Wednesday 29 July 2020

ब्लॉग-व्लॉग...भाऊ-भारदे!

कुठल्याही सामाजिक माध्यमातलं लिखाण, व्यक्त झालेलं मत-विचार ह्याकडे कसं पाहावं? त्यावरच्या वादविवादात किती टोकाची भूमिका घेत सहभागी व्हावं? घटकाभरची, फावल्या वेळेतली करमणूक म्हणून पाहायचं की त्याचा गांभीर्यानं विचार करायचा?

फेसबुकवरची एक पोस्ट. आठवड्यापूर्वीची. भरपूर वाचली गेली आणि तिची जोरदार चर्चा झाली. हे टिपण वाचल्याची पावती १००३ जणांनी दिलेली. त्यापैकी ६०३ जणांनी हसरी स्मायली टाकलेली, बदाम टाकणारे १२ आणि लाईकचा अंगठा दाखविणारे ३७३. हा मजकूर न आवडल्याने रागावले चौघे आणि दुःखी झालेले तिघे. अर्थात ह्या साऱ्या भावना शब्दांकित नव्हे, तर इमोजीच्या रूपाने चिन्हांकित झालेल्या. शब्दाने व्यक्त झालेले वाचक आहेत ५८८ आणि हे टिपण १४६ वाचकांनी आपल्या भिंतीवर सामायिक केलेले.

वरच्याच टिपणाशी संबंधित दुसरी पोस्ट त्यानंतर तीन दिवसांनी फेसबुकवर अवतरलेली. तिच्याबद्दल पावती देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी. म्हणजे ३६६ - त्यात हसऱ्या स्मायली ११८, 'आवडलं बुवा' असं बदामाच्या रूपाने सांगणारे सहा, अंगठा दाखविणारे २३८ वाचक. ह्या टिपणामुळे रागावलेल्यांची आणि वाईट वाटलेल्यांची संख्या फारच कमी - प्रत्येकी एक. ह्या टिपणकर्त्याने छोटा मजकूर लिहिलेला आणि त्याच्या खाली वरचं टिपण सामायिक केलेलं. त्यामुळेच की काय इथे संख्या कमी दिसते आहे.

पहिलं टिपण आहे मंदार अनंत भारदे ह्यांचं. त्यात त्यांनी लिहिलं आहे ज्येष्ठ पत्रकार  भाऊ तोरसेकर ह्यांच्याबद्दल. 'दीर्घ काळानंतर सोशल मीडियात मला मनापासून आवडलेली ही पोस्ट म्हणून जशीच्या तशी शेअर करतोय,' अशी टीप देत भाऊंनी हा मजकूर सामायिक केला. त्याच्या आधी एक छोटी कथा लिहिली - आई मी कुठे आहे?

भारदे यांचा लेख सात परिच्छेदांचा आणि ४८६ शब्दांचा. काय आहे त्यात? तर भाऊ तोरसेकर ह्यांचा वावर कसा अत्र-तत्र-सर्वत्र असतो; सगळ्या गोष्टींची त्यांना कशी आधीच माहिती असते आणि ते मोदींहून कसे अधिक मोदीनिष्ठ (किंवा हल्लीच्या अत्यंत लोकप्रिय भाषेत 'मोदीभक्त'!) आहेत, हे भारदे ह्यांनी वक्रोक्तीनं लिहिलं आहे. त्यात मग श्रीकृष्ण, अफजलखान ह्यापासून ते थेट अजित डोवाल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि (अर्थातच) राहुल गांधी हे सगळे येतात. ह्या साऱ्यांना एकत्र आणणारं एकच समान सूत्र - भाऊ तोरसेकर.

'वेदांआधी भाऊ तोरसेकर होते, उपनिषदांच्या आधीही भाऊ होते,' अशा वाक्यानं सुरू होणारा लेख एकदम हलकाफुलका आहे. पाच ते सात मिनिटांत वाचून होणारा हा लेख काहींना खदखदून हसवील, तर काहींच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटवील. विनोदाचा, व्यंग्य-लेखनाचा उत्तम नमुना म्हणून ह्या लेखाकडे पाहता येईल.

'लेखकाची भूमिका' अंगीकारून 'बघ्याची भूमिका' असं पुस्तक नावावर असलेले भारदे लेखनात उपहास-उपरोधाचा पुरेपूर वापर करतात. पण त्यांच्या ह्या लेखाकडे फारच गांभीर्यानं पाहिलं गेलेलं दिसतं. लेखाखाली प्रतिक्रियांचा वर्षाव पाहायला मिळतो. कशा आहेत ह्या प्रतिक्रिया? ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या. 'हा कोण टिकोजीराव भाऊंबद्दल लिहिणारा?' असा संतप्त सूर व्यक्त करण्यापासून 'बरं झालं जिरवली एकदाची!' असा (असुरी) आनंद व्यक्त करण्यापर्यंत.

कशामुळे भारदे ह्यांनी भाऊंवर हा लेख लिहिला असावा? आपल्या आजूबाजूला एवढं काही विनोदी घडत असताना त्यांनी हाच विषय का निवडला? उत्तर साधं-सोपं आहे. सामाजिक माध्यमांवरची भाऊंची लोकप्रियता आणि त्यांचं मोठं 'फॅन-फॉलोइंग'. फेसबुकवरच्या मराठी माणसांमध्ये साधारण सात वर्षांपासून हे नाव प्रसिद्ध आहे. भाऊ तोरसेकरांनी ब्लॉगवर लेख लिहावा, त्याचा दुवा फेसबुकवर सामायिक करावा आणि त्याखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडावा! हे असं सात-आठ वर्षांपासून चालू आहे. त्यांच्या ब्लॉगने वाचकसंख्येचा एक कोटीचा टप्पा कधीच ओलांडला.

'लॉकडाऊन'वर उतारा म्हणून ह्या काळात अनेकांनी फेसबुक लाइव्ह, वेबिनार, यूट्यूब चॅनेल असे मार्ग निवडले. साधारण ह्याच सुमारास भाऊ तोरसेकर ह्यांनी यूट्यूबवर 'प्रतिपक्ष' नावाने चॅनेल सुरू केलं. त्यावर त्यांचे व्हिडिओ नियमित येऊ लागले. त्याचेही साडेचार महिन्यांतच लाखाहून अधिक 'फॉलोअर' झाले आहेत. त्यातील काही 'व्लॉग' हिंदीतही रूपांतरित होऊ लागले. ब्लॉगकडून भाऊ व्लॉगकडे (व्हिडिओ ब्लॉगिंग) वळाले. आधी ते लिहायचे, तेच आता बोलून दाखवतात. त्यांचं हे चॅनेल तांत्रिकदृष्ट्या फार सरस नाही. पण त्यांच्या निष्ठावान वाचकांना त्यात फारसा रस नाही. त्याबद्दल त्यांची तक्रारही नसणार. 'भाऊ बोलत आहेत,' हाच त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. साहजिकच 'प्रतिपक्ष' लोकप्रिय होण्यास वेळ लागला नाही.

भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी ह्यांचे नाव साधारण सात वर्षांपूर्वी जाहीर केले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे सातत्याने समर्थन करणारे पत्रकार म्हणून भाऊ चिरपरिचित झाले आहेत. 'पुण्यनगरी'तील सदराने त्यांना मोठा वाचकवर्ग मिळवून दिला आणि फेसबुकमुळे त्यांचे हजारोंच्या संख्येने चाहते निर्माण झाले. जागता पहारा ब्लॉगवरील लेख चवीने वाचले जाऊ लागले, व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जाऊ लागले. आतापर्यंत कधी मिळालं नाही किंवा आपल्यापासून माध्यमांनी दडवून ठेवलं, ते भाऊंच्या लिखाणातून वाचायला मिळत आहे, असं वाचकांना वाटू लागलं. हे सगळं लिहिताना-मांडताना भाऊंचं तर्कशास्त्र अजिबात उणं पडत नाही, हे महत्त्वाचं. उघडपणे उजवी बाजू मांडणाऱ्या मराठी पत्रकाराला बहुदा पहिल्यांदाच मिळालेलं हे प्रचंड यश असावं.

'प्रतिपक्ष' लोकप्रिय होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच काळात झालेला गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष. त्यावर भाऊंनी 'लडाख गूढकथा' ह्या शीर्षकाने तब्बल ११ व्लॉग सलग सादर केले. अर्थातच त्यांची भूमिका अनपेक्षित नव्हती. ह्या संघर्षात चीनला कसं नमतं घ्यावं लागलं, भारताची - अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची भूमिका कशी योग्य व नेमकी आहे, अजित डोवाल ह्यांनी कशी भूमिका बजावली, ह्या संघर्षाचा पूर्वेतिहास, मोदींना प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी ह्यांच्यावर टीका... असं सगळं काही त्यात आहे. दरम्यानच्या काळात राजस्थानमधील घडामोडी, महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार, देवेंद्र फडणवीसांचं 'मी पुन्हा येईन...' अशा वेगवेगळ्या विषयांवरही भाऊ बोलले. 'प्रतिपक्ष'नं गेल्याच आठवड्यात लाख प्रेक्षक-श्रोत्यांचा टप्पा ओलांडला.

भारदे ह्यांनी भाऊ तोरसेकर ह्यांच्यावर लिहिण्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. त्यातूनच त्यांनी भाऊंना श्रीकृष्ण जन्मापासून ते अफझलखानाचा वध, १८५७च्या उठावापासून देवेंद्र फडणवीस ह्याच्या जलयुक्त शिवारापर्यंत सगळीकडे नेलं आहे; सगळीकडे त्यांचं अस्तित्व दाखवून दिलं आहे. ह्या छोट्या टिपणातल्या काही कोट्या, काही चिमटे अफलातून आहेत. आपण न केलेल्या कामाचे व्हिडिओ भाऊ टाकत असल्याचे पाहून फडणवीसांनी त्यांना ब्लॉक केले, अशा काही भन्नाट कल्पना आहेत. भाऊंच्या लिहिण्या-बोलण्यावर, विश्लेषणावर वा भूमिकेवर थेट टीका न करता ह्या अस्वली पद्धतीने केलेल्या गुदगुल्या आहेत. हे लिहिण्यात थोडी टिंगल, थोडी टवाळी, बरीचशी मस्करी दिसत असली, तरी विखार वा अनादर जाणवत नाही.

हे मिश्कील, खुसखुशीत लेखन खुद्द भाऊंना आवडलं असलं, तरी त्यांच्या चाहत्यांना मात्र मुळीच रुचलेलं नाही. प्रतिक्रियांवरून ते दिसून येतं. त्यातल्या काही निष्ठावंत वाचकांनी 'भारदे तुम्ही स्वतःला समजता कोण (भाऊंवर टीका करायला)?' असा सात्त्विक संतापाचा सवाल विचारला आहे. अनेकांनी पातळी सोडून प्रतिवाद केला आहे. भाऊ कसं खरं खरं लिहितात, ह्याची ग्वाही ह्या निमित्ताने देत बऱ्याच जणांनी 'त्यामुळंच ते रुचत नाही' असा निष्कर्षही काढला आहे.

भाऊंचे चाहते ह्या लेखावर जसे व्यक्त झाले, तसे त्यांचे विरोधकही. त्यात प्रामुख्याने लेखक, पत्रकार आहेत. त्यांच्या प्रतिसादातून भाऊंबद्दल व्यक्त झालेली असूया, विखार सहजपणे दिसतो. एका पत्रकाराने अश्लाघ्य भाषेत टीका करून त्यावरील प्रतिसादाला उत्तर देताना नंतर एकेरी उल्लेख केला आहे. 'अशी पोस्ट आपल्यावर लिहिली जाणार आहे, हे भाऊंना आधीच माहीत झालं असणारे!', असा लेखाच्या सुराला साजेसा एक प्रतिसादही दिसतो. भाऊंनी केलेलं राजकीय विश्लेषण आवडणाऱ्या काहींना त्यांचं परराष्ट्र धोरण, लष्कर आदींबाबतचं मतप्रदर्शन पटत नाही. ही संधी साधून एकमेकांना 'ट्रोल' करण्याची संधी साधणारे आणि दुसऱ्याच्या भिंतीवर आपलं भांडण भांडणारेही बरेच दिसतात.

एका पत्रकाराने भाऊंच्या बाजूनं लिहिलं आहे, 'लाख सबस्क्राईबर व पन्नास-साठ हजार व्ह्यूअर म्हणजे भाऊंचे व्हिडिओ पटतात लोकांना.' हे सगळं गमतीगमतीत घ्यायचं आहे आणि वाचायचं आहे, ह्याची जाणीव असलेलेही काही मोजके वाचक ह्या पोस्टवर येऊन गेलेले दिसतात. बाकी बहुतेक सारे तलवारी उपसून सज्ज!

प्रतिक्रियांचा असा पाऊस पडलेला असताना, त्यांना उत्तर देण्याच्या, प्रतिवाद वा समर्थन करण्याच्या भानगडीत लेखक मंदार भारदे फारसे पडल्याचे दिसत नाही. 'तुम्ही आता स्टँडअप कॉमेडियन व्हा,' असा सल्ला देणाऱ्या एका वाचकाचे त्यांनी आभार मानल्याचे दिसतात! 'तू पण थोडी पत्रकारिता केली आहेस असे वाटते म्हणून केवळ विचार वेगळे यासाठी इतके अतिरेकी विखारी विचार योग्य नाही. ज्येष्ठत्वाचा असा अनादर तुझ्याकडून अपेक्षित नाही,' अशी प्रतिक्रिया चिंतामणी करमरकर ह्यांनी नोंदविली. त्याच्या उत्तरादाखल मंदार भारदे लिहितात, 'फक्त गंमत म्हणून का बघू नये आपण ह्याकडे? विरोध केला तर लगेच अनादर कशाला होईल?'

भारदे ह्यांना ही भट्टी कशी साधली? ह्याचं उत्तर शोधलं तर सहज सापडतं. रसाळ भाषणांबद्दल प्रसिद्ध असणारे, निरुपणकार म्हणूनच जे ओळखले जात त्या बाळासाहेब भारदे ह्यांचे मंदार नातू आहेत. 'काँग्रेस खुर्चीवाल्यांचा / भाजप पूजाअर्चावाल्यांचा / समाजवादी चर्चावाल्यांचा / कम्युनिस्ट मोर्चावाल्यांचा' किंवा 'ज्ञान असेल तरच भान येते. स्फूर्तीची मूर्ती होते आणि कार्यसिद्धी असेल तर आपोआप प्रसिद्धी मिळते,' अशा कोट्या भाषणात सहज करणाऱ्या भारदेबुवांचा दीर्घ सहवास त्यांना लाभला. त्यामुळे राजकारण, समाजकारण, रसाळ लेखन ह्याचे धडे इतर कोणाकडे गिरवण्याची गरज त्यांना भासलेली नसावी. 'माजी अभाविप कार्यकर्ता' असा त्यांचा उल्लेख एका वाचकानं प्रतिक्रियेत केला. पण त्यांनी कोणतं 'पॉलिटिकल थॉट बुक' अभ्यासलं, ते स्पष्ट आहे.

बहुसंख्य प्रतिक्रिया-प्रतिसादाचा सूर पाहिला, तर जाणवतं हेच की, निखळ विनोद म्हणून ह्या लेखाकडे फार थोड्या लोकांनी पाहिलं. त्यातलं वाचनानंदाचं सुख घेणं अनेकांना जमलं नाही. श्रीकांत उमरीकर ह्यांच्यासारख्या उत्तम वाचक-लेखकालाही ह्याचा मुलाखतीद्वारे प्रतिवाद करावा वाटणं नाही म्हटलं तरी खटकणारं आहे. लेखामध्ये भारदे ह्यांनी कुणाच्याही व्यंगाचा दुरान्वयानेही उल्लेख केलेला नाही. असलंच तर ते 'व्यंग्य' आहे!

'विनोदाचे महत्त्व' ह्यावर महर्षी वि. रा. शिंदे ह्यांनी लिहिलं आहे - विनोद म्हणजे संसारात येणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगांचा वाजवीपेक्षा जास्त चटका लावून न घेता, आपली संतोषित वृत्ती कायम ठेवणे हा होय.... ह्या गुणामुळे ही माणसे नेहमी सुखी आणि आनंदी असतात. त्यांच्या मनोमंदिरामध्ये नेहमी विनोदाची हवा खेळून उबट ओलसरपणास जागा न राहिल्यामुळे क्लेश, चिंता इत्यादी कृमी त्यात साचत नाहीत. धर्म आणि कर्तव्य ह्यांविषयी आपली खोटीच समजूत करून घेऊन मनुष्ये वारंवार आपआपसांत तंटा माजवितात आणि त्यामुळे होणारे व्यक्तीचे आणि समुदायाचे नुकसान भरून काढण्यासाठी पुन: नवीन यत्न करावा लागतो,  ह्या सर्वच खटाटोपाचे निवारण विनोदी माणसाच्या ह्या निर्विघ्नपणामुळे होते, ही गोष्ट एकदम कोणाच्या लक्षात भरण्याजोगी नसली, म्हणून तिचे महत्त्व कमी आहे असे नाही. (संदर्भ -  https://virashinde.com)

जाता जाता सहज टोपी उडवणं, एवढंच लेखातून जाणवतं. वक्रोक्तीचं वा व्याजोक्तीचं उदाहरण म्हणूनच त्याकडे पाहिलं पाहिजे. तसं ते पाहता येत नसेल, तर भाऊंच्याच शब्दात स्वतःला विचारलं पाहिजे, 'आई, मी कुठं आहे?'
....
मंदार भारदे ह्यांचा लेख इथं वाचायला मिळेल -
https://www.facebook.com/photo/?fbid=10158599648733064&set=a.10151015027468064

...आणि 'मी कुठं आहे?' हे विचारणारं भाऊ तोरसेकर ह्यांचं टिपण २३ जुलैचं आहे. 

Sunday 12 July 2020

फुलले हसू...

समाधानाचे हसू! शस्त्रक्रिया केलेल्या एका मुलीसमवेत डॉ. हिरजी एडनवाला.
हमदनगरचा स्थापना दिन २८ मे रोजी असतो. यंदा त्याच्या एक दिवस आधीच शहरानं आपला एक सुपुत्र गमावला. केरळातील त्रिशूर येथे जवळपास ६० वर्षे राहिलेल्या डॉ. हिरजी सोराब एडनवाला ह्यांनी २७ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. 'स्माईल मेकर' ही त्यांची सर्वदूर असलेली ओळख.

कोण होते हे डॉ. एडनवाला? नगरशी त्यांचा नेमका काय आणि कसा संबंध? त्यांचा जन्म १९३०मध्ये नगर येथे झाला. भिंगार कँप परिसरात श्री. बेहराम नगरवाला ह्यांचा बंगला (११, नगरवाला रस्ता) आहे. तेच डॉ. एडनवाला ह्यांचं जन्मस्थळ. त्यांचं आजोळ नगर. त्यांची आई होमाई होरमसजी नगरवाला. पत्नी गुलनारही नगरनिवासीच. ते वाढले मुंबईमध्ये. तिथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्रिशूर (केरळ) येथेच स्थायिक झाले. त्यांच्या निधनाची बातमी 'पारशी टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाली. श्री. बेहराम नगरवाला व मित्र श्री. धनेश बोगावत ह्यांच्यामुळे ती समजली. इंटरनेटवर शोध घेतल्यावर लक्षात आलं की, हा माणूस किती मोठा होता ते!

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या जन्मजात व्यंगामुळे अनेक मुलांचं आयुष्य बिकट होतं. व्यंगामुळे चेहरा विकृत होतो; बोलताना त्रास होतो. समाजात टिंगलटवाळी वाट्याला येते आणि ती मागे पडत जातात. हे जन्मजात व्यंग शस्त्रक्रियेने दूर करून ह्या मुलांच्या आयुष्यात हसू फुलवणं हेच डॉ. एडनवाला ह्यांनी जीवनध्येय मानलं. प्रदीर्घ कारकीर्दीत अशा १६ हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या.

'स्माईल ट्रेन'मुळे डॉ. एडनवाला विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झाले.
वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. एडनवाला ह्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्रिशूरच्या 'ज्युबिली मिशन हॉस्पिटल'ची १९५८मध्ये निवड केली. अखेरच्या क्षणापर्यंत ते तिथेच कार्यरत राहिले. दुभंगलेले ओठ व टाळू ह्या व्यंगामुळे मुलांना किती त्रास होतो, हे सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आलं आणि हे दुःख दूर करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या रुग्णालयातील 'चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर' ह्या शस्त्रक्रियांचे भारतातील अग्रणी केंद्र बनले.

दुभंगलेले ओठ-टाळूवरची शस्त्रक्रिया खर्चिक आहे. अनेक पालकांना हा खर्च परवडणारा नसतो. दूरवरून येणाऱ्या गरीब पालकांना डॉ. एडनवाला ह्यांनी कधी निराश केलं नाही. रुग्णालय, मित्र आणि काही संस्था ह्यांच्या मदतीने ते ह्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करीत. ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मुंबईचा जयनाथ पवार. त्याचा आदर्श प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान. त्याचं 'जय हो...'  जयनाथला 'की बोर्ड'वर उत्तमपैकी वाजवता यायचं. पण गाणं शक्य नव्हतं. अडचण व्यंगाची होती. त्रिशूरच्या रुग्णालयात त्याच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया झाली आणि तो आनंदानं 'जय हो...' गाऊ लागला!

ह्याच व्यंगावर विविध देशांमध्ये उपचाराची सोय करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी स्वयंसेवी संस्था म्हणजे 'स्माईल ट्रेन'. साधारण ० वर्षांपूर्वी डॉ. एडनवाला ह्या संस्थेबरोबर काम करू लागले. मग ते संस्थेचा अविभाज्य घटक बनले. त्यांच्या निधनानंतर 'स्माईल ट्रेन'ने संकेतस्थळावर श्रद्धांजलीपर विशेष लेख प्रसिद्ध केला. (त्याचा अनुवाद खाली दिला आहे.)

डॉ. एडनवाला ह्यांचे जन्मस्थळ.
(छायाचित्र सौजन्य - बेहराम नगरवाला)
हसू फुलविण्याचे हे मिशन डॉ. एडनवाला ह्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत चालविले. नव्वदीच्या घरात असलेल्या या शल्यविशारदाने शेवटची शस्त्रक्रिया २०१९च्या डिसेंबरमध्ये केली. श्री. बेहेराम नगरवाला सांगतात की, आपला जन्म जिथं झाला, त्या घराबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. घराजवळचा हौद, तिथलं चिंचेचं झाड, आईने लावलेलं चिकूचं झाड ह्याची ते नेहमी आठवण काढीत. अलीकडेच त्यांनी घराचे फोटो मागविले होते. ते पाठवण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी आली.
.............
डॉ. एडनवाला ह्यांना आठवताना...

मुंबईतलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आणि जीवनाच्या साथीदाराची निवड करून डॉ. हिरजी सोराब एडनवाला दक्षिण भारतातील त्रिशूरमध्ये पोहोचले. तिथं २० खाटांचं, एकही डॉक्टर वा रुग्ण नसलेलं रुग्णालय त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतं. नवंनवंच लग्न झालेलं हे जोडपं रुग्णालयाच्या आवारातील एका छोट्या घरात राहू लागलं. तिथं नव्हती पाण्याची सोय, नव्हता साधा पंखा. तशा परिस्थितीत डॉ. एडनवाला ह्यांनी काम सुरू केले.

त्या आरंभीच्या दिवसांत रुग्णालयाची धुरा डॉ. एडनवाला ह्यांनीच संभाळली. बाळांतपणं, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची सेवाशुश्रुषा करणं आदी कामांमध्ये ते गुंतून गेले. पण त्यांचं आवडतं काम म्हणजे मुलांना मदत करणं. त्यातूनच त्यांच्या आवडीचं काम उभं राहिलं - दुभंगलेले ओठ आणि टाळू असं व्यंग असलेल्या मुलांवर उपचार करणं.

त्रिशूरच्या ज्युबिली मिशन रुग्णालयात १९५९मध्ये डॉ. एडनवाला ह्यांनी 'चार्ल्स पिंटो सेंटर फॉर क्लेफ्ट लिप अँड पॅलेट'चा श्रीगणेशा केला. आपल्या माजी बॉसचं नाव त्यांनी ह्या केंद्राला दिलं होतं. हे केंद्र म्हणजे त्यांचा एकखांबी तंबूच! ते एकटेच शस्त्रक्रिया करीत. केंद्राला पैशाची चणचण भासत होती; हाताशी आधुनिक उपकरणं नव्हती. पण आपलं काम आणि आपले रुग्ण ह्यांच्याबद्दल त्यांना असलेलं अमर्याद ममत्व ह्या प्रतिकुल परिस्थितीहून वरचढ ठरलं. हाताशी असलेल्या मर्यादित सामग्रीच्या साहायाने त्यांनी रुग्ण म्हणून येणाऱ्या प्रत्येक मुलावर आवश्यक ते उपचार केले, त्याची काळजी घेतली.

दुभंगलेल्या ओठाचे व्यंग असलेल्या मुलांना मदत करण्याच्या कामाला डॉ. एडनवाला ह्यांनी वाहूनच घेतलं होतं. एकदा तर रेल्वेगाडीतून जाताना खिडकीतून त्यांना असं व्यंग असलेला एक मुलगा दिसला. त्याला पाहून त्यांनी गाडी थांबविण्यासाठी साखळी ओढली. आपल्या कामावरच्या त्यांच्या ह्या निष्ठेला तोडच नाही!

ह्याच पद्धतीने चार दशकांहून अधिक काळ डॉ. एडनवला आपलं शल्यक्रियांचं काम करीत आले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्या पत्नीच्या वाचण्यात एक लेख आला. हा लेख होता 'स्माईल ट्रेन'बद्दल. ही स्वयंसेवी संस्था दुभंगलेल्या ओठांचे व्यंग असलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करते आणि ह्या कामासाठी आपले भिडू म्हणून संस्था भारतातील रुग्णालयांचा शोध घेत होती. हा लेख वाचून त्यांनी आपल्या पतीबद्दल आम्हाला कळविले आणि सन २००१मध्ये त्रिशुरचे ज्युबिली मिशन हॉस्पिटल आणि डॉ. एडनवाला 'स्माईल ट्रेन'चे भारतीय भागीदार बनले. त्यानंतरच्या १९ वर्षांमध्ये 'स्माईल ट्रेन'च्या मदतीमुळे आणि डॉ. एडनवाला ह्यांच्या मूलभूत प्रशिक्षणामुळे  'चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर'चं रूपांतर ह्या व्यंगावर उपचार करणाऱ्या एका आधुनिक, बहुविद्याशाखीय केंद्रामध्ये झालं.

'स्माईल ट्रेन'चा जीवनगौरव पुरस्कार डॉ. एडनवाला ह्यांना
अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या हस्ते देण्यात आला.
खरं तर डॉ. एडनवाला ह्यांचं काम जागतिक स्तरावर दखल घेण्यासारखंच होतं. ते मात्र 'आपण बरं नि आपलं काम बरं' अशाच पद्धतीनं ह्या साऱ्यापासून लांब राहिले. त्यांनी एवढी वर्षं केलेल्या ह्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्याचं काम 'स्माईल ट्रेन'नं केलं. 'क्लेफ्ट केअर'बाबत (दुभंगलेल्या ओठांवर उपचार व काळजी) आयोजित विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात येऊ लागलं. ह्या परिषदांमध्ये त्यांनी आपले अनुभवाचे बोल सांगितले; त्यांनी एवढी वर्षं वापरलेलं तंत्र श्रोत्यांना समजावून सांगितलं. त्याचा फायदा जगभरातील अनेक डॉक्टरांना झाला. 'स्माईल ट्रेन'च्या वैद्यकीय सल्लागार मंडळाचे (न्यू यॉर्क) सदस्य म्हणून ते काम पाहू लागले. संस्थेनं भारतात वैद्यकीय सल्लागार परिषद स्थापन केली, तिचे ते संस्थापक सदस्य होते. वैद्यकीय उपचार आणि परोपकारी सेवाकार्याबद्दल त्यांना २००६मध्ये अतिशय मानाचे जोसेफ मॅकार्थी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दुभंगलेल्या ओठावरची भारतातील ५० हजारावी शस्त्रक्रिया २०१८मध्ये झाली. हाच मुहूर्त साधून 'स्माईल ट्रेन'नं जीवन गौरव सन्मान देत डॉ. एडनवाला ह्यांच्या कार्याला दाद दिली.

खूप काही बदलत असताना आणि वाट्याला एवढी प्रसिद्धी नि लोकप्रियता येत असताना डॉ. एडनवाला ह्यांच्या कामाची गती कधी मंदावली नाही. 'स्माईल ट्रेन'ची आणि त्यांची साथ दोन दशकांची. ह्या काळात त्यांनी दुभंगलेल्या ओठांवरच्या सदतीसशेहून अधिक शस्त्रक्रिया केल्या.

डॉ. एडनवाला आपल्या कार्यालयात. सगळ्या भिंती त्यांच्या हीरोंच्या छायाचित्रांनी सजलेल्या!
'ज्युबिली मिशन हॉस्पिटल'च्या परिसरातील छोट्याशा घरात डॉ. एडनवाला दाम्पत्याचा संसार साठ वर्षं चालला. त्याच घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आठवड्यात किमान चार शस्त्रक्रिया करण्याचा डॉ. एडनवाला ह्यांचा जणू परिपाठच होता आणि तो त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत पाळला. त्यांच्या कार्यालयातील भिंती कृष्ण-धवल छायाचित्रांनी सजल्या होत्या. दुभंगलेल्या ओठांचं व्यंग घालविण्यासाठी शस्त्रक्रियांचा उपाय अवलंबिणाऱ्या जुन्या पिढीतल्या शल्यविशारदांची ती छायाचित्रे. ते सारे सर्जन म्हणजे डॉ. एडनवाला ह्यांचे नायक! ह्या नायकांच्या स्मृतिमंदिरात ते बसत. त्याच नायकांच्या मांदियाळीतलेच डॉ. एडनवाला एक होत. पण ह्या विनयशील माणसाने तसं कधी जाणवू दिलं नाही. स्वतःच्या मनाची तशी समजूत होऊ दिली नाही. दयाळूपणा, समर्पण आणि सातत्य ह्याचा जिताजागता आदर्श म्हणजे डॉ. एडनवाला. त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले. लाखो मुलांच्या चेहऱ्यावर कायमचं हसू फुलवलं. हे विद्यार्थी आणि ते हसरे चेहरेच त्यांचा वारसा अमर ठेवणार आहेत.

'स्माईल ट्रेन'च्या उपाध्यक्ष आणि आशियाच्या विभागीय संचालक डॉ. ममता कॅरल म्हणाल्या, ''अतिशय शांत, हुषार आणि शिस्तप्रिय असलेल्या डॉ. एडनवाला ह्यांनी आम्हां सर्वांना पुढे पुढे जाण्यासाठी सदैव प्रेरत केले. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या डॉक्टरांनी सगळ्यांना नेहमीच मदत केली. 'टीच अ मॅन टू फिश' हे 'स्माईल ट्रेन'चं ब्रीद आहे. म्हणजे तेवढ्या वेळापुरती उपयोगी पडेल अशी मदत करण्याऐवजी संबंधिताला पुढे सदैव कामास येईल आणि तो स्वयंपूर्ण होईल, असं शिकवणं. डॉक्टरांनी हे तत्त्वज्ञान सर्वांच्या गळी उतरवलं. तरुण शल्यविशारद, वैद्यकीय व्यावसायिक ह्यांना प्रशिक्षण, सल्ला देऊन, मार्गदर्शन करून त्यांनी तयार केलं. दुभंगलेल्या ओठाचं व्यंग असलेल्या मुलांबद्दल त्यांना मनस्वी कणव वाटे, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम होतं, ह्याचं मला कधीच विस्मरण होणार नाही. परोपकार आणि करुणा याचे ते मूर्तिमंत उदाहरण होत. अशा मुलांशी संवाद साधणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या डॉ. एडनवाला ह्यांना पाहणं फार आनंददायी दृश्य असे. त्यांना आम्ही गमावलंय, ह्याचं दुःख तर मोठं आहेच. पण त्यांनी उपचार करून व्यंगमुक्त केलेल्या हजारो मुलांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या हास्यातून त्यांच्या कर्तृत्वाचं दर्शन घडत राहील. त्यांना जवळून पाहिलेल्या अनेकांच्या हृदयात त्यांनी जागा पटकावलेली आहे.''
..... 
('स्माईल ट्रेन' संकेतस्थळाच्या सौजन्याने. हा मृत्युलेख अनुवादित करून प्रकाशित करण्यास संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक ब्रँडन लॉसन ह्यांनी परवानगी दिली. सर्व छायाचित्रे त्यांच्याच संकेतस्थळावरून साभार.)


(आणखी संदर्भ - 'द हिंदू', 'पारशी टाइम्स', 'मुंबई मिरर')

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...