‘नोकिया’चा सुबक-ठेंगणा हँडसेट आणि एअर-टेलचं कार्ड. मला बापुड्याला तो चालू कसा करायचा नि बंद कसा करायचा हेही माहीत नव्हतं. एका चटपटीत (माझ्याहून) तरुण सहकाऱ्यानं ते शिकवलं. कार्यालयानं दोन-तीन महिन्यांतच आधीची एअर-टेलची ‘आयडिया’ बाद ठरवून नव्या सेवेची ‘कल्पना’ आपलीशी केली. सांगायचा मुद्दा असा की, कार्यालयामुळं माझ्या हाती मोबाईल आला. तसा मिळाला नसता, तर मी तो कधी घेतला असता, हे सांगता येत नाही. मित्रांनी आग्रह केला असता आणि घरचे मागे लागले असते, तेव्हा कुठं मी त्याला तयार झालो असतो. अगदीच नाइलाज झाला म्हणून...
कार्यालयीन कामाच्या सोयीसाठी दिलेला हा सेलफोन फारच काळजीपूर्वक वापरत होतो. आलेले फोन स्वीकारण्यापुरताच त्याचा वापर. अगदी अत्यावश्यक असेल, तरच त्यावरून संपर्क साधायचा. पहिली तीन वर्षं तर मी त्यावरून घरीही संपर्क साधत नसे. खासगी कामासाठी तर वापर नाहीच. एस. एम. एस.साठी मात्र भरपूर. खूप वेळा असं होई की, फोनकॉलपेक्षा एस. एम. एस.चं बिल (थोडंसं) जास्त असे. तीन-चार दिवसांपेक्षा जास्त रजेवर जायचं असलं की, मी तो बंद करून संपादकांच्या ताब्यात देऊन टाकायचो. एखादी फार मोलाची वस्तू जपून ठेवायला द्यावी अगदी तसं. ते हसायचे. सहकारी विनायक लिमयेही हसायचा. फोन राहू दे की, असं ते म्हणायचे. पण मला ते उगीचंच बंधन वाटायचं.
... हे सगळं लिहायचं कारण म्हणजे माझे दोन दिवस, तब्बल ४८ - अ ठ्ठे चा ळी स - तास मोबाईलविना गेले. परवा दिवशी दुपारी जेवण करून ताणून दिली. उशाजवळ मोबाईल होता, गाणी ऐकवत. एखादं गाणं मध्येच ऐकू यायचं. अर्धजागृत अवस्थेतलं मन त्याची नोंद घ्यायचं. असं तासभर चाललं. त्यानंतर कधी तरी मोबाईलच बॅटरी संपून गेली.
आताही असंच झालं असेल म्हणून पुन्हा त्याला सांगितलं - ‘नो सिम’ दिसतंय रे. मागच्या प्रयोगाची पुनरावृत्ती झाली. पण ह्या वेळी त्या प्रयोगांना मोबाईलनं दाद दिली नाही. बिघाडाचा बहुतेक नवा, प्रगत व्हेरिएंट असावा. आधीच्या उपायांना भिक न घालणारा.
मग शंका आली. फोनच बिघडलाय की काय! धस्स झालं. जेमतेम वर्षभराचं वय त्या फोनचं. एवढ्यात त्याला ऑक्सिजन कमी पडू लागला? व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली पण?
मुलानं दिलासा दिला. असा धीर सोडू नका म्हणाला.
सिमकार्डाची चाचणी करायची ठरवलं. मुलाच्या फोनमध्ये कार्ड टाकलं. तिथं तीच तऱ्हा. त्याचं कार्ड माझ्या मोबाईलमध्ये टाकलं. ते चालू.
म्हणजे बिघाड कार्डमध्ये आहे, मोबाईलमध्ये नाही. धस्सची जागा हुश्शनं घेतली. सिमकार्ड बदलणं हाच उपाय. तुलनेनं कमी खर्च.
पण ते लगेच शक्य नव्हतं. शनिवारची दुपार होती. भारत संचार निगमचं कार्यालय बंद होण्याची वेळ जवळजवळ आलीच होती. रविवारची सुटी. म्हणजे नवीन कार्ड थेट सोमवारी मिळणार.
मोबाईल दोन दिवस बंद. पण ते अर्धसत्य होतं. कार्ड नव्हतं तरी व्हॉट्सॲप चालूच होतं. घरच्या ब्रॉडबँडचा झरा सदाचाच झुळझुळता. म्हणजे फार काही अडणार नव्हतं. अगदी तातडीनं कुणाशी संपर्क साधायचा तर ‘व्हॉट्सॲप कॉल’ करता येणार होता. त्या विद्यापीठावरून ज्ञानाची देवाणघेवाण चालूच होती. शिवाय घरबशा फोन (लँडलाईन) होताच की शेवटी.
तसं काहीच झालं नाही. कुणाचाही फोन आला नाही. मोबाईलवाचून माझं कसं चालेल, असं एकालाही विचारावंसं वाटलं नाही. कुणालाही सांत्वन करावं वाटलं नाही. म्हटलं चला, आपल्या नशिबीचं दुःख आपणच भोगलं पाहिजे.
फायबर कनेक्शनच्या कृपेनं घरात काही अडचण नव्हतीच. प्रश्न बाहेर पडल्यावरचा होता. म्हटलं चालायला गेल्यावर डाटा वापरू. होऊ दे दोन-तीन तासांत खर्च. फोन करायचा असेल, ते व्हॉट्सॲपवर बोलतील, असं वाटलं. तो विचार वेडगळपणाचा होता, हे घराबाहेर पडल्यावर लक्षात आलं. सिमकार्ड चालूच नसताना डाटा कुठून येणार होता! आडच नसताना पोहोरा कुठं टाकणार?
तास-दीड तास पायी चालताना दोन-तीन वेळा तरी फोन पाहिला जातो. त्याचं मुख्य कारण म्हणजे किती पावलं झालीत आणि किती राहिलीत, हा हिशेब करायचा असतो. रोजचं दहा हजार पावलांचं लक्ष्य आहे. (दि. बा. मोकाशी ह्यांचं ‘अठरा लक्ष पावलं’ असं पुस्तक आहे. तेवढं लक्ष्य सहा महिन्यांमध्ये पुरं होत असेल बुवा.) क्वचित कधी एकटा चालत असेन, तर डाटा चालू करून ‘विद्यापीठा’त काही नवीन (फॉरवर्डेड) परिपत्रकं पडलीत का, तेवढं पाहतो. कुणाचा फोन आलाच तर बोलतो.
फिरताना गप्पा मारायला जोडीदार असल्यानं फोन चालू नसल्याचं काही जाणवलं नाही. रात्रीही सहसा कुणी फोन करत नाही. बेरात्री झोपून बेसकाळी कधी तरी उठल्यावर पहिली झडप फोनवर मारायची, असला अगोचर प्रकार आपल्याकडून होत नाही. बऱ्याच वेळा जाग येते तीच मुळी फोन वाजत असल्यामुळे. रविवारी सकाळी ती शक्यता नसल्याने अंमळ उशिराच उठलो.
मोबाईल-विरह अजून दीड दिवस सहन करावा लागणार, हे माहीत होतंच. तेवढ्यात चेतन भगत ह्यांचा लेख वाचण्यात आला. ‘तुम्ही तुमचा स्क्रीन-टाईम कमी करताय ना?’ असं विचारणारा. लेखकमहोदय रोजचे पाच तास मोबाईल पाहण्यात घालवतात. तशी कबुली त्यांनीच दिली. मग आठवलं की, आपल्यालाही आठवड्याला अहवाल येतो. कधी वेळ वाढल्याचं दाखवणारी, तर क्वचित कधी आधीच्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचं सांगणारी. त्याची फार काळजी नाही करत. कारण त्यातला बराचसा वेळ मोबाईल इंटरनेट रेडिओवरची गाणीच ऐकवत असतो.
चेतन भगत ह्यांच्या लेखावरून एक गोष्ट आठवली - एका अमेरिकी कंपनीनं तीन वर्षांपूर्वी आयोजित केलेली स्पर्धा. मोठ्या बक्षिसाची. एक लाख डॉलरचं बक्षीस. स्पर्धा होती वर्षभर मोबाईलपासून लांब राहण्याची. त्यात भाग घेण्याची तयारी किमान दहा हजार लोकांनी दाखवली होती. किती जण स्पर्धेत उतरले, किती टिकले आणि कोण जिंकलं, हे काही नंतर पाहिलं नाही. फक्त त्यावर लेख लिहिला होता. अशा स्पर्धेत भाग घेऊन स्वतःला तपासावं असं तेव्हा वाटलं होतं. पण ‘व्हिटॅमिन वॉटर’ची ही ‘व्हिटॅमिन वॉटर स्क्रोल फ्री फॉर ए यीअर कॉन्टेस्ट’ फक्त अमेरिकी नागरिकांसाठीच होती.
मोबाईलला आधुनिक जगातली (स्मार्ट) सोय म्हटलं जातं खरं. पण वास्तव वेगळंच आहे. खूप जणांना आता त्याची लत लागल्यासारखी झाली आहे. व्यसन. न सुटणारं. सोडण्याचा प्रयत्न केला की, अजून घट्ट पकडून ठेवणारं.
सिमकार्ड बिघडल्याच्या निमित्तानं आपलंही व्यसन किती हाताबाहेर गेलंय किंवा अजून आटोक्यात आहे, ह्याचा अंदाज येईल म्हटलं. तसं तर दर अर्ध्या-पाऊण तासानं व्हॉट्सॲप उघडून पाहायचा चाळा लागलेलाच आहे. कुणाचा फोन आला नाही, तरी आपण कुणाला तरी लावतो.
कोणतंही व्यसन सोडताना मधला काळ फार खडतर जातो म्हणे. त्याला ‘विड्रॉअल सिम्प्टम्स’ म्हणतात. मोबाईल जवळ नसतो, त्याची कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसते तेव्हा जाणवणारी लक्षणे अशी - राग, तणाव, नैराश्य, चिडचिड आणि अस्वस्थता.
ह्यातलं एकही लक्षण रविवारी लक्षणीयरीत्या जाणवलं नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. अधूनमधून वाजणारा फोन एकदाही वाजत नव्हता. त्यामुळे क्वचित थोडं अस्वस्थ वाटलं खरं. पण आपलाच मोबाईल बंद आहे, हे पटवून घेतल्यानं ती अस्वस्थता संपली. न राहवून दोघा-तिघांना व्हॉट्सॲप कॉल केले. दोघांनी नंतर बोलू सांगितलं, तर दोघांनी फोनच उचलला नाही.
‘फोन बंद का?’ असं काळजीनं विचारणारे मेसेजही व्हॉट्सॲपवर दिसले नाहीत. मनाची समजूत घातली - आज रविवार असल्याने सगळे निवांत असतील. फोन बाजूला ठेवून आराम करत असतील. एका मित्राचा रात्री उशिरा मेसेज आला तसा. त्याला मग घरच्या फोनवरून सांगितलं सगळं. गप्पा मारल्या थोडा वेळ; पण सिमकार्ड कसं बंद पडलं वगैरेबद्दल त्यानं काडीचीही उत्सुकता दाखविली नाही. म्हटलं चला - बंद सिमकार्डाचा क्रूस प्रत्येकाला आपापलाच वाहून न्यावा लागतो तर.
फोन बंद असताना जगात उलथापालथ झाली तर काय, अशी शंकाही एकदा चाटून गेली. सुदैवानंच तसं काही झालं नाही. जग आपल्या गतीनं पुढं जात राहिलं.
अखेर सोमवार उजाडला. भीती वाटत होती की, सिमकार्ड बदलायला गेल्यावर भारत संचार निगमवाले काही तरी त्रुटी काढून परत पाठवतील. दोन दिवसांना या म्हणतील. तसं काही झालं नाही. गेल्यावर अर्ध्या तासात कार्ड बदलून मिळालं. दुपारचा झोपेचा रतीब संपल्यावर नवं कार्ड टाकलं. फोन चालू झाला. अठ्ठेचाळीस तासानंतर मी जगाशी पुन्हा जोडलो गेलो.
... पण जगाला त्याची काही खबरबातच नव्हती. फोन चालू होऊन तीन तास लोटले, तरी मला कुणाचाही फोन आला नाही!
एक झालं - सिमकार्ड आणण्याच्या निमित्तानं आज थोडा अधिकच ‘मोबाईल’ झालो. त्या कार्यालयात जाऊन-येऊन तीन हजार पावलं चाललो.
कुणी फोन करो किंवा न करो; फोन चालू आहे, म्हणजे मी जगाशी जोडला गेलेलो आहे, हा माझा (गैर)समज कायम आहे, एवढं नक्की!
......
‘लखपती बनविणारी स्मार्टफोन-मुक्ती’ -
https://khidaki.blogspot.com/2019/01/SmartPhone.html
इति मोबाईल आख्यान सुफळ संपन्न!!
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवामस्त जमलाय...
उत्तर द्याहटवाकिती विचार, कल्पना चमकून गेल्या तेवढ्या वेळात.. प्रत्येकाची अवस्था अशीच होत असणार नक्कीच.
- विनय गुणे, संगमनेर
व्वा व्वा... खूपच मस्त 👌
उत्तर द्याहटवाअशा जगास्तव काय कु़ढावे
मोही कुणाच्या का गुंतावे...
हेच खरं, शाश्वत सत्य आहे की!! 😊
तुझा विश्वास बसणार नाही, पण माझ्या ओळखीचा एक मोठा पत्रकार व्यक्तिगत कामासाठी सोशल मीडिया अजिबात म्हणजे वापरत नाही...!
- मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली
👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा४८ तास मोबाईल बंद असल्याने आपल्या मनात काय-काय विचार येऊ शकतात, हे या निमित्ताने जुन्या-नव्या सगळ्या आठवणी मनमोकळेपणाने लिहिल्या. आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे मोबाईल.
- जितेंद्र जैन, औरंगाबाद
खुमासदार लेख 👌
उत्तर द्याहटवा- अनिल कोकीळ, नाशिक
तुझा लेख वाचल्यावर मला स्वतःला मोबाईलचे किती ॲडिक्शन जडले आहे, हे ठळकपणे जाणवले. नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर आणि मार्मिक लेख.
उत्तर द्याहटवा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
- विकास पटवर्धन, नगर
खूपच सुंदर!
उत्तर द्याहटवा- शैलेश बोपर्डीकर, पुणे
व्वा! छान! सीमकार्ड बंद...
उत्तर द्याहटवाओघवतं लिखाण भराभर अधाशीपणे
वाचत गेलो. खुप आवडलं.
जगाच्या लेखी आपलं महत्त्व किती, हे समजलं.
- पी. बी. देशमुख, दहिसर, मुंबई
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेताना येणाऱ्या अडचणी व मानसिक उलघाल खुसखुशीत पद्धतीने मांडली आहे.
उत्तर द्याहटवाअनेक प्रसंगांतून जाताना जग आपल्या वाचून कधीच थांबत नाही ह्याचा साक्षात्कार होतो.
'मोबाईल दुरुस्त झाला आहे' असे स्टेट्स टाकले असते तर एखादा फोन नक्कीच आला असता 😀
- विनायक कुलकर्णी, पुणे
😄😄😄😄
उत्तर द्याहटवाएकदम बेश्ट!
- उमेश आठलेकर, नारायणगाव
मजेशीर लेख आहे . बरेच दिवसांनी आगमन झालं आहे.
उत्तर द्याहटवा'मोबाईलविना...' हा 'खिडकी'तील विषय बरंच काही सांगून गेला. हलका-फुलका, पण तेवढाच महत्त्वाचा विषय खूप भावला. ताजातवाना, रसरशीत वाटला.
उत्तर द्याहटवाप्रथम मोबाईल हाती आला, तेव्हा तीन वर्षं तुम्ही जी वर्णन केली, ती अवस्था अनुभवली. आजही तशीच आहे. विनायक लिमये ह्यांचा उल्लेख आनंद देऊन गेला. एकूणच छान...
- प्रताप देशपांडे, नगर
खरंच सतीश सर, आपण मोबाईलच्या इतके आधीन झालोत की एक क्षणही करमत नाही त्याशिवाय. जनसंपर्काचे एकमेव साधन. करमणुकीचे महत्त्वाचे साहित्य यात ओतप्रोत भरलेलं... ते नसले तर helpless व्हायला होते. मागील महिन्यात झुक्याने फेसबुक बंद केले ना माझे. बापरे! काय विचारता... इतके असह्य झाले होते मी. महद्प्रयत्नांनी फेसबुक पुन्हा सुरु झाले. दुसरे फेबु अकाऊंट उघडले, पण तिथेही मन रमेना. शेवटी पहिले ते पहिलेच असते. पाच हजार दिग्गज मित्रसंच अचानक गायब झाला असता. शेवटी एकदाचे फेसबुक सुरू झाले आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. खरंच पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...
उत्तर द्याहटवा- प्रांजली जोशी लाळे, मनमाड
आपला एक अवयव असल्यागत हल्ली मोबाईल असतो. त्यामुळे आपण त्याच्या अधीन होत चाललोय. पण तो न वापरताही जगता यायला हवे. तुमच्या लेखामुळे हे मनात आले.
उत्तर द्याहटवा- सीमा मालाणी, संगमनेर
ईश्वरच अस्तित्व हा चिंतनाचा विषय. ईश्वराचे अस्तित्व आहे का? प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न.
उत्तर द्याहटवामोबाईल लीलामृत या आपल्या विस्तृत लेखाच्या मंथनातून मोबाईल हाच कलियुगातील आधुनिक ईश्वर, अशी खात्री पटली.
धन्यवाद..!
श्रीराम वांढरे.
भिंगार, अहमदनगर.