स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...
‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा. ‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो. तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला पहिल्या क्रमांकावरचा देश आपला आहे. आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो आपण जगात नंबर वन? -------------- ‘मोरू’ आणि त्याचे बाबा ही मराठी साहित्यातली तशी ऐतिहासिक पात्रं. नवरात्र संपून दसरा उजाडला की, त्या दोघांची कोणाला ना कोणाला आठवण होतेच. सोनं लुटायचं म्हणून मोरूला दसऱ्याच्या दिवशी बाबा उठवित. काळ बदलला आहे. साडेतीन मुहूर्तांसह आणखी काही मुहूर्त इंटरनेटकृपेने आले आहेत. त्यांना ‘डेज’ म्हणतात. काळाबरोबरच चालत आता काही विशिष्ट दिवशीही त्याला झोपेतून जागं करणं, बाबांना आपलं कर्तव्य वाटते. काळाप्रमाणे भाषाही बदलली आहे. पूर्वीसारखं ‘मोऱ्या’ असं खेकसत त्याच्या कटिप्रदेशाशी आपल्या चरणकमलानं आघात करणं बाबांनी सोडलं आहे. ते आता ‘मोरूबाळ’ असं संबोधतात. 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' कादंबरी त्यांनी वाचलेली आहे. पण वसकणं सोडून ते 'गुड मॉर्निंग, बेटा' म्हणतात. मोरूही त्यांचा उल्लेख (पाठीमागे) ‘आमचा बाप’ असा थेट न करता, ‘आमचे पिताश्री’ असा करत...