Sunday, 29 May 2016

मत्प्रिय नगरा...

(अहमदनगर असं कागदोपत्री नाव असलेलं आणि साऱ्यांच्या बोलण्या-लिहिण्यात कायम  नगर असाच उल्लेख येत राहिलेल्या या शहराचं वयोमान पाचशेहून अधिक आहे. त्याचा स्थापनादिन 28 मे. गेल्या अडीच दशकांपासून तो साजरा होतो. त्याच आठवणी, तेच कढ, तीच महता आणि तीच गाथा... उत्सवी स्थापनादिनापलीकडे कधीच काही होत नाही. या शहराबद्दलची आपुलकी व्यक्त करणारी ही कविता. अडीच वर्षांपूर्वी केलेली... आणि वर्तमान पाहता भविष्यातही तशीच लागू राहील, असंच खंतावून म्हणावंसं वाटतं.)

भोऐतिहासिक नगरा
उपेक्षेचे वारे सोसत
परी ना कण्हतना कुथत
संथ गतीने सुरूच आहे 
तुझी वाटचालअखंडित


पारतंत्र्याच्या सोसून अनेक
 ‘शाही
अनुभवतोयस सध्या लोकशाही
पण तुझ्या गौरवाच्या आणि कुचेष्टेच्या 
लिखाणाची अजूनही आहे ओली शाई 

पाचशतकी वयाचा तुझ्या 
उल्लेख होतो वारंवार
पण बा नगरानाहीत दिसत 
वार्धक्याच्या काहीबाही खुणा 
तुझ्या अंगावर... 
हांदिसताहेत सुरकुत्या कधीच्या 
झालेल्या त्या तरुणपणीच्या 
उपेक्षेच्याकुपोषणाच्या... 

लढायांतल्या तलवारींचा 
तू ऐकला आहेस खणखणाट 
आणि मंदिरात वाजणाऱ्या  
टाळ-घंटांचा किणकिणाट
तरीही स्तब्ध आणि सुज्ञ
नेहमीसारखाच स्थितप्रज्ञ! 

ऋषी-मुनीसाधू-संतांचा 
नित्य लाभलाय सहवास 
आणि हव्यासी सत्ताधीशही 
करून गेलेत येथे वास 
पण आहे तीच परिस्थिती 
झकासमानत राहतोयस खास 

भरण-पोषणाच्या
नि सुजाण पालकत्वाच्या 
कल्पनाच आहेत तुझ्या वेगळ्या 
देगा उसका भला
न देगा उसका भी भला 
धुंदीत जगतोयस आगळ्या... 

कुणीही यावे 
टिकली मारुनी जावे
तसे कुणीही यावे नि 
राज्य करुनी जावे... 
तुझे त्याला ना सोयर - ना सुतक 

प्रश्न पडत राहतात
उत्तरे कधी तरीच 
सापडत असतात
अनुत्तरित समस्या 
चिघळून लसलसतात... 
मिरवतोस तू त्या अंगावर 
लखलखत्या दागिन्यांगत! 

उसाच्या हिरव्यागार मळ्यांतून 
घोंगावतात दुष्काळी वारे 
आणि वाहत्या कालव्यांतून 
पुढे जातात तहानेचे झरे 
भुकेला-तहानलेला तू
आहेस तेथेतसाच राहा बरे 

खुणावणारे पुणे
हिणवणारे नाशिक
चमकणारे औरंगाबाद 
या त्रिकोणात तुझा 
न दिसणारा चौथा कोन 
बोथटन टोचणारा... 

झगमगत्या त्या महानगरांकडे
पाहून नाहीत तुझे दिपत डोळे 
कोठूनकाही कळत नाही
पण मिळवलेस हे शहाणपण खुळे

ग्लोबल युगापासून तू 
नसशी रे लांब फार
पण नाही तुझा हात 
त्याच्या खांद्यावर 
सबबइतके जवळ 
तरीही दूर
पडले हे केवढे अंतर 

नव्या जगात जगताना 
कितीही आले जिवावर 
रोज करावे वाटते हाऽऽय
तरीही म्हणावे लागते बाऽऽय 

फेसबुकावर तुला मानाचे पान 
कितीक लाईककॉमेंट्‌स छान 
दुरावा तुझा साहवेना
परि तुझ्याजवळ राहवेना!(पूर्वप्रसिद्धी : दैनिक सकाळ, 22 नोव्हेंबर 2013)

2 comments:

 1. मस्त. शहराशी संवाद ही कल्पना आवडली. आपल्या शहराला आपण बोलावे, असे लोकांना वाटले, तर शहरे जिवंत वाटू लागतील.

  उसाच्या हिरव्यागार मळ्यांतून
  घोंगावतात दुष्काळी वारे
  आणि वाहत्या कालव्यांतून
  पुढे जातात तहानेचे झरे
  हे कडवं छानंय!

  पण चमकणारे औरंगाबाद? कुठाय ही चमचम? आम्हाला कशी दिसत नाही बरे?
  इथे आम्हीही पाहतो दुसऱ्या झगमगणाऱ्या शहरांकडे.

  ReplyDelete
 2. नगर चे वास्तव कवितेत अवतरले!
  स्तुत्य प्रयत्न, अभिनंदन!
  (अण्णासाहेब वाकचौरे)

  ReplyDelete

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

  'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...