Monday 12 March 2018

एकलव्य, अर्जुन आणि द्रोणाचार्यही

(वडोदरा विशेष - ३)
----
खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो - सुधीर परब!

· केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचा भारतीय खेळांमधला पहिला मानकरी...
· याच पुरस्काराचा गुजरातेतील आद्य विजेता...
· देशी खेळाला अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात माझ्यापासून होईल, असं वडिलांना सांगणारा...
· राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार देण्याचा निकष बदलण्यासाठी निमित्त ठरलेला अष्टपैलू...
· खो-खोचा डाव सुरू होताच पहिल्या२० सेकंदांतच ३ गडी टिपण्याचा पराक्रम...
· वयाच्या पंचाहत्तरीतही रोज नियमाने मैदानावर उपस्थित राहून खेळाडू घडविणारा मार्गदर्शक-संघटक...


या माणसाची ओळख पटविण्यासाठी तीन शब्द पुरेसे, नऊ अक्षरं - सुधीर भास्कर परब!

साहित्य संमेलनासाठी वडोदऱ्यात पोहोचलो, त्याच दिवशी सकाळी जुना खो-खोपटू निर्मलचंद्र थोरात यानं फोन करून सांगितलं की, सुधीर परब यांना भेट. मध्यस्थ रमतचे जुने खो-खो खेळाडू आहेत. एकलव्य पारितोषिक त्यांना दोनदा मिळालंय.’ (ते गुजरात क्रीडा मंडळाचे हे नंतर स्पष्ट झालं.)


शाळकरी वयात मध्यस्थ रमत, हॅपी वाँडरर्स या महाराष्ट्राबाहेरच्या क्रीडा मंडळांची नावं ऐकली होती. तिथल्या बऱ्याच खेळाडूंचीही नावं वाचून माहीत होती. पण आता हे दोन्ही संघ बातम्यांमध्ये येत नसल्याने ही नावं आठवणींच्या कोपऱ्यात दडलेली. त्यातलंच हे एक. निर्मलनं सुचवलं खरं, पण त्यांचा संपर्क क्रमांक कुठून मिळवायचा. मग नाशिकच्या मंदार देशमुखला साकडं घातलं. मंदार महाराष्ट्र खो-खो संघटनेचा कार्याध्यक्ष; त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगला संघटक. त्याचा सुरतेच्या खो-खो क्लबशी संपर्क. तिथून तो सुधीर परब यांचा क्रमांक मिळवून देईल, असं वाटलं होतं नि तसंच झालं.

संपर्काचा क्रमांक मिळताच परब यांना सविस्तर निरोप पाठविला व्हॉट्सअॅपवरून. कोण, काय, कशासाठी भेटू इच्छितो इत्यादी. त्यानंतर उत्तराची पाऊण तास वाट पाहिली नि लक्षात आलं की, त्यांनी निरोप अजून वाचलेलाच नाही! थेट फोन लावला. अनोळखी नंबर. ते फोन उचलतात की नाही, अशी भीती. पण तसं काहीच झालं नाही. पहिल्या मिनिटात ओळख सांगितली नि परब सरांनी लगेच सांगितलं, ‘‘पोलो मैदानाजवळच्या यूथ सर्व्हिस सेंटरवर या.’’ सविस्तर पत्ता, रिक्षावाल्याला सांगायच्या खुणा याचीही माहिती दिली.

पोलो मैदान माहीत होतं. पायी चाललं की शहराची माहिती होते, असा समज आणि स्वतःच्या पायांवर दांडगा विश्वास. त्यामुळे रिक्षा टाळून कूच केली. तीन जणांना विचारत, खात्री करत नेमकं एक चौक अलीकडंच वळलो. तासाभरानं परब सरांचा फोन. च् च् करीत ते म्हणाले, ‘‘आहात तिथंच थांबा. मुलगा पाठवतो घ्यायला.’’ 

यूथ सर्व्हिस सेंटरवर पोहोचलो आणि गप्पा सुरू झाल्या. जवळचं पुस्तक परब सरांना भेट देताना आगाऊपणा केला. विचारलं, पुस्तकं वाचायला आवडतात का?’ (खेळाडूचा आणि वाचनाचा काय संबंध, असा आपला रुजलेला गैरसमज.) हो असं सरळ उत्तर देताना सरांनी सुरुवात केली ती जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणना होणाऱ्या थ्री मस्केटीअर्सवर बोलायला. अलेक्झांडर ड्युमाच्या त्या तीन शिलेदारांचं महत्त्व रसाळपणे सांगू लागले. त्यांची निष्ठा आणि खेळ याचा संबंध जोडून ते भरभरून बोलू लागले. सरांनी त्यांना शाळकरी वयात वाचायला सुचविलेलं ते पुस्तक. त्यांनी ते पचवलं होतं...


अर्जुन पुरस्कार आणि डावीकडे
अमृतमहोत्सवानिमित्तचं गौरवचिन्ह

परब सरांचं लक्ष पुस्तकावरून मैदानाकडं वळवणं मला आवश्यक होतं. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला एकलव्य पुरस्कार दिला जातो. कोणत्याही खेळाडूला हा पुरस्कार एकदाच देण्यात यावा, असा त्याचा निकष बदलण्याचं कारण ठरलेल्या सुधीर परब यांच्याकडून अंदर की बात जाणून घ्यायची होती. हा पुरस्कार दोन वेळा मिळविणारे ते एकमेवाद्वितीय. गुजरातेतली खो-खोची लोकप्रियता आणि त्यात आघाडीवर असलेली मराठमोळी नावं, याचंही रहस्य माहीत करून घ्यायचं होतं. सरांचा क्रीडाप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकायचा होता. त्यामुळेच ड्युमाच्या संमोहनातून सर बाहेर निघणं आवश्यक होतं.

अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचा सुवर्णमहोत्सव १९५४मध्ये झाला. त्यानिमित्त अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती.  गुजरात क्रीडा मंडळाकडून सुधीर परब यांनी पदार्पण केलं. त्यांचं वय होतं ११. त्यांच्या संघाचं नेतृत्व होतं जयवंत लेले यांच्याकडे. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वाधिक गाजलेले सरचिटणीस म्हणून लेले यांचा नक्कीच उल्लेख करता येईल. एवढे गाजलेले लेले किती साधे होते आणि शेवटपर्यंत कसे साध्या घरात राहत होते, हे परब सरांनी बोलता बोलता सांगून टाकलं.) या स्पर्धेचा अंतिम सामना पुणे आणि बडोदे संघांमध्ये झाला. श्रीकांत टिळक, नंदू घाटे, अविनाश भावे आदी जुन्या खेळाडूंच्या आठवणी मग ओघानेच आल्या. श्रीकांत टिळक हातात घड्याळ बांधून खेळत आणि राउंड गेम त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य, हेही त्यांनी बोलता बोलता सांगून टाकलं. तब्बल सहा दशकांनंतरही त्यांना प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू आणि त्यांची वैशिष्ट्यं आठवत होती.

आठवणींचा ओघ सुरू होता. त्या गप्पांमध्ये एक गोष्ट लक्षात आली - काही अडलं, तर ती साखळी जुळल्याशिवाय परब सर पुढे सरकतच नव्हते. आजूबाजूला बसलेल्या मित्रांना विचारत, नकाशा काढायला लावत. असंच काही तरी होतं... म्हणत ते पुढची पायरी गाठत नसत. परिपूर्णतेचा ध्यास! त्या काळात एक खेळ-एक संघटना असं काही रुजलं नव्हतं. अखिल भारतीय स्पर्धा होत त्या विविध मंडळांच्या संघांच्या. धारवाडपासून गुजरातपर्यंत एकच राज्य असलेल्या बृहन्मुंबई राज्याचा क्रीडा महोत्सव ५४-५५मध्ये सुरू झाला. द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी पैसा कसा उभा केला? तर रेसच्या बक्षिसांमधील काही ठरावीक निधी या महोत्सवासाठी वळवला, अशी गमतीदार आठवण परब सरांनी सांगितली. म्हणजे घोडे जिंकत आणि खो-खोपटू पळत!

मुद्दा असा बारकाईनं स्पष्ट केला जातो
डभोईत राहणाऱ्या सुधीर परब यांचं खेळाशी नातं तिथल्या शाळेत १९४७मध्येच जुळलं. सर्व इयत्तांना शिकविणाऱ्या राऊबाई सपकाळ आणि व्यायाम शिक्षक बाबूराव सोंडकर यांची नावं आजही त्यांच्या ओठावर आहेत. लंगडीपासून सुरुवात झाली. (त्यांचं लंगडी प्रेम आणि ते लंगडीचं माहात्म्य ज्या पद्धतीनं सांगतात, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) तिसरीनंतर पुढच्या शिक्षणासाठी ते बडोद्यात आजीकडं आले. सोबत बहीण लता परब होतीच. पहिल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेली खो-खोपटू, अशी त्यांची ओळख. गुजरात क्रीडा मंडळाच्या मैदानावर १९५०मध्ये निकुंज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर परब यांचा लंगडीचा सराव सुरू झाला. तेव्हाच्या बडोद्याचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, ‘‘सर्व महाराष्ट्रीय मंडळी मुलांना तालमीत नाही तर गुरुवर्य वसंतराव कप्तान यांच्या गुजरात क्रीडा मंडळात पाठवत. लंगडी सहसा एका पायानं शिकतात. पण आम्हाला दोन्ही पायांनी लंगडी घालायला शिकवलं. त्याचा पदन्यासासाठी फार मोठा फायदा झाला.’’ आधी लंगडी, त्यात प्रावीण्य मिळाल्यावर दमसास वाढविण्यासाठी कबड्डी आणि मग बुद्धिचापल्यासाठी आट्यापाट्या असा खेळाडूंचा प्रवास असे.

गप्पा रंगत होत्या आणि संध्याकाळ संपून घड्याळाचे काटे रात्रीची वेळ दाखवत होते. आता हे सारं अर्ध्यावरच सोडावं लागणार, अशी चुटपूट लागली होती. तेवढ्यात सुधीर सरांनी विचारलं, ‘‘उद्या काय करताय?’’ दुसऱ्या दिवशी डाकोरनाथजींच्या दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं होतं. पण सरांनी सांगितलं, ‘‘घरी या सकाळी साडेनऊ वाजता.’’ न जाताच डाकोरजी प्रसन्न झाले होते! मी कुठं राहतो, तिथून मला कोण न्यायला येईल आणि घरी सोडेल, याचा तपशील सरांनी तिथंच ठरवून टाकला. त्यांचे जुने सहकारी वसंतराव घाग यांना फोन करून माझा क्रमांकही दिला.

डाव अर्ध्यावर मोडला नव्हता; मैफल रंगायची होती. मंजलपूर भागातील सुधीर परब यांच्या टुमदार बंगल्यात (बंगला नाही हो, साधं घर म्हणा!’... इति सर) बरोबर साडेनऊ वाजता पोहोचलो. स्वहस्ते चहा बनवून सरांनी आणून ठेवला आणि गप्पाष्टकाचा पुढचा अध्याय सुरू. पुढे अडीच-तीन तास रंगलेला. गुरू बाबूराव सुर्वे यांचं नाव सर वारंवार आपुलकीनं घेत होते. गुजरात क्रीडा मंडळाच्या असंख्य खेळाडूंची नावं त्यांच्या स्मृतिकोशातून लगेच ओठांवर येत होती. योगेश यादव, निशिगंध देशपांडे, प्रवीण हरपळे, वसंतराव घाग, योगेंद्र देसाई, मराठीतला पहिला व्यायामकोश तयार करणारे आबासाहेब मुजुमदार, त्र्यंबकराव लेले, मधू मोरे, भाऊ तांबे... वर्ष, स्पर्धा स्थळ, असा अगदी बारीकसारीक तपशील अगदी अचूकपणे सांगितला जात होता. मधली १० मिनिटं खो-खो समजावून सांगताना सरांनी त्यांच्या दिवाणखान्याचं मैदान बनवलं. लंगडी पुन्हा आलीच. लंगडी खेळण्याचा फायदा काय? आमच्याकडे रिंगणात (तुम्ही महाराष्ट्रात त्याला चौकोनात म्हणता.) आक्रमकाला तोंडावर घेताना हुलकावण्या देण्याचं कौशल्य येतं, असं सरांनी सांगितलं. आता इथं त्यांच्या भाषिक अभ्यासाचंही दर्शन घडलं. हुलकावण्यांना गुजरातीतील रूढ शब्द पलट्या आहे. पतंगबाजीतून हे शब्द आले; ‘भपकी म्हणजे समोर पटकन हूल देणे. कत्तर म्हणजे कातरी जशी सर्रकन फिरते, तसं. एकाच वेळी दोन्ही हातांनी एक-एक गडी मारल्याची आठवणही मग निघते.

आठवणी एकामागून एक निघत राहतात. खुंटाला हाताने न शिवताच पायाने स्पर्श करून परत फिरण्याचा शोध परब सरांनी जोधपूरच्या १९५९-६०च्या स्पर्धेत लावला. प्रतिस्पर्धी मोहन आजगावकर ते कौशल्य पाहून त्यावर तोड काढू पाहत होता. पण इकडे बिनतोड उपाय होता. सरांनी खो न देताच मोहनरावांना मिठीत घेऊन मामा बनवलं. तेव्हाचे नियम वेगळे होते. आक्रमण करणाऱ्या संघाकडून फाऊल झाल्यास त्यांचा अर्धा गुण कापला जाई. दोषांक पद्धतीसारखा. त्याचा १९५०च्या स्पर्धेतील अफाट किस्सा सरांच्या पोतडीत आहे. गुजरात क्रीडा मंडळाचा कर्णधार अनिल डेरे तीन मिनिटे खेळला. नंतर जुम्मादादा व्यायाम मंदिराच्या संघानं तुफानी आक्रमण केलं. ‘‘या तुफानी आक्रमणाच्या नादात त्यांच्याकडून फाऊल होऊ लागले. एवढे की, एरवी आम्ही डावाने हरलो असतो तो सामना जिंकलो!’’, हे सांगताना सरांना आताही हसू आवरत नसतं.

आधी आक्रमक असलेले सुधीर परब तेच आपलं काम मानत. पण आंतरविद्यापीठ स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळताना बाबूराव सुर्वे यांनी त्यांना सांगितलं, तू चांगला संरक्षकही आहेस. तिथून पुढे तो प्रवास सुरू झाला नामवंत अष्टपैलू खो-खोपटू घडविणारा. इथं मग त्यांनी खेळाचं तत्त्वज्ञान सांगितलं, ‘‘खो-खो पायाऐवजी डोक्याने खेळायचा खेळ आहे. मी आक्रमक म्हणून संरक्षकाच्या फक्त पायाकडे लक्ष ठेवून असे. संरक्षण करताना आक्रमक खेळाडूच्या पायांची दिशा पाहत असे.’’ ‘‘तसा मी आधी गॅलरी-शो करणारा होतो. बहिणीनं मला बदलवून टाकलं,’’ असंही ते प्रांजळपणे सांगतात.

यथावकाश भारतीय ऑलिम्पिक संघटनेत खो-खो संघटनेचा समावेश झाला. राष्ट्रीय स्पर्धा सुरू लागली. हैदराबादला १९६५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुधीर सर पहिल्यांदा एकलव्य पुरस्काराचे मानकरी ठरले. गुरू वसंतराव कप्तान यांना एकसष्टीनिमित्त त्यांनी दिलेली ती अपूर्व भेट होती! बडोद्यात १९६७-६८मध्ये राष्ट्रीय स्पर्धा झाली. याच स्पर्धेत सुधीर परब यांनी नवनवीन विक्रमांना गवसणी घातली. संपूर्ण स्पर्धेत ते दोनदा किंवा तीनदाच बाद झाले. बरोबरीमुळे जादा डावापर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांची वेळ होती -  ५:२९ मिनिटे, ६:२५ आणि ६:४५. एकलव्य पुरस्कारासाठी त्यांच्या नावाशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्याच स्पर्धेनंतर नियम बदलला - एका खेळाडूला एकदाच हे पारितोषिक दिले जाईल!

वि. वि. क. यांच्याशी सुखसंवाद.
खजिन्यातून माहिती बाहेर पडत होती. टिपण काढताना माझी दमछाक सुरू होती. अलीकडंच म्हणजे ६ जानेवारी २०१८ रोजी सुधीर परब यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. त्या वेळी त्यांनी सर्व सहकाऱ्यांची आठवण काढली, त्यांचाही सत्कार करायला लावला. ते होते म्हणून मी इथपर्यंत आलो, असं सांगताना हळवा होतो स्वर त्यांचा. मग खूप जुनी जुनी नावं निघतात. त्यांना सहज विचारलं, ‘‘वि. वि. करमकर सरांशी बोलायचं का? फोन लावतो...’’ आपण आता कदाचित त्यांच्या लक्षात नसू, या भावनेनं सुधीर परब थोडं थबकतात. फोन लागतो आणि मग सुरू होतो दोन दिग्गजांचा संवाद. दहा मिनिटांच्या गप्पांनंतर सुधीर सर (पुन्हा हळवं होऊन) म्हणतात, ‘‘बरं झालं तुम्ही फोन लावला ते. त्यांच ऋण मान्य करायचं राहून गेलं होतं...’’ अशाच आठवणी मग ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आपुलकीच्या, मोरारजीभाईंच्या, खो-खोमुळे उत्तम यष्टिरक्षक बनलेल्या किरण मोरेच्या. खूप!

बडोद्याच्या खो-खोची आज दयनीय अवस्था झाली आहे. त्याबद्दलची खंत बोलून दाखवताना सुधीर परब म्हणाले, ‘‘शिक्षणाचा पर्याय निवडावा लागतो. खो-खो खेळून कोणी नोकरी देत नाही. नोकरी नसली तर जगायचं कसं? क्लब जिवंत राहिले, तर खेळ जगेल. त्यासाठी क्लब पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर, अशा दोन स्पर्धा व्हायला हव्यात.’’

खो-खो म्हणजे ‘Relay played by 9 players’, असं सांगून सर म्हणाले, ‘‘रीलेमध्ये बॅटन द्यायचं असतं, इथं खो म्हणजे ते बॅटन देणंच. इथं क्षणात गती घ्यावी लागते नि पुढच्या क्षणी गतिहीन व्हावं लागतं. सगळ्या खेळांचा पाया खो-खो आहे. खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो!’’

सुधीर परब. मोठा खेळाडू. अजूनही मैदानाच्या बाहेर न पडलेला. खेळावरंच प्रेम किंचितही कमी न झालेला. बडोद्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी अभिमानानं सांगणारा माणूस. साहित्य, कला, संगीत, माणसं या साऱ्यांबद्दल मनस्वी आपुलकी असलेला माणूस. पुढच्या भेटीत त्यांनी मला बडोद्यातलं बरंच काही दाखवायचं आश्वासन दिलं आहे. बऱ्याच मोठमोठ्या माणसांशी ते माझी भेट घालून देणार आहेत. तसं निमंत्रण स्वीकारून तर मी त्यांचं घर सोडलं... पुन्हा येण्याच्या बोलीवरच!

Tuesday 6 March 2018

नर्मदातटीचे नारेश्वर

(वडोदरा विशेष - २)
----
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सूप वाजल्यानंतर वडोदरा आणि परिसर पाहण्यासाठी दोन-तीन दिवस मुक्काम करायचं ठरवलं होतं. (संमेलनाला गेल्यावर सूप वाजलं अशाच भारदस्त साहित्यिक भाषेत लिहायचं असतं ना!) वडोदऱ्याहून एका दिवसात जाऊन परत येता येईल, अशी ठिकाणं शोधत होतो. संमेलनस्थळी गुजरात पर्यटन महामंडळाच्या दालनातून बऱ्यापैकी माहिती मिळाली. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांचा पुतण्या भागवत यांनी सुचविल्यानुसार नारेश्वरला जायचं ठरवलं. ते दत्त देवस्थानांपैकी एक, असं त्यांनी सांगितलं.

वडोदऱ्याच्या प्रशस्त बसस्थानकावरून सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास नारेश्वर धामसाठी बस असते आणि तिथून परतायला दीड वाजता. बस कुठल्या फलाटावर, किती वाजता लागते याची चौकशी करून फलाटावर उभं राहिलो, तोच एक रिकामी बस आली. तिचा वाहक नारेसर-नारेसरच ओरडत होता. (नारेसर किंवा नारेस्वर, अंकलेसर किंवा अंकलेस्वर... हे तिथले आपल्याला ऐकू येणारे उच्चार.) त्या तरुण वाहकाला (उगीचंच) मस्का लावत विचारलं, आप हमे नारेश्वर ले जायेंगे ना?’ त्यानं आश्वासक हास्यानंच उत्तर दिलं. घाई करीत बसमध्ये शिरलो. पण त्याची गरजच नव्हती. माझ्यानंतर अजून सात-आठच प्रवासी चढले आणि गाडी सुटली. नारेश्वर फारसं लोकप्रिय नसावं किंवा ही अगदीच डब्बा गाडी आहे, असं प्रवाशाच्या संख्येवरून वाटलं. आणखी दोन-तीन जणांनी नारेश्वरचं तिकीट घेतल्यावर योग्य गाडीत बसल्याचा दिलासा मिळाला.

ही रिकामी बस साधू वासवानी चौकातल्या थांब्यावरच ओसंडून भरू लागली. तिथनं पुढं हात दाखवा, गाडी थांबवा, थोडे प्रवासी उतरवा नि भरपूर प्रवासी चढवा असा प्रकार सुरू होता. या ७२ किलोमीटरच्या प्रवासाला साधारण दोन तास लागले आणि तिकीट फक्त ३७ रुपये. रस्ता चांगलाच होता.

श्रीरंगावधूत महाराज मंदिराचं प्रवेशद्वार बाहेरून आणि आतून असं दिसतं.
नारेश्वर दत्तसंप्रदायातलं महत्त्वाचं ठिकाण आहे. श्रीरंग अवधूत (तिथं उच्चार श्रीरंगावधूत असाच करतात.) दत्तसंप्रदायातले महत्त्वाचे संत-कवी. अनुयायी-भाविक त्यांना दत्तात्रेयाचा अवतार मानतात. गुजरातमध्ये दत्तसंप्रदायाच्या प्रसाराचं मोठं काम त्यांनी केलं. (अधिक तपशील - https://en.wikipedia.org/wiki/Rang_Avadhoot). मंदिराच्या अगदी जवळच बसथांबा आहे. मंदिर प्रशस्त आणि शांत. आवारात आपल्या पद्धतीप्रमाणे अन्य छोटी-मोठी मंदिरे. रंगावधूत स्वामींची मोठी मूर्ती आहे. मुक्कामाची आणि दोन्ही वेळच्या प्रसादाची सोय आहे. मंदिरात छायाचित्रं काढायला मनाई असल्याचा फलक होता. पण नेमकी कुठली छायाचित्र काढायला मनाई आणि कुठली काढता येतील, हे न कळल्यानं प्रवेशद्वाराची आणि भोजनगृहाची छायाचित्रं घेतली.


इथं येण्याचं मुख्य आकर्षण होतं नर्मदामैया. परिक्रमेची चार-पाच पुस्तकं वाचली आतापर्यंत. तेव्हापासून नर्मदेविषयीची उत्कंठा वाढलेली. तिचं दर्शन घ्यायचं होतं. मंदिरात दर्शन घेऊन विचारत नर्मदामैयाकडं गेलो. श्रीरंग सेवा घाट - नऊ वर्षांपूर्वी तयार झालेला हा घाट भक्कम आणि चांगला आहे. पण तरीही त्याला थोडी कळा आलेली वाटली. घाट उतरतानाच नर्मदेचं घडलेलं दर्शन तेवढं विलोभनीय नव्हतं. पात्रात पाणी होतं, पण नदी दुथडी भरून वाहताना दिसली नाही. एका छोट्या शाळेची सहल होती तिथं. त्यातल्या विद्यार्थ्यांना पाहून आलेले उंटवाले. विस्तीर्ण वाळवंटात चौपाटी. सकाळ जेमतेम संपून दुपार होत असल्याने त्या चौपाटीवर आळसावलेली शांतता. लोकांना पलीकडच्या गावात ने-आण करणारी एक बोट. स्वतःचं काही तरी हरवल्यासारखं पाण्यात ऐवज शोधणारा तरुण. बहुदा परिक्रमावासीयांनी पूजेसाठी केलेल्या पात्रातील महादेवाच्या पिंडी. डुंबणाऱ्या म्हशी. थोड्या दूरवर सुरू असलेला वाळूचा जोरदार उपसा. त्याच्या यंत्रांची घरघर आणि मालमोटारींची थरथर. चौपाटी म्हटल्यावर अपरिहार्य असलेला कचरा. हे दृश्य काही फार मनोहर नाही वाटलं. तसं ते नव्हतंच.
नारेश्वरच्या श्रीरंग सेवा घाटावरून घडलेलं नर्मदामातेचं पहिलं दर्शन.
नर्मदामैयाला पुन्हा भेटायला यायचं कबूल करून देवस्थानातल्या भोजनगृहाकडं वळलो. मोठी रांग असूनही शांततेत प्रसाद वाढणं-घेणं सुरू होतं. भात-आमटी, मसालेदार दिसणारी पण तिखट नसणारी वांगी-वाटाण्याची भाजी आणि बर्फी. वडोदऱ्याच्या परतीच्या प्रवासासाठी थांब्यावर येऊन थांबलो आणि अचानक नर्मदा परिक्रमेला निघालेले भाविक भेटले. त्यांच्याबरोबर परिक्रमेला निघण्याचा आग्रह कसाबसा नाकारून निघालो. त्या विषयी नंतर. तूर्तास नर्मदेच्या पहिल्यावहिल्या भेटीची ही काही छायाचित्रं...


नर्मदेच्या वाळवंटात थाटलेली ही चौपाटी. गेला तेव्हा दुपार असल्याने तिथं सारी सामसूम होती.
(खालचं छायाचित्र) या बाई मात्र उकडलेली मक्याची कणसं घेऊन होत्या तिथं. 












कंबरभर पाण्यात उभं राहून चाललेली ही साधना नव्हे,
तर मोलाचं काही गवसावं यासाठीचे श्रम आहेत!


नर्मदेच्या पात्रात झालेली शिवलिंगांची पूजा.


सहलीला आलेल्या मुलांची घोडेस्वारी.
उंटावरचे शहाणे होण्यास मात्र कुणी तयार नव्हतं.


संध्याकाळपर्यंत काहीच काम नसल्यानं वाळूत तोंड खुपसण्याच्या बेतात असलेला रईस.


नदीकाठी वाळूची चलती. महाराष्ट्राप्रमाणंच
इथंही वाळूचा उपसा असा जोरात सुरू असलेला दिसला.














तुरीच्या ओल्या शेंगा घ्यायच्या की सोललेले दाणे?


सहलीसाठी आल्यावर सहभोजनाचा आनंद
आणि तोही प्रसादालयात.


नारेश्वरहून पलीकडच्या तिरावरच्या गावात ने-आण करणारी नाव. यंत्रावर चालते ती.
माणसांसह वाहनांना ले चल पारचं काम दिवसभर सुरू असतं. एका फेरीचं भाडं १० रुपये.


पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...