शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

पाहिलं ते टिपलं


सुरुवात परतीच्या प्रवासापासून आणि मानवी संस्कृती वसविणाऱ्या नदीपासून.
मंदसौरहून धुळ्याकडे निघाल्यावर खलघातच्या थोडे पुढे नर्मदामाता दर्शन देते.
विस्तीर्ण पात्र, भरपूर पाणी. तिच्या दर्शनानंच प्रसन्न वाटतं.

रत्या वर्षाला निरोप दिला आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं ते प्रवासातच. दोन दिवस तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतो. संकल्प थोरात याच्या आंतरविद्यापीठ सायकलिंग स्पर्धेनिमित्त बिकानेरला जाणं झालं. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामानंतर परतताना पुष्कर व अजमेर यांचा धावता दौरा केला.

या सहलीत खूप काही पाहणं झालं नाही, फार वेगवेगळ्या ठिकाणी चवीनं खाणं झालं नाही. असं असलं तरी मिळालेल्या वेळात या दोन्ही गोष्टी आवर्जून केल्या. आणखी एक गोष्ट म्हणजे फोटो. सोबत कॅमेरा नेला होता. शक्य होतं तिथं तिथं छायाचित्रं काढली. काही काही तर अगदी धावत्या मोटारीतून.

कॉलेजमध्ये असताना प्रयोगपुस्तिकांची (जर्नल) सजावट करण्यासाठी मला स्केच पेनांचा संच मिळाला होता. भौतिकशास्त्राच्या पहिल्या प्रयोगाची नोंद करताना मी पाच-सहा वेगवेगळे रंग वापरून रंगपंचमीच खेळली होती. आमचे अध्यापक अतिशय चांगले होते. त्यांनी मला बोलावून समजावलं - एक किंवा दोनच रंग वापरावेत. म्हणजे मग चित्रविचित्र दिसत नाही.

कॅमेरा घेतल्यानंतर जेव्हा जेव्हा प्रवास केला, तेव्हा तेव्हा त्याचा वापर मी पहिल्या वेळच्या स्केच पेनांसारखा केला. वाटलं की, टिपलं छायाचित्र. त्यातले तांत्रिक तपशील अजून कळत नाहीत. तो वापरणारा हातही तयार झाला नाही. नजरेला भावलेलं तसंच्या तसं छायाचित्रात सापडत नाही. आपण क्लिक करत राहायचं, अपघातानं काही छायाचित्रं चांगली येतात, एवढं बरीक कळलं आहे.

या सात दिवसांच्या सहलीत बरीच छायाचित्रं काढली. त्यातली थोडी चांगली आली, काही बरी. चांगल्या छायाचित्रांचं श्रेय अर्थात त्या आधुनिक तंत्राच्या कॅमेऱ्याला...

नव्या वर्षाचा पहिला दिवस. सकाळी भरपूर थंडी होती. नयागांवमध्ये कडेकोट बंदोबस्तात दिसलेली ही मंडळी.













पाहुणे दूर देशीचे दिसती,
कुठून कुठे चालले असती?
असंच एक गाव. सकाळ संपून दुपार चालू झालेली असली, तरी थंडी आहेच. म्हणून एवढा जामानिमा. गाडीतून कुणी तरी कॅमेरा काढून बघतोय. थोड्या कुतुहलानं आणि स्मितहास्यानं मिळालेला प्रतिसाद.





गढी चिरेबंदी आणि खाली साधी घरं. दगडी इतिहासाला पाठीशी घेऊन सिमेंट-काँक्रिटचं वर्तमान. हे गाव कोणतं, गढी कोणाची काही माहीत नाही.

फलक जे अंतर दाखवत आहे, तो पल्ला खूप लांबचा. आंतरविद्यापीठ स्पर्धेतील सायकलपटूंना दुसऱ्या दिवशी एवढं दूर जायचं नसलं, तरी 'टीम ट्रायल'मध्ये १२० किलोमीटरचं अंतर कापायचं होतंच. त्यासाठी निघालेला हा चौघांचा चमू.








काकध्यान!
अहमदाबाद-दिल्ली महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर गाडीची भूक भागविण्यासाठी थांबलो, बाजूच्या झाडावर ध्यान लावून बसलेल्या  या महाशयांनी तेव्हा खुणावलं.














अजमेर, पुष्कर इथली गर्दी टाळायची म्हणून ब्यावरमधून दुसरा रस्ता निवडला.
या रस्त्यानं दमणूक केली खरी; पण जाता जाता अशी नैसर्गिक शिल्पंही पाहायला मिळाली. शिवपुरी घाटाच्या खूप अलीकडे सहज नजरेला पडलेला
आणि चालत्या गाडीतून टिपलेला हा नैसर्गिक चमत्कार.


बिकानेरच्या जुनागढ़मधील राजसिंहासन. महिरप, त्यावरची कलाकुसर. पाहण्यासाठी वेळ अपुरा पडतो.
















जुनागढ़मधलाच हा फूलमहाल. त्याच्या दरवाज्यावर सुरेख चित्र, महिरपीवर अप्रतिम कलाकुसर.
त्याच्या खाली आहे तो मेणा. राणीवंशासाठी. असे बरेच मेणे, पालख्या इथे आहेत.












पुष्कराच्या ब्रह्मदेव मंदिराच्या बाहेर खूप दुकानं आहेत. मिठाया, महिलांना आवडणाऱ्या बांगड्या-पर्स, खेळणी असं बरंच काही. हे एक दुकान तलवारींचं. पहिला फोटो काढताच तिथल्या तरुणानं 'नको बरं' असं नजरेनं दटावलं आणि हातांनी खुणावलं.
















हेच ते प्रसिद्ध पुष्करतीर्थ!
समोर पर्वतराजी, डोळ्यांसमोर पाणी - तीर्थोदक आणि तलावाच्या काठावर फडकणारे धर्मध्वज!


















टमटममध्ये मागच्या बाजूला का होईना बसायला जागा मिळाली,
हीच खुशी आणि तोच उत्सव. पेट्रोलपंपावर इंधन भरून चाललेल्या
सहाआसनी रिक्षामध्ये बसलेले बाबा.

पुष्करहून अजमेरकडे नेणारा रस्ता सुंदर आहे. कडेला बरंच काही पाहण्यासारखं.
महाराणा प्रताप यांचा पुतळा गाडीतूनच पाहिला. चालत्या गाडीतून काढलेल्या
छायाचित्रांपैकी त्यातल्या त्यात बरं आलेलं हे एक.
थोडा वेळ थांबून स्मारकाला भेट द्यायला हवी होती, असं आता वाटतं.
....
('...बीकानेर सेलेख - https://khidaki.blogspot.com/2020/02/Bikaner.html)
...
(सर्व छायाचित्रे अस्मादिकांनीच टिपलेली.
कृपया पूर्वपरवानगीविना उपयोग करू नये.)


रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

...बीकानेर से




जुनागढ़चं बाहेरून दर्शन


'राजा और रंक'मध्ये कुमकुमचं गाणं आहे. ती दरोगाबाबूला 'चली आयी हूँ मैं अकेली बीकानेर से' असं सांगताना खूप वेळा ऐकलं. 'बिकानेर मिष्ठान्न भांडार' असे फलक नगरसह अन्य शहरांत पाहिले. तिथल्या भुजियाबद्दल ऐकलेलं. बिकानेरशी संबंध एवढाच.

'पधारो म्हारे देस...' असं आमंत्रण राजस्तानातून कधी कुणाकडून आलं नाही. पण वर्ष संपता संपता निर्मल थोरात ह्यानं सोबत म्हणून चलायला सांगितलं. बिकानेरला जायचं. तिथं नव्या वर्षात संकल्पची आंतरविद्यापीठ सायकलिंग स्पर्धा होती. त्याच्या दोन सायकली, त्यांची चाकं हे सगळं नेण्यासाठी निर्मलनं स्वतःची गाडी काढली. त्यात जागा होती म्हणून 'चल' म्हणाला. गाड्याबरोबर नळ्याची (बिकानेर) यात्रा.

धुळ्याहून मुंबई-आग्रा रस्त्याने मंदसौरमार्गे (आणि इंदूरला बाजूला सोडून) जायचं, असा मार्ग आमचे सारथी वामन ह्यांनी ठरवलेला. त्यांचा नेहमीचा रस्ता. असा प्रवास म्हणजे रस्त्यात स्थानिक खासीयत चाखणं, शक्य होईल ते पाहाणं आणि फोटो काढत राहाणं, ही त्रिसूत्री ठरलेली. त्यानुसार जाण्याच्या मार्गावर कुठं काय खायला मिळेल, हे इंटरनेटवर पाहून ठेवलं.

वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळी सहाचा मुहूर्त ठरला खरा; पण आम्ही नगर सोडलं आठ वाजता. येवले पार केल्यावर मनमाडच्या अलीकडे अंकाई-टंकाई जोडकिल्ले खुणावत होते. अंतर तब्बल बाराशे किलोमीटरचं आणि मुख्य उद्देश स्पर्धा, ह्या दोन कारणांमुळे तिथं थांबणं शक्य नव्हतं. साजिऱ्या दिसणाऱ्या किल्ल्यांना दुरूनच पाहून समाधान मानलं. दुपारची क्षुधाशांती धुळ्याजवळच्या सोनगीर फाट्यावरील 'सुरभि'मध्ये केली. जेवण चांगलं मिळालं; पण खान्देशी भरीत-कळण्याची भाकरी नसल्यामुळे निराशाच झाली. (ह्या खाद्यभ्रमंतीवरचा लेख इथं वाचा; जाता, जाता...खाता, खाता - https://lajzat.wordpress.com 

नरडाणा, शिरपूर, पळसनेर अशी ऐकलेली गावं पाट्यांवर दिसत होती. भरपूर पाणी असलेल्या तापीचं दर्शन झालं. मध्य प्रदेशातील सेंधवा, बालसमुंद पाट्या खुणावून गेल्या. खलघातच्या (खलघाट?) थोडंसं आधी नर्मदामैयाचं दर्शन घडलं. नारेश्वरनंतरची तिची ही दुसरी भेट. विस्तीर्ण पात्र, भरपूर पाणी आणि दोन-तीन पूल. परतताना इथं फोटोसाठी थांबायचं, हे वामनकाकांकडून कबूल करून घेतलं. मुक्काम मंदसौरला ठरलेला होता. त्यामुळे शेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या रतलामला रात्रीच्या अंधारात नुसताच टाटा करून गेलो.

मंदसौरला पशुपतिनाथाचं मंदिर आहे. काठमांडूनंतर फक्त तिथेच. त्या देवस्थानाच्या धर्मशाळेत मुक्काम. उत्तर भारतीय थंडीनं आपली चुणूक दाखवायला मध्य प्रांतातच सुरुवात केली होती. शहराच्या थोडं बाजूला असलेल्या धर्मशाळेत लगेच जागा मिळाली. आठ-दहा माणसं मावतील अशी प्रशस्त खोली. पांघरायला रजया आणि गीझरही. बारा तास गाडीत बसलेल्या माणसांना अजून काय हवं? आणि हो, खोलीचं रात्रीचं भाडं २०० रुपये!

पहिल्या दिवशी बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. बिकानेरमुक्कामी पोहोचायला दुसऱ्या दिवशीसाठी ५५० किलोमीटरचा प्रवास बाकी होता. सकाळी लवकर उठून नयागांव इथं नाश्त्यासाठी थांबलो - पोहे-समोसा-जिलबी. तिथं गंमत झाली. वामनकाकांनी 'एक जलेबी' अशी ऑर्डर दिली. अर्धवट झोप झालेला मालक वैतागला. 'एक नही मिलेगी। कम से कम दो लेना पडेगा।' असं म्हणाला. समजुतीतला घोटाळा नंतर लक्षात आला. आपल्या पद्धतीनुसार आम्ही एक प्लेट मागत होतो नि त्याला एक वेढा वाटला.


चांगल्या फोटोचं श्रेय कॅमेऱ्यालाच!
जवळच एका भाजीवाल्याचं दुकान होतं. आपल्याकडे मिळती तशीच भाजी. बटाटे, कोबी, फ्लॉवर वगैरे. मिरच्या फक्त मोठ्या. वांगी लांबट व हडकुळी, सुरकुतलेली. रताळ्यासारखे कंद दिसले. पण पांढरे. विचारल्यावर भाजीवाल्यानं सांगितलं, 'शक्करकंद.' 'आमच्याकडे याला रताळी म्हणतात आणि ती थोडी विटकरी-लाल असतात,' असं म्हणाल्यावर तो म्हणाला, 'रतालू अलग है। हमारे यहां भी होता है।' दोन-तीन फोटो काढले. चांगला आलेला एक दाखवल्यावर तरुण भाजीविक्रेता म्हणाला, 'डीएसएलआर से फोटो अच्छे ही आते!' धन्यवाद वगैरे देण्याऐवजी त्याने विकेट काढली. माणसापेक्षा त्याचा तंत्रज्ञानावर अधिक (आणि सार्थ) विश्वास होता तर.

निम्बाहेडा सोडल्यानंतर राजस्तानची हद्द लागली. डोक्यातलं राजस्तान डोळ्यांना दिसत नव्हतं. सगळीकडे हिरवंगार. ब्यावर सोडल्यानंतरही दोन-तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी दिसलं. चित्तोडगडनंतर अहमदाबाद-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग पकडला. कापडासाठी प्रसिद्ध असलेलं भिलवाडा रस्त्याच्या बाजूनंच होतं. जागोजागी उड्डाणपुलांचं काम चालू. त्यामुळे वेळेचा-वेगाचा अंदाज चुकू लागला.

या रस्त्यानं बिकानेरला जायचं म्हणजे अजमेर आणि पुष्कर ओलांडून जावं लागणार. ऐन दुपारी, गर्दीच्या वेळी, भर वस्तीतून. त्या ऐवजी ब्यावरवरून आतल्या रस्त्यानं मेडता, नागौर इथून जायचं ठरलं. त्या रस्त्यानं परीक्षाच घेतली. काही भाग चांगला, काही खराब. मध्येच घाट. शिवपुरा घाट तर परीक्षा पाहणाराच. ब्यावरजवळ सिमेंटचे कारखाने असलेलं एक गाव. महामार्गावर जेवायला थांबलो आणि अजून एकसुद्धा नाही वाजला, म्हणून तसंच निघालो. ब्यावरच्या पुढे एकही चांगला ढाबा, हॉटेल दिसलं नाही. सकाळच्या पोहे-समोसा-जिलबीनं दिवसभर आधार दिला. असो!

वर्षाचा पहिलाच दिवस कंटाळवाण्या प्रवासाचा. जाताना नागौरला रस्त्याच्या कडेलाच असलेलं सुंदर उद्यान दिसलं. संध्याकाळ सरून रात्र सुरू झाली आणि कसंबसं आम्ही बिकानेरमध्ये दाखल झालो. दीर्घ प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यानंही परीक्षा घेतली. शहरातले गल्ली-बोळ पार करीत कसंबसं जाट धर्मशाळेत पोहोचलो. बाहेरून अतिशय छोटी वाटणारी ही धर्मशाळा मोठी आहे. साध्या खोल्यांपासून वातानुकूलित खोल्यांपर्यंत; दोन माणसांसाठी आणि दहा जणांसाठीही. माणशी २५० रुपये एवढा अल्प दर. जिल्ह्यातील जाट समाजाने अगदी ५०० रुपयांपासून देणग्या देऊन हमरस्त्यावर ही वास्तू उभी केली आहे. तीन-चार जानेवारीला राज्य सरकारच्या भरतीसाठी मोठी परीक्षा होती. त्या दिवशी तर तिथं जागाच नव्हती. गावावरून गाड्या करून आलेली आठ-दहा तरुण पोरं एकाच खोलीत पथारी टाकून राहिली.

पहिल्या रात्री पटकन दिसलेल्या, जवळ असलेल्या 'नागणाराय होटल एण्ड रेस्टोरेन्ट'मध्ये जेवलो. चांगलं जेवण होतं. गल्ल्यावर बसलेल्या जयपालसिंह भेलू यांनी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो म्हटल्यावर ते जरा खुलले. कारण कळलं. ते आठ-दहा वर्षं मुंबईत होते. मराठी माणसांबद्दल त्यांचं चांगलंच मत. परप्रांतीय म्हणून कुणाचा त्रास झाला नाही. त्रास दिला तो आमच्याच माणसांनी, असं त्यांनी सांगितलं. कौटुंबिक कारणामुळं ते राजस्तानात परतले.


धुके दाटले...
सायकलिंग स्पर्धेचं यजमानपद महाराजा गंगासिंग विद्यापीठानं सलग तिसऱ्या वर्षी स्वीकारलं होतं. धर्मशाळेपासून पुढे अडीच किलोमीटरवर हे विद्यापीठ. देखणं, अजून बरीच कामं चालू असलेलं. स्पर्धा होती जवळच्या नाल गावाजवऴ. स्पर्धेची वेळ सकाळी साडेसातची. आम्ही गाडीतून निघालो तेव्हा एवढं धुकं होतं होतं की, जेमतेम पाच फुटांपर्यंतचं कसंबसं दिसत होतो. त्या दहा किलोमीटरसाठी आम्हाला पाऊण तास लागला. तिथं पोहोचणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी आम्ही होतो. बऱ्याच वेळाने संयोजक आले. त्या दिवशी सूर्याचं दर्शन झालं पावणेदहाच्या सुमारास. 'हे धुकं आणि थंडी तर काहीच नाही, दोन दिवसांपूर्वी याहून अधिक गडद 'धुंद' आणि कडक थंडी होती,' असं कुणी तरी म्हणाल्यावर पुढचे तीन दिवस कसे जाणार याची काळजी वाटलीच. सुदैवाने नंतर तपमापकातल्या पाऱ्यानं वरती जायला सुरुवात केली.


घेवरचा महिना
पहिल्या दिवशी बिकानेरमध्ये चक्कर मारायला गेलो. जिकडेतिकडे घेवरचे ठेले दिसत होते. आदल्या रात्री येतानाच एका स्टॉलने लक्ष वेधलं होतं. चौकशी केल्यावर कळलं की, हा तिथला घेवरचा, फिणीचा मोसम होता. १४ डिसेंबरपासून संक्रांतीपर्यंत महिनाभर अशी दुकानं थाटली जातात. मनोज कुमावत यांच्या स्टॉलवर बराच वेळ रेंगाळलो. घेवर पाहिले. मुगाचा लाडूही चाखला. संक्रांतींसाठी वेगवेगळे गज़क, लाडू, भाजलेल्या शेंगा यांचे स्टॉल रस्त्यावर लागले होते. इथं दूधही भरपूर. भल्यामोठ्या पातेल्यांमध्ये दूध घेऊन विक्रेते बसले होते.

राजस्तानात पाहण्यासारखं खूप काही आहे. बिकानेरमध्येही. दुसऱ्या दिवशी चौकशी करून लालगढ़ व जुनागढ़ पाहायचं ठरवलं. चौकशी करत जुनागढ़पर्यंत पोहोचलो. तिथलं सारं व्यवस्थापन राजघराण्याच्या ट्रस्टचं आहे. प्रवेशशुल्क ५० रुपये. पाहण्यासारखं भरपूर. आम्ही तिथं जेमतेम दोन-अडीच तास होतो. जुनागढ़, त्यातली सारी दालनं, वास्तुकला, अफलातून नक्षिकाम हे सगळं बारकाइनं नि निवांत पाहायला, त्याची मजा चाखायला दिवसही कमीच पडेल.

त्या दिवशी ती राज्य सरकारची परीक्षा दुपारी संपल्यावर अनेक उमेदवार मोठ्या संख्येने आले होते. परदेशी पर्यटकांचाही गट होता. आत जाण्यापूर्वीच धिप्पाड देहयष्टीचे आणि भरदार पांढऱ्याशुभ्र मिशांचे दीपसिंह दिसले. बाहत्तरीचे दीपसिंह इथं पर्यवेक्षक म्हणून काम करतात. तिकीटबारीजवळच खुर्ची टाकून बसलेले असतात. त्यांनी चौकशी केली आमची. 'अहमदनगर' असं सांगताच त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सैन्यातून निवृत्त झालेले सुभेदारसाहेब तीन-साडेतीन वर्षं नगरच्या एम. आय. आर. सी.मध्ये होते. त्यांच्या भरभक्कम हातात हात देत पुन्हा येण्याचा शब्द आम्ही दिला.

पर्यंटकांच्या गटासाठी ट्रस्टने 'गाईड'ची सोय केली आहे. पण पंचवीस-तीस जणांना तो एकटा काय सांगणार? आणि त्याचं ऐकण्यात रसही खूप कमी जणांना! तुलनेने परदेशी पर्यटक लक्ष देऊन पाहत होते आणि ऐकतही होते. आम्ही फिरत फिरत पाहू लागलो. आम्हा पंधरा-वीस पर्यंटकांबरोबर गाईड इंदरसिं राठोड (संपर्क +९१ ७८९१४ १०२५७) आले. ट्रस्टचे गाईड ते. पहिल्या काही मिनिटांतच त्यांनी मला हेरलं. नाव-गाव चौकशी केली. मग प्रत्येक ठिकाणी ते 'कुलकर्णी जी' अशी हाक मारू लागले, माहिती देऊ लागले. नंतर 'निर्मल जी' नावाचाही जप सुरू झाला. प्रत्येक ठिकाणचं वर्णन ते करत होते, ते जणू काही आम्हा दोघांसाठीच.

बाहेर पडताना या माणसाला काही तरी द्यावं लागणार. तशी अपेक्षा असल्याशिवाय का तो आपल्याला एवढा जपतो, हे मनात आलंच. मध्ये एक-दोन वेळा त्यांना टाळण्याचाही प्रयत्न केला. साठीजवळ आलेले इंदरसिंह आवर्जून आमची वाट पाहत थांबत. एक-दोन ठिकाणी त्यांनी आमचे फोटोही काढले. मग त्यांना टाळण्याचा विचार सोडला.

बाहेर पडताना इंदरसिं यांना विचारलं, काही अपेक्षा आहे का? अतिशय प्रांजळपणे त्यांनी सांगितलं, तुमची इच्छा; आग्रह नाही. जेवढं दिलं तेवढ्याचा त्यांनी मान ठेवला आणि पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलं. हा लेख लिहिताना थोडा समजुतीचा गोंधळ झाला म्हणून त्यांना फोन केला. नाव आणि गाव सांगितल्यावर 'कोई तकलीफ नाही' म्हणत ते बोलले.

बिकानेर संस्थानाचे संस्थापक राव बिकाजी, महाराजा गंगासिंह (पहिले व दुसरे), कर्णीसिंह यांचा हा जुनागढ़ किल्ला. महाराजा कर्णीसिंह म्हणजे आंतरराष्ट्रीय नेमबाज. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या या महाराजांच्या नावाने 'शूटिंग रेंज'ही आहे.

लाल दगडातल्या देखण्या इमारती. सुंदर नक्षी. पाहातच राहावं असं सगळं काही. वेगवेगळे महाल, तलवारींपासून ब्रिटिशकालीन बंदुकांपर्यंतची विविध काळातील शस्त्रं, चंदनाचं सिंहासन, एकाहून एक सुंदर चित्रं, पालख्या-मेणे... असं खूप काही. हे सगळं एक दिवसात पाहून होण्यासारखं नाहीच. जुनागढ़नंतर लक्ष्मिनाथाचं मंदिर आणि शेजारचं जैन मंदिरही पाहिलं. संध्याकाळी परतताना रस्ता चुकलो. फार लांबचा वेढा घेऊन कसंबसं मुक्कामी पोहोचलो. त्या वेळी जुन्या भकास बिकानेरचं दर्शन घडलं.

फारसं फिरलो नाही, तरी शहर म्हणून बिकानेरचा तसा ठसा उमटत नाही. उघडी गटारे, रस्त्याच्या कडेला कचरा, छोटे बोळ, चहाच्या आणि समोसे-कचोरीच्या टपऱ्या असं दिसतं. मोकाट फिरणाऱ्या गायी हे या शहराचं वैशिष्ट्य. ठिकठिकाणी गायी निवांतपणे रस्ता अडवून उभ्या होत्या किंवा रस्ता ओलांडताना दिसतात. त्यांना हाकलण्याच्या फंदात कोणी पडत नाही. अशी 'गायलँड' भरपूर. या भागात गो-शाळाही भरपूर आहेत. बिकानेर सोडतानाच एक मोठी गो-शाळा दिसली. रस्त्यावर लागणाऱ्या अन्य गावांमध्येही तसे फलक पाहायला मिळाले.

शहराचं चित्र असं नि माणसांचं वेगळंच. गुजरातसारखीच आतिथ्यशील माणसं इथं भेटली. मोकळेपणाने गप्पा मारणारी. रस्ता किंवा पत्ता सांगणारी. जुनागढ़ पाहून येताना एका मोटरसायकलस्वाराला पत्ता विचारण्यासाठी हटकलं. तो वेगात होता. लक्षात आल्यावर थोडं पुढं जाऊन थांबला, मागं आला आणि व्यवस्थित माहिती दिली. अस्सल राजस्तानी जेवायचं होतं, तेव्हा मालट्रकच्या क्लीनरनं जवळच्या दोन-तीन हॉटेलांची नावं सांगितली. ट्रक घेऊन तो अधूनमधून महाराष्ट्रात येत असतो.

पर्यटन पोलिसांचाही चांगला अनुभव आला. जुनागढ़जवळ वाहनतळ शोधण्यासाठी आणि पाहण्यासाठी अजून काय आहे, याची चौकशी करायला म्हणून 'पर्यटन पुलिस' अशी पाटी लावलेल्या चौकीजवळ गेलो. तिथल्या शौकतअली यांनी कपाळावर आठ्या न पाडता सविस्तर सांगितलं आणि बिकानेरमधल्या पर्यटनस्थळांची माहिती व नकाशा असलेली छोटी पुस्तिकाही दिली. त्याच चौकीत दुसऱ्या दिवशी आणखी एका पोलिसाकडून तसाच चांगला अनुभव मिळाला. त्यानं सगळ्या खाणाखुणांसह व्यवस्थित रस्ता सांगितला आणि संपूर्ण राजस्तानमधील सगळ्या पर्यटनस्थळांचा नकाशा दिला.

माणसं बोलायला मोकळी, संवादोत्सुक आणि विश्वास ठेवणारी. याचा वेगळाच अनुभव भुजियाच्या दुकानात आला. सगळ्यांत मस्त भुजिया कुठं मिळेल, याची चौकशी केल्यावर स्टेशन रस्त्यावरील 'बिशनलाल बाबुलाल भुजियावाला' नाव समजलं. सर्वोत्तम भुजियासाठी तिथंच जा, असा सल्लाही मिळाला. तिथं गेलो तेव्हा काही मराठी मुंबईकर खरेदी करीत होते. छोटंसं दुकान. मोसम असल्यामुळे दर्शनी भागात सगळी फिणीची खोकी. दोन प्रकारचे भुजिया आणि पापड घेऊन पैसे देण्यासाठी गल्ल्याजवळ गेलो.

थोड्या गप्पा मारताना नगरहून, शिर्डीजवळच्या अहमदनगरहून आलो आहे, असं सांगताच चमत्कार झाला. पैसे घेणाऱ्या श्री. जीवनलाल अग्रवाल यांनी एका मुलाला हाक मारून चार प्रकारचे भुजिया आणि गजकचा पुडा असलेली पिशवीच हातात दिली. हे साईबाबा आणि शनिदेवाच्या चरणी अर्पण करा, असं त्यांनी सांगितलं. घेतलेल्या पदार्थांचे पैसे देण्यासाठी मी हातात नोट घेऊन उभा. जीवनलालजी पैसे घ्यायलाच तयार नाहीत. माझा आग्रह आणि त्यांचा नकार, असं चार वेळा झालं. 'शिर्डी नगरपासून किती लांब आहे? तिथं जाण्यासाठी तुम्हाला पैसे लागतीलच ना?', असं म्हणत ते पैसे नाकारत होते. अखेर नाइलाज झाल्याचं दर्शवित त्यांनी बिलाच्या जवळ पोहोचणारी रक्कम घेतली. परतीच्या प्रवासात साईबाबाच्या चरणी त्यांची पिशवी ठेवल्यावर बरं वाटलं.

असंच खादीच्या दुकानात गेलो. तिथं असलेले कमल गप्पिष्ट होते. त्यांच्या गप्पांमुळे आम्ही थोडी जास्तच खरेदी केली. स्टेशन रस्त्यानं जाताना मध्येच एक बाबा दिसले. 'अपना वजन तुलवाए। मात्र पाच / रु.' अशी पाटी जवळ. डोक्याला साफा, गळ्यात मफलर, अंगात जर्कीन आणि त्यावर जाकीट. जवळ काठी आणि वजनाचं यंत्र. बाबा बिडी शिलगावण्याच्या तयारीत होते. त्यांचा फोटो काढावा म्हणून परत फिरलो. बाबांनी मग पोज घेतली आणि विचारलं, 'आप फोटो खिचवाओगे तो हमें क्या मिलेगा?' निरुत्तर करणारा प्रश्न. जवळच्याच एकानं सांगितलं, 'बाबाजी, ये टुरिस्ट है। निकालने दो फोटो...'



हमें क्या मिलेगा?

बिकानेरमध्ये गायी जेवढ्या दिसल्या, तेवढ्या संख्येने उंट काही दिसले नाहीत. इथलं विमानतळ नालपासून एक किलोमीटरवर आहे. बाजूला मोकळी जागी आणि बाभळीसारख्या झाडांचं रान. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तिथं तीन उंट चरताना दिसले. मालवाहतुकीसाठी उंटानं ओढायच्या काही गाड्या दिसल्या. त्यातून प्रामुख्यानं भुस्सा वाहून नेला जात होता. या परिसरात पिक-अप व्हॅन मात्र मोठ्या प्रमाणात दिसतात. मागच्या हौद्यात दुधाचे मोठमोठाले कॅन, भाज्यांच्या टोपल्या, धान्याची पोती. पुढं कोंबलेली माणसं.

बिकानेरमध्ये मजेशीर हिंदी फलक, त्यावरचे शब्दप्रयोग दिसले. 'बर्फ जैसा ठंडा मिनरल वॉटर', असं एक टपरीवाला कडाक्याच्या थंडीत जाहीर करीत होता. 'फुल्ल डाइट' म्हणजे पोटभर थाळी. 'आइरन/आयरन' हे आयर्नचं राजस्तानी रूप. 'क्लास'चं अनेकवचन तिथं 'क्लासेज' झालेलं पाहायला मिळालं. 'ऑटोज्ञ' किंवा 'पाश्चरीकृत' यांसारखे आंग्ल-गीर्वाण शब्द दिसले, तसाच 'अनुज्ञप्तिधारक' असा शुद्ध शब्दही वाचायला मिळाला.

परतीच्या मार्गावर पुष्कर आणि अजमेर ही दोन तीर्थक्षेत्रं पाहायचं ठरवलं. (नंतर मग शेवटच्या टप्प्यात शिर्डीतही दर्शन झालं.) पुष्करच्या जवळ जातानाच उंटाच्या दिमाखदार गाड्या दिसल्या. पर्यटकांसाठी. ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर पुष्करमध्ये आहे. पुष्कर मेळ्यासाठी प्रसिद्ध असलेला या गावातील तलाव मोठा, खूप घाट असलेला. गाडी लावतानाच आम्हाला एका तरुणानं गाठलं. 'फक्त १० रुपयांची पूजेची थाळी घ्या आणि मला ३० रुपये द्या,' असं म्हणत तो बरोबर आला. त्या दिवशी दशमी असतानाही एकादशी असल्याचं सांगत त्यानं पूजा करायला लावली आणि एका माणसाच्या जेवणासाठी म्हणून १०० रुपये अधिकचे खर्च करायला लावलेच. अजमेर कोणत्याही भारतीय देवस्थानासारखंच. दाराजवळच पैसे मागणारे होते. डोक्यावर आच्छादन पाहिजे म्हणून १५ रुपयांना पांढरेशुभ्र हातरुमाल विकणारे होते. आशीर्वाद देणारे होते, ताईत विकणारे होते आणि भीक मागणारेही होते...

राजस्तानचं हे पहिलं दर्शन. केर-सांगरीची भाजी आणि बाजरीची रोटी, दाल बाटी चुरमा, गट्टे की सब्जी यांची चव घ्यायची राहिलीच. लालगढ़, कर्णीमाता मंदिर, गजनेर अभयारण्य पाहायचं राहिलंच. उंटावरची सफरही बाकी आहे. तिथलं आतिथ्य अनुभवायला पुन्हा एकदा जायलाच हवं! आमंत्रण आलं नाही, तर ते लावून घ्यायला हवं...
.....
(छायाचित्रं - https://khidaki.blogspot.com/2020/02/Bknr-Photo.html)

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!

सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️ जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना ...