Tuesday 31 December 2019

'खिडकी' ठरली नंबर एक!



'खिडकी' सताड उघडली, त्याला साडेपाच वर्षं झाली आता. लोकसभेच्या मागच्या निवडणुकीनंतर कधी तरी. लिहिण्याची कोंडी होत होती, तेव्हा आपलं असं काही हक्काचं सुरू करावं वाटलं. त्या काळात छोटी-मोठी टिपणं/लेख, 'पद्यासारखं वाटणारं गद्य' शीर्षकाखाली आम आदमीच्या कविता असं अधूनमधून लिहीत होतो. ते मित्रांना, ओळखीच्या मंडळींना इ-मेलने पाठवलं जाई. 'अहो दादा! हे तुम्ही छापत का नाही? असं वाया जाऊ देऊ नका', असा सल्ला एका लेखक-कवीनं आपलेपणानं दिला होता. वर्तमानपत्रात काम करीत असूनही छापण्याची अडचण येते, हे कारण काही त्याला पटलं नाही.

सामाजिक माध्यमाचं व्यासपीठ तोवर चांगल्या प्रमाणात खुलं झालं होतं. (जाता जाता : 'सोशल मीडिया'चं भाषांतर 'समाज माध्यम' असं करणं चुकीचं आहे, हे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कधी तरी लिहिलं होतं. 'सामाजिक माध्यम' असा शब्द त्यांनी सुचविला आहे.) फेसबुक नियमित उघडतो. पण तिथं दीर्घ कुणी वाचतं का नाही, हे कळत नव्हतं. तिथं 'मित्रां'ची संख्या मर्यादित. त्यामुळे मोठ्या संख्येनं वाचकांपर्यंत कसं जायचं, हा प्रश्नच.

अशात एकदा मधुकर टोकेकर यांची इ-मेल पाहिली. आपल्याला वाचायला, ऐकायला जे जे काही आवडलं आहे, ते ओळखीच्या मंडळींना इ-मेलने पाठवायची त्यांची सवय. त्यांच्याशी अजून तशीही ओळख झालेली नाहीच. तर त्यांच्या एका इ-मेलमध्ये 'मैत्री २०१२' ब्लॉगचा दुवा आला. ('मैत्री'ची संपादक मंडळी ब्लॉगचा उल्लेख आवर्जून अनुदिनी करतात.) त्या अनुदिनीला भेट दिली. तिथं मोठी मंडळी आणि वैविध्यपूर्ण साहित्य होतं. धाडस करून संपादक मंडळातील श्री. मंगेश नाबर यांना एक टिपण (बहुतेक पद्यासारखं वाटणारं गद्य!) पाठविलं. त्यांनी ते लगेच प्रसिद्धही केलं.

'मैत्री'चे वाचक दूरदूरचे; वयानं, शिक्षणानं, अनुभवानं आणि ज्ञानानंही मोठे. त्यांना आपण लिहिलेलं आवडत आहे, हे प्रतिक्रियांवरून समजलं. मग तिथेच लिहू लागलो. आम आदमीच्या एक-दोन कविता तर खास श्री. नाबर यांच्या सांगण्यावरून लिहिल्या. तिथं लिहीत असतानाच जाणवलं की, आपल्याला हवं ते माध्यम हे आहे.

'ब्लॉग'बद्दल अगदी अडाणी नसलो, तरी फार माहितीही नव्हती. तो सुरू करणं तसं सोपंच आहे. पण तांत्रिक बाबींचा बागुलबुवा करण्याची सवय नडली. त्यामुळं ते काम पुढं ढकलत राहिलो. शेवटी एकदाचं धाडस केलं. तरुण पत्रकार केदार भोपे मदतीला आला आणि त्यानं तासाभरात ब्लॉग सुरू करून दिला. ब्लॉग सुरू करावा असं वाटण्याचं श्रेय 'मैत्री'ला काही प्रमाणात निश्चित जातं.

मग लिहीत राहिलो. काही जुनं त्यावर टाकत राहिलो. पण हे वाचकांपर्यंत पोहोचणार कसं? इ-मेलने कळवू लागलो. ज्यांना इ-मेल पाठवत होतो, त्यातले खूप जण अनोळखी होते. त्यातल्या काहींचा नंतर चांगला (इ-)परिचय झाला; काहींशी फोनवर बोलणंही झालं. 'अशा इ-मेल यापुढे पाठवू नका,' 'तुमच्या मेलिंग लिस्टमधून माझं नाव काढून टाका' असं काहींनी कळवलं. (त्यांना पुढे कधीच इ-मेल जाणार नाही, याची काळजी घेतली.) पण बऱ्याच जणांनी हा इ-मेलचा मारा सहन केला; भले ते ब्लॉगला भेट देत असोत वा नसोत! काही वाचकांनी 'आपली ओळख आहे का? माझा इ-मेल कुठून मिळाला?' असंही विचारलं. कळविल्यावर मग त्यांची काही तक्रार राहिली नाही. पुढे मग व्हॉट्सॲपचा वापर करीत नव्या लेखनाचे दुवे पाठवित राहिलो.

मध्यंतरी एका सणकीत ब्लॉग सहा महिने बंद ठेवला. त्याची गंमत 'पासवर्डपायी परवड!' लेखात लिहिली आहेच. (khidaki.blogspot.com/2018/09/password.html) त्यातून बाहेर पडलो आणि नव्यानं लिहिणं चालू केलं. या ब्लॉगमुळं अनेक मोठ्या माणसांपर्यंत, चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचता आलं. त्यांची दादही मिळाली. असे वाचक बरेच आहेत. 'चांगलं मराठी लिहीत असल्याबद्दल' काहींनी कौतुकही केलं. वाचक देत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल एका मित्रानं कौतुकमिश्रित आश्चर्य व्यक्त केलं! अशा सगळ्याच वाचकांचं नाव घेणं शक्य नाही. वृत्तपत्रात काम करीत असताना बातमीतील नावांबद्दल आग्रह धरणाऱ्यांना सांगत असे - ज्यांची नावं आली त्यांना त्यात फारसं स्वारस्य नसतं; पण चुकून एखाद्याचं नाव विसरलं, तर तो खट्टू होतो!

तर वर्ष संपताना हे पाल्हाळ लावण्याचं खास कारण आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 'खिडकी'नं दोन टप्पे गाठले. हे दोन्ही टप्पे गाठता आले, ते ब्लॉग वाचणाऱ्या तुम्हा सगळ्यांमुळेच.

'एबीपी माझा' दूरचित्रवाणी वाहिनी मराठी ब्लॉगरसाठी दर वर्षी 'ब्लॉग माझा' स्पर्धा घेते. या स्पर्धेत भाग घेण्याचं एका मैत्रिणीनं दोन वर्षांपूर्वी सुचविलं. स्पर्धेत भाग कसा घ्यायचा, हे शोधलं. आहे की अजून मुदत, असं म्हणून लगेच प्रवेशिका भरायचा कंटाळा केला. पुन्हा लक्षात आलं तेव्हा त्याची मुदत संपली होती. त्यानंतर मागच्या वर्षी अचानक या स्पर्धेची आठवण झाली. शोधाशोध केल्यावर कळलं की, स्पर्धेत भाग घ्यायची मुदत कालच संपली!

दोन वर्षांचा हा अनुभव असल्यानं यंदा ऑक्टोबरच्या शेवटी, नोव्हेंबरच्या सुरुवातीला स्पर्धेची घोषणा पाहत होतो. पण काहीच सापडलं नाही. यंदाही गाडी चुकली, असं समजून गप्प राहिलो.

मुलानं २ डिसेंबरला स्पर्धेची माहिती कळविली. त्यानं दिलेला दुवा उघडून पाहिला, तर स्पर्धेत भाग घेण्याचा तो शेवटचा दिवस होता. हुश्श वाटलं! त्याच दिवशी ऑनलाईन नोंदणी केली.

त्यानंतर अवघ्या १० दिवसांनी, म्हणजे दि. १२ डिसेंबरच्या रात्री 'एबीपी माझा'मधून फोन आला - 'अभिनंदन! 'ब्लॉग माझा' स्पर्धेत तुमच्या ब्लॉगला पहिला क्रमांक मिळाला...' मुंबईच्या 'कोर्टयार्ड मॅरियट'मध्ये १९ डिसेंबरला पारितोषिक वितरण झालं. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारलं. बाकीचे तरुण विजेते पाहिल्यावर वाटलं की, आपण शिंगं मोडून वासरांत शिरलो की काय!

'खिडकी नंबर एक' ठरल्याची बातमी तुम्हाला सांगायलाच हवी ना! त्यासाठी तर वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त निवडला.

आणखी एक, याच आठवड्यात ब्लॉगच्या वाचकांच्या संख्येनं तीस हजारांचा टप्पा ओलांडला. पाच वर्षांतील पाऊणशे लेखांसाठी ही संख्या फार मोठी नाही, हे तसं खरं आहे. पण यातले बहुसंख्य वाचक नियमित आहेत, हेही खरं. ते मनापासून वाचतात. दूरदेशी असलेले भारतीयही 'खिडकी' उघडून डोकावतात, याचा आनंद वाटतो.

'तुम्ही थोडं अनियमित लिहिता. प्रमाण वाढवलं पाहिजे,' अशी 'तक्रार' एका ज्येष्ठ वाचकानं अलीकडेच केली. त्यात तथ्य आहेच. पण ज्या विषयांवर मोठ्या प्रमाणात लिहिलं जातं, ते विषय टाळतो. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल, महाराष्ट्रात महिनाभर रंगलेलं राजकीय नाट्य यावर इच्छा असूनही लिहिलं नाही. त्यात फार वेगळं काही असणार नाही, हे जाणूनच ते केलं.

संकल्प वगैरे नाही. पण नव्या वर्षात अधिक लिहिण्याचा, चांगलं लिहिण्याचा, वेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न नक्की करणार!

'खिडकी' उघडल्यावर हवेची सुखद झुळूक आली पाहिजेच ना!!

10 comments:

  1. मनाची खिडकी सताड उघडून लिहिलंत, म्हणून तर स्पर्धेत आयोजकांनी त्यांच्या मनाची कवाडं खुली करत खिडकी पहिल्या क्रमांकावर आणली. 😊
    (हे उगा यमक म्हणून)
    पण खरंच खूप आनंद झाला.
    सगळे लेख काही मी वाचलेले नाहीत; पण जे वाचले ते पक्के लक्षात राहिले आहेत.
    अगदी मनःपूर्वक अभिनंदन सर!💐

    ReplyDelete
  2. हार्दिक अभिननंदन! सामाजिक माध्यमाचा सकारात्मक उपयोग👍

    ReplyDelete
  3. सतिश.....
    खरच अप्रतिम.....
    अभिनंदन......⚘

    ReplyDelete
  4. अभिनंदन सर.

    - संग्राम

    ReplyDelete
  5. खिडकीमधून वारा , सुखावून टाकतो सारा ।
    खिडकी आहे छोटी , पण क्षितिजाहून मोठी ।। १ ।।

    खिडकी राहो उघडी , हि विचारांची पगडी ।
    खिडकी आहे तगडी , लावी प्रभोदनाची गोडी ।। २ ।।

    अमित भट , सेऊल , द.कोरिया

    ReplyDelete
  6. अभिनंदन सतीश! 'खिडकी' भारीच आहे.
    - प्रदीप कटारिया, पुणे

    ReplyDelete
  7. 'खिडकी' कधीही लावून घेऊ नकोस, सतीश. वाऱ्याची झुळूक कायम येत राहील याची दक्षता घे. बाकी तुझ्या लिखाणाविषयी मी काय बोलणार!
    - जगदीश निलाखे, सोलापूर

    ReplyDelete
  8. प्रथम क्रमांकासाठी हार्दिक अभिनंदन.

    शिंग मोडून किंवा न मोडता पण वासरांत शिरलंच पाहिजे. नाही तर खोंडं भारी आहेत. शिंगाची पर्वा न करता अंगावर घेतात!
    - मनोज तुळपुळे, औरंगाबाद

    ReplyDelete
  9. सतीश, तू नियमित लिहीत जा. 'खिडकी'तून आल्हाददायक हवा येऊन जीवन सुसह्य होते, एवढे मात्र निश्चित.

    आणि हो, तुझे खास अभिनंदन!
    - रवींद्र चव्हाण, पुणे

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...