Wednesday 19 August 2015

भूषण, दूषण आणि प्रदूषण

गंजल्या जरी । काढा तलवारी ।
आम्ही वारकरी । आठवा थोडे ।।

 
करा आता जोर । लावा तयां धार ।
कशाचा विसर । पडलासे तुम्हा ।।

 
जातीची ढाल । द्वेषाची मशाल ।
पेटवा खुशाल । लागो द्यात आग ।।

थोडी फुंक मारा । फुलेल निखारा ।
आगडोंब सारा । मग उसळेल ।।

करू या कहर । कालवू जहर ।
हाच तो प्रहर । साधण्या संधी ।।

चंदनगंधाची सोड । जुनी ती खोड ।
उगाळ खोड । आता घाणेरीचे ।।

तयांचा उद्धार । करू या चित्कार ।
विषाचे फुत्कार । वळवळीत ।।

शेलके वेचावे । हवे ते बोलावे ।
घ्या हे पुरावे । करावे जाहीर ।।

तो(ह)फा जितेंद्रीय । प्रेक्षक देवेंद्रीय ।
निर्माता राजकीय । दिलीपकुमार।।

इतिहासे कोंदणे । हवे ते गोंदणे ।
शरदाचे चांदणे । दाविते मार्ग ।।
.
.
.
खेळ प्रचलित । मने कलुषित ।
हवा प्रदूषित । होऊ दे की ।।

असे असे घडे । कोण कुठे पडे ।
पापाचिये घडे । ओसंडिले ।।

देण्यात दूषण । कोणाला भूषण ।
वास्तव हे भीषण । आज-कालचे ।।
-------------------------------------
© आम आदमी
-------------------------------------
#Maharashtra_Bhooshan #award #ShivShahir #cast_politics #history

Saturday 15 August 2015

शुध्द साहीत्य वैगेरे वैगेरे...

फार्फार वर्षांपूर्वी, म्हणजे वीस-एक वर्षांपूर्वी `रुची` मासिकानं (आता त्याचं नाव `शब्द रुची` असं झालंय का? की तेव्हाही ते असंच होतं?) मुखपृष्ठावर एक धम्माल केली होती. म्हणजे मुखपृष्ठावर एक पत्रच छापलं होतं. आणि त्या पत्रातल्या शुद्धलेखनाच्या चुका दाखवून दिल्या होत्या. सध्या साहित्यक्षेत्रामध्ये अनेकांसाठी `नायक` आणि तेवढ्याच जणांसाठी `खलनायक` असलेल्या प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी त्या चुका दाखवून दिल्या होत्या. हे म्हणजे अगदीच सौम्य भाषेत झालं. खरं सांगायचं तर ठाले पाटलांनी ते पत्र लिहिणाऱ्याची अगदी `बिनपाण्यानं तासली` होती.

साहित्य क्षेत्रातील एका (आता) मानाच्या (झालेल्या) पुरस्कारासंबंधी काही आवाहन करणारं ते पत्र होतं. ते लिहिणारा एक प्राध्यापक (आणि नंतर कवीही!) होता. त्या पुरस्कारासंबंधीच्या निवडसमितीत तो महत्त्वाची भूमिका बजावत असे. लेखक-अनुवादक विलास गिते यांनी तो अंक दाखविल्यानंतर या पामराने त्या वेळी `लोकसत्ता`च्या नगर आवृत्तीतील `नगरी-नगरी` सदरामध्ये `शुद्धलेखनाचं कवतिक` या शीर्षकाखाली काही मजकूर खरडला होता.

साधुन
साहीत्य
जेष्ठ
साहीत्यीक
जेष्ठ साहीत्यीक
उत्कृष्ठसाहीत्य
रविंद्र
बद्रीनाथ
समाज प्रबोधन
नाट्य सेवा
दरवर्षी
महत्व
25 वे
असुन
रौप्य महोत्सवी वर्षांच्या
दिनांक 29 ऑगस्ट रोजी
साहीत्य सेवा
डॉ. सुधिर
विश्‍लेशक
संवेदनशिल
शिस्तप्रीय
प्रतिकुल
अराधना
राहीला
श्रध्दा
रुपये 1 लाख
स्मृतीचिन्ह
स्वरुप
रविंद्र शोभेणे (नागपुर)
लोकहीतवादींची शतपत्रे
लोकहीतवादी
उर्फ
अनिष्ठरुढी
विरुध्द
लिहीली
विश्‍लेशन
आधोरेखीत
देवून
पंढरपुर
सांप्रदायाच्या
विनामुल्य
कूष्ठरोगी
दिनदुबळे
वर्षांपासुन
रंगभूमिची
एकांकीका
व्यवसायीक
दिगदर्शक
पाहीले
सहाय्यक
रसीक
आधिराज्य
नवोदीत

... आता वाचणाऱ्यांना (ते इथपर्यंत आलेच असतील, तर) कदाचित वाटेल की, कौतिकराव ठाले पाटील, `रुची` इत्यादी रुळांवरून गाडी अशी कशी घसरली? तर ते सांधे जोडून घेतो. (नाही तरी आम्ही हाडाचे `जुळारी` आहोतच. इकडचे शब्द तिकडे जुळवून रोजच्या रोज अंक काढण्यात आमची हयात गेली.) तर वर काही दिलेले शब्द वाचल्यावर लगेच नेमके काय झाले, हे (हुशार!) वाचकांना समजून येईल. हे सारे शब्द एकसमयावच्छेदे करून एकाच ठिकाणी (आणि दोन कागदांवर) अवतीर्ण झाले आहेत.

नगरमध्ये गेल्या आठवड्यात वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी जी मुद्रित दोन पानी टिपणी देण्यात आली, त्यामध्ये हे सारे शब्द दर्शन देतात. आमच्या अधू दृष्टीला जेवढे नजरेस पडले, ते आम्ही येथे दिले. त्याहून अधिक (अशुद्ध) शब्द त्यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाचे म्हणजे ज्या पत्रकार बैठकीत ही टिपणी बोरूबहाद्दरांच्या हाती देण्यात आली, त्या बैठकीस एक ख्यातकीर्त समीक्षक, माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी त्याबद्दल काही अस्वस्थता व्यक्त केली किंवा कसे, याचा तपशील मिळाला नाही.

त्याहून अधिक महत्त्वाचे (आणि अर्थातच गमतीचे) म्हणजे, ठाले पाटलांनी अशुद्ध लेखनामुळे ज्या पत्राबद्दल संताप व्यक्त केला होता, त्यात उल्लेखिलेल्या मानाच्या, प्रसिद्ध वगैरे पुरस्काराची ही वृत्तपत्रीय टिपणी आहे.

हे एवढे साधे शब्द अगदी ठरवून अशुद्ध वापरल्यावर संबंधितांना `पद्मश्री`, `पद्मभूषण` आदी किताब पदवीसारखे नावामागे (किंवा नावाआधी) लावायचे नसतात; मानद डॉक्टरेटबद्दल `डॉ.` वापरायचे नसते; `नामदार` हे नावामागे वापरण्यासाठी नसून, त्या पदाबद्दल वापरायचे असते, इत्यादी तपशील माहीत असण्याचे कारणच नाही.

या दीर्घ (आणि बहुअशुद्ध) वृत्तपत्र टिपणीत आणखी काही विनोद आहेत. ते तपशिलाचे आहेत आणि वाक्यरचनेचेही आहेत. उदाहरणार्थ...

1) `अश्‍वमेध` या कांदबरीच्या माध्यमातून गेल्या अर्धशतकामधील समाजाच्या ऱ्हासाचे चित्रण शब्दबध्द करतांनाच राजकारण, सत्ताकारण, शिक्षण, कला, पत्रकारीता, कौटुंबिक व सार्वजनिक जीवन आणि मानवी नातेसंबध अशा सर्वच स्तरावर सुरु असलेल्या अधःपतनावर जळजळीत वास्तवाचे अंजन घालून समाजाला खडबडून जागे करण्याचा यशस्वी प्रयत्न डॉ. शोभणे यांनी केला.

(वास्तविक `अश्‍वमेध` म्हणजे तीन कादंबऱ्यांच्या मालिकेतील दुसरा खंड आहे. या तीन कादंबऱ्यांचा एकूण कालावधीच 25 वर्षांचा (आणीबाणी-1975 ते 2000) आहे. आणि त्यातही `अश्‍वमेध`मध्ये येणारा कालखंड जेमतेम सात वर्षांचा आहे. मग हे अर्धशतक कुठून आले? आणि `यशस्वी प्रयत्न` असेल, तर `अयशस्वी प्रयत्न` म्हणजे काय असतो बुवा?)


2) ...त्याचे विश्‍लेशन करुन आजचे सामाजिक संदर्भ एकनाथ ढोणे यांनी आधोरेखीत केली.

3) वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन परंपरा जोपासतांनाच पंढरपुर येथे निराधारांसाठी उभारलेल्या सेवाव्रती कार्य करतांनाच...

(आता वरील दोन्ही उदाहरणांबद्दल अधिक काही लिहावे का?)

4) श्रीनिवास भणगे - उत्तम अभिनयाव्दारे रसीक मनावर आधिराज्य गाजविणाऱ्या या कलाकाराने केलेल्या नाट्य सेवेचा विचार करुन...

(भणगे अभिनयाबद्दलही पुरस्कार देण्याएवढे प्रसिद्ध आहेत, ही माहिती आम्हाला या `विखिपीडिया`मधूनच समजली!)

आता साहित्याचा आणि शुद्धलेखनाचा काय संबंध आहे, (किंवा `संबंधच काय!`) असे कोणी म्हटले म्हणजे बोलणेच खुंटले! (आधी असे ठरविले होते की, या मजकुरातील अशुद्ध शब्द ठळक करावेत. तसे करून पाहिल्यावर (ठळकपणे) असे लक्षात आले की, त्यामुळे जवळपास साडेशहाण्णव टक्के शब्द ठळकच होत आहेत. आपली गणना उगीच कोणी साडेतीन टक्क्यांमध्ये करायला नको म्हणून ते टाळले, एवढेच.)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...