Sunday 19 July 2015

सत्संग!


गोष्ट तशी फार जुनी नाही. नेमकं सांगायचं तर दोन वर्षं नि एक महिन्यापूर्वीची आहे आणि तीन दिवसांपूर्वीची आहे. म्हणजे 13 जून 2013 रोजीची आणि 15 जुलै 2015 रोजीची. गोष्ट एका पुस्तकाची आहे आणि त्यामुळे भेटलेल्या एका वेगळ्या माणसाची आहे.

माझ्या मुलाचे मामा श्री. अशोक कानडे यांनी 13 जून 2013 रोजी माझ्या वडिलांना एक पुस्तक भेट दिलं. पुस्तकाचं नाव - "हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन'. लेखक - श्री. एम्.. अनुवादक - श्री. वि. पटवर्धन. आवृत्ती तिसरी. पाने - 362. किंमत 295 रुपये.

या पुस्तकाचा विषय पूर्णपणे अध्यात्माचा. अर्थातच तो आपला नाही, असं समजून पुस्तक हातात घेतलं आणि ठेवून दिलं. अध्यात्म, योग, साधू, चमत्कार या विषयाची आवडच असावी लागती. वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी. मुलगा मला परवा परवापर्यंत "नास्तिक' म्हणत होता. आस्तिक आहोत की अज्ञेयवादी, याच्या उत्तराचा शोध माझ्यापुरता चालू आहे. "नास्तिक' म्हणवून घ्यायला आवडलं असतं; पण तेवढा मनाचा खंबीरपणा नाही अजून. तो येईल की नाही, हे सांगणं कठीण आहे. असो!

वडिलांनी श्री. एम. यांचं आत्मकथन वाचून पूर्ण केलं. एकदा असंच कधी तरी वाचायला नवं काहीच नव्हतं आणि तेव्हाच श्री. एम. यांचं आत्मकथन हाती लागलं. त्यातली काही पानं वाचली. जरा वेगळी वाटली. श्री. एम. नावाच्या माणसाचा प्रवास, त्याला आलेले थरारक अनुभव - काही अद््भुत आणि अविश्वसनीय वाटण्याच्या कोटीतील, एका वेगळ्या जगाच्या प्रवासाचं आपल्या नेहमीच्या भाषेत वर्णन... नक्कीच वाचनीय आहे हे सारं, असं वाटलं. तरीही ते पुस्तक एका बैठकीत हातावेगळं करावं असं नाही वाटलं.

आमचा एक साधा-सरळ-सज्जन मित्र लक्ष्मीकांत दिवाणी ऊर्फ लखू पटेल अलीकडच्या सात-आठ वर्षांत याच अध्यात्माच्या रस्त्याकडं वळला आहे. वडिलांनी ते पुस्तक त्याला वाचायला दिलं.

साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी कधी तरी "श्री. एम.' नगरमध्ये येऊन गेल्याचं कळलं-वाचलं आणि पुस्तक आठवलं. त्यांना भेटायला हवं होतं, असं वाटलं. लखू पटेलनंच महिनाभरापूर्वी बोलता बोलता श्री. एम. पुन्हा नगरला येणार असल्याचं सांगितलं. त्यांचं आत्मकथन वाचून पूर्ण झाल्याचंही त्यानं सांगितलं आणि आठवड्याभरात ते पुस्तक परत दिलं.

पुस्तक परत आलं आणि ते वाचायला घेतलं. माझ्या पद्धतीनं अधली-मधली पानं वाचत राहिलो. थोडा अधिक रस निर्माण झाला. श्री. एम. नगरमध्ये तीन दिवस थांबणार आहेत, तेव्हा त्यांच्याशी बोलता येईल का, त्यांची मुलाखत घेता येईल का, असं वाटलं. म्हटलं बघू या. आणि मग मंगळवारी (१४ जुलै) बातमी आली, त्यांच्या पदयात्रेचं राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि हिवरेबाजारच्या पोपट पवार यांनी स्वागत केल्याची. अरेच्चा! आले की ते. नगरमध्ये काय कार्यक्रम आहे, किती दिवस आहेत, हे पाहायला पाहिजे, असं मनात आलं. पण ते तेवढ्यापुरतंच.

दुसऱ्या दिवशी, बुधवारी (१5 जुलै) कार्यालयात गेल्यावर लगेच समजलं की, श्री. एम. हिवरेबाजारमध्ये आहेत. तिथं संध्याकाळी ते गावकऱ्यांशी बोलणार आहेत. छायाचित्रकार दत्ता इंगळेनं हे सांगितलं. त्यांच्या पदयात्रेचं - कन्याकुमारी ते काश्मीर आशा-यात्रेचं माहितीपत्रक दिलं आणि विचारलं, ""येता का? जाऊ आपण.''  ते शक्य वाटत नव्हतं. मग पोपट पवारांशी संपर्क साधून तक्रार केली - काय हे? एवढी मोठी माणसं येतात आणि तुम्ही साधं सांगतही नाही. पोपट जुना मित्र. त्यानं लगेच यायचं आमंत्रण दिलं. "आता जमणं अवघडच,' असं सांगून गप्प बसलो.

पण राहवत नव्हतं. चमत्कार वगैरे सोडून द्या; पण त्या अफाट आत्मकथनातले काही प्रसंग आठवत राहिले. श्री. एम. यांना भेटावं आणि बोलावं, असं वाटत राहिलं. जाऊ की नको? उलघाल. अस्वस्थता. सहकारी दीपक रोकडे यानं जोर लावला. हिवरेबाजारला निघालो. साथीला दत्ता. तोच सारथी. नंतर छायाचित्रकाराच्या भूमिकेत.

आत्मकथन पूर्ण वाचून झालेलं नाही. त्यांच्या पदयात्रेच्या माहितीपत्रकावरून फार काही माहिती मिळत नाही. अध्यात्म, योगशास्त्र याबद्दल काहीच माहिती नाही. श्री. एम. यांना काय विचारायचं? कसं विचारायचं? त्यांच्याकडून काय जाणून घ्यायचं आणि नंतर ते कसं मांडायचं? अस्वस्थ वाटू लागलं. मनात आलं, निघालो नसतो तर बरं झालं असतं.

हिवरेबाजारमध्ये साडेपाचच्या सुमारास पोहोचलो आणि अर्ध्या तासात ग्रामसंसदेच्या पटांगणात श्री. एम. आले. सोबतीला पोपट पवार होतेच. त्यांनी लगेच ओळख करून दिली. प्रेमानं हसले ते. माझ्याजवळ असलेलं त्यांच पुस्तक त्यांनी दुरूनच ओळखलं होतं. दाक्षिणात्य पद्धतीने गुंडाळलेली पांढरी लुंगी, पांढरा सदरा, गळ्यात उपरणं, उलटे वळविलेले केस, पांढरी दाढी, कपाळी बहुतेक पिवळं गंध आणि पायात निळे बूट. नाक एकदम धारदार. इंदिरा गांधी यांच्या नाकाची आठवण करून देणारं.

पण एकूण व्यक्तिमत्त्व काही साधू-संत-योगी यांच्यासारखं वाटत नव्हतं. आपल्या घरातला माणूस वाटत होता तो.

साधा, सज्जन, सात्त्विक. परका न वाटणारा.

श्री. एम. व्यासपीठावर बसले. पुस्तकावर त्यांची सही घेतली. आशीर्वादांसह सही.

कार्यक्रम सुरू झाला. पोपट पवार बोलले. मग गावकऱ्यांतर्फे श्री. एम. यांचा सत्कार. फेटा बांधून. गळ्यात हार घालून घेतला. मानपत्र स्वीकारलं. मग बोलायला उभे राहिले, तेव्हा हार काढून ठेवला. सत्संग. म्हटलं हे अध्यात्माविषयी बोलतील. आपल्याला पचायला जडच जाणार.

श्री. एम. यांनी मृदू, हळुवार आवाजात बोलायला सुरुवात केली. पंधरा-एक मिनिटं बोलले. त्याच संथ लयीत. कुठे चढ-उतार नाही. आवेश नाही. भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवण्याची वक्तृत्वकला नाही. पण ठामपणे. "भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी...आज चालू या सोबतीनं' असं ब्रीद असलेल्या पदयात्रेची माहिती दिली. बोलण्यात महात्मा गांधी, वेद, उपनिषदे, गावे, गावांचा विकास, तरुण असे सगळे मुद्दे येऊन गेले. कार्यक्रम संपला.

श्री. एम. यांनी पत्रकारांसाठी थोडा वेळ द्यावा, अशी विनंती पोपट पवारांनी केली. त्यांनी ती मान्य केली. त्यांच्याशी बोलू इच्छिणारा, काही जाणून घेऊ पाहणारा तसा मी एकटाच होतो. हिवरेबाजारच्या ग्रामसंसदेच्या सभागृहात आमची बैठक जमली.

आध्यात्मिक गुरू असलेले श्री. एम. मूळचे मुमताजअली. तारुण्यातच अध्यात्माकडे ओढले जाऊन ते नाथपंथीय बनले.  गुरूंनी त्यांचं नामकरण "मधुकरनाथ' केलं. पण "श्री. एम.' हे प्रचलित नाव. संन्यासी नव्हे, संसारी. त्यांच्याशी संवाद सुरू होण्यापूर्वी या साऱ्याची उजळणी केली. पुस्तकात वाचलेले काही प्रसंग लक्षात आहेत ना, हे आठवून पाहिलं.

महत्त्वाचं एक कुतुहल होतंच. श्री. एम. जन्माने मुस्लिम. आजही ते मुस्लिम असल्याचं नाकारत नाहीत. रमजानचा महिना सुरू. आणि हा माणूस हिंदू अध्यात्मावर अधिकारानं बोलतो. तेच जाणून घ्यायचं होतं.

तरीही पहिला प्रश्न स्वाभाविकपणे पदयात्रेबद्दलचा. शांतता आणि एकात्मता या उद्देशानं काढलेली ही "आशा-यात्रा.' त्यात तीन हजार किलोमीटर अंतर कापल्यानंतर काय वाटतं, अनुभव काय आहे? श्री. एम. म्हणाले, ""अनुभव चांगलाच आहे. लोक प्रेम करतात, हेच कुठेही गेलो तरी पाहायला मिळाले. जिथं जिथं चांगलं काम सुरू आहे, तिथं तिथं आजपर्यंतच्या प्रवासात जात आलो. समाजातील ऐक्‍य आणि गावांचा विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी यांनी तेच सांगितलंय. त्याचा विसर पडल्यामुळेच आज परिस्थिती काहीशी वाईट झाल्याचे दिसते. पण तरीही मला चित्र आशादायीच दिसतंय. पुण्यात आम्ही उपवास केला. शनिवारवाड्यासमोर बसलो होतो. किती वेगवेगळे लोक आले होते तिथं.''

समोरच्याचा प्रश्न ऐकून घेण्यास श्री. एम. उत्सुक. पदयात्रेच्या कल्पनेविषयी विचारल्यावर ते उत्साहानं सांगू लागले. "माणसानं चाललंच पाहिजे. मी ज्या घरात जन्मलो, तिथे तेव्हापासूनच गाड्यांचा वापर पाहत आलो. चालायला हवं, हे मला लहानपणीच समजलं. हिमालयात असताना गुरू महेश्‍वरनाथ यांनी मला तसाच संदेश दिला होता. ते म्हणाले होते, "परिस्थिती अशी येईल, की धर्माचा झेंडा घेऊन लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे तुला एक दिवस कन्याकुमारीपासून काश्‍मीरपर्यंत चालत जावंच लागेल.' खरं तर दोन्ही धर्मांचा आत्मा एकच आहे. कबिरांनीही ते सांगितलं आहे. पण गुरूंनी सांगितलेले खूप वर्षांपासून मनात होते. पण अनामिक भीतीमुळे ही कल्पना कागदावर उतरवत नव्हतो. माझं वय आता 66 आहे. असंच तीन-एक वर्षांपूर्वी कधी तरी विचार करत होतो. लक्षात आलं की, वय वाढतंय. पदयात्रा आता नाही काढायची तर कधी? आधी ठरवलं की, एकटंच चालत राहायचं. मग एके दिवशी सहज कर्नाटकाच्या माजी पोलिस महासंचालकांना मनातलं बोलून दाखवलं. ते म्हणाले, "मीही येणार.' त्यांची पत्नी म्हणाली, "मी का नाही? मीही येते की!' झालं. असं करत करत माणसं वाढत गेली. और फिर कारवाँ बनता गया... यात्रेत आमचा 60-70 माणसांचा गट आहे. कधी कधी दीड-दोनशे मंडळी होतात. जेवण्याची-राहण्याची सोय स्थानिक मंडळी करतात. कसली अडचण येऊ देत नाहीत.''

जन्माने मुस्लिम असलेल्या या योगीयाच्या तोंडी सतत दाखले असतात उपनिषदे, वेद यांचे. हे सारं अडचणीचंच. त्याबद्दल विचारल्यावर श्री. एम. हळुवार हसले. म्हणाले, ""होय! ही तारेवरची कसरतच आहे. पण मी द्विधा नव्हतोच कधी. ना मैं इस्लाम की सोचता हूँ; ना हिंदू की। मैं सिर्फ आदमी के बारे में सोचता हूँ। या साऱ्या प्रवासात वेगवेगळे छोटे-मोठे गुरू लाभले. त्यातील एका स्वामींनी एकदा विचारले होते, "तुम्ही रोज पाच वेळा नमाज पढता का?' त्यांना मी म्हणालो, "माझा नमाज 24 तास सुरूच असतो. कारण मी सर्वांना नमस्कार करीत असतो.' "नमाज' अरबी नव्हे, तर पर्शियन शब्द आहे. संस्कृत "नमः' म्हणजे नमस्कार. त्यापासूनच "नमाज' बनला आहे.'' बोलता बोलता त्यांनी भाषेचा अभ्यास सहज दाखवून दिला. संस्कृत का महत्त्वाची भाषा आहे, हेही सांगून टाकलं.
जरा भीत भीतच विचारलं - तुम्हाला कधी कुणी "काफीर' म्हणून हिणवलं नाही का? खळखळून हसले ते.

मोक्षाची गोष्ट सांगणाऱ्या अध्यात्मातील मंडळींना गेल्या काही वर्षांपासून राजकारणात "अच्छे दिन' आले आहेत. मनात शंका होतीच की, श्री. एम. त्यापासून दूर कसे? की त्यांचीही विशिष्ट कोणत्या पक्षाशी-विचारसरणीशी जवळिक आहे? धाडस करून विचारलंच त्यांना - अध्यात्मातील "गुरू' बनल्यावर राजकारणात येण्याची आमंत्रणं नाही का आली?

या भाबड्या प्रश्‍नावर श्री. एम. यांचं आधी उत्तर एका स्मितहास्याचं. मग म्हणाले, ""तो माझा मार्ग नव्हे. मी सगळ्यांना भेटतो. सगळ्यांशी चर्चा करतो. पण राजकारणात उतरायला माझा नकारच.''

एकदा भूमिका कळली. मग पुढचा प्रश्न विचारायला फारसं धाडस बांधावं लागलं नाही. सध्याच्या राजकारणातील साधू-संत-महंत यांच्या गर्दीविषयी विचारलं. त्याबद्दल त्यांची मतं पक्की आहेत. सूचकपणे ते म्हणाले, ""कपड्यांवरून कोणी साधू नाही होत. साधुत्वाचे गुण महत्त्वाचे. ते एक दिवसात किंवा एक तासात कळणार नाही. साधू म्हणवून घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.''

राजकारण, क्रिकेट, सिनेमा, गुन्हेगारी आणि अध्यात्म हे सध्याचे चलतीचे विषय आहेत. या सगळ्याच गोष्टी विकल्या जातात. अध्यात्माचा बाजार मांडलेला पाहायला दिसतो. हे दुकान, तो मॉल... श्री. एम. यांना विचारलं, अध्यात्माचं बाजारीकरण झालं आहे का हो? उत्तर दिलं त्यांनी. पण तेव्हा बोलताना खंत जाणवत होती त्यांच्या आवाजात. म्हणाले, ""खरं आहे हे. पण कोण कुणाला सांगणार? ध्यान पैसे देऊन विकतात. असं असतं का कधी?''

कुंभमेळा हौशा-नवशांची फार गर्दी वाटते नाही का, असं एक सरसकट विधानही मी बोलता बोलता करून टाकलं होतं. त्यालाही श्री. एम. यांनी हात घातला. ""तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. कुंभमेळ्याचा मूळ उद्देश फार वेगळा होता. ठरावीक वर्षांनी साधू-संतांनी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी यासाठी कुंभ सुरू झाला. आताचं...जाऊ द्या झालं.''

फेटा बांधल्यामुळं श्री. एम. काहीसे अवघडलेले होते. बोलता बोलता त्यांनी दोनदा विचारलं, ""हे आता काढून ठेवलं तर चालेल का?'' काही संबंध नसताना मीही त्यांना मोठ्या औदार्याने तशी "परवानगी' देऊन टाकली. वेळ संपत होती. विचारण्यासारखं माझ्याकडेही फार काही राहिलं नव्हतं. कोणताही अभ्यास नसलेल्या, त्यांच्या विषयाची जाण नसलेल्या एका पत्रकाराला श्री. एम. यांनी भरपूर वेळ दिला होता. सगळ्या प्रश्नांना त्यांनी शांतपणे उत्तरं दिली.

या देशाच्या, या समाजाच्या भवितव्याविषयी फार आशावादी आहेत ते. माणसं माणसांशी माणसासारखंच वागतील, अशी आशा आहे त्यांच्या मनात. एवढा वेळ बरोबर घालवल्यानंतर काही गोष्टी लक्षात राहिल्या - या माणसाला अध्यात्माबद्दलचा अभ्यास आणि अधिकार दाखवण्याची हौस नाही. अतिशय मृदू स्वरातलं त्यांचं बोलणं. आणि अर्थात त्यांचं साधेपण, सच्चेपण!

--------
योग आणि इस्लाम
अलीकडेच जागतिक योग दिन साजरा झाला. त्यावरून दोन-तीन आठवडे जोरदार वादही रंगला. योग इस्लामविरोधी आहे, असा गवगवा करण्यात आला. याबद्दल श्री. एम. यांना विचारावं असं ठरवलंच होतं. तसं ते भीत भीत विचारलंही. त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं. योगशास्त्र इस्लामच्या विरोधात आहे, हे त्यांना मुळीच मान्य नाही. ते म्हणाले, ""योग भारतात हजारो वर्षांपूर्वी जन्मलेलं, सगळ्यात मोठं शास्त्र आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी रोज अर्धा ते पाऊण तास योगासने आणि प्राणायम करतो. योग आणि शाकाहार, हेच माझ्या प्रकृतीचं रहस्य. या भारतीय संस्कृतीला "हिंदू संस्कृती' असं लेबल लावणं गैर आहे. योगासनात कुठे आहे धर्म आणि देव? चित्तवृत्तीचा निरोध हेच "योगसूत्र' आहे, असे पातंजली ऋषी यांनीच लिहून ठेवले आहे. तुम्हाला सूर्यनमस्कार मान्य नाही. ठीक आहे; अन्य आसनं करा ना मग. आणि नाही तरी सूर्याकडे पाहून नमस्कार घालायला आजच्या फ्लॅटसंस्कृतीत कुणाच्या घरातून सूर्य दिसतो? नमाजात योगासनं आहेतच आहे. समजा प्रकृतीसाठी डॉक्‍टरने योगासनं करण्याचा सल्ला दिला, तर तो तुम्ही ऐकणार नाही? जगण्यासाठी आवश्यक ते करण्याचं नाकारणं हेच मुळी इस्लामला मान्य नाही. आता कम्युनिस्टांसाठी योगशास्त्रावर एक पुस्तक लिहिण्याचा मी विचार करतो आहे.''

ग्रामविकासातील कर्मयोग
ग्रामविकासाचं आधुनिक तीर्थक्षेत्र झालेल्या हिवरेबाजारमध्ये आशा-यात्रा दिवसभर होती. श्री. एम. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर गावात सगळीकडे फिरून झालेलं काम पाहिलं. त्यांना ते आवडलंही फार. एकात्मता आणि गावचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असंच त्यांचं मत आहे. ते म्हणाले, ""महात्मा गांधींनी सांगितलेलं काम पोपटराव पवार इथं करीत आहेत. असं काम करणारेच साधू-कर्मयोगी असतात. तमाशा करनेवाले साधू कम होने चाहिए। गावे विकसित झाली, तर शहरात कोण कशाला जाईल? नेमकं हेच काम इथं होतंय. ते पाहून खरोखर समाधान वाटतं. आणि म्हणून तर देशाच्या भविष्याविषयी आशा वाटते. पूर्वी ज्ञानसंपादनासाठी जगातून मंडळी भारतात येत. ती परिस्थिती पुन्हा येईल, ज्ञान मिळविण्यासाठी परदेशातील लोक या देशात येत राहतील, असंच स्वप्न मी पाहतो आहे.''

"एम' म्हणजे मसाला डोसाही!
हिवरेबाजारच्या गावकऱ्यांशी संवाद साधताना "एम.' म्हणजे नेमकं काय, हे श्री. एम. यांनी सांगितलं. "एम.' म्हणजे - मधुकरनाथ, मुमताजअली खान आणि मानवही! अशाच आणखी एका "एम'चा उल्लेख त्यांच्या आत्मकथनात आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. अरुंधती गुहेमध्ये ध्यान करताना एके दिवशी त्यांच्या डोळ्यांसमोर मसाला डोसाच येत होता. ते त्यांच्या गुरूंनी जाणलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषिकेशमधील "मद्रास कॅफे'मध्ये श्री. एम. यांनी पोटभर डोसे खाल्ले आणि त्यानंतर त्यांची त्याबद्दल तीव्र इच्छा उरली नाही! त्यांना डोशाबद्दल विचारायचं मी ठरवलं होतंच. त्याप्रमाणं "अजूनही डोसा खाता का?' असं विचारण्याचं धाडस केलंच. प्रश्न विचारला आणि त्यांना हसू फुटलं. म्हणाले, ""ते पुस्तकात लिहिल्यापासून सगळे जण मला डोसाच खाऊ घालू पाहतात. मी अजूनही डोसा खातोच. पण त्याबद्दलची आसक्ती तेव्हाच संपून गेली.''

----------------------
(टीप  : या विषयावर लिहिणं हे माझं धाडसच! पण ते केलं खरं. श्री. एम. यांच्याशी साधलेल्या संवादाच्या आधारे दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीमध्ये एक छोटेखानी लेख लिहिला. त्याचंच हे विस्तारित रूप. या लेखाचा उद्देश, नेमकं काय सांगायचंय याबद्दलची अनभिज्ञता, लिहिण्याची शैली... हे सारं जमलंय की नाही, याबद्दल साशंकता आहे. अशा विषयावर लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. त्यामुळं अपुरेपण, काही हून गेल्याची हुरहूर जाणवतेच.)

(छायाचित्रे - दत्ता इंगळे)
----------------------
#श्री_एम #सत्संग #अध्यात्म #अध्यात्म_गुरू #योग_इस्लाम #हिवरेबाजार #वेद_उपनिषदे #आशा_यात्रा #मसाला_डोसा #ग्रामविकास #पोपट_पवार

Saturday 18 July 2015

मुंबईत घडलेल्या
`नाट्यमय` प्रसंगाने
एक गोष्ट सिद्ध केली...
`शाकाहार` नेहमीच
`सात्त्विक` आहार असतो, असे नाही.
--------
`शुद्ध शाकाहारी` आम आदमी

Thursday 16 July 2015

...आधी अकाउंट तरी उघड!

`व्हॉट्सअॅप`वर सध्या फिरणाऱ्या विनोदावरून सुचलेला एक `ई-नोद`

चिंतू कायम चिंतेत असतो. इ-लोकप्रिय झाल्याचं स्वप्न तो दिवसाही पाहत असतो. पण ते पूर्ण कसं नि कधी होणार, हेच त्याला नेमकं कळत नाही. फेसबुकावरच्या आपल्या `पोस्ट` `व्हायरल` झाल्या आहेत, त्या अनेकांनी शेअर केल्या आहेत आणि त्यावरून एखादी बातमी जन्म घेते, तिचा नायक म्हणून आपला फोटो छापून येतोय, एखादं टीव्ही. चॅनेल आपली मुलाखत घेतेय, असं स्वप्न तो पाहत असतो.

पण स्वप्न काही सत्यात उतरत नाही. असं का घडत नाही आणि ते कधी घडणार, हाच प्रश्न चिंतूचं काळीज (हृदय नव्हे, यकृत!) पोखरून टाकतो. आपल्या `पोस्ट`ला पाचशे `लाईक` आणि शंभर-सव्वाशे `कमेंट` कशा मिळणार, याचाच त्याला सततचा ध्यास.

विचार करकरूनही चिंतूला उत्तर काही सापडत नाही. अखेर देवाला शरण जायचं तो ठरवतो. गुरू कुंभेत गेल्याचा मुहूर्त साधून तो जपजाप्य सुरू करतो. नाना देवांचा धावा करतो.

एकूण तेहेतीस कोटी देव असूनही, त्यातला एकही पहिल्या आठवड्यात तरी चिंतूला काही प्रसन्न होत नाही.

अधिकच अस्वस्थ झालेला चिंतू आपल्या भक्तीची तीव्रता वाढवितो. जपाच्या माळेतील मणी अधिक वेगाने फिरू लागतात.

दुसराही आठवडा भाकड जातो. सव्वा अब्जांपैकी कुणाकुणाकडे देव तरी धावणार हो?

आता चिंतू ठरवतो. आर या पार. नाऊ अॉर नेव्हर. तो मग सृष्टीच्या निर्मात्याला, साक्षात ब्रह्मदेवालाच साकडं घालतो - `या आठवड्यात मी इ-पॉप्युलर झालोच पाहिजे. नसेल जमत तर अन्नत्याग करून प्राणत्याग करीन.`

चिंतूच्या उपवासाचा पहिला दिवस जातो आणि तिकडे वर ब्रह्मदेव अस्वस्थ होतो. चिंतूचे प्राण हकनाक जाणार याची काळजी त्याला वाटू लागते. त्याच तिरीमिरीत तो चिंतूकडे जातो आणि चिडून म्हणतो, `अरे माझ्या बाबा. करतो तुझी इच्छा पूर्ण. पण आधी फेसबुकवर अकाउंट तरी उघड!`

Monday 13 July 2015

उघडा डोळे, बघा की नीट!

संजीवला लहानपणापासूनच गाड्यांचं नि मोटारींचं वेड लागलेलं. त्याला असलेल्या ढीगभर खेळण्यांमध्ये गाड्याच गाड्या होत्या. तरी त्याला प्रत्येक वाढदिवसाला खेळण्यातली गाडीच हवी असायची. वाढत्या वयाबरोबर त्याचं हे वेड वाढतच गेलं. बारावीला उत्तम गुण मिळाल्यावरही संजीवनं `ऑटोमोबाईल एंजिनीअरिंग`लाच प्रवेश घ्यायचा हट्ट धरला. आई-बाबांनी किती तरी समजावलं त्याला, पुढची सुंदर, सोनेरी स्वप्नं दाखवली. पण संजूबाबा काही बधला नाही त्यांना.

उत्तम गुण मिळवून संजीव पदवीप्राप्त अभियंता झाला. शेवटच्या वर्षी `कॅम्पस इंटरव्ह्यू`मध्ये `फोक्सवॅगन`सारख्या बड्या कंपनीत त्याची यशस्वी मुलाखत झाली. बी. ई.चा निकाल लागला आणि त्याच दिवशी संजीवच्या घरी `फोक्सवॅगन`चं `ऑफर लेटर` येऊन पडलं. दुहेरी यशाचा आनंद साजरा करताना आई-बाबांनी मणभर पेढे वाटले.

रात्री निवांत गप्पा मारताना बाबांनी विचारलं, ``मग कधी जॉईन होतोयस तू `फोक्सवॅगन`मध्ये? आता जरा 10-15 दिवस मजा कर नि मग लाग नोकरीला.`` ``मी नाही त्यांची `ऑफर` स्वीकारणार,`` असं सांगत संजीवनं `मी नोकरीच करणार नाही, स्वतःचं गॅरेज सुरू करणारेय!`, असा बॉम्बगोळा टाकला.

आई-बाबांना वाटलं, पोराला भिकेचे डोहाळे लागलेत. चांगली रुबाबात अधिकाऱ्याची नोकरी करायची सोडून निळे कपडे घालून हात काळे करायची अवदसा कुठनं आठवली, असंही त्यांनी संतापानं विचारलं. मग संजीवनं त्यांचं मराठी माणूस, त्याची नोकरीतच रमण्याची लाचार वृत्ती, उद्योग, श्रमप्रतिष्ठा वगैरे वगैरे मुद्द्यांवर तासभर लेक्चर घेतलं. ते त्यांनी ऐकून घेतलं निमूट.

स्वतःचं गॅरेज सुरू करण्याआधी संजीवला दोन-एक वर्षं एखाद्या चांगल्या गॅरेजमध्ये काम करून अनुभव घ्यायचा होता. मग इथं बाबाच कामी आले. त्यांनी जुन्या मित्राला गाठलं. त्याला बाबापुता करून आपल्या पोराला नोकरीला ठेवून घे, असं सांगितलं. त्या पोटी महिन्याला दोन-तीन हजार रुपये देण्याची तयारीही दाखविली. पण मित्राचा प्रश्न पैशाचा नव्हताच. एवढं शिकलेला एंजिनीअर आपल्या गॅरेजमध्ये काम करणार याचं दडपण त्याला वाटत होतं.

गॅरेजमध्ये रुजू झाल्यावर संजीवनं पहिले दोन दिवस सगळं समजून घेतलं. तिसऱ्या दिवशी `फोक्सवॅगन`ची भली थोरली मोटर गॅरेजसमोर उभी राहिली. संजीवसारखा उमदा, हुशार एंजिनीअर आपल्याकडे आहे आता, हे माहीत असलेल्या गॅरेजमालकानं काम स्वीकारलं आणि त्याच्यावर टाकली की जबाबदारी.

संजूनं मोठ्या खुशीत काम सुरू केलं. कोणाचीही मदत न घेता पाच तास तो खपला. सगळं काम संपवून काळे पडलेले, ग्रीसाळलेले हात धुवून, चेहरा स्वच्छ करून, शर्ट बदलून तो बाहेर आला. आपण गाडीचं काम एकदम टकाटक केलंय, असा विश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तेवढ्यात गाडीचा मालक आलाच.

मोटारीचं काम एका दिवसात होईल, याची खात्री मालकाला नव्हती. संजीव म्हणाला, ``एका दिवसात? अहो, पाच तासांत केलं सगळं. एकदम ओके डन!``

मालक मोटारीजवळ गेला. त्यानं बारकाईनं पाहिलं. मग त्याच्या चेहऱ्यावर हळुहळू आठ्या उमटू लागल्या. संजीवनं विचारलं, ``काय झालं? गाडी एकदम टकाटक केलीय तुमची!``

त्याला चालकाच्या बाजूला नेत मोटरमालक म्हणाला, ``सगळं काम झालं म्हणताय; मग हे इथं पाच-सहा पोचे पडलेले तसेच कसे? हा इथला रंगाचा टवका उडालाय, तोही पाहिला नाही तुम्ही. आणि हे इथं कसल्या रंगाचं ठिगळ लावलंय हो? आरसाही तसाच खिळखिळा आहे. हँडल नीट लागतच नाहीये आणि खिडकीची काचही अडकतेय.``

त्याच्याकडं आश्चर्यचकित होऊन आणि आपल्यावर प्रचंड अन्याय होतोय, असा भाव चेहऱ्यावर आणून संजीव म्हणाला, ``अहो महाराज! ही सगळी कामं मी त्या पलीकडच्या बाजूनं कधीची केलीत की. बघा जरा नीट, डोळे उघडून!``
-----------------------
(पूर्वप्रसिद्धी ः `फेसबुक`च्या भिंतीवर 25 सप्टेंबर 2014)

संमेलन निघालंय फॉरीनला!

मराठी सारस्वताचा दरबार।
उभे सान-थोर मनसबदार।
घेउनि गाऱ्हाणे।।

सालोसाल भरे संमेलन जत्रा।
तयात असती भानगडी सत्रा।
यंदाची गा गोष्ट निराळी।।

सोडुनिया माहेरचा वास।
संमेलन निघाले परदेशास।
ऐसे कैसे चालेल?

अंकल सॅमच्या देशा।
जाण्याचा धरिला धोशा।
आम्ही काय करावे?

आईने सोडुनी स्व-प्रदेशा।
अगा का जावे वनवासा?
मोह डॉलरचा धरुनी।।

येणे-जाणे सत्तर हजारी।
आमची रिकामी तिजोरी।
कोठुनी आणावा रोकडा?

इथे भरता संमेलन।
भरपूर होई मान-सन्मान।
तेथे कोण जाणे काय होई?

येण्या-जाण्या एसी गाडी।
राहण्यास शानदार माडी।
तृप्ती कशी पोटभर।।

रसिकांच्या भेटीची आस।
परि आम्ही सारे उदास।
असे खिसा रिकामा।।

माय-बाप सरकारा।
देशी का कर्ज नादारा?
न फेडीच्या बोलीवरी।।

साहित्य महामंडळाचे ठाले।
तयांवर रोखिले सर्वांचे भाले।
सिद्ध सारे टिपाया।।

नव्हे हे संमेलन जागतिक।
"एनआरआयां'पुढे हे अगतिक।
आरोपही झाले करिते।।

डावे-विद्रोही झाले जमा।
न बाळगता कसली तमा।
केला सुरू हंगामा।।

कोणा दिसे भांडवलशाही।
कोणास वाटे हुकुमशाही।
अमेरिकावारीमागे।।

रत्नांग्रीचे पटवर्धन।
रोज गाती संकीर्तन।
जाहल्या तयारीचे।।

देवीदासराव परभणीचे।
नसे त्यांना दुःख याचे।
म्हणती पाहू पुढल्या साली।।

कोणी म्हणे वेगळी वाटुली।
पर्यायी संमेलनाची धाकली।
पत्करावी सर्वांनी।।

प्रकाशकांचा जमला मेळा।
पुस्तकविक्रीवर त्यांचा डोळा।
जमात ही जाहली रुष्ट।।

कौतिकरावांना म्हणती खाष्ट।
परदेशवारीचा बेत हा नतद्रष्ट।
हाणुनिया पाडू।।

सांगती आमची जात खमकी।
याचिका सादरण्याची धमकी।
आता भेटू कोर्टात।।

कलमबहाद्दरही सरसावले।
रोज एकाचे चांगभले।
होई बातम्यांतून।।

ठाले पाटलांच्या नावावरी।
रोजच्या रोज कोट्या करी।
एक "ओव्हर'स्मार्ट मित्र।।

ठाले इकडे निवांत।
सांगती पुढचे बेत।
कसे कसे होईल।।

रूळ बदलता खडखडाट।
होणारच थोडा-बहुत।
वदती ते कौतुके।।

इथे हो कोठले रुळ?
विमानातूनच की सरळ।
होणार तुम्ही "बुंग'।।

बे-एरियाचे देवकुळे।
डोके तयांचे भंजाळे।
ऐकुनिया वाद सारा।।

म्हणती आम्हीही मराठीप्रेमी।
आली संधी चालुनी नामी।
का लावता दृष्ट तुम्ही?

आतल्या गोटाची खबर।
मुख्यमंत्री आपुले थोर।
पाठिंबा तयांचा या पर्यटना।।

ज्याला ज्याला परवडे।
त्याने संमेलना जावे गडे।
अन्यथा बसावे टीव्हीसमोरी।।

अवघा मतामतांचा गलबला।
ऐकवेना माय मराठीला।
ढाळू लागली आसवे।।

सारे उत्सवाचे चाहते।
मी जगते की मरते?
काळजी कुणा?

गेले एक वर्ष परदेशी।
विसरीन मी तुम्हां कैशी?
सवाल ती विचारी।।

घडते आहे फॉरीनवारी।
त्याचीही आगळी खुमारी।
भोगू द्यावी एकदा।।

तीही माझीच लेकरे।
हौस त्यांची करू पुरे।
रौप्यमहोत्सवाची।।

झाला तेवढा पुरे गोंधळ।
आता नको अधिक घोळ।
संमेलनावरुनी।।

अशी ही साहित्य कहाणी।
दूध कमी अन् जादा पाणी।
पांचट, परि माना गोड।।

-------
(मराठी साहित्य संमेलनाचे वऱ्हाड सॅन होजे इथे जाण्यावरून तेव्हा मराठी साहित्याच्या (चिमुकल्या) विश्वात सात वर्षांपूर्वी खळबळ वगैरे उडाली होती म्हणे. यथावकाश हे संमेलन पार पडलं; "विश्व' असं लेबल लावून! "विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!' अशा आशयाचं एक कवी लिहून गेलाच आहे की!!)

(कितवे तरी विश्व मराठी संमेलन लवकरच अंदमानला (म्हणजे भारतातच हो!) होऊ घातले आहे. त्यावरून आठवला पहिल्या विश्व संमेलनाचा गोंधळ. आणि त्या वेळी, म्हणजे 28 जून 2008 रोजी खरडलेल्या या ओळी. त्या तेव्हा छापायला धाडल्या. पण संबंधितांनी त्या कचराकुंडीत टाकल्या! त्याच ओळी कचऱ्यातून शोधून आता पुन्हा इथं डकवत आहे. निमित्त अर्थातच अंदमानचं. पण हे वाचणं कुणाला काळ्या पाण्याची शिक्षा वाटायला नको बुवा!!)

Wednesday 8 July 2015

आनंद




मागच्या आठवड्यात एक दिवस (शोभत नसतानाही) टी-शर्ट घालून कार्यालयात गेलो. एका सहकाऱ्याने तो न्याहाळला आणि विचारलं, ``मुलाचा टी-शर्ट घातला काय?``
 
निषेधात्मक आणि नकारात्मक मान हलवून त्याला म्हणालो, ``नाही, नाही. माझाच आहे तो. खूप दिवसांनी घातलाय.``

``तुमच्या मुलाच्या अंगावर दोनदा पाहिला म्हणून म्हणालो.`` सहकारी जरा खालच्या आवाजात म्हणाला.

मग उत्तर दिलं, ``टी-शर्ट माझाच आहे. वापरत नव्हतो म्हणून त्याला दिला. आज सहज अडकवलाय.``

...बाकी जाऊ द्या. अशा निमित्तानं का होईना, `आपला मुलगा` यापेक्षा `त्याचा बाप`, अशी आपली ओळख होणं नाही म्हटलं तरी आनंदाचंच असतं की!

मलमपट्टी



आपल्याला हवाहवासा असणारा
आणि नक्की मिळणार अशी
(उगीचच) अपेक्षा ठेवलेला पुरस्कार
दुसऱ्याच कोणाला जाहीर होतो,
तेव्हा इंदिवर यांच्या या ओळी थोडा दिलासा देतात...


अपनी तकदीर में पहले ही से कुछ तो गम हैं
और कुछ आप की फितरत में वफ़ा भी कम है
वरना जीती हुयी बाजी तो ना हारे होते

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...