(वडोदरा विशेष - २)
----
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सूप
वाजल्यानंतर वडोदरा आणि परिसर पाहण्यासाठी दोन-तीन दिवस मुक्काम करायचं ठरवलं
होतं. (संमेलनाला गेल्यावर ‘सूप वाजलं’ अशाच भारदस्त साहित्यिक भाषेत लिहायचं असतं ना!) वडोदऱ्याहून
एका दिवसात जाऊन परत येता येईल, अशी ठिकाणं शोधत होतो. संमेलनस्थळी गुजरात पर्यटन
महामंडळाच्या दालनातून बऱ्यापैकी माहिती मिळाली. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी
यांचा पुतण्या भागवत यांनी सुचविल्यानुसार नारेश्वरला जायचं ठरवलं. ते दत्त देवस्थानांपैकी एक, असं त्यांनी सांगितलं.
वडोदऱ्याच्या प्रशस्त बसस्थानकावरून
सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास नारेश्वर धामसाठी बस असते आणि तिथून परतायला दीड वाजता. बस कुठल्या फलाटावर, किती
वाजता लागते याची चौकशी करून फलाटावर उभं राहिलो, तोच एक रिकामी बस आली. तिचा वाहक
‘नारेसर-नारेसर’च ओरडत
होता. (नारेसर किंवा नारेस्वर, अंकलेसर किंवा अंकलेस्वर... हे तिथले आपल्याला ऐकू
येणारे उच्चार.) त्या तरुण वाहकाला (उगीचंच) मस्का लावत विचारलं, ‘आप हमे नारेश्वर ले जायेंगे ना?’ त्यानं आश्वासक हास्यानंच उत्तर दिलं. घाई करीत बसमध्ये शिरलो. पण त्याची गरजच
नव्हती. माझ्यानंतर अजून सात-आठच प्रवासी चढले आणि गाडी सुटली. नारेश्वर फारसं लोकप्रिय नसावं किंवा ही अगदीच डब्बा गाडी आहे, असं
प्रवाशाच्या संख्येवरून वाटलं. आणखी दोन-तीन जणांनी नारेश्वरचं तिकीट घेतल्यावर योग्य गाडीत बसल्याचा दिलासा मिळाला.
ही रिकामी बस साधू वासवानी चौकातल्या
थांब्यावरच ओसंडून भरू लागली. तिथनं पुढं ‘हात
दाखवा, गाडी थांबवा, थोडे प्रवासी उतरवा नि भरपूर प्रवासी चढवा’ असा प्रकार सुरू होता. या ७२ किलोमीटरच्या प्रवासाला साधारण दोन तास
लागले आणि तिकीट फक्त ३७ रुपये. रस्ता चांगलाच होता.
श्रीरंगावधूत महाराज मंदिराचं प्रवेशद्वार बाहेरून आणि आतून असं दिसतं. |
नारेश्वर दत्तसंप्रदायातलं महत्त्वाचं ठिकाण आहे. श्रीरंग अवधूत (तिथं उच्चार
श्रीरंगावधूत असाच करतात.) दत्तसंप्रदायातले महत्त्वाचे संत-कवी. अनुयायी-भाविक
त्यांना दत्तात्रेयाचा अवतार मानतात. गुजरातमध्ये दत्तसंप्रदायाच्या प्रसाराचं
मोठं काम त्यांनी केलं. (अधिक तपशील - https://en.wikipedia.org/wiki/Rang_Avadhoot). मंदिराच्या अगदी जवळच बसथांबा आहे. मंदिर प्रशस्त आणि शांत. आवारात आपल्या
पद्धतीप्रमाणे अन्य छोटी-मोठी मंदिरे. रंगावधूत स्वामींची मोठी मूर्ती आहे.
मुक्कामाची आणि दोन्ही वेळच्या प्रसादाची सोय आहे. मंदिरात छायाचित्रं काढायला मनाई असल्याचा फलक होता.
पण नेमकी कुठली छायाचित्र काढायला मनाई आणि कुठली काढता येतील, हे न कळल्यानं प्रवेशद्वाराची
आणि भोजनगृहाची छायाचित्रं घेतली.
इथं येण्याचं मुख्य आकर्षण होतं नर्मदामैया.
परिक्रमेची चार-पाच पुस्तकं वाचली आतापर्यंत. तेव्हापासून नर्मदेविषयीची उत्कंठा
वाढलेली. तिचं दर्शन घ्यायचं होतं. मंदिरात दर्शन घेऊन विचारत नर्मदामैयाकडं गेलो.
श्रीरंग सेवा घाट - नऊ वर्षांपूर्वी तयार झालेला हा घाट भक्कम आणि चांगला आहे. पण
तरीही त्याला थोडी कळा आलेली वाटली. घाट उतरतानाच नर्मदेचं घडलेलं दर्शन तेवढं
विलोभनीय नव्हतं. पात्रात पाणी होतं, पण नदी दुथडी भरून वाहताना दिसली नाही.
एका छोट्या शाळेची सहल होती तिथं. त्यातल्या विद्यार्थ्यांना पाहून आलेले उंटवाले. विस्तीर्ण वाळवंटात
‘चौपाटी’. सकाळ जेमतेम
संपून दुपार होत असल्याने त्या ‘चौपाटी’वर आळसावलेली शांतता. लोकांना पलीकडच्या गावात ने-आण करणारी एक बोट. स्वतःचं काही
तरी हरवल्यासारखं पाण्यात ऐवज शोधणारा तरुण. बहुदा परिक्रमावासीयांनी पूजेसाठी
केलेल्या पात्रातील महादेवाच्या पिंडी. डुंबणाऱ्या म्हशी. थोड्या दूरवर सुरू
असलेला वाळूचा जोरदार उपसा. त्याच्या यंत्रांची घरघर आणि मालमोटारींची थरथर.
चौपाटी म्हटल्यावर अपरिहार्य असलेला कचरा. हे दृश्य काही फार मनोहर नाही वाटलं. तसं ते नव्हतंच.
नारेश्वरच्या श्रीरंग सेवा घाटावरून घडलेलं नर्मदामातेचं पहिलं दर्शन.
|
नर्मदामैयाला पुन्हा भेटायला यायचं
कबूल करून देवस्थानातल्या भोजनगृहाकडं वळलो. मोठी रांग असूनही शांततेत प्रसाद वाढणं-घेणं
सुरू होतं. भात-आमटी, मसालेदार दिसणारी पण तिखट नसणारी वांगी-वाटाण्याची भाजी आणि
बर्फी. वडोदऱ्याच्या परतीच्या प्रवासासाठी थांब्यावर येऊन थांबलो आणि अचानक नर्मदा
परिक्रमेला निघालेले भाविक भेटले. त्यांच्याबरोबर परिक्रमेला निघण्याचा आग्रह
कसाबसा नाकारून निघालो. त्या विषयी नंतर. तूर्तास नर्मदेच्या पहिल्यावहिल्या
भेटीची ही काही छायाचित्रं...
नर्मदेच्या वाळवंटात थाटलेली ही
चौपाटी. गेला तेव्हा दुपार असल्याने तिथं सारी सामसूम होती.
(खालचं छायाचित्र) या बाई मात्र उकडलेली
मक्याची कणसं घेऊन होत्या तिथं. |
कंबरभर पाण्यात उभं राहून चाललेली ही
साधना नव्हे,
तर मोलाचं काही गवसावं यासाठीचे श्रम आहेत! |
नर्मदेच्या पात्रात झालेली
शिवलिंगांची पूजा. |
सहलीला आलेल्या मुलांची घोडेस्वारी. उंटावरचे शहाणे होण्यास मात्र कुणी तयार नव्हतं.
|
संध्याकाळपर्यंत काहीच काम नसल्यानं वाळूत
तोंड खुपसण्याच्या बेतात असलेला ‘रईस’.
|
नदीकाठी वाळूची चलती.
महाराष्ट्राप्रमाणंच
इथंही वाळूचा उपसा असा जोरात सुरू
असलेला दिसला. |
तुरीच्या ओल्या शेंगा घ्यायच्या की सोललेले दाणे? |
सहलीसाठी आल्यावर सहभोजनाचा आनंद आणि
तोही प्रसादालयात. |
नारेश्वरहून पलीकडच्या तिरावरच्या गावात ने-आण करणारी नाव. यंत्रावर चालते ती. माणसांसह वाहनांना ‘ले चल पार’चं काम
दिवसभर सुरू असतं. एका फेरीचं भाडं १० रुपये.
|
घरबसल्या 'नर्मदामैया'चे दर्शन घेता आले. अप्रतिमच!
उत्तर द्याहटवा- रोहिणी पुंडलिक, नगर
मस्त माहिती
उत्तर द्याहटवानर्मदे हर
उत्तर द्याहटवाबडोद्याजवळच्या नारेश्वरबद्दल वाचताना आम्ही अलीकडेच केलेल्या नर्मदा परिक्रमेच्या आठवणी ताज्या झाल्या.
उत्तर द्याहटवा- दिलीप वैद्य, पुणे
नारेश्वरच्या वर्णनावरून बडोद्याला तीनतीनदा जाऊनही आपण न बघितल्याबद्दल खंत वाटली नाही. नर्मदा बघावी तर जबलपूरचीच. भेडाघाट, मार्बल रॉक्स व धुवाधार ही अप्रतिम ठिकाणे नसली बघितली तर अवश्य बघा.
उत्तर द्याहटवा- प्रियंवदा कोल्हटकर
सर्व नद्या आम्हाला गंगेसमानच! म्हणूनच आपली प्रवाही लेखणी 'खिडकी'तून थेट नर्मदेच्या प्रवाहास जाऊन मिळाली. आपला लेख नकळत 'Testament of Jawaharlal Neharu' मध्ये पंडितजींनी गंगा-यमुना नद्यांचं केलेल्या भावस्पर्शी वर्णनाची तसेच 'When the Rivers run Dry'मध्ये श्री. फ्रेड पियर्स यांनी 'भारत एक प्रचंड अंदाधुंदी' म्हणून भारतातील नद्या-पाणी व्यवस्थापन याची वर्णन केलेली वस्तुस्थिती यांची आठवण करून देतो.
उत्तर द्याहटवा- श्रीराम वांढरे