Saturday 30 June 2018

आणीबाणी...नव्याने जुनी कहाणी

अरे! लागली उचकी, आणा पाणी
आणीबाणी की हो, आणीबाणी!!
झाकती कुणी, उकरती कुणी,
जोरात सुरू झाली खणाखणी

जुनाट विरजण, पुन्हा घुसळणी
हाती लागे ओशट, खवट लोणी
आंबटढाण ताक, ओता पाणी
शिळ्या कढीला, ताजी फोडणी

अरुणाची ती वाणी प्रखर
दुर्गामाता जणू हिटलर
सुरजेवाला भडके सत्वर
शहनशहाचा करी जागर

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट जुनी
भीष्माचार्य लालजी अडवाणी
चाहूल घेत व्यथिलेही होते,
येतेय बरं पुन्हा आणीबाणी!

अंधारपर्वा मिळतो उजाळा
राजकारण थोडे त्यात मिसळा
कुणी पाळती दिवस काळा
मिसाबंदींचा सत्कारसोहळा

जाहीर होता त्यांना पेन्शन
यांना का हो फुकाचे टेन्शन?
देणारे देतील आणि घेणारे घेतील
विनयाने बरेच नाही म्हणतील!

असेच असे एक अशोकपर्व
आठवे तया अनुशासनपर्व
म्हणती आम्हांस आहे गर्व
शिस्तीत होते देशात सर्व

आणखी काही झाले गोळा
अंधारयुगाचा त्यांना कळवळा
आव आणती जणू सांब भोळा
जखमेवरती थोडे मीठ चोळा!

सांगती चार वर्षांपासुनी
भोगतो देशात आणीबाणी
ती भली अन् आजची बुरी
अशी तुलना करील कुणी?

काय बोलावे, कसे सांगावे
माजले आहेत गोबेल्स फार
अरे! लागली उचकी, आणा पाणी
आणीबाणी की हो, आणीबाणी!!
.
.
.
पंचवीस जून-पंचवीस जून
तो 43 वर्षांचा, झाला जून
तुटुनी पडती परस्परांवर
करीत सारे दिन दिन
विचारतोय आम आदमी दीन
कधी, केव्हा होते अच्छे दिन?’

----------------------------------
(व्यंग्यचित्रे - मंजूल (फर्स्ट पोस्ट) यांच्या सौजन्याने)

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...