बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस



स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही.
किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही!
दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र
आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड.
बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६!
-----------

लवकर उठायचंच आज असा निश्चय करून (नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. शतायुषी दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. पत्रकारह्या नात्यानं पहिली नोकरी.

हल्लीच्या भाषेत सांगायचं तर कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच.

संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅)

कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी बोलावून घेतले. अभ्यास कसा चालू आहे, ह्याची चौकशी केली. दिवाळी अंक कोणता हे सांगितले.

सरांशी बोलत असतानाच त्यांच्या कक्षात डॉ. अरविंद संगमनेरकर आले. पांढराशुभ्र सफारी. (हा त्यांचा आवडात वेष, हे नंतर लक्षात आलं.) त्यांच्याशी प्र. ना. सरांनी ओळख करून दिली. परीक्षा मेच्या शेवटी संपत होती. जूनपासून लगेच मी कामाला जायला सुरुवात करायची, असं ठरलं.

आधीचे दोन महिने संध्याकाळी चार-पाच तास. मग अंकाच्या कामाला गती आली आणि मी दुपारी साडेबारा-एकच्या दरम्यान जाऊ लागलो. त्या दिवशीही तसाच गेलो. खाली प्रशस्त रुग्णालय आणि त्याच्या वरच्या मजल्यावर आमची संपादकीय विभागाची खोली. बहुसंख्य वेळ तेथे मीच राजा असायचो. म्हणजे एकटाच बसून काही ना काही करत होतो.

... तर गोष्ट त्या दिवसाची आहे. काम सुरू केले आणि इंटरकॉमवरून निरोप आला - सरांनी बोलावलं आहे. केबिनमध्ये डॉक्टर एकटेच होते. रुग्णतपासणीचा पहिला टप्पा संपलेला होता. अंकाचं दिवसभरातलं तातडीचं काम काय आहे, हे त्यांनी सांगितलं. आधी सांगितलेलं काम कोठपर्यंत आलंय, ह्याचा आढावा घेतला.

तुमचा फोटो छापून आलाय
बोलणं संपलंय हे ओळखून निघालो, तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, ''आणि हे काय हो! तुमचा फोटो छापून आलाय केसरीमध्ये आज.'' टेबलाच्या खणातून त्यांनी अंक काढून दाखवला. कौतुकाने हसले.

ही बातमी डॉक्टरांपर्यंत पोहोचल्यानं रंगा खूश होता. दोन जिने चढून कामाच्या ठिकाणी बसलो.  पुन्हा एकदा इंटरकॉम वाजला. बाहेरचा फोन होता. मधुकाका - (कै.) मधुकर कुलकर्णी – बोलत होते. त्यांच्या आवाजातली खुशी लपत नव्हती. कारण तेच - त्यांच्या धाकट्या आणि लाडक्या पुतण्याचा फोटो छापून आलेला.

मधुकाकांचा फोन
मधुकाकांच्या नजरेतून हे सुटणारं नव्हतंच. कारण गुप्तचर विभागात काम करताना त्यांचं दिवसभरातलं सर्वांत महत्त्वाचं काम असायचं, सगळी मराठी वृत्तपत्रं, साप्ताहिकं बारकाइनं वाचायची. त्यातल्या काही नोंदी काढायच्या. फोटो पाहिला आणि लगेच त्यांनी फोन केला.

माझा फोटो छापून आलाय, असं मार्केटिंग करायच्या आधीच दोन महत्त्वाच्या व्यक्तींना ते कळालं आणि त्यांनीच कौतुकानं सांगितलं होतं! आता तातडीनं करायचं पहिलं काम होतं, ते म्हणजे केसरीचा अंक विकत घेणं.

दैनिक केसरीमध्ये ह्या दोन-चार दिवसांत कधी तरी छायाचित्र प्रसिद्ध होणार हे माहीत होतं. पण नेमकं कधी, त्याचा पत्ता नव्हता. त्यामुळे तातडीने बाहेर पडून अंक विकत घेतला. तो नंतर कोठे तरी गेला. मधुकाकांनी आठवणीनं कार्यालयातून अंक आणला. त्याचंच मधलं पान संग्रहात आहे.

करमाळ्यात बातमी पोहोचली
करमाळ्याला माझ्या घरी ही बातमी दुपारी उशिरा कधी तरी कळली. वडिलांना तर शाळेतून आल्यावर संध्याकाळी. अंक पाहण्यासाठी वाचनालयात गेले, तर ते बंद झालेले. दोन-तीन ठिकाणी चौकशी करून अखेर त्यांना रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास एका प्राध्यापकाच्या घरी केसरीचा अंक पाहायला मिळाला!

तिसरे पत्र होते पुण्यातले. आधी जेथे काम करत होतो, त्या व्यापारी मित्र मासिकातील सहकारी व तेथे टपाल आणून देणाऱ्या पोस्टमनदादा ह्यांचे. पोस्टमनदादांचे नाव नारायण मड्डी किंवा असेच काही होते. त्यांनीच अंक पाहून बाकीच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यावर मड्डी, विलास लांडगे, खांबे, पुन्हा पत्रकारितेत सहकारी बनलेला प्रसाद घारे आणि आणखी एक जण.

त्या काळी केसरीमहिन्यातील सर्वोत्तम वाचकाच्या पत्राला बक्षीस देत असे. बक्षिसाची घोषणा पत्रलेखकाच्या छायाचित्रासह आणि अत्यल्प माहितीसह वाचकांची पत्रे सदरामध्ये केली जाई.

बक्षीस मिळत नाही म्हणजे काय..?

आपण एवढा काळ (म्हणजे जेमतेम तीन-साडेतीन वर्षे) वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये नियमित पत्रं लिहितो आणि केसरीचं बक्षीस मिळत नाही, म्हणजे काय, असं काही तरी डोक्यात होतं. एकदा तरी ते मिळवायचंच असं मनाशी ठरवलेलं.

हा फोटो प्रसिद्ध झाला आणि मीही. अभिनंदन करणारी चक्क तीन पत्रे आली. दोन करमाळ्याहून – श्री. राजाभाऊ देवी आणि श्री. संजय ढोके ह्यांची.

त्याच महिन्यात ज्येष्ठ साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे ह्यांना लोकमान्य टिळक पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं होतं. ह्या देशात आज ना उद्या कम्युनिस्टांचे राज्य येईल, असा आशावाद त्यांनी पारितोषिक स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात व्यक्त केला होता.

बातमी वाचून ट्टॉक!
त्या कार्यक्रमाची बातमी केसरीमध्ये नव्हे, तर सकाळमध्ये वाचली आणि मी टॉक् केलं. बक्षिसाच्या पत्राची हमखास हमी देणारा विषय मला सापडला होता. अगदी धोरणीपणे केलेली ती आयुष्यातली पहिली (आणि बहुदा एकमेव!) कृती होय!!

त्या धोरणीपणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पत्रात कोठेही अनवधानाने श्री. डांगे ह्यांचा अनमान होणार नाही किंवा त्यांचे मोठेपण नाकारणारा सूर उमटणार नाही, ह्याची काळजी घेतली. (दुर्दैवाने त्या पत्राचे कातरण आता नाही. वाचक म्हणून वृत्तपत्रांना जेवढी पत्रे लिहिली, त्या सगळ्याची कातरणे मध्यंतरी वैतागून रद्दीत घातली. )

अपेक्षा होती, त्याप्रमाणे दोन दिवसांत ते पत्र प्रसिद्ध झाले. त्या दिवसातले सर्वांत मोठे पत्र म्हणून – तीन स्तंभी शीर्षक असलेले.

त्यानंतर ज्याची वाट बघत होतो, तेही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडले. केसरीचे सहसंपादक श्री. एकनाथ बागूल ह्यांच्या सहीचं पत्र सप्टेंबरच्या आठवड्यात आलं. (ते स्वतःचं नाव अेकनाथ असं लिहीत. सावरकर ह्यांच्या धाटणीने. त्यावरून ते सावरकरवादी आहेत, असा समज करून घेतला होता.😀 ) जुलै महिन्यातील बक्षिसाचे पत्र म्हणून तुम्ही ९ जुलै रोजी लिहिलेल्या कम्युनिस्टांचे राज्य कोणाच्या बळावर येणार?’ या पत्राची निवड झाली आहे. त्यासाठी छायाचित्र आणि अल्पपरिचय पाठवावा, असं त्यांनी लिहिलं होतं.


जयंतरावांच्या सहीचा चेक
फोटोपेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचं होतं तो ५१ रुपयांचं बक्षीस. यथावकाश जयंतराव टिळक अशी फर्डी सही असलेला चेकही मिळाला. तो सहीसाठी तरी ठेवायला हवा होता. पण त्या काळात ही रक्कम फार मोठी होती.

दैनिकामध्ये छापून येणारा पहिलाच फोटो होता माझा. त्यामुळे नवीन फोटो काढायचं ठरवलं. तो कोठे काढला, ते लक्षात आहे. लालबहादूर शास्त्री रस्त्यावर थोडे पुढे 'जोशी स्टुडिओ' होता. त्यांचा मुलगा बहुतेक वृत्तविद्या अभ्यासक्रमाला आमच्या बरोबर होता. पंजाब नॅशनल बँकेत नुकताच रुजू झालेला शाळूसोबती अनिल कोकीळ ह्याला बरोबर घेऊन गेलो होतो.

बक्षिसाची बातमी अनिलला सांगितली, तेव्हा तो दुप्पट खूश झाला. पहिल्या पटीच्या खुशीचं कारण म्हणजे तो तेव्हा बासरी शिकत होता आणि त्यावर त्याला राष्ट्रगीताच्या दोन ओळी त्याच दिवशी विनासायास वाजवता येऊ लागल्या होत्या.

हे पाठविण्यासाठी 'केसरी'ने स्वतःच्या पत्त्याचं आणि टपाल हशील असलेले पाकीटही सोबत पाठविलं होतं. पण एवढा धीर कोणाला होता!

पत्रामधील सूचनांनुसार अल्पाक्षरी ओळख आणि ताजा करकरीत फोटो स्वहस्ते ५६८, नारायण पेठ ह्या पत्त्यावरील कार्यालयात देऊन आलो होतो.

आणि मग वाट पाहणे, एवढेच उरले होते.

ते सार्थकी लागले, ते ९ सप्टेंबर १९८६ रोजी. बरोबर चार दशकांपूर्वी. त्या छोट्या आठवणी मनातून जात नाहीत. म्हणून तर हा मोठा लेख लिहायचा घाट!

..............

#केसरी #पहिला_फोटो #वाचकांची_पत्रे #५१रुपये_बक्षीस #श्रीपाद_अमृत_डांगे #टिळक_पारितोषिक #शतायुषी #मधुकाका #डॉअरविंद_संगमनेरकर #प्रना_परांजपे #पत्रकारिता_आठवणी

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाच...