Friday 26 July 2019

शरण तुला, दलाला!


राज्याच्या राजकारणाचा शकट जिथून हाकला जातो, त्या इमारतीला पूर्वी सचिवालय म्हणत. लाल दिव्याला ते नापसंत होतं. नामांतर केलं. राजधानीतील ती इमारत मंत्रालय म्हणून ओळखली जाऊ लागली.

नामांतर झालं. पण तिथले सत्ताधीश बदलले का? उत्तर नाहीच असं आहे. दाम मोजून घेऊन काम करवून देणाऱ्या एजंटांचा, दलालांचा सत्तेच्या वर्तुळातील बुजबुजाट कायम आहे. एक नाही, अनेक. ही जमात राहते आमदार निवासात, खाते-पिते पंचतारांकित हॉटेलांत. आणि काम? बढती, बदली, निलंबन, लिकर परमिट, आश्रमशाळांची परवानगी. सगळी कामं करतात ही मंडळी. मंत्रालयाशी संधान साधून असल्यामुळे आलेली पावर. कोणत्याही अडचणींवरचा उड्डाणपूल म्हणजे ही जमात.

हे मत एका एजंटाचंच. त्याचं नाव-गाव-जात-धर्म विचारू नका. तो ते सांगणार नाही. तसं स्पष्ट केलंय त्यानं. आमदार निवासात पोपटराव म्हणून विचारा; कोणीही घालून देईल त्याची गाठ. कोणी त्याला मिठ्ठूमिया म्हणून साद घालतं, तर कोणी राघोबादादा पेशवे म्हणतं. पत्रकारमित्र रघुनाथ जोशी त्याला पप्पूशेठ म्हणतो. पोपटरावांचा मुक्काम आमदार निवासात.

आमदार निवास रूम नं. १७५६ ही कादंबरी पुरुषोत्तम बोरकर यांची. पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनानं या कादंबरीची पहिली आवृत्ती १३ डिसेंबर १९९९ रोजी प्रकाशित केली. या ८६ पानांच्या कादंबरीची किंमत ७५ रुपये आहे. अवचित कधी तरी घेतलेलं हे पुस्तक परवा परवा वाचण्यात आलं.

आई-वडील परलोकी आणि बहीण नवऱ्याघरी गेल्यामुळे पोपटराव एकटा पडलेला. ग्रेज्युएट्स ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी आर नॉट अॅप्लीकेबलच्या शेऱ्यांनी घायाळ! राजधानीत येतो स्वप्नं डोळ्यांत घेऊन. ती तुकड्या-तुकड्यांनी विरत जातात. ठरतो एक नि:संग एजंट. पैसा फेको, काम देखो.

खोली आमदाराची आणि राज्य पोपटरावचे. त्याचा संचार कुठं नाही? त्याच्या ओळखी कुणाशी नाहीत? अफाट भ्रष्टाचारानं पद गमावलेला माजी राज्यमंत्री कागदराव गगनबावडेकर त्याच्याकडे येतो – सत्तेचं वलय पुन्हा लाभावं यासाठी त्याला त्याच्या बाबावर सिनेमा काढायचाय. पोपटराव दिग्दर्शक गाठून देतो.

खान्देशातील बाबासाहेब तुपटाकळीकर पन्नाशीत पोहोचलेले. त्यांचं राजकीय स्वप्न भव्य होतं...सेंट्रेल हॉलमध्ये तैलचित्र किंवा मंत्रालयाच्या आवारात पुतळा! जेमतेम एकदा ग्रामपंचायतीत निवडून आले. वारुणीचा चषक पुढे असला की, त्यांच्या स्वप्नांचे तुकडे अधिक झळाळते होतात. बाथ, वॉश, डिनर, लंच, ड्रिंक्स अशा शब्दांचे त्यांना वेड. तूर्त ते पोपटरावांच्या संगतीनं दलाली करतात.

शिक्षणमहर्षी म्हणवून घेण्यासाठी नागपूरचा पुढारी आसुसलेला. आता त्याला फक्त आश्रमशाळा हवी. त्यासाठी १० लाख नगद मोजण्याच्या तयारीनिशी पोपटरावांकडे आलेला. अडचण नको म्हणून मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डनलाही त्यानं सोबत आणलेलं आहे.

पुसदचा भावी आमदार बिक्कनसिंग राठोड. त्याला त्याच्या आमदाराला नडायचं आहे. पोपटरावशी खल करतो. मार्ग सापडतो. रघुवीरचा मित्र प्रेमानंद भुसावळकर. निर्लज्जम् सदा सुखी असं बोधवाक्य घेऊन पिवळी पत्रकारिता करणारा. तो लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन दिवसांत डझनभर बातम्यांचा अंक बिक्कनसिंगला देतो. आमदार देशमुखांची पुरती बदनामी करणारा.

समाजसेवा करणारी किन्नरी तारापोरवाला, अय्याशी राजकारणी फैज अहमद बुखारी, कारकुनाचा मुलगा हृषीकेश ऊर्फ रॉकी, आमदार निवासातल्या खोल्यांमध्ये केवळ उजव्या हाताच्या अंगठ्यावरून भविष्य पाहणारे होराभूषण बाबा अमरनाथ, जनमहाकवी खग्रास सूर्यभेदी! अशी अनेक माणसं भेटतात इथं. किडनी विकणारा दुबेही इथंच राहायचा.

या कादंबरीला सलग असं एक कथानक नाही. तुकड्या-तुकड्याने ती पुढं सरकत राहते. पण या प्रत्येक तुकड्याला सांधणारा दुवा म्हणजे पोपटराव. हा प्रत्येक तुकडा अस्वस्थ करणारा. आपल्या लोकशाहीबद्दल आणि पिळवणूक करणाऱ्यांबद्दल संताप निर्माण करणारा. वांझ संताप.

खादीशुभ्र, अटारणे असे शब्द; मंत्रालय ते आमदार निवास हाच खरा दलाल स्ट्रीट अशी विधानं. भाषा वेगळी, भन्नाट. मंत्रालयाचा अख्खा परिसर उभा राहतो डोळ्यांपुढे. ग़म तो इसका है, ज़माना है कुछ ऐसा खरिदरा। एक मुज़रिम दुसरे मुज़रिम को कहता है बुरा..., शुक्रिया ऐ मेरे कात़िल, ऐ मसिहा मेरे। जहर जो तूने दिया, वो दवा हो बैठा... अशा पानापानावरच्या ओळी. नायकाची मन:स्थिती दाखवतात त्या. शि. द. फडणीस यांचं मुखपृष्ठ बेफाम. टोकाचा उपहास हसवतो आणि दगड झालेल्या मनावर एकेक ओरखडाही उठवत राहतो.
...
(पूर्वप्रसिद्धी : दि. २० जून २०१०)

एका लेखकाचा मृत्यू


मधल्या काळात बरेच दिवस माझ्या इ-मेलची सिग्नेचर दोन ओळींची होती. नंतर ती बदलली. त्या ओळी फार नकारात्मक वाटतात. शक्य असतील तर बदलाव्यात, असं एकानं सुचवलं म्हणून. त्या जागी नवीन काही आलं नाही.


सर से सीने तक कही, पेट से पाव तक कही
इक जगह हो तो कहें, दर्द इधर होता है...

ओळी कुठून घेतल्या होत्या, हे पक्कं माहीत आहे. पुरुषोत्तम बोरकर यांच्या लिखाणातलं आणि मनाला भिडलेलं होतं ते. हे त्यांच्या पुस्तकात आहे की, त्यांनी पाठविलेल्या कुठल्या इ-मेलमध्ये, ते शोधावं लागेल. सिग्नेचरमधल्या त्या ओळी उडवल्या. मनातून काही खोडल्या गेल्या नाहीत.

ही गोष्ट शुक्रवारची (दि. १९ जुलै). फेसबुक पाहत असताना पुस्तकांशी संबंधित गटात एका तरुणानं आपली इच्छा व्यक्त केली होती – मला पूर्ण वेळ लेखन करून जगायचं आहे. शक्य आहे का ते?

त्यावर प्रतिक्रिया देण्याची इच्छा झाली - मराठीत तूर्तास तरी असं काही संभवनीय नाही. लिहिण्याची हौस वगैरे ठीक. पण मराठीत लिहून पोट भरण्याची खात्री नाही... असंच लिहायचं होतं. तेवढ्यात खालच्या काही प्रतिक्रिया पाहिल्या. एक-दोघांनी त्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला होता. चेतन भगत वगैरे नावे देऊन. पण बऱ्याच प्रतिक्रिया माझ्या मताशी जुळणाऱ्याच होत्या.

पुस्तकप्रेमींच्या गटातून बाहेर पडलो. डोळ्यांसमोर पुढची पोस्ट आली ती पुस्तकाशी संबंधितच. पुरुषोत्तम बोरकर यांच्या निधनाची (वाईट) बातमी देणारी. खरं तर त्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये आलेली ही बातमी वाचली नव्हती. आणि दुपारचं जेवण करून थोडं निवांत म्हणून बसलो असताना, ही बातमी. हादरलोच.

सुन्न व्हायला झालं. ते दुखणं पुन्हा फणा काढून वर आलं! वेदना होतीच. कुठे होती, किती होती, कशी होती... हे नाही सांगता येणार. बोरकर यांच्या बोलण्यातून ती अधूनमधून जाणवायची. त्यांच्या विनोदाच्या, उपहासाच्या, टवाळीच्या लिहिण्यातून हा आपादमस्तक व्यापून राहिलेला दर्द पाहिलेला आहे.

आठवायला लागलो, बोरकरांशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं ते? फार दिवसांपूर्वी. किमान वर्षभरात तरी त्यांच्याशी संवाद झाला नव्हता. फोनवरून नाही किंवा इ-मेलवरूनही. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात का कुणास ठाऊक, त्यांची आठवण झाली होती. करू नंतर फोन म्हणून हातात घेतलेला फोन बाजूला ठेवून दिला होता तेव्हा.

शेवटचं बोलणं खरंच कधी झालं होतं? बोरकरांचं वऱ्हाडी गोडव्याचं बोलणं कधी ऐकलं होतं? मग आठवलं की, पत्नीची तब्येत कशी आहे, हे विचारण्यासाठी मध्यंतरी कधी तरी त्यांना फोन केला होता. कर्करोगाशी चालू असलेली झुंज अखेर संपल्याचं त्यांनी तेव्हा सांगितलं. त्यानंतर एक-दोनदा बोललो असू आम्ही कदाचित. इ-मेलवरून संवादही खूप महिन्यांपूर्वी झाला. एवढ्यात तर त्यांची इ-मेल नाही किंवा कुठल्या लेखनावर प्रतिक्रियाही नाही. या दीड वर्षामध्ये एवढं लिहिलं आणि त्यातल्या कुठल्याच लेखनावर त्यांना व्यक्त व्हावं वाटलं नाही? त्यांची एखाद्या ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही, हे लक्षात कसं आलं नाही?

सध्या काय चालू आहे, नवीन संकल्पना काय आहे, हेही बोरकर यांनी एवढ्यात कळवलं नव्हतं. नवीन काही हाती लागलं किंवा कल्पना सुचली की, ते उत्साहानं फोन करून सांगत. बरोबर वर्षापूर्वी आलेली त्यांची इ-मेल. त्यात एवढंच विचारलं होतं – मोबाईल नंबर बदलला काय? कृपया नवीन नंबर कळवा. काही मायना नाही, एखाद-दोन काव्यपंक्ती नाहीत. काळजाला हात घालणारा शेर नाही. बोरकरांचीच इ-मेल होती का ती?

न राहवून मोबाईलमध्ये असलेला बोरकर यांचा क्रमांक काढला. कोण कुणाचं सांत्वन करणार? फोन कोण घेईल बरं - घेईल की नाही? काही बोलेल की बोलणार नाही? बोरकरांचे चिरंजीव केदार यांनी फोन घेतला. काय झालं, कसं झालं... सगळं काही सांगितलं. नाव सांगितल्यावर त्यांनी ओळखलंही. मुंबई-पुण्यातून, महाराष्ट्रातून कुठून कुठून फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. खूप वेळ बोललो. बऱ्याच आठवणी. बोलताना कळलं की, गेल्या वर्षभरापासून ते इ-मेल वगैरेपासून थोडं लांबच होते. डोळ्यांचा त्रास होता काही तरी. बोरकरांना बुधवारी रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. तीव्र झटका. सगळा दहा-पंधरा मिनिटांचा खेळ! रुग्णालयात न्यायलाही जमलं नाही. कुणाला काही न सांगता, निरोपही न घेता एक लेखक सहजपणे निघून गेला.

पुरुषोत्तम बोरकर नावाच्या भन्नाट लेखकाची ओळख होण्याचा योग होता नशिबात! त्याला जून-जुलैमध्ये बरोबर नऊ वर्षं झाली. निमित्त ठरलं एक छोटा लेख. पुस्तकांविषयी आठवड्याला लिहीत होतो. संग्रहात असलेली पुस्तकं. त्यांचा साधा परिचय. तो वाचल्यावर पुस्तक पाहायची-चाळायची, वाचायची इच्छा व्हावी असा. गाजलेली पुस्तकं घ्यायची नाहीत. या आठवड्यात कोणत्या पुस्तकावर लिहायचं बुवा, असा प्रश्न डोक्यात घोळत असताना, कधी तरी घेऊन ठेवलेलं आमदार निवास रूम नं. १७५६ हाताला लागलं. शरण तुला, दलाला!’ या शीर्षकानं लेख २० जून २०१० रोजी प्रसिद्ध झाला.

तोपर्यंत साधारण २०-२२ पुस्तकांवर लिहून झालं होतं. सनसनाटीबद्दल लिहिल्यावर श्री. ल. ना. गोखले यांनी इ-मेलवरून चौकशी केली होती. बाकी कुणी नाही. आमदार निवासबद्दल लिहून झाल्यानंतर दोन दिवसांनी कार्यालयात कुणी तरी सांगितलं, तुझ्यासाठी बोरकरांचा फोन आला होता. नुसत्या आडनावावरून काही कळलं नाही. त्यांनी आपला क्रमांकही दिला नसावा. दिला असला, तरी तो लिहून घेण्याची तसदी संबधिताने घेतली नसेल बहुतेक.

दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर तासाभरात फोन आला. कुलकर्णीसाहेब... नाही का मी पुरुषोत्तम बोरकर बोलतोय. तुम्हाला माझी इ-मेल मिळाली ना? भाऊ, काय सुंदर लिहिलं हो तुम्ही पुस्तकावर!’ साक्षात लेखकाचा फोन. पसंतीची दाद देणारा. पण त्यांची इ-मेल मिळाली नव्हती. नंतर ती मिळाली, तर ते पत्र जोडलं गेलेलं नव्हतं. दोन-तीन फोननंतर आणि साधारण आठवड्याच्या प्रयत्नांनंतर इ-मेल आली. अडचण येऊ नये म्हणून सोबत फाँटची सगळी माहिती असलेलं जोडपत्र.

पत्राचा मायनाच अक्षरस्नेही होता. कृत्रिम वाटणारं विशेषण. मुद्दाम जोडलेला शब्द वाटावा. थेट भेटीत लक्षात आलं की, हे विशेषण अकृत्रिम स्नेहातून आलं होतं. आपलं पुस्तक कुणा एकाला आवडलं आणि त्याला त्यावर लिहावं वाटलं, याचा आनंद बोरकरांना लपविता आला नव्हता. रसिकराज वाचक म्हणून त्यांनी गौरव केला. फोन नंबर आणि घरचा पत्ताही विचारलेला. नवी कादंबरी १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी त्यांनी प्रकाशकाकडे दिली होती. ती दोन महिन्यांत प्रकाशित होणार होती. तिची प्रत पाठविण्यासाठी पत्ता हवाच. मेड इन इंडिया वाचली का? नसेल तर तीही कुरीअरने पाठवून देतो, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यांच्या या इ-मेलला जुलैला उत्तर दिलं. एका पत्रकारानं नाही, तर भारावलेल्या, लेखक-भक्त वाचकानं जसं लिहावं तसं.

बोरकर तेव्हा पुण्यातच होते. पिंपळे सौदागरला मुलासह राहत होते. केदार तिथं नोकरी करीत होता. फोनवर विचारून एक दिवस लेखकमहोदय थेट कार्यालयात हजर झाले. सिटी बसने एवढा लांबचा प्रवास करून. आपल्या चाहत्याला भेटण्यासाठी म्हणून. साधा शर्ट-पँट, जॅकेट. डोळ्यांना चष्मा. चष्म्याआडून चमकणारे डोळे. त्यात खूप कुतुहल. गोल चेहऱ्यावर दिसणारी आपुलकी नि हसू. खांद्यावर अडकवलेली शबनम. खूप जुनी ओळख असल्यासारखं बोलले ते. संपादकांची ओळख करून देतो म्हणालो, तर ते काही उत्सुक दिसले नाहीत. तुम्हालाच भेटायला आलो, म्हणाले. एक लोकप्रिय लेखक संपादकाची ओळख करून घेण्यासाठी आसुसलेला नव्हता.

अधूनमधून फोन चालू राहिले आमचे. एके दिवशी बोरकरांनी धक्का दिला. नवी कादंबरी तुम्हाला अर्पण करतोय, असं त्यांनी सांगितलं. अरेच्चा! हा सगळाच अनुभव माझ्यासाठी नवीन. १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारीच्या अर्पणपत्रिकेचं प्रूफ त्यांनी पाठवलं. त्या चौघांमध्ये मी एक. पहिल्यांदाच अर्पणपत्रिकेत नाव. तेही भन्नाट, वेगळं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकात. काही दिवसांनी त्यांनी कादंबरीही पाठवली. ती अर्थातच एका बैठकीत वाचून झाली.

यथावकाश बोरकर कुटुंबानं पुणं सोडलं. मीही स्वगृही परतलो. इ-मेलवरून संपर्कात होतो. अधूनमधून बोरकरांचा फोन येई. कधी कुलकर्णीसाहेब, तर कधी आहात का राजे जागेवर!’ असं मिठ्ठास भाषेत विचारत. बोलताना बरं का भाऊ, तुम्हाला वाटेल की, हा बोरकर काईचा काई सांगून राह्यलाय बरं... असं सगळं खास वऱ्हाडी हेलात असे. खूप वेळ फोन चालत आमचे. पुस्तक लिहिण्याचा आग्रह करत ते.

अस्वस्थतेतून आम आदमीच्या कविता लिहिण्याचा नाद लागला. चालू घडामोडींवर टीका-टिप्पणी, कवितेच्या शैलीत. त्याचं पद्यासारखं वाटणारं गद्य असं नामकरण केलं. अशाच एकदा बारा-चौदा रचना बोरकरांना वाचण्यासाठी इ-मेलवरून पाठवून दिल्या. त्या सगळ्या एका बैठकीत वाचून त्यांनी रात्रीच कधी तरी फोन केला. त्यांनी केलेल्या कौतुकानं अक्षरश: भारावून जायला झालं.

सविस्तर प्रतिक्रिया कळविण्यासाठी बोरकरांनी जून २०१३ रोजी इ-मेल पाठविली.
अहले-जुबाँ भी आखिर गूंगे बने हुए है
जिंदा रहेंगे कब तक मुर्दा जमीर लेकर...
असं लिहीत त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं. या रचनांमधून जनतेच्या दुःखनाडीवर बोट ठेवले आहे, असं लिहितानाच आणखीही काही अतिशयोक्त असणारी (वाटणारी नव्हे!) विशेषणं अस्मादिकांबद्दल वापरली होती. अहले-जुबाँ म्हणजे सरस्वतीपुत्र, असा अर्थ त्यांनीच त्यात दिला.

बोरकरांनी पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव केला होता. त्या खुशीतच त्यांचं हे कौतुकपत्र काही जणांशी शेअर केलं. ते वाचून कवी संजय बोरुडे यांनी लिहिलं – मेड इन इंडियाआमदार निवाससारख्या पुस्तकांनी बोरकरांनी मराठी साहित्याला अस्सल देशी लेणे बहाल केले आहे. त्यांची दाद म्हणजे आपल्या लेखणीचा अजोड सन्मानच!

एव्हाना बोरकरांना काही अडचणी जाणवू लागल्या होतं, असं जाणवलं. नव-नायकांच्या चरित्रलेखनाचं, पुस्तकांचं शब्दांकन करून देण्याचं काम ते करीत. तुमच्याकडे साखर-सम्राट, सहकार-सम्राट भरपूर आहेत हो. एखादं काम असेल त्यांचं तर सांगा हो भाऊ मला, असं म्हणत ते. पत्रकार म्हणून माझ्याबद्दल त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या. एखाद्या स्वप्निल कवी-लेखकासारख्याच. अचानक त्यांनी १९ ऑगस्ट २०१३ला इ-मेलमधून चार वात्रटिका पाठविल्या. सध्याचं लेखन म्हणून.
कोनाड्यातील हे दीपस्तंभ
हे विजेरीतले दिवे
खुराड्यातच झेपा घेती
हे गरुडांचे थवे
ही वात्रटिका निवडणुकीच्या काळात लिहीत असलेल्या एका सदरात वापरली. त्यांना तसं कळवलंही.

माझं पहिलं पुस्तक जून २०१४मध्ये प्रसिद्ध झालं. त्याची प्रत पुरुषोत्तम बोरकर यांना न पाठवणं शक्यच नव्हतं. पुस्तक मिळाल्याबरोबर ते वाचून त्यांनी ११ जूनला लगेच इ-मेलनं पत्र पाठवलं. अक्षरस्नेही सतीशभाऊ अशी सुरुवात करून त्यांनी लिहिलं होतं – पहिलं पुस्तक कुरवाळण्याचा आनंद काही औरच असतो. अवर्णनीय असतो. या तुमच्या आनंदात मीही मनापासून सहभागी आहे. एका नवोदित लेखकाला आपल्या बिरादरीत किती सन्मानानं सामावून घेण्याचा हा प्रयत्न. केवढी आपुलकी. पुढं त्यांनी लिहिलं की, तुम्ही दुसऱ्यांच्या व्यथावेदनांनी छिन्न-खिन्न होत असता. पोतराज होऊन चाबकाचे फटके आपल्या हाताने आपल्याच पाठीवर मारून घेत असता. पण इलाज नसतो. याबाबतीत एक शेर आठवतो :
ये कहना हमने ही, तूफाँ में डाल दी कश्ती
कसूर अपना है, दरिया को क्या बुरा कहना...

असं कौतुक करून झाल्यावर बोरकर मग आपल्या मूळ स्वभावाला साजेसं लिहितात – पहिले अपत्य दणदणीत झाले. मात्र याबाबतीत नियोजन वगैरे करू नये! म्हणून मैत्रीप्रीत्यर्थ अशा शुभेच्छा देतो की, किमान अष्टपुस्तकी लेखक भव:’. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. पुस्तकावर त्यांनी मोठा लेख लिहिला आणि तो २८ जून रोजी इ-मेलने पाठविला. का कुणास ठाऊक, त्या इ-मेलचा मायना रिस्पेक्टेड सर असा होता. त्याच्या दुसऱ्याच रात्री दीर्घ काळ आमचा फोन चालला. पत्राला उत्तर न दिल्यामुळं नाराजी जाणवली. पण बहुतेक सगळं बोलणं जगण्यातल्या अडचणींबद्दल चाललं होतं.

पुस्तकाच्या वेळी बोरकरांमधल्या बेरकी, अनुभवी, जाणत्या लेखकानं एक सल्ला दिला - आता एक प्रकाशन डायरी आणा. त्यातली पुरस्कारांची यादी पाहा. प्रत्येकाला द्या एक एक पुस्तक पाठवून... हां, अजिबात लाजायचं नाही. त्यांचा हा सल्ला पाळला नाही.


पु. ल. देशपांडे आणि बोरकर.
त्यांच्या स्मार्ट फोनच्या डीपीवरून घेतलेलं हे छायाचित्र.

मेड इन इंडियाबद्दल मी काय लिहावं! एवढं नक्की की, ती हातात घेतल्यावर पूर्ण वाचूनच खाली ठेवली. तिचा नायक पंजाबराव. त्याला जगण्यात विलक्षण रस आहे. क्रिकेट, राजकारण, सिनेमा, संगीत, साहित्य, वृत्तपत्रं, लेखन-वाचन…. सगळ्यांमध्ये त्याला रुची आहे, गती आहे. त्याच्या बोलण्यावरून ते समजतं. बोरकर यांची तीन-चार वेळा भेट झाल्यावर आणि खूप वेळा फोनवर बोलल्यामुळं आता वाटतं की, पंजाब म्हणजे खुद्द पुरुषोत्तम बोरकर असावेत! तेच हजरजबाबी बोलणं, त्या कोट्या, ते व्यथित होणं, ती जुनी गाणी, ते शेर...

बोरकराचं स्वतंत्र लेखन गेल्या काही वर्षांत जवळपास थांबल्यासारखं झालं होतं. वृत्तपत्रातली नोकरी त्यांनी केव्हाच सोडली होती. केवळ लेखनावर जगत होते ते. चरित्रात्मक पुस्तकांचं शब्दांकन करीत. त्यासाठी त्यांची अपेक्षाही कधीच मोठी नव्हती. बरं का सतीशभौ, आपल्याला काय, महिन्याला २०-२२ हजार रुपये मिळाले तरी बास. शबनम गळ्यात अडकवून, पेन-ड्राइव्ह खिशात ठेवून ते खामगावहून पुण्याला अधूनमधून चक्कर मारत. अशातच त्यांच्या पत्नीला कर्करोग झाला. नित्य उपचार मोठे खर्चिक होते. त्या चिंतेनं त्यांना दीर्घ काळ पिडलं. उपचारासाठी मदतीचं आवाहन करणारी बातमीही प्रसिद्धीसाठी पाठविली होती. पण त्यातून काहीच साधलं नाही. लेखकाच्या डोक्यावरचं चिंतेचं ओझं कमी झालं नाही. मन असं थाऱ्यावर नसताना, तेव्हाही त्यांच्या डोक्यात कॅन्सरचे दिवस असं पुस्तक लिहिण्याची कल्पना घोळत होती.

चरित्र लिहिता येईल, अशी दोन माणसं मला नगरमध्ये आढळली. नगरमधल्या महनीय व्यक्तींची ओळख करून देणारं एक पुस्तक पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. उपयोगी पडेल म्हणून त्याची प्रत बोरकरांना पाठवून दिली. त्यातल्या एकाला भेटायला म्हणून ते नगरमध्ये आले होते. थकलेले, दमले-भागलेले, काही तरी हरवलेले. घरी आले. तासभर बसले. गप्पा मारल्या. खरं तर त्यांच्या त्या नगरच्या मुक्कामात मैफल रंगवायची होती. त्यांचं लेखन मनापासून आवडणाऱ्या तिघा-चौघांना सांगितलं होतं. पण बोरकरांना असं काही नको होतं. नको. कुणाला बोलवू नका. मी तुमच्या घरी येईन, थोडा वेळ बसेन, थोडं काही खाईन आणि माझ्या कामाला जाईन, असं त्यांनी स्वच्छ शब्दांत सांगितलं.

नगरमधली दोन कामं त्यांना मिळाली नाहीत आणि दोन मिळाली. लेखनाचं पूर्ण झालेलं काम द्यायला ते येणार होते. आले असणारच. पण न भेटताच गेले. त्या पुस्तकाची त्यांनी सांगितलेली रक्कम पुरुषोत्तम बोरकर नावाला न्याय देणारी नव्हती. काही वेळा तर शब्दांकनाचं श्रेय देणंही टाळल्याचं त्यांनी एकदा व्यथित होऊन सांगितलं होतं.

स्वातंत्र्यानंतर खेड्यातली बदललेली मूल्ये आणि खेड्यांनी गमावलेली स्वतःची ओळख, याची कथा मेड इन इंडियामध्ये ओघवत्या शैलीत, बोचकारत, हसवत, उपहास करीत मांडली आहे. एका वेगळ्या धाटणीची कादंबरी. ती लिहिणाऱ्या बोरकरांना लेखक म्हणून स्वतंत्रपणे जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी एका राजकीय पक्ष-संघटनेच्या मुखपत्राच्या संपादनाची स्वीकारलेली जबाबदारीही तीन-चार महिन्यांतच सोडून दिली. बोरकरांनी लेखक म्हणून तीन कादंबऱ्यांच्या माध्यमातून खूप काही दिलं. त्यांना काय मिळालं?

फक्त आणि फक्त लेखनाच्या बळावर जगण्याच्या लेखकाच्या त्या बाण्याचं, स्वप्नाचं काय झालं, याचं विदारक वास्तव समोर आहे. एका इ-मेलमध्ये बोरकरांनी लिहिलेला हा शेर त्यांनाच केवढा लागू पडतो -
झुकता नही तो काट दे सर मेरा जिंदगी
मुझसे मेरे गुरूर की कीमत वसूल कर...
...
(अवश्य वाचा - शरण तुला, दलाला!’ - https://khidaki.blogspot.com/2019/07/AamdarNiwas.html)

Saturday 20 July 2019

जर-तरच्या गोष्टी...

इट्स कमिंग होम... विश्चचषक अखेर घरी आल्याचा आनंद. (सौजन्य : www.theguardian.com)

(विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात) सुपर ओव्हरचे नाटक रंगविण्याची गरज नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन्ही संघांना संयुक्त विजेते जाहीर करायला हवे होते.
– माईक हेसन (न्यूझीलंडच्या संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक)

या सामन्याचा खरा निकाल टाय असायला हवा होता! वास्तविक इंग्लंड व न्यूझीलंड दोन्ही संघ समान होते असे दिसले. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हे मान्य करून हस्तांदोलन करायला हवे, हे खिलाडू उत्तर झाले असते. पण पैसा, अति देशभक्ती आणि प्रेक्षागारातील गर्जना अधिक ताकदवान ठरल्या.
- सायमन जेनकिन्स (स्तंभलेखक, द गार्डियन)

मुख्य सामना व महाषट्क झाल्यानंतरही दोन्ही संघांमधील फरक ओळखता येत नसेल (त्यांच्यातील विजेता ठरविता येत नसेल) तर चषक विभागून देणे योग्य होते.
- क्रेग मॅकमिलन (न्यूझीलंड संघाचे मुख्य फलंदाजी प्रशिक्षक)

...विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आजवरचा सर्वाधिक थरारक, श्वास कोंडून धरायला लावणारा अंतिम सामना झाला. इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्या निकालानंतर अनेक जण व्यक्त होत आहेत. प्रतिक्रिया बोलून दाखवित आहेत. एकूण १०० षट्कांच्या खेळानंतर आणि त्यानंतरच्या महाषट्कानंतर (सुपर ओव्हर) इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात (किंचित का होईना) सरस कोण याचा निकाल लागला नाही. त्यामुळेच आय. सी. सी.ने स्पर्धेसाठी बनविलेल्या नियमावलीच्या (Playing Conditions) आधारे निकाल लावण्यात आला, चषकाचा मानकरी ठरविण्यात आला. ज्याचे चौकार अधिक तो संघ विजेता, अशी तरतूद त्यात होती. त्यातूनही बरोबरीच साधली गेली असती, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले असते. बाद फेरीतील सामना बरोबरीत सुटला तर निर्णयासाठी काय तरतुदी आहेत, याची चर्चा भारत-न्यूझीलंड उपान्त्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यावर झाली होतीच.

सामन्यानंतर मात्र हा रडीचा डाव आहे असं म्हणत आयसीसीवर टीका सुरू झाली आहे. त्यात माजी क्रिकेटपटू, संघटक, पत्रकार, स्तंभलेखक, सर्वसामान्य चाहते असे सगळेच आहेत. खरंच हा आय. सी. सी.नं खेळलेला रडीचा डाव होता का? आणि तसा तो असेल तर ते आधी कोणाच्या लक्षात का आलं नाही? त्याला आधी कोणी विरोध का केला नाही? स्पर्धेसाठी बनविलेल्या नियमावलीची १४० पानांची (छोट्या मासिकाच्या आकाराची) पुस्तिका आहे. कोणत्याही क्रिकेट मंडळाने, खेळाडूने, तज्ज्ञाने त्यातील तरतुदींवर आधी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही.

अधिक चौकार मारणारा संघ विजयी, या तरतुदीबद्दल गौतम गंभीर यानंही त्याच्या तडकफडक शैलीत ट्विट केलं आहे. तो लिहितो, कोणी किती चौकार मारले, यावर एवढ्या महत्त्वाच्या सामन्याचा निकाल कसा लावला जातो, हेच समजत नाही. आयसीसीचा हा नियमच हास्यास्पद आहे. गंभीर आणि अनेक जण आता तावातावाने बोलत आहेत, त्यांना या नियमावलीतील हास्यास्पद असं काही आधी आढळलं नाही का?

क्रिकइन्फोचे माजी व्यवस्थापकीय संपादक मार्टीन विल्यमसन यांनीही यावर टीका करताना वेगळं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं आहे की, अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडच्या बाजूने बेटिंग केलेल्या सर्वांचे पैसे ऑस्ट्रेलियाच्या स्पोर्ट्सबेटने परत केले! विश्वचषकाचा विजेता अशा प्रकारे ठर(वि)णं अगदीच लाजिरवाणं आहे. आय. सी. सी.च्या हास्यास्पद आणि विसंगतीपूर्ण निर्णयाची किंमत बेटिंग करणाऱ्यांना चुकवावी लागू नये, असं (आम्हाला) वाटतं, असं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

बरोबरीच्या प्रसंगात अंतिम सामन्याचा निकाल लावण्यासाठी चौकारांचाच नियम का ठेवला? ज्याचे कमी गडी बाद झाले तो संघ विजयी ठरविण्याचा नियम का नाही? चौकार जास्त मारले याचाच अर्थ त्या संघाने अधिक चेंडू निर्धाव म्हणून (डॉट बॉल) खेळून काढले. मग कमी चेंडू निर्धाव खेळणाऱ्या संघाला विजयी का घोषित करायचे नाही? हे आणि असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. नियमावली हास्यास्पद ठरविण्यात आली.

प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांनी याबाबत केलेली ट्विट डोळ्यांत अंजन घालणारी आहेत. त्यांनी लिहिलं आहे की, चौकारांच्या संख्येवर विजेता संघ ठरवणं, हा काही नवा नियम नाही. खूप दिवसांपासून तो आहे. नियमांमध्ये काही बदल हवे आहेत का, असं संघांना विचारलं जातं, तेव्हा ते आहेत ते नियम जसेच्या तसे स्वीकारतात. प्रत्येक व्यवस्थेत काही उणे-अधिक असतंच. ते खेळाडूंना दाखवलं जातं आणि ते मान्य करूनच ते खेळतात. नियमांबद्दल आरडाओरड, त्रागा करणे सर्वांत सोपं आहे. नियमात तुम्हाला अपेक्षित असलेले बदल करण्यासाठी मेहनत घेणं मात्र फार कठीण, गैरसोयीचं असतं.

ही स्पर्धा होती आणि तिचा विजेता ठरवणं आवश्यक होतं. मग तो कोणत्याही मार्गाने का ठरेना! स्पर्धा सुरू होण्याआधी नियम ठरलेले होते. ते काही अंतिम सामन्याच्या वेळी इंग्लंडची सोय पाहून बनवलेले नव्हते, हे इयान विल्यम्स यांचं ट्विट हर्ष भोगले यांच्या म्हणण्याला दुजोराच देणारं आहे.

शेवटच्या चेंडूवर धावबाद आणि विजेतेपद हुकले.
हताश मार्टीन गप्टील आणि त्याची समजूत काढणारा जिमी नीशम.
(सौजन्य : www.theguardian.com)
विजयी झालेल्या संघाचं अभिनंदन करतानाच हरलेल्या संघाचं सांत्वन करण्याला, त्यांच्या खेळाबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलण्याचा प्रघात आहे. सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणविलं जाणारं क्रिकेट त्यापासून दूर कसं असेल? इथे तर नेमकं कोण विजयी याचा निर्णय १०२ षट्कांच्या खेळानंतर न लागूनही चषकापासून वंचित राहिलेल्या न्यूझीलंडचा संघ होता. त्यामुळेच न्यूझीलंडचं सांत्वन करण्याची लाटच उसळली.

उपान्त्य सामन्यातील विजयानंतर किवीजचा कर्णधार केन विल्यमसन यानं भारतीय क्रिकेटप्रेमींची समजूत काढताना अंतिम सामन्यात पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून की काय, असंख्य भारतीयांचा पाठिंबा न्यूझीलंडला होता. विश्वचषक ब्लॅक कॅप्सनं जिंकावा असंच त्यांना वाटत होतं. या इच्छाकल्पित चिंतनाचा भंग झाल्याच्या निराशेमुळंच या प्रतिक्रिया व्यक्त होत असाव्यात. त्यात राग आहे, टीका आहे, खिल्ली आहे, टवाळी आहे. सामना इंग्लंडनं जिंकला, पण मनं न्यूझीलंडनं!’, तुझ्या विजयाहून शहरात चर्चा तर माझ्या पराभवाचीच अधिक आहे, असे डायलॉगही समाज माध्यमातून दिसतात.

इंग्लंडच्या विजयापेक्षा न्यूझीलंडचा पराभव पचवणं भारतीय चाहत्यांना अधिक जड गेलेलं दिसतं. भारताची अंतिम फेरीची संधी हुकवणाऱ्या न्यूझीलंडच्या विरोधात आपले क्रिकेटप्रेमी असणं स्वाभाविक मानलं गेलं असतं. मागच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीयांच्या सदिच्छा न्यूझीलंडच्या बाजूने होत्या. त्याचं कारण म्हणजे अंतिम सामन्यातला दुसरा संघ होता उपान्त्य फेरीत भारताला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा. त्या पार्श्वभूमीवर इथं चित्र उलटंच. साखळीत भारताची विजयी घोडदौड थांबविणारा इंग्लंड संघ समोर होता, हे त्याचं निमित्त असावं. दीडशे वर्षं राज्य करणाऱ्या इंग्रजांवर आपला राग आहेच. न्यूझीलंडला दिलेल्या पाठिंब्यातून इंग्लंडबद्दलचा राग, चीड व्यक्त होत असावी का?

विश्वचषकापासून अगदी थोड्या अंतरानं लांब राहिलेल्या न्यूझीलंडचा खेळ चांगलाच झाला. त्याचं कौतुक व्हायला हवंच. पण ते कौतुक अशा पद्धतीने केलं जात आहे की, वाटावं इंग्लंडचा खेळ जणू अगदीच भिकार झाला. त्या दर्जाचा खेळ न करताच त्यांना विश्वविजेतपद मिळालं (किंवा मिळवून दिलं गेलं!) आहे. वस्तुस्थिती तशी नाही. खरं तर न्यूझीलंडच्या अगदी घशात गेलेला हा सामना इंग्लिश खेळाडूंनी दोन ते तीन वेळा अलगद बाहेर काढला.

ज्यावर विश्वचषक विजेता ठरला, त्या चौकारांचीच गोष्ट पाहू या. न्यूझीलंडच्या फलंदाजांना १९.२ ते ३४.३ षट्कांच्या दरम्यान एकही चौकार मारता आला नाही. विसावं षट्क टाकणाऱ्या अदिल रशीदच्या पहिल्या चेंडूवर केन विल्यमसनने चौकार मारला. त्यानंतर ९३ चेंडूंनंतर तो सीमापार झाला. एवढी कंजूष गोलंदाजी करणाऱ्यांना, प्रामुख्यानं रशीद व लियम प्लंकेट यांच्या कौशल्याला दाद द्यायला हवी की नको? तीच गत शेवटच्या ११ षट्कांची. त्यात न्यूझीलंडला फक्त एक चौकार व एक षट्कार मारायला जमलं. ज्या षट्कांमध्ये धावांची गती वाढविली जाते, संधी शोधून फटकेबाजी केली जाते, त्या षट्कांमध्ये इंग्लिश गोलंदाजांनी एवढा अचूक, किवी फलंदाजांना जखडून ठेवणारा मारा केला नसता, तर..?

शिस्तबद्ध, अचूक गोलंदाजी करणाऱ्या कॉलीन डी ग्रँडहोमनं आपल्या पहिल्याच षट्कात जॉनी बेअरस्टोचा झेल सोडला. किंवा त्याच्याकडून तो सुटला. त्या वेळी बेअरस्टो १८ धावांवर खेळत होता. त्यानंतर २९ धावांची भर पडल्यावर न्यूझीलंडला दुसरं यश मिळालं. बेअरस्टो आणखी १८ धावा काढल्यावर बाद झाला. तो झेल ग्रँडहोमनं तेव्हाच पकडला असता, तर..?

न्यूझीलंडच्या डावातली सर्वांत मोठी ७४ धावांची भागीदारी दुसऱ्या जोडीसाठी झाली. बेन स्टोक्स व जोस बटलर यांनी नाजूक अवस्थेतून संघाला सावरता पाचव्या जोडीसाठी ११० धावा जोडल्या. शेवटच्या काही षट्कांत अतिशय दमलेला, धापा टाकणारा स्टोक्स धाव पळताना कुचराई करीत नव्हता. त्याच्या या झुंजार खेळीचं महत्त्व नाही का अजिबात. त्यानं असा झुंजार खेळ केला नसता, तर..?

दोन्ही संघांची षट्कं आणि धावा याची तुलना केल्यावर दिसतं की, अगदी पंचेचाळिसाव्या षट्कापर्यंत इंग्लंड न्यूझीलंडहून मागंच होतं. शेवटून दुसऱ्या षट्कात नीशमच्या गोलंदाजीवर स्टोक्सने मारलेला फटका ट्रेंट बोल्टच्या हातात गेला. तेव्हा त्याला तोल सावरता आला नाही आणि त्याचा पाय सीमारेषेवर पडला. त्यानंतर स्टोक्सने २२ धावा कुटल्या. हा झेल झाला असता, तर..?

वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्राथवेटचा झंजावात पाहता न्यूझीलंडचा साखळी सामन्यातला पहिला पराभव तिथेच झाला असता. त्या वेळीही नीशमच्याच गोलंदाजीवर शेवटून दुसऱ्या षट्कातच बोल्टनेच त्याचा सीमारेषेवर अफलातून झेल घेतला होता. तेव्हाही असाच तोल गेला असता, तर..?

क्रीजमध्ये पोहोचल्यानंतर आपण हे हेतुत: केलं नाही असं स्पष्ट करीत बेन स्टोक्सने
केलेली कृती माफी मागणारी होती.

(सौजन्य : www.cricket.com.au)
मार्टीन गप्टीलने केलेली फेक स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सीमापार गेला. यात स्टोक्सचा तसा काहीच दोष नव्हता. तसं त्यानं लगेच हातवारे करून स्पष्टही केलं. एवढंच काय चेंडू सीमेकडं जात असताना दोन्ही फलंदाज धावले नाहीत. या चेंडूवर पाचऐवजी सहा धावा देण्याची चूक पंचाकडून झाली. त्यात ना स्टोक्स सहभागी होता ना त्याचा संघ. पंचांची ही चूक म्हणजे निर्णय घेण्यातली त्रुटी होती, असं ती दाखवून देणारे माजी पंच सायमन टॉफेल म्हणतात. ही एक धाव कमी गेली असती, तर न्यूझीलंड जिंकलंच असतं असं मानायला तेही तयार नाहीत. ओव्हर-थ्रोचा चौकार देऊ नका; पळून काढल्या तेवढ्याच दोन धावा असू द्या, अशी विनंती स्टोक्सनं पंचांना लगेचच केल्याचं बेनचा सहकारी जेम्स अँडरसन यानं नंतर सांगितलंच. (आपण असं काही केलं/सांगितलं नाही, असा खुलासा नंतर स्टोक्सनं केला.)

थोडक्यात ही सगळी असं झालं असतं तर... आणि तसं झालं नसतं तर... या पद्धतीची कहाणी आहे. स्पर्धेची न पटणारी नियमावली, काही घडलेल्या आणि काही बिघडलेल्या गोष्टी यावर चर्चा चालूच राहणार.

वास्तव एवढंच आहे की, इंग्लंडनं सामना जिंकला आहे. न्यूझीलंडपेक्षा आठ चौकार अधिक मारून. इंग्लंडनं पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, हेच खरं. अगदी नेमकेपणानं आणि समालोचक व माजी क्रिकेटपटू ईशा गुहा हिच्या शब्दांचा आधार घेऊन सांगायचं, तर इंग्लंडच्या पुरुष संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, हेच सत्य आहे!
...

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू केन विल्यमसन. सचिनच्या हस्ते त्यानं हे उत्तेजनार्थ पारितोषिक स्वीकारलं.
(सौजन्य : www.dnaindia.com)
पुरस्कार देऊन सांत्वन?
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याची निवड झाली. एकूण परिस्थिती पाहिली, तर न्यूझीलंडचं सांत्वन करण्यासाठी म्हणून त्याची निवड झाली असावी, अशी शंका यावी. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यमसन (एकूण धावा ५७८) चौथा आहे. स्पर्धेत पाच शतकं झळकाविण्याचा विक्रम करणारा रोहित शर्मा (६४८) पहिल्या क्रमांकावर आणि त्याच्या पाठोपाठ डेव्हिड वॉर्नर (६४७) आहे. बांगला देशाचा शकीब अल हसन याच्या धावा ६०६ आणि बळी ११. अगदी अफलातून अष्टपैलू खेळ. इंग्लंडच्या पहिल्या आणि शेवटच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या स्टोक्सनं ४६५ धावा केल्या आणि सात बळी घेतले. क्षेत्ररक्षण करतानाही तो उठून दिसला. पण स्पर्धेचा नायक ठरण्याऐवजी हा खेळाडू खलनायक म्हणविला गेला! रोहित, वॉर्नर व शकीब यांचा विचार का झाला नाही, हे कधीच कळणार नाही. खिलाडू वृत्ती व चतुरस्त्र नेतृत्व यामुळे विल्यमसनचं पारडं अधिक जड झालं, असं पारितोषिक वितरण करताना सांगण्यात आलं. मैदानावर खेळाडू वृत्ती दाखविणं अपेक्षितच आहे. ती दाखविली नाही, तर कारवाई होते. नेतृत्वगुणाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर विल्यमसन उजवा होता; पण तो इतरांहून फार प्रतिभावान होता, असं सिद्ध करणाऱ्या खूप काही गोष्टी नाहीत.

Friday 12 July 2019

बर्फाने गिळिले आगीच्या लोळाशी!विजयाची चाहूल लागल्यानं खूश असलेले न्यूझीलंडचे डी ग्रँडहोम, यष्टिरक्षक लॅथम, मार्टीन गप्टील व लॉकी फर्ग्युसन. (सौजन्य : www.cricket.com.au)
कागदावरचं समीकरण भक्कम होतं. मैदानात ते शांतपणे सोडविलं की, उत्तर बरोबर येणारच. पण या साध्या-सोप्या समीकरणाच्या मधल्या कुठल्या तरी दोन-तीन पायऱ्यांमध्ये गफलत झाली. आणि हमखास बरोबर येईल असं वाटणारं उत्तर सरतेशेवटी चुकलंच! भोपळा मिळाला!!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या साखळीतील शेवटचा सामना या आधी क्वचितच एवढा लक्षपूर्वक पाहिला गेला असेल. एक संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेला आणि दुसरा स्पर्धेतून बाहेर फेकला गेलेला. पण त्याच लढतीचा निकाल उपान्त्य फेरीत कोण कोणाशी खेळणार, हे ठरवणार होता.

दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि भारतीय संघाचे चाहते खूश झाले. कारण कांगारूंच्या पराभवानं गुणतक्त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आला. उपान्त्य फेरीतील सामना यजमान इंग्लंडविरुद्ध, त्यांच्या लाडक्या नि लकी मैदानावर खेळण्याचं टळलं होतं. अवघड पेपरऐवजी सोपा पेपर. इंग्लंडऐवजी तुलनेनं दुबळ्या न्यूझीलंड संघाशी मँचेस्टरच्या मैदानावर सामना. सोपं वाटत होतं. पेपर अवघड गेला! भोपळा मिळाला!!

सलग तिसऱ्या स्पर्धेत भारतानं उपान्त्य फेरी गाठली. सचिन तेंडुलकरला जसा विश्वविजेतेपदानं निरोप देण्यात आला, तशीच कर्तबगारी विराट कोहलीचा संघ दाखविल आणि महेंद्रसिंह धोनी चषक उंचावत निरोप घेईल, अशी स्वप्नं रंगवली होती चाहत्यांनी. पण ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इतिहासाची पुनरावृत्ती झाली नाही. तिथं केन विल्यमसन आणि त्याच्या भिडूंनी नवी आवृत्ती लिहिली! अंडर डॉग्ज म्हणविल्या जाणाऱ्या, इतरांच्या निकालावर ज्यांचा उपान्त्य फेरीतील प्रवेश अवलंबून होता, त्या न्यूझीलंडनं संभाव्य विश्वविजेत्यांना मात दिली.

पावसानं पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताच्या विजयाचीच खात्री तमाम भारतीयांना होती. अगदी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या डावातील राहिलेले २३ चेंडू संपल्यानंतर भारताचा डाव सुरू होण्यापूर्वीही फार कमी जणांना किवीज डाव उलटवतील, असं वाटत असावं. भारताचे फलंदाज मैदान उतरत होते, तेव्हा क्रिकविझचं प्रेडिक्टर टूल न्यूझीलंडच्या विजयाची शक्यता फक्त दोन टक्के सांगत होतं.

क्रिकेटप्रेमींच्या अंदाजाचे ते दोन टक्के त्यानंतरच्या तीन तासांमध्ये १०० टक्क्यांमध्ये परावर्तित झाले. न्यूझीलंडनं ठेवलेल्या लक्ष्याची छोटी वाटणारी टेकडी भारतीय फलंदाजांसाठी हिमालयासारखी झाली. परिणामी लॉर्ड्सवर अंतिम सामन्यात खेळण्याची तीन तपांनंतर आलेली संधी हातची निसटली.

साखळीमध्ये चांगला खेळ करीत नऊपैकी सात सामने जिंकणारा भारताचा संघ नेमका बाद फेरीच्या लढतीत असा कसा गळपटला? काय आहेत पराभवाची कारणं?

१) मधली फळी आश्वासक आणि निर्णायक खेळ करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरली.
२) चांगली सुरुवात करून, न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दडपण आणून आणि धावांना खीळ घालूनही नंतर गोलंदाजांनी हातातला लगाम सैल सोडला.
३) ऑफ स्टंपबाहेरच्या चेंडूची पाय न हलवता जागेवरूनच छेड काढण्याची जुनी खोड पुन्हा दिसून आली.
४) अपवाद वगळता क्षेत्ररक्षण खराब झाले. घेण्यासारखे पण न झालेले किमान तीन झेल; एकाच चेंडूवर दोन ओव्हर-थ्रो या चुका ठळकपणे जाणवल्या. फलंदाजी मजबूत(?) करण्याच्या नादात घेतलेल्या यष्टिरक्षकांच्या मर्यादा वर्तुळाबाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसून आल्या.
५) आधीच्या सामन्यांचा अनुभव असूनही फिनिशर धोनीकडून अपेक्षा करण्याची चूक नडली.

या सामन्याआधी भारताचा पराभव करणं फक्त इंग्लंडला साखळीत साधलं होतं. धावांचा पाठलाग करताना संघ हरला. त्या वेळी असलेलं ३१ धावांचं अंतर या वेळी १८ धावांचं झालं. पण इंग्लंडचं आव्हान तीनशेहून अधिक आणि उपान्त्य सामन्यात ते जवळपास नव्वद धावांनी कमी होतं. संघानं खेळलेल्या एकूण चेंडूंच्या दोन तृतीयांशपेक्षा थोडे अधिक चेंडू खेळणारे आणि एकूण धावसंख्येच्या दोन तृतीयांशहून थोड्या कमी धावा केलेले पहिले तीन फलंदाज एकाच वेळी अपयशी ठरले तर काय? भारताची विजयी दौड सुरू असताना हा प्रश्न वारंवार विचारला गेला. पण ती समस्या उद्भवली नाही, म्हणून तिचं उत्तर शोधण्याची तसदी कोणाला घ्यावी वाटली नाही. त्याच दाबून ठेवलेल्या दुखण्यानं नेमकी महत्त्वाच्या सामन्यात उचल खाल्ली. पराभवाचं हे एक कारण. मधल्या फळीत एका दमदार फलंदाजाची गरज होती, असा साक्षात्कार प्रशिक्षक रवी शास्त्री यांना संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यावर झाला!


रोहित शर्माला बाद केल्यानंतर 
आनंद गगनात न मावणारा मॅट हेन्री.
(सौजन्य : www.dailymail.co.uk)
लोकेश राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली, पहिल्या १९ चेंडूंमध्येच एका मागोमाग एक बाद, असं स्पर्धेत पहिल्यांदाच घडलं. या तिघांना अपयशाबद्दल तेवढा दोष देता येणार नाही. एवढं नक्की की, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना त्यांनी थोडं जास्तच डोक्यावर चढवून ठेवलं. दोन्ही सलामीवीर बाहेरचा चेंडू खेळण्याच्या मोहात झेल देऊन बसले, तर कर्णधार कोहलीला क्रॉस खेळणं नडलं. अशा परिस्थितीत अनुभवी दिनेश कार्तिक, तरुण-तडफदार ऋषभ पंत व हार्दिक पंड्या यांची जबाबदारी होती.

एकेरी-दुहेरी धावा घेत धावफलक बऱ्यापैकी हालता ठेवणाऱ्या पंत-पंड्या जोडीनं नंतर डावखुऱ्या मिचेल सँटनेरचा बाऊ केला. त्याला चौकार मारता येत नसतीलही; पण चेंडू ढकलून स्ट्राईक बदलणं शक्य नव्हतं का? हे दोघेही नंतर हेच दडपण झुगारण्याच्या प्रयत्नात आणि त्यासाठी काही तरी चमकदार करून दाखविण्याच्या आमिषाला बळी पडले. त्यांना बाद करणाऱ्या सँटनेरचं पहिल्या टप्प्यातील गोलंदाजीचं पृथक्करण होतं - ६-२-७-२. सीमारेषेवर झेल देऊन पंत बाद झाला, तेव्हा हे सारं न पाहवून विराट लगेच प्रशिक्षकाकडं गेला. ये क्या हो रहा है?’, असंच जणू त्याला विचारायचं होतं.

मधल्या फळीचं अपयश पहिले तीन फलंदाज आणि गोलंदाज यांनी साखळीत झाकून ठेवलं. त्याचा अंदाज येऊन संघाच्या व्यवस्थापनानं काही बदल करायला हवे होते. धोनीला अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर संधी देण्याचा विचार का केला गेला नाही? त्यामुळं या बुजुर्ग खेळाडूला त्याच्या डावाची घडी बसविण्यासाठी पुरेसे चेंडू मिळाले असते. तो खात असलेल्या चेंडूंचं दडपण समोरच्या फलंदाजांवर आलं नसतं. धावफलक हलता नाही, एकेरी-दुहेरी धावा निघत नाहीत यामुळे अस्वस्थ होऊन कोहली बाद झाल्याचं दोन सामन्यांमध्ये पाहायला मिळालं होतंच की.

शेवटच्या षट्कांमध्ये धावांचा वेग वाढविण्यात फलंदाज जसे अपयशी ठरले, तसेच गोलंदाजही शेवटच्या षट्कांमध्ये काबू ठेवण्यात फिके पडले. न्यूझीलंडनं शेवटच्या १० षट्कांमध्ये ८४ धावांची भर घातली. दुसऱ्या दिवशी त्यांनी २३ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. अंतिमतः त्याच आपल्याला महाग गेल्या, असं म्हणता येईल. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री व लॉकी फर्ग्युसन यांनी पहिल्या काही षट्कांमध्ये जेवढा तिखट मारा केला, त्याची झलकही अर्धा तास आधी जसप्रीत बुमराह व भुवनेश्वरकुमार यांच्या चार षट्कांमध्ये दिसली नाही.

विजय दृष्टिपथात आल्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या शेपटानं चांगली वळवळ करावी, असा अनुभव किमान तीन सामन्यांमध्ये आला. विजय नक्की आहे, डाव गुंडाळलाच आहे, अशा समजुतीत गोलंदाज ढिले पडत होते की काय? पाकिस्तानविरुद्ध पावसानंतर झालेल्या पाच-सहा षट्कांमध्ये आपल्याला त्यांचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. बांगला देशालाही ६ बाद १७९ अशा स्थितीतून आपण २८६ धावांची मजल मारू दिली. अफगाणिस्तानच्या शेपटाला ५० धावा करू दिल्या. इंग्लंडनं २८ ते ३७ या १० षट्कांत फक्त २५ धावा केल्या होत्या. मग बेन स्टोक्सनं केलेल्या आक्रमणापुढ हतबल होत आपण शेवटच्या १३ षट्कांमध्ये १२१ धावा दिल्या. थोडक्यात वळवळ थांबविण्याऐवजी शेपटाला फणा उगारण्याची संधी आपण दिली.

रवींद्र जाडेजाच्या झुंजार खेळीतील एक षट्कार.
(छायाचित्र सौजन्य : standard.co.uk)
अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज, न्यूझीलंडचा सँटनेर यांच्यापुढे आपले फलंदाज मान तुकवत असताना आपल्या प्रसिद्ध मनगटी फिरकी गोलंदाजांची मात्रा फारशी चालली नाही. कुलदीप यादवला सात सामन्यांमध्ये सहा आणि युजवेंद्र चहलला आठ सामन्यांमध्ये १२ बळी मिळाले. गोलंदाजीचा भार खऱ्या अर्थाने वाहिला तो बुमराह, महंमद शमी व भुवनेश्वरकुमार यांनी. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजा याच्याऐवजी कुलदीपला खेळवायला हवं होतं, असा सूर बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी, समीक्षकांनी लावला होता. जाडेजा नसताच तर? या सामन्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नंतर फलंदाजी या सर्वच बाबींत त्याने ठसा उमटवला. त्याने घेतलेले दोन सुरेख झेल, निकोल्सला मामा बनविणारा चेंडू आणि रॉस टेलरला धावबाद करणारी थेट फेक...हे सगळंच अव्वल दर्जाचं होतं. त्याच्या झुंजार व धुवाधार फलंदाजीमुळेच विजयश्री काही काळ खुणावत राहिली.

इतके जवळ आणि तरीही खूप दूर...
विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात धोनी धावबाद.
धोनीच्या खेळण्यावर या स्पर्धेत बरीच टीका झाली. इंग्लंड व न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या पराभवाला त्याला प्रामुख्यानं जबाबदार धरण्यात आलं. ते मान्य नसलेला सचिन तेंडुलकर उपान्त्य सामन्यानंतर म्हणाला, प्रत्येक वेळी धोनीने येऊन सामना जिंकून द्यावा, अशी अपेक्षा करणं योग्य नाही. त्यानं अनेकदा ही कामगिरी केलेली आहे.हा पूर्वेतिहास लक्षात घेऊनच त्याच्याकडून अशी अपेक्षा केली जात होती. पण ती त्याच्याकडून पूर्ण झाली नाही, हे स्पर्धेत स्पष्ट दिसून आलं. त्यानं ३११ चेंडू खेळून २७३ धावा केल्या आणि स्ट्राईक रेट ८७.७८ आहे. पण हे आकडे सर्व चित्र स्पष्ट करीत नाहीत. चेंडू तटवून काढणारा किंवा ढकलणारा, एकेरी धावेस नकार देणारा धोनी समोरच्या फलंदाजावरचं दडपण वाढवत होता. न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्यानं अठ्ठेचाळिसाव्या षट्कापर्यंत एकही आक्रमक फटका का मारला नाही, याबद्दल प्रसिद्ध समीक्षक सिल्ड बेरी आश्चर्य व्यक्त करतात. अशा परिस्थितीत त्याच्यावर टीका होणार आणि पराभवाबद्दल जबाबदार ठरवलंही जाणार.

विजय मिळत असताना अनेक त्रुटी झाकल्या जातात. त्या सामान्य क्रिकेटप्रेमीच्या लक्षात येत नाहीत. पण हीच छोटी-मोठी दुखणी एकाच वेळी उद्भवली आणि त्याची परिणती निसटत्या, हळहळ वाटायला लावणाऱ्या पराभवात झाली. बुमराह आणि भुवनेश्वर पहिल्या दिवशी अगदी भरात असताना केन विल्यमसन व रॉस टेलर यांनी परिस्थितीशी ज्या पद्धतीने जुळवून घेतलं, ते कुणालाच जमलं नाही. न्यूझीलंडची गोलंदाजी अप्रतिम होती आणि क्षेत्ररक्षण तेवढंच उत्कृष्ट. त्या उलट आठव्या षट्कात हेन्री निकोल्स, बत्तिसाव्या षट्कात रॉस टेलर व अडतिसाव्या षट्कात जिमी नीशम यांचे झेल घेण्यात कुचराई झाली.

पराभवानं निराश झालेला तेंडुलकर म्हणाला की, भारतीय फलंदाजांनी राईचा पर्वत केला. या धावसंख्येचा पाठलाग करणं सहज शक्य होतं. प्रत्येक वेळी रोहित व कोहली यांनी भक्कम पायाभरणी करून द्यावी, असं त्यांच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांनी अचूक व नेमका मारा केला. विल्यमसनचं नेतृत्व अतुलनीय होतं.

पराभवामुळं कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमी नाराज झाले असणार, हे ओळखून विल्यमसननं त्यांच्यासाठी खास संदेश दिला – तुम्ही फार रागावला नसाल, अशी आशा आहे. तुम्ही लक्षावधी मंडळी अतिशय उत्कटपणे प्रेम करता, तो खेळ खेळण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. आणि मला आशा आहे की, अंतिम सामन्यात आम्हाला कोट्यवधींचा पाठिंबा मिळेल!’

उपान्त्य सामन्याच्या दिवशी द न्यूझीलंड हेरल्डच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेल्या बातमीचं शीर्षक आशावादी होतं - ‘Yes, We Kane’.

केन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करून दाखवलं’!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेटवर्ल्डकप संकेतस्थळावर ८ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तान्ताचं शीर्षक फार बोलकं होतं - Kohli's fire or Williamson's ice? स्वभावानं दोन टोकांवर असलेले हे दोन कर्णधार.

शेवटी बर्फानं आपल्या गारव्यानं आगीचा लोळ गिळून टाकला, हे खरंच!

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...