Saturday 31 October 2020

'शार्ली एब्दो'साठी...

फ्रान्सच्या राजधानीतून - पॅरिस येथून प्रकाशित होणारे 'शार्ली एब्दो' साप्ताहिक व्यंग्यात्मक लेखनासाठी प्रसिद्ध आहे. त्यात प्रामुख्याने बोचरी व्यंग्यचित्रे असतात. अशाच एका व्यंग्यचित्राचे निमित्त करून इस्लामी अतिरेक्यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी साप्ताहिकाच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बारा जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये संपादक, व्यंग्यचित्रकार ह्यांच्यासह आठ पत्रकारांचा समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी, आठ जानेवारी २०१५ रोजी लिहिलेली ही रचना त्या वेळी एका अनुदिनीवर प्रकाशित झाली. सध्या फ्रान्समध्ये जे काही चालले आहे आणि त्याचे पडसाद ज्या पद्धतीने जगभर उमटत आहेत, ते पाहिल्यावर साडेपाच वर्षांपूर्वीच्या ह्या लिखाणाची आठवण झाली.

हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पॅरिसचे रहिवासी.

(छायाचित्र सौजन्य - सी. एन. एन.)


शब्द हे आहे शस्त्र

एकदम जपून वापरा

कुंचला म्हणजे अस्त्र

थोडे सावरून चालवा

पचेल तेच लिहा

रुचेल तेच बोला

पटेल तेच काढा

ऐकत नाही? मारा-झोडा!

पेन? टाका मोडून!

ब्रश? द्या फेकून!

शाई-रंग? द्या ओतून!

बोटे? तीही द्या छाटून!

पडावी टोळधाड

तसे येतात भ्याड

नाव-ओळख लपवून

आणि तोंड झाकून

बंदुकीच्या चापावरची

नाही होत पकड ढिली

निर्ढावत लक्ष्य साधते

निर्दयी प्रत्येक गोळी

पॅलेटमधला हरएक

रंग असतो थिजलेला

आणि डौलदार कुंचला

निराधार पडलेला

कॅनव्हास मग तिथला

लाल रंगाने माखलेला़

'खीचों न कमान को, ना तलवार निकालो,

गर तोप मुकाबिल हो, तो अखबार निकालो'

फलकावरील एकेका अक्षराच्या

हृदयात घुसलेली असते गोळी

.

.

.

काल ते होते

उद्या मी असेन

मागणे एवढेच...

लेखणी थरकापू नये भिऊन

अन् लिहिणे जाऊ नये राहून

.........

- निःशब्द आणि संतप्त आम आदमी

.......


No comments:

Post a Comment

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...