मुख्य सामग्रीवर वगळा

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

‘ळ’च्या अढळपदासाठी

 

रचना - शब्दकुल

‘ध’चा ‘मा’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ळ’चा ‘ल’ केला जात होता आणि ‘चलता है...’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘तिलक’. बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘बालासाहब’. नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ळ’ जाऊन तिथं ‘ल’ कसा येतो?

हिंदीमध्ये ‘ळ’च्या जागी ‘ल’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८पासून प्रयत्न सुरू केले. 'ळ'ऐवजी 'ल'चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये 'ळ'च वापरावा, अशी मागणी करीत त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्यपाल कार्यालय; केंद्रीय गृहमंत्रालयाचा राजभाषा विभाग, उच्च शिक्षण मंत्रालयाचा हिंदी विभाग, प्रसारण मंत्रालय यांना वारंवार पत्रं लिहिली. आग्रही पाठपुरावा केला. त्यांच्या धडपडीला यश आलं. केंद्रीय हिंदी संचालनालयानं 'ळ'च्या वापराबाबत परिपत्रक काढलं. 'ळ' अक्षर हिंदीच्या परिवर्धित वर्णावलीत स्वीकारण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे रेल्वे, बॅंका, केंद्र सरकारी कार्यालयांना स्थानिक नावात बदल करता येणार नाही. म्हणजेच (विशेषनामात) 'ळ' आहे म्हणून त्या जागी 'ल' वापरता येणार नाही.

श्री. निर्मळ ह्यांच्या एकांड्या शिलेदारीच्या यशाच्या दोन बातम्या एवढ्यात वाचण्यात आल्या. 'ळ'ला हिंदी संचालनालयानं मान्यता दिल्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये सप्टेंबरच्या अखेरीस प्रसिद्ध झाली. ‘‘ळ’च्या वापरासाठी पंतप्रधानांना माजी संमेलनाध्यक्षांचे पत्र’ ह्या शीर्षकाची बातमी दैनिक लोकमतमध्ये गेल्या शनिवारी आली. त्यामुळंच 'ळ'चा आणि त्याचबरोबर त्यासाठी सुफळ पाठपुरावा करणाऱ्या श्री. निर्मळ ह्यांचाही मागोवा घ्यायचं ठरवलं. तो घेताना बऱ्याच गोष्टी हाती लागल्या.

'ळ'बद्दल मोल्सवर्थ कृत मराठी - इंग्रजी शब्दकोशातील (सुधारित पाचवे पुनःमुद्रण) नोंद अशी आहे -

The thirty-fourth consonant. It differs greatly from English L. It never occurs initially.


'हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे,' असं (चुकीचं) नेहमीच सांगितलं जातं आणि बहुसंख्य लोक त्यावर विश्वास ठेवतात. त्याच धर्तीवर 'ळ' अक्षर हिंदीत (बोलीत वा लिहिण्यात) नाही, असाच आपला समज. तोही खरा नाही. हरयाणाची भाषा हिंदी. त्यांच्या बोलीत 'ळ' आहे, हे लष्करातील एका सुभेदारसाहेबांशी बोलताना मागंच स्पष्ट झालं होतं. नगरमध्ये मारवाडी समाज मोठ्या संख्येनं. त्यांच्या बोलण्यात 'ळ' ओघानं असतोच. ह्या वर्षीच्या सुरुवातीला बिकानेरमध्ये जाऊन आलो. राजस्थानची व्यवहाराची भाषा हिंदीच. कवी सुरेश नारायण कुसुंबीवाल ह्यांच्या 'बिच बाजार सच' संग्रहातील एका कवितेत 'पुरणपोळी' असा उल्लेख वाचला, तेव्हा आश्चर्य वाटलं होतं. हिंदीत 'ळ' कसा? त्याचा उलगडा आता थोडं शोधताना झाला.

बहुसंख्य भारतीय भाषांमध्ये 'ळ' आहे. राजस्तानी, हरयाणवी, गढ़वाली, कुमाउंनी, नेमाडी, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमीळ, कोकणी, गुजराती, ओडिया ह्या सगळ्या भाषांमध्ये हे अक्षर आहे. संस्कृत, उर्दू, आसामी, बंगाली अशा काही मोजक्याच भाषांमध्ये ते नाही. मध्यंतरी वाचण्यात आलं की, हिंदी काही त्या अर्थाने भाषा नाही. विविध २२ (संख्या कमी-अधिक असेल!) बोलींचा तो समुच्चय आहे. श्री. निर्मळ तर हिंदीची व्याख्या 'उर्दूतले कठीण शब्द वगळून त्या ऐवजी संस्कृत शब्दांना घेऊन बनलेली 'देवनागरी उर्दू' भाषा' अशी करतात! गुजरातीमध्येही हे अक्षर आहेच. सुप्रसिद्ध अभिनेते परेश 'रावल' ह्यांचे आडनाव 'रावळ' असेच असल्याचा उल्लेख विकिपीडियावर दिसतो. मी 'परेश रावळ' असंच नाव वापरत होतो, तेव्हा त्याला काहींनी हरकत घेतली होती. प्रचलित ते वापरावं, असं त्यांचं म्हणणं! 'ललित'च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र ह्यांनी म. गो. रांगणेकर ह्यांचं व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई व पी. व्ही. नरसिंह राव त्यांच्या 'कुलवधू' नाटकाचे चाहते होते, अशी माहिती देत श्री. मिश्र गंमत सांगतात - मोरारजीभाई 'कुलवधू'ऐवजी 'कुळवधू' म्हणायचे!

आंतरजालावर फिरताना धर्मेंद्र पंत ह्यांचा ब्लॉग दिसला. त्यावर लेख आहे - 'गढ़वाली में 'ल' और 'ळ' का अंतर'. लेख साधारण अडीच वर्षांपूर्वीचा. ते लिहितात - बाल और बाळ, ढोल और ढोळ, मोल और मोळ, घोल और घोळ, पितलु और पितळु। क्या आप एक जैसे दिखने वाले इन शब्दों का अंतर जानते हैं? अगर आप गढ़वाली या कुमाउंनी लोकभाषा की जानकारी रखते हैं तो आपको इनका अंतर स्पष्ट करने में दिक्कत नहीं होगी। 'ल' और 'ळ' के कारण पूरा अर्थ बदल जाता है। ...असल में 'ळ' का साम्राज्य काफी विस्तृत है, लेकिन हिन्दी में इस अक्षर को नकार देने के कारण यह उपेक्षित हो गया। मराठी और दक्षिण भारतीय भाषाओं में 'ळ' का धड़ल्ले से उपयोग होता है। उघड आहे, हिंदीचीच उपबोली असलेल्या गढ़वालीमध्ये 'ळ' आहे! 'ळ'-'ल' अक्षरांतरामुळे अर्थात काय बदल होतो, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी ४४ शब्दही दिले आहेत. वैदिक संस्कृतमध्ये, वेद-पुराणे-उपनिषदे ह्यांमध्ये हे अक्षर आढळते, असेही पंत सांगतात. (संदर्भ - https://ghaseri.blogspot.com)

ह्याच विषयाला ब्लॉगच्या माध्यमातूनच वाचा फोडलेली आढळते ती श्री. तुषार कुटे ह्यांनी. 'मेरी आवाज़' ब्लॉगवर जून २०११मध्ये लिहिलेल्या ''ळ' का शब्दप्रयोग' शीर्षकाच्या लेखात ते लिहितात की, 'हिंदीमध्ये 'ळ'चा वापर का केला जात नाही, असाच प्रश्न मला पडतो.' 'ळ'च्या जागी 'ल' वापरल्यामुळे होणाऱ्या गल्लत-गफलतींची उदाहरणे त्यांनी दिली आहेत. 'तमिळ', 'मल्याळम' ह्या भाषांचा उल्लेख हिंदीत 'तमील', 'मल्यालम' करणं चुकीचं आहे, ह्याकडे लक्ष वेधून ते लिहितात की, 'ळ' का प्रयोग अगर हिंदी में करना शुरू किया जाए तो शायद इस जुबान की अन्य दक्षिण भारतीय भाषाओं में होने वाली दूरी और कम हो सकती है. (संदर्भ - https://tusharkute.wordpress.com)

भाषाशास्त्राचे अभ्यासक अविनाश बिनीवाले ह्यांचा 'महाराष्ट्र टाइम्स'मधील 'गळून पडणारे ‘ष’ आणि ‘ळ’’ शीर्षकाचा लेखही आढळला. त्यांनी लिहिले आहे की, बहुतेक मराठी भाषिकांचा समज असतो, की 'ळ' हा ध्वनी फक्त मराठीत आहे. 'ळ' अक्षर असलेली मराठी ही जगातली एकमेव भाषा आहे, असे सांगणारेही भेटत असतात. संस्कृतात 'ळ' अक्षर नाही हे खरे; पण अभिजात संस्कृतहूनही जुन्या असलेल्या ऋग्वेदाच्या वैदिक भाषेत 'ळ' आहे. ऋग्वेदाची सुरुवातच 'अग्निमीळे पुरोहितम्' अशी आहे... भारतात 'ळ्' असलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे ५० कोटी आहे.

अशीच चर्चा वाचायला मिळाली http://mr.upakram.org संकेतस्थळाच्या एका धाग्यावर. जगाच्या पाठीवर राहणाऱ्या, विविध देशांचं पाणी चाखून आलेल्या मंडळींनी त्यात आपले अनुभव लिहिले आहेत. तमीळनाडूतील नेत्या कनीमोळी ह्यांचं नाव गाजू लागलं, तेव्हा हिंदी, मराठी माध्यमांमध्ये त्यांचं नाव 'कनीमोझी' असं प्रसिद्ध होई. त्याच्याही खूप आधी सत्तर-ऐंशीच्या दशकांमध्ये 'द्रविड मुन्नेत्र कझागम' असं पक्षाचं नाव येत होतं. त्याचा संदर्भ 'रोचना' ह्यांच्या प्रतिक्रियेत येतो. त्यांनी लिहिलंय की, तमिळ भाषेतही 'ळ'चा उच्चार वादाचा विषय आहे; काहीसा आणि-आनि ह्यासारखाच. 'ऋषिकेश' लिहितात की, माझ्या माहितीनुसार तमिळमध्ये दोन प्रकारचे उच्चारी 'ळ' आहेत. त्यासाठी तमिळ लिपीमध्ये वेगवेगळ्या खुणा आहेत. मात्र इंग्रजीतच काय पण संस्कृत, हिंदीतही दोन्ही 'ळ' नाहीत. त्यावर मिहिर कुलकर्णी ह्यांनी लिहिलं आहे की, ते दोन 'ळ' मल्याळममध्येही वेगळे आहेत. अर्थात दोन्ही आपल्या मराठी 'ळ'पेक्षा थोडे वेगळे आहेत...माझा तमिळ रूममेट तर ल, ळ आणि ऴ ह्या सर्वांचा उच्चार 'ळ' असाच करतो. उदा. हेळो, माळेगाव, अळेपुळा, तमिळ, मळ्याळम इ.

'ळ'-'ल' अक्षरांतरामुळे शब्दांचे अर्थ कसे बदलतात, ह्याची उदाहरणं https://www.bytesofindia.com ह्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर वाचायला मिळतात. उदाहरणार्थ : अंमल - राजवट आणि अंमळ - थोडा वेळ; खल - गुप्त चर्चा आणि खळ - गोंद; कल - रोख, ओढा आणि कळ - वेदना किंवा यंत्राचे बटन; छल - कपट आणि छळ - त्रास इत्यादी.

हे असं बरंच काही वाचल्यावर श्री. प्रकाश निर्मळ ह्यांच्या कामाचं महत्त्व अधिकच जाणवलं. त्यांच्याशी बोलावं आणि त्यांनाही बोलतं करावं वाटलं. हे करण्यामागची त्यांची भूमिका समजून घ्यावी, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, त्यात काय अडचणी आल्या, हे माहीत करून घ्यावं वाटलं. त्यातूनच ही मुलाखत आकाराला आली. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी सविस्तर उत्तरं दिली. ह्याच मुलाखतीचा संपादित अंश 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मुंबई आवृत्तीत सोमवारी प्रसिद्ध झाला आहे. 


Ø  हिंदीत लिहिता-बोलताना सरसकट ‘ळ’चा ‘ल’ केला जातो. हे जवळपास सर्वांच्याच पचनी पडलं होतं. असं असताना तुम्हाला ह्यामध्ये काय खटकत होतं? केव्हापासून?

- खरं तर ‘ळ’ आणि ‘ल’ ह्यांच्या उच्चारामध्ये खूपच फरक आहे. महाराष्ट्रात आपण उच्चारप्रधान भाषा, लिपी वापरतो. उच्चाराबाबत अतिशय काटेकोर असलेल्या संस्कृतला ‘देवभाषा’ मानतो. शब्दांना मंत्रांचे स्थान देतो. लांबून ऐकायला सारखेच वाटणारे ‘श’-‘ष’चे उच्चार स्वतंत्र दर्शवतो. ‘सहस्र’ शब्द ‘सहस्त्र’ लिहू नये, उच्चारू नये असा आग्रह धरतो. असे असताना टिळकचे हिंदीत होणारे ‘तिलक’ स्वीकारणं मला पटत नव्हतं. एवढं सुंदर लोणावळा हे नाव, त्याची मोडतोड व्हावी; साळी समुदायाचे नावच बदलून टाकावे हे पटत नव्हते. भातात खडा लागावा तसं किंवा एखादं सुंदर गाणं कुणी भसाड्या आवाजात गायिल्यावर कानाला खटकतं, तसा ‘ळ’चा ‘ल’ कायम खटकत होता आणि अजूनही खटकतो. ‘घननिळा लडिवाळा’सारख्या गीतातून ऐकू येणाऱ्या ह्या नितांत श्रवणीय उच्चाराची ‘देवनागरी उर्दू’ने इतकी वर्षं जी वाट लावली, ती आक्षेपार्ह आहे.

Ø  हल्ली आपल्याकडे भाषेबद्दल, विशेषतः मराठी लिहिण्या-बोलण्याबद्दल ‘समजलं म्हणजे झालं ना!’ अशी (तडजोडीची) भूमिका सहजपणे घेतली जाते. अशा जमान्यात तुम्हाला ‘ळ-ल’ची ‘तडजोड’ का मान्य नव्हती? भाषेच्या शुद्धतेबद्दल हा दुराग्रह आहे, असं कुणी ऐकवलं नाही?

- खूप लोकांनी ऐकवलं. खिल्लीसुद्धा उडवली. ‘इथे लोक ‘thanks’चं ‘thx’ करतात आणि तुम्ही एका अक्षरासाठी आकाश-पाताळ एक करता! हे सोडून द्या,’ असंही म्हणाले. राजभाषा विभागातील महिला अधिकारी म्हणाली की, इसमे कुछ भी होने वाला नही. लक्ष्यप्राप्तीपर्यंत स्वस्थ बसायचं नाही, हे माझ्या संस्थेनं शिकवलं; उच्चारांच महत्त्व पालकांनी. मंत्रोच्चार नीट जमले नाहीत म्हणून एका पुरोहिताला नारळ देणारे माझे वडील आणि बोलताना प्रमाणभाषेचा आग्रह धरणारी आई, ह्यांच्यामुळे उच्चाराबाबत नेहमीच सजग राहिलो. माझी ग्रामीण बोली वऱ्हाडी, अस्सल गावरान शैलीत बोलता येते मला. पण प्रमाणभाषेत बोलताना प्रत्येक उच्चार स्पष्ट असावा, ह्याबाबत मी नेहमीच काटेकोर राहिलो. शुद्धतेचा आग्रह आहे, दुराग्रह मात्र नाही! कुणाला ‘ण’, ‘ळ’ म्हणताच येत नाही, हे समजू शकतो. पण लिहितानाही कुणी तसं करीत असेल, तर ते चूकच.

Ø  सरकारी पातळीवरच्या व्यवहारात ‘ळ’ऐवजी ‘ल’ वापरणे (आता) अयोग्य ठरेल. तो केंद्रीय हिंदी संचालनालयाच्या सूचनेचा भंग असेल. हा मोठा बदल करण्याकरिता तुम्ही पाठपुरावा केला. आता समाधानी आहात का?

- केंद्रीय हिंदी संचालनालयाच्या सहायक संचालकांनी मला पत्राने कळवलं की, आम्ही हा वर्ण विस्तारित वर्णमालेत स्वीकारला असून, त्याच्या वापराची प्रक्रिया सुरू आहे. ते वाचून खूप आनंद झाला. राजभाषा विभागाने ह्याबाबत काही सांगण्यास असमर्थता दर्शविल्यावर हिंदी संचालनालयाने दिलेले हे स्पष्टीकरण भारताच्या भाषिक व्यवहाराला नवे वळण देणारे ठरणार आहे. बदलाबाबत स्पष्ट बोलायचं, तर मी अजून समाधानी नाही. लढा सुरूच आहे. त्यांनी ‘ळ’ वर्ण मराठी आणि समस्त अहिंदी भाषांचा वर्ण मानून विस्तारित वर्णमालेत घेतला. तो क्रमिक पुस्तकांतून यायला हवा असेल, तर ‘ळ’ मानक वर्णमालेतच आला पाहिजे. विस्तारित वर्णमालेची अंमलबजावणीही तातडीने होणं आवश्यक आहे.

Ø  ह्या त्रुटीबद्दल दाद मागावी, त्यासाठी पाठपुरावा करावा, हे तुम्हाला नेमकं कसं सुचलं?

- सार्वजनिक हितासाठी एखादी बाब योग्य वाटत नसेल, तर त्याबाबत तक्रार करायला लोक घाबरतात. संबंध बिघडतील, अडचणी येतील म्हणून आपल्यापुरता उपाय शोधण्याची प्रवृत्ती असते. त्यात काही चूक नाही. मी मात्र खटकणाऱ्या गोष्टींविरुद्ध नेहमीच स्पष्ट भूमिका घेत आलो आणि त्यासाठी चिवटपणे मागेही लागलो. प्रसंगी अनेक नकारात्मक लोकांशी शत्रुत्वही पत्करले. हीच सवय ह्या पाठपुराव्यासाठी कामी येते आहे.

Ø  पाठपुरावा करण्याची सुरुवात कशी झाली? कोणकोणत्या पद्धतीनं आणि कोणकोणत्या संस्थांशी तुम्ही संपर्क साधला?

- सर्व मार्गांनी ह्याचा पाठपुरावा केला आणि तो अजूनही चालू आहे. ह्याला सुरुवात झाली माझ्या राजस्थान दौऱ्यापासून. तो हिंदीभाषी प्रदेश समजला जातो. त्या प्रदेशाची राजभाषा ‘हिंदी’ म्हणजे राजस्थानच्या दृष्टीने खडी बोली आहे. तिथे ‘ळ’चा प्रचुर प्रमाणात उच्चार करताना लोक दिसले. लोकांशी चर्चा केली. तेथील वृत्तवाहिन्या बघितल्या. त्या भाषेचा थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की, राजस्थानच्या लोकभाषेतच ‘ळ’ आहे. नंतर लक्षात आलं की, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेशातील काही भागात ‘ळ’चे उच्चारण आणि लेखनही होतं. म्हणजे भारताच्या निम्म्याहून अधिक भागात ‘ळ’चे उच्चारण होतें. संस्कृतसह १४ भाषांमध्ये ‘ळ’चे लेखन होते. हे लक्षात आल्यावर ‘दूरदर्शन’, ‘इंडिया टीव्ही’, ‘झी टीव्ही’ ह्यांना लिहिले. काही मराठी वाहिन्यांना, प्रसारण मंत्रालयाला, राजभाषा विभागालाही लिहिले. खूप पत्रव्यवहार केला. सुरुवातीला काहीच उत्तर आले नाही. कुणाशी, कसा पाठपुरावा करायचा, हे नंतर नेमकं कळाल्यावर प्रतिक्रिया येणं सुरू झालं. सुरुवातीला अमरावतीचे माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे नेते दिनेश सूर्यवंशी, नेहमीच्या संपर्कातील साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार, अमरावतीचे सुरेश अकोटकर, नागपूरच्या शुभांगी भडभडे आणि विविध मराठी दैनिकांमधील पत्रकारमित्र ह्यांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

Ø  राजकीय किंवा सरकारी व्यवहारात हिंदीचा एकुणात वरचष्मा असताना आपल्या म्हणण्याची दखल घेतली जाईल, ह्याबद्दल कितपत आशावादी होता?

- सध्याच्या सरकारबाबत माझा अनुभव खूप चांगला असल्यामुळे आशावादी होतो, आहे. सकारात्मक राहिल्यावरच संघर्ष करता येतो. सरकारी यंत्रणेबाबत नकारात्मक असाल, तर तुमचे मुद्दे पटवून देणे शक्य होत नाही. कार्यालयीन वर्णमालेतील ‘ळ’ची अंमलबजावणी व मूळ वर्णावलीमध्ये ‘ळ’च्या समावेशाबाबतची माझी मोहीम नक्की यशस्वी होईल.

Ø  पंतप्रधान, त्यांचे कार्यालय, केंद्रीय मंत्री आदींना तुम्ही निवेदने पाठविली. त्यांच्याकडून किती त्वरेने आणि कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला?

- प्रत्येक वेळी प्रतिसाद मिळाला नसला, तरी पत्राची दखल घेतली जाते असं दिसतं. ह्या पाठपुराव्यासाठी वेळोवेळी वेगवेगळी सामाजिक माध्यमे वापरली.

Ø  स्थाननामे आणि व्यक्तिनामे ह्यांबाबतच बदलासाठी आग्रही राहिलं पाहिजे, असंच तुमचं म्हणणं होतं/आहे ना?

- अर्थातच. विशेषनाम कोणत्याही भाषेत तसेच राहते. हिंदी उच्चारप्रधान भाषा आहे. राजभाषा तर सर्वसमावेशक असायला हवी. त्यामुळे तिने संकीर्ण लिपी वापरू नये, प्रादेशिक उच्चारांचा सन्मान करावा, असे माझे मत आहे. हिंदीमध्ये ‘ळ’ नसता आणि देवनागरीतही तो नसता, तरी इंग्रजीने ‘छ’साठी केली, तशी तरतूद हिंदीला वर्णमालेत करावी लागलीच असती.

Ø  भाषा हे काही तुमचे (व्यावसायिक किंवा व्यावहारिक) कार्यक्षेत्र नाही. आपले लेखक, प्राध्यापक, पत्रकार ह्यांनी ‘ळ-ल’चा मुद्दा उचलून धरल्याचं ऐकिवात नाही. की तसे काही प्रयत्न पूर्वी झाल्याचं आणि त्याला यश न आल्याचं तुम्हाला माहीत आहे?

- असा प्रयत्न करणारा मी पहिलाच का, ह्याबद्दल काहीच माहिती नाही. पण ह्या निमित्ताने हिंदीतील विस्तारित वर्णमालेत ‘ळ’ स्वीकारला गेल्याचे जगाला पहिल्यांदा कळालं, एवढं मात्र मी खात्रीपूर्वक सांगतो.

Ø  हा बदल व्यवहारात येण्यासाठी माध्यमांनी काय करावे, असे तुम्हाला वाटते? सर्वसामान्य मराठी भाषकांकडून तुमच्या ह्याबाबत काय अपेक्षा आहेत?

- मराठी माध्यमांनी हा विषय खूप लावून धरला. आघाडीवरची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, अनेक डिजिटल चॅनेल व सामाजिक माध्यमांतील ग्रूप ह्यांनी हा विषय प्राधान्याने प्रसारित केला. साहित्य क्षेत्रातूनही अपेक्षित प्रतिसाद मिळतो आहे. फक्त जनसामान्यांचा प्रतिसाद वाढला पाहिजे. जिथे ‘ळ’चा ‘ल’ होतो, तिथे त्यांनी लगेच पत्र द्यावे. कारण दुर्लक्षामुळेच आपल्या समृद्ध प्रादेशिक भाषांचे खूप नुकसान होत आहे. ‘देवनागरी उर्दू’मुळे राजस्थानीची झाली, तशी मराठीची अवस्था होऊ नये म्हणून मराठी माणसाने आणि हिंदी, अहिंदी भाषकांनी, प्रादेशिक भाषांनी सतत जागरूक राहिले पाहिजे.

Ø  हे सर्व करताना तुम्हाला कुणाची विशेष साथ (संस्था/व्यक्ती/माध्यमे) मिळाली?

- गणेश देवी, नागनाथ कोत्तापल्ले, श्रीपाद भालचंद्र जोशी, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, रा. रं. बोराडे, प्रदीप निफाडकर, राजन खान, मिलिंद जोशी, सदानंद देशमुख, नरेंद्र लांजेवार, रवींद्र शोभणे, किशोर सानप, सतीश तराळ, नरेशचंद्र काठोळे, भरत यादव, घनश्याम पाटील, महेंद्र आकांत, राजन लाखे, सतीश जैन, गोपी सरडे, विलास मराठे, महेश केळुसकर, मंगेश विश्वासराव, गोवर्धन देशमुख, विजया वाड, विनिती ऐनापुरे ह्यांनी मला पाठिंबा दिला. ह्या विषयावर मी अजूनही नवीन माहिती मिळवत असतो. लेख लिहितो, टिपणं काढतो. कुणाला तरी ट्वीट, इ-मेल करतो, पत्र पाठवतो. माहितीच्या अधिकाराचा वापर करतो. माझं काम सुरूच आहे. माजी संमेलनाध्यक्ष आणि २० साहित्यिक ह्यांच्याशी नुकतेच जुळले. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे, पिंपरी-चिंचवड), विदर्भ साहित्य संघ, मातंग साहित्य परिषद, समरसता साहित्य परिषद, मराठी एकीकरण समिती आदी ह्या चळवळीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सामील होत आहेत.

....

टिप्पण्या

  1. आपला ईमेल मिळाला...
    त्यात 'ळ' संदर्भातील लेख असल्याचे आपण लिहिले होते, तसा तडक सदर लेख वाचून काढला. अतिशय विस्तृत माहिती असलेल्या आपल्या या लेखाबद्दल अभिनंदन.
    लेख आवडला.

    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. वा वा ...!
    कळा ह्या लागल्या जीवा ...!!👍👍
    सतीश,
    हा लेख लगेच वाचून टाकला ..मस्त भट्टी जमलीय..

    हा लेख वेगवेगळ्या विद्यापीठाच्या हिंदी अभ्यासक्रम मंडळ अध्यक्ष लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे,ते बघ बरं...
    "ळय महाराष्ट्र...!"

    उत्तर द्याहटवा
  3. थोडक्यात निर्मळांनी मराठीतील 'ळ' या शब्दाचा हिंदी मध्ये आजीवन विमा उतरवून हिंदी भाषा निर्मळ केली, हिंदी भाषेचं बोबडेपण घालवले, "ळ" ला धरावयास भाग पडले. नकळत "कमळा"ला व स्वतःलाही न्याय मिळवून दिला. खिडकीने नेहमीप्रमाणे आपल्या लेखणी द्वारे त्यावर साज चढवला. वास्तविक शब्द त्यातून भाषेची निर्मिती हा विश्व निर्मिती इतकाच गहन विषय आहे. विविध संदर्भाद्वारे आपण तो लीलया पेलला आहे.

    अर्थात IT म्हणजे जगावेगळे रसायन. You ला U, माझीहि सहमतीला +1, Brod Band ला BB, Power Down ला PD म्हणजे लाईट गेली. ID म्हणजे इंटरनेट डाउन म्हणजे इंटरनेट बंद वगैरे वगैरे. अशा प्रकारे भाषेवर अघोरी संस्कार करणारे महाभाग. अशा शब्द कुस्करून वापर करणाऱ्यां महाभागासाठी भविष्यात शासनाला स्वतंत्र भाषाकुस्करु संचालनालय स्थापन करावे लागल्यास नवल नको.  

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.

    उत्तर द्याहटवा
  4. 'ळ'वरचा लेख वाचला. श्री. निर्मळ ह्यांना धन्यवाद.

    'क्राइम पेट्रोल' मालिकेत सुनील केळकर नावाचे एक पोलीस अधिकारी आहेत. ते आपली ओळख नेहमी 'मै सुनील केलकर' अशी करू देतात, तेव्हा हसू येतं. तिथं काही लिहायचं नसतं, बोलायचं असतं.

    आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकसुद्धा नावात 'ळ' असेल तर त्याचा बळी देऊन 'ल'चाच उपयोग करायचे.
    - मनोहर राईलकर

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान कार्य, संघर्ष. महत्त्वाचं काम आहे हे. जे सर्वभाषिक खरेखुरे जाणकार आहेत, त्यांच्या ठायी 'ळ'चं महत्त्व अतिशय अर्थपूरअम आहे. नाही तर कळ/कल, सरळ/सरल, मरळ/मरल, तरळ/तरल, झुरळ/झुरल... अशा अनेक विपर्यस्त शब्दांच्या अर्थामुळे गोंधळ उडेल. ह्या संघर्षाला सलाम, अभिनंदन, धन्यवाद!
    - चंद्रकांत कुटे, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  6. कुल(ळ)कर्णीसाहेब,
    आजच्या खिडकीत निराळाच विषय हाताळल्याबद्दल आभार.

    विषयाची दुसरी बाजू दिसावी, म्हणून मी बर्‍याचदा विरोधी भूमिका घेत असतो. त्यामुळे गैरसमज नसावा.

    आपल्या भाषेतील एखादं मुळाक्षर दुसर्‍या भाषेने तिच्या इच्छेविरुद्ध घ्यावं ह्याचा आग्रह हा दुराग्रह मानावा लागेल. कित्येक शब्दांची देवाणघेवाण सहजरीत्या होत असते आणि त्यातून भाषा समृद्ध होत जाते हे निर्विवाद आहे. परंतु मुळाक्षर हे मूळ अक्षर असल्याने त्यातील बदल भाषेच्या मुळावरच घाव घालतो. त्यामुळे हा बदल सहसा पचनी पडत नाही.

    आपण मराठीत तमिळ मुळाक्षरं घेतली का? तमिळ ह्या शब्दातला 'ळ' हा आपला 'ळ' नाही. तो उच्चारायला जीभ टाळ्याला लावून मागेच ठेवावी लागते. ते मुळाक्षरदेखील भिन्न आहे. कित्येक अरबी व उर्दू मुळाक्षरं आपल्याकडे नाहीत. पूर्वोत्तर राज्यातील भाषांचा तर आपण विचारही करत नाही.

    कित्येक जर्मन नावं आपण मराठीत लिहू शकत नाही. मग जर्मनांनी उलटा आग्रह धरायचा का?

    आपण मराठीत जे करत नाही ते हिंदीत करण्याचा आग्रह कशासाठी? लेखात म्हटल्याप्रमाणे हिंदी ही राजभाषा नाही. त्यामुळे तिच्यावर काही खास जबाबदारीही नाही.

    'ळ' जर हिंदी वर्णमालेत घातला गेला असेल तर तो लॉबिंगचा विजय आहे; तत्त्वाचा नाही.

    - हेली दळवी

    उत्तर द्याहटवा
  7. बेहतरीन लेख के लिए आपका शत शत अभिनंदन.

    - एड. दिनेश शर्मा, पुलगांव (वर्धा)

    उत्तर द्याहटवा
  8. 'ळ' अक्षराचे महत्त्व श्री. निर्मळ यांना समजणार नाही तर कोणाला? त्यांची खदखद तुम्ही उलगडून दाखविली, यासाठी धन्यवाद!

    मी ग्वाल्हेरची असल्याने हा त्रास जवळून बघितला आहे. तेथे बरेच वेळा आपले मराठी भाषकही 'ल..' उच्चारून कविता किंवा गाण्याचे सौंदर्यच घालवितात. 'उजलल्या दश दिशा...' ऐकताना कसेसेच होते.

    पण कधी कधी मला असेही वाटते की, मराठी भाषक पण उगाच नाव का बदलतात? उदाहरणार्थ... सगळे 'पटियाला' म्हणत असताना आपण 'पतियाळा' का म्हणतो ?
    - स्वाती वर्तक

    उत्तर द्याहटवा
  9. ''ळ'च्या अढळपदासाठी' ह्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. ही बाब धसास लावून काही निर्णय मिळविल्याबद्दल श्री. निर्मळ ह्यांचे हार्दिक अभिनंदन.

    काही वर्षांपासून मराठी भाषेस 'अभिजात भाषे'चा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालले होते. दर वेळेस मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळेस ठराव पास होतात; नंतर मामला थंड!! आता ही बाब कोणी बोलत नाही. अगदी शिवसेना सरकारदेखील. त्याबाबत कोणी अजून प्रयत्न करीत आहे का?
    - अशोक जोशी, बंगलोर

    उत्तर द्याहटवा
  10. फारच सुंदर ब्लॉग झाला आहे. अनेक नवीन माहिती मिळाली आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. श्री. निर्मळ यांच्या जिद्दीला मनःपूर्वक नमस्कार. प्रश्न केवळ ळ चा नसून तत्वाचा मानून त्यांनी जी धडपड करुन यश गाठलं ते कौतुकास्पद आहे. आणि कुलकर्णी साहेब तुम्ही हे सर्व सविस्तर मांडलं त्याबद्दल तुमचेही आभार.
    -- पुरुषोत्तम रा. रामदासी
    नवी मुंबई.

    उत्तर द्याहटवा
  12. प्रतिक्रिया म्हणून काही एकेक ओळीत...
    - सविस्तर, सारी माहिती. तीही सांगोपांग आणि एकही शब्द विना-आधार नसलेली. Authentic.
    - लेखावर आलेल्या प्रतिक्रिया तोलामोलाच्या. त्यात एक फारच Apt - हा लेख विविध विद्यापीठांपर्यंत पोहोचणे जरुरी.
    - हे Old school प्रकारातले लेखन आहे. जे आज दुर्मिळ झाले आहे.

    आणि -
    - लेख वाचताना मध्ये-मध्ये येणाऱ्या खिडक्या (चित्रांच्या-फोटोंच्या) निव्वळ अप्रतिम!
    - प्रदीप रस्से, जळगाव

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द. मा. - पाहिलेले, ऐकलेले

' परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोकांच्या जीवनात माझ्या लेखनामुळे आनंद निर्माण करावा, हीच माझी इच्छा आहे...' ...आपल्या हजारो, लाखो चाहत्यांना हळहळ करायला लावीत, ह्या जगाचा काल निरोप घेतलेल्या प्रसिद्ध लेखक प्रा. द. मा. मिरासदार ह्यांचे हे म्हणणे आहे. नगरमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. तिचा समारोप करताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली. द. मा. मिरासदार आपल्या अनेकांचे आवडते लेखक. लहानपणी कधी तरी त्यांच्या कथांची ओळख झाली. बहुतेक जुन्या मॅट्रिकच्या (अकरावी) मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची नागू गवळीची कथा होती. मी ऐकलेली-वाचलेली त्यांची ती पहिली कथा. आपल्या म्हशींवर लेकरांप्रमाणे प्रेम करणारा, कुंभकर्णी झोपेतच दोन-तीन चोरांना लोळवणारा नागू फार आवडला. मग संधी मिळेल, तेव्हा करमाळ्याच्या ज्ञानेश्वर वाचनमंदिरातून त्यांची पुस्तके आणून वाचू लागलो. भोकरवाडी आणि नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, आनशी, महादा, ज्ञानू वाघमोडे ह्...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...