Tuesday 15 February 2022

मोबाईलविना...

मोबाईल रुळला नव्हता, तर आपले पाश पसरू पाहत होता, तेव्हाची ही गोष्ट. तो बाळगणाऱ्याकडे थोडं हेव्यानंच पाहिलं जायचं. आमच्या गरीब बिचाऱ्या मराठवाड्यातल्या वार्ताहरांची सोय व्हावी म्हणून २००६मध्ये मोबाईल माझ्या वाट्याला आला. ते बातमीदार सगळे आठ जिल्ह्यांमध्ये विखुरलेले आणि त्यांच्या बातम्यांना ‘न्याय देणारा’ (किंवा वाट लावणारा!) मी पुण्यात. संवादाचा-संज्ञापनाचा धंदा असलेल्या ठिकाणीच विसंवाद नको म्हणून ही व्यवस्था केली होती. त्याचा फायदा होऊन मी मोबाईलधारी झालो. अगदी साडेतीन टक्क्यांत नाही, पण साडेतीस टक्क्यांमध्ये तरी नक्कीच आलो.

‘नोकिया’चा सुबक-ठेंगणा हँडसेट आणि एअर-टेलचं कार्ड. मला बापुड्याला तो चालू कसा करायचा नि बंद कसा करायचा हेही माहीत नव्हतं. एका चटपटीत (माझ्याहून) तरुण सहकाऱ्यानं ते शिकवलं. कार्यालयानं दोन-तीन महिन्यांतच आधीची एअर-टेलची ‘आयडिया’ बाद ठरवून नव्या सेवेची ‘कल्पना’ आपलीशी केली. सांगायचा मुद्दा असा की, कार्यालयामुळं माझ्या हाती मोबाईल आला. तसा मिळाला नसता, तर मी तो कधी घेतला असता, हे सांगता येत नाही. मित्रांनी आग्रह केला असता आणि घरचे मागे लागले असते, तेव्हा कुठं मी त्याला तयार झालो असतो. अगदीच नाइलाज झाला म्हणून...

कार्यालयीन कामाच्या सोयीसाठी दिलेला हा सेलफोन फारच काळजीपूर्वक वापरत होतो. आलेले फोन स्वीकारण्यापुरताच त्याचा वापर. अगदी अत्यावश्यक असेल, तरच त्यावरून संपर्क साधायचा. पहिली तीन वर्षं तर मी त्यावरून घरीही संपर्क साधत नसे. खासगी कामासाठी तर वापर नाहीच. एस. एम. एस.साठी मात्र भरपूर. खूप वेळा असं होई की, फोनकॉलपेक्षा एस. एम. एस.चं बिल (थोडंसं) जास्त असे. तीन-चार दिवसांपेक्षा जास्त रजेवर जायचं असलं की, मी तो बंद करून संपादकांच्या ताब्यात देऊन टाकायचो. एखादी फार मोलाची वस्तू जपून ठेवायला द्यावी अगदी तसं. ते हसायचे. सहकारी विनायक लिमयेही हसायचा. फोन राहू दे की, असं ते म्हणायचे. पण मला ते उगीचंच बंधन वाटायचं.

... हे सगळं लिहायचं कारण म्हणजे माझे दोन दिवस, तब्बल ४८ - अ ठ्ठे चा ळी स - तास मोबाईलविना गेले. परवा दिवशी दुपारी जेवण करून ताणून दिली. उशाजवळ मोबाईल होता, गाणी ऐकवत. एखादं गाणं मध्येच ऐकू यायचं. अर्धजागृत अवस्थेतलं मन त्याची नोंद घ्यायचं. असं तासभर चाललं. त्यानंतर कधी तरी मोबाईलच बॅटरी संपून गेली.

झोपेतून उठल्यावर पाहिलं, तर मोबाईल बंद. तो रिचार्ज करायला सुरुवात केली. सहज पाहिलं तर ‘नो सिम’ अशी सूचना येत होती. काळजात काही धस्स वगैरे झालं नाही. दहा-एक दिवसांपूर्वी असंच झालं होतं. हृदयातल्या सिमकार्डचं अस्तित्व स्मार्टफोन नाकारत होता. अशा वेळी डोकं लावत बसत नाही. मुलाला सांगतो. त्यानं त्या दिवशी सिमकार्ड बाहेर काढलं, थोडं साफ केलं. आतमध्ये फुंकलं (कृपया नोंद घ्यावी - ‘फुं’ म्हटलेलं आहे; ‘थुं’ नाही!) आणि परत कार्ड घातलं. फोन पहिल्यासारखा चालू लागला.

आताही असंच झालं असेल म्हणून पुन्हा त्याला सांगितलं - ‘नो सिम’ दिसतंय रे. मागच्या प्रयोगाची पुनरावृत्ती झाली. पण ह्या वेळी त्या प्रयोगांना मोबाईलनं दाद दिली नाही. बिघाडाचा बहुतेक नवा, प्रगत व्हेरिएंट असावा. आधीच्या उपायांना भिक न घालणारा.

मग शंका आली. फोनच बिघडलाय की काय! धस्स झालं. जेमतेम वर्षभराचं वय त्या फोनचं. एवढ्यात त्याला ऑक्सिजन कमी पडू लागला? व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली पण?

मुलानं दिलासा दिला. असा धीर सोडू नका म्हणाला.

सिमकार्डाची चाचणी करायची ठरवलं. मुलाच्या फोनमध्ये कार्ड टाकलं. तिथं तीच तऱ्हा. त्याचं कार्ड माझ्या मोबाईलमध्ये टाकलं. ते चालू.

म्हणजे बिघाड कार्डमध्ये आहे, मोबाईलमध्ये नाही. धस्सची जागा हुश्शनं घेतली. सिमकार्ड बदलणं हाच उपाय. तुलनेनं कमी खर्च.

पण ते लगेच शक्य नव्हतं. शनिवारची दुपार होती. भारत संचार निगमचं कार्यालय बंद होण्याची वेळ जवळजवळ आलीच होती. रविवारची सुटी. म्हणजे नवीन कार्ड थेट सोमवारी मिळणार.

मोबाईल दोन दिवस बंद. पण ते अर्धसत्य होतं. कार्ड नव्हतं तरी व्हॉट्सॲप चालूच होतं. घरच्या ब्रॉडबँडचा झरा सदाचाच झुळझुळता. म्हणजे फार काही अडणार नव्हतं. अगदी तातडीनं कुणाशी संपर्क साधायचा तर ‘व्हॉट्सॲप कॉल’ करता येणार होता. त्या विद्यापीठावरून ज्ञानाची देवाणघेवाण चालूच होती. शिवाय घरबशा फोन (लँडलाईन) होताच की शेवटी.

पण समजा कुणाचं तातडीचं काम असलं तर? (हा आपला एक गैरसमज.) फोन बंद असल्याचं लक्षात आल्यावर त्याला काही शंका-कुशंका आल्या तर? त्यावर उपाय शोधला. सद्यस्थिती अद्यतन. म्हणजे स्टेट्स अपडेट. ‘सिमकार्ड खराब झालंय. काही काम असेल, तर कृपया व्हॉट्सॲपवर संपर्क साधावा.’ स्टेट्स अपडेट केलं आणि तासाभरात ते २५ जणांनी पाहिलं. म्हटलं चला, आता दोन-तीन तरी फोन येतील. असं कसं झालं, काळजी घ्या वगैरे सांगणारे.

तसं काहीच झालं नाही. कुणाचाही फोन आला नाही. मोबाईलवाचून माझं कसं चालेल, असं एकालाही विचारावंसं वाटलं नाही. कुणालाही सांत्वन करावं वाटलं नाही. म्हटलं चला, आपल्या नशिबीचं दुःख आपणच भोगलं पाहिजे.

फायबर कनेक्शनच्या कृपेनं घरात काही अडचण नव्हतीच. प्रश्न बाहेर पडल्यावरचा होता. म्हटलं चालायला गेल्यावर डाटा वापरू. होऊ दे दोन-तीन तासांत खर्च. फोन करायचा असेल, ते व्हॉट्सॲपवर बोलतील, असं वाटलं. तो विचार वेडगळपणाचा होता, हे घराबाहेर पडल्यावर लक्षात आलं. सिमकार्ड चालूच नसताना डाटा कुठून येणार होता! आडच नसताना पोहोरा कुठं टाकणार?

तास-दीड तास पायी चालताना दोन-तीन वेळा तरी फोन पाहिला जातो. त्याचं मुख्य कारण म्हणजे किती पावलं झालीत आणि किती राहिलीत, हा हिशेब करायचा असतो. रोजचं दहा हजार पावलांचं लक्ष्य आहे. (दि. बा. मोकाशी ह्यांचं ‘अठरा लक्ष पावलं’ असं पुस्तक आहे. तेवढं लक्ष्य सहा महिन्यांमध्ये पुरं होत असेल बुवा.) क्वचित कधी एकटा चालत असेन, तर डाटा चालू करून ‘विद्यापीठा’त काही नवीन (फॉरवर्डेड) परिपत्रकं पडलीत का, तेवढं पाहतो. कुणाचा फोन आलाच तर बोलतो.

फिरताना गप्पा मारायला जोडीदार असल्यानं फोन चालू नसल्याचं काही जाणवलं नाही. रात्रीही सहसा कुणी फोन करत नाही. बेरात्री झोपून बेसकाळी कधी तरी उठल्यावर पहिली झडप फोनवर मारायची, असला अगोचर प्रकार आपल्याकडून होत नाही. बऱ्याच वेळा जाग येते तीच मुळी फोन वाजत असल्यामुळे. रविवारी सकाळी ती शक्यता नसल्याने अंमळ उशिराच उठलो.

खूप वेळ झाला, तरी फोन वाजला नाही; कर्ज, क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन रमी खेळण्यासाठी बोनस देऊ करणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या एस. एम. एस.चा आवाज आला नाही. बँकेतली आहे तीच जमा दर दोन दिवसांनी सांगणाऱ्याही एस. एम. एस.चं क्रेडिट नाही. थोडं चुकल्या चुकल्यासारखं झालं. स्टेट्स अपडेटकडे पाहिलं, तर ते पाहणाऱ्यांची संख्या चांगल्यापैकी वाढलेली होती. पण सगळ्यांनीच त्यावर साधी प्रतिक्रियाही देणं टाळलेलं.

मोबाईल-विरह अजून दीड दिवस सहन करावा लागणार, हे माहीत होतंच. तेवढ्यात चेतन भगत ह्यांचा लेख वाचण्यात आला. ‘तुम्ही तुमचा स्क्रीन-टाईम कमी करताय ना?’ असं विचारणारा. लेखकमहोदय रोजचे पाच तास मोबाईल पाहण्यात घालवतात. तशी कबुली त्यांनीच दिली. मग आठवलं की, आपल्यालाही आठवड्याला अहवाल येतो. कधी वेळ वाढल्याचं दाखवणारी, तर क्वचित कधी आधीच्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचं सांगणारी. त्याची फार काळजी नाही करत. कारण त्यातला बराचसा वेळ मोबाईल इंटरनेट रेडिओवरची गाणीच ऐकवत असतो.

चेतन भगत ह्यांच्या लेखावरून एक गोष्ट आठवली - एका अमेरिकी कंपनीनं तीन वर्षांपूर्वी आयोजित केलेली स्पर्धा. मोठ्या बक्षिसाची. एक लाख डॉलरचं बक्षीस. स्पर्धा होती वर्षभर मोबाईलपासून लांब राहण्याची. त्यात भाग घेण्याची तयारी किमान दहा हजार लोकांनी दाखवली होती. किती जण स्पर्धेत उतरले, किती टिकले आणि कोण जिंकलं, हे काही नंतर पाहिलं नाही. फक्त त्यावर लेख लिहिला होता. अशा स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला तपासावं असं तेव्हा वाटलं होतं. पण ‘व्हिटॅमिन वॉटर’ची ही ‘व्हिटॅमिन वॉटर स्क्रोल फ्री फॉर ए यीअर कॉन्टेस्ट’ फक्त अमेरिकी नागरिकांसाठीच होती.

मोबाईलला आधुनिक जगातली (स्मार्ट) सोय म्हटलं जातं खरं. पण वास्तव वेगळंच आहे. खूप जणांना आता त्याची लत लागल्यासारखी झाली आहे. व्यसन. न सुटणारं. सोडण्याचा प्रयत्न केला की, अजून घट्ट पकडून ठेवणारं.

सिमकार्ड बिघडल्याच्या निमित्तानं आपलंही व्यसन किती हाताबाहेर गेलंय किंवा अजून आटोक्यात आहे, ह्याचा अंदाज येईल म्हटलं. तसं तर दर अर्ध्या-पाऊण तासानं व्हॉट्सॲप उघडून पाहायचा चाळा लागलेलाच आहे. कुणाचा फोन आला नाही, तरी आपण कुणाला तरी लावतो.


‘नोमोफो’नं आपल्याला कितपत ग्रासलंय, ह्याचं उत्तर मिळेल असं वाटलं. नोमोफो - नो मोबाईल फोबिया. मोबाईलपासून आपण लांब आहोत म्हणजे जगापासून तुटलो आहोत, असा वाटणारा गंड. असा काही गंड नाही, असा अहंगंड वाटत होता. तो दूर होऊन न्यूनगंड येण्याची भीती होती.

कोणतंही व्यसन सोडताना मधला काळ फार खडतर जातो म्हणे. त्याला ‘विड्रॉअल सिम्प्टम्स’ म्हणतात. मोबाईल जवळ नसतो, त्याची कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसते तेव्हा जाणवणारी लक्षणे अशी - राग, तणाव, नैराश्य, चिडचिड आणि अस्वस्थता.

ह्यातलं एकही लक्षण रविवारी लक्षणीयरीत्या जाणवलं नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. अधूनमधून वाजणारा फोन एकदाही वाजत नव्हता. त्यामुळे क्वचित थोडं अस्वस्थ वाटलं खरं. पण आपलाच मोबाईल बंद आहे, हे पटवून घेतल्यानं ती अस्वस्थता संपली. न राहवून दोघा-तिघांना व्हॉट्सॲप कॉल केले. दोघांनी नंतर बोलू सांगितलं, तर दोघांनी फोनच उचलला नाही. 

‘फोन बंद का?’ असं काळजीनं विचारणारे मेसेजही व्हॉट्सॲपवर दिसले नाहीत. मनाची समजूत घातली - आज रविवार असल्याने सगळे निवांत असतील. फोन बाजूला ठेवून आराम करत असतील. एका मित्राचा रात्री उशिरा मेसेज आला तसा. त्याला मग घरच्या फोनवरून सांगितलं सगळं. गप्पा मारल्या थोडा वेळ; पण सिमकार्ड कसं बंद पडलं वगैरेबद्दल त्यानं काडीचीही उत्सुकता दाखविली नाही. म्हटलं चला - बंद सिमकार्डाचा क्रूस प्रत्येकाला आपापलाच वाहून न्यावा लागतो तर.

फोन बंद असताना जगात उलथापालथ झाली तर काय, अशी शंकाही एकदा चाटून गेली. सुदैवानंच तसं काही झालं नाही. जग आपल्या गतीनं पुढं जात राहिलं.

अखेर सोमवार उजाडला. भीती वाटत होती की, सिमकार्ड बदलायला गेल्यावर भारत संचार निगमवाले काही तरी त्रुटी काढून परत पाठवतील. दोन दिवसांना या म्हणतील. तसं काही झालं नाही. गेल्यावर अर्ध्या तासात कार्ड बदलून मिळालं. दुपारचा झोपेचा रतीब संपल्यावर नवं कार्ड टाकलं. फोन चालू झाला. अठ्ठेचाळीस तासानंतर मी जगाशी पुन्हा जोडलो गेलो.

... पण जगाला त्याची काही खबरबातच नव्हती. फोन चालू होऊन तीन तास लोटले, तरी मला कुणाचाही फोन आला नाही!

एक झालं - सिमकार्ड आणण्याच्या निमित्तानं आज थोडा अधिकच ‘मोबाईल’ झालो. त्या कार्यालयात जाऊन-येऊन तीन हजार पावलं चाललो.

कुणी फोन करो किंवा न करो; फोन चालू आहे, म्हणजे मी जगाशी जोडला गेलेलो आहे, हा माझा (गैर)समज कायम आहे, एवढं नक्की!

......

‘लखपती बनविणारी स्मार्टफोन-मुक्ती’ - 

https://khidaki.blogspot.com/2019/01/SmartPhone.html

--------
#nomopho #mobile #smartphone #no_sim #withdrawal_symptoms #whatsapp #without_mobile

Thursday 3 February 2022

श्रेय नको म्हणताना...


‘एकविसावं शतक’...‘एकविसावं शतक’! कोणे एके काळी म्हणता येईल, एवढ्या पूर्वी हा फार चर्चेतला विषय होता. ते उजाडेल आणि अनेक समस्यांना गडप करील, असं वाटायचं. आमच्या पिढीला (पन्नास ते पासष्ट वयोगट) एकविसाव्या शतकाचं स्वाभाविकच फार अप्रुप होतं. त्याची चर्चा सुरू झाली ती ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि त्या चर्चेनं, ‘एकविसावं शतक’ ह्या शब्दप्रयोगानं खूप स्वप्नं दाखवली. म्हणून आमच्यासह आपला देश ते कधी एकदा येतंय, ह्याची वाट पाहत होता.

बराच काळ, जवळपास दीड दशक गाजावाजा होत राहिलेलं एकविसावं शतक उजाडलं आणि त्याची दोन दशकंही पार पडली. आपल्याला हवं ते नेमंक गाणं ऐकण्यासाठी एखादी कॅसेट ‘फास्ट फॉरवर्ड’ करावी तसा हा वीस-बावीस वर्षांचा काळ गेला, असं आता वाटतं. त्या शब्दप्रयोगाचं गारूड असलेली माणसंही जुनी झाली. उठता-बसता ‘आमच्या वेळी...’ म्हणतील एवढ्या वयाची झाली.

आता असं वाटतं की, एकूणच हे शतक ‘फास्ट फॉरवर्ड’ आहे. किंवा ‘टू मिनट’सारखं इन्स्टंट, झटपट आहे. त्यात गेल्या साधारण दहा वर्षांपासून ‘फॉरवर्ड’ हा फारच महत्त्वाचा शब्द बनला आहे. व्हॉट्सॲपनं आपल्या आयुष्याचा ताबा घेतल्यापासून. (किंवा आपण त्याला ताबा घेऊ दिल्यापासून, असं म्हणू या हवं तर.) ह्या ‘फॉरवर्ड’चा आचार-विचारातील पुरोगामीपणाशी फारसा संबंध नाही. त्याचं नातं आहे पुढे पाठविण्याशी. रोज हजारो शब्दांचा मजकूर, छायाचित्रं, ध्वनिचित्रफिती पुढाळल्या जातात. आल्या तशा पुढे ढकलल्या जातात. उत्साहाने, ईर्ष्येने. त्यामागचे इरादे नेक असतात नि फेकही असतात.

व्हॉट्सॲपच्या थोडंसंच आधी फेसबुकनं चमत्कार घडवला होता. त्या माध्यमामुळं अनेकांना व्यक्त होण्याची संधी मिळाली. नवे लेखक उजेडात आले. वेगळ्या पद्धतीचं लिहू लागले. स्मार्ट फोनमुळं फेसबुक-व्हॉट्सॲप अशी युती घडली. त्यातून ‘शेअरिगं’-‘फॉरवर्डिंग’ चालू झालं. कुणी तरी लिहिलेलं दुसराच कुणी तरी तिसऱ्याच्या नावानं पुढं पाठवू लागला. ‘माझी पोस्ट ढापली’, ‘माझी कविता चोरली’ अशी ओरड होऊ लागली. हेही वाङ्मयचौर्यच की. काही वेळा ही ढापाढापी स्वार्थासाठीच असते असंही नाही. काही वेळा त्यात ‘शहाणे करूनि सोडावे सकल जन’ असा अविर्भावही असतो.

कृष्णाजी नारायण आठल्ये ह्यांची कविता आहे. ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे...’ असा हितोपदेश करणारी ही कविता. ‘ही वीस कडवी म्हणजे वीस रत्नं आहेत,’ अशी मल्लिनाथी करीत ती गेल्या काही वर्षांपासून सर्रास समर्थ रामदासांच्या नावे खपवली जाताना आढळते. ‘पाचशे रुपयाची नोट’ असा उल्लेख असलेली कविता बा. भ. बोरकरांची असं छातीठोकपणे सांगितलं गेलं. एका ज्येष्ठ व उत्तम वाचक असलेल्या डॉक्टरांकडून ही कविता मला आली, तेव्हा बराच शोध घेतला. बोरकर कविता लिहीत होते, तेव्हा पाचशे रुपयाची नोटच मुळी नव्हती. मग त्यांच्या कवितांचा अभ्यास असलेल्या काहींनी निर्वाळा दिला की, ही बोरकरांची कविता नव्हेच. अगदी अलीकडचंच उदाहरण म्हणजे सुभाष अवचटांचं नोव्हेंबरमधलं लेखन डॉ. अनिल अवचट ह्यांचं आहे, असं म्हणत 'य' वेळा फिरत राहिलं.

हे झालं मोठ्या माणसांचं. त्यात असं मानता येईल की, नेमका कवी वा लेखक माहीत नसल्याने आणि शैली थोडी-फार ओळखीची वाटल्यानं श्रेय देण्यात चुका होतात. पण सर्वसामान्य माणसांचं लेखन अगदी सहजपणे ढापलं जातं. जणू आपणच ते लिहिलं, असं भासवलं जातं. फेसबुकवरचा एक किस्सा आठवतो. सात-आठ वर्षांपूर्वी एकाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारली आणि थोड्या वेळात पाहतो, तर मी लिहिलेली टिपणं त्यानं सरळ स्वतःची म्हणून टाकलेली! मध्यंतरी तर खवय्यांच्या एका गटात पाककृती चोरून तशाच दुसऱ्या गटात आपल्या नावावर खपविल्याची तक्रार झाली.

‘या लेखनावर माझा कॉपीराईट आहे’, ‘माझी पोस्ट माझ्या नावासकट शेअर करण्यास हरकत नाही’, अशा वैधानिक इशारांसह लोक लिहू लागले. स्वामित्वहक्क दाखविणाऱ्या © चिन्हाचा सर्वाधिक वापर ह्याच दशकामध्ये झाला असावा. तरीही मजकुराची ढापाढापी थांबलेली नाही. 

हे सगळं लिहिण्याचं कारण एकदम छोटं आहे. ‘भाषा आणि जीवन’चा उन्हाळा-पावसाळा २०२०चा अंक कसा कोण जाणे, ह्या आठवड्यात माझ्याकडे आला. त्यात नेहा सिंह ह्यांच्या हिंदी कथेचा अनुवाद ‘असं समजा की’ ह्या  शीर्षकानं प्रसिद्ध झाला आहे. तो केला आहे नांदेडच्या पृथ्वीराज तौर ह्यांनी.

जेमतेम दीड-दोनशे शब्दांच्या ह्या कथेनंतर अनुवादकाने दिलेली टीप फारच वेगळी आणि बेलगाम ‘फॉरवर्ड’च्या आजच्या जमान्यात महत्त्वाची आहे. पृथ्वीराज तौर लिहितात - ‘(ह्या कथेच्या) मराठी अनुवादाचे हक्क मुक्त असून, हा अनुवाद कुणालाही, कशासाठीही, अनुवादकाचे नाव वगळूनही वापरता येईल. हा अनुवाद कुणी स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केला तरी प्रस्तुत अनुवादक त्यावर कधीही आक्षेप घेणार नाही. मराठी मुलांपर्यंत जगभरातील उत्तमोत्तम गोष्टी पोहोचाव्यात, मुलांना श्रेष्ठ जागतिक बालसाहित्याचा परिचय व्हावा, एवढीच या अनुवादामागील भूमिका आहे.’

श्रेय लाटण्याच्या, दुसऱ्याच्या लेखनावर बिनदिक्कत स्वनाममुद्रा उमटविण्याच्या आजच्या जमान्यात कुणी एक श्रेयापासून दूर जाऊ पाहतो. आपण केलेला अनुवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, एवढंच त्याचं म्हणणं.

ह्यावर अधिक काय बोलावे!

.............

#एकविसावेशतक #फास्टफॉरवर्ड #अनुवाद #भाषाआणिजीवन #बालसाहित्य #ढापाढापी #फॉरवर्डिंग #सामाजिकमाध्यमे #WhatsApp #facebook #copyright


पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...