Monday 26 February 2018

सरकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखक आणि चिंता (अ. भा. आवृत्ती)


(वडोदरा विशेष - १)
----

उद्घाटनाच्या कार्यक्रमात गायकवाड आणि मंडळींनी रंगविलेली मैफल.
सनई आणि जलतरंग ही जुगलबंदी अफलातूनच!
..........................................

सयाजीराव महाराजांच्या वडोदऱ्यात गेल्या आठवड्यात झालेलं साहित्य संमेलन अतिशयोक्ती अलंकाराच्या दोन उदाहरणांच्या वापरांपासून लांब राहिलं - साहित्यपंढरीच्या वारकऱ्यांची उच्चांकी गर्दी आणि पुस्तकविक्रीची कोटीची उड्डाणे’!

अलीकडच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बातम्यांना लावण्याची ही वरची दोन हमखास विशेषणं. ती इथे वापरली गेली नाहीत हे खरं; पण ह्या भाषिक अलंकारांचा मोह संबंधितांना टाळता आला नाही तो नाहीच. समारोपाच्या कार्यक्रमात ते दिसलं.

अध्यक्षीय भाषणाचं (जोरकस) कौतुक करताना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी ह्या संमेलनाची (आणि त्याच वेळी संमेलनाध्यक्षांचीही?) तुलना थेट आणीबाणीच्या काळात कऱ्हाडला झालेल्या संमेलनाशी केली. येथून पुढची संमेलने गर्दीची नव्हे, तर अशीच दर्दींची होतील, असंही म्हटलं गेलं. दर्दी-गर्दीबद्दल बोलल्यानंतर पुढे कार्यशाळांना मिळालेला तुडुंब प्रतिसाद संमेलनाचं वैशिष्ट्य असल्याचं नमूद करण्यात आलं.

उशिरा सुरू झालेले नि रेंगाळलेले कार्यक्रम
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरीत झालेलं हे संमेलन बऱ्याच अर्थांनी वेगळं ठरलं. मंडप न उभारता, प्रशस्त क्रिकेट मैदानात झालेला उद्घाटनाचा कार्यक्रम आणि बंदिस्त सभागृहात उरकलेला समारोप ही वैशिष्ट्यं सांगतानाच दोन्ही कार्यक्रम किमान तासभर उशिरानं सुरू झाले, ह्याचीही नोंद करायला हवी. दोन्ही कार्यक्रम रेंगाळले आणि अध्यक्षीय भाषण, अध्यक्षांचं समारोपाचं भाषण पूर्ण होण्याच्या किती तरी आधीच श्रोत्यांच्या संख्येला गळती लागल्याचं दिसलं.

खुले अधिवेशन संपण्यापूर्वीच महामंडळाशी संलग्न साहित्य संस्थांचे बरेच पदाधिकारी व्यासपीठावरून पायउतार झाले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ह्यांचं भाषण सुरू असताना व्यासपीठावरच्या निम्म्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. पदाधिकाऱ्यांचं हे वागणं सभाशास्त्राच्या संकेताला धरून नव्हतं. तुम्ही चुकत आहात, असं त्यांना कोण सांगणार?

संमेलनाच्या सगळ्यांत मोठ्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अध्यक्षीय भाषण, असं साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी ह्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात जोरदारपणे सांगितलं. अध्यक्षांवर कौतुकाचा वर्षाव करताना ते म्हणाले, ‘‘ठाम आणि लक्षणीय भूमिका घेण्याचं मराठी लेखक विसरला होता. ते लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं. भूमिका न घेणाऱ्या लेखकाच्या संप्रदायाला ह्या भाषणाने बाजूला सारले!’’


ग्रंथदिंडीत सहभागी झालेले
संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख.
......................
अध्यक्षांचं ‘धाडस’
डॉ. जोशी यांनी ज्याचं भरभरून कौतुक केलं, त्या अध्यक्षीय भाषणानं माध्यमांना पुरेपूर खाद्य दिलं, हे नक्की. संमेलनाला आलेल्या सर्वसामान्य प्रतिनिधींमध्ये आणि मोजक्या लेखकांमध्ये नंतर ह्या भाषणाची किती चर्चा झाली, हे सांगणं कठीण आहे; पण माध्यमांना त्यानं अजून काही काळ पुरणारं भांडवल निश्चितपणे दिलं. देशमुख यांनी राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजेस., असं म्हणण्याचं धाडस (हा शब्द त्यांचाच) केलं. गुजरातच्या भूमीवर हे धाडस केलं, ह्याकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात आलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी हे ऐकवलं, असंही प्रसिद्ध झालं.

पंतप्रधानांच्या गुजरातेत झालेल्या मराठी संमेलनातल्या ह्या भाषणानं सत्ताधारी पक्षाचे कान (परस्पर) टोचले गेले, याचा भलताच आनंद अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कडव्या पाठीराख्यांना झाला. तथापि, हा चुकणारा राजा विद्यमान नसून सार्वकालिक असल्याचं संमेलनाध्यक्षांनीच म्हटल्याची बातमी नंतर प्रसिद्ध झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भक्तांचं त्याबद्दलचं मत काही वाचण्यात आलं नाही.

केंद्रात मोदी सरकार सत्तेवर येण्याची चिन्हं दिसू लागताच (ह्याला भीती वाटू लागताच असंही म्हणता येईल!) ह्या ना त्या प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा चर्चेत येऊ लागला, आणला जाऊ लागला. सरकार सत्तेवर येऊन पावणेचार वर्षं झाल्यानंतरही त्यात फरक पडलेला नाही. त्याचंच दर्शन वडोदऱ्याच्या साहित्य संमेलनात घडलं.

ते दखल घेण्याजोगं नव्हतं?
अध्यक्षीय भाषणामुळे देशमुख हीरो ठरले. त्यांचं हे छापील भाषण (त्या पुस्तिकेचा आकार भाषा आणि जीवन नियतकालिकाचा) ५२ पानांचं. त्यात प्रास्ताविक, माझी साहित्याची भूमिका व माझे साहित्य चिंतन, आजचे आपले अस्वस्थ वर्तमान, कलावंताची अभिव्यक्ती व व्यापक सांस्कृतिक स्वातंत्र्य, मराठी भाषेच्या विकासाची भावी दिशा, वाचन संस्कृती वाढविण्यासाठीची नीलप्रत, बृहन्महाराष्ट्राचे प्रश्न व उपाय योजना आणि समारोपाचे विवेचन अशी आठ प्रकरणे आहेत. त्यापैकी अस्वस्थ वर्तमान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन प्रकरणांवरच (साधारण साडेचौदा पानं) प्रकाशझोत पडला. उर्वरित साडेसदतीस पानांमध्ये त्यांनी जे मांडलं, ते फारसं उपयोगी नव्हतं किंवा तेवढी दखल घेण्याजोगं नव्हतं? काय अर्थ लावायचा? त्यांची साहित्यविषयक, वाचन-संस्कृतीविषयक भूमिका एवढी अदखलपात्र का ठरावी?

राजा कुठे, कसा चुकतो आहे, त्या चुका कशा सुधारता येतील, ह्याबद्दल देशमुख ह्यांनी केलेल्या विवेचनाबद्दल बरंच काही लिहून आलं, येत राहील. वर्तमानामुळे ह. ना. आपटे यांच्या काळ तर मोठा कठीण आला.. या दीर्घकथेची आठवण आल्याचं त्यांनी नमूद केलं. व्यवस्था माणसाचा आवाज दाबू पाहते, तेव्हा तो आवाज बनणं लेखकाचं काम असतं, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वच काळातील राजांबद्दल बोललो असं नंतर सांगणाऱ्या देशमुख यांनी आजचं अस्वस्थ वर्तमान असा वर्तमानकालीन उल्लेख करणं सूचक आहे. काही निवडक घटना (ठळकपणे) मांडून त्यावरून निष्कर्ष काढणं, हे काही नवं नाही. अध्यक्षीय भाषण त्याचंच निदर्शक आहे.

महात्मा गांधींची गायीबद्दलची भूमिका विसरले?
गो-हत्याबंदीचा उल्लेख करताना त्यांनी (स्वातंत्र्यवीर) सावरकरांच्या गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे या विधानाचा दाखला दिला. गुजरातच्या भूमीत बोलताना महात्मा गांधी यांच्या विविध विधानांची उदाहरणं देताना त्यांची गायीबद्दल काय भूमिका होती, याकडे देशमुख यांचं लक्ष गेल्याचं दिसत नाही. 

महात्मा गांधी लिहितात - THE COW is a poem of pity. One reads pity in the gentle animal. She is the mother to millions of Indian mankind. Protection of the cow means protection of the whole dumb creation of God. The ancient seer, whoever he was, began with the cow. The appeal of the lower order of creation is all the more forcible because it is speechless. (YI, 6-10-1921, p. 36)  (संदर्भ : http://www.mkgandhi.org (Comprehensive Website by Gandhian Institutions-Bombay Sarvodaya Mandal & Gandhi Research Foundation)). अर्थात महात्मा गांधी यांनी असंही लिहिलं आहे की, I would not a kill a human being for protection a cow, as I will not kill a cow for saving a human life, be it ever so precious. असो! प्रश्न निवडक व सोयीच्या विधानांचा आहे.

देशमुख ह्यांनी मराठवाड्यातल्या गंगा-जमनी संस्कृतीचा उल्लेख केला. नगरला नोव्हेंबरमध्ये झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे ह्यांनीही या संस्कृतीचं मोठेपण व गरज ठाशीवपणे मांडली होती. वडोदऱ्याच्या संमेलनात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ह्यांचा सविस्तर परिचय करून देताना ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ काय म्हणाले, ह्याकडेही लक्ष वेधलं पाहिजे. ते म्हणाले, हैदराबादचा निजाम मराठवाड्याचे इस्लामीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. (मराठी) भाषेची गळचेपी सुरू होती. हा मुस्लिमबहुल प्रांत असल्याचे निजामाला सिद्ध करायचे होते.

चपळगावकरही म्हणाले, ‘‘मराठी वाङ्मयाची जी आवड निर्माण झाली, त्याचं खरं श्रेय मी निजामाला देतो. निजामाने मला पाचवीच्या वर्गातही मराठी शिकू दिलं नाही. ह्या घुसमटलेल्या वातावरणामुळे मराठी वाङ्मयाचे विशेष प्रेम उफाळून आले.’’ कोणत्या संस्कृतीबद्दल देशमुख बोलत होते, की नरहर कुरुंदकर यांनी म्हटल्याप्रमाणे प्रश्न असल्याचंच नाकारत होते? त्यामुळेच त्यांचं हे (गाजलेलं) भाषण पॉलिटीकली करेक्ट भूमिकेचं आहे, असंच म्हणावं वाटतं.

ते राजा आणि आम्ही प्रजा
लोकशाही स्वीकारून आता ७० वर्षं झाली. पण राजा आणि प्रजा या भूमिकेतून आपण अजूनही बाहेर पडत नाही, हेही या भाषणावरून दिसतं. सरकार म्हणजे राजा आणि आपण त्यावर अवलंबून असलेली सर्वसामान्य प्रजा; राजारूपी सरकारने स्वातंत्र्य द्यावे आणि आम्ही ते उपभोगावे अशीच आपली मनोभूमिका रूपकाच्या स्वरूपातही का असावी? अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतानाच अध्यक्षांचे हे भाषण महामंडळाने सेन्सॉर न करता प्रसिद्ध केल्याचा उल्लेख झाला, हे लक्षणीय आहे. म्हणजे सेन्सॉरशिप फक्त राजकीय सत्ताधाऱ्यांची असते असं नाही, तर साहित्य संस्थेची सत्ता भोगणाऱ्यांचीही असते. त्याबद्दलही कान टोचले जावेत.

आणखी दोन भाषणं
उद्घाघटनाच्या कार्यक्रमास दोन ज्येष्ठ गुजराती साहित्यिक उपस्थित होते. उद्घाटक या नात्याने ज्ञानपीठचे मानकरी डॉ. रघुवीर चौधरी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सीतांशु यशश्चंद्र. त्यांची भाषणेही महत्त्वाची होती. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हापासून मराठीचा सतत विकास सुरू आहे, असं सांगताना डॉ. चौधरी ह्यांनी सयाजीराव महाराज, आचार्य विनोबा भावे, दिलीप चित्रे, विश्वनाथ नरवणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रकाश भातंब्रेकर आदींच्या कामाचं महत्त्व आवर्जून नोंदविलं. शंकराचार्यानंतर देशभर फिरले ते आचार्य विनोबा भावेच, असंही त्यांनी सांगितलं.

भारतीय भाषा अस्मितेच्या रुग्ण आहेत, असं डॉ. यशश्चंद्र म्हणाले. आपल्याला मराठी फार आवडते, याचं कारण म्हणजे ही भाषा बलिष्ठ आहे. मराठी साहित्यात समता आहे, असं त्यांनी कौतुकानं सांगितलं.

संमेलनाचे अध्यक्ष किंवा उद्घाटक यांची भाषणं ऐकण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यबाहुल्यामुळे वेळ नव्हता. संमेलनाचा निधी दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्यांनी टाळ्या मिळविल्या. एरवी त्यांच्या भाषणात दम नव्हता. मराठीतील साहित्य कालसुसंगत आहे, असं विधान त्यांनी कशाच्या जोरावर केलं, कुणास ठाऊक. खरं म्हणजे मराठी अभिजात आहेच!’, कुठल्याही प्रकारचं आव्हान मराठी पेलू शकते, मराठी विद्यापीठाची मागणी रास्त आहे. आम्ही तिचा सकारात्मक विचार करू, भाषा वादाचा नाही, तर संवादाचा विषय असतो आदी विधानं निव्वळ टाळ्याखाऊ होती.

तुलनेने मंत्री विनोद तावडे ह्यांचं भाषण चांगलं झालं. मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी माणूस हे वेगळे-स्वतंत्र विषय आहेत. त्या तिन्हींसाठी वेगवेगळ्या प्रयत्नांची गरज असून, तसे ते केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

विसंगतीवर अचूक बोट
सरकारचे कान टोचणारे अध्यक्षीय भाषण आणि खुल्या अधिवेशनातील सारे ठराव ह्या ना त्या सरकारला काही तरी मागणारे, विनंती करणारे असतानाच निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ह्यांनी मुलाखतीत वर्तमानातील विसंगतींवर अचूक बोट ठेवलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भोगण्यासाठी काही किंमत द्यावी लागते, हेच माणसांना उमगलं नाही, दडपणं वाढतात तेव्हा साहित्यातला उपरोध वाढत जातो, लेखकाच्या मनात कोणतीही वाङ्मयबाह्य अपेक्षा निर्माण झाली की, त्याचं लेखकपण संपतं. त्याचं स्वातंत्र्य टिकायचं असेल, तर राजकीय महत्त्वाकांक्षा नकोत, स्वार्थत्यागी माणसाची कदर केली जाईल, याची आज शाश्वती नाही, आम्ही पुरोगामी इतके ठाम की, दुसऱ्याचे ऐकून घेत नाही हे त्यांचं म्हणणं लख्ख आरसा दाखविणारं होतं.

डॉ. रसाळ व संपादक प्रशांत दीक्षित ह्यांनी घेतलेली ही मुलाखत काहीशी समांतर रुळांवर चालली. मुलाखत घेणाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवला. डॉ. रसाळ यांनी दीक्षित ह्यांना फारसं बोलू दिलं नाही आणि एक-दोन वेळा तर त्यांचे प्रश्नच गैरलागू ठरवले.

उदारमतवादाची गरज सांगताना चपळगावकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य राबविण्यासाठी उदारमतवादी लोकशाही प्रवृत्ती लोकांना शिकविली पाहिजे. उदारमतवादी तत्त्वांना आम्ही इतिहासात फारसं महत्त्व दिलं नाही. आम्ही राजा-प्रजा (दाता-याचक) याच भूमिकेत राहिलो.’’ अनुदानावर डोळा ठेवून, किंबहुना तेवढ्याचसाठी उभ्या राहणाऱ्या सार्वजनिक संस्थांकडेही त्यांनी अंगुलीनिर्देश केला. ही मुलाखत अर्ध्याहून अधिक झाल्यावर चं. वि. महेता सभागृहात गर्दी वाढू लागली. ती प्रतिभावंतांचा सहवास मिळविण्यासाठी होती, हे यथावकाश स्पष्ट झाले. एका साहित्य संस्थेच्या पदाधिकाऱ्याने दिलेली माहिती खरी असेल, तर ती धक्कादायक आहे - पुढच्या कार्यक्रमासाठी मुलाखत लवकर आटोपती घ्या, असा निरोप थेट व्यासपीठावरच देण्यात आला! उदारमतवादाच्या अभावाचे थेट प्रत्यंतर!!

मनोहर मेजवानी
संमेलनात दुसऱ्या दिवशी मान्यवरांचा सत्कार होता. सत्काराला उत्तर देताना श्याम मनोहर ह्यांनी केलेले भाषण म्हणजे संमेलनातली आणखी एक मेजवानी. त्यांनी आधी टिपण वाचून दाखविलं. त्याची प्रत खरं म्हणजे उपलब्ध करून द्यायला हवी होती. त्यांच्या मुक्त चिंतनातील काही ठळक मुद्दे -

- शास्त्रांप्रमाणेच साहित्यालाही तत्त्व आहे. ज्ञान म्हणजे काय याची चर्चा समाजात/साहित्यात होते काय? ज्ञान केवळ मिळवायचे नसते, तर निर्माणही करायचे असते. ते सोपे असते, असा भ्रम निर्माण करून कसे चालेल?
- गणिती, लेखक, कवी वगैरे हवेत अशी समाजाची कळकळ आहे काय? शेतकरी व साहित्यिक आपापल्या कामातून जगतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय?
- राजकारणी भाषणात कधी कविता-कादंबरीचा उल्लेख का करीत नाहीत? ह्याचा अर्थ ते समाजात खोलवर पोहोचले नाही किंवा मराठी साहित्य तेवढ्या दर्जाचे नाही.
- संस्कृतीसभ्यता या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. नीट जगण्याची प्रेरणा, कुतुहल आणि या जीवनाचा अर्थ काय, हे शोधण्याची वृत्ती म्हणजे संस्कृती. नीट जगण्याची व्यवस्था म्हणजे सभ्यता. जगण्यातल्या अडचणी कादंबरी-कवितेतून येतात. सभ्यतेचे विषय Fictionमध्ये का घ्यायचे नाहीत?
- जुनं ३०-४० वर्षांपूर्वीचं वाचूच नये असं आहे का? मराठी किंवा भारतीय भाषांमध्ये कालातीत असं काहीच निर्माण होत नाही का? मराठी (आणि भारतीय) वाङ्मयाला इतिहास आहे; परंपरा नाही.
- आपल्या कुटुंबांमध्ये ज्ञानाला स्थान नाही. संशोधनाचं काम दिवसातल्या २४ तासांचं आहे. आपल्या सभ्यतेतला एक कोपरा ज्ञानासाठी सतत जिवंत ठेवा. महत्त्वाचे गहन प्रश्न सामान्यांपासून सर्वांनी धरून ठेवले पाहिजेत.

कथेची व्याख्या 
कथा, कथाकार, कथानुभव हा कार्यक्रम रंगविण्याचं श्रेय सूत्रसंचालक नीलिमा बोरवणकर यांना! त्यांनी मंगला गोडबोले, गुजराती लेखिका हिमांशी शेलत व मोनिका गजेंद्रगडकर ह्यांना छान बोलतं केलं. कथेची व्याख्या काय, या मूलभूत प्रश्नाला तिन्ही लेखिकांनी सविस्तर उत्तर दिलं.

जयवंत दळवी आवडते लेखक असलेल्या हिमांशीदीदी म्हणाल्या, ‘‘जीवनातलं किती तरी वास्तव मराठी कथांतून वाचायला मिळालं. आपली कहाणी सांगता-लिहिता येत नाही, ती सांगायला घाबरतात, अशा व्यक्तींच्या मौनाला वाचा फोडते, ती कथा अशी माझी व्याख्या आहे.’’ छोट्या जागेत, मर्यादित पात्रांमध्ये आयुष्याचा एखादा प्रसंग झळझळीत करणे ही कथेची ताकद असते, असं सांगून गोडबोले म्हणाल्या, ‘‘कथा म्हणजे भिंगाखाली धरलेला आयुष्याचा छोटा तुकडा! हे भिंग म्हणजे लेखकाची नजर असते.’’ दुःखाचा अर्थ शोधणं, ही माझी कथा. आयुष्याचं अर्थसूचन करणारी कलाकृती म्हणजे कथा, असं गजेंद्रगडकर म्हणाल्या.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रसाधनाच्या १२ खंडांचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमासाठी महेता सभागृह ओसंडून वाहत होतं. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या संकल्पनेतून हे मोठं काम साकार झालं.

खंत दूर झाली
त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानताना राजमाता शुभांगिनीराजे म्हणाल्या, ‘‘महाराजांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली नाही, ही आमची खंत होती. या खंडांमुळे त्यांची ओळख देशभर होईल.’’ छत्रपती शिवरायांचे काम सयाजीरावांनी २०० वर्षानंतर पुढं चालवलं, असं सांगताना त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारु।याचा दाखला दिला.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रबोधिनीत हे खंड पाठविण्याची सूचना तावडे यांनी केली. आदर्श कारभाराचा ध्यास घेतलेल्या महाराजांनी कोल्हापूरला १९३२मध्ये झालेल्या संमेलनात केलेल्या भाषणाची ध्वनिफित ऐकवण्यात आली. महाराजांच्या स्पष्ट शब्दोच्चारातून त्यांचे ठाम विचार ऐकायला मजा आली.


लेझिम खेळणाऱ्या पोरी... ग्रंथदिंडीतला उत्साह.
..........................


संमेलनाच्या आयोजनाबद्दल फार काही तक्रारी झाल्याचं ऐकायला मिळालं नाही. अदबीनं बोलणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची फळी मदतीस सदैव सज्ज होती. उद्घाटन-समारोपाचा कार्यक्रम अकारण लांबला. त्यामुळे दोन्ही वेळा संमेलनाध्यक्षांचं भाषण खूप उशिरा झालं. हरिश्चंद्र थोरात यांचा सहभाग असलेला टॉक शो केवळ दुसऱ्या सभागृहात ठेवल्यामुळे काहीसा दुर्लक्षित झाला.

मराठीच्या उपयोजित वापराबद्दल संमेलनात कार्यशाळा झाल्या. त्याही छोट्या वर्गखोलीत पार पडल्या. संमेलनस्थळी न आलेली आदल्या दिवशीची ग्रंथदिंडी थाटात पार पडली. त्यातला सहभाग उत्साही होता. आठ दशकांनंतर आपल्या शहरात झालेलं हे संमेलन उत्सवी-उत्साही होतं की, काही देणारं होतं, याचं नेमकं उत्तर बडोदेकरांकडूनच अपेक्षित आहे.
---
(शीर्षकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ४ नोव्हेंबरचा लेख पाहता येईल.)
---
#साहित्य_संमेलन #वडोदरा #मराठी #लक्ष्मीकांत_देशमुख #श्रीपाद_भालचंद्र_जोशी 
#सयाजीराव_महाराज #न्यायमूर्ती_चपळगावकर #अध्यक्षीय_भाषण #अभिव्यक्ती_स्वातंत्र्य
#मराठवाडा #निजाम #श्याम_मनोहर #राजा_तू_चुकतो_आहेस

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...