अजून किती दिवस पाहायला मिळणार नाही हे दृश्य?
(छायाचित्र सौजन्य :
स्क्रोल/एचटी) |
'The only thing you absolutely have to know is the location of the library.'
अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. 'सर्च एंजिन'वर 'बुक कोट्स' टाकलं की, पाच-पन्नास संकेतस्थळं सेकंदामध्ये त्यांचं हे उद्धृत ठळकपणे दाखवून देतात.
माझ्या घरापासून वाचनालय जवळ आहे. तिथपर्यंत चालत जायला १०-१२ मिनिटं पुरेशी होतात. पण कित्येक दिवसांत; नेमकं सांगायचं, तर २२ मार्चपासून तिथं जाताच आलं नाही. सहा महिने होऊन गेले त्याला. त्याच्या आधी १५ दिवस आणलेली अनुवादित कादंबरी पडून आहे. तिची पारायणंही शक्य होती.
'नगर वाचनालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं 'स्थान' काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच लाखभर पुस्तकं असलेल्या ह्या सार्वजनिक वाचनालयाचं दार अजून बंदच आहे. ते कधी उघडणार, ह्याची काहीच कल्पना नाही.
म. गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी सगळ्याच वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर 'अनलॉक : ५'च्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. केंद्र व राज्य सरकारांनी त्यात कशाला मुभा दिली नि कशावरचे निर्बंध कायम, हे बातम्यांमध्ये तपशिलानं आहे. राज्य सरकारनं ५ ऑक्टोबरपासून बार, रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. आणखी काही गोष्टी केल्या आणि काही जुने निर्बंध चालूच ठेवले. ह्यात कुठेच ग्रंथालयांचा-वाचनालयांचा उल्लेख नाही, हे विशेष. असा अनुल्लेख म्हणजे उपेक्षाच!
साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात गेलेल्या आपल्या देशातील बहुसंख्यांना वाचनालये उघडावीत, त्यासाठी काही मागणी करावी, असं वाटल्याचं दिसलं नाही. (काही तुरळक अपवाद असतील.) वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा फैलाव होतो, अशा 'व्हॉट्सॲप विद्यापीठीय' बातम्यांचा पूर आल्यानंतर तसा तो होत नाही, हे सांगण्यासाठी वृत्तपत्रांची एकच घाई उडाली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी ह्यांना बोलते करून त्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे छापण्यात आल्या. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विषाणू पसरत नसेल, तर तो पुस्तकांच्या पानांमधून कसा पसरेल, असा प्रश्न वाचनालयांच्या बाबतीत विचारायचं मात्र विसरूनच गेलं.
'अनलॉक : ५'च्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेला मात्र जाग आली. 'ग्रंथालये बंद असणं, ही बाब एकूण साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे ती उघडण्यास परवानगी द्यावी,' अशी मागणी साहित्य परिषदेनं केल्याची बातमी शुक्रवारच्या दैनिकांमध्ये आहे. पण एकूणच साहित्य व्यवहार पाहणाऱ्यांना काय किंमत द्यायची किंवा त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा, हे प्रशासन हाकणाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे 'मागणी केली, बातमी आली' एवढ्यावरच समाधान मानण्याची वेळ.
नगर जिल्हा वाचनालयाच्या प्रवेशद्वारावरचा
फलक.
वाचनालयाची दारं उघडली का, हे पाहण्यासाठी पंधरवड्यापूर्वी नगर जिल्हा वाचनालयाकडे चक्कर मारली. जाळीच्या दारावर पुठ्ठ्याचा एक छोटा फलक टांगलेला होता. त्यावर मजकूर होता - 'शासकीय आदेशानुसार मंगळवार दि. १-९-२०२० पासून ते बुधवार दि. ३०-९-२०२० पर्यंत अहमदनगर जिल्हा वाचनालय बंद राहील.' त्यानंतर गुरुवारी ते उघडले की नाही, ह्याची कल्पना नव्हती; पण त्या दिवशी तिथला दूरध्वनी मात्र कुणी उचलत नव्हतं. शुक्रवारी तर म. गांधी जयंतीची सुटीच होती.
पुस्तक बदलायला आणि वाचायला खालच्या मजल्यावर बंदी. वरच्या मजल्यावर मात्र ती विकायला परवानगी! |
'अनलॉक'च्या पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ज्या शहरात सर्वाधिक खरेदी मोबाईलची होते, त्याच शहरात प्रदर्शनात पुस्तकांची विक्री होते किंवा नाही, हा मुद्दा वेगळाच आहे. मोबाईलच्या, मिठाईच्या, कपड्यांच्या, सौंदर्यप्रसाधनांच्या, सटरफटर वस्तूंच्या दुकानात झुंबड उडते. अधिकृत परवानगी मिळाल्याच्या किती तरी दिवस आधीपासून रेस्टॉरंट आणि बारमध्ये सहजपणे 'बसता' येते, अशी चर्चा कर्णोपकर्णी असते. तिथे ग्रंथालयावरचे निर्बंध मात्र कडकपणे चालू असतात. त्यावाचून कुणाचे काही अडत नाही, ही तर भावना त्यामागे नसावी ना?
'लॉकडाऊन'च्या सुरुवातीला अनेक जण वाचनाकडे वळले होते. वाचनाची ही भूक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून भागवण्यात आली. मग सरसकट पुस्तकाची पीडीएफ देण्याची मागणी होऊ लागली. पीडीएफच्या माध्यमातून फुकट वाचा! हे एवढं वाढलं की, अखिल भारतीय प्रकाशक महासंघाला शेवटी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करावी लागली. त्याच्या बातम्या सप्टेंबरमध्येच प्रसिद्ध झाल्या.
परिस्थिती अशी असताना सार्वजनिक वाचनालयांचे निर्बंध काही प्रमाणात दूर केले असते तर? त्यामुळे अनेकांची सोय झाली असती. आमच्या नगरमधील काही खासगी ग्रंथालये ह्या सर्व काळात व्यवस्थित चालू आहेत. निर्बंधाचे उल्लंघन न करता त्यांनी आपल्या वाचकांना सेवा दिली. ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे शिरीष बापट ह्यांचं 'अभिरुची वाचनालय'. त्याही पेक्षा किती तरी अधिक सभासद जिल्हा वाचनालयाचे आहेत. पण ह्या कसोटीच्या काळात वाचन-संस्कृतीच्या कसोटीला आपण उतरावं, ह्या भावनेनं वाचनालयाकडून काही झाल्याचं दिसलं नाही, ह्याचं वाईट वाटतं. वाचनालय सुरू व्हावं ह्यासाठी आम्ही सभासदांनीही रेटा लावला नाही.
किचनेर पब्लिक लायब्ररी
(ओंटारिओ, कॅनडा)
इंटरनेटवर भटकताना कॅनडाच्या ओंटारिओ परगण्यातील 'किचनेर पब्लिक लायब्ररी'चं संकेतस्थळ दिसलं. काही शाखा असलेलं हे वाचनालय १० ऑगस्टपासून पुन्हा चालू झालं. त्याचा आनंद संकेतस्थळावर व्यक्त झालेला दिसतो. सभासदांना उद्देशून तिथं लिहिलं आहे - 'आमच्या ह्या जागेत तुमचं पुन्हा स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे! खूप दिवसांपासून आम्हाला तुमची आठवण येत होती...' सरकारच्या अनुदानावर (म्हणजे जनतेच्या पैशातून) चालणाऱ्या इथल्या सार्वजनिक वाचनालयांना आपल्या वाचकांची अशी मनापासून आठवण झाली का?
समर्थ रामदास स्वामींनी 'प्रसंगी अखंडित वाचीत जावे' असं लिहून ठेवलं. त्यातलं अखंडित महत्त्वाचं आहे. सफ़दर हाशमी 'किताबें' कवितेत लिहितात -
किताबें करती है बातें
बीते जमानों की
दुनिया की, इंसानों
की
आज की कल की
एक-एक पल की।
खुशियों की, ग़मों
की
फूलों की, बमों की
जीत की, हार की
प्यार की, मार की।
सुनोगे नहीं क्या
किताबों की बातें?
आपण सगळ्याच पातळ्यांवर कान बंद करून घेतल्यानंतर पुस्तकांचे हे अस्फुट उद्गार त्या पानांतून कसे ऐकू येतील!
वाचल्यानं माहिती मिळते, ज्ञान वाढतं. माणूस शहाणा होतो म्हणतात.
आपली प्रजा शहाणीसुरती असावी, असं कोणत्या जमान्यातील राज्यकर्त्यांना वाटत असतं हो!
लॉकडाऊनच्या काळात पुस्तकांची गरज भासली.अर्थात ते शक्य नव्हते. परंतु जस जसे अनलॉक टप्पे सुरु झाले त्या काळात वाचनालय सुरु करायला हरकत नव्हती.
उत्तर द्याहटवालेख छानच !!
सध्या सोशल मिडियामुळे वाचन तसे कमीच झाले आहे, निदान माझे तरी !!
उत्तर द्याहटवाग्रंथालये बंद आहेत आणि ग्रंथपालांचे पगार गोठवले आहेत. हा क्रूरपणा आहे. आपण ह्याकडे लक्ष वेधण्याचे महत्वाचे काम केले आहे.सर्व आरोग्याचे नियम पाळून ग्रंथालये त्वरित चालू करावीत ही मागणी सर्व माध्यमातून पुढे करू या.
उत्तर द्याहटवाउद्बोधक लेख आहे पुस्तक आणि लायब्ररीबद्दल .
उत्तर द्याहटवा- अमित भट, दक्षिण कोरिया
वाचनालयं बंद ही कल्पना भयावह आहे. आपण पुस्तकं महाग आणि घरात जागेचा अभाव म्हणून विकत घ्यायला जात नाही; तेव्हा वाचनालय हाच आपला आधार आहे आणि तोच बंद झाला तर वाचकांची कुचंबणा होते ह्याची नोंद घ्यायला हवी...
उत्तर द्याहटवामी सध्या किंडलवर पुस्तकं वाचते आहे..दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न 🙏🙏
- सुधा तुंबे
वाचनसंस्कृतीच्या उपेक्षेवर आपण नेमके बोट ठेवले आहे. आपला हा लेख वर्तमानपत्रांतही आला पाहिजे.
उत्तर द्याहटवामजेने म्हणता येईल की, राज्य सरकारमध्ये 'शहाणपणा' हा विभाग / खाते नसल्याने, त्या बाबत प्रस्ताव सुचविणे कोणाच्या लक्षांत आले नाही वा ती कोणाची जबाबदारी ह्याबाबत मंत्रिमंडळात मतभेद झाले!! अगदी 'सामना'चे शहाणे संपादकही विसरले याबाबत वक्तव्य करण्यास!!
- अशोक जोशी, बंगलोर
प्रिय सतीश,
उत्तर द्याहटवाआत्ताच तुझा लेख वाचला. अतिशय छान लिहिला आहेस. माझ्यासकट कित्येकांच्या भावनांना तू कथित केलं आहेस.
घरातली पुस्तकं संपली. भूक म्हणून pdf वर, तसेच पॉडकास्ट वर वाचण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न केला, पण रमलो नाही. पुस्तकांच्या पानात जेव्हढं रमायला होतं तितकं सिंथेटिकमध्ये नाही होत. स्क्रोल अप आणि डाऊन करतांना आत्माच हरवतो पुस्तकाचा.
- मिलिंद शिंदे
एकदम बरोबर बोललात. मार्च महिन्यापासून माझं मराठी वाचन बंद आहे. कारण माझ्या स्वत:जवळचा साठा संपला. मुलीच्या राज्यातील इंग्रजी पुस्तकांवर सध्या तहान भागवतेय. पणजीची केंद्रीय लायब्ररी कधी उघडते असं झालं आहे.
उत्तर द्याहटवा- प्रियंवदा कोल्हटकर, पणजी
खूपच छान... अगदी सूचक. आपली करमाळ्याची लायब्ररीही अशीच बंद असेल. ती पण तशी मोठीच आहे.
उत्तर द्याहटवाआम्हाला लायब्ररीचा अगदी सुखद अनुभव गेल्या वर्षी बेलफास्टला आला... अगदी सुरेख लायब्ररी. तिथले कर्मचारी अतिशय सौजन्यशील आणि अगत्यशील. वाचनाची आवड जोपासण्यासाठी प्रयत्नशील असलेली तिथली नगरपालिका किंवा महानगरपालिका.
- निलय रामनवमीवाले, पुणे
सुंदर आणि योग्य लेख. पण आपले प्रयत्न वांझोटे. सरकार चालवणारे किती जण पुस्तकं वाचत असतील, ह्याबद्दल शंकाच आहे. त्यांना बार माहिती असल्याने ते लवकर चालू झाले. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे श्री. शिरीष बापट ह्यांची सेवा नक्कीच कौतुकास्पद आहे. शेवटी एवढेच म्हणावे वाटते की, उद्धवा, अजब तुझे सरकार..!
उत्तर द्याहटवा- विकास पटवर्धन, नगर
वाचनीय, चिंतनीय, मननीय...
उत्तर द्याहटवाकिताबें करती है बातें
बीते जमानों की
दुनिया की, इंसानों की
आज की कल की
एक-एक पल की।
फार सुंदर.
- हरिहर धुतमल, लोहा
छान मांडलंय. मीही वाट बघतेय सोलापूरच्या लायब्ररीत कधी जायला मिळतंय ह्याची.
उत्तर द्याहटवा- मृणाल खडक्कर
खूप छान आणि मार्मिक भाष्य करून तुम्ही व्यवस्थेचे लक्ष वेधले आहे.
उत्तर द्याहटवामद्यालये उघडतात... पण ग्रंथालये बंद राहतात. समाज साक्षर आणि जागृत होण्यास व्यवस्थाच मोठा अडथळा असते!
- प्रशांत कांबळे, संगमनेर
सतीश भाऊ, लेख छान लिहिला आहेस , कौतुक 👌 निलय ने लिहिले आहे . सध्यातरी घरातील पुस्तके वाचतो आहे, म्हणजे पारायण. व्हाट्सअप मुळेही वाचन होते आहे. ज्ञानसंपदा ओंजळभर, v अक्षरधारा पुणे
उत्तर द्याहटवायेथून येणाऱ्या पोस्ट पण छान असतात. आणि सध्या टी व्ही जोडीला आहेच. एपिक चॅनेल खूपच छान आहे कितीतरी माहिती मिळते असो लेखाबद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन. भेटू या परत.
खर तर सर्व क्षेत्र ही शहाण पणा पासुन कोसो मैल दूर आहे. सरकार कोणतेही असले तरी त्यात फरक पडला नसता. या फसलेल्या लॉक डाउन मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की त्या का बंद आहेत हे कोणीच सांगू शकणार नाही. वाचन संस्कृती पासून आपण ईतके दूर चाललो आहोत की वाचनालय हे आपल्या समाज व्यवस्थेचे एक अभिन्न अंग आहे हे सुद्धा सरकार व आपण दोघेही सोईस्कर रीत्या विसरून गेलो. एका चांगल्या प्रश्नाला वाचा फोडली. व माझ्या एका अतिशय आवडत्या कवितेने तू त्याचा शेवट केला
उत्तर द्याहटवानमस्कार.
उत्तर द्याहटवानेहमीप्रमाणेच नेमकं वर्मावर बोट ठेवलं आहे. वाचनालये इतके दिवस बंद ठेवण्यामागे काहीही सबळ वैद्यकीय कारण नाही. पण त्याविरुद्ध आवाज न उठल्यामुळे तिकडे दुर्लक्ष झालं आहे इतकंच.
वाचकांनीसुद्धा काळाची पावलं ओळखून आपल्या सवयी बदलायला हव्यात. पुस्तकांचा वास, स्पर्श वगैरे गोष्टी चैनीच्या मानाव्यात. पूर्वी लोक पुस्तकं विकत घेत असत. ग्रंथालयांचा प्रसार झाल्यावर लोक त्या स्वस्त आणि सुकर पर्यायाकडे वळले. पुस्तकाच्या मालकीचा अभिमान सोडून दिला.
आता ई-पुस्तकांकडे मोर्चा वळवण्याची वेळ आली आहे. आता सार्वजनिक वाचनालयांनी ई-पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत अशी मोहीम सुरू करावी.
ह्याबाबत इतर वाचकांची मतं जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
- हेली दळवी
नशीब..! ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर आदींच्या काळात सोशल मीडिया नव्हता! अन्यथा आज किती जणांच्या नशिबी भिक्षापात्र आले असते?
उत्तर द्याहटवाअल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांना ज्या photoelectric effect संशोधनासाठी नोबेल मिळाले; हे संशोधन नसते तर आज सोशल मीडिया दिसला नसता. त्या वेळी सोशल मीडिया असता तर कदाचित अल्बर्ट आईन्स्टाईन झाला नसता. सोशल मीडिया वाईट असं नाही. पण त्याची कीड लावून घेणे वाईट. असो.
नगर वाचनालयात अत्यंत उत्कृष्ट पुस्तके आहेत. नगर वाचनालयाचे अनेक सभासद आहेत, वाचन संस्कृतीचे चाहतेही अनेक असतील. पण..! आपण डोळस व आत्मीयता बाळगणारे अहात हे 'खिडकी'तून दिसून येते.
शेवटी एकच सांगतो 'शासकीय ग्रंथालय' म्हणजे शासनाचा नाइलाजाने सज्जनपणा...! अमेरिकेतील वास्तव्यात ग्रंथालयांचे खूप छान अनुभव आले. त्याबद्दल नंतर कधी तरी.
- श्रीराम लंबोदर वांढरे, भिंगार, नगर
Closing down libraries is apocalypse now.
उत्तर द्याहटवालॉकडाऊन नंतर वाचनालये उघडायला हवीत याकडे तू लक्ष वेधलेस हे योग्यच . पण सरकारला दारूची दुकाने उघडण्यात जेवढा इंटरेस्ट तेवढा वाचनालये उघडण्यात नाही , हे दिसून आलेच आहे ! वाचनातला आनंद या राजकारण्यांना काय ठाऊक ? त्यांना हवे आहे नाईट लाईफ !
उत्तर द्याहटवाReally a very nice article.
उत्तर द्याहटवाI hope very soon the library will open.
Thanks for sharing this article, waiting for your next article.
- Dr.Ravi Bulakhe, South Korea
खूप सुंदर लेख.
उत्तर द्याहटवापुस्तक हातात घेऊन वाचणे, मध्ये वाचनात व्यत्यय आला तर बुक मार्क घालून ठेवणे इत्यादीचा आनंद काही वेगळाच असतो. तो आनंद पीडीफ वाचताना नक्कीच मिळत नाही. पण काही बाबतीत सामान्य माणूस हतबल असतो, होतो.
मी सध्या यू. एस.मध्ये, बॉस्टन इथे आहे. इथली लायब्ररी म्हणजे पुस्तकांच्या बाबतीत 'घेता किती दोन्ही करांनी' अशी अवस्था आहे.
या लायब्ररीसंदर्भात एक हृद्य आठवण... माझे सहचारी (जेष्ठ साहित्यिक आणि विज्ञान लेखक) लक्ष्मण लोंढे असताना आम्ही इकडे आल्यावर लोंढे इथल्या लायब्ररीत कायम पडीक असायचे. म्हणून त्यांच्या निधनानंतर माझ्या मुलीनं या लायब्ररीला त्यांच्या नावे डोनेशन दिलं. त्या लायब्ररीची जी प्रमुख होती तिनं ते स्वीकारलं. तेव्हा तिच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. खरं तर तिची आणि ह्यांची व्यक्तिशः ओळखही नव्हती. पण एक लेखक म्हणून तिला वाटलेली आपुलकी आणि जिव्हाळा तिच्या डोळ्यांत दिसला. असो...
- स्वाती लोंढे
सर्वांनाच विचार करायला लावणारा ,वास्तवाचे भान आणून देणारा हा लेख आहे.समाज ,संस्कृती विकसनाचे मोठे कार्य कळत-नकळत पुस्तकाच्या माध्यमातून होत असते.ग्रंथालये आता लवकर खुली झाली पाहिजे.
उत्तर द्याहटवालेख आवडला. मी लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडे असलेल्या पुस्तकांचे वाचन केले. उदा. किमयागार, छावा, युगंधर, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, रेंज आॅफ एन्जल्स (अनुवादित), पूर्वरंग, अपूर्वाई, नस्ती उठाठेव, निवडक अत्रे, हॅन्गओव्हर, पोहरा.
उत्तर द्याहटवाआवर्जून वाचावं अस वाटणारे आता दुर्मिळ प्रजातोत सामील झाले आहेत आणि शासनाचा ग्रांथ, पुस्तके, वाचनाशी फक्त 'अर्थपूर्ण' संबंध उरला आहे, त्याची ही परिणीती
उत्तर द्याहटवाअतिशय महत्वपूर्ण संवेदनशील विषय आपण हाताळला. टाळेबंदी काळात हक्काची साथ देणारी ज्ञानसंपदा पुस्तके आहेत. मात्र वाचन संस्कृती जपण्यासाठी शासनाकडून झालेले दुर्लक्ष भविष्यासाठी निश्चितच घातक ठरेल. दारूची दुकाने, मॉल, हॉटेल यांना परवानगी देतांना वाचनालयांकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असे म्हणावे लागेल. आपल्या लेखनातून शासनकर्त्याना मनाची कवाडे उघडण्याची सुबुद्धी येवो ही प्रार्थना.
उत्तर द्याहटवापुस्तकं धूळ खात पडावीत, वाचनालंयं बंद व्हावीत हाच तर सर्व राज्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. कारण जनता पुस्तकं वाचुन शहाणी झाली तर?
उत्तर द्याहटवायाकारणास्तव, शासनकर्त्यांकडुन अपेक्षा नकोच. जनतेचाच रेटा असायला हवा. पण तमाम जनता सोशल माध्यमांवर 'ढकलगाडी' खेळण्यांत मग्न.
शासनाला बिअर बार बंद करणे परवडत नाही परंतु ग्रंथालय कायमचे बंद झाले तरी त्यांचे काही बिघडत नाही. याद्वारे स्वतः शासनच वाचन संस्कृती सोबतच ग्रंथ संस्कृती सुद्धा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे असे दिसते. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या शब्द प्रामाण्य प्रमाण नाकारण्यात येते आहे. यामुळे पुढच्या पिढीला ग्रंथ कसे असतात हे सुद्धा कदाचित माहित राहणार नाही अशी भयावह परिस्थिती येईल. म्हणून ग्रंथालयात ताबडतोब घडणे ही काळाची गरज आहे. आपला लेख उत्कृष्ट आहे अभिनंदन. प्रा. सुरेश जाधव नांदेड
उत्तर द्याहटवाज्याला वाचनाविषयी तळमळ असते तोच हे लिहील व वाचेल... वाचाल तर वाचाल हे खूपच पटते.खूपच छान लेख.
उत्तर द्याहटवानेहमीप्रमाणेच छान लेख... मनातील अस्फुट भावनांना वाट करून देणारा.
उत्तर द्याहटवा- अनिल कोकीळ, पुणे
तुझ्या 'खिडकी'चा परिणाम -
उत्तर द्याहटवाहॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू झाले, ग्रंथालयं सुरू करण्यास नेमका अडथळा काय? ग्रंथालयांचा विजनवास कधी संपणार? https://bit.ly/3nxuB8e
नियमावली जारी करून ग्रंथालयं सुरू करा; ग्रंथपाल, वाचनप्रेमी, विद्यार्थ्यांची मागणी -
https://bit.ly/3lgjA9i
- आर. डी. कुलकर्णी, पुणे
महत्त्वाचा विषय... वाचनीय लेख. योग्य ती काळजी घेत वाचनालये सुरू होणे गरजेचे आहे. शेवटी 'वाचाल तर वाचाल' म्हणतात, ते काही खोटे नाही.
उत्तर द्याहटवा'खिडकी'च्या माध्यमातून तुम्ही वाचकांच्या जिव्हाळ्याचा विषय हाताळला आहे. वाचनसंस्कृती वाढीस लागणे, ह्या संस्कृतीची जोपासना होणे अगत्याचे आहे. एका चांगल्या विषयावर अतिशय नेमक्या शब्दांमध्ये आपण वाचनालयांचे महत्त्व पटवून दिले आहे.
- बालाजी ढोबळे, परतूर (जालना)
उत्तम लेख. मराठी वाचनालये लवकर सुरु होवोत आणि त्यांची परिस्थिती लवकरात लवकर सुधारो ही सदिच्छा !!
उत्तर द्याहटवाअगदी माझ्या मनातले विचार मांडले आहेत. पहिल्यांदा वाटले, की सुरू होईल महिनाभरात. पण (फक्त) ग्रंथालय बंद हा प्रकार लांबतच चाललाय. मी सभासद असलेली दोन्ही ग्रंथालय अजून बंद आहेत. शेवटी वाचनापासून दूर राहणे म्हणजे...
उत्तर द्याहटवाशेवटी ऑगस्ट महिन्यात 'पुणे नगर वाचन मंदिर' सुरू झाल्याचे कळले. तिथेही सभासद झालो. आता एकाच वेळी दोन पुस्तके आणतो. कारण घरी सर्वांना वाचनाचे वेङ आहे.
उत्तम लेख
उत्तर द्याहटवा