मनुष्यप्राण्याला हसण्याची अद्भुत देणगी मिळालेली आहे म्हणतात. ह्या देणगीचं रहस्य शोधण्यासाठी खूप संशोधन झालं, चालू आहे. त्यातून काही निष्कर्ष संशोधकांनी काढले आहेत. हसण्याचे खूप फायदे सांगितले जातात नि कारणंही. का हसतो माणूस - एखादा विनोद झाला म्हणून? कुणाची फजिती झाल्यामुळं? ही दोन्ही कारणं खरी असली, तरी ती तेवढीच नाहीत. हसणं संवादाचं एक साधन आहे. चेहऱ्यावर फुलणारं हसू समाजातील नातेसंबंध वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं, असं संशोधक-अभ्यासकांचं मत आहे.
हसू बऱ्याच वेळा भावनांचं दर्शन घडवतं, असं म्हणतात. हसण्याने ताण हलका होतो, मन मोकळं होतं. सिग्मंड फ्रॉईड ह्यांनी म्हटलंय की, 'हसण्यामुळे मानसिक कोंडी दूर होते. मनावरचं दडपण आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते.' हसणं आरोग्यासाठी चांगलं आहे, असं मानलं जातं.
...तर ह्या हसण्यावर अचानक कुणी बंदी आणली तर? अमूक इतके दिवस अजिबात हसायचं नाही! एखादी तरी स्मितरेषा... नाव नको. कठोरपणे पालन झालंच पाहिजे निर्बंधाचं. तो मोडला तर शिक्षा. ही शिक्षा काय असेल, ह्याचा अंदाज करणं कठीण. संबंधित व्यक्ती कुटुंबीयांना, आप्तांना, मित्र-स्नेहीजनांना भविष्यात कधीही न दिसण्याची दाट भीती.
'शोकमग्न' उत्तर कोरियात ही बंदी आलेली आहे. देशाचा कारभार ज्याच्या लहरीवर चालतो, तो हुकुमशहा किम जोंग-उन शुक्रवारपासून (दि. १७ डिसेंबर) सुतकात आहे. त्याचे वडील आणि आधीचे अध्यक्ष किम जोंग-इल ह्यांच्या निधनाला शुक्रवारी १० वर्षं झाली. मरणाचा दशकपूर्ती सोहळा करताना ११ दिवसांचा सार्वत्रिक शोक व्यक्त केला जात आहे. ह्या काळात कुणी हसायचं नाही, कसली खरेदी करायची नाही आणि मद्यपान करायचं नाही, असा सक्त आदेश आहे. तसं करताना कुणी आढळलंच तर कठोर शिक्षा. आदेशाचं कुणी उल्लंघन करीत नाही ना, हे पाहण्यासाठी पोलीस खातं दिवस-रात्र लक्ष ठेवून आहे.
बंधनं एवढ्यावरच संपत नाहीत. अजूनही आहेत. स्मृतिदिनी साधं किराणा सामान आणण्याचीही परवानगी नव्हती. ह्या शोकपर्वाच्या दरम्यान कुणाचा वाढदिवस येत असल्यास, त्यानं तो मुळीच साजरा करायचा नाही. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर त्याचं दुःखही मर्यादेत व्यक्त करायचं. रडण्याचा आवाज घराबाहेर मुळीच येता कामा नये. मृताला शेवटचा निरोप देण्यासाठीही वाट बघायची. हा अकरा दिवसांचा शोककाल संपल्यावरच 'राम नाम सत्य है' म्हणायचं! हसायला बंदी आणि रडायची चोरी.
उत्तर कोरियातील ह्या तुघलकी फर्मानाच्या बातमीने आंतरराष्ट्रीय पातळीवर माध्यमांचं स्वाभाविकच लक्ष वेधून घेतलं. 'द गार्डियन', 'न्यूजवीक', ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांतील पोर्टल ह्यांनी बंदीची बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली. भारतातील वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी वाहिन्या ह्यांच्या संकेतस्थळावर तर ही बातमी शुक्रवारीच झळकली. ह्या सर्वांच्या बातमीचा स्रोत एकच आहे - 'रेडिओ फ्री एशिया'. 'द गार्डियन'नं ह्या बातमीचा व्हिडिओ संकेतस्थळावर दिला आहे. त्यात म्हटलंय की, (ह्या शोककाळात) कुठल्याही प्रकारे आनंदाची भावना व्यक्त करण्यासच सक्त मनाई आहे.
प्योंगयांगमध्ये उभे असलेले किम-संग आणि किम जोंग ह्यांचे पुतळे. शोकपर्वाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. (छायाचित्र सौजन्य - किम वोन जिन) |
देशाचा सर्वेसर्वा असलेल्या किम जोंग-उन ह्यानं काढलेलं फर्मान मोडण्याचा परिणाम काय होतो, ह्याची उत्तर कोरियाई जनतेला पूर्ण जाणीव आहे. त्याच्या एक दशकाच्या राजवटीत आतापर्यंत २७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा जाहीरपणे देण्यात आलेली आहे.
योगायोगाची गोष्ट अशी की, ज्या दिवशी उत्तर कोरियात ह्या 'राष्ट्रीय शोका'ची आणि त्यानिमित्तच्या निर्बंधांची घोषणा झाली, त्याच दिवशी दक्षिण कोरियातील 'कोरिया जूंगअँग' दैनिकानं एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध केली. ती बातमी आहे संयुक्त राष्ट्रांत मंजूर झालेल्या निषेध ठरावाची. उत्तर कोरियात सलग १७ वर्षांपासून मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे आणि त्याचा संयुक्त राष्ट्र महासभेने निषेध केला. महासभेनं एक दिवस आधीच (गुरुवार, १६ डिसेंबर) हा ठराव एकमतानं मंजूर केला. नागरिकांचा अनन्वित छळ, अमानवी पद्धतीच्या शिक्षा, राजकीय कैद्यांच्या छावण्या, लैंगिक अत्याचार, स्वदेशी आणि परदेशी नागरिकांचं अपहरण, आचार-विचार स्वातंत्र्यावर बंदी, परदेशात गेलेल्या कामगारांचे शोषण अशा अनेक प्रकारे मानवी हक्क पायदळी तुडविले जात असल्याचं निषेधाच्या ठरावात म्हटलं आहे.
दक्षिण कोरियातील 'द डोंग-ए' दैनिकानंही (त्याचा अर्थ 'मूळ' किंवा 'अस्सल' असा आहे.) ह्या निषेध ठरावाच्या निमित्तानं संपादकीय लिहिलं आहे. त्याचं शीर्षक आहे - North Korea is like a time-bomb set into motion. त्यात म्हटलं आहे की, किम जोंग कुटुंब तीन पिढ्यांपासून सत्तेवर आहे. किम जोंग-इल ह्यांच्या मृत्यूला एक दशक होत असताना उत्तर कोरिया अजिबात बदललेला नाही. किम कुटुंबाबद्दल निष्ठा व्यक्त करण्याची शपथ घेण्यासाठी जनतेवर जुलूम-जबरदस्ती केली जाते. मानवी हक्कांचं उल्लंघन हे तिथलं अतिकटू वास्तव आहे.
कोरोनाच्या अर्थात कोविड-१९च्या महामारीनं अवघं जग त्रस्त असताना उत्तर कोरियामध्ये नेमकी काय परिस्थिती होती, हे काही फारसं स्पष्ट झालेलं नाही. जगभरात कोरोनाची लागण होत असल्याच्या बातम्या येऊ लागताच ह्या देशानं जानेवारी २०२०मध्ये आपल्या सर्व सीमा कडेकोट बंद केल्या. कोरोनावर लसीकरणाचा उपाय जगानं स्वीकारला असताना, उत्तर कोरियानं मात्र त्याकडे पाठ फिरविली. विविध देशांनी लस देण्याची तयारी दाखवली असताना उत्तर कोरिया सरकारनं त्याबद्दल थोडंही औत्सुक्य दाखवलं नाही. 'कोव्हॅक्स'नं चीनमध्ये विकसित केलेल्या 'साइनोव्हॅक' लशीचे तब्बल ३० लाख डोस देऊ केले होते. तेही स्वीकारले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियात कोरोनावरचं लसीकरण झालेलंच नाही.
किम जोंग-उन तुघलकी वागण्याबद्दल (कु)प्रसिद्ध आहेच. त्यामुळे त्याच्या ह्या नव्या फर्मानाबद्दल फारसं आश्चर्य वाटलेलं नाही जगभरात. कोरियातील रहिवाशांना दोन वर्षांपूर्वी लांबलचक कातडी कोटात आपल्या अध्यक्षाचं दर्शन झालं. तो कोट लोकप्रिय झाला. पण आपल्या पोषाखाची कुणी नक्कल करू नये म्हणून त्यानं जनतेला तसा कोट वापरण्यावर बंदी आणली. 'राजा प्रजेसारखा नव्हे, तर तिच्याहून वेगळाच दिसला पाहिजे. तेच त्याचं वैशिष्ट्य असावं,' अशी काहीशी किम जोंगची भावना असावी.
चमचमीत खाणे, बेहोश होण्याएवढे पिणे, बेभान जल्लोष करणे ह्यावर सुतकाच्या काळातली बंदी समजून घेता येईल कदाचित. पण हसण्यावर बंदी? उत्तर कोरियात एकूणच राज्यकर्त्यांना हसण्याचा तिटकारा आहे का? किम जोंग-उनची अनेक छायाचित्रं उत्तर कोरियातील दैनिकांच्या संकेतस्थळावर पाहायला मिळतात. त्यातली दोन लक्षणीय वाटतात. एका छायाचित्रात सैन्यदलातील महिला जवान-अधिकाऱ्यांच्या घोळक्यात किम आहे. त्याच्या जवळच्या सर्व महिला रडताना दिसतात. दुसरं छायाचित्र शाळेतलं आहे. त्यात दिसतात किमच्या मागे धावणारी, आसपास घोटाळणारी चिमुकली मुले. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहताना पाहायला मिळतात.
हसण्याचं एवढं वावडं का असावं बरं? हसणं म्हणजे नेहमीच विनोदावर किंवा कुणाची फजिती झाली म्हणून नसतं. बी. बी. सी. इंग्रजी संकेतस्थळावर आरोग्य विभागात हसण्याची कारणमीमांसा करणारा लेख आहे. त्यात लिहिलं आहे की, माणसे का हसतात? आपण समाधानी, आनंदी आहोत, हे ते त्यातून दाखवून देऊ इच्छित असतात. परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते हसताना दिसतात.
मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हिन ह्यांना अभ्यासात असं आढळलं की, माणसं विनोदापेक्षा मित्रांशी बोलताना अधिक वेळा हसतात. आपण इतर कुणाबरोबर असलो की, तीसपटीनं जास्त हसतो. आपण हसतो ते प्रतिक्रियांवर, विधानांवर - अनेक वेळा त्यात विनोदाचा दूरवर संबंध नसतो.
हसणं म्हणजे संवादाचं एक साधन आहे. ते नेहमीच काही प्रतिक्रियेदाखल नसतं. लोक आपल्याला आवडतात आणि आपण त्यांना समजून घेतो, हे दाखवून देण्याचं हास्य एक साधन आहे, असंही ह्या लेखात म्हटलं आहे.
हसण्यावरची मराठी विश्वकोशातली नोंद आहे - हसण्याची शारीरिक प्रतिक्रिया सर्व माणसांत सारखी असली, तरी या प्रतिक्रियेला जन्म देणाऱ्या मानसिक कारणांत मात्र विविधता आहे. बालकांमध्ये हास्य केवळ आनंदाचे निदर्शक असते. परंतु प्रौढांमध्ये मात्र हास्यामागची मानसिक भूमिका विविध प्रकारची असू शकते. ही विविधता हास्याचे वर्णन करणाऱ्या विविध शब्दयोजनांनी स्पष्ट होते. उदाहरणार्थ, निरागस हास्य, तिरस्कारयुक्त हास्य, तुच्छतादर्शक हास्य, उपहासात्मक हास्य, निंदाव्यंजक हास्य, छद्मी हास्य वगैरे. हास्य हे शरीर व मन दोन्हींचे टॉनिक आहे, उपकारक आहे, आरोग्यकारक आहे. हास्याची खरी उपयुक्तता त्याच्या सामाजिकतेत आहे.
असं असताना हसण्याबाबत एवढी टोकाची भूमिका का? एकट्या किम जोंगलाच हसण्यावर बंदी आणावी वाटते की जगभरातील सगळ्याच हुकूमशहांना हसण्याबद्दल भीती वाटते? 'हुकूमशहा हसत नसतात,' असं मुसोलिनीनं म्हटल्याची आठवण लिंकन मेमोरियल विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. स्टुअर्ट डब्ल्यू. मॅकक्लेलंड ह्यांनी लॉस एंजेलेस इथल्या व्याख्यानात (१९४२) सांगितली आहे.
बी. बी. सी.च्या लेखात म्हटलेलं आहे की, उंदीर हसतात, चिंपांझी हसतात आणि कुत्रीही. उंदीर विनोदावर हसत नाहीत, तर खेळताना हसतात. प्रसिद्ध लेखक राल्फ वाल्डो इमर्सन ह्यांनी लिहिलंय - पृथ्वी फुलांच्या रूपात हसते. एका वचनानुसार आशावादी सगळं विसरण्यासाठी हसतो आणि निराशावादी हसायचंच विसरतो.
उत्तर कोरियातील लोकप्रिय विनोद
उत्तर कोरियातील जनतेला हसण्याचं वावडं आहे का? काहींच्या म्हणण्यानुसार त्या माणसांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलत नाही. पण ही माणसंही हसतात, त्यांना विनोद प्रिय आहे, ह्याचे दाखले देणारेही आहेत. उत्तर कोरियामध्ये लोकप्रिय असलेले काही विनोद संकेतस्थळांवर सहज सापडतात. त्यात खूप नवीन किंवा वेगळे विनोद आहेत असं नाही. बरेच विनोद असे असतात की, ते फिरत जातील तिथली वेषभूषा स्वीकारतात, त्या मातीचे संदर्भ अंगीकारतात. उत्तर कोरियातील विनोदांचंही तसंच आहे. त्याचा थोडा मासला -
हा पहिला...
सामाजिक माध्यमावर कुणी तरी प्रश्न विचारलेला असतो - 'डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया' ह्या देशात खटकण्यासारखं काय आहे?
...काही क्षणांत उत्तर मिळतं - पहिलाच शब्द, डेमोक्रॅटिक!
कोरोनाबद्दलचे दोन विनोद...
उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण कसा नाही आढळला बुवा?
त्यात काय. तिथं नेहमीच 'लॉकडाऊन' चालू असतं!
आणि हा दुसरा...
देशातील कोरोनाच्या रुग्णांची दर अर्ध्या तासाने दिली जाणारी ताजी माहिती -
सकाळी ८.०० - १
८.३० - ०
९.०० - १
९.३० - ०
१०.०० - १
१०.३० - ०
हा थोडासा राजकीय विनोद -
उत्तर कोरियातील एका तुरुंगातील कैदी तिथल्या ग्रंथालयात पुस्तक आणायला जातो. एका चळवळ्या कार्यकर्त्याचं गाजलेलं पुस्तक त्याला वाचायचं असतं.
ग्रंथपाल म्हणतो, ''पुस्तक काही नाही गड्या. पण तो लेखक इथंच आहे!''
आणि हा समारोपादाखल...
कलादालनात चित्रप्रदर्शन चालू असतं. हातात सफरचंद घेऊन असलेल्या ॲडम आणि इव्ह ह्यांचं चित्र अगदी मन लावून पाहताना इंग्रज नागरिक म्हणतो, 'हे अगदी शंभर टक्के इंग्लिश नागरिक आहेत. कारण त्यातला पुरुष सर्वोत्तम खाणं एका स्त्रीबरोबर वाटून घेतोय.'
त्याला अडवत फ्रेंच नागरिक म्हणतो, 'काही तरीच काय! निर्वस्त्र असूनही किती मोकळेपणाने, विनासंकोच वावरताना दिसतात ते. फ्रेंचच आहेत ते मुळी.'
त्या दोघांनाही झिडकारत उत्तर कोरियाचा नागरिक म्हणतो, 'हे दोघं उत्तर कोरियाचेच. शंकाच नाही. त्यांच्याकडे कपडे नाहीत, जवळ पुरेसं खायला नाही आणि तरी त्यांचा आविर्भाव आपण स्वर्गात बागडत असल्यासारखा आहे बघा!'
------------------------------
(संदर्भ - koreatimes.co.kr, donga.com, rfa.org, hankookilbo.com, mirror.co.uk koreajoongangdaily.joins.com, koryogroup.com/jokes, upjoke.com/north-korea-jokes, mirror.co.uk)
------------------------------
#northkorea #nolaughing #kim_jong_un #mourning #corona #covid19 #vaccination #UN #dictator #koreanjokes #smile #southkorea #humanrights