आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी गावाचे भाग वाटून घेतले आहेत. त्या त्या
भागाची आम्ही रोजच्या रोज स्वच्छता करतो. कचऱ्याचं शाळेत वर्गीकरण करतो. नखापासून
केसांपर्यंत स्वच्छता पाहिजे, हे आम्हाला कळलं आहे. शाळेत जे शिकतो, ते आम्ही घरी
सांगतो. त्यामुळं घरोघरी स्वच्छता दिसते.’’
…
नोकरीच्या
शोधात मुंबईत गेलेले आणि नंतर तिथेच स्थिरावलेले श्री. पांडुरंग अहिलाजी
कदम (वय ७३) साधारण दशकापूर्वी गावी परत आले. ते गेले तेव्हा गाव वेगळं होतं
आणि दीर्घ काळानंतर परतले, तेव्हा अगदीच वेगळं भासलं. ते म्हणाले, ‘‘आमचं गाव छान आणि स्वच्छ आहे, याचा आनंद वाटतो. या कामात सगळं गाव सहभागी
होतं. कोणतंही काम श्रमदानानं होतं. ध्वनिवर्धकावरून घोषणा झाली की, सगळे येतात.
काम होणं गरजेचं आहे, हे सगळ्यांनाच पटलंय. गाव स्वच्छ झाल्यामुळंच हे बक्षीस
मिळालं. तुम्हाला कुठं कचरा दिसणार नाही. सगळे जण शौचालयाचा वापर करतात. पाणीही
जपून वापरतो आम्ही. पिण्याचं स्वच्छ पाणी मिळतं. चांगल्या गावाची सगळी लक्षणं इथं
दिसतात. स्वच्छतेचं महत्त्व सगळ्यांनाच पटलं आहे. कारण त्यामुळे आरोग्य चांगलं
राहतं आणि आजार होत नाही. याचं गावकऱ्यांना समाधान असल्यामुळंच हे काम टिकून
राहील.’’
...

हिवरेबाजारमध्ये
झालेल्या कामांचा सगळा इतिहास तोंडपाठ असलेले श्री. सहदेव यादव पवार (वय ६६)
राज्य पातळीवरच्या या पारितोषिकामुळं मनापासून खूश आहेत. कशामुळं गावाला हे
पारितोषिक मिळालं, असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘चोख काम
केल्यामुळंच पारितोषिक मिळालं आम्हाला. गावात सगळीकडे सांडपाण्याची व्यवस्था आहे.
कुठंच रस्त्यावर पाणी साठत नाही. त्यामुळे डास होत नाहीत आणि रोगराईचं प्रमाणही
कमी आहे. ओला-सुका कचरा वेगळा करून त्याची पद्धतशीर विल्हेवाट लावली जाते.
नॅडेपमध्ये कंपोस्ट खत तयार केलं जातं. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोपवाटिकेत
ते वापरतो. गावात तुम्हाला प्लास्टिकचा एक तुकडाही दिसणार नाही. विद्यार्थी आणि
गावकरी मिळून सगळी स्वच्छता करतात. संघटन महत्त्वाचं, हे गावाला कळलं आहे. पोपटराव
पवार साहेबांचं विद्यार्थी ऐकतात. मग गावकरी कसे मागे राहतील? घरोघरी शौचालयाचाच वापर होतो. अगदी वयस्क माणसंही बाहेर विधी करीत नाहीत.
मुलांनी त्यांना ती सवय लावली. त्यामुळं गावात कुठं घाण दिसणार नाही. घरोघरी
शोषखड्ड्याचं फार छान आणि अगदी शास्त्रशुद्ध काम झालं या मोहिमेत. स्वच्छता आणि
श्रमदान याचं मोल सगळ्यांनी जाणलंय. नवीन पिढीलाही ते समजलं आहे. त्यामुळे हे काम
टिकून राहील.’’
...
हिवरेबाजारच्या
गाडीनं रुळ बदलण्याचं सुरू केलं, तेव्हापासून निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री.
सखाराम पादीर (वय ६२) श्री. पोपटराव पवार यांच्या बरोबर होते आणि आहेत. या
पारितोषिकानं त्यांनाही आनंद झालाच. ‘आम्ही
पारितोषिकांसाठी, पुरस्कारांसाठी काम करीत नाही,’ असं
आग्रहानं सांगून श्री. पादीर सर म्हणाले, ‘‘गाव बदलण्याचं,
सुधारण्याचं हे काम सततच चालू आहे. पुरस्काराच्या उद्देशानं आमचे गावकरी कुठलंही
काम करीत नाहीत. गावच्या भल्यासाठी सतत काही तरी करीत राहणं आता आमच्या अंगवळणी
पडलं आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता याकडं सगळेच आवर्जून लक्ष देतात.
त्याची पावती या पारितोषिकानं मिळाली, एवढंच. गावातले सगळे जण सगळ्या गोष्टी मनापासून
करतात. आम्ही शाळकरी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांना स्वच्छतेची सवय
लागली. कुठंही कागदाचा कपटा दिसला, तरी ते तो उचलून कचराकुंडीतच टाकतात. घर आणि
परिसर प्रत्येक जण स्वच्छ ठेवतो. त्यामुळे गाव आपोआपच स्वच्छ होतं. स्वच्छतेची लागलेली
ही सवय आता कुणी विसरणं शक्य नाही.’’
...
निवृत्त
माध्यमिक शिक्षक श्री. हरिभाऊ विठोबा ठाणगे (वय ८१) यांच्या आठवणीत जुन्या
गावाचं चित्र आहे आणि अलीकडच्या २५-३० वर्षांमध्ये झालेले बदलही त्यांनी जवळून
पाहिले. बाहत्तरच्या दुष्काळापूर्वी गाव आबादीआबाद होतं. गायरानं सुरक्षित होती.
त्यामुळं घरोघर दूधदुभतं होतं, अशी आठवण सांगून ते म्हणाले, ‘‘दुष्काळामुळं सगळं बदललं. पण तेही नकोसं चित्र गावाच्या प्रयत्नांतून
पालटून गेलं. योग्य मार्गदर्शनामुळं गाव बदलण्यासाठी आपणच झटलं पाहिजे, हे
गावकऱ्यांना पटलं. त्यामुळं त्यांचा सहकार्य मिळालं. वेगवेगळ्या मोहिमांमध्ये
गावानं एकदिलानं काम केलं. त्यातूनच गाव स्वच्छ झालं. लोटाबंदी, पर्यावरणाचं
रक्षण, पाणी अडवणं अशी खूप काम केली सगळ्यांनी. श्रमदानामुळं पुष्कळशा गोष्टी
गावातल्या गावात करता आल्या. सरकारच्या योजनांचा आम्ही पुरेपूर लाभ घेतला. त्या
अमलात आणण्यासाठी गावकरी झटले. त्यातून शेतीचा विकास झाला, दुधाचा व्यवसाय बहरला
आणि आर्थिक स्थैर्य आलं. त्यामुळं गावकरी समाधानी आहेत. ग्रामस्वच्छतेचं पहिलं
पारितोषिक मिळालं, यात नवल काहीच नाही. प्रत्येक घराला स्वच्छतेचं महत्त्व पटलं
आहे.’’
(सर्व छायाचित्रे : शब्दकुल)
............
हिवरेबाजारच्या या वाटचालीस दिशा देणारे सरपंच आणि राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष श्री. पोपट पवार यांची मुलाखत - ‘पेपर १०० टक्के सोडवल्यानं यश अपेक्षितच होतं!’
https://khidaki.blogspot.com/2018/11/PopatPawar.html