बुधवार, २७ मे, २०२०

लिलिको म्हणतात हे वाङ्मयचौर्यच!



अँड्र्यू लिलिको
(छायाचित्र सौजन्य - http://www.europe-economics.com)
'मच्याकडील, ब्रिटनमधील निकषांनुसार हे अगदी सरळ सरळ वाङ्मयचौर्य आहे!' अर्थतज्ज्ञ अँड्र्यू लिलिको यांनी 'खिडकी'शी इ-मेलवरून साधलेल्या संवादात असे स्पष्ट म्हटले आहे...

'एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास 'वाङ्मयचौर्य' म्हणतात... मूळ साहित्यकृती लपविणे, किंवा रूपांतरात तिचा मुळीच उल्लेख न करणे, ह्याला 'वाङ्मयचौर्य' असे संबोधतात... वाङ्मयचोरी ही कायदेशीररीत्या गुन्हा नसली, तरी ती नैतिकदृष्ट्या गंभीर मानली जाणारी क्षेत्रे म्हणजे पत्रकारिता आणि शिक्षण.'

हा संदर्भ देण्यामागचा संदर्भ काय आहे, हे बहुतेकांच्या लक्षात आलं असेलच. दैनिक लोकसत्तामध्ये सध्या दररोज पहिल्या पानावर 'कोविडोस्कोप' सदर प्रसिद्ध होत असतं. दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर त्याचे लेखक आहेत. ह्या सदरामध्ये १३ मे रोजी 'मिठीत तुझिया...' शीर्षकाने मजकूर प्रसिद्ध झाला. ह्या मिठीचे रहस्य १५ मे रोजी उलगडले ते एका ट्वीटमुळे. @accountantvarun ह्या खातेदाराने हे वाङ्मयचौर्य असल्याचा थेट दावा केला. इंग्लंडमधील अर्थतज्ज्ञ अँड्र्यू लिलिको ह्यांच्या व्यक्तिगत ब्लॉगमधील मजकूर ह्या 'मिठीत' विरघळून गेल्याचे त्याने म्हटले.

बघता बघता सामाजिक माध्यमांमध्ये ही पोस्ट व्हायरल झाली. खुद्द मूळ लेखक अँड्र्यू लिलिको ह्यांना टॅग करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही मजेशीर आहेत. ट्विटरवर फॉलोअरची संख्या वाढत असल्याचे पाहून 'माझ्या सर्व नवीन मराठी अनुयायांचे स्वागत आहे!' असं थेट मराठीमध्येच त्यांनी ट्वीट केलं. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला.

कोण आहेत हे अँड्र्यू लिलिको? 'द गार्डियन', 'द टेलिग्राफ' अशा प्रसिद्ध दैनिकांसाठी नियमित लिहिणारे लिलिको अर्थतज्ज्ञ आहेत. जगप्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चर्चांमध्येही ते दिसतात. अर्थशास्त्रविषयक सल्ला देणाऱ्या 'युरोप इकॉनॉमिक्स' संस्थेचे ते कार्यकारी संचालक आहेत. राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्रामध्ये बी. ए.; अर्थशास्त्रात एम. एससी., तत्त्वज्ञानामध्ये एम. ए. अशा पदव्या घेतलेल्या लिलिको ह्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून अर्थशास्त्रातली पीएच. डी. मिळविली आहे.

'अँड्र्यू लिलिकोज पर्सनल ब्लॉग' ह्या अनुदिनीवर त्यांनी ११ मे रोजी 'अ सेन्स ऑफ प्रपोर्शन' शीर्षकाचा १० परिच्छेदांचा लेख लिहिलेला दिसतो. त्यातील तीन परिच्छेदांमधील साधारण २२० शब्दांचा मजकूर 'मिठी'मध्ये आढळतो. अर्थात सामाजिक माध्यमांमध्ये गवगवा झाला, तसा तो 'लोकसत्ता'चा अग्रलेख नाही, तर सदरातील मजकूर आहे.

ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना एका वाचकाने ह्या वाङ्मयचौर्याचा उल्लेख केल्यावर, त्याला लिलिको ह्यांनी 'अच्छा! आता मला मराठी शिकावं लागणार तर!' असा मिश्कील प्रतिसाद दिला. ट्वीटना उत्तर देणाऱ्या, काही विनोदी प्रतिक्रिया 'री-ट्वीट' करणाऱ्या लिलिको ह्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असावी बरे? तेच जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी इ-मेलवरून संपर्क साधला आणि इ-मुलाखत देण्याची विनंती केली. सोबत काही प्रश्नही विचारले. 'मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे देऊ इच्छितो', असे कळवत अवघ्या चार तासांमध्येच लिलिको ह्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्यात इंग्रजीतून झालेल्या इ-मेल संवादातून साधलेली हीच ती इ-मुलाखत...

·       ·     आपला लेख (किंवा त्यातील काही भाग) कोणी चोरून वापरला, हे कळले त्या क्षणी तुमची प्रतिक्रिया काय होती? राग आला, चीड आली, खंत वाटली की गंमत?
- खरं सांगायचं म्हणजे गंमत वाटली आणि माझा थोडा बहुमानही झाल्यासारखं वाटलं.

·  ·     महाराष्ट्राच्या प्रादेशिक भाषेत, मराठीत अशा प्रकारे आपले नाव आणि आपले लेखन पोहोचेल, अशी कल्पना तरी तुम्ही कधी केली होती का?
- असा काही विचार माझ्या मनात कधी आला नव्हता. मी लिहिलेले लेख आणि वृत्तान्त अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत. विविध देशांच्या - आखातातील आणि पूर्व आशियातीलही - दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमांत मी हजेरी लावली आहे. त्यामुळे भारतीय वाचकांसाठी कोणी लेख लिहिण्याची किंवा तेथील प्रेक्षक-श्रोत्यांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कार्यक्रम करण्याची विनंती केली असती, तर मला काही आश्चर्य वाटलं नसतं.

·     ·  घडल्या प्रकाराबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते वाङ्मयचौर्य आहे की केवळ निष्काळजीपणा?
- ब्रिटनच्या (युनायटेड किंग्डम) निकषांनुसार हे अगदी सरळ सरळ वाङ्मयचौर्य आहे. अर्थात मला हेही ठाऊक आहे की, इतर संस्कृतींमध्ये ह्याकडे निराळ्या पद्धतीनं पाहिलं जातं, थोडा वेगळा विचार केला जातो. त्यामुळेच तुम्हा भारतीयांच्या मापदंडानुसार हे वाङ्मयचौर्य आहे किंवा नाही, ह्याबद्दल अटकळीवर आधारित मत देणं मला शक्य वाटत नाही.

·   ·     ह्या प्रकारानंतर संपादक गिरीश कुबेर ह्यांच्यावर महाराष्ट्रातून मोठी टीका झाली. एका ज्येष्ठ संपादकाने (श्री. भाऊ तोरसेकर) ह्याचे वर्णन 'दरोडा' असेच केले. एका इंग्रजी पोर्टलनेही (www.opindia.com) लेख प्रसिद्ध केला. ह्याबद्दल तुमचे काय मत आहे?
- ब्रिटन, युरोपातील देश किंवा न्यूझीलंडमध्ये कशा पद्धतीनं हे सारं चालतं, ह्याची मला कल्पना आहे. वृत्तपत्रांच्या संपादकांमधील चर्चा किंवा हे संपादक, सेलेब्रिटी व राजकारणी यांच्यातील संवादात, संबंधात नेहमीच अतिशय धूर्त, सूक्ष्म पातळीवरचं राजकारण आणि व्यावसायिक शक्तिप्रदर्शन असतं. तुम्ही वर उल्लेख केला आहे, त्या संपूर्ण वादात बऱ्याच गुंतागुंतीच्या बाबी आहेत, असं मी मानतो. इथं कोण बरोबर, कोण चूक हे ठरविणं किंवा कोणाची बाजू घ्यावी, हे काही मला नाही ठरवता येणार. कारण मी पडलो बाहेरचा माणूस!

·     असा अनुवाद करण्यापूर्वी संबंधिताने आपली परवानगी घेतली नव्हती, असं ट्वीट तुम्ही उत्तरादाखल केलं होतंच. आता एवढा सगळा वाद झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडे दिलगिरी व्यक्त केली का?
- अर्थातच नाही. पण त्यांनी माफी मागावी, अशी मागणी मीही काही केलेली नाही.

 ·    हा प्रकार उघडकीस आला, त्या दिवशी तुम्ही काही मराठी वाक्येही ट्वीटमध्ये लिहिली. हे कसं काय जमविलं तुम्ही?
अहो, जाऊ द्या. आता ते गुपितच राहू द्या...

·   ह्या वादानंतर ट्विटरवर तुमचे किती फॉलोअर वाढले? त्यात महाराष्ट्रातील किती आहेत?
- त्यात नक्कीच भर पडली, हे मी खात्रीने सांगतो. पण ट्विटरवर मला 'फॉलो' करणाऱ्यांची संख्या वीस हजारांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या 'फॉलोअर'चा बारीकसारीक तपशील पाहणं, त्याची नोंद घेणं मला काही शक्य नाही.

·       ·     आता महाराष्ट्राला भेट देण्याची उत्सुकता तुम्हाला वाटत आहे का?
- अजूनपर्यंत तरी भारतात मी आलो नाही. तशी संधी मिळाली नाही. पण तिथे जाऊन आलेल्यांकडून मी भारताबद्दल बरंच काही ऐकलं आहे. तुमचा देश रंगतदार आणि मोहक आहे. तिथं बऱ्याच वेगळ्या आध्यात्मिक अनुभवांना आणि नैतिक गोष्टींना सामोरं जावं लागतं. कुणास ठाऊक, माझं काम कधी तरी मला तिथं जाण्याची संधी मिळवून देईल आणि तो अनुभव माझ्यासाठी फारच आकर्षक, अद्भुत असेल.
...
ताजा कलम ः ह्या विषयाबाबत 'लोकसत्ता'च्या संपादकांची मुलाखत असलेला व्हिडिओ दैनिकाच्या संकेतस्थळावर २९ मे रोजी टाकण्यात आला.
...
(परवानगी न घेता हा लेख किंवा त्यातील काही भाग कोणत्याही माध्यमांतून वापरणे म्हणजेही 'वाङ्मयचौर्यच' ठरेल, ह्याची कृपया नोंद घ्यावी!)
….
मराठी माध्यमांविषयीचे हेही लेख इथे पाहा -


...

१८ टिप्पण्या:

  1. ek nava mudda lakshat alyavar tyacha tal gathanaysathi thet tya lekhashi mulakhatitun sanvad sadhun aapan navin payanda * marathi sahityik patrakaritet * padat aahat .

    उत्तर द्याहटवा
  2. 'खिडकी'तून टाकलेला हा वेगळा कटाक्ष आपल्याकडील तज्ज्ञ, विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ ह्यांची मनोवृत्ती दाखवतो. त्यामुळे बऱ्याचदा अशा तज्ज्ञांनी काढलेले निष्कर्ष, व्यक्त केलेली मतं आपल्या देशातील परिस्थितीशी विपरीत दिसतात. कारण हे निष्कर्ष परदेशी तज्ज्ञांच्या मतांचे वाङ्मयचौर्य करून काढलेले असतात. असो!
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. साद्यंत.

    सगळ्या शंका, कोठेही न जाता दूर करणारे लेखन. आणि...Authentic!

    You deserve to write more.

    There is a huge gap between some studious journalism n we common readers.
    - प्रदीप रस्से, जळगाव

    उत्तर द्याहटवा
  4. मुलाखत वाचली. गिरीश कुबेर यांचं लेखन मला आवडतं. ते असं काही करतीलसं वाटत नव्हतं. लिलिको यांनी ते बऱ्याच लाइटली घेतलेलं दिसतंय. आपले आभार.
    - प्रियंवदा कोल्हटकर

    उत्तर द्याहटवा
  5. दोन्ही लेख (लिलिको व एकलव्याची एकसष्टी) मस्तच आहेत. खूप दिवसांनी तुमचे लेख वाचले. लिहीत राहा.
    - सुधा तुंबे

    उत्तर द्याहटवा
  6. लिलिको आणि कोविडोस्कोप ह्याबद्दल वाचले होते. पण आपल्या प्रश्नांमधून त्यांच्या भूमिकेबद्दल माहिती होते.

    त्यातील परिच्छेद वगैरे तर नाही पण संपूर्ण हा लेखच जर मी इतरांना अग्रेषित केला तर ते तर चौर्य म्हणणार नाही न? ही...ही! मला आवडलाय म्हणून इतरांना पाठवायची इच्छा आहे.
    - स्वाती वर्तक

    उत्तर द्याहटवा
  7. हा मुद्दा गाजत असल्याचे आम्हाला माहीत नव्हतं. कळवल्याबदल धन्यवाद.

    पण लेख वाचून आश्चर्य बिलकुल वाटलं नाही; वाईट मात्र वाटलं. पत्रकारितेचं अधोपतन ही आनंदाची गोष्ट नाही. पण ही आज-कालची घटना नाही. कित्येक साहित्यिक आजवर धडधडीत वाङ्मयचौर्य करीत आले आहेत. आता मला उदाहरणं आठवत नाहीत. पण त्यासंबंधी गाजावाजा झाल्याचा स्मरत नाही.

    पत्रकारांवरही फारशी टीका झाली नसती. पण अलीकडे त्यांनी holier than thou अशी भूमिका स्वीकारली होती. त्याचाच हा परिणाम आहे.

    पत्रकारांनी विरोधी पक्षाची किंवा activistची भूमिका सोडून केवळ बातमीदाराचा पेशा पत्करावा. आमची मतं बनवण्यास आम्ही समर्थ आहोत.
    - हेली दळवी

    उत्तर द्याहटवा
  8. maajhaa एक लेख कोणीतरी चोरल्याचे माझ्या एका नातेवाइकाच्या लक्षात आले व त्यांनी मला ते सांगितले होते. पण लेखकाला जाब विचारायला मला वेळ नव्हता. हिंदी सिनेमा तर वाड्मय चौरायने भरलेला आहे. ( अगदी चोरी चोरी सिनेमासहा .) एवढेच नव्हे तर काही मोठमोठे मराठी लेखक आपली विशेषतः नाटके स्वतः;च्या नावावर खपवतात. कुठून घेतले ते जाऊद्या पण निदान मूळ कल्पना परकीय एवढे लिहायचीही तसदी घेत नाहीत. . मूळ लेखकांची रीतसर परवानगी विचारली तर ते आनंदाने देतात असा माझा अनुभव. मागे एक अनुवाद विषेशांक प्रसिद्ध झाला. त्यासाठी मी एक कथा अनुवादित केली. लेखिकेने लेखी परवानगी आनंदाने पाठवली. मी तिला तो मराठी अंक पा ठवला. धन्यवाद या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल.

    उत्तर द्याहटवा
  9. बहुतेक मराठी वाचक मराठी सोडून इतर फारसं वाचत नाहीत.त्यामुळे अशी नवीन माहिती लोकसत्ताच्या वाचकांपर्यंत पोचली तर त्यात काय वाईट ? फक्त परवानगी घेऊन उल्लेख केला असता तर योग्य झालं असतं। पण मूळ लेखकाला काहीच आक्षेप असल्यामुळे विनाकारण वाद वाढवण्यात काहीच अर्थ नाही .कुबेरांसारखा मराठी वाचकांचे वैचारिक भरण पोषण करणारा दुसरा कोणी पत्रकार मला तरी दिसला नाही अजून .वाचनीय अग्रलेख फक्त लोकसत्ताचेच असतात.एके काळी म.टा. होता पण आता त्यांना फक्त मार्केट लीडर होण्यातच रस दिसतो.

    उत्तर द्याहटवा
  10. चोरी पकडली गेल्यावरही ती पाहिली न पाहिली असे करण्याने चोर अधिक खजील व्हावा.

    उत्तर द्याहटवा
  11. सतीश,
    'खिडकी'त डोकावणे नेहमीच शक्य होत नाही. पण आज डोकावलो नाही, तर आतच घुसलो.

    मला हे प्रकरण माहीतच नव्हतं; मी वेगळ्या कामात गुंतलो होतो. आणि गंमत सांगू का? ज्या मराठी विश्वकोशातील नोंदीचा तू संदर्भ घेतला आहेस, तिचा लेखक मीच तर आहे!

    तुझा लेख उत्तमच झाला आहे. आणि अतिशय अचूक. त्याबद्दल अभिनंदन! चोर पकडले गेलेच पाहिजेत. हा हा हा!
    - श्रीनिवास हेमाडे

    उत्तर द्याहटवा
  12. मूळ लेखकाशी संपर्क करून तुम्ही वस्तुस्थिती समजावून घेतली व मांडली. असे सत्यशोधन मराठी पत्रकारितेत हवे आहे. तुमची साधार मांडणी आवडली..

    उत्तर द्याहटवा
  13. लिलिको ह्यांना आवडलेलं नाही हे. हलकी नापसंती व्यक्त केली आहे त्यांनी. कारण आपल्याकडे कसं बघितलं जातं, ह्यावर ते लक्ष ठेवून आहेत. पण तुम्ही वाचा फोडली, हे आवडलं.
    - चंद्रकांत कुटे, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  14. ऐकावे ते नवल, असच म्हणावं लागेल. तटस्थपणे आपण हा विषय प्रभाविपणे मांडला आहे. म्हणूनच थोडी विस्तारीत प्रतीक्रीया.

    मला आठवते ऐके काळी मी दर रविवारी सकाळी भिंगारहून नगर माळीवाडा ST Stand वर सायकलने जात. महाराष्ट्र टाईम्स व लोकसत्ताची गाडी आली कि, लोक त्यांवर तुटुन पडत. रविवारचे  हे दैनिक आठवडाभर पुरत असे. त्यावेळेस लोकसत्ता संपादक विद्द्याधर गोखले व म.टा. संपादक गोविंद तळवलकर होते. मार्मिक, BLITZ, ORGANISER असे दादा होते. TV, YouTube, Twitter, Facebook, WhatsApp असला भंपकपणा नव्हता. 

    आजकाल ग्रंथालयातहि ईंग्रजी लेखकांच्या मराठी अनुवादीत पुस्तकांचा ढीग लागला आहे. कांही अपवाद वगळता विज्ञानावरील पुस्तकेही इकडचे-तीकडचे गोळा करून लीहून स्वत:च्या नावावर प्रसिद्ध केले जातात. शालेय-महाविद्यालय पुस्तकंही याला अपवाद नाहीत. 
    कुलकर्णी साहेब पळवापळविचा जमाना आहे. अस्सल २४ कॅरेट मिळणार कुठून.
    श्रीराम वांढरे.     

    उत्तर द्याहटवा
  15. गिरीश कुबेर यांनी संदर्भात तसा उल्लेख करायला पाहिजे होता. किंवा हा प्रकार उघड झाल्यावर तरी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे होती.
    अर्थात त्यामुळे संबंधित लेखकालाही महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली, नाहीतर त्यांचे लेखन इकडे कितीजण वाचत असतील ??

    उत्तर द्याहटवा
  16. मूळ लेखकाला भिडलात हे छान केलंत, त्यांनीही किती सहजतेने प्रतिसाद दिला... थोरामोठ्यांच्या असल्या ' कामगिरीवर ' प्रकाश टाकायलाच हबा.. त्यासाठी तुमच अभिनंदन...

    उत्तर द्याहटवा
  17. मस्त आहे लेख.

    प्रश्नही भारी विचारले आणि उत्तरेही तशीच आहेत.
    - शानुल देशमुख, नाशिक

    उत्तर द्याहटवा

आजोबा सांगतात, ‘ॲक्ट पॉझिटिव्ह’

  डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू ...