Wednesday 12 July 2023

असं राजकारण, अशा गमती

 



माध्यमांमधून वाचायला-ऐकायला-पाहायला मिळणारं राजकारण म्हणजे हिमनगाचं टोक असतं, असं नेहमीच बोलून दाखवलं जातं. त्यात तथ्य आहेच. खऱ्या राजकारणातील डाव-प्रतिडाव, शह-मात, प्याद्यांचे बळी आपल्यासारख्या सामान्यांपर्यंत सहसा येत नाहीत. तुम्ही अगदी आतल्या वर्तुळातले, गोटातले असाल किंवा हल्लीच्या माध्यमांच्या लोकप्रिय भाषेत बोलायचं तर तुम्हीच ‘खातरीशीर सूत्र’ असाल, तर हे पाहण्या-अनुभवण्याची संधी मिळते. रोज घडणाऱ्या राजकारणात तिरक्या, अडीच घरांच्या चाली असतात, तशा अनेक गमतीजमतीही घडत असतात. पडद्याआड होणाऱ्या आणि आपल्यापर्यंत येताना मीठ-मसाला लेवून किंवा पाणी टाकून येणाऱ्या अनेक गमती.

राजकारण करणाऱ्या मंडळींचा असाच एक धमाल किस्सा अलीकडे ऐकायला मिळाला. सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंबात वाढलेला एक मुलगा सामाजिक जीवनात सहभागी होतो आणि एकाहून अधिक वेळा आमदार म्हणून निवडून येतो. सत्तेच्या अगदी आतल्या वर्तुळापर्यंत पोहोचतो. हे कसं साध्य होतं?

पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी असलेला त्या नेत्याचा जवळचा कार्यकर्ता, अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांच्या काम करण्याची रीत उलगडून दाखवत असतो - फार खोलात जाऊन नाही; पण अगदी वरवरचंही नाही. कार्यकर्त्यांचा चमू कसा आहे, ते कशा पद्धतीनं काम करतात, त्यातली सफाई तो स्पष्ट करतो. त्याच्या नेत्याचे - भाऊ म्हणू आपण त्यांना - एक गुरू आणि मार्गदर्शक असतात. व्यवसायाने वकील. संबंधित एका कोणत्या तरी संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी. निवडणूक असली की, व्यूहरचना कशी करायची, कोणती पावलं उचलायची, हे सगळं ते ठरवातात आणि भाऊ त्यांचं मनोभावे ऐकतात. कारण त्यांच्या यशाचे ते मुख्य शिल्पकार असतात. ह्या गुरू-मार्गदर्शकाचं ‘मामा’ हे सार्वत्रिक आदरार्थी संबोधन.

अशीच एक निवडणूक. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. नेत्याची जल्लोषात मिरवणूक निघालेली असते. त्याच वेळी मामा आणि पक्षाचे तालुकाध्यक्ष वेगळ्या कामात गुंतलेले. मिरवणुकीशी त्यांना काही देणं-घेणं नाही. जणू त्यांचा कुठल्या प्रक्रियेशी संबंधच नाही. पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचं शिक्कामोर्तब करणारा ‘ए-बी फॉर्म’ त्यांना पक्षाच्या जिल्हा कार्यालयातून आणायचा होता. हा फॉर्म म्हणजे पक्षाचा उमेदवार असल्याची आणि अधिकृत चिन्ह मिळण्यासाठीची अतिशय महत्त्वाची, अनिवार्य अशी कागदपत्रं. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत तो मिळालाच पाहिजे. त्यात काही त्रुटी राहिली नाही ना, हे अगदी डोळ्यांत तेल घालून तपासावं लागतं.


खरं तर नेत्यानं निवडणुकीसाठी अर्ज आधीच भरलेला होता. त्याच अर्जाला ‘ए-बी फॉर्म’ जोडायचं काम बाकी. शेवटच्या दिवशीची जल्लोषातली मिरवणूक फक्त कार्यकर्त्यांमध्ये जोष आणण्यासाठी. हवा तयार करण्यासाठी. आपली ताकद दाखविण्यासाठी - आपल्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि विरोधकांना धडकी भरवण्यासाठी. जिल्हा मुख्यालयावरून ही जोडगोळी मतदारसंघात परतली, तेव्हा मिरवणूक पूर्ण भरात आलेली. फटाक्यांची आतषबाजी आणि गगनभेदी घोषणा. कार्यकर्त्यांचा उत्साह टिपेला गेलेला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय अगदी जवळच आलं होतं.

मिरवणूक अशी जोषात असताना भाऊंच्या कार्यालयात मोजकेच कार्यकर्ते बसले होते. महत्त्वाचं काम वेळेत आणि चोखपणे पार पडल्याचं समाधान त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. गरमागरम चहाचे कप आले होते. चहा घेताना मामांना अस्वस्थ वाटू लागलं. अंग थरथर कापू लागलं. घाम आला. हा हृदयविकाराचा झटका असल्याचं जवळच्यांनी ओळखलं. तिथल्याच कुणा एकाजवळ सॉर्बिट्रेटची गोळी होती. त्यानं लगेच ती त्यांच्या जिभेखाली सरकवली. डॉक्टरांना बोलावणं गेलं. ते आले आणि तपासून त्यांनी दुजोरा दिला - हृदयविकाराचाच झटका. तातडीनं रुग्णालयात घेऊन चला.

रुग्णवाहिका आली. एवढी मोठी मिरवणूक चालू असताना तिला वाट कशी मिळणार? सुदैवानं भाऊंना ही माहिती मिळाली होती. त्यांच्या सांगण्यानुसार मिरवणूक लगेच विसर्जित करण्यात आली. रुग्णवाहिका मामांना घेऊन मुंबईकडे धावू लागली. सोबत तालुकाध्यक्षांसह दोन-तीन महत्त्वाचे कार्यकर्ते. प्राथमिक उपचारांना यश आलं. रुग्णवाहिका तासभर धावल्यानंतर मामांची परिस्थिती बरी झाली. थोडं बोलण्याइतपत त्राण त्यांच्या अंगी आलं. तोंडावरचा ऑक्सिजनचा मुखवटा सरकवत त्यांनी विचारलं, ‘‘अरे, तुम्ही सगळे इथे. तो ‘ए-बी फॉर्म’ वेळेत कोण पोहोचवणार?’’ कार्यकर्त्यांनी त्यांना शांत राहायला सांगितलं आणि ‘सगळं व्यवस्थित होतंय’ असा दिलासा दिला.

तेवढ्याशा बोलण्यानं मामांना पुन्हा धाप लागली. कार्यकर्त्यांनी ऑक्सिजनचा मास्क व्यवस्थित बसविला. त्यांना श्वास घेण्यास सांगितलं. मुंबई येईपर्यंत मामा एकच प्रश्न पुनःपुन्हा विचारत होते - ‘ए-बी फॉर्म वेळेत पोहोचला ना? काही गडबड झाली नाही ना?’

सुदैवानं सगळं काही सुरळीत पार पडलं. मुंबईत वेळेवर आणि आवश्यक ते उपचार झाले. मामा ठणठणीत बरे झाले. निवडणुकीच्या कामाची सूत्रं हाती घेण्यासाठी आणि व्यूहरचना आखण्यासाठी ते पुन्हा मतदारसंघात दाखल झाले. तोंडाला बँडेज गुंडाळून अनिल कुंबळे गोलंदाजीसाठी उतरला होता ना, अगदी तसेच.

मामांची उपस्थिती मोलाची ठरली. मार्गदर्शकाचा सल्ला पुन्हा एकदा उपयोगी पडला. त्यांचा शिष्य निवडणुकीत पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी झाला. भाऊ सत्तासोपानावर चढले.

निवडणुकीच्या निकालानंतर दोन-तीन दिवसांची गोष्ट. भाऊ मुंबईला रवाना झालेले कार्यकर्ते निवांत बसले होते. चर्चा तीच - कुठे अपेक्षेएवढं लीड मिळालं, कुठं थोडं कमी झालं, कुणी काम केलं...वगैरे.

मामांनी अचानक विचारलं, ‘‘का रे भावड्यांनो, समजा मी त्या हार्ट ॲटॅकमधून वाचलो नसतो  तर? तुम्ही काय केलं असतं, कसे लढला असता?’’

तालुकाध्यक्ष मामांच्या तालमीत तयार झालेले. ते लगेच हजरजबाबीपणेम्हणाले, ‘‘मामा, तुम्ही शिकवलेलं काहीच विसरलो नाही आम्ही. कोणत्याही परिस्थितीचा कसा (अनुकूलच) उपयोग करून घ्यायचा माहिती आहे आम्हाला. तुम्ही म्हणता तसं झालंच असतं दुर्दैवाने, तर आम्ही प्रचारात एकंच सांगितलं असतं - भाऊंना मंत्री करायचं मामांचं स्वप्न होतं. भाऊ मंत्री झाल्याशिवाय मामांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. त्यासाठी भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करा..!’’

अशा असतात राजकारणातल्या पडद्याआडच्या गमतीजमती.

...........................

(चित्रं-सौजन्य - https://www.voicesofyouth.org आणि https://cleverharvey.com आणि https://swarajyamag.com)

...........................

#राजकारण #गमतीजमती #राजकीय_गमतीजमती #राजकारण_पडद्यामागचं #माध्यमं #एबी_फॉर्म 


पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...