बुधवार, ४ एप्रिल, २०१८

पुन्हा वडोदऱ्याला बोलावणारी माणसं

(वडोदरा विशेष - ४)
----
निवडणुकीच्या कामासाठी परराज्यात गेलेल्या पत्रकारांच्या पहिल्या वृत्तान्तामध्ये रिक्षावाला हटकून आढळे. हा प्रतिनिधी मोठ्या वृत्तपत्राचा (म्हणजे व्हर्नाक्यूलर नव्हे, इंग्रजी!) असलाच, तर तो रिक्षावाल्याऐवजी टॅक्सीवाल्याचा हवाला देतो. वडोदऱ्याच्या स्वच्छ व भव्य बसस्थानकातून बाहेर पडल्यावर सकाळी सकाळी रिक्षाचालकाची भेट घेणं अपरिहार्यच होतं; कुठल्याही बातमीत त्याचा हवाला द्यायचा नसताना आणि क्या माहोल है यहाँ?’ असं विचारायचं नसतानाही.

स्थानिक माणसं सांगतात ते भाडं आणि रिक्षाचालक सांगतात ते, यात नेहमीच मोठा फरक असतो. माझे स्थानिक पालक केशव कुलकर्णी यांनी सांगितलं होतं, पाच रुपयांत पोहोचाल तुम्ही. रिक्षावाले ४० रुपयांपेक्षा कमी काही सांगतच नव्हते. लक्षात आलं की, त्यांनी सिटावर जाणाऱ्या रिक्षाचं भाडं सांगितलं होतं नि मी स्वतंत्र रिक्षा करू पाहत होतो. (अर्थात तेही भाडं किमान १० रुपयेच होतं.) अखेर एक मध्यमवयीन रिक्षावाला ३० रुपयांमध्ये यायला तयार झाला.

रिक्षाचालक मुस्लिम. दाढीदीक्षित (माझ्यासारखाच!), दाढी पांढरी (पुन्हा तेच!!), पण वयाचा अंदाज लावता न येण्यासारखा चेहरा. त्यांनीच बोलणं सुरू केलं. वडोदऱ्यातल्या रिक्षामध्ये चालकासमोरच्या काचेवर एक क्रमांक दिसतो. उदाहरणार्थ P 187. हे पोलिसांनी दिलेले क्रमांक. प्रवाशाच्या सोयीसाठी. एखादा चालक आडदांडपणे वागला किंवा रिक्षात काही सामान वगैरे विसरलं, तर तो क्रमांक सांगितल्यावर पोलिसांना रिक्षा शोधणं सहज शक्य होतं. एरवी वाहनाचा क्रमांक कोणी आठवणीनं पाहतंच, असं नाही. ही सगळी माहिती या चालकानंच आपणहून दिली.

भाडं नाकारणं, अवाजवी पैसे सांगणं ही गावोगावची दुखणी. तो विषयही याच चालकानं काढला. ‘‘आमच्यातले तरुण रिक्षावाले फार विचित्र वागतात. भाडं घेतात, प्रवाशाला सोडलं की, लगेच आपल्या ठेप्यावर. मी त्यांना म्हणतो, तुम्ही प्रवाशांना लुटता. त्याच्याकडून जायचं-यायचं भाडं काढता. पण कुणी ऐकत नाही.’’ त्यांनी सांगितलेला हा अनुभव मध्यम शहरात नेहमीच येतो. इतर रिक्षाचालक ४०-५० रुपये सांगत असताना, या गृहस्थांनी मला ३० रुपयांत सोडलं. त्यांना पैसे देताना चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या एकानं पाहिलं आणि म्हणाला, ‘‘तीस रुपये? काका, फार घेतले हो पैसे!’’
-x-x-x-x-x-x
सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना येणाऱ्या अनुभवावरून साधारण तिथल्या वागणुकीची कल्पना येते. अगदी शितावरून भाताची परीक्षा... करण्याजोगे नसतात हे अनुभव. पण गुजरात एसटी महामंडळाच्या बसमधून तीन वेळा प्रवास केला. त्या तिन्ही चालकांचा अनुभव चांगलाच होता. (असे चांगले अनुभव महाराष्ट्रातही मिळतातच!) नारेश्वरला जाणारी बस सकाळची होती. तिचा वाहक तरुण, तरतरीत. मुख्य स्थानकावरून सुटलेली बस रिकामीच होती. पण साधू वासवानी चौकातील थांब्यावर ती तोबा भरली. त्याची कल्पना वाहकाला असावी. त्यानं तिथं उतरताना माझ्याशेजारची जागा राखून ठेवायला सांगितली. बरेच नोकरदार त्या बसनं नोकरीच्या गावी जात असावेत. गर्दीचा लोंढा थोडा कमी झाल्यावर त्यातल्या एका मध्यमवयीन नोकरदाराला त्यानं हक्कानं माझ्या शेजारी बसायला सांगितलं. आणखी दोन महिला कर्मचाऱ्यांना त्यानं अशाच पद्धतीनं जागा मिळवून दिली आणि एकीला आपली जागा दिली. तिथल्या बसमध्ये वाहक एकटाच बसेल, असं आसन दाराशेजारीच असतं.

वासवानी चौकातला हा थांबा बहुतेक पाकीटमारांचा अड्डा असावा. कारण तिथनं बस सुटल्यावर एक महिला पैशाची पर्स चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानं ओरडू लागली. काय करणार बुवा! इथं हे नेहमीचंच आहे. पोलिस काही लक्ष देत नाहीत... अशीच काही तरी चर्चा मग सुरू झाली. त्याच वेळी वाहकानं त्या महिलेला काकू, काही टेन्शन घेऊ नका असा गुजरातीतून वारंवार दिलासा दिला. थोड्या वेळानं पाकीट मारल्याची आणखी एक तक्रार आली. त्या प्रवाशालाही वाहकानं त्याच्या पद्धतीनं दिलासा दिला.

शहरातले सगळे विनंती थांबे घेत, बस महामार्गाला लागली. पोर गावानंतर शाळकरी मुलांची वर्दळ सुरू झाली. हे सगळेच पासधारक. पण त्यातल्या कुणावरच वाहक ओरडताना दिसला नाही. सोमवार असल्यानं बसमध्ये रोजच्या पेक्षा थोडी जास्तच गर्दी असावी बहुतेक. दर पाच-दहा मिनिटांनी कुठल्या तरी छोट्या गावात बस थांबे. प्रवासी विद्यार्थीच होते. त्यातल्या बहुतेकांशी वाहकाची ओळख होती. गर्दी फारच झाल्याने नंतरच्या थांब्यावरच्या विद्यार्थ्यांना (त्यात मुली बहुसंख्येनं होत्या.) हा कंडक्टरकाका सांगू लागला, ‘‘मागच्या बसनं ये. महेशकाकाची बस पाचच मिनिटांत येत आहे.’’ दोन तासांच्या प्रवासात पाहायला मिळालेलं त्याचं हे काम सुखावणारं होतं. त्याच्या वागण्यात चिडचिड दिसली नाही; सुट्या पैशांसाठी तो कोणावर खेकसताना दिसला नाही. एवढ्या गर्दीत त्याला कॅमेऱ्यात टिपणं शक्य नव्हते. त्याचं नाव तरी किमान विचारायला हवं होतं.
-x-x-x-x-x-x
संमेलनाच्या आदल्या दिवशीच ग्रंथदिंडी निघाली. पॅलेसपासून निघालेली ही दिंडी तीन-साडेतीन किलोमीटरची प्रदक्षिणा करून पुन्हा तिथंच विसर्जित झाली. उत्साही सुरुवातीनंतर मार्गी लागलेल्या दिंडीच्या बाजूनं जात असतानाच एका गृहस्थांनी कुतुहलानं विचारलं, ‘‘कुठून आलात तुम्ही?’’ वडोदऱ्यात मराठी ऐकायला आल्यावर भारावून वगैरे जाण्याची गरज नसते. त्यात पुन्हा हे मराठी साहित्य संमेलन.

सत्तरीच्या आसपास असलेल्या या गृहस्थांशी जुजबी गप्पा झाल्या आणि ते माझ्या बरोबरच निघाले. पुढचा तासभर तरी त्यांच्या सोबतीनं चाललो. वडोदऱ्यात पाहायला काय काय आहे, काय काय पाहा, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. अतिशय मृदुभाषी, आपुलकीनं वागणारे हे होते श्री. मधुसूदन आदवानीकर. टाइम्स-एक्सप्रेसमध्ये काम केल्याचं त्यांनी सांगितल्यावर स्वाभाविकच अधिक आपुलकी वाटू लागली. निवृत्तीनंतर १०-१५ वर्षांपूर्वी ते वडोदऱ्यात स्थायिक झाले. संपादकीय विभागात काम केलं नसलं, तरी लिहिण्या-वाचण्याची त्यांना चांगली आवड. दिनकर गांगल, अरुण टिकेकर, कुमार केतकर यांच्याशी त्यांची ओळख. या तिघांच्या सांगण्यावरून त्यांनी अधूनमधून लिहिलेलं; ग्रंथालीशीही संबंध आलेला. त्यामुळं आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या. न थकता आणि न कंटाळता त्यांनी बराच वेळ सोबत केली.

वडोदऱ्यात फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळा जाणवू लागला होता. त्यामुळं तासभर चालल्यानंतर तहान लागली. उसाच्या रसाची एक गाडी पाहून आम्ही थांबलो. बर्फ न घालता तो गोड रस प्यायलो. मला न जुमानता अहो, तुम्ही आमचे पाहुणे!’ असं बजावत श्री. आदवानीकर यांनी रसाचे पैसे देत तासाभरापूर्वी ओळख झालेल्याचा पाहुणचार केला!
-x-x-x-x-x-x
संमेलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारेश्वरला गेलो. दर्शन झालं, नर्मदामाईची भेट घेतली, महाप्रसाद झाला आणि आता परतीच्या बसची वाट पाहायची एवढंच. त्यालाही किमान दीड तास होतो. झाडाच्या सावलीखाली उभं असताना समोरून डुलत डुलत येणारा एक जण दिसला. सदरा, पायजमा आणि गांधी टोपी. हातात पिशवी. नक्की मराठी माणूस! समोरून जाताना पाहिलं, तर पिशवीत हिर्व्यागार मिरच्या. थांबवलं आणि विचारलं, ‘‘माउली, नमस्कार. कुठून आलात?’’

सुधाकरतात्या आणि संजयभौ... बेलदारवाडी.
अंदाज एकदम बरोबर. माउली बेलदारवाडीच्या (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) होत्या. संजय धर्मा शिर्के. तिथल्या सिद्धेश्वर आश्रमाची नर्मदा परिक्रमा चालू होती. त्या दिवशी सोमवार - उपवास. साबूदाण्याच्या खिचडीसाठी मिरच्या आणायला संजयभाऊ गेले होते. नंतर या परिक्रमेचे प्रमुख सुधाककरतात्या म्हणालेच की, संजयभौंनी एकदा जबाबदारी घेतली की, पूर्ण करणारच! संजयभाऊंशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांची छायाचित्रं काढली. मग ते म्हणाले, ‘‘चला, तुमची ओळख करून देतो. थोडा साबूदाणा खा, आमच्याबरोबर.’’

तिथनं दोनच मिनिटांवरच्या मैदानात परिक्रमेला आलेल्या भाविकांच्या दोन बस, तीन जीप थांबल्या होत्या. स्टोव्हवर मोठ्या कढईत चार-पाच जण खिचडी तयार करीत होते. संजयभाऊ, सुधाकरतात्या यांच्या बरोबर
परिक्रमावासीयांचा उपवास. खिचडी पाहिजेच ना.
बसमध्ये गप्पा मारत बसलो. दोघांनी आग्रह केला, चला इथनंच आमच्या बरोबर परिक्रमेला. ‘‘नोकरीबिकरीचा ताप नाही ना आता डोक्याला. चला मग परिक्रमेला. गाडीत जागा आहे,’’ असं पुनःपुन्हा म्हणत राहिले. नको नको म्हटल्यानंतरही एका पत्रावळीवर गरमागरम खिचडी आली. हे दोघं आश्रमाची, गुरू ज्ञानेश्वर माउलींची, आश्रमातल्या गोशाळेची, दर वर्षीच्या परिक्रमेची माहिती देत होते. ‘‘आमच्या आश्रमाबद्दलही ब्लॉगवर लिहायला पाहिजे हो,’’ असं सुधाकरतात्या म्हणाले. उन्हाळा संपल्यानंतर अंमळनेरला येण्याचं आश्वासन जळगावच्या प्रदीप रस्से यांचा (परस्पर) हवाला देत निरोप घेतला या दोघांचा.

-x-x-x-x-x-x
ज्येष्ठ खो-खोपटू सुधीर परब यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल लिहिलं आहेच. त्यात त्यांच्यातल्या (साध्या आणि पाय जमिनीवर असलेल्या) माणसाविषयी अधिक लिहायला हवं होतं. दुपारी मुलाखत संपल्यावर त्यांना म्हटलं, ‘‘मला रस्ता दाखवायला याल का? म्हणजे कुठून रिक्षा मिळेल ते समजेल....’’ सुधीर सरांनीच जोरदार शिफारस केल्यामुळं लक्ष्मीविलास पॅलेसच्या परिसरातील महाराज फत्तेसिंह संग्रहालय पाहायचं होतं. ते सांगितल्यावर ते मोटर काढून थेट तिथंच सोडायला आले. तिथून कुठं जाणार या प्रश्नाला ‘‘महाकालीमध्ये उसळ-शेव खायला असं उत्तर दिल्यावर त्यांनी गाडी पुन्हा उलटी घेऊन बाहेर पडण्याचा जवळचा रस्ताही दाखवला.

संग्रहालय पाहायला फार कोणी नव्हतं. तिथं फिरताना छान वाटलं. एका तरुण कर्मचाऱ्यानं दोन-तीन चित्रांची मजा कशी घ्यायची हे मुद्दाम सांगितलं. तो म्हणाला, कुणी निवांत रस घेऊन बघत असलेलं दिसलं, तरच मी सांगतो. संग्रहालयातून बाहेर पडलो, तेव्हा चांगलीच भूक लागली होती. योग्य रस्त्यानंच बाहेर पडत असताना शंका आली, आपण चुकत तर नाही ना? तेवढ्यात समोरून एक दुचाकी येताना दिसली. दुचाकीस्वाराला थांबवलं. वृद्ध गोरेपान गृहस्थ होते. त्यांना बहुतेक चालण्याचा त्रास असावा. कारण जवळच एक काठी होती.

महाराष्ट्राच्या प्रेमात असलेले रॉनी अंकल.
बाहेर पडण्याचा रस्ता हाच ना, असं विचारल्यावर आजोबांनी होकारार्थी मान डोलावली आणि कुठं जायचंय, कुठून आला?’ अशी प्राथमिक चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहे. संग्रहालय पाहिलं, आता पोटात कावळे ओरडताहेत आणि म्हणून पोटपूजा करायला निघालो, असं उत्तर दिलं. आणि त्याबरोबर चमत्कार झाला. मुंबई?’ असं विचारत आजोबांनी यू टर्न घेतला. गाडी वळविली आणि बसायची आज्ञा केली. गुरुप्रसादमध्ये बेस्ट जेवण मिळतं; तिथं जेव' असं त्यांनी सांगितलं. माझा बेत वेगळा होतो. सान्यांच्या जय महाकालीमध्ये प्रसिद्ध शेव-उसळ खायची होती. ते कीर्ती स्तंभाजवळ आहे, असं ऐकून होतो. तेवढाच पत्ता आजोबांना सांगितला.

आजोबांनी गाडी सुरू केली. जाता जाता बरंच बोलत होते. तमाम राजकारण्यांना फर्ड्या इंग्रजीत शिव्या देत होते. गुरुप्रसादच्या बाहेरच दुचाकी लावत त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला जय महाकालीमध्ये मला सोडण्याचा आदेश दिला. ते तिथनं एका मिनिटाच्याच अंतरावर होतं. बाहेरच आम्ही बोलत असताना त्यांनी वेटरला विचारलं, ‘‘पाहुण्याला ग्लासभर लस्सी पाजतोस का?’’ मग आम्ही आत गेलो. गप्पा सुरू झाल्या. ते होते रॉनी एस. बेअशेर. निवृत्त पोलिस अधिकारी. वय वर्षं ८४. मूळचे हुबळीचे. अँग्लो-इंडियन. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात त्यांनी पालथा घातलेला. मुंबईवर त्यांचं विलक्षण प्रेम. भरभरून बोलत होते. चीनच्या आक्रमणामुळे त्या वेळी मनात निर्माण झालेल्या त्वेषातून त्यांनी पोलिसाची नोकरी स्वीकारली. गुजरात पोलिस दलात त्यांनी मोटर व्हेईकल फिटर म्हणून काम सुरू केलं आणि अहमदाबादच्या पोलिस अधीक्षकपदापर्यंत मजल मारली. निवृत्त होऊन २६ वर्षं झाली त्यांना.

उपाहारगृहात बसल्या बसल्या रॉनी आजोबांनी माझ्याकडचा कॅमेरा पाहिला. त्यांना त्यातली बरीच माहिती होती. महाराष्ट्राबद्दल... नव्हे मुंबईबद्दल किती बोलू नि किती नको, असं त्यांना झालं होतं. गुरुप्रसादमधून उठताना त्यांना म्हणालो, ‘‘सर, तुम्हीही चला शेव उसळ खायला.’’ ‘‘नको! घरी बायको जेवायची वाट पाहत असेल. ती आजारी असते ना,’’ असं सांगताना गोऱ्यापान लालबुंद रॉनी आजोबांचे डोळे किंचित पाणावले होते, असा भास झाला!
-x-x-x-x-x-x
सुधीर परब सरांच्या घरी नेण्याची जबाबदारी त्यांनी वसंतराव घाग यांच्यावर सोपवली होती. परब सरांच्या बरोबर खेळलेले वसंतराव, समवयस्क किंवा दोन-तीन वर्षांनी लहान. वसंतरावांना त्या रात्री सकाळची वेळ सांगण्यासाठी फोन केला. ते सांगू लागले, ‘‘सुधीर सरांचा फोन आला होता मघाशीच. आता माझ्या घरी काय नेमके पाहुणे आले आहेत...’’ समज झाला की, त्यांना उद्या येणं शक्य नाही. तेवढ्यात ते म्हणाले, ‘‘सरांकडे सोडायचंय ना? किती वाजता - साडेनऊ? मी बरोबर सव्वानऊ वाजता तुमच्याकडे येतो.’’

घाग सरांची वाट पाहत सकाळी चहाच्या गाडीजवळ थांबलो होतो. मोटरसायकलवरून टी-शर्ट घातलेलं कोणी गेलेलं दिसलं नि वाटलं की, हेच वसंतराव. तेवढ्यात त्यांचा फोन - मी आलो आहे. तेच होते ते. वय झालं, तरी खेळाडू ओळखू येतोच. मोटरसायकलवर बसून परब सरांच्या घरी. मला सोडलं नि सरांना सांगून एका मिनिटाच्या आत वसंतराव तेथून परत! मला घेऊन येताना ते परब सर किती मोठा माणूस आहे हेच सांगत होते. इकडे परब सरही आपल्या सहकाऱ्यांबद्दल तेवढ्याच आत्मीयतेने बोलत होते.

वडोदऱ्याचा मुक्काम सहाव्या दिवशी आवरता घ्यायचा ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी घाग सरांना भेटायला बोलावलं. छोटी भेट द्यायची होती त्यांना. कामासाठी बाहेर गेलेले वसंतराव सातपर्यंत परत येतील की नाही, हे सांगता येत नव्हतं. बॅगा घेऊन, लॉजचा हिशेब पूर्ण करून मी बाहेर थांबलो होतो. तेवढ्यात ते आलेच. बॅगा पाहून त्यांनी थेट बसस्थानकावर सोडण्याची तयारी केली. बसा तुम्ही. रिक्षावाले काहीही पैसे मागतात हो, असं म्हणत त्यांनी मला बसवलंच मोटरसायकलवर.

निरोप घेताना घाग सरांनी दोन दोन वेळा सांगितलं, ‘‘तुमच्या ओळखीचं कुणी बडोद्याला येणार असेल, तर माझा नंबर द्या. अगदी मध्यरात्र झाली असली, तरी मी घ्यायला येईन. रिक्षावाले काहीही पैसे मागतात हो! खो-खो खेळणारी मुलं असतील, तर मला सांगा. त्यांची राहण्याची सगळी सोय मी करीन.’’

वडोदऱ्याच्या प्रशस्त स्थानकावर बसची वाट पाहत मी थांबलो असताना तासाभरानंतर घाग सरांचा फोन आला - बस मिळाली की नाही, याची चौकशी करायला. त्यांचा फोटो काढायला जमलंच नाही... (आता नंतर त्यांचं छायाचित्र इथं आलं, ते श्री. सुधीर परब यांच्यामुळे. त्यांनी व्हॉट्सअॅपवरून हे छायाचित्र पाठविलं.)
-x-x-x-x-x-x
चहा पितानाच लस्सीचा आग्रह करणारे केशव कुलकर्णी.
वडोदऱ्याला माझा मुक्काम सुखाचा होईल, हे पाहण्याची जबाबदारी स्वीकारली होती केशव कुलकर्णी यांनी. केसरी-लोकसत्तामधले माझे वरिष्ठ सहकारी महादेव कुलकर्णी त्यांचे चुलते. महादेवरावांनी सांगितल्यामुळं केशव कुलकर्णींनी स्वस्तात मस्त मुक्कामाची सोय केली. तुम्ही आमच्या काकांचे मित्र म्हणजे मला वडलांसारखेच, असं म्हणत सगळी सोय पाहिली. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला जाऊ म्हटल्यावर त्यांनी खास एका जागी नेलं. पुण्याहून पाहुणे आलेत हो... असं सांगत गाडीवाल्याला द बेस्ट देण्याची ऑर्डर सोडली. पोहे, उसळ शेव, भजी, फाफडा... असे एकाहून एक फर्मास पदार्थ खाऊ घातले. गरमागरम चहा पित असतानाच केशवराव म्हणाले, ‘‘इथली लस्सी फस्सक्लास असते. चहानंतर पिऊ!’’ मनातल्या मनात त्यांना दंडवत घालत लस्सीचा आग्रह मोडून काढला. परत निघालो, असं सांगण्यासाठी फोन केल्यावर हा पठ्ठ्या म्हणालाच, ‘‘माझ्या गरिबाघरचा पाहुणचार घ्यायचा राहिलाच बरं का तुमचा.’’ पुढच्या वेळी... असं आश्वासन दिलं.

... ही अशी माणसं भेटली बडोद्यात. फार संख्येनं नाही. पण भेटली तेवढी लक्षात राहणारी. वडोदऱ्याच्या पुढच्या दौऱ्यासाठी आमंत्रित करणारी!

१९ टिप्पण्या:

  1. लेख खुप चांगला आहे,नोंदी तपशीवार आल्या आहेत त्यामुळे बडोदा येथील सामाजिक वातावरणा ची ओळख होते, सोबतच व्यक्ती आणि वल्ली ही भेटतात.

    उत्तर द्याहटवा
  2. ‘वडोदऱ्यातली लक्षांत राहिलेली माणसे’ माणुसकी जपणारी दिसतात. गुजरातची हवा एकदमच वाईट नाही तिथे ‘माणसेही’ रहातात.

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त , अगदी या हृदयीचे त्या हृदयी ! चित्रकारालाही जमणार नाही एवडे सुंदर शब्दचित्र आपण रेखाटले आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. आत्ताच्या काळात आपल्या माणसांवर कोणी लिहीत नाही, तू अशा माणसांवर लिहिलेस ज्यांची सोबत तुला खूप कमी काळासाठी लाभली.

    Great काका
    Hats off !

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय प्रवाही आणि आत्मीयतेनं ओथंबलेलं लेखन. भेटलेली सगळी माणसं तुमच्या लेखणीतून मूर्तिमंत झाली. व्वा.

    तुमच्या बरोबर प्रवास करायला आवडेल!
    - रजनीश जोशी, सोलापूर

    उत्तर द्याहटवा
  6. खूप छान! मस्त!! सारं साक्षात घडतंय, असं वाटतं.
    - पांडुरंग देशमुख, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  7. तुम्ही वडोदरा वाचकांच्या दारापर्यंत नेलं. ओघवती मराठी... सुंदर वर्णन आणि प्रसंगही. काय अनुभवलं-पाहिलं ते सांगणारा नितांत सहज सुंदर लेख. वृत्तान्ताचा हा एक सुरेख घाट!

    हा लेख माणसांबद्दल काही सांगतो. 'बिझी बी' यांनी एकदा सांगितलं होतं, 'माझे सर्वोत्तम मित्र आहेत... (भेटणारी) माणसं.'

    ... आणि हो, तुम्ही माझाही उल्लेख केला आहे. योग्यच!

    - प्रदीप रस्से, जळगाव

    उत्तर द्याहटवा
  8. जीवन, एक 'घडीभराचा प्रवास!' या प्रवासात आपण अनुभवलेले रिक्षावाले, यात्रेकरू, स्नेही, नामवंत खेळाडू शब्दबद्ध करून जणू आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होत आहात पुढील प्रवासासाठी. आपला प्रवास असाच चालत राहो व सर्वांना आपल्या अनुभवाची मेजवानी मिळत राहो.
    - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

    उत्तर द्याहटवा
  9. 'वडोदरा विशेष' खरोखरच विशेष आहे. आपली लेखनशैलीही विशेष आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे तुमचे निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आहे. समोरच्या व्यक्तीमधील बारकावे आपण चांगले हेरता व ते शब्दबद्ध करता. अभिनंदन.

    या सर्व लेखांचा संग्रह प्रसिद्ध व्हावा असं मला वाटतं आणि तसं होणार असल्यास प्रसिद्धिपूर्व नोंदणी माझी करा. धन्यवाद
    - प्रा. सुरेश जाधव, नांदेड

    उत्तर द्याहटवा
  10. छानच... वडोदरा विशेषचा हा भागही चांगला झाला आहे. आपल्याला भेटणारी ओळखीची वा अनोळखी माणसं दखल घेण्याजोगी निश्चितच असतात. तू तसाही माणसांचा भुकेला; त्यात एका मागोमाग एक अशी चांगुलपणा असलेली माणसं भेटल्यावर तू त्यांच्यावर लिहिलं नाहीस तरच नवल.

    लेख उत्तम आहे...
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा
  11. वा. मस्त ओळख करून दिली आहे. माणसांवर प्रेम करणारा भेटणं दुर्मिळ झालंय आताशा. म्हणून असा पाहुणचार झाला तुमचा!
    - नीलिमा बोरवणकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  12. लेख आवडला. दृश्ययमयता आहे. लेखन प्रवाही आहे.

    उत्तर द्याहटवा
  13. वृत्तचित्रण, प्रवासवर्णन, स्थळचित्रण आणि व्यक्तिचित्रण या सर्वांचा सुंदर मिलाफ या चारही लेखमालिकेत वाचायला मिळाला.
    आता असे वाटतं, हे चारही भाग वेगवेगळे वाचण्याऐवजी सलग वाचायला पाहिजेत. म्हणजे त्यातील मजा काही औरच येईल.

    उत्तर द्याहटवा
  14. लेख छान झाला आहे. ही माणसे अल्प कालावधीसाठी भेटलेली; पण कायम स्मरणात राहणारी अशी!त्यांची शब्दचित्रे उत्तम रेखाटली आहेत.
    - माधवी कुंटे

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...