Tuesday, 31 December 2019

'खिडकी' ठरली नंबर एक!'खिडकी' सताड उघडली, त्याला साडेपाच वर्षं झाली आता. लोकसभेच्या मागच्या निवडणुकीनंतर कधी तरी. लिहिण्याची कोंडी होत होती, तेव्हा आपलं असं काही हक्काचं सुरू करावं वाटलं. त्या काळात छोटी-मोठी टिपणं/लेख, 'पद्यासारखं वाटणारं गद्य' शीर्षकाखाली आम आदमीच्या कविता असं अधूनमधून लिहीत होतो. ते मित्रांना, ओळखीच्या मंडळींना इ-मेलने पाठवलं जाई. 'अहो दादा! हे तुम्ही छापत का नाही? असं वाया जाऊ देऊ नका', असा सल्ला एका लेखक-कवीनं आपलेपणानं दिला होता. वर्तमानपत्रात काम करीत असूनही छापण्याची अडचण येते, हे कारण काही त्याला पटलं नाही.

सामाजिक माध्यमाचं व्यासपीठ तोवर चांगल्या प्रमाणात खुलं झालं होतं. (जाता जाता : 'सोशल मीडिया'चं भाषांतर 'समाज माध्यम' असं करणं चुकीचं आहे, हे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कधी तरी लिहिलं होतं. 'सामाजिक माध्यम' असा शब्द त्यांनी सुचविला आहे.) फेसबुक नियमित उघडतो. पण तिथं दीर्घ कुणी वाचतं का नाही, हे कळत नव्हतं. तिथं 'मित्रां'ची संख्या मर्यादित. त्यामुळे मोठ्या संख्येनं वाचकांपर्यंत कसं जायचं, हा प्रश्नच.

अशात एकदा मधुकर टोकेकर यांची इ-मेल पाहिली. आपल्याला वाचायला, ऐकायला जे जे काही आवडलं आहे, ते ओळखीच्या मंडळींना इ-मेलने पाठवायची त्यांची सवय. त्यांच्याशी अजून तशीही ओळख झालेली नाहीच. तर त्यांच्या एका इ-मेलमध्ये 'मैत्री २०१२' ब्लॉगचा दुवा आला. ('मैत्री'ची संपादक मंडळी ब्लॉगचा उल्लेख आवर्जून अनुदिनी करतात.) त्या अनुदिनीला भेट दिली. तिथं मोठी मंडळी आणि वैविध्यपूर्ण साहित्य होतं. धाडस करून संपादक मंडळातील श्री. मंगेश नाबर यांना एक टिपण (बहुतेक पद्यासारखं वाटणारं गद्य!) पाठविलं. त्यांनी ते लगेच प्रसिद्धही केलं.

'मैत्री'चे वाचक दूरदूरचे; वयानं, शिक्षणानं, अनुभवानं आणि ज्ञानानंही मोठे. त्यांना आपण लिहिलेलं आवडत आहे, हे प्रतिक्रियांवरून समजलं. मग तिथेच लिहू लागलो. आम आदमीच्या एक-दोन कविता तर खास श्री. नाबर यांच्या सांगण्यावरून लिहिल्या. तिथं लिहीत असतानाच जाणवलं की, आपल्याला हवं ते माध्यम हे आहे.

'ब्लॉग'बद्दल अगदी अडाणी नसलो, तरी फार माहितीही नव्हती. तो सुरू करणं तसं सोपंच आहे. पण तांत्रिक बाबींचा बागुलबुवा करण्याची सवय नडली. त्यामुळं ते काम पुढं ढकलत राहिलो. शेवटी एकदाचं धाडस केलं. तरुण पत्रकार केदार भोपे मदतीला आला आणि त्यानं तासाभरात ब्लॉग सुरू करून दिला. ब्लॉग सुरू करावा असं वाटण्याचं श्रेय 'मैत्री'ला काही प्रमाणात निश्चित जातं.

मग लिहीत राहिलो. काही जुनं त्यावर टाकत राहिलो. पण हे वाचकांपर्यंत पोहोचणार कसं? इ-मेलने कळवू लागलो. ज्यांना इ-मेल पाठवत होतो, त्यातले खूप जण अनोळखी होते. त्यातल्या काहींचा नंतर चांगला (इ-)परिचय झाला; काहींशी फोनवर बोलणंही झालं. 'अशा इ-मेल यापुढे पाठवू नका,' 'तुमच्या मेलिंग लिस्टमधून माझं नाव काढून टाका' असं काहींनी कळवलं. (त्यांना पुढे कधीच इ-मेल जाणार नाही, याची काळजी घेतली.) पण बऱ्याच जणांनी हा इ-मेलचा मारा सहन केला; भले ते ब्लॉगला भेट देत असोत वा नसोत! काही वाचकांनी 'आपली ओळख आहे का? माझा इ-मेल कुठून मिळाला?' असंही विचारलं. कळविल्यावर मग त्यांची काही तक्रार राहिली नाही. पुढे मग व्हॉट्सॲपचा वापर करीत नव्या लेखनाचे दुवे पाठवित राहिलो.

मध्यंतरी एका सणकीत ब्लॉग सहा महिने बंद ठेवला. त्याची गंमत 'पासवर्डपायी परवड!' लेखात लिहिली आहेच. (khidaki.blogspot.com/2018/09/password.html) त्यातून बाहेर पडलो आणि नव्यानं लिहिणं चालू केलं. या ब्लॉगमुळं अनेक मोठ्या माणसांपर्यंत, चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचता आलं. त्यांची दादही मिळाली. असे वाचक बरेच आहेत. 'चांगलं मराठी लिहीत असल्याबद्दल' काहींनी कौतुकही केलं. वाचक देत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल एका मित्रानं कौतुकमिश्रित आश्चर्य व्यक्त केलं! अशा सगळ्याच वाचकांचं नाव घेणं शक्य नाही. वृत्तपत्रात काम करीत असताना बातमीतील नावांबद्दल आग्रह धरणाऱ्यांना सांगत असे - ज्यांची नावं आली त्यांना त्यात फारसं स्वारस्य नसतं; पण चुकून एखाद्याचं नाव विसरलं, तर तो खट्टू होतो!

तर वर्ष संपताना हे पाल्हाळ लावण्याचं खास कारण आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 'खिडकी'नं दोन टप्पे गाठले. हे दोन्ही टप्पे गाठता आले, ते ब्लॉग वाचणाऱ्या तुम्हा सगळ्यांमुळेच.

'एबीपी माझा' दूरचित्रवाणी वाहिनी मराठी ब्लॉगरसाठी दर वर्षी 'ब्लॉग माझा' स्पर्धा घेते. या स्पर्धेत भाग घेण्याचं एका मैत्रिणीनं दोन वर्षांपूर्वी सुचविलं. स्पर्धेत भाग कसा घ्यायचा, हे शोधलं. आहे की अजून मुदत, असं म्हणून लगेच प्रवेशिका भरायचा कंटाळा केला. पुन्हा लक्षात आलं तेव्हा त्याची मुदत संपली होती. त्यानंतर मागच्या वर्षी अचानक या स्पर्धेची आठवण झाली. शोधाशोध केल्यावर कळलं की, स्पर्धेत भाग घ्यायची मुदत कालच संपली!

दोन वर्षांचा हा अनुभव असल्यानं यंदा ऑक्टोबरच्या शेवटी, नोव्हेंबरच्या सुरुवातीला स्पर्धेची घोषणा पाहत होतो. पण काहीच सापडलं नाही. यंदाही गाडी चुकली, असं समजून गप्प राहिलो.

मुलानं २ डिसेंबरला स्पर्धेची माहिती कळविली. त्यानं दिलेला दुवा उघडून पाहिला, तर स्पर्धेत भाग घेण्याचा तो शेवटचा दिवस होता. हुश्श वाटलं! त्याच दिवशी ऑनलाईन नोंदणी केली.

त्यानंतर अवघ्या १० दिवसांनी, म्हणजे दि. १२ डिसेंबरच्या रात्री 'एबीपी माझा'मधून फोन आला - 'अभिनंदन! 'ब्लॉग माझा' स्पर्धेत तुमच्या ब्लॉगला पहिला क्रमांक मिळाला...' मुंबईच्या 'कोर्टयार्ड मॅरियट'मध्ये १९ डिसेंबरला पारितोषिक वितरण झालं. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारलं. बाकीचे तरुण विजेते पाहिल्यावर वाटलं की, आपण शिंगं मोडून वासरांत शिरलो की काय!

'खिडकी नंबर एक' ठरल्याची बातमी तुम्हाला सांगायलाच हवी ना! त्यासाठी तर वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त निवडला.

आणखी एक, याच आठवड्यात ब्लॉगच्या वाचकांच्या संख्येनं तीस हजारांचा टप्पा ओलांडला. पाच वर्षांतील पाऊणशे लेखांसाठी ही संख्या फार मोठी नाही, हे तसं खरं आहे. पण यातले बहुसंख्य वाचक नियमित आहेत, हेही खरं. ते मनापासून वाचतात. दूरदेशी असलेले भारतीयही 'खिडकी' उघडून डोकावतात, याचा आनंद वाटतो.

'तुम्ही थोडं अनियमित लिहिता. प्रमाण वाढवलं पाहिजे,' अशी 'तक्रार' एका ज्येष्ठ वाचकानं अलीकडेच केली. त्यात तथ्य आहेच. पण ज्या विषयांवर मोठ्या प्रमाणात लिहिलं जातं, ते विषय टाळतो. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल, महाराष्ट्रात महिनाभर रंगलेलं राजकीय नाट्य यावर इच्छा असूनही लिहिलं नाही. त्यात फार वेगळं काही असणार नाही, हे जाणूनच ते केलं.

संकल्प वगैरे नाही. पण नव्या वर्षात अधिक लिहिण्याचा, चांगलं लिहिण्याचा, वेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न नक्की करणार!

'खिडकी' उघडल्यावर हवेची सुखद झुळूक आली पाहिजेच ना!!

Thursday, 12 December 2019

अस्वस्थ ते आश्वस्त!जागतिकीकरण झालं, खुली अर्थव्यवस्था आली आणि त्या पाठोपाठ कार्यालयीन कामकाजात संगणक आले. त्यानं खूप काही घडवलं आणि बिघडवलं. ठिकठिकाणची कार्यालये 'स्मार्ट' झाली. तिथली कामाची पद्धत बदलली, माणसांची गरज कमी झाली. असणारी माणसं या साऱ्याला अनुरूप असतीलच असं नाही. तसं त्यांनी असायला हवं, हे खरं. काम करणारी माणसंही 'स्मार्ट' असणं गरजेचं झालं. नव्या, आधुनिक व्यवस्थेशी जुळवून घेण्यास कुरकुर करणारी, ते न जमणारी माणसं बाहेर फेकली गेली. व्यवस्थेतून काही जण स्वतःहून बाहेर पडले, काही जण बाहेर काढले गेले आणि काहींना 'गोल्डन हँडशेक' देऊन निरोप देण्यात आला. असं सारं बदलत असतानाही नव्या व्यवस्थेत स्वतःला कुठेच बसविता न येणारी आणि तरीही 'चुकून' टिकून राहिलेली माणसं असतातच. त्यांचं काय होतं? या बदलामुळे अस्वस्थ असलेले, तरीही चाकोरी सोडता न येणारे कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, साहेब काय करतात?

प्रसिद्ध पत्रकार-चित्रकार-लेखक प्रकाश बाळ जोशी अशाच एका मोठ्या अधिकाऱ्याची कथा सांगतात. ती असते त्याची लढाई - नोकरीची, ती टिकवून ठेवण्याची, त्या जगातील अस्तित्वाची. 'प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा' शीर्षकाचा २९ कथांचा ३५८ पानांचा हा दगणदणीत संग्रह आहे. 'भाष्य प्रकाशन'ने २७ मार्च २०१५ रोजी तो प्रकाशित केला. त्यातील कथा १९७३ ते १९९९ या कालावधीत लिहिलेल्या. बऱ्याच विविध अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि काही अप्रकाशित. त्यातीलच ही 'विनयभंग' कथा.

मुंबईत मुख्यालय असलेल्या सेमटेल कंपनीत 'डीके' अधिकारी आहेत. त्यांचं आडनाव 'रंगाचारी' असल्याचा उल्लेख फार नंतर येतो. नव्या जमान्यात त्यांच्याही कंपनीनं कात टाकलेली, कार्यालय बदललेलं. डीके चांगल्या पदावर - विभागीय व्यवस्थापक आणि चांगला पगार घेणारे. अडचण एकच - सध्या काम नाही. नुसतं बसून पगार घ्यायला त्यांना छान वाटतं. पण त्याच वेळी नोकरी टिकविण्याची धास्तीही मनात. अशा अडनिड्या वयात चांगलं बसलेलं रुटीन सोडून दुसरी, कमी पगाराची नि जास्त कामाची नोकरी कोण शोधणार? आणि कशासाठी? काम नसलेल्या डीके यांना मग नकोशा गोष्टी जाणवतात. उदाहरणार्थ कार्यालयात येणारा कुबट वास. त्याची तक्रार केल्यावर बॉस उडवून लावतो. सहकाऱ्यांकडे बोलावं, तर ते लक्ष देत नाहीत. रंगनाथन मात्र फटकळपणे बोलतो, 'तुम्हाला काही कामधंदा नाही. त्यामुळे हे असलं सुचतं. काही तरी काम लावून घ्या...' हे बोलणं लागट असलं, तरी खरं असतं. त्यामुळे हिरमोड होतो त्यांचा.

सगळं बदललं आहे, नवीन व्यवस्थापन आलं आहे, साहेबांसकट सगळ्यांना हजेरीसाठी कार्ड पंच करावं लागतं. एवढ्या साऱ्या बदलात आपल्याला कुणी हात लावलेला नाही, याची जाणीव डीके यांना आहेच. नवीन जबाबदारी अंगावर पडेपर्यंत आहे हेच ढकलत न्यावं, हे त्यांनी मनोमन मान्य केलं आहे. अशाच एका संध्याकाळी साहेब सांगतात, 'जाताना भेटून जा.' काही तरी काम मिळणार, या भावनेनं डीके सुखावतात. त्याच वेळी दुसरीकडे शंका - 'कशासाठी बोलावलं असेल? आपला नंबर लागतो की काय?'

बॉस थोडक्यात काम सांगतात. कंपनीच्या औरंगाबाद कार्यालयातील एका मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनं घोळ घालून ठेवलेला असतो. त्यानं 'न्यू ईयर इव्ह'ला पार्टीत मित्राच्या पत्नीचाच विनयभंग केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल असते. त्याची बातमी स्थानिक दैनिकांमध्ये प्रसिद्ध होते. नेमकं त्याच काळातं अजिंठा-वेरूळ पाहायला गेलेल्या कंपनीच्या एका संचालकाच्या कानावर हे सारं येतं. अस्वस्थ होऊन ते कंपनीच्या जनरल मॅनेजरकडं बोलतात. हा जो बदलापूरकर नावाचा एमआर आहे, त्याला काढूनच टाका नोकरीतून, असं फर्मान कंपनीच्या चेअरमनसाहेबांनी काढलेलं. पण असं एकदम करता येत नाही. व्यवस्थेचे म्हणून काही नियम असतात. त्या नियमांनुसार जाऊन, अंतर्गत चौकशी करूनच निर्णय घ्यावे लागतात. न्याय होतो की नाही, ही बाब वेगळी; पण न्यायाची प्रक्रिया पार पाडली गेली, हे दाखवावं लागतं.

आणि बॉस डीके यांच्यावर नेमकी हीच जबाबदारी टाकतात. 'कंपनी काही तरी करते आहे,' हे दाखविण्याची जबाबदारी डीके यांची. 'माझा लेबर-लॉचा काही अभ्यास नाही,' असं डीके सांगतातही. मग एकदम त्यांच्या मनात येतं - कधी नाही ते आपल्याला काही काम सांगितलं जात आहे आणि आपण ते आडवळणाने टाळण्याचा प्रयत्न करतो आहे, असं दिसणं काही बरोबर नाही. काम नाही, ते मिळालं आहे. म्हणजे कंपनीसाठी आपलं अस्तित्व आहे. ही संधी सोडायला नको. बॉसने बजावलेलं असतंच - महत्त्वाचं आहे काम; अजून काही घोळ वाढायला नको.

डीके यांना बदलापूरकर आठवतो. औरंगाबाद विभाग त्यांनी पूर्वी संभाळलेला आहे. तिथली माणसंही ओळखीची आहेत. बॉसनं दिलेली फाईल ते बारकाइनं वाचतात. फार काही नसतं त्यात - गुन्ह्याच्या बातमीचं कात्रण. काही मुद्दे काढतात. मग एका वकील मित्राला फोन करतात - अशा प्रकरणाची चौकशी कशी करायची हे विचारण्यासाठी. विरंगुळा म्हणून दुसरा मित्र सुधाकरबरोबर 'बार'मध्ये बसल्यावर डीके म्हणतात, जाऊन येतो औरंगाबादला. एक-दोन दिवसांत मिटवून टाकतो प्रकरण. आलेलं काम पटकन संपवावं आणि मोकळं व्हावं, असा त्यांचा विचार.

सुधाकर म्हणतो, ''जेवढी लांबवता येईल, तेवढी चौकशी लांबव. नाही तरी तुला दुसरं काही काम नाही. या वयात कुठं नोकरी शोधणार?'' डीके कार्यालयात बसून दिवसभर फाईल वाचतात. काय करायचं याचे नेमके मुद्दे एका कागदावर काढतात - 'लिप्टन'मधील पारशी साहेबाने लावलेली सवय.

चौकशीसाठी डीके यांचा औरंगाबाद दौरा. बॉसची रीतसर परवानगी घेऊन. विमानाने जाणे, थ्री-स्टार हॉटेलमध्ये राहणे. कोंदट वास येणाऱ्या कार्यालयापेक्षा बरं वाटतं त्यांना हे. औरंगाबादच्या कार्यालयात थेट जाणं टाळतात. तशी कल्पनाही दिलेली नसते त्यांनी. ओळखीच्या आमदाराकडून पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याशी संपर्क साधलेला असतो. दरम्यानच्या काळात बदलापूरकरविरुद्ध ज्यानं फिर्याद दिलेली असते, त्या धनराज नहारशी संपर्क साधतात डीके. मिटवता येतं का, ते पाहायला. काम केल्याचं त्यांनाही दाखवायचं असतंच की.

पोलिस इन्स्पेक्टर जामकर डीके यांना भेटायला थेट हॉटेलात येतात. सगळी केस व्यवस्थित समजावून सांगतात. बदलापूरकर आणि नहार मित्र. नव्या वर्षाच्या स्वागताच्या रात्री बायकासंह पार्टीला जातात. तिथे यथेच्छ बीअर पितात. बदलापूरकरचं एका वेटरशी भांडण झाल्यावर चौघेही नहारच्या घरी जातात. तिथे पुन्हा पेयपान. अशातच काही तरी गडबड होते आणि नहारची बायको बदलापूरकरविरुद्ध विनयभंगाची फिर्याद देते भररात्री. तिला दुजोरा द्यायला बदलापूरकरचीच बायको! आरोपीची बायको फिर्यादीच्या बाजूने असल्याने पोलिसांना गुन्हा नोंदविणं भागच पडतं. आपण काय घोळ घातला, हे तिच्या दुसऱ्या दिवशी लक्षात येतं आणि वकिलाकरवी ती सुधारित प्रतिज्ञापत्र देते.

एफआयआर वाचून डीके यांच्या फार काही लक्षात येत नाही. ते संध्याकाळी औरंगाबाद विभागीय कार्यालयात जातात. व्यवस्थापक इनामदार आश्चर्यात पडतात. डीके अचानक, काही न कळवता-सांगता इथे कसे? आणि आधी ऑफिसात न येता, हॉटेलात उतरून. इनामदार अस्सल अधिकारी असतात. खालचे वर काही कळू द्यायचे नाही आणि वरच्यांशी खालचे कोणी संपर्कात येऊ द्यायचे नाही. आपले महत्त्व कसे अबाधित राहिले पाहिजे. आपल्याला विचारल्याविना खालची-वरची साखळी सांधली जाणे अशक्य व्हावे, ही त्यांची कार्यपद्धती. 'बदलापूरकरचं प्रकरण काय आहे?' असं डीके यांनी विचारल्यावर इनामदारांना नाही म्हटले तरी धक्काच बसतो. हेडऑफिसपर्यंत हे प्रकरण गेले? तोवर त्यांना विश्वास असतो की, इथल्या इथे मिटून जाईल हे प्रकरण. म्हणून तर त्यांनी मुख्य कार्यालयाला त्याबाबत काही कळवलेले नसते. पण चेअरमन, संचालक यांनी यात कसे लक्ष घातले आहे, हे सूचकपणे सांगून डीके त्यांना हादरवतात.

डीके चौकशीला आल्याची बातमी दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होते. कशी काय आली बुवा बातमी, असा प्रश्न त्यांना पडतो. इन्स्पेक्टर जामकर त्यांना भेटलेले असतात. बातमीचा स्रोत तोच असावा. त्याच बातमीमुळे बदलापूरकर त्यांना भेटायला पत्नीसह हॉटेलात येतो. नोकरी वाचवा असं सांगतो. गयावया करतो. त्याची बायकोही चूक झाल्याचं मान्य करते. 'बायकोसमोर कोणता नवरा दुसऱ्या बाईचा विनयभंग करील?', असा तर्कशुद्ध वाटणारा प्रश्नही विचारते. चौकशी अधिकाऱ्याच्या भूमिकेत जाऊन डीके बदलापूरकरला आवश्यक त्या गोष्टी सांगतात.

औरंगाबादचे काम संपले. आता फक्त कार्यालयात जाऊन बदलापूरकरचा अधिकृत जबाब घेणे आणि तिथून विमानाने परत मुंबई. हॉटेलात सकाळी सांगितलेलीच कथा बदलापूरकर पुन्हा ऐकवतो. त्यातून डीके यांना अधिक काही कळत नाही. 'प्रकरण फारच गुंतागुंतीचं झालंय आता,' असं सांगून ते इनामदार यांना जोराचा धक्का देतात.

विमानात बसल्यावर सवयीने डीके नोटबुक काढतात. दौऱ्याचं फलित मुद्द्यांच्या स्वरूपात लिहू लागतात. एवढी मोठी घटना वरिष्ठ कार्यालयाला न कळवल्याबद्दल इनामदारांची बदली, बदलापूरकरला सस्पेंड करून एप्रिलपर्यंत चौकशी पूर्ण करायची आणि तिसरा मुद्दा त्याची नाशिकला 'पनिशमेंट ट्रान्सफर'.

चौथाही मुद्दा डीके यांच्या मनात असतो. तो नोंदवत मात्र नाहीत ते. धनराज नहार फिर्याद मागे घेईल, असं बदलापूरकरला वाटत असतं. या असल्या प्रकरणामुळे कंपनीची बदनामी होते, हे माहीत असल्याने आल्या आल्या डीके यांनीही त्याच्याशी संपर्क साधलेला असतोच.

पण धनराज नहार माघार घेणार नाही, तडजोड करणार नाही आणि चौकशी चालूच राहील, याची काळजी घेणं हा डीके यांनी न लिहिलेला चौथा मुद्दा असतो. चौकशी चालू राहिली, तरच त्यांच्या कंपनीतील अस्तित्वाला अर्थ असणार होता. त्यासाठी अनुषंगिक गोष्टी करणे भाग आहे. त्यासाठी त्यांना औरंगाबादला वारंवार यावे लागणार. तशी तरतूद त्यांनी करून ठेवलेली असते. दिवसभर कार्यालयात नुसतं बसून काय करायचं, या प्रश्नाला त्यांनी उत्तर शोधलेलं आहे. त्यासाठी त्यांना बदलापूरकर, इनामदार, बॉस आणि अस्वस्थ झालेले कंपनीचे संचालक-चेअरमन यांची मोठीच मदत झालेली.

प्रकाश बाळ जोशी यांची ही दीर्घकथा छापील २६ पानांची आहे. त्यात त्यांचे एक अमूर्त रेखाटणही आहे. त्याची कथेशी नाळ जुळलेली आहे, असं मात्र वाटत नाही. कथानायक डीके यांची अस्वस्थता सुरुवातीच्या भागातून फार छान व्यक्त झाली आहे. बदलती व्यवस्था, त्यातून मध्यमवयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आलेली अस्वस्थता त्यांच्या शब्दांतून पुरेपूर जाणवते. शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका अन्य कथांप्रमाणेच येथेही दिसतात. घडणाऱ्या प्रसंगांनुसार वाचकांना आपल्याबरोबर नेण्यात, उत्सुकता कायम ठेवण्यात ही कथा यशस्वी होते.

आधी काम नाही म्हणून अस्वस्थ असणारे डीके, नंतर काही काम सांगितलं जात आहे, हे समजल्यावर सहज प्रवृत्तीनुसार ते टाळू पाहणारे डीके, पडलीच आहे जबाबदारी तर उरकून टाकू चटकन असं वाटणारे डीके, नंतर या साऱ्याचा अर्थ कळलेले आणि ते आपल्या कंपनीतल्या अस्तित्वाशी किती निगडीत आहे, हे जाणवणारे डीके. हळुहळू बदलत जातात ते. त्यांना आवश्यकच असतं ते. हे सारं बदलतं चित्र लेखकानं अतिशय छान पद्धतीने साकारलं आहे.

आधी काही घडत नाही आणि जेव्हा काही घडू लागते, तेव्हा त्याचे दान आपल्या बाजूने पाडण्यात डीके सारी बुद्धी पणाला लावतात. इनामदार आणि बदलापूरकर यांचा वापर करून ते आपल्या अस्तित्वाला, नोकरीतील आपल्या आवश्यकतेला अर्थ देऊ पाहतात. त्याबद्दल त्यांचा राग येत नाही किंवा त्यांच्या वृत्तीचा तिरस्कारही वाटत नाही. नव्या व्यवस्थेतील अक्राळविक्राळ चक्रात त्यांचे जे काही स्थान आहे, ते भक्कम करण्यासाठी, किमान ते टिकून राहण्यासाठी ते या साऱ्या प्रकरणाचा वापर करून घेऊ पाहतात. रिकामे बसून पगार घेण्यापेक्षा काही तरी काम करतो आहोत, असे कंपनीला दाखवून (आणि मनाला भासवून) डीके आपल्या अस्तित्वाला अर्थ देत राहतात. भावनांचा शब्दबंबाळ आविष्कार, शैलीतील नाट्यमयता असं काहीही नसताना 'विनयभंग'चे नायक डीके अस्वस्थ करून सोडतात, हे नक्की!

(ग्रंथाली कथा परीक्षण स्पर्धेसाठी पाठविलेला हा लेख. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.)

रंग उडालेली, दयनीय 'परी'

  दिवाळी पाडव्याच्या दिवशी तालुका किंवा छोट्या जिल्ह्याच्या पातळीवरच्या कोणत्याही एस. टी. आगारातून सकाळची पहिली बस कशी बाहेर पडायची? विशेषतः...