Wednesday 23 March 2016

खोडलेले ‘अ-क्षर’!

वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून (मराठी) वृत्तपत्रं वाचतो आहे. पोटासाठी म्हणून २८ वर्षं वृत्तपत्रातच काम करतो आहे. कुणी तरी काम करताना दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे किंवा कुणाच्या हातून नकळत झालेली गल्लत-गफलत आणि त्यावरून झालेला गहजब याची चौकट अधूनमधून कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात दिलगिरी, माफी, क्षमस्व...अशा कुठल्या तरी एका शीर्षकाखाली दिसायचीही. नंतर नोकरी सुरू केल्यावर अशी चौकट आपल्या अंकात (आणि तीही आपल्यामुळं) छापून आली, तर तो दिवस वाईट जायचा. आणि तशीच चौकट प्रतिस्पर्धी अंकात दिसली की, त्याची दिवसभर टिंगलटवाळी!

पण गेल्या शुक्रवारी (१८ मार्च) लोकसत्ताच्या पहिल्या पानावर चौकट वाचली आणि हबकलोच. पुनःपुन्हा वाचली ती. आदल्या दिवशी 'असंतांचे संत' अग्रलेख वाचल्यावरच तीव्र प्रतिक्रिया येणार, याची खात्री झाली होती. पण ह्या अवघ्या २६ शब्दांच्या चौकटीनं हादरून जायला झालं. ही चौकट प्रथम पुरुषी एकवचनी अशा स्वरूपात लिहिलेली आहे. असं आजवर कधी वाचलेलं नव्हतं. संपादक आपला उल्लेख आम्ही असाच करतात. त्याचा अर्थ प्रथम पुरुषी आदरार्थी असा नसतो; तर संपादकीय जबाबदारी म्हणजे कोण्या एकाची नसून सामूहिक आहे, असंच त्यातून ध्वनित केलं जात असतं आणि वाचणाऱ्यांनीही ते तसंच समजायचं असतं. त्या गृहितकाला या चौकटीनं मोठा तडा दिला.

क्षमस्व!’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या लोकसत्ताच्या त्या चौकटीत मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो असं प्रथम पुरुषी एकवचनी वाक्य आहे. याचा अर्थ ही दिलगिरी सामूहिक नसून एकट्या संपादकाची आहे आणि हा अग्रलेख कोणी लिहिला, हेही त्यातून उघड होतं. चौकटीच्या शेवटी - संपादक असा उल्लेख आहे आणि त्या नात्यानं लोकसत्ताच्या अंकात नाव प्रसिद्ध होतं ते गिरीश कुबेर यांचंच. म्हणजे तो अग्रलेख लिहिला आहे कुबेर यांनी आणि व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त केली आहे ती त्यांनीच. त्याच्याशी त्यांच्या संपादकीय मंडळाचा किंवा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही. (ह्याचा पुढचा अर्थ असा की, याबाबत आम्ही संपादकांच्या मागे नाहीत किंवा आमचा त्यांना अजिबात पाठिंबा नाही, हे व्यवस्थापनाने न बोलताही दाखवून दिलं आहे!) अतिशय भयानक चित्र आहे हे. अग्रलेखात सातत्यानं आम्ही असाच उल्लेख करणाऱ्या आणि शैलीचा कुर्रेबाजपणा जाणवणाऱ्या गिरीश कुबेर यांच्यावर ही भलतीच आफत ओढवली, हे स्पष्ट आहे. अशी चौकट लिहिताना आणि ती अंकाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्याचा आदेश देताना (किंवा मिळालेल्या त्या आदेशाचं पालन करताना) त्यांना किती यातना झाल्या असतील, याची कल्पनाच केलेली बरी.

त्याहूनही धक्कादायक म्हणजे अग्रलेख मागे घेत असल्याचं विधान. अंकात छापून आलेला अग्रलेख मागे कसा घेणार, असा छद्म प्रश्न त्यावरून विचारण्यातही आला. त्यातला फोलपणा सगळ्यांनाच माहीत होता. केवळ कुबेर यांना (अधिक) अडचणीत आणायचे किंवा त्यांची खिल्ली उडवायची ह्याच हेतूने हे विचारलं जात होतं. पण म्हटल्याप्रमाणं लोकसत्तानं आपल्या संकेतस्थळावरून हा अग्रलेख हटविलाही. त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र कायम आहेत. प्रसिद्ध झालेली एखादी गोष्ट मागं घ्यावी लागणं धक्कादायक आणि त्याहून अधिक अवमानकारक आहे. मराठी वृत्तपत्रांमध्ये तरी असा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळाला. दिलगिरी व्यक्त करणं एक वेळ समजून घेता येतं; पण अ-क्षर असं ज्याला म्हटलं जातं, तेच पूर्णपणे खोडून काढण्यात संबंधितांना यश आलं. सर्वाधिक वाईट, चिंताजनक बाब असेल तर तीच!

(व्यक्तिगत) माफी आणि (अग्रेलखाची) माघार यावरून लेखनाच्या (आणि अर्थातच अभिव्यक्तीच्या) स्वातंत्र्याबद्दल मोठंच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही अशी विनाशर्त दिलगिरी व्यक्त करण्यासाठी कुबेर ह्यांच्यावर फार मोठं दडपण आलं असणार, हे नक्की. ते कुणाचं हे उघड होणार नाही. पण येत्या काही दिवसांत त्याबद्दल कुजबुजीच्या स्वरूपात बोललं जाईल. हे दडपण नेमकं कुणाचं (आणि कसलं) होतं, त्याच्यापुढे व्यवस्थापन एवढं का नमलं आणि त्यांनी कुबेरांनाही कसं नमवलं? ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे यांनी फेसबुकवर लिहिलंच आहे की, व्यवस्थापनाच्या आर्थिक नाड्या आवळण्याची क्षमता असणाऱ्या कुण्या तरी शक्तीने व्यवस्थापनावर अग्रलेख मागे घेण्यासाठी जबर दडपण आणले असावे. दुर्दैवाने ते खरं असेल, तर आपलं सारं स्वातंत्र्य तकलादू आहे, असंच हताशपणे म्हणावं लागेल. एरवी होतो तसा वाद-प्रतिवाद याही अग्रलेखावर झाला नसता काय? अग्रलेखाचा समाचार घेणारा एखादा सविस्तर लेख? पण तशा कोणत्या तडजोडीला वावच ठेवण्यात आला नाही, असं जाणवतंय. तुटो वाद संवाद तो हीतकारीया समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणं दोन्ही बाजूंनी थोडं-फार सामंजस्य दाखवलं असतं आणि थोडं मौन बाळगलं असतं, तर ह्या वादाचा संवाद झालाही असता!

देशभरात गेले काही महिने असहिष्णुतेचा गजर होत आहे. त्यावरून देश सोडून जाण्याच्या आणि हाकलून देण्याच्याही वल्गना झाल्या. पण एका असहिष्णुतेचं ढळढळीत उदाहरण समोर दिसत असताना, त्याबद्दल फार कोणी मनापासून, अगदी आतमधून व्यक्त झालेलं दिसत नाही. एका संपादकाच्या लेखन-स्वातंत्र्यावर गदा आली असताना, त्याबद्दल कोणाला खरोखर मनोमन दुःख झालं, असंही काही पाहायला मिळालं नाही. या अग्रलेख माघारीतूनच आणखी एक गोष्ट सिद्ध होते की, समूह म्हणून या देशात सर्वाधिक सहिष्णू हिंदू आहेत. (व्यक्तिगत पातळीवर आपण हिंदू फार सहिष्णू नाही, हेही आपल्या जातपरंपरेनं पूर्वीच सिद्ध केलं आहे.) दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका चित्रावरून उठलेल्या गदारोळाच्या वेळीही हे दिसलंच आहे.

लोकसत्ताच्या संपादकांनी वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. हे वाचक नेमके कोण, याचा स्पष्ट उल्लेख नसला, तरी ते समजून घेता येतं. पण याही आधी किमान अशी दोन उदाहरणं देता येतील की, त्या वेळी लोकसत्ताने याहून किती तरी मोठ्या वाचकसमूहाला दुखावलं होतं. बोगस बळिराजाची बोंब आणि याकूब मेमनच्या फाशीच्या वेळचा एक शोकान्त उन्माद हे ते दोन अग्रलेख होत. त्याही वेळी लोकसत्ताकारांकडून माफीची अपेक्षा व्यक्त झालीच होती. पण तशी ती मागण्यात आली नाही, ह्याचा अर्थ तेव्हाचं दडपण आजच्या एवढं तीव्र नसावं, असं नक्कीच गृहीत धरता येईल. यातून एक अर्थ असाही काढता येतो की, हिंदू आणि शेतकरी, हे देशातले दोन सर्वांत मोठे समूह दखलपात्र नाहीत!

फेसबुकसारख्या सोशल मीडियावर गेल्या चार-पाच दिवसांपासून लोकसत्ताच्या ह्याच माफीनामावर जोरदार चर्चा सुरू आहे. माफी मागितल्याबद्दल आणि अग्रलेख मागे घेतल्याबद्दल कुबेर यांच्यावर विशिष्ट दृष्टिकोणातून टीका सुरू आहे. त्यांची खिल्ली उडविणारा (आणि त्याच वेळी अग्रलेख योग्य आणि चांगला होता, असं प्रशस्तिपत्र देणारा), एक मोठा वर्ग आहे. कुबेर ह्यांची पाठराखण करणारा एक छोटा समूह दिसतो. पण त्यांच्या म्हणण्यावरही प्रतिक्रिया देण्यात कुबेर-विरोधक आघाडीवर आहेत.

याला कारणीभूत आहेत ते स्वतः कुबेरच. मराठी वृत्तपत्रसृष्टीत गेल्या चार-पाच वर्षांमध्ये संपादक म्हणून सर्वाधिक चर्चेत राहिले ते कुबेरच. कुमार केतकर लोकसत्ताचे संपादक असतानाच जून २०१०मध्ये कुबेर ह्यांची कार्यकारी संपादक म्हणून नियुक्ती झाली. ते साधारण ऑक्टोबरच्या सुमारास रुजूही झाले. त्यांच्या नियुक्तीची माहिती वरिष्ठ सहकाऱ्यांच्या बैठकीत देताना केतकर यांनी ते आले तरी डिसेंबर २०१२पर्यंत मी राहणार आहेच, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. कुबेर आल्यानंतर साधारण सहा महिन्यांतच केतकर लोकसत्ताचा राजीनामा देते झाले. अंकावर संपादक म्हणून केतकर ह्यांचं नाव असतानाच मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्यावर थेट टीका करणारं लिखाण लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालं. आणि ते होतं कुबेर यांनी सुरू केलेल्या नव्या सदरात. लोकसत्ताच्या वाचकांना हा एकदम सांस्कृतिक-राजकीय वगैरे धक्का होता. कारण नोव्हेंबर २००२पासून २०११-१२चं केंद्रीय अंदाजपत्रक सादर होईपर्यंत लोकसत्ताच्या संपादकीय लेखनातून सोनिया-राहुल-मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध काही वाचण्याची सवयच वाचकांना राहिली नव्हती. सर्वसाधारण वाचकांची ही सार्वत्रिक तक्रार होती त्या काळात.

लोकसत्तामध्ये रुजू होताच कुबेर ह्यांनी चाणाक्षपणे साधारणपणे दशकभराच्या या प्रतिमेला, वाचकांच्या मनातील गृहितकाला धक्का दिला आणि तिथंच आपली संपादक म्हणून प्रतिमा वाचकांच्या मनात ठसवण्यात ते यशस्वी झाले. त्या आधी मराठी वाचकाला त्यांचं नाव माहीत होतं, ते महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर, विशेष प्रतिनिधी म्हणून आणि काही पुस्तकांचे लेखक म्हणून. इकॉनॉमिक टाइम्समधील त्यांची राजकीय संपादकाची भूमिका सामान्य मराठी वाचकाला माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. केतकर ह्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या आगे-मागे लोकसत्ताच्या विविध कार्यालयांतून अनेक वरिष्ठ-कनिष्ठ सहकारी वेगवेगळ्या दैनिकांमध्ये गेले. इंडियन एक्सप्रेसप्रमाणेच लोकसत्ताचंही केंद्रीकरण करण्याच्या निर्णयाची त्याच काळात अंमलबजावणी झाली. नव्या कार्यालयाची संस्कृती आणि तिथली माणसं पुरती समजून घेण्याआधीच कुबेरांपुढे ही दोन नवी आव्हानं उभी राहिली होती. त्यावर मात करीत ते पुढे पुढे जात राहिले. राज्य-केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकारवर-नेतृत्वावर लोकसत्तामधून सणकून टीका होऊ लागली. काँग्रेसधार्जिणा किंवा काँग्रेस-समर्थक (खरं तर नेहरू-गांधी समर्थक), अशी दैनिक लोकसत्ताची सुमारे नऊ-दहा वर्षं राहिलेली प्रतिमा पुसण्यात कुबेर यशस्वी झाले. (आणि ह्याच दरम्यान कधी तरी सरसंघसंपादक असं बिरुदही त्यांच्या नावामागे चिकटविण्यात आलं. त्यामागं कोण होतं, हेही अनेकांना माहीत आहेच!)

याच काळात कार्यालयीन पातळीवरची आव्हानं कुबेर यांनी पेलली आणि अंकाला नवं रूपही दिलं. त्यांचं लेखनही वाचकांना आवडत होतं. कारण ते अधिक थेट, बोचरं होतं. त्यात मध्यमवर्गीय किंवा हिंदुत्ववादाचे सहानुभूतिदार यांना सरसकट लक्ष्य बनवलं जात नव्हत. ओपिनियन मेकर्सचं वृत्तपत्र अशी त्यांनी लोकसत्ताची प्रतिमा निर्माण केली. खुद्द तेही वाचकप्रिय संपादक बनले होते. त्यांची (तिरकस) शैली, थेट हात घालण्याची वृत्ती, अंकाचं वैविध्य हे सारंच वाचकांना हवंहवंसं वाटत होतं. कुबेर संपादक म्हणून गोविन्द तळवलकर ह्यांना आदर्श मानतात. त्यांच्या लिहिण्या-बोलण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे. एवढंच काय, कुबेरांच्या डोळ्यांपुढे असलेलं आदर्श वृत्तपत्र म्हणजे तळवलकरांच्या काळातील पत्र नव्हे मित्र, हेही त्यांच्या बोलण्यातून जाणवलेलं आहे.

कुणाचीही नि कशाचीही भीडभाड बाळगता न लिहिणं ठीक आहे. त्यातूनच कुबेर ह्यांचा लौकिक गेल्या तीन-चार वर्षांमध्ये निश्चितच वाढला. पण काही काळातच त्यांच्या लेखनामध्ये अहंकार, दर्प आणि नको एवढी तुच्छताही प्रकर्षानं जाणवू लागली. राहुल गांधी, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदींना कायम बालीश ठरवणं चटकन लक्षात येणारं होतं. बोंब आणि उन्माद हे दोन्ही अग्रलेख ह्याच पठडीतले होते. खरं तर शेतकऱ्यांवर लिहिलेल्या ह्या अग्रलेखातले अनेक मुद्दे विचार करण्यासारखे होते. हा अग्रलेख प्रसिद्ध होण्याच्या आठ-दहा दिवस आधी लोकसत्ताच्याच पहिल्या पानावर मराठवाड्यातील शेती कशी उद्ध्वस्त झाली, ह्याच्या बातम्यांची मालिकाच प्रसिद्ध झाली होती. असं असताना ह्या अग्रलेखाच्या शीर्षकावरून आणि तो लिहिण्याच्या तुच्छतावादी शैलीतून सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना बोगस ठरवल्याची भावना निर्माण झाली. खरी बोंब झाली ती त्याच वेळी. (त्याचा परिणाम असा की, येत्या १० वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर थोडंही विरोधात लिहायला कोणी धजावणार नाही.) उन्मादच्या अग्रलेखाचीही तीच कथा. केवळ बहुसंख्याकांची भावना म्हणून ती खरी नव्हे, तर निव्वळ उन्मादीच, या हट्टाग्रहातून तो अग्रलेख लिहिण्यात आल्यासारखं वाटलं. त्या दोन्ही वेळा वाचक-भावनेची दखल ना कुबेर यांनी घेतली, ना दैनिक लोकसत्ताच्या व्यवस्थापनाने.

जागतिक महिला दिनी प्रसिद्ध झालेला नवयुगाचे हळदीकुंकू अग्रलेखही असाच. बाजार व्यवस्थेनं या सर्व दिनांचं कसं चांगभलं करून टाकलं आहे, हा अग्रलेखाचा मुख्य मुद्दा. पण त्याच्या सुरुवातीलाच कौशल इनामदार यांना उगीचच टप्पल मारून काय साधलं, हे अग्रलेख लिहिणाऱ्यालाच माहीत. त्याला उत्तर म्हणून इनामदार यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टला असंख्य लाईक मिळाले आणि ती ढिगानं शेअर करण्यात आली. केवळ तुच्छतावादापायी हे झालं. अग्रलेख अन्वयार्थ लावण्यासाठी असतो, असं मानण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट उलट्या चष्म्यातून पाहायची सवय लावून घेतल्यामुळं हे घडत गेलं असावं.

सुमारे २२ वर्षांपूर्वी मी लोकसत्तामध्ये रुजू झालो, तेव्हा एका मित्रानं औत्सुक्य म्हणून लोकसत्ताच्या राजकीय भूमिकेबद्दल विचारलं होतं. त्याला तेव्हा सांगितलं होतं की, हा विरोधी पक्षाचा पेपर!’ सत्तेवर जो कोणी असेल, त्याच्या विरोधात लिहिण्याची लोकसत्ताची सर्वसाधारण परंपरा होती. ती केतकर ह्यांच्या काळात खंडित झाल्याची बहुसंख्य वाचकांची भावना होती. कुबेर ह्यांनी ती पुन्हा सुरू केली. मोदी आणि फडणवीस सरकारविरुद्धही ते लिहीत राहिले. त्यातून मोदीभक्त त्यांच्यावर नाराज झाले. एफटीआयआय आणि असहिष्णुता या मुद्द्यांची खिल्ली उडविल्याने पुरोगामी मंडळींनी कुबेरांच्या नावामागं आधीच लावलेल्या सरसंघसंपादक किताबावर शिक्कामोर्तब केलंच होतं.

समव्यावसायिकांमध्ये कुबेर फारसे प्रिय नव्हतेच. पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची आवश्यकता नाही, हे वेळोवेळी ठामपणे सांगितल्यामुळं पत्रकार संघटनांना त्यांच्याविषयी फार प्रेम नाही. त्यामुळेच एक ऐतिहासिक घटना घडूनही, एका संपादकाच्या बचावासाठी फार कमी जण पुढे आले.

फेसबुकवर फिरताना सहज म्हणून पांडुरंग कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ओळी वाचण्यात आल्या. त्यांना गीता व ज्ञानेश्वरी वाचताना हे सुचलं. त्या ओळी अशा -

पाण्याविना बुडालो
आगीविना जळालो
दाबला नच गळा
प्राण सोडता झालो

केवळ अहंकारामुळं हे झालं, असं त्या ओळींमधून कुलकर्णी सांगू पाहतात. ...आपल्या पत्रकारांची अवस्था तूर्त वेगवेगळ्या कारणांमुळं अशीच झाली आहे, असं म्हटलं तरी चालेल.

शार्ली एब्दोवर झालेल्या हल्ल्यात काही पत्रकार-कर्मचाऱ्यांना जीव गमावावा लागल्यानंतर मराठी वृत्तपत्रांमध्येही त्याबद्दल लिहून आलं. अग्रलेख-स्फुटे, ह्या ना त्या माध्यमातून त्याचा निषेध झाला. पण आपल्याच एका समव्यावसायिकावर अशी वेळ आली असताना कोणत्याही वृत्तपत्रातून त्याचे उघडपणे पडसाद उमटले नाहीत. त्यावर थेट प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. अर्थात हे पहिल्यांदाच घडत नाही. गेल्या अडीच दशकांमध्ये मराठी वृत्तपत्रांवर होणारे हल्ले वाढत आहेत. पण समस्त मराठी वृत्तपत्रसृष्टीने हल्लेखोरांचा निषेध केलेला दिसत नाही. (तुलनेनं २५ वर्षांपूर्वी महानगरवरील हल्ल्याचा व्यापक निषेध झाला होता. पण त्याही वेळ महानगर विरुद्ध सांज लोकसत्ता अशी लढाई झालीच होती.) उलट खासगी गप्पांमधून व्यक्त होतो, तो असुरी आनंदच. दैनिक लोकमतला मध्यंतरी एका चित्राच्या निमित्तानं अशीच माफी मागावी लागली. त्याही वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत काहीच चर्चा झाली नाही. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रेरणास्रोत असलेल्या तत्त्वज्ञ व्हॉल्तेअर यांनी म्हटले होते, मला तुझे विचार मान्य नसतीलही कदाचित. पण ते मांडण्याच्या तुझ्या हक्काचे मी प्राणपणाने संरक्षण करीन. पत्रकारांनी हवं तर व्हॉल्तेअर अभ्यासू नये; पण त्यांचे हे बोल नक्कीच लक्षात ठेवावेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं याहून अधिक समर्पक स्पष्टीकरण नाही.

... कुबेरांनी अग्रलेख मागे न घेण्यावर ठाम राहायला हवे होते, त्यांनी मग राजीनामा का दिला नाही?’ ‘एवढं सारं घडल्यानंतरही ते मौन का बाळगून आहेत?’ असे एक ना अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. पण ही वेळ अशी प्रश्नमालिका उपस्थित करण्याऐवजी त्या प्रश्नांचा मागोवा घेण्याची आहे, असं वाटतं. माझे एके काळचे संपादक गिरीश कुबेर जात्यात होते. माझ्यासारखे असंख्य मराठी पत्रकार सुपात आहेत. एक व्यावसायिक पत्रकार ह्या नात्यानं संपादक गिरीश कुबेर यांना पाठिंबा व्यक्त करणं, मला आवश्यक वाटतं. हे लिहिलं ते एवढीच जाणीव ठेवून!
---------
सोबत फेसबुकवरच्या दोन निवडक (आणि संपादित) नोंदी :

एखाद्या संपादकाला ही कृती करावी लागणं हे पुढील काळासाठी धोक्याची घंटा वाजणं असू शकतं. तर मग वाचक म्हणून आपण या घटनेचा कसा विचार करावा? आज `लोकसत्ता` आहे. उद्या दुसरा एखादा पेपर असेल. संपादक आज कुबेर आहेत. उद्या अन्य कुणी असेल.
- मेधा कुळकर्णी
व्यवस्थापनाला यात हस्तक्षेप करण्याची गरज का वाटली असावी व केवळ दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी अग्रलेखच मागे घेण्यास लावण्याचे कारण काय असावे? या प्रकरणाचा थोडा व्यापक विचार केला तर असे वाटते की, व्यवस्थापनाच्या आर्थिक नाड्या आवळण्याची क्षमता असणाऱ्या कुण्यातरी शक्तीने व्यवस्थापनावर अग्रलेख मागे घेण्यासाठी जबर दडपण आणले असावे.
- दिवाकर देशपांडे
....

(टीप - हा मजकूर कोणत्याही सोशल मीडिया’वर कॉपी अँड पेस्ट’ या पद्धतीने वापरू नये. ज्यांना तो शेअर’ करायचा आहे, त्यांनी सरळ अनुदिनीचा दुवा द्यावा, ही आग्रहाची विनंती.)

25 comments:

  1. प्रिय सतीश जी,
    भारत में लिबरल ग्रुप का नेतृत्व वामपंथियों के पास है जिनकी विचारधारा के देशों में कहीं वैचारिक स्वतंत्रता नहीं है. मानवीय विचारों की ऊंचाई को जिस क्रूरता से इन्होने कुचला है, उसकी मिसाल भी मिसालों में नहीं मिलती. किंतु फिर भी वे खुद को आधुनिक समझते है, क्योंकि वे धर्म, पूजा, उत्सव और कर्मकांड को नहीं मानते. उनके आसपास के सारे माहौल में एक भकास पना दिखाई देता है, किंतु कोई उनसे प्रश्न नहीं करता क्योंकि किसी को उनसे कोई उम्मीद ही नहीं हैं.
    श्री श्री रविशंकर के यमुना प्रदूषण पर आसमान सर पर उठा देने वाले लोग मुंबई में देवनार की आग के समय क्यों खामोश हो जाते है, इसे समझने के लिये डाक्टरेट की डिग्री लेना आवश्यक नहीं है.
    एक लॉबी है जो कुछ पत्रकार, वकील और एनजीओ मिलकर चलाते है. उन्हें सभी के दुःख नहीं दिखते, केवल कुछ लोगों के दुःख दिखते है. फिर इनको सुनने वाले न्यायालय भी है, जो चार पन्नों के आदेश से किसी भी समाज और उसकी जिन्दा परंपरा को मृत घोषित कर सकते है.
    किंतु आज वक्त बदल रहा है, सोशल मिडिया ने इन कलम के दुकानदारों की सुनना बंद कर दिया है.

    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  2. संपादकीय मागे घेणे, ही अजबच घटना आहे. असो! पण `खोडलेले `अ-क्षर`` लेख खूपच छान; महाचर्चा व्हावी, असाच आहे. अभिनंदन!!
    - संजय आढाव, नगर

    ReplyDelete
  3. `अ-क्षर` अप्रतिम चिंतन आहे आणि खूप काही शिकविणारे आहे.
    - हरिहर धुतमल, लोहा (जिल्हा नांदेड)

    ReplyDelete
  4. मुद्दा खरंच गंभीर आहे. कुबेरांबद्दल सुरुवातीला जसं वाटत होतं त्यापेक्षा ते वेगळे निघाले, अशी माझीही भावना पूर्वीच झालेली आहे. उजवं-डावं म्हणून नव्हे, पण अपुरी माहिती असली तरी (किंवा बहुधा त्यामुळंच) प्रचंड अहंकार त्यांच्या लेखनात दिसतो बहुतेकदा, त्यानं खूपच कंटाळा येतो.

    बाकी, तुमचा मुद्दा व्हॅलिड आहेच. लोकमतच्या वेळेला तर हे खूपच जाणवलं. शिवाय त्यापूर्वी सकाळच्या वरिष्ठ वार्ताहरावर पुण्यात बांधकामव्यावसायिकाकडून झालेला हल्ला. अशा इतरही घटनांवेळी मुळात ज्यांच्यावर हा प्रसंग गुदरलाय त्यांनीच काही तक्रार लावून न धरल्यामुळं वरकरणी सगळं थांबूनच जातं. त्यामुळं हे पटत नसलेल्या इतर व्यक्तींनाही मग फक्त आपलं मत मांडून थांबण्याएवढाच मार्ग उरतो, कारण बाजू लढवण्यासाठी लढाई सुरूच नसते, वरकरणी तरी.

    ReplyDelete
  5. लेख खूपच छान. भांडवलशाहीच्या जगात या गोष्टी होणारच. मार्केटवर मोठा परिणाम होणार असेल, तर माफीही मागता येते आणि टीकाही करता येते. त्यांचे लेख फार वाचनीय असतात, असे वाटत नाही. त्यांच्या लेखनाचे वर्णन चांगले केले आहे. काही अग्रलेख ताळतंत्र सोडून लिहिल्यासारखे वाटतात. टीआरपीसाठी वाहिन्यांवर वाट्टेल ते करतात, अशी टीका आपण करतो.वृत्तपत्राच्या बाबतीत तसे केलेे, तर काय होते, त्याचे हे उदाहरण.

    ReplyDelete
  6. विरोधासाठी विरोध जसा योग्य नाही, तसेच पाठिंब्यासाठी पाठिंबा पण योग्य नाही. व्हॉल्तेअर न अभ्यास करता, त्यांचीं विचारांची प्रगल्भता लक्षात न घेता, फक्त एक वाक्याने प्रभावित होणे हे अतिशय धोक्याचे असू शकते. सोयीने अर्थ लावण्यात आपला नावलौकिक आहेच, हे नमूद करण्यास नको. याचे परिणाम सध्या बघायला मिळत आहेतच, व्यक्तिस्वातंत्र्याची जबाबदार बाजू समजून न घेता त्याबद्दल हिरहिरीने बोलणारे पत्रकारसुद्धा दिसत आहेत.

    - अमित कुलकर्णी, पुणे

    ReplyDelete
  7. हा लेख आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचे दर्शन घडवणारा आहे. आपण जे लिहिलं आहे, ते एक सामान्य वाचक म्हणून कुणालाही पटेल असे आहे. आपण दाखवलेल्या अनेक उदाहरणांमुळे ही जाहीर व्यक्तिगत माफी अधिकच खटकते हे शंभर टक्के मान्य.

    - मंगेश नाबर, मुंबई

    ReplyDelete
  8. आपला लेख वाचला. आपल्या विचारांशी मी सहमत आहे. `लोकसत्ता’ विषयी मला नेहमीच आस्था वाटत आली आहे कारण माझे चुलते कै. द्वारकानाथ भगवंत कर्णिक हे त्याचे पहिले संपादक होते. कुबेर यांनी `असंतांचे संत’ हा अग्रलेख लिहिला, तेव्हा मला थोडे आश्चर्यच वाटले होते व त्यांच्या राजकीय विचारांबद्दल निर्माण झालेला माझा विरोध काहीसा निवळला होता. तेवढ्यात त्यांची `दिलगिर चौकट’ वाचनात आली. मला त्या वेळी जे वाटले त्याचे `तिरस्कार’ या शब्दात वर्णन करावे लागेल. याआधी कोणताही संपादक इतक्या खालच्या पातळीवर गेला नव्हता. अगदी वागळेसुद्धा. अग्रलेख `पाठीमागे घेणे’ ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे. अग्रलेख वेबसाईटवरून गायब केला म्हणून हजारो वाचकांकडे वितरित झालेले अंक गायब होत नाहीत. ते काही परत मागवून घेता येत नाहीत. कुबेर यांनी `लोकसत्ता`चे संपादक म्हणून जे काही थोडे-बहुत नाव मिळवले होते, ते एका रात्रीत धुळीस मिळवले आहे. एखाद्या दुसऱ्या स्वाभिमानी माणसाने राजीनामा दिला असता. तो स्वाभिमान कुबेरांकडे दिसत नाही, असे खेदाने म्हणावे लागते. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी विचार करावा. नाहीतर `लोकसत्ता`चे अग्रलेख यापुढे - मग ते कुबेरांनी स्वत: लिहिलेले असोत वा त्यांच्या संपादक मंडळातील दुसऱ्या कुणी - गांभीर्याने कुणी घेणार नाही.

    - यशवंत कर्णिक, मुंबई

    ReplyDelete
  9. अतिशय योग्य, समर्पक आणि योग्य वेळ. गिरीश कुबेर यांचे परफॉर्मन्स अप्रायजल (कार्यमीमांसा) अतिशय यथार्थ. या विषयावरील माझाही लेख ते छापतील की नाही याची मात्र खात्री नाही.

    - देवेंद्र, पुणे

    ReplyDelete
  10. Nice and thought provoking blog on Kuber and Loksatta edit.

    - Dnyanesh Jathar,
    Chief Of Bureau, THE WEEK, MUMBAI

    ReplyDelete
  11. खूप आवडला लेख. संतुलित, तरीही सडेतोड!

    - शेफाली वैद्य, पुणे

    ReplyDelete
  12. गेल्या काही दिवसांत या विषयावर लिहिल्या गेलेल्या आणि माझ्या वाचनात आलेल्या अनेक लेखांमधील सर्वोत्कृष्ट लेख हाच; या समतोल परंतु सणसणीत लेखाबद्दल तुमचं मन:पूर्वक अभिनंदन.

    अनेक नवीन गोष्टी कळल्या. काही ठिकाणी असं वाटलं की माझ्या मनातलंच लिहिलं आहे तुम्ही, इतकी तुमची आणि माझी मतं जुळतात. आपण दोघंही समानशील असलो पाहिजेत खास.

    तुमची शैली विशेष आहे. साहजिकच आहे, पत्रकारितेचा एवढा दीर्घ अनुभव असल्यावर. अगदी स्वच्छ लिहिता तुम्ही. तेच मला आवडलं.

    - मृदुला जोशी, मुंबई

    ReplyDelete
  13. खरं म्हणजे या साऱ्या प्रकारात अग्रलेख मागे घेणे यावर भर दिला जात असला तरी त्यामागून येणाऱ्या घटनांचा मोठा धोका कुणाच्या लक्षात येत नाही. तसा कुणावरही सरळ टीका न करणारा हा अग्रलेख कुणाच्या तरी आग्रहावरून मागे घेण्याइतपत विचारस्वातंत्र्याचा गळा घोटला जातो, याचाच अर्थ नंतरच्या काळात आम्हाला असे भीतीच्या सावटात काटछाट केलेले विचारच ऐकायला मिळतील. खरा वैचारिक कस देणारे `लोकसत्ता` हे एकमेव वृत्तपत्र होते; आता तेही या दडपणाखाली येणार असेल तर काही नव्या पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे. केवळ वाचकांची मालकी असणारे माध्यम असू शकते का याचा मध्यंतरी विचार होत होता. तीही कल्पना व्यवहार्यतेच्या मुद्द्यावर मागे पडलेली दिसते. परंतु आपण समजतो तसे या प्रकरणात दिसत नाही. वृत्तपत्रातील आर्थिक घटकाच्या हस्तक्षेपापेक्षा राजकीय व आता राष्ट्रीयत्वाचा बुरखा पांघरणाऱ्यांचेच हे कृत्य असावे असा दाट संशय येतो.

    - डॉ. गिरधर पाटील

    ReplyDelete
  14. 'खोडलेले `अ-क्षर`' वाचले. ज्या पोटतिडिकीने आपण निरपेक्षपणे सत्याच्या मागे उभे राहाता, ती आपल्या मनाची 'कुबेरी'च म्हणावी. त्याची निश्चितच दाद द्यावयास हवी. सत्य हे उघडे-बोडकेच शोभून दिसते; त्याला कावेबाजपणाचे अस्तर नसते! एक मात्र खरे की, लबाडांच्या दुनियेत 'वृत्तपत्र संपादक' असणे म्हणजे तारेवरची कसरत. या कसरतीतून संत ज्ञानेश्वर-तुकाराम-एकनाथ यांची कुबेरीही सुटली नाही. खरं सांगू का कुलकर्णी साहेब, शब्दाची कुबेरी वापरून समस्त राजकारणी, समाजास शहाण करणे म्हणजे सावलीबरोबर लढण्यासारखं आहे..! आणि एवढं करूनही शेवटी जग हे विसरभोळं असतं. असो.
    `सुखस्य मूलं धर्मः। धर्मस्य मूलं अर्थ:। अर्थस्य मूलं राज्यम्।` या चाणक्य नीतीचा दाखला देऊन स्व. राजीव दीक्षित यांनी याच विषयावर मार्मिक प्रकाश टाकला आहे.

    - श्रीराम वांढरे, भिंगार, नगर

    ReplyDelete
  15. आपला हा लेख खूप आवडला. मला कुबेरांचे अग्रलेख आवडतात; पण त्यांच्या मनातील दुसऱ्यांसाठी असलेली तुच्छ भावना आवडत नाही. आपण त्यांच्या 'बोगस बळिराजाची बोंब' अग्रलेखाचा उल्लेख केला आहे. त्या लेखाचा समाचार घेणारा लेख मी नांदेडच्या एका दैनिकात लिहिला होता.

    - प्रा. सुरेश जाधव, नांदेड

    ReplyDelete
  16. आपण `लोकसत्ता`च्या त्या अग्रलेखाविषयी चांगली मांडणी केली आहे. पत्रकार-संपादकाच्या स्वातंत्र्याविषयी आपण लिहिले आहे आणि सभ्य व्यवस्थेत मला ते १०० टक्के मान्यच आहे. पण संपादकांच्या अहंकाराचा जो मुद्दा उपस्थित केला आहे, त्याची चर्चा न करता, तो आपण सोडून दिला आहे. याचा अर्थ ज्याच्या हातात लेखणी आहे, त्याने आपला विचार एकतर्फी थोपवावा, असा घ्यायचा का?

    हा विषय केवळ श्री. गिरीश कुबेर यांच्याशी संबंधित नाही. पण पुन्हा कुबेर यांचेच उदाहरण द्यायचे तर `अर्थक्रांती`वर दोन वर्षांपूर्वी, असाच पुरेशी माहिती न घेता 'अर्थवांती' नावाचा अग्रलेख त्यांनी लिहिला होता. त्यांनी अग्रलेखाची मांडणी एक अर्थतज्ज्ञ म्हणून केली असती तर ते समजण्यासारखे होते. पण त्यांनी त्या पदावर बसून खोडसाळपणा केला होता. त्यामुळे आम्ही एक प्रतिक्रिया पाठविली. त्यांच्याशी मी बोललोही आणि आपण कशा अपुऱ्या माहितीवर अग्रलेख लिहिला आहे, शेरेबाजी केली आहे, हे सांगितले. आम्ही दिलेली प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्याची विनंती केली; पण कुबेर यांनी त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. मग आम्ही फेसबुक आदी माध्यमांची मदत घेतली. पण त्याला अर्थातच मर्यादा होत्या. कारण ज्या वर्गापर्यंत हे लेखन गेले त्या वर्गापर्यंत आम्ही पोचूच शकलो नाही. अशा वेळी काय करायचे, असा माझा प्रश्न आहे. (आपण माझ्या फेसबुकवर ते पत्र आणि चर्चा पाहू शकता.)

    मीही संपादक म्हणून काम केले आहे. संपादकपदाचा मान त्या खुर्चीचा मान आहे, त्यामुळे वाचकांचे पल्याविषयी आणि आपले आपल्याविषयी गैरसमज होतात, असा माझा अनुभव आहे. शिवाय ज्याला गाजवायचे आहे, त्याला त्यामुळे ऐतीच संधी चालून आल्यासारखे होते. त्यामुळे संपादक भाषणे करून सगळ्याच विषयांवर बोलू लागतात, एवढेच नव्हे तर त्यांच्या व्याख्यानांना गर्दी होते आणि त्याचे रकानेच्या रकाने अंकात प्रसिद्ध होतात. त्यात आपण समाजातील त्या विषयातील जाणकारांचा अपमान करतो, हे लक्षातही येत नाही. काही वेळा तर हे वादच अनेकांना समाज पुढे घेऊन चालला आहे, असे वाटू लागतात. पण विश्वासार्हता गमावल्यामुळे त्याचा परिणामही होत नसतो, हे विसरले जाते. सर्व प्रतिष्ठा, उपाध्या, पुरस्कार बहाल केले जातात. असे पुरस्कारांचे विक्रम साजरे केले जातात. सर्वात वाईट म्हणजे ते म्हणजे चांगले, असे विकृत काही रूढ केले जाते. ही घोर फसवणूक आहे. याचा न्यायनिवाडा कोठे होतो?

    तातडीने मत देण्याच्या आणि वाचनीय करण्याच्या नादात माध्यमे समाजाचे किती नुकसान करीत आहेत, हे आज पाहायला मिळते आहे. एवढेच नव्हे तर अशा काही माध्यमांनी म्हणजे काही लोकांनी समाजाला एका नकारात्मकेत ढकलून दिले आहे. हे केवढे नुकसान आहे!

    संपादक आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी मनात आदर आणि काळजी असूनही अशा परिस्थितीत त्यांच्या वेगळेपणाची आणि स्वातंत्र्याची अशी किती आणि का चर्चा करायची असा प्रश्न मला पडला आहे.

    - यमाजी मालकर, पुणे

    ReplyDelete
  17. लेख वाचला. सडेतोडपणा मनाला भावला. गिरीश कुबेर यांच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला.

    - पांडुरंग भा. देशमुख, दहिसर, मुंबई

    ReplyDelete
  18. मस्त, नवीन माहिती देणारा आणि स्पष्ट वाटला ब्लॉगवरचा हा लेख. विशेषत: 'कुणाची आणि कशाचीही भीडभाड न बाळगता....' हा परिच्छेद आवडला, कारण त्यातला मजकूर माझ्या निरीक्षणाला पुष्टी देणारा वाटला.

    - पराग पुरोहित, पुणे

    ReplyDelete
  19. ‘मला तुझे विचार मान्य नसतीलही कदाचित. पण ते मांडण्याच्या तुझ्या हक्काचे मी प्राणपणाने संरक्षण करीन.’ पत्रकारांनी हवं तर व्हॉल्तेअर अभ्यासू नये; पण त्यांचे हे बोल नक्कीच लक्षात ठेवावेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं याहून अधिक समर्पक स्पष्टीकरण नाही...... हे अतिशय महत्त्वाचे सारवाक्य आपण मांडले आहे. केवळ पत्रकारचे नाहीत तर समाजातील सर्वच घटकांनी या सारवाक्याचे भान जपले तरच आपण सुसंवादी समाजाकडे वाटचाल करू शकू, असे वाटते. धन्यवाद आपल्याला, एका संतुलित विचारलेखासाठी...!!!

    ReplyDelete
  20. `लोकसत्ता`मधील अग्रलेखाबाबतचा `खोडलेले`अ-क्षर`` लेख सर्वांगसुंदर आहे. मुद्देसूद, सडेतोड आणि अभ्यासपूर्ण असलेला हा लेख पत्रकारितेच्या सर्व अंगांना स्पर्श करतो. दिलगिरीसह अग्रलेख मागे घेण्याचा प्रकार प्रथमच घडल्याने या दैनिकाने आपले हसू मात्र करून घेतले. या प्रकारास संपादक सर्वस्वी जबाबदार असले, तरी अन्य घटकांनी अंग काढून घेणे अन्यायकारकच आहे. गिरीश कुबेर यांना एकाकी पाडण्याचा हा कट हेतुपुरस्सर रचला गेल्याने परिस्थिती आणखी घातक आणि चिंताजनक वाटते. त्यांच्यावर ही वेळ का आली, कुणी आणली, अन्य घटकांची भूमिका काय याबाबतचे सारे गौडबंगाल उघड होणे गरजेचे वाटते, एवढेच..!

    - प्रताप देशपांडे, नगर

    ReplyDelete
  21. १ श्री. कुबेरांनी मागितलेली माफी वैयक्तिक होती हे लक्षात आले नव्हते.
    २ 'मी'चा अर्थ व्यवस्थापन कुबेरांच्या पाठीशी नाही हेही लक्षात आले नव्हते.
    ३ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यास -तेही एका नावाजलेल्या संपादकास व्यवस्थापनाने असे एकटे सोडावे हे चूकच आहे
    ( Sorry! my computer is refusing to type in Marathi. I have to complete the rest in English )
    4 Editorial is withdrawn means it has been deleted on web site. But people have already read it in print. It cannot be erased from their memories. Management may have thought it better to close the matter by taking this step so as to avoid legal action. It might have persuaded Mr. Kuber not to resign.
    5 Politics is bad enough but Religion and Politics is a lethal combination. We are ordinary people and are most of the time unable to stand the ground in opposition. This is a charitable view that I take on Mr. Kuber not resigning.
    6 I believe a ' blog ' is ' personal '. I would have avoided opinions about Mr. Kuber. (they weaken his case.)
    7 On going thru the editorial itself, I find nothing wrong in it. Mr. Kuber has apparently investigated and researched the matter leading to ' canonization' of Mother Theresa. Everybody knows today that ' miracles ' do not happen He is against deifying Mother Theresa. He rightly observes this will happen again. He is also right that in all religions Popes or Dhrmagurs or Paigambars - whatever name you call then by- wish to keep power and hold on common people with them. They join hands with the political power ' Rajsatta' to achieve this or even take over Rajsatta as has happened all over the World. He has cited examples from history of all religions and has not singled out Mother Theresa as such For this very reason, religious Institutions do not accept Science and
    the progress it has made and keep clutching ( apparently) to ' blind faith' As regards observations about ' care taken of patients in Hospitals of Missionaries of Charity , Mr. Kuber has cited references and hence cannot be faulted for his conclusuion. I would like to concede that Mother Theresa was a kind hearted woman and devoted all her life taking care of ' destiutes' whom the Society that is we had rejected- may be with an ulterior motive of converting them to Christianity. But does it alone reduce the merit of service rendered by her. Did she throw back the destitutes on street after they converted?
    8 This issue is like the story of a number of blind men touching and feeling an elephant to find out what it is. There will be many a diverse opinion on this.
    9 News papers are known by their ' editorials '. In this respect Loksatta
    stands tall. I read the editorial in every issue of Loksatta. Mr. Kuber has taken the paper to great heights. Its weekly supplements- ' Chaturang' and ' Lokrang' are a must for me. I preserve them. Loksatta is very active in a great many social fields- leadership provided by Mr. Kuber.
    10 It is indeed sad that the media fraternity has not stood by him. Self interest -alas - always comes first.

    Let Saint Mother Theresa's soul rest in peace.

    - Suresh Deolalkar, Hyderabad

    ReplyDelete
  22. kahre tar kuberanbaddal maze vaiyaktik mat purvihi changle navate ni nahi.tasa maza n tyancha arthaarthi kahis sambandh nahi.Pan loksattatil anek manyawar mandali te sampadak zalyawar vegveglya yruttpatrala join zale,tevha kahi kanawar ale.
    hi wel tyanchyawar yenar hoti kinwa tyanich odhwun ghetliye ase mala watate.by d way tumhisatwik ,patrkaritechi buj rakhnare lekhan ya nimittane kele asun bhandwalshahine sampadakanche sthan kase takladu karun takley te mandlet,jyachi sarvsamany vachakala kalpana asane shaky nasate .
    Yenara kal ha patrkarita samplyachi chinhe darshwanara asel kay/ Sarkar konachehi asle tari te paishawalech chalwatat,he anantim saty ahe,Tyamule he n talata yenare ahe.kontya tari pakshachi gruhpatrika mhanun paper chalwnari mandali he lakshat ghetil ka?ya drushtine tumchya SHABDSANWAD madhil kahi lekh punha athwtat.
    Well done,satishji

    ReplyDelete
  23. हा लेख वाचून खरच मनस्वी खूप आनंद झाला . आपल्या सहकाऱ्याच्या गुणदोषांचे वर्णन करत असतानाच त्याच्या बद्दल असणारी आपुलकी आणि संकट समयी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची दिलदारी आपल्यासारखा उदंड मनाचा माणूसच दाखवू शकतो . या अल्पावधीत आपल्या व्यासंगाचा आलेला अनुभव खूप काही शिकवणारा आणि समजावणारा ठरला आहे .
    --- आपल्या 'खिडकीत ' सतत डोकावणारा......आपला आशिष

    ReplyDelete
  24. सर, आपली मांडणी संतुलित असली तरी लेखाच्या अखेरीस आपण नमूद केलंय,की 'एक व्यावसायिक पत्रकार म्हणून 'संपादक' गिरीश कुबेर यांना पाठिंबा व्यक्त करणे आवश्यक वाटतं' - याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? नोकरीसाठी किंवा पदासाठी कुबेर यांनी केलेली व्यावसायिक तडजोड योग्य म्हणायची का? आपण व्यावसायिक पत्रकार आहोत, या नात्यानं अापण करीत असलेली तडजोड संपादकही करत असतील, असं समजून घ्यायचं का? मग, कुबेर यांनी अाणखी तडजोड करावी. यापुढे अापण व्यवस्थापकीय संपादक अाहोत, असं जाहीर करून, यापुढे अग्रलेखृ-लेख लिहिणार नाही, असे किमानपक्षी जाहीर करावे. संपादक अाणि पोटार्थी पत्रकार यात थोडा फरक आजही आहे, तोपर्यंत कुबेर टीकेस पात्रच आहेत...

    ReplyDelete
  25. `खोडलेले अ-क्षर` अप्रतिम, संतुलित, सम्यक आणि सत्य विचार मांडणारे. पत्रकारांचे डोळे उघडणारा आहे हा लेख.

    - डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...