Thursday 29 February 2024

क्रीडा पत्रकारितेतील ‘आजोबा’


(छायाचित्र सौजन्य : खेलो इंडिया)

मराठी क्रीडा पत्रकारितेतील एक महत्त्वाचं आणि अग्रगण्य नाव
म्हणजे हेमंत जोगदेव. दीर्घ काळापासून मैदानावर रमलेल्या
जोगदेव ह्यांचं गुरुवारी पहाटे निधन झालं. ऑलिम्पिकला जाणारे
ते पहिले मराठी पत्रकार. खो-खो, कबड्डी, कुस्ती ह्या देशी खेळांवर
त्यांनी भरभरून लिहिलं. त्यांच्या काही आठवणी...
------------------
‘संपादकऽऽऽ’!
अधिकृतरीत्या साधा उपसंपादक नसतानाही अशी थेट ‘बढती’ देत, बहुमानाने संबोधणारे आणि बोलावणारे दोघे होते. ‘क्रीडांगण’मध्ये काम करीत असतानाची ही गोष्ट आहे. पहिले होते, ‘प्रेस्टिज’चे सर्वेसर्वा सर्जेराव घोरपडे. दुसरे क्रीडा पत्रकार, समीक्षक श्री. हेमंत जोगदेव. त्या संबोधनात कोठेही गंमत, चेष्टा नव्हती. असलंच तर किंचित कौतुक होतं.

हेमंत जोगदेव नाव ऐकलेलं होतं. ‘केसरी’मध्ये त्यांनी लिहिलेलं वाचलं होतं. ‘क्रीडांगण’मध्ये लिहिण्यासाठी त्यांना पहिल्यांदा पत्र लिहिलं ते श्री. घोरपडे ह्यांच्या सांगण्यावरून. पत्रकारनगरमध्ये राहायचे ते. साधं पोस्टकार्ड तेव्हा दुसऱ्या दिवशी मिळायचं.

असं पत्र मिळालं की, तिसऱ्या दिवशी श्री. जोगदेव लेख घेऊन पंताच्या गोटातील ‘क्रीडांगण’च्या कार्यालयात येत. लेख हातात देत आणि मग श्री. घोरपडे ह्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या केबिनमध्ये जात. तेथून परतताना ‘येतो हो संपादक...’ असा निरोप घेत.

पुण्याच्या क्रीडा जगतात तेव्हा दोन महत्त्वाच्या शर्यती होत्या - मुंबई-पुणे सायकल शर्यत आणि नेहरू स्टेडियमवर होणारी मोटोक्रॉस. प्रॉमिस सायकल शर्यत रविवारी होई आणि तिच्या बातम्या सोमवारी पुण्यातील दैनिकांच्या पहिल्या पानावर झळकत. क्रिकेटशिवाय (आणि टेनिसही) अन्य खेळांनाही पहिल्या पानावर जागा मिळायचे दिवस होते ते. मोटोक्रॉस नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यावरून दोन आठवडे वादही रंगत.

सायकल शर्यत, मोटोक्रॉस
सायकल आणि मोटरसायकल ह्या दोन्ही शर्यतींसाठी हक्काचे लेखक होते हेमंत जोगदेव. एकदाच कधी तरी त्यांना अतिशय घाईघाईने लेख लिहायला सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी किंचित कुरकुर केली होती. दुसऱ्या वेळी आठवड्याचा वेळ दिल्यावर लेख हातात देताना म्हणाले होते, ‘हे कसं मस्त झालं. असा वेळ दिला की मनासारखं लिहिता येतं!’ आणि मग प्रसन्न हसले.

जोगदेवांचे लेख मी ‘संपादित’ करायचो. 😇 ते ‘केसरी’च्या व्याकरणानुसार लिहायचे - म्हणजे ‘असेही ते म्हणाले’ असं असेल तर ते ‘असेहि’ लिहीत. क्रीडा-संस्कृती शब्दामधील शेवटची ‘ती’ ऱ्हस्व असे. आश्चर्य वाटायचं, एवढा अनुभवी पत्रकार असं का लिहितो? त्या प्रश्नाचं उत्तर ‘केसरी’मध्ये काम करू लागल्यावर मिळालं.

ढिंगच्याक शर्ट
श्री. जोगदेव ह्यांना पहिल्यांदा तेव्हाच पाहिलं होतं. बुटकेच म्हणता येतील अशी उंची. पँटमध्ये खोचलेला ढिंगच्याक शर्ट. मोठमोठ्या चौकड्यांचे, कॉट्सवूल प्रकारचे आणि भडक रंगांचे शर्ट त्यांच्या अंगावर नेहमी दिसत. नंतर संपादक कुमार केतकर ह्यांना पाहिल्यावर जोगदेवांचीच आठवण झाली. आधुनिक पद्धतीचे, प्रसंगी चित्रविचित्र वाटणाऱ्या रंगाचे-प्रकाराचे शर्ट हे दोघंही घालत. खरं सांगायचं म्हणजे मिरवत! त्यांना ते शोभूनही दिसत.

जोगदेवांच्या चष्म्याला लेस लावलेली असायची. लिहीत नसतील तेव्हा तो कपाळावर तरी असायचा किंवा गळ्यात लोंबत असायचा. 

त्याच काळात पुण्यातील खो-खोपटू हेमंत जोगदेव प्रसिद्ध होते. लिहिणारे आणि खेळणारे जोगदेव एकच, असा समज होता. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा (लिहिणारे) जोगदेव साठीच्या घरात होते. हा माणूस आता आतापर्यंत खो-खोसारखा खेळ खेळायचा, ही चकित करणारीच गोष्ट होती. नंतर कळलं की, ‘हे’ जोगदेव ‘ते’ नव्हेत!

महाराष्ट्र केसरी स्पर्धा
‘क्रीडांगण’च्या मैदानातली खेळी वर्ष-सव्वा वर्षाची. नंतर ‘केसरी’च्या नगर आवृत्तीमध्ये रुजू झालो. कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन - महाराष्ट्र केसरी स्पर्धा नगरमध्ये होती. गदेची अंतिम कुस्ती पहिल्यांदाच गादीवर (मॅट) होणार होती. माती की गादी, हा वाद हिरिरीने चालू होता. नियमांनुसार होणारी कुस्ती पाहण्याची पहिलीच वेळ. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यावर लिहायचं होतं.

त्याच वेळी प्रवरानगरमध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धा होती. तिचं वृत्तांकन करून जोगदेव गदेच्या कुस्तीसाठी (म्हणजे अंतिम लढतीसाठी) नगरमध्ये येणार होते. स्पर्धेच्या आधी त्यांनी नगर कार्यालयात संपर्क साधला. मी ‘केसरी’मध्ये आहे आणि स्पर्धेच्या बातम्या देणार आहे, हे समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, ‘अरे! तो आहे होय. मग काही प्रश्नच नाही...’ गंमतीची गोष्ट म्हणजे तोवर त्यांनी माझी एकही बातमी वाचलेली नव्हती.

शेवटच्या दिवशी जोगदेव आले. मैदानावर आमची भेट झाली. साडेतीन दिवस भरपूर बातम्या दिल्या होत्या. काही प्राथमिक कुस्त्यांच्या निकालाचा बातम्यांमध्ये ‘अमूक वि. वि. तमूक’ (म्हणजे विजयी विरुद्ध) असा उल्लेख तिन्ही दिवस केला. जोगदेवांनी सांगितलं, ‘हे असं काही द्यायचं नाही.’

प्रतिस्पर्ध्यांहून एक पाऊल पुढे
मॅटवरची पहिली अंतिम लढत झाली. वाडिया पार्कजवळचा जवाहर आखाडा फुलून गेला होता. माळशिरसच्या रावसाहेब मगर ह्यानं बाजी मारत ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पटकावली. जोगदेवांना घेऊन कार्यालयात गेलो. तिथं बातमी लिहायला सुरुवात केल्यावर म्हणाले, ‘‘आपल्याला तेवढी मुलाखत मिळाली असती तर बरं झालं असतं...’’ अंतिम लढतीतील दोन्ही मल्लांच्या मुलाखती मी सकाळीच घेतल्या होत्या. तसं सांगितल्यावर ते भलतेच खूश झाले! प्रतिस्पर्धी दैनिकांच्या आम्ही एक पाऊल पुढे होतो!!

त्या वेळी भारतीय कुस्ती संघटना ऑलिम्पिकसाठी मल्ल घडविण्याचे स्वप्न पाहत होती. त्यासाठी दिल्लीत खास केंद्र सुरू करण्यात आलेले. काही रशियाई प्रशिक्षकही स्पर्धा पाहण्यासाठी खास आले होते. ते गुणी पेहलवान हेरणार होते. रावसाहेब मगरची दिल्लीतील प्रशिक्षणासाठी निवड झाली.

सहाच महिन्यांनंतर, नगरमध्ये आयोजित एक मेच्या आखाड्यात रावसाहेब मगर दिसला. तो दिल्लीहून परत का आला? त्याची मुलाखत घेतली. तीच नेहमीची कारणं - जेवायला चांगलं मिळत नाही, पोट भरत नाही, दिल्लीत करमत नाही...

सणसणीत मुलाखत मिळाली. पण ती ‘केसरी’च्या फक्त नगर आवृत्तीत प्रसिद्ध झाली. माध्यमांना असलेला शाप! कम्युनिकेशन गॅप!! पुढे दोन महिन्यांनंतर हे सांगितल्यावर जोगदेव फार हळहळले.

कोणाचं तरी अनुकरण करीत ‘ॲथलेटिक्स’साठी ‘मैदानी स्पर्धा’ असा शब्दप्रयोग करीत होतो. जोगदेवांनी एकदा बजावलं, ‘‘ॲथलेटिक्स’ असंच लिहायचं. क्रिकेट, फुटबॉल, खो-खो हे काय मैदानी खेळ नाहीत की काय!’

मराठी क्रीडा पत्रकार संघटना
साधारण तीन दशकांपूर्वी मराठी क्रीडा पत्रकार संघटनेची स्थापना झाली. अखिल भारतीय मराठी क्रीडा पत्रकार संघटना. तिच्या स्थापनेनिमित्त पुण्यात तीन दिवसांचं अधिवेशन भरलं. बालेवाडी संकुलाचं मोठ्या घाईने चालू असलेलं काम आम्हा सगळ्यांना पाहायला मिळालं. संघटनेच्या स्थापनेसाठी धडपडणारे जोगदेव कार्यकारिणीत कोठे नव्हते. ‘केसरी’चा प्रतिनिधी म्हणून त्यांनी माझं नाव पुढे केलं.

संघटनेच्या कार्यकारिणीच्या तीन-चार बैठकांना हजर राहिलो. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, असं वाटत होतं. एक मोठं पत्र श्री. जोगदेव ह्यांना लिहिलं. त्याची एक प्रत वि. वि. करमरकर ह्यांना आवर्जून पाठवायला त्यांनी सांगितलं. करमरकर त्या संघटनेत सहभागी नव्हते. ‘महाराष्ट्र टाइम्स’चं प्रतिनिधित्व संजय परब करीत होते. तेही कधी कार्यकारिणीच्या बैठकीला आले नाहीत.

नगरमध्ये त्या काळात क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धा जोरात होती. नियमित होणारी एकमेव स्पर्धा. तिला फार वलय होतं. त्या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी एका वर्षी श्री. जोगदेव ह्यांना बोलावलं. ते आदल्या दिवशीच मुक्कामी आले. एवढ्या वेळा परदेशी, तीन-चार ऑलिम्पिकना जाऊन आले असल्यामुळे त्यांना मांसाहार चालत असेल, असा सगळ्यांचाच समज.

जोगदेवांनी सांगितलं, ‘‘मी शाकाहारी.’’

मला राहावलं नाही. हळूच त्यांना विचारलं, ‘‘मग परदेशांमध्ये कसं मिळतं तुम्हाला जेवण?’’

पाठीवर थाप मारत नि मिश्कील हसत ते म्हणाले, ‘‘तिथं काय खातो ते इथं सांगायचं नाही आणि खायचंही नाही!’’

‘केसरी’तील ‘आजोबा’
जोगदेवांच्या पोतडीत अनेक किस्से होते. मी अधूनमधून प्रतिनियुक्तीवर पुण्यात असायचो. तेव्हा हे किस्से ऐकायला मिळायचे. ‘संपादक असावा तर (चंद्रकांत) घोरपड्यांसारखा!’, हे त्यांचं लाडकं मत होतं. पुढे समजलं की, घोरपडे, ते आणि प्रमोद जोग, अशी ‘केसरी’तील खास गँग होती. पुणे कार्यालयात जोगदेव ‘आजोबा’ म्हणूनच ओळखले जायचे. खेळकर, खट्याळ आजोबा होते ते  - चेष्टामस्करीत रमणारे, ‘आमच्या काळी’चे किस्से सांगणारे, दोन-चार जणांना घेऊन ‘प्रभा’मध्ये वडा खायला जाणारे.

पुण्याच्या राजकारणात त्या वेळी टिळक आणि गाडगीळ असे गट काँग्रेसमध्ये होते. जोगदेव स्वाभाविकपणे टिळक गटात. विठ्ठलराव गाडगीळ त्या वेळी अखिल भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांचे एक-दोन किस्से जोगदेव रंगवून सांगत.

कार्यालयातील फोन किती गांभीर्याने घेतले जातात, ह्याचा जोगदेवांनी एक किस्सा भन्नाटच होता. त्यांच्याच शब्दांत - ‘अरे, मी नॅशनल गेम्ससाठी केरळला गेलो होतो. फोन मिळायची मारामार. काय सांगू, त्या दिवशी तासाभराने फोन लागला. आता झटपट बातमी द्यावी म्हणून म्हणालो, ‘जोगदेव...’ काय गंमत रे... मी बोलतोय म्हणायच्या आधीच पलीकडून उत्तर आलं, ‘ते केरळला गेलेत’ आणि फोन ठेवून दिला खाडकन्!’

असंच एकदा पुणे कार्यालयात असताना दुपारच्या वेळी जोगदेवांकडे कोणी आलं होतं. ते (कबड्डी महर्षी) बुवा साळवी असावेत, असं वाटलं. ते बाहेर गेले आणि जोगदेवांना विचारलं की, ते बुवा होते का? मला ओळख करून घ्यायची होती. त्यांनी लगेच जिन्यात जाऊन बुवांना हाक मारली आणि माझी ओळख करून दिली. नगर जिल्हा कबड्डी संघटनेची धुरा बदलत असल्याची बातमी मला तिथेच बुवा साळवींकडून मिळाली.

क्रीडा आणि युवक कल्याण संचालनालयाचे संचालक कॅप्टन देशपांडे होते. एका अभ्यासासाठी ते तज्ज्ञ परीक्षक म्हणून हवे होते. जोगदेवांना सहज म्हटलं, त्यांच्या भेटीची वेळ मिळवून द्या ना हो. त्या वेळी मी ‘केसरी’त नसतानाही जोगदेवांनी लगेच त्यांच्यासाठी पत्र लिहून दिलं. नव्या, तरुण मुलांशी ते आपुलकीने वागत. शक्य ती मदत करीत.

पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती. हेमंत जोगदेवांनी मला नगरहून खास बोलावून घेतलं. त्यांचा आवडता खेळ कबड्डी. त्याच्या वृत्तांकनाची जबाबदारी दिली. त्या स्पर्धेसाठी फिदा कुरेशी तज्ज्ञ समालोचक म्हणून लिहिणार होते. त्यांचं ऐकून शब्दांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे फिदाभाईंशी जवळची ओळख झाली.

ऑनलाईन ऑलिम्पिक ज्ञानकोश
मध्यंतरी ‘लोकसत्ता’मध्ये पुण्यात काम करीत असताना पुन्हा संबंध आला. ते एका पाक्षिकाचं काम पाहत होते. त्यासाठी लिहिलं. अगदी अलीकडे ऑनलाईन ऑलिम्पिक ज्ञानकोशाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यात हॉकीचा त्यांनी माझ्यावर सोपवलं. दुर्दैवाने ते काम रखडलं. ते सांगताना ते हताश, निराश झाले होते.

हौशी क्रीडा पत्रकार असताना मला ‘पूर्ण वेळ क्रीडा पत्रकार’ समजणाऱ्या आणि त्याच नात्यातून संवाद साधणाऱ्या व्यक्ती दोन. वि. वि. करमरकर आणि दुसरे हेमंत जोगदेव! बऱ्याच वेळा मला त्यांना सांगावं लागलं की, माझं मुख्य काम हे नव्हतं हो.

क्रीडा पत्रकारितेतील दोन पीठाधीश 
त्या काळातील क्रीडा पत्रकारितेतील ही दोन स्वतंत्र पीठंच जणू. त्यातलं एक पीठ मुंबईचं आणि दुसरं पुण्याचं! स्वाभाविकच ती स्पर्धा होती. हे दोन्ही ‘पीठाधीश’ अनेक स्पर्धांच्या निमित्तानं एकत्र असत. त्या दोघांशीही जवळचे संबंध आले, हे भाग्यचं.

एकाशी गप्पा मारताना दुसऱ्याचा विषय आला नाही, असं क्वचितच होई. त्या गप्पांमधून क्वचित कधी स्पष्ट-अस्पष्ट अशी स्पर्धा जाणवे. पण ती तेवढ्याचपुरती. क्वचित चेष्टाही. पण हेटाळणी, तिरस्कार, द्वेष... अशा भावना त्यात कधी दिसल्या नाहीत.

जोगदेव आणि वि. वि. क., दोघंही एकमेकांचा उल्लेख एकेरी करीत. हे त्यांना ‘करमरकर’, किंवा क्वचित ‘बाळ’ म्हणत. ते मात्र सहसा ‘हेमंत’ असाच उल्लेख करीत. तसं त्यांच्या वयात साधारण एका पिढीचं अंतर. वि. वि. क. पूर्ण वेळ व्यावसायिक पत्रकार. जोगदेव खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ पत्रकार नसले, तरी त्यांनी काम तसंच केलं.

हे दोन्ही ‘पीठाधीश’ आयुष्याच्या शेवटपर्यंत कार्यरत राहिले, हे समान वैशिष्ट्य. दोघांनाही अजून बरंच काही करायचं होतं. दोघांची लिहिण्याची धाटणी वेगळी. वि. वि. क. शैलीदार. जोगदेव खेळातले बारकावे अधिक टिपणारे. कबड्डी, कुस्ती, फुटबॉल आणि ऑलिम्पिक हे जोगदेवांना सर्वाधिक प्रिय. तुलनेने क्रिकेट त्यांना फारसं आवडायचं नाही. वि. वि. क. क्रिकेटबद्दल लिहीतच.

कबड्डी आणि खो-खो ह्या देशी खेळांसाठी दोघांनी भरपूर काही केलं. त्याबद्दल दोन्ही संघटनांनी, खेळाडूंनी त्यांचं ऋण मानायलाच हवं.

नव्या तंत्रज्ञानाशी, विशेषतः इ-मेल आणि इंटरनेटशी दोघांनाही मैत्री करता आली नाही. वय हेच त्याचं कारण असावं. दोघांनाही व्हॉट्सॲपवरून काही पाठवलेलं चालत नसे. किंबहुना ते ॲप त्यांच्याकडे नव्हतंच.

वि. वि. क. ह्यांना एकदा महत्त्वाचा काही मजकूर इ-मेलने पाठवणं आवश्यक होतं. त्या वेळी त्यांनी एका परिचिताचा इ-मेल दिला. हॉकीचा मजकूर पाठवायचा होतो, तेव्हा जोगदेवांनाही असंच केलं. बहुदा त्यांनी नातीचा इ-मेल कळवला.

आयुष्यभर खेळावर भरभरून लिहूनही ‘डिजिटल’ जगात ह्या दोघांच्या पाऊलखुणा फारशा आढळत नाहीत. वि. वि. क. ह्यांचं वर्षभरापूर्वी निधन झालं, तेव्हा त्यांचं छायाचित्र शोधलं. फक्त ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर एक बरं छायाचित्र सापडलं.

जोगदेव ह्यांचं एकच छायाचित्र आज माहितीच्या महाजालात सापडलं. तेही  ‘ऑन ड्यूटी’ असल्याचं. ‘खेलो इंडिया’च्या २०१९च्या स्पर्धेच्या वृत्तांकनासाठी ते गेले होते, तेव्हाचं त्यांचं अधिस्वीकृतीसह असलेलं हे छायाचित्र आहे. त्या वेळी ते नव्वदीपार होते, हे विशेष!

‘खेलो इंडिया’च्या फेसबुक पानावर श्री. जोगदेव ह्यांचं हे छायाचित्र टिप्पणीसह पाहायला मिळतं. ती इंग्रजी टिप्पणी १३ जानेवारी २०१९ रोजी मोठ्या कौतुकानं लिहिलेली आहे - 
91 yr-old journalist Hemant Jogdeo has an unmatchable passion for sport. In 1976 he became 1st Marathi journalist to cover Olympics. Jogdeo a resident of Pune is proud that #KIYG2019 is being hosted here & praises the event for being a great platform for youngsters.
.............

#क्रीडा #क्रीडा_पत्रकारिता #हेमंत_जोगदेव #केसरी #महाराष्ट्र_केसरी #ऑलिम्पिक #विविक #मराठी_क्रीडा_पत्रकार_संघटना #आजोबा #कबड्डी #कुस्ती

.............

वि. वि. क. ह्यांच्याबद्दलचा लेख वाचण्यासाठी -

https://khidaki.blogspot.com/2023/03/Vi.Vi.Ka..html


पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...