Friday 27 April 2018

जिंकता जिंकता...हरता हरता


भारतीय क्रिकेट संघाबद्दल २५-३० वर्षांपूर्वी असं म्हटलं जायचं की, जिंकता जिंकता हरावं कसं, हे आपल्या संघाकडून शिकावं. ते अर्थातच कसोटी सामने नव्हते, तर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले मर्यादित षट्कांचे, एक दिवसाचे सामने होते. त्याची आठवण यायचं कारण म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, अर्थात आयपीएलमध्ये बुधवारी (दि. २५) आणि गुरुवारी (दि. २६) झालेले दोन सामने. जिंकण्याची आशा असलेली लढत पाहता पाहता कशी हातातून निसटू द्यायची आणि उघड्या डोळ्यांनी पराभव स्वीकारायचा, याची ठळक उदाहरणं म्हणजे हे दोन सामने. किंवा त्याच्या उलटही म्हणता येईल - हरणारे सामने कसे खेचून आणायचे नि त्याचं दिमाखदार विजयात रूपांतर कसं करायचं, हेही या सामन्यांच्या जेत्यांनी  दाखवून दिलं.

या दोन्ही सामन्यांमध्ये भरपूर विरोधाभास; साम्य होतं ते अटीतटीचं.  बुधवारच्या सामन्यात धावांचा पाऊस पडला आणि गुरुवारच्या सामन्यात त्याचा दुष्काळ पाहायला मिळाला. बुधवारचा सामना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करीत चेन्नई सुपर किंग्जनं जिंकला आणि पंजाबी किंग्जची छोट्या धावसंख्येचा पाठलाग करतानाच दमछाक झाली. चेन्नई-बंगलोर लढतीमध्ये ३३ षट्कारांचा पाऊस पडला. हैदराबाद आणि पंजाब किंग्ज एलेव्हन यांच्या फलंदाजांना मिळून जेमतेम ६ षट्कार मारता आले - ते एबी डीव्हिलियर्स किंवा अंबाटी रायुडू किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्यापेक्षा कमीच ठरले. आधीच्या सामन्यात गोलंदाजांची पिटाई होत असताना, कालच्या सामन्यात मात्र तेच वरचढ ठरले. एवढे की, पंजाबच्या अंकित रजपूतनं पाच बळी मिळविले.

सनरायझर्स हैदराबादनं सलग दुसऱ्या सामन्यात कमाल केली. आणखी किती कमी धावसंख्या असली, तरी त्यांचे गोलंदाज ते आव्हान सहज पेलतील हे पाहणंच यंदाच्या आयपीएलचं वैशिष्ट्य ठरेल, असं आता वाटू लागलं आहे. आणि ही किमया संघाला साधली, ती अनुभवी भुवनेश्वरकुमारच्या गैरहजेरीत. मागच्याच आठवड्यात त्यांनी अवघ्या ११८ धावांचं पाठबळ असतानाही मुंबई इंडियन्स संघाला ३१ धावांनी धूळ चारली आणि काल १३३ धावांचं आव्हान देऊन पंजाब किंग्ज एलेव्हनला ११८ धावांत गुंडाळलं. या दोन्ही संघांची फलंदाजीची ताकद कागदावर मजबूत दिसणारी. पण हैदराबादच्या खेळाडूंनी या कागदाचा पार चोळामोळा केला! पहिल्याच षट्कात कर्णधाराला गमावल्यानंतर हैदराबादला फार मोठी मजल मारताच आली नाही. मनीष पांडेचं कष्टसाध्य अर्धशतक हीच काय ती त्यांची जमेची बाजू. शकीब अल हसन (२९ चेंडूंमध्ये २८) आणि युसूफ पठाण (१९ चेंडूंमध्ये नाबाद २१) यांनीच त्याला थोडी साथ दिली. एरवी अंकित रजपूतच्या तेज माऱ्यापुढे त्यांची अवस्था बिकटच होती. हैदराबादचे सहापैकी पाच बळी त्यानंच मिळवले. पंजाबनं चार झेल सोडण्याची कृपादृष्टी दाखविली नसती, तर हैदराबादची परिस्थिती अधिकच दयनीय झाली असती.
राहुलचा त्रिफळा नि सामन्याला कलाटणी.

मागच्या वर्षीचा धावांचा दुष्काळ संपवून ख्रिस गेलची सुगी सुरू झाली आहे. तो आणि के. एल. राहुल यांची दुसऱ्या ते सातव्या षट्कांतली टोलेबाजी पाहताना पंजाब एकही गडी न गमावताच सामना जिंकणार की काय, असं वाटू लागलं होतं. पण नंतर सगळंच बदललं. पाहता पाहता सामना पंजाबच्या हातून निसटला. त्याचं श्रेय जेवढं हैदराबादच्या गोलंदाजांना तेवढंच ते पंजाबच्या फलंदाजांनाही. विशेषतः गेल, फिंच आणि कर्णधार अश्विन अतिशय बेजबाबदार फटके मारताना बाद झाले. पडझडीची सुरुवात झाली, ती आठव्या षट्कात. रशीद खानचा पाचवा चेंडू खेळणाऱ्या राहुलची यष्टी वाकली आणि चालत्या गाड्याला खीळ बसली. एरवी एकेरी-दुहेरी धावांसाठी पळण्यात आळस दाखवणारा गेल या डावात मात्र पळत होता. कदाचित त्यामुळेच तो दमला असावा आणि बेसिल तंपीच्या उसळलेल्या चेंडूवरचा त्याचा पुलचा फटका पार फसला.

नाबाद ५५ अशी जोरदार सुरुवात असलेल्या पंजाबनं दोन गडी झटपट गमावले, तरी सगळंच काही बिघडलं नव्हतं. शेवटच्या सहा षट्कांमध्ये त्यांना ५१ धावा करायच्या होत्या आणि सहा गडी बाकी होते. शकीब अल-हसनला षट्कार खेचणाऱ्या फिंचनं पुढच्या चेंडूवर तसाच प्रयत्न केला. मनीष पांडेनं हा सुरेख झेल पकडला आणि पंजाबची वाटचाल पराभवाकडे सुरू झाली. रशीद खान, शकीब आणि संदीप यांच्यापुढे किंग्ज एलेव्हनने नांगीच टाकली. रशीद खानच्या लेगस्पिनला कसं खेळायचं हे त्याचाच देशबंधू मुजीबूर रहमाननं रिव्हर्स स्वीपचे दोन चौकार ठोकून दाखवलं. रजपूतचा नबीनं सोडलेला झेल महाग पडणार, अशी भीतीही त्यामुळं वाटली. पण तसं काही झालं नाही. सामन्यानंतर कुमार संगकारानं व्यक्त केलेली प्रतिक्रिया नेमकी होती - हैदराबाद जिंकलं नाही, तर पंजाब हरलं! कागदावर नोंद हैदराबादच्या विजयाचीच होणार, हे खरं. पण अशा पराभवातून मिळालेल्या धड्यापासून काही शिकल्यावरच संघाची पुढची वाटचाल होत असते, हेही खरं. पंजाबची सारी मदार राहुल आणि गेल यांच्यावरच असल्याचं दिसून आलं. या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे – रशीद, शकीब आणि मुजीब यांची फिरकी चालत असताना; धावा देण्यात ते कंजुषी दाखवित असताना, अपयशी ठरला तो या तिघांहून अनुभवी अश्विन!

द ग्रेट फिनिशर
जेमतेम १३० धावांचा पाठलाग करताना पंजाबची फ्या फ्या उडाली असताना, आदल्या सामन्यात चेन्नईनं २०५ धावांचा जिद्दीनं पाठलाग केला. द ग्रेट फिनिशर या आपल्या लौकिकाला धोनी बुधवारी पुन्हा एकदा जागला. त्यानं नेहमीच्या थाटात षट्कार ठोकत लक्ष्य गाठलं. अखेरच्या दोन षट्कांमध्ये ३० धावा हव्या असताना धोनी आणि ब्राव्हो यांनी त्यासाठी दोन चेंडू कमीच घेतले.

पुन्हा पाठलाग, पुन्हा षट्कार आणि पुन्हा विजय!
धोनी सहाव्या क्रमांकावर खेळायला आला, तेव्हा संघाची अवस्था चांगली म्हणण्याजोगी नव्हती. चार फलंदाज बाद आणि ११ षट्कांमध्ये १३२ धावा करायच्या होत्या - प्रत्येक चेंडूला दोन या गतीनं. आशादायक गोष्टी दोन होत्या - समोर अंबाटी रायुडू सुटलेला होता आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवून देणारा ब्राव्हो बाकी होता. या दोघांच्या साथीनंच धोनीनं विजयश्री खेचून आणली. संघाची सर्वांत मोठी भागीदारी झाली ती पाचव्या जोडीसाठी - रायुडू आणि धोनी यांनी ५४ चेंडूंमध्ये १०१ धावांची भर घातली. नंतर ब्राव्होच्या साथीनं धोनीनं ३२ धावा जोडल्या त्या अवघ्या ११ चेंडूंमध्ये. फक्त ३४ चेंडूंमध्ये ७० धावा काढणाऱ्या धोनीचा स्ट्राईक रेट २०५.,८८ होता. अंबाटीनं ५३ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या आणि ब्राव्होनं मोक्याच्या क्षणी आतषबाजी केली. सतरा-अठराव्या षट्कांमध्ये मार खाणाऱ्या महंमद सिराज आणि अँडरसन यांनाच पुढची दोन षट्कं नाइलाजानं देण्याची वेळ बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीवर का आली असावी? या दोघांच्या ७.४ षट्कांतच तब्बल १०६ धावा कुटण्यात आल्या. एकाच षट्कात १४ धावा देणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला नंतर एखादं षट्क द्यावं असं कोहलीला का वाटलं नसेल?

बंगलोर जिथं फसलं, नेमकं तिथंच चेन्नईनं सावरलं आणि विजय मिळवला. चौदाव्या षट्काअखेर रॉयल चॅलेंजर्सनं १३८ धावांची मजल मारली होती आणि त्यांचे दोनच गडी बाद झाले होते. एबीडी जोरात होता. पण पंधराव्या षट्कात दोन गडी गमावल्यानंतर बंगलोरची मधली फळी कोसळली. धावांचा वेग कायम राखण्याच्या नादात त्यांचे फलंदाज बाद होत गेले. ही घाई एवढी होती की, एकोणिसाव्या षट्काच्या शेवटच्या चेंडूवर आणि त्याच्या पुढच्या षट्कातल्या पहिल्या दोन चेंडूंवर, असे सलग तीन फलंदाज बाद झाले. प्रश्न गडी बाद होण्याचा नसून ते तीन चेंडू वाया जाण्याचा आहे. त्या चेंडूंवर किमान १० ते कमाल १८ धावा निघणं शक्य होतं. चेन्नईनं नेमका त्याच महत्त्वाच्या षट्कांमध्ये आपला खेळ उंचावला आणि मोठ्या धावसंख्येचा सलग दुसऱ्यांदा पाठलाग केला. पंजाबविरुद्ध त्यांचा प्रयत्न थोडक्यात फसला होता. बुधवारी मात्र दिमाखदार यश मिळालं.

दोन टोकांच्या या दोन लढती. एकीत गोलंदाजांची कत्तल आणि दुसरीत फलंदाजांची उडालेली भंबेरी. एका सामन्यात धावांचा थरारक पाठलाग आणि दुसऱ्यामध्ये छोट्या अंतराचा पल्ला गाठताना उडालेली दमछाक. क्रिकेटमधल्या अद्भुत अनिश्चिततेची ही दोन अप्रतिम उदाहरणं. डागाळलेल्या आयपीएलकडं प्रेक्षकांना खेचणारी, स्पर्धेचं आकर्षण वाढविणारी.

(सांख्यिकी तपशील व छायाचित्रं ईएसपीएनक्रिकइन्फो आणि आयपीएलटी-ट्वेन्टी संकेतस्थळांच्या सौजन्यानं.)

6 comments:

 1. अप्रतिम विश्लेषण! फार दिवसांनी इतकं चांगलं वाचायला मिळालं. श्रीनिवास कुलकर्णी

  ReplyDelete
 2. व्वा! सामने पाहिले नाहीत, परंतु तुमच्या लेखनातून ते पाहिल्याचा आनंद मिळाला..

  ReplyDelete
 3. दोन्हीही मॅचेस न पाहताही, ब्लॉग वाचून एकाच वेळी एकाच मैदानावर प्रत्यक्षात दोन मॅचेस पाहतोय असा भास झाला...👌👍

  ReplyDelete
 4. तसं तर आयपीसीएल मला आवडत नाही, तरी दोन्ही सामने पाहिले.वनडे सामने पाहताना देश जिंकण्याचं समाधान असतं.इथं कोण कोणाशी खेळतंय हेच समजत नाही. क्लायमेक्सी उत्कंठा ताणताण ताणूनही घेतली. पण आपलं समालोचन अधिक भावलं. जिद्द आणि ध्येयाच्या पाठलागाची मेहनत कशी असावी याचं जिवंत उदाहरण हे.सर, आपण क्रिकेटचा काॅलम सुरू करावा असं वाटतं मनापासून.
  सल्ला नाही, मागणं आहे!

  ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...