लिहायला-वाचायला शिकल्यापासून पेपर वाचायला लागलो की, पेपर वाचायला लागल्यापासून लिहायला-वाचायला
शिकलो, हे आठवणं अंमळ कठीणच आहे. कळतंय तेव्हापासून वाचतोय.
पण वाचतोय तेव्हापासून कळतं आहेच, असं अजाबात नाही. सदर
लेखकाची (म्हणजे सदर ‘सदर’ नव्हे,
तर हा मजकूर लिहिणारा लेखक, सदर इसम या
अर्थाने!) हीच गोची आहे.
अस्मादिकांना लहानपणापासून पेपर वाचण्याची फार्फार आवड. पण
त्यातील अग्रलेख, लेख, स्फुटे, क्रीडा, अर्थव्यवहार आदी विषयांत आम्हाला कधीच रस नव्हता. राजकारण चुलीत जावो नाही
तर (विनाअनुदानित) गॅसच्या शेगडीवर होरपळो; त्याच्याशी देणे-घेणे
नाहीच! हटके बातम्या हीच खरी आपली आवड. उदाहरणार्थ – ‘शेळीने
दिला चार करडांना जन्म’, ‘नागाच्या डोक्यावर बसला उंदीर’,
‘पपईत दिसला गणपती’, ‘दुधी भोपळ्यात आढळला
मारुती’ इत्यादी इत्यादी बातम्या आम्ही चवीनं चाखत (आय मीन
वाचत...) आलो आहोत. हल्ली हल्ली तर ‘बाईने दिला मुलीला जन्म’
अशीही बातमी चौकटीत वाचायला मिळते की काय, असे
वाटू लागले होते. ‘नारळात सापडला मोदक’ ही बातमी वाचल्यावर दिवसभर विचार करीत राहिलो. मोदकाच्या आत खोबऱ्याचे
सारण असते. मग इथे त्या नारळात मोदक कसा? आणि त्याचा
अतिविचार केल्यामुळे डोकं दुखू लागलं. नशीब. हे कुणा पत्रकाराला कळलं नाही. नसता
दुसऱ्या दिवशी वन पॉइंट ब्ल्याक रुळाच्या चौकटीत ‘नसणाऱ्याचेही
दुखू लागले डोके’ अशी बातमी आली असती!
मध्यंतरी माध्यमक्रांती झाली. मोबाईल आले, मग ते स्मार्ट (आता
ओव्हरस्मार्ट!) झाले, महाजाल आले. या साऱ्यामुळे
आमच्यासारख्या वाचकाची फार सोय झाली. अशा असंख्य बातम्या फुकटात मिळू लागल्या. ‘जगातील सर्वोत्तम राष्ट्रगीताचे युनेस्कोचे बक्षीस भारताला’, ठणठणीत असलेल्या (आणि एवढ्यात ईहलोक सोडण्याची शक्यता नसलेल्या) माणसाला ‘आरआयपी’ अशी अल्पाक्षरी सामुदायिक आदरांजली, सिनेमाच्या कोटी-क्लबाच्या कोट्या... अशा बातम्यांमुळे टाईमपास होतो.
माहितीत उत्तम भर पडते. कट्ट्यावरच्या गप्पा गाजवायला, फॉरवर्ड
करायला संबंधित मजकूर उपयुक्त ठरतो. आपण ‘अपडेट’ असल्याचा भास होतो. ज्ञानसंपन्न होणे याला आमचे कधीच प्राधान्य नव्हते.
माहितीसंपन्न असणे आधुनिक जगात आवश्यक आहे, यावर आम्ही ठाम
आहोत.
इंटरनेटमुळे तर ‘पाँचो ऊँगलियाँ घी में’ असेच प्रत्ययास येऊ लागले. फेसबुकावर जाऊन सुंदर सुंदर चेहरे न्याहाळत लाईकचे बटन क्लिकत असताना भिंतीवर बाजूला अशा बातम्यांकडे खेचणाऱ्या पोस्ट असतात. एकदा तुम्ही एकावर क्लिकले की, दुसऱ्या दिवसापासून रतीब सुरूच होतो. वाच लेका किती वाचतोस ते. बघ लेका किती बघतोस ते. (आणि बघतोच, या महापुरातून कसा वाचतोस ते!)
पण या मोहाकडे आम्ही पाठ फिरविली. (जशी कार्यालयात जबाबदारीकडे अत्यंत जबाबदारीने फिरवितो तशी!) त्याऐवजी आम्ही ‘bizarre news’ या इ-नियतकालिकाचे वर्गणीदार झालो. (त्याची विपत्रे नियमित आणि मोफत मिळतात म्हणूनच!) आता ‘bizarre news’ देवनागरीत कसे खरडावे, हे भरपूर प्रयत्न करूनही न समजल्याने आम्ही ते शब्द तसेच ठेवले आहेत. आमचे हे अज्ञपण सुज्ञांच्या ध्यानी आले असेलच.
ते सोडा. या इ-नियतकालिकांकडून नियमित येणाऱ्या बातम्या आमची
माहितीची भूक उत्तमप्रकारे भागवितात, हे आवर्जून सांगितलेच पाहिजे. उदाहणार्थ - लास वेगासमध्ये
फिरणाऱ्या एका पाहुण्याच्या डोक्यावर धारांचा वर्षाव झाला, पाऊस
आला या आनंदात तो फेसबुकावर टाकण्यासाठी कविता रचण्याचे मनात आणत होता. तेवढ्यात
त्याला कळले की, त्याची पावसाची शंका योग्य नसून, एका पोट्ट्याने केलेली ती लघुशंका आहे. आणखी एक म्हणजे कॅनडाच्या
पोलिसांनी अग्निशामक दलातील एका जवानास अटक केली. एका गावात लागलेल्या एकोणीसपैकी 18 आगी लावण्यात (आणि नंतर विझविण्यात) त्याचाच हात होता म्हणे!
फ्लोरिडामध्ये पिस्तूल साफ करता करता गोळी उडून एक तरुण जखमी झाला. आणि ते
त्याच्या दोन दिवसांनंतर लक्षात आले ते शर्ट बदलताना. त्याचे नाव ‘संजूबाबा’ वगैरे होते का, याचा
तपशील त्यात नाही. ‘कॉर्न ऑन द कॉब चॅलेंज’मध्ये भाग घेणाऱ्या एका चिनी महिलेला थोडे टक्कल कसे पडले, विस्कॉनसिन नदीत मासेमारी करणाऱ्या एकास 60
वर्षांपूर्वीचे बीअरचे कॅन कसे सापडले आणि ते रिकामेच आढळल्यावर त्याला कशी हळहळ
वाटली...
पण एवढ्या सगळ्या बातम्या (नियमित) वाचताना एक खंत मनात होतीच.
या साऱ्या (विचित्र) विश्वाच्या नकाशावर भारताचे नाव औषधालाही सापडत नाही. पण
गेल्याच आठवड्यात ती दूर झाली. वैद्यकशास्त्राच्या मदतीनं दलजिंदरकौर यांनी
बाहत्तराव्या वर्षी आई होण्याचं सुख अनुभवलं. त्यांचे पती मोहिंदरसिंग गिल 79 वर्षांचे आहेत.
... गेल्या आठवड्यात ही बातमी वाचली आणि आपला देश कशात आणि
कुठेच मागे नाही, याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला. ‘... की जय!’ असे किंचाळण्याचा हुरूप आम्हास नव्याने
आला. तूर्त, असो!
---
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक सकाळ, 19 मे 2016)
मनोरंजक बातम्या ..........अस्सल मसाला..........खूपच मस्त.......
उत्तर द्याहटवा