कोजागरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी
व्हॉट्सॲपवर संदेश आला. बहुतेक फॉरवर्ड केलेलाच असावा. पण वाचण्यासारखा. वाचून
गालातल्या गालात हसण्यासारखा. त्यात म्हटलं होतं - ‘दसऱ्यानिमित्त आलेली
झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं आता कुठं मोबाईलमधून काढून टाकली. थोडं साफसुफ
वाटतंय तेवढ्यात मसाला दुधाचे ग्लास आणि चंद्राची गर्दी झाली.’
हा संदेश पूर्ण वाचणं काही जड गेलं नाही. दोन-तीन ओळींचाच
होता तो म्हणून. वाचल्यानंतर पुढे पाठवण्याचा मोह झाला क्षणभर. पण आवरला. कारण तो
फार फिरणार असं वाटलं होतं. ते खरं ठरलं. दिवसभरात अजून दोन-तीन ठिकाणांहून आला
तो.
दिवस सणांचे आहेत. उत्सवाच्या उत्साहाचे आहेत. या उत्साहावर यंदा पावसानं चांगलं धो धो पाणी टाकलं, हे खरं. त्यामुळं की काय, दिवाळीच्या अगदी दोन-तीन दिवस आधीपर्यंत बाजारपेठेत उत्साह कमी दिसत असेल कदाचित; पण मोबाईलमध्ये तो कधीचा ओसंडून वाहायला लागला होता. अशा उत्साही संदेशांनी व्हॉट्सॲप फसफसून वाहतंय. बऱ्याचदा हे फसफसणं विटण्यापर्यंत जाऊन पोहोचतं, ही बाब वेगळी.
दिवस सणांचे आहेत. उत्सवाच्या उत्साहाचे आहेत. या उत्साहावर यंदा पावसानं चांगलं धो धो पाणी टाकलं, हे खरं. त्यामुळं की काय, दिवाळीच्या अगदी दोन-तीन दिवस आधीपर्यंत बाजारपेठेत उत्साह कमी दिसत असेल कदाचित; पण मोबाईलमध्ये तो कधीचा ओसंडून वाहायला लागला होता. अशा उत्साही संदेशांनी व्हॉट्सॲप फसफसून वाहतंय. बऱ्याचदा हे फसफसणं विटण्यापर्यंत जाऊन पोहोचतं, ही बाब वेगळी.
दिवाळी चालू झालीच आहे. अगदी मुहुर्तावर शुभेच्छा देण्यात
काय मजा! त्या तर सगळेच देतात. आपण त्यात आघाडीवर असलंच पाहिजे, म्हणून मग काही व्हॉट्सॅपवीर आठवडाभर आधीच सुरुवात करतात. त्यांच्याकडे
स्टॉक असतोच. गेल्या वर्षीचा, त्याच्या आदल्या वर्षीचा.
शुभेच्छांमध्येच म्हटलेलं असतं – सगळ्यांच्या आधी आणि एक (किंवा दोन) दिवस) आधी शुभेच्छा मीच दिल्या! (याच
धर्तीवर आम्ही यंदा वर्षाअखेरीस २०२१ या वर्षाच्या आणि
नववर्षाच्या पहिल्या दिवशी २०२२साठी शुभेच्छा देणार आहोत!)
वसुबारसेपासून शुभेच्छांचा 'ताप' (फीव्हर हो) वाढत जातो आणि पाडव्यादिवशी तो १०४ वगैरे होतो. तो उतरणीला लागल्याची लक्षणं भाऊबीजेपासून जाणवू लागतात. त्या दिवशी ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ फॉर्मात असते. त्यानंतरही अधूनमधून कुणाला तरी हुक्की येतेच. आलेल्यातला एखादा मेसेज तो फॉरवर्ड करून टाकतो बसल्या बसल्या. फॉरवर्ड तर फॉरवर्ड; त्यातून शुभेच्छा दिल्याचं आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याचं समाधान. त्यानं दिवाळीच्या आनंदावर तृप्तीची कशी जाड साय येते.
वसुबारसेपासून शुभेच्छांचा 'ताप' (फीव्हर हो) वाढत जातो आणि पाडव्यादिवशी तो १०४ वगैरे होतो. तो उतरणीला लागल्याची लक्षणं भाऊबीजेपासून जाणवू लागतात. त्या दिवशी ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ फॉर्मात असते. त्यानंतरही अधूनमधून कुणाला तरी हुक्की येतेच. आलेल्यातला एखादा मेसेज तो फॉरवर्ड करून टाकतो बसल्या बसल्या. फॉरवर्ड तर फॉरवर्ड; त्यातून शुभेच्छा दिल्याचं आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याचं समाधान. त्यानं दिवाळीच्या आनंदावर तृप्तीची कशी जाड साय येते.
एव्हाना लाडू, चकल्या, चिवडा, फटाके, रांगोळ्या,
आकाशकंदील, पणत्या... हे सारं पचवताना
मोबाईलला अजीर्ण होऊन जातं. क्वचित कधी तरी त्याला याचा हँगओव्हरही येतो आणि तो
लडखडायला लागतो. अशा वेळी एकच उपाय असतो – लंघन करणं. सरसकट
सगळे संदेश उडवून टाकत व्हॉट्सॲप एकदम स्वच्छ करून बंद ठेवायचं. यानं तुमच्या
अँड्रॉईडची किंवा अन्य कुठल्याही स्मार्ट फोनची प्रकृती पूर्वपदावर येण्यास मदत
होते.
दिवाळीच्या शुभेच्छा म्हटलं की, काही
गोष्टी अनिवार्य असतात. घरावर लखलखीत लायटिंग केलं असलं तरी इथं इवलीशी (आणि
शक्यतो मिणमिणती!) पणती आवश्यक असते. प्रकाशाची अंधारावर मात,
उडणारे बाण आणि भुईनळे, कानठळ्या बसविणारे
हिरवे ॲटमबाँब, अंगालाच मुंग्या लागतात की काय, अशी शंका येणारे पाकात मुरवून ठेवलेले गोग्गोड शब्द इत्यादीही असतंच. एरवी
असंस्कृत भासणाऱ्या या जगात दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारी संस्कृत वचनं आणि श्लोक
पाहिले की, या देववाणीला आपण उगीच अभ्यासातून हद्दपार केलं
असं वाटतं. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम,
एकनाथ या संतश्रेष्ठांचे अभंग-ओव्याही शुभेच्छांमधून आढळतात.
अलीकडच्या काही वर्षांत शुभेच्छांसाठी ज्ञानदेवांच्या ‘मी
अविवेकाची काजळी। फेडुनी विवेकदीप उजळी।’ ओवीला फार
मागणी आहे. ही काजळी दिवाळीपुरती काढली म्हणजे भागलं, असंच
आपली विवेकबुद्धी सांगत असावी, बहुतेक!
आणखी काही शुभेच्छांमध्ये दिवाळीचा फराळही आवर्जून असतो.
दगडासारखा कडक लाडू,
वातड चकली, चिवट कडबोळी, खवट करंजी याचे जुनाट ('स्वराज्य'छाप) विनोद त्यात असतात. ‘छायाचित्र हजार
शब्दांहून बोलकं असतं’ या उद्धृताला जागून बरेच जण
फराळाच्या ताटांचे फोटोच पाठवतात. साधारण सहा-सात वर्षांपासून फॉरवर्ड होत
असलेल्या या पदार्थांना वास कसा येत नाही किंवा ते तेवढे जुने आहेत, याचा वासही फॉरवर्ड करणाऱ्यांना येत नाही, ही तशी
आश्चर्याचीच गोष्ट. पण आपल्याला कुठे वाचायचंय/पाहायचंय,
फॉरवर्ड तर करायचंय ना, अशी संबंधितांची स्थितप्रज्ञ
भूमिका असते. त्यातून ते फिरत राहतात.
तसाही फराळ आणि फॉरवर्ड यांचा संबंध जुनाच आहे. ‘गेले
ते दिन गेले...’ आळवणाऱ्यांना आणि ‘आमच्या काळी असं होतं...’ असे कढ काढणाऱ्या
वयोगटातल्या ('सोशल') मंडळींना हे लगेच
पटेल. पूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून फराळाची ताटं शेजारच्या घरोघर
पोहोचवण्याची पद्धत होती. घरातला बंड्या बेसनाचा लाडू खाण्यासाठी हट्ट धरून बसला
असला, तरी तो आधी शेजारच्या खंड्याच्या घरी कसा पोहोचता होईल,
यावर त्याच्या प्रेमस्वरूप आईचा कटाक्ष असे. ‘त्या खंड्याच्या आईचा फराळ येण्याआधी आपला त्यांच्या घरी जाऊ दे रे,’ असं बंड्याच्या भावाला किंवा बहिणीला सांगतानाच सोबत ‘उगीच नको त्या मेलीचा तोरा...’ असा थेट शब्दांत
न दिला जाणारा संदेशही असायचा. बोलण्याची पट्टी कमी करत असल्याचा आभास करीत आपल्या
ह्यांना नेमकं ऐकू जाईल, अशा पद्धतीनं ‘खंडूच्या बाबांना माझ्या चकल्या भारी आवडतात. म्हणून लवकर नेऊन दे जा...’ अशी पुष्टीही जोडली जायची. व्हॉट्सॲपच्या मेसेजचंही असंच असतं ना? त्याचा मेसेज यायच्या आधी माझा मेसेज गेलेला बरा!
(घरच्या) फराळाची ताटं भरून शेजारीपाजारी देण्याचं काम
पहिले दोन दिवस उत्साहाने चालायचं. तोपर्यंत शेजारूनही फराळाची ताटं आलेली असत. मग
सुरू होई फॉरवर्डचं काम. घरची चकली खमंग झाली असली, तर ती न पाठवता पाटलांची
किंवा जोश्यांची वातड चकली द्यायच्या ताटात जाई. ‘बेसन
कसं नि किती भाजायचं कळतच नाही, कुलकर्णीबाईंना’ असा उद्धार करीत त्यांचे लाडू जाधवांच्या किंवा गायकवाडांकडे पाठवायच्या
ताटात जात. दिवाळीतला चिवडा भाजक्या पोह्यांचाच. पण एखाद्या घरातून चुरमुऱ्याचा
चिवडा आलेला असेल, तर नाकं मुरडत त्याची चवही न पाहता तो
तसाच्या तसा कुणाकडे तरी लगोलग फॉरवर्ड केला जाई. आपण कसं थोडे चांगले मेसेज सरसकट
फॉरवर्ड न करता जवळच्या मित्रांना (आणि शक्यतो मैत्रिणींनाच!) पाठवतो, तसं फराळाचंही असे. आत्या-मामा-काका
यांच्यासाठी डब्यात घरचेच फराळाचेच पदार्थ भरण्याची दक्षता घेतली जाईल. क्वचित
कोणा जळकुट्या जाऊबाईंच्या डब्यात एखाद-दुसरा पदार्थ फॉरवर्डेड असायचा.
नाना पाटेकर आणि विश्वास नांगरे ह्यांचे ब्लॉग वाचण्यासारखे
असतात,
असं सोशल मीडियाच्या दुनियेत बहुतेकांना (न वाचताच) मान्य आहे.
त्यामुळे व्हॉट्सॲपवर (त्यांच्या नावाचं लेबल लेऊन) आलेला आणि सात-आठ वेळा
स्क्रोल करत पाहावा लागणारा मेसेज सरसकट पुढे ढकलला जातो. काही खानदानी कुटुंबांचं
तसंच असतं. त्यांच्याकडून येणारी फराळाची ताटं किंवा चार पुड्यांचे दोन-दोन डबे
नाना पदार्थांनी गच्च भरलेले असतात. ते सारेच चविष्ट असतात, असं
सगळ्यांना (ऐकून ऐकूनच) मान्य असतं. हे डबे पाहूनच दडपून जायला होईल. त्यामुळे चव
घेण्याऐवजी त्यातील पदार्थ तुकड्यातुकड्यांमध्ये फॉरवर्ड केले जात. त्यातूनही थोडं
काही राहिलंच तर कामवाल्या मावशी मदतीला येतातच.
व्हॉट्सॲपवर आलेले सगळेच्या सगळे मेसेज वाचणं या जन्मात
तरी कुणाला शक्य नाही. हीच शक्यता पूर्वीच्या जमान्यात वेगळ्या बाबतीत होती. घरात
आलेले सगळेच्या सगळे पदार्थ चाखणं एकदम अशक्य गोष्ट. पण काही जणांचे मेसेज
वाचण्यासारखेच असतात,
हे जसं अनुभवानं ध्यानात येतं; तसंच
फराळाचंही होतं. काहींचे काही पदार्थ चाखण्यासारखेच असतात, असं
घरच्या मंडळींचं मत असे आणि कुटुंबकर्तीला ते नाइलाजानं मान्य करावं लागे. विशेषतः
मोतिचूर लाडू, खमंग अनारसे, खुसखुशीत
चकल्या असा ऐवज फॉरवर्ड न करता राखून ठेवला जाई आणि चाखून पाहिला जाई.
कितीही काळजी घेतली, तरी हे गणित बिघडे. कोणता
लाडू देशपांडे काकूंचा आणि कुठला चिवडा शिंदे मावशींचा, चकली
चाकोत्यांकडची आहे की अनारसे आढावांकडचे आहेत, याचा सगळा
गोंधळ होऊन जाई. त्यामुळे एक-दोन दिवसांतच ते लक्षात ठेवण्याचा नाद सोडून द्यावा
लागे. त्यातही फॉरवर्डची कल्पना यथावकाश सगळ्यांनीच अमलात आणलेली असे. त्यामुळे
एखाद्या राजूने पवार आजींकडचा रव्याचा लाडू चांगला असतो म्हणून मागितला, तर आई रागानं वाटी त्याच्यापुढे आदळे. एक तुकडा खाऊन राजू तोंड वाकडं करत
म्हणे, ‘‘आई, हा पवार आजींकडचा
लाडू नाही गं. तू घरचाच दिलास चुकून. वास येतोय...’’ तेव्हा
मग आईच्याही लक्षात येई की, हा लाडू चार घरी फिरून पुन्हा ‘बनविल्या घरीच तू सुखी राहा...’ म्हणत
आपल्याकडे आलेला आहे. राजूच्या आईचा अनुभव अस्मादिकांनाही एसएमएसच्या जमान्यात आला
आहे. पत्रकारदिनाच्या शुभेच्छा देणारा हा संदेश एवढा फिरला की, सोलापूरच्या एका पत्रकाराकडून तो आम्हाला आला. ‘हा माझाच मेसेज तुम्ही मलाच कसा काय पाठवलात?’ असं
विचारल्यावर त्या पॉवरबाज पत्रकारानं माझं नावच फोनबुकमधून उडवून टाकलं.
पूर्वीसारखं आता कुणी घरी फराळाचं सगळंच्या सगळं बनवत नाही.
काही इकडून मागवतात, काही तिकडून बनवून घेतात.
शुभेच्छांची पत्रही आता कुणी हातानं लिहीत नाही. काही इ-मेलवरून उचलतात आणि व्हॉट्सॲप बऱ्याच जणांच्या मदतीला
आलेलं असतं. एकूणच फराळ काय नि व्हॉट्सॲप मेसेज काय, त्यांचा ‘संदेश’ पूर्वीपासून तोच आहे - थोडं चाखू, थोडं राखू... बाकीचं आपलंच म्हणून पुढे ढकलून टाकू!
…
(छायाचित्रं इंटरनेटवरून
साभार.)
खुसखुशीत फराळ
उत्तर द्याहटवा👌chhan....as usual
उत्तर द्याहटवाKeep writing....
वाह ! खुसखुशीत लेख!
उत्तर द्याहटवाअगदी अप्रतिम आणि सुरेख झाला आहे लेख अगदी दिवाळीच्या फराळ सारखा पण हा स्वनिर्मित आहे हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे त्यामुळे लेखाची लज्जत काही न्यारीच आहे
उत्तर द्याहटवाWhatsapp, Facebook यांनी एक गोष्ट केली ती म्हणजे स्मार्टफोन हातात आल्या आल्या आत्मविश्वास वाढविला.
उत्तर द्याहटवान्यूनगंड इतका घालविला की forward करताना आपण काय करतोय याचे भान पण नाही रहात.
सभाधीटपणा दिला पण काय व्यक्त व्हायचे हे कुठे कळतेय.
स्वनिर्मित स्वलिखित एखादा संदेश प्रसारित करावा तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काय उत्तर द्यावे हे सुद्धा कित्येकांना समजत नाही.
वाचन संस्कृती आत्ता फक्त मोबाईल पुरतीच शिल्लक राहील की काय असेच आता वाटू लागले आहे.
पुस्तकवाचन नाही म्हणून परिपक्वपण नाही, आणि परिपक्वता नाही म्हणून व्यक्त होण्यात गुणवत्तापूर्ण विचार नाहीत.
आपला एखादा अनुभव सांगावा नि त्यावर प्रतिसाद म्हणून समोरच्याने त्याला आलेले इतर संदेश अग्रेषित करावे हे पाहून हसायला मात्र होते.
लेख आवडला, पण अपूर्ण वाटला, विषय नेमका, मार्मिक आहे, पण पुन:लेखन आवश्यक वाटते.
अतिशय खुसखुशीत
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिलेयस.
उत्तर द्याहटवापहिल्यांदाच माझ्याच अंतर्मनात डोकवुन आलो.
छान सर
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवाखरंय. तसाही फराळ आणि फॉरवर्ड यांचा संबंध जुनाच आहे. आता हीही संस्कृती लोप पावत चालली आहे. लेख तर कुरकुरीत झालाय. खमंग!
उत्तर द्याहटवाआपण भारतीय शुभेच्छांसाठी मिम्स, इमेज इतके तयार करतो की, या सगळ्या सायबर कचऱ्याचा भला मोठा एव्हरेस्ट तयार झाला असेल. चतुर्थीला पण आज-काल शुभेच्छा देतात राव! या मेसेजला चार आणे जरी शुल्क लावले, तर बंद होईल हे सगळं.
- स्वप्निल जोशी, औरंगाबाद
दिवाळीच्या धामधुमीतही तुमचं दमदार लिखाण पचनी पडलं. डीलिट मास्टर-की संभाळून उघडायला लागला, हा तुमच्या लेखणीचा 'विजय' आहे!
उत्तर द्याहटवा- चंद्रकांत कुटे, मुंबई
अप्रतिम लिखाण
उत्तर द्याहटवा- सुहास चव्हाण, पुणे
'लहानपण परत दे रे देवा,' हे आठवलं मला सतीश. खरंच मला सचिनच्या आईने केलेला गुलाबजाम आणि तेल्याच्या मामींचा आखाड आठवला व तोंडाला पाणी सुटले!
उत्तर द्याहटवा- सुदेश रासकर, मुंबई
सतीश, आज तुझ्या 'खिडकी'मुळे दुपारचं जेवण आता पचलं. हसून हसून पुरेवाट झाली... आणि हो, लहानपणाची आठवण झाली. खूप समर्पक शब्दांत तू व्यक्त केले आहे सगळे.
उत्तर द्याहटवा- प्रदीप कटारिया, पुणे
सतीश, तुझ्या लेखानं जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. जुने दिवस परत येणे शक्य नाही; पण आपल्या मित्रांचं 'गेट टुगेदर' व्हावे, ही सुदेश व प्रदीप यांची इच्छा मात्र पुरी होऊ शकते. तेवढी ताकद व प्रतिभा तुझ्या 'खिडकी'त आणि लेखणीत आहे.
उत्तर द्याहटवा- रवींद्र चव्हाण, पुणे
खुसखुशीत झाला आहे लेख.
उत्तर द्याहटवा- बाबा भांड, औरंगाबाद
फराळ एकदम खुसखुशीत!
उत्तर द्याहटवा- प्रसाद खटावकर, नगर
लेख वाचला. मार्मिक. फॉरवर्ड करण्याचा मोह टाळला! कर्त्याकडे फराळाचे ताट परत येऊ नये या सदिछ्छांसह...
उत्तर द्याहटवापुढील काळात पुस्तकांच्या लायब्ररीऐवजी व्हॉट्सअॅप लायब्ररी जन्म घेत आहे. सावधान!
- प्रवीण जोशी, पुणे
फराळातील बिघडलेले पदार्थ एकमेकांना फॉरवर्ड करण्याची गंमत धम्मालच! सोशल मीडियावरच्या आगळ्यावेगळ्या दिवाळीचा घेतलेला मजेशीर वेध.
उत्तर द्याहटवालेख खूपच छान. आवडला...
- संजय आढाव, नगर
अप्रतिम...
उत्तर द्याहटवा- स्वाती मिरीकर, मिरी (नगर)
सध्या कुणीही उठतो आणि त्या देववाणीवर अत्याचार करतो. त्या कौरवसभेतल्या द्रौपदीला पाहून "व्वाः! संस्कृत! क्या बात है!" म्हणत टाळ्याही वाजतात. असो.
उत्तर द्याहटवाहा फराळ मस्त खमंग साधलाय. खिडकीतून घमघमला, चवीने चाखला, निगुतीने राखला, प्रेमाने पुन्हा पुन्हा आस्वादला.
नेहमीप्रमाणेच सुंदर झाला आहे लेख.
उत्तर द्याहटवा- अनिल कोकीळ, पुणे
छान जमलाय लेख!
उत्तर द्याहटवाचकलीसारखा खुसखुशीत!!
- संजीवनी घळसासी, पुणे
झणझणीत झालाय, चिवड्यासारखा. बऱ्याच जणांना मिरची लागेल! भाऊबीज जाऊ द्या, 'हॅपी न्यू इयर'साठी तयार राहा.
उत्तर द्याहटवा- सदानंद भणगे, नगर
लेख एकदम खुसखुशीत झाला आहे. मस्त!
उत्तर द्याहटवा- जितेंद्र जैन, औरंगाबाद
तुझं भाषेवरचं प्रभुत्व. तोड नाही त्याला! खूप भावला लेख, सतीश. असाच लिहीत जा आणि पाठवत राहा. आपल्यालाही थोडं-फार मराठी कळत होतं, याची जाणीव होते त्यामुळे.
उत्तर द्याहटवा- जगदीश निलाखे, सोलापूर
लेख खुसखुशीत नि खमंग झाला आहे.
उत्तर द्याहटवा- दत्ता उकीरडे, राशीन
अतिशय मार्मिक व सुरेख लेख. सद्यःस्थितीत सणाच्या वेळी मेसेजचा खरोखर अतिरेक होतो.
उत्तर द्याहटवालेखकमहाशय, आपण नगरमध्ये अनेक वर्षं पत्रकारिता केली असल्याने दिवाळीच्या वेळच्या मेसेजची मीमांसा सरळ व प्रांजळ पद्धतीने केली आहे. तुमचे वास्तव्य पुण्यात असते, तर ह्या शुभेच्छा मेसेजची मीमांसा तुम्ही दिवाळी सणाच्या मुळाशी जाऊन केली असती. उदाहरणार्थ - रामाचे व रावणाचे युद्ध का झाले, वगैरे, वगैरे!
सर्व सणांचे महत्त्व आता खरोखर हरवले आहे व मेसेज फॉरवर्ड करण्याएवढे राहिले आहे, हे मात्र सत्य!
- विकास पटवर्धन, नगर
खुसखुशीत. तुझ्यासारखी लिखाणाची शैली मला नाही. तू दिवाळीच्या फराळासारखे गोड व खुसखुशीत लिहितो.
उत्तर द्याहटवा- अशोक तुपे, श्रीरामपूर
मस्त! फॉरवर्डची कल्पना भारी वाटली.
उत्तर द्याहटवा- गणाधिश प्रभुदेसाई, पुणे
सुरेख... खुसखुशीत... वास्तव...
उत्तर द्याहटवा- उल्हास देसाई, नगर
व्हॉट्सअॅपचा फराळ डोक्याला ताप देणारा असला, तरी तुमचा साहित्यिक 'फराळ' खुसखुशीत व खमंग आहे. फॉरवर्डचे जुने संदर्भ एकदम परफेक्ट आहेत.
उत्तर द्याहटवादिवाळीच्या काळात मनात नसलेलं शुभेच्छांचं औदार्य खरं तर वीट आणतं. अशा वेळी 'थोडं चाखू, थोडं राखू' उत्तम साहित्यिक फराळ खूपच गोड वाटतो. त्यात तो आपल्या मित्रानं बनवलेला असेल, तर त्याचा गोडवा काही औरच असतो...
- प्रबोधचंद्र सावंत, पुणे
अतिशय खमंग फराळाची मेजवानी!
उत्तर द्याहटवा- प्रदीप नणंदकर, लातूर
खूप दिवसाची तुमची गैरहजेरी या लेखाने भरुन काढली .
उत्तर द्याहटवालेख , मार्मिक, प्रासंगिक , खसखुशीत व मजेदार तर आहेच पण विशेष म्हणजे एखाद्या सुविधेचा अतिवापराने कसा दुरुपयोग केला जातो हे , सूचकपणे ,दर्शविणारा ही आहे .
या उत्तम भाष्याबद्दल आपले अभिनंदन व हार्दिक धन्यवाद.
- अशोक जोशी, बंगळुरू
फराळ बहारदार जमला आहे. तो गपागप मट्ट न करता चघळून चघळून खाल्ला. तुम्ही घेतलेली मेहनत स्पष्टपणे जाणवते. तुमचं घरगुती आणि निर्भेळ मराठी आणि लेखनकला यावर मी पहिल्यापासूनच फिदा आहे.
उत्तर द्याहटवावार्ताहरकीमुळे तुमच्या लेखनाला मर्यादा पडतात अशी माझी समजूत आहे. त्यामुळे दिवाळीसारख्या लेखांवर भर दिलात तर आमचे डोळे तृप्त होतील.
दिवाळीच्या उत्स्फूर्त शुभेच्छा. फॉरवर्डेड नव्हेत.
- हेली दळवी
लेख अजून तरी खुसखुशीत आहे, पावसाळी वातावरणामुळे वारावलेला नाही. पूर्ण लेख जणू माझाच अनुभव, माझेच विचार तुमच्या शब्दांत गुंफून आले आहेत असे वाटले.
उत्तर द्याहटवाअक्षरशः मी काही दिवस बाहेर होते तेव्हा व्हाट्सअॅप बघणे शक्य नव्हते, तर 1000 संदेशांनी टॅबलेट भरले होते. कोण वाचणार आणि उत्तर देणार???
- स्वाती वर्तक
Very good satish touching
उत्तर द्याहटवालेख खुसखुशीत झाला. सगळ्यांच्या अंधानुकरण करण्याच्या, फॉरवर्डच्या हव्यासाचा योग्य शब्दांत समाचार! आत्मीयतेचा अभाव असलेले फॉरवर्ड वीट आणतात हेच खरंय! खरी माया माफक अभिव्यक्तीतून समजते; तिला सजावटीची गरज नसते, हे तुझ्या लेखातून अधोरेखित झालं!!
उत्तर द्याहटवा- श्रीकांत जोशी, नगर
खुसखुशीत लेख वाचताना हसू आवरेना... अगदी चोख वर्णन. मनातल्या मनात अगदी हेच विचार होते. पुढील लेखाची वाट बघते आहे...
उत्तर द्याहटवासुधा तुंबे
खुसखुशीत झालाय. काही संदर्भ आता जुने वाटतात, कदाचित सर्वांना कळणार नाहीत. उदाहरणार्थ - 'स्वराज्य'छाप विनोद. बाकी मस्त!
उत्तर द्याहटवा- मनोज तुळपुळे, औरंगाबाद
जाम भारी लिहिलंय. खमंग, खुसखुशीत, चपखल...
उत्तर द्याहटवा- सीमा मालाणी, संगमनेर
चकलीसारखा खुसखुशीत आणि चिवड्यासारखा चटकदार!
उत्तर द्याहटवापान जमून येतं ना, तसं...
- अविनाश दंडवते, पुणे