सोमवार, १२ मार्च, २०१८

एकलव्य, अर्जुन आणि द्रोणाचार्यही

(वडोदरा विशेष - ३)
----
खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो - सुधीर परब!

· केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराचा भारतीय खेळांमधला पहिला मानकरी...
· याच पुरस्काराचा गुजरातेतील आद्य विजेता...
· देशी खेळाला अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात माझ्यापासून होईल, असं वडिलांना सांगणारा...
· राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार देण्याचा निकष बदलण्यासाठी निमित्त ठरलेला अष्टपैलू...
· खो-खोचा डाव सुरू होताच पहिल्या२० सेकंदांतच ३ गडी टिपण्याचा पराक्रम...
· वयाच्या पंचाहत्तरीतही रोज नियमाने मैदानावर उपस्थित राहून खेळाडू घडविणारा मार्गदर्शक-संघटक...


या माणसाची ओळख पटविण्यासाठी तीन शब्द पुरेसे, नऊ अक्षरं - सुधीर भास्कर परब!

साहित्य संमेलनासाठी वडोदऱ्यात पोहोचलो, त्याच दिवशी सकाळी जुना खो-खोपटू निर्मलचंद्र थोरात यानं फोन करून सांगितलं की, सुधीर परब यांना भेट. मध्यस्थ रमतचे जुने खो-खो खेळाडू आहेत. एकलव्य पारितोषिक त्यांना दोनदा मिळालंय.’ (ते गुजरात क्रीडा मंडळाचे हे नंतर स्पष्ट झालं.)


शाळकरी वयात मध्यस्थ रमत, हॅपी वाँडरर्स या महाराष्ट्राबाहेरच्या क्रीडा मंडळांची नावं ऐकली होती. तिथल्या बऱ्याच खेळाडूंचीही नावं वाचून माहीत होती. पण आता हे दोन्ही संघ बातम्यांमध्ये येत नसल्याने ही नावं आठवणींच्या कोपऱ्यात दडलेली. त्यातलंच हे एक. निर्मलनं सुचवलं खरं, पण त्यांचा संपर्क क्रमांक कुठून मिळवायचा. मग नाशिकच्या मंदार देशमुखला साकडं घातलं. मंदार महाराष्ट्र खो-खो संघटनेचा कार्याध्यक्ष; त्याहून महत्त्वाचं म्हणजे चांगला संघटक. त्याचा सुरतेच्या खो-खो क्लबशी संपर्क. तिथून तो सुधीर परब यांचा क्रमांक मिळवून देईल, असं वाटलं होतं नि तसंच झालं.

संपर्काचा क्रमांक मिळताच परब यांना सविस्तर निरोप पाठविला व्हॉट्सअॅपवरून. कोण, काय, कशासाठी भेटू इच्छितो इत्यादी. त्यानंतर उत्तराची पाऊण तास वाट पाहिली नि लक्षात आलं की, त्यांनी निरोप अजून वाचलेलाच नाही! थेट फोन लावला. अनोळखी नंबर. ते फोन उचलतात की नाही, अशी भीती. पण तसं काहीच झालं नाही. पहिल्या मिनिटात ओळख सांगितली नि परब सरांनी लगेच सांगितलं, ‘‘पोलो मैदानाजवळच्या यूथ सर्व्हिस सेंटरवर या.’’ सविस्तर पत्ता, रिक्षावाल्याला सांगायच्या खुणा याचीही माहिती दिली.

पोलो मैदान माहीत होतं. पायी चाललं की शहराची माहिती होते, असा समज आणि स्वतःच्या पायांवर दांडगा विश्वास. त्यामुळे रिक्षा टाळून कूच केली. तीन जणांना विचारत, खात्री करत नेमकं एक चौक अलीकडंच वळलो. तासाभरानं परब सरांचा फोन. च् च् करीत ते म्हणाले, ‘‘आहात तिथंच थांबा. मुलगा पाठवतो घ्यायला.’’ 

यूथ सर्व्हिस सेंटरवर पोहोचलो आणि गप्पा सुरू झाल्या. जवळचं पुस्तक परब सरांना भेट देताना आगाऊपणा केला. विचारलं, पुस्तकं वाचायला आवडतात का?’ (खेळाडूचा आणि वाचनाचा काय संबंध, असा आपला रुजलेला गैरसमज.) हो असं सरळ उत्तर देताना सरांनी सुरुवात केली ती जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणना होणाऱ्या थ्री मस्केटीअर्सवर बोलायला. अलेक्झांडर ड्युमाच्या त्या तीन शिलेदारांचं महत्त्व रसाळपणे सांगू लागले. त्यांची निष्ठा आणि खेळ याचा संबंध जोडून ते भरभरून बोलू लागले. सरांनी त्यांना शाळकरी वयात वाचायला सुचविलेलं ते पुस्तक. त्यांनी ते पचवलं होतं...


अर्जुन पुरस्कार आणि डावीकडे
अमृतमहोत्सवानिमित्तचं गौरवचिन्ह

परब सरांचं लक्ष पुस्तकावरून मैदानाकडं वळवणं मला आवश्यक होतं. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला एकलव्य पुरस्कार दिला जातो. कोणत्याही खेळाडूला हा पुरस्कार एकदाच देण्यात यावा, असा त्याचा निकष बदलण्याचं कारण ठरलेल्या सुधीर परब यांच्याकडून अंदर की बात जाणून घ्यायची होती. हा पुरस्कार दोन वेळा मिळविणारे ते एकमेवाद्वितीय. गुजरातेतली खो-खोची लोकप्रियता आणि त्यात आघाडीवर असलेली मराठमोळी नावं, याचंही रहस्य माहीत करून घ्यायचं होतं. सरांचा क्रीडाप्रवास त्यांच्याच तोंडून ऐकायचा होता. त्यामुळेच ड्युमाच्या संमोहनातून सर बाहेर निघणं आवश्यक होतं.

अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचा सुवर्णमहोत्सव १९५४मध्ये झाला. त्यानिमित्त अखिल भारतीय खो-खो स्पर्धा आयोजित केली होती.  गुजरात क्रीडा मंडळाकडून सुधीर परब यांनी पदार्पण केलं. त्यांचं वय होतं ११. त्यांच्या संघाचं नेतृत्व होतं जयवंत लेले यांच्याकडे. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वाधिक गाजलेले सरचिटणीस म्हणून लेले यांचा नक्कीच उल्लेख करता येईल. एवढे गाजलेले लेले किती साधे होते आणि शेवटपर्यंत कसे साध्या घरात राहत होते, हे परब सरांनी बोलता बोलता सांगून टाकलं.) या स्पर्धेचा अंतिम सामना पुणे आणि बडोदे संघांमध्ये झाला. श्रीकांत टिळक, नंदू घाटे, अविनाश भावे आदी जुन्या खेळाडूंच्या आठवणी मग ओघानेच आल्या. श्रीकांत टिळक हातात घड्याळ बांधून खेळत आणि राउंड गेम त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य, हेही त्यांनी बोलता बोलता सांगून टाकलं. तब्बल सहा दशकांनंतरही त्यांना प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू आणि त्यांची वैशिष्ट्यं आठवत होती.

आठवणींचा ओघ सुरू होता. त्या गप्पांमध्ये एक गोष्ट लक्षात आली - काही अडलं, तर ती साखळी जुळल्याशिवाय परब सर पुढे सरकतच नव्हते. आजूबाजूला बसलेल्या मित्रांना विचारत, नकाशा काढायला लावत. असंच काही तरी होतं... म्हणत ते पुढची पायरी गाठत नसत. परिपूर्णतेचा ध्यास! त्या काळात एक खेळ-एक संघटना असं काही रुजलं नव्हतं. अखिल भारतीय स्पर्धा होत त्या विविध मंडळांच्या संघांच्या. धारवाडपासून गुजरातपर्यंत एकच राज्य असलेल्या बृहन्मुंबई राज्याचा क्रीडा महोत्सव ५४-५५मध्ये सुरू झाला. द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी त्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी पैसा कसा उभा केला? तर रेसच्या बक्षिसांमधील काही ठरावीक निधी या महोत्सवासाठी वळवला, अशी गमतीदार आठवण परब सरांनी सांगितली. म्हणजे घोडे जिंकत आणि खो-खोपटू पळत!

मुद्दा असा बारकाईनं स्पष्ट केला जातो
डभोईत राहणाऱ्या सुधीर परब यांचं खेळाशी नातं तिथल्या शाळेत १९४७मध्येच जुळलं. सर्व इयत्तांना शिकविणाऱ्या राऊबाई सपकाळ आणि व्यायाम शिक्षक बाबूराव सोंडकर यांची नावं आजही त्यांच्या ओठावर आहेत. लंगडीपासून सुरुवात झाली. (त्यांचं लंगडी प्रेम आणि ते लंगडीचं माहात्म्य ज्या पद्धतीनं सांगतात, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) तिसरीनंतर पुढच्या शिक्षणासाठी ते बडोद्यात आजीकडं आले. सोबत बहीण लता परब होतीच. पहिल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेली खो-खोपटू, अशी त्यांची ओळख. गुजरात क्रीडा मंडळाच्या मैदानावर १९५०मध्ये निकुंज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर परब यांचा लंगडीचा सराव सुरू झाला. तेव्हाच्या बडोद्याचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले, ‘‘सर्व महाराष्ट्रीय मंडळी मुलांना तालमीत नाही तर गुरुवर्य वसंतराव कप्तान यांच्या गुजरात क्रीडा मंडळात पाठवत. लंगडी सहसा एका पायानं शिकतात. पण आम्हाला दोन्ही पायांनी लंगडी घालायला शिकवलं. त्याचा पदन्यासासाठी फार मोठा फायदा झाला.’’ आधी लंगडी, त्यात प्रावीण्य मिळाल्यावर दमसास वाढविण्यासाठी कबड्डी आणि मग बुद्धिचापल्यासाठी आट्यापाट्या असा खेळाडूंचा प्रवास असे.

गप्पा रंगत होत्या आणि संध्याकाळ संपून घड्याळाचे काटे रात्रीची वेळ दाखवत होते. आता हे सारं अर्ध्यावरच सोडावं लागणार, अशी चुटपूट लागली होती. तेवढ्यात सुधीर सरांनी विचारलं, ‘‘उद्या काय करताय?’’ दुसऱ्या दिवशी डाकोरनाथजींच्या दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं होतं. पण सरांनी सांगितलं, ‘‘घरी या सकाळी साडेनऊ वाजता.’’ न जाताच डाकोरजी प्रसन्न झाले होते! मी कुठं राहतो, तिथून मला कोण न्यायला येईल आणि घरी सोडेल, याचा तपशील सरांनी तिथंच ठरवून टाकला. त्यांचे जुने सहकारी वसंतराव घाग यांना फोन करून माझा क्रमांकही दिला.

डाव अर्ध्यावर मोडला नव्हता; मैफल रंगायची होती. मंजलपूर भागातील सुधीर परब यांच्या टुमदार बंगल्यात (बंगला नाही हो, साधं घर म्हणा!’... इति सर) बरोबर साडेनऊ वाजता पोहोचलो. स्वहस्ते चहा बनवून सरांनी आणून ठेवला आणि गप्पाष्टकाचा पुढचा अध्याय सुरू. पुढे अडीच-तीन तास रंगलेला. गुरू बाबूराव सुर्वे यांचं नाव सर वारंवार आपुलकीनं घेत होते. गुजरात क्रीडा मंडळाच्या असंख्य खेळाडूंची नावं त्यांच्या स्मृतिकोशातून लगेच ओठांवर येत होती. योगेश यादव, निशिगंध देशपांडे, प्रवीण हरपळे, वसंतराव घाग, योगेंद्र देसाई, मराठीतला पहिला व्यायामकोश तयार करणारे आबासाहेब मुजुमदार, त्र्यंबकराव लेले, मधू मोरे, भाऊ तांबे... वर्ष, स्पर्धा स्थळ, असा अगदी बारीकसारीक तपशील अगदी अचूकपणे सांगितला जात होता. मधली १० मिनिटं खो-खो समजावून सांगताना सरांनी त्यांच्या दिवाणखान्याचं मैदान बनवलं. लंगडी पुन्हा आलीच. लंगडी खेळण्याचा फायदा काय? आमच्याकडे रिंगणात (तुम्ही महाराष्ट्रात त्याला चौकोनात म्हणता.) आक्रमकाला तोंडावर घेताना हुलकावण्या देण्याचं कौशल्य येतं, असं सरांनी सांगितलं. आता इथं त्यांच्या भाषिक अभ्यासाचंही दर्शन घडलं. हुलकावण्यांना गुजरातीतील रूढ शब्द पलट्या आहे. पतंगबाजीतून हे शब्द आले; ‘भपकी म्हणजे समोर पटकन हूल देणे. कत्तर म्हणजे कातरी जशी सर्रकन फिरते, तसं. एकाच वेळी दोन्ही हातांनी एक-एक गडी मारल्याची आठवणही मग निघते.

आठवणी एकामागून एक निघत राहतात. खुंटाला हाताने न शिवताच पायाने स्पर्श करून परत फिरण्याचा शोध परब सरांनी जोधपूरच्या १९५९-६०च्या स्पर्धेत लावला. प्रतिस्पर्धी मोहन आजगावकर ते कौशल्य पाहून त्यावर तोड काढू पाहत होता. पण इकडे बिनतोड उपाय होता. सरांनी खो न देताच मोहनरावांना मिठीत घेऊन मामा बनवलं. तेव्हाचे नियम वेगळे होते. आक्रमण करणाऱ्या संघाकडून फाऊल झाल्यास त्यांचा अर्धा गुण कापला जाई. दोषांक पद्धतीसारखा. त्याचा १९५०च्या स्पर्धेतील अफाट किस्सा सरांच्या पोतडीत आहे. गुजरात क्रीडा मंडळाचा कर्णधार अनिल डेरे तीन मिनिटे खेळला. नंतर जुम्मादादा व्यायाम मंदिराच्या संघानं तुफानी आक्रमण केलं. ‘‘या तुफानी आक्रमणाच्या नादात त्यांच्याकडून फाऊल होऊ लागले. एवढे की, एरवी आम्ही डावाने हरलो असतो तो सामना जिंकलो!’’, हे सांगताना सरांना आताही हसू आवरत नसतं.

आधी आक्रमक असलेले सुधीर परब तेच आपलं काम मानत. पण आंतरविद्यापीठ स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळताना बाबूराव सुर्वे यांनी त्यांना सांगितलं, तू चांगला संरक्षकही आहेस. तिथून पुढे तो प्रवास सुरू झाला नामवंत अष्टपैलू खो-खोपटू घडविणारा. इथं मग त्यांनी खेळाचं तत्त्वज्ञान सांगितलं, ‘‘खो-खो पायाऐवजी डोक्याने खेळायचा खेळ आहे. मी आक्रमक म्हणून संरक्षकाच्या फक्त पायाकडे लक्ष ठेवून असे. संरक्षण करताना आक्रमक खेळाडूच्या पायांची दिशा पाहत असे.’’ ‘‘तसा मी आधी गॅलरी-शो करणारा होतो. बहिणीनं मला बदलवून टाकलं,’’ असंही ते प्रांजळपणे सांगतात.

यथावकाश भारतीय ऑलिम्पिक संघटनेत खो-खो संघटनेचा समावेश झाला. राष्ट्रीय स्पर्धा सुरू लागली. हैदराबादला १९६५मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुधीर सर पहिल्यांदा एकलव्य पुरस्काराचे मानकरी ठरले. गुरू वसंतराव कप्तान यांना एकसष्टीनिमित्त त्यांनी दिलेली ती अपूर्व भेट होती! बडोद्यात १९६७-६८मध्ये राष्ट्रीय स्पर्धा झाली. याच स्पर्धेत सुधीर परब यांनी नवनवीन विक्रमांना गवसणी घातली. संपूर्ण स्पर्धेत ते दोनदा किंवा तीनदाच बाद झाले. बरोबरीमुळे जादा डावापर्यंत गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांची वेळ होती -  ५:२९ मिनिटे, ६:२५ आणि ६:४५. एकलव्य पुरस्कारासाठी त्यांच्या नावाशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्याच स्पर्धेनंतर नियम बदलला - एका खेळाडूला एकदाच हे पारितोषिक दिले जाईल!

वि. वि. क. यांच्याशी सुखसंवाद.
खजिन्यातून माहिती बाहेर पडत होती. टिपण काढताना माझी दमछाक सुरू होती. अलीकडंच म्हणजे ६ जानेवारी २०१८ रोजी सुधीर परब यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. त्या वेळी त्यांनी सर्व सहकाऱ्यांची आठवण काढली, त्यांचाही सत्कार करायला लावला. ते होते म्हणून मी इथपर्यंत आलो, असं सांगताना हळवा होतो स्वर त्यांचा. मग खूप जुनी जुनी नावं निघतात. त्यांना सहज विचारलं, ‘‘वि. वि. करमकर सरांशी बोलायचं का? फोन लावतो...’’ आपण आता कदाचित त्यांच्या लक्षात नसू, या भावनेनं सुधीर परब थोडं थबकतात. फोन लागतो आणि मग सुरू होतो दोन दिग्गजांचा संवाद. दहा मिनिटांच्या गप्पांनंतर सुधीर सर (पुन्हा हळवं होऊन) म्हणतात, ‘‘बरं झालं तुम्ही फोन लावला ते. त्यांच ऋण मान्य करायचं राहून गेलं होतं...’’ अशाच आठवणी मग ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आपुलकीच्या, मोरारजीभाईंच्या, खो-खोमुळे उत्तम यष्टिरक्षक बनलेल्या किरण मोरेच्या. खूप!

बडोद्याच्या खो-खोची आज दयनीय अवस्था झाली आहे. त्याबद्दलची खंत बोलून दाखवताना सुधीर परब म्हणाले, ‘‘शिक्षणाचा पर्याय निवडावा लागतो. खो-खो खेळून कोणी नोकरी देत नाही. नोकरी नसली तर जगायचं कसं? क्लब जिवंत राहिले, तर खेळ जगेल. त्यासाठी क्लब पातळीवर आणि व्यावसायिक पातळीवर, अशा दोन स्पर्धा व्हायला हव्यात.’’

खो-खो म्हणजे ‘Relay played by 9 players’, असं सांगून सर म्हणाले, ‘‘रीलेमध्ये बॅटन द्यायचं असतं, इथं खो म्हणजे ते बॅटन देणंच. इथं क्षणात गती घ्यावी लागते नि पुढच्या क्षणी गतिहीन व्हावं लागतं. सगळ्या खेळांचा पाया खो-खो आहे. खो-खो जगावा लागतो, पचवावा लागतो!’’

सुधीर परब. मोठा खेळाडू. अजूनही मैदानाच्या बाहेर न पडलेला. खेळावरंच प्रेम किंचितही कमी न झालेला. बडोद्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी अभिमानानं सांगणारा माणूस. साहित्य, कला, संगीत, माणसं या साऱ्यांबद्दल मनस्वी आपुलकी असलेला माणूस. पुढच्या भेटीत त्यांनी मला बडोद्यातलं बरंच काही दाखवायचं आश्वासन दिलं आहे. बऱ्याच मोठमोठ्या माणसांशी ते माझी भेट घालून देणार आहेत. तसं निमंत्रण स्वीकारून तर मी त्यांचं घर सोडलं... पुन्हा येण्याच्या बोलीवरच!

२४ टिप्पण्या:

  1. जबरदस्त मार्गदर्शक लेखन...आम्हा नवागतांना प्रेरक शब्दांकन

    उत्तर द्याहटवा
  2. सुधीर परब सर यांच्यावरचा लेख अफलातून आहे. खूपच सुंदर भाषाशैली...साधी, सरळ आणि समजणारी.
    - शानूल देशमुख, नाशिक

    उत्तर द्याहटवा
  3. सतीश काय व कसे लिहावे हे सुचत नाही. न पाहिलेला न ऐकलेला सामना तू तुझ्या लेखणीतून साक्षात डोळ्या समोर उभा केला. एका सच्च्या माणसाचे एका कलंदर पण मनस्वी माणसाने केलेले वर्णन. तू एकटा भेटला याचा दंड वसूल केला जाईल. परत जेव्हा जाशील तेव्हा मी नक्की येणार. हा आयुष्याचा ठेवा आहे. मित्रा जिंकलास.

    उत्तर द्याहटवा
  4. लेख आवडला, जुन्या काळातील खेळाडूंबद्दल कशा पद्धतीने लिहावे याची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
    अविनाश खैरनार,नाशिक

    उत्तर द्याहटवा
  5. फारच छान खूप आवडलं. निशिगंध देशपांडे माझे मित्र आहेत. आपल्याला फारसं बोलायला मिळालं नाही.परब आम्ही काढलेल्या मासिकाचे सह संपादक होते.. आभार.


    उत्तर द्याहटवा
  6. प्रवाही भाषा नेमके शब्दांकन ग्रेट

    उत्तर द्याहटवा
  7. प्रसिद्धीपासून दूर असलेला थोर खेळाडू व खेळ यांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. खो-खोच्या खेळीचे वर्णन वाचून मैदानात उतरल्यासारखे वाटले. खूपच छान.
    - मृण्मयी

    उत्तर द्याहटवा
  8. Excellent write up on Parab sir! There will be many more such interesting and lucid blogs from you, I am sure!
    - Ashok Kanade

    उत्तर द्याहटवा
  9. फारच अप्रतिम! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मराठी क्रीडा पत्रकारितेत आज-काल इतके चांगले लिखाण वाचायला मिळत नाही. तुझा लेख लखलखीत आहे.
    - उमेश आठलेकर

    उत्तर द्याहटवा
  10. खरंच लेख वाचताना अंगावर काटे येत होते... खेळ आणि खेळाडू यांचे नाते किती अतूट असते.. हे उत्तम उदाहण आहे....नक्कीच प्रेरादायी... परब सरांना सलाम... Balasaheb Pokarde https://m.facebook.com/anandpokarde/?ref=bookmarks

    उत्तर द्याहटवा
  11. हा मनापासून लिहिलेला लेख आहे. हे परब सरांचं शब्दचित्र नसून शब्दचलच्चित्र आहे. सर खेळताना नजरेसमोर येतात. तुमची लेखणी या लेखात खोखोपटुच्या पायासारखी चालली आहे

    उत्तर द्याहटवा
  12. सतीश सर खूप छान लिहले आहे तुमी परब सर ना अजून पर्यन्त कधी पाहिले नाही पण नाव खूप ऐकले आहे तुमच्या शब्द रचनेतून पूर्ण सर आणि सामना डोळ्यासमोर येत होते

    उत्तर द्याहटवा
  13. Great Blog, happy to be an Barodian and also played KHO-KHO at ‘मध्यस्थ रमत" kendra.
    Chetan Harpale

    उत्तर द्याहटवा
  14. सतीश, धन्यवाद. इतका चांगला लेख आणि इतक्या उत्तम खेळाडू बद्दल लिहिले म्हणून. परब सरांचा मोबाईल नंबर आहे का? श्रीनिवास कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  15. 'वडोदरा विशेष'मधील तिन्ही लेख खूप छान. अभिनंदन! ज्येष्ठ खो-खोपटू सुधीर परब यांच्याबद्लची माहिती नव्यानेच वाचायला मिळाली. माहितीपूर्ण लिखाणाबद्दल पुनश्च अभिनंदन!!
    - दिलीप वैद्य, पुणे

    उत्तर द्याहटवा
  16. खुप सुंदर उल्लेख आपल्या खो-खोचा सुधीर सरांकडू़न!

    मी बडोद्याचा खो-खो खेळाडू आहे. गुजरात क्रीडा मंडळामध्ये लंगडी, आट्यापाट्या आणि खो-खोचा सराव सुरू केला. प्रत्येक स्पर्धेच्या वेळी सुधीर सरांकडन नवीन आठवणी ऐकून अंगावर काटा यायचा... लंगडीच्या स्पर्धा, आट्यापाट्या आणि खो-खोच्या राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या स्पर्धासुद्धा खेळलो. आता मी प्रशिक्षक आणि भारतीय खो-खो महासंघामध्ये पंच म्हणून कार्यरत आहे.

    ... आणि हो, बडोद्याच्या खो-खोची दशा आता बिघडली आहे. पण आम्ही प्रयत्न करून खेळ पुन्हा वर आणू. सुधीर सर एक गोष्ट नेहमी सांगतात, 'खो-खो माझा प्राण आहे!'
    - भावेश पी वारके, बडोदे

    उत्तर द्याहटवा
  17. 'खिडकी' वाचली. खूप छान. एकदम भारी, मस्त वाटलं वाचून!
    - संकल्प थोरात

    उत्तर द्याहटवा
  18. 'एकलव्य, अर्जुन आणि द्रोणाचार्यही' वाचून कळेच ना म्हणजे काय? लेख वाचल्यानंतर हे पुरस्कार मिळवणाऱ्या सुधीर परब यांच्याबद्दलचा लेख आहे हे कळले. सगळ्यात जास्त जाणवले ते म्हणजे त्यांचा साधा-सरळ स्वभाव. हल्ली अर्ध्या हळकुंडानं पिवळे होणारेच जास्त. आपली लेखनशैलीही भावली.
    - प्रियंवदा कोल्हटकर

    उत्तर द्याहटवा
  19. सर आपल्या लेखामुळे एका तेजोवला‍याचा साक्षात्कार झाला आहे. खो खो प्रेम करणारे व सांगणारे अनेक लोक बघितले पण खो खो ज्यांची साधना आहे, आस्था आहे अशा ऋषीतुल्य परब सरांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळाल्या सारखे वाटते. सूर्याला माझ्या जवळ तेज आहे हे सांगण्याची गरज नसते, कारण ती त्याची ताकद आहे की बघनारा चे डोळे दीपाविते. आपल्या लेखामुळे या खो खो च्या अदभूत ठेव्‍यास याची देही याची डोळा भेटण्याची लालसा मानात निर्माण झाली आहे. माझी पूर्व पुण्याई खो खो खेळाशी नाते जोडले गेले याचा अभिमान वाटतो की इतकी उज्वल परंपरा लाभली आहे. त्या तेजस वंदन......

    उत्तर द्याहटवा
  20. सुधीर परब सरांना माझा नमस्कार! माध्यमांच्या प्रकाशझोतापासून लांब राहात मैदानाला वाहून घेण्याच्या त्यांच्या वृत्तीला हा सलाम आहे.

    हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. आपल्या देशी खेळांना परब सर पुन्हा झळाळी मिळवून देतील.

    तुमची लेखनशैली कौतुक करण्याच्या पलीकडची आहे, असं मला वाटतं. छायाचित्रंही सुरेख टिपलीत; अगदी नेमक्या वेळी.

    मला सर्वाधिक काय आवडलं, तर ते ब्लॉगच्या वाचकांकडून प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होणारं प्रेम. थक्क होतो मी!

    - प्रदीप रस्से, जळगाव

    उत्तर द्याहटवा
  21. दोन आगळ्यावेगळ्या विषयांवरचे (नारेश्वर आणि सुधीर परब) उत्तम व माहितीपूर्ण लेख.

    मला वाटतं की, कब्बडीच्या लीग सामन्यांचे TV coverage अलीकडे येत असल्याने त्या खेळाडूंना थोडे-फार 'अच्छे दिन' येऊ लागले आहेत. खो-खोबद्दल मला माहिती नाही.
    - अशोक जोशी, बंगलोर

    उत्तर द्याहटवा
  22. सुधीर परब यांच्यावरील लेख सुंदर. अतिशय माहितीपूर्ण, आँखो देखा हाल जणू!
    - चंद्रशेखर रामनवमीवाले

    उत्तर द्याहटवा
  23. आपल्या लेखणीने खो-खो खेळाला खो देऊन त्यातील खिलाडूपणा, सांघिकभावना, स्पर्धा, युद्धनीती, डावपेच, झटपट विचार, गती, चापल्य, निष्ठा, आव्हान स्वीकारणे, आदर इत्यादी गुणांना प्रभारित केले आहे. अर्थात हे सर्व गुण श्री,-सुधीर परब यांनी जोपासले आहेत म्हणूनच ते खो-खोचे 'एकलव्य', 'अर्जुन', 'द्रोणाचार्य' आहेत. परब सरांनी व्यक्त केलेली खंत मात्र चटका लावून जाते.

    केवळ आर्थिक लाभ, प्रसिद्धीपोटी राजकारणी, उद्योजक, नट-नट्या यांनी क्रिकेटसारख्या नपुंसक खेळात नाक खुपसून अन्य भारतीय मैदानी व मर्दानी खेळ संपविले आहेत ही वस्तुस्थिती आहे. असो.
    - श्रीराम वांढरे

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...