मी गेल्या 20 वर्षांमध्ये राहण्याच्या तीन
जागा बदलल्या. या काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी मात्र कायम राहिल्या. एक म्हणजे
घरी पेपर (दैनिक वृत्तपत्र) टाकणारा विक्रेता. आणि दुसरा केशकर्तनकार. हा ‘पेपरवाला’ स्वतः बऱ्याच वर्षांपासून माझ्याकडे अंक
टाकत नाही. त्याचा मदतनीस हे काम करतो. तो स्वतः उपनगरामधला (अधिक मोठा) व्याप
सांभाळतो.
आपण ‘पेपरवाला’ असं
सरसकट म्हणतो खरं; पण त्याचा तसा उल्लेख करायला गेल्या काही
वर्षांपासून माझी तरी जीभ रेटत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एवढ्या
वर्षांच्या संबंधांनंतर आमच्यामध्ये स्वाभाविकच आपुलकी निर्माण झाली आहे. पुन्हा
मी वृत्तपत्र व्यवसायातच काम करतो. अस्मादिक एक ‘चांगला
पत्रकार’ असल्याचा त्याचा (गैर)समज आहे. ते प्रत्येक भेटीत
बोलून दाखविल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. (आपुलकी, समान व्यवसाय आणि माझ्याबद्दलचा
समज, अशा त्रिसूत्रीमुळेच तो माझ्याकडून टाकणावळ घेत नाही.) कोणत्या नव्या
दैनिकांच्या काही योजना (स्कीम) आल्या, तर परवानगी वगैरे न
विचारता, परस्पर पैसे भरून माझं नाव नोंदवून टाकतो. म्हटलं
तर आम्ही गल्लीवालेच आहोत. तो अचानक कधी तरी येतो, तेव्हा
तासभर गप्पा मारत बसतो.
हे सारं जे सांगतो आहे, ते गिरीश दिगंबर काळे
याच्याबद्दल. खरं तर अरे-तुरे करण्याच्या वयाचा राहिला नाही तो आता. चाळिशीच्या
पुढे गेला आहे. पण इतक्या वर्षांची सवय जात नाही. आता महत्त्वाचा मुद्दा. ‘पेपरवाला’ असं म्हणण्याता एका स्वाभाविक तुच्छता, क्षुद्रत्वाचा उल्लेख जाणवतो. गिरीशला आणि त्याच्या वागण्या-बोलण्याला पाहून तसं मुळीच म्हणावं वाटत नाही. तसं बोलल्यानं त्याचा अवमान होतो, याची जाणीव मला आहे.
...तर गेल्या शनिवारी ( 25
जूनला) संध्याकाळी कार्यालयात असतानाच गिरीशचा फोन आला. त्याचं एक महत्त्वाचं काम
होतं. ते माझ्याकडूनच होईल, असा त्याला विश्वास होता. काम काय आहे, हे त्यानं लगेच
सांगितलं. ‘मला
बायोडाटा लिहून पाहिजे. तुम्हाला कधी वेळ आहे?’, असं त्यानं
फोनवरूनच विचारलं. (मलाही तो कधी अरे-तुरे, तर कधी अहो-जाहो असं बोलतो.) ते उशिरात
उशिरा कधीपर्यंत मिळालं तर चालेल, हेही त्यानं सांगितलं. त्यानुसार रविवारी सकाळी
भेटण्याचं ठरलं आमचं. गिरीशला या वयात ‘बायोडाटा’ कशासाठी हवा, हे न कळून मी बुचकळ्यातच
पडलो. पण त्यानंच त्याचं उत्तर दिलं. ‘रोटरी क्लब ऑफ अहमदनगर’नं त्याची ‘रोटरी व्होकेशनल अॅवॉर्ड’साठी निवड केली होती. संयोजकांना त्याचा परिचय हवा होता. तो लिहायचा कसा
आणि कोणत्या भाषेत याचा ताण त्याच्या मनावर होता. याचं नेमकं उत्तर माझ्याकडे सापडेल,
अशी त्याची खात्री होती आणि ती त्यानं बायकोला बोलूनही दाखविली होती.
ठरल्याप्रमाणं दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीश आला. माझ्याकडे कोणी आलेलं आहे, हे पाहून त्यानं नंतर यायचा वायदा केला. पुन्हा फोन करून संध्याकाळी येण्याचं कबूल केलं. तो आलाच नाही संध्याकाळी. वाट पाहून फोन केला आणि पाचच मिनिटांत तो घरी पोहोचला. काहीसा उत्तेजित होता तो. स्वाभाविकच होतं ते. ‘सचोटीनं केलेल्या सामाजिक/व्यावसायिक कामाबद्दल’ त्याची या पुरस्कारासाठी रोटरी क्लबनं निवड केली होती. त्या कार्यक्रमात परिचय करून देण्यासाठी क्लबनं माहिती मागितली होती. तीच त्याला लिहून हवी होती. या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली, कुणी नाव सुचविलं याची काही म्हणता काही माहिती त्याला नव्हती. पुरस्कारासाठी ‘फिल्डिंग’ लावणाऱ्या अव्वल क्षेत्ररक्षकांच्या जगाबाबत तो पूर्ण अज्ञानी होता!
|
प्रसिद्ध निवेदक सुधीर
गाडगीळ यांच्या हस्ते गिरीशनं रोटरी क्लबचा पुरस्कार स्वीकारला. (छायाचित्र सौजन्य
: दत्ता इंगळे)
|
गिरीशला वाटत होतं की, मी
ते कागदावर लिहून द्यावं. मी संगणक सुरू केला आणि त्याला म्हटलं, ‘बोल आता.’
स्वतःविषयी सांगायचं म्हटल्यावर भल्याभल्यांना किती सांगू नि किती नको, असं होऊन
जातं. गिरीशचं तसं मुळीच झालं नाही. त्यानं दोन-तीन मिनिटांतच काय ते सांगून
टाकलं. कितव्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली, कुणाकुणाबरोबर काम केलं, कुणाबद्दल
कृतज्ञता व्यक्त करायची एवढंच त्यानं सांगितलं. फापटपसारा नाही, अवाच्या सवा वाढवून
सांगणं नाही. आपल्या कामाचं अवडंबर नाही की, उगीचच उदात्तीकरण नाही. नेमकं आणि
सुस्पष्ट.
संगणकावर काम सुरू केलं. सात-आठ
मिनिटांमध्ये साडेतीनशे शब्दांचा मजकूर तयार झाला. साधा, सरळ, सोपा. त्याला हवा
तसा. तो टंकित करण्याचं काम सुरू असताना गिरीशनं एकदाच अडवलं. मी त्याचा उल्लेख ‘वृत्तपत्र वितरक’ केला होता. तो म्हणाला, ‘वृत्तपत्र विक्रेता’ लिहा. आपण ‘एजंट’ नाहीत. त्यानं
केलेल्या या दुरुस्तीनं मला तो पुन्हा एकदा आवडून गेला. जे आहे ते लिहू आणि तेच
सांगू, असा त्याचा बाणा.
गिरीशच्या आयुष्यातला हा
पहिला पुरस्कार. तोही न मागता, इच्छा व्यक्त न करता मिळालेला. तो कशामुळं मिळाला, ‘रोटरी क्लब’सारख्या
मोठ्या संस्थेला आपलं नाव कुणी सुचविलं, याचं त्याला खरोखर औत्सुक्य होतं. त्याला
कदाचित माहीत असेल-नसेल; त्यानं अलीकडच्या काळात एक मोठं काम
केलं. एका वयोवृद्ध, एकाकी आणि आजारानं त्रासलेल्या प्राध्यापकाची त्यानं गेल्या
10 वर्षांत स्वतःच्या वडिलांसारखी काळजी घेतली. निधनानंतर त्यांच्या नातेवाइकांशी
संपर्क साधला. या काळात त्यांच्या घरची एक काडी इकडची तिकडं झाली नाही. त्यांचे
वारस परदेशातून आले तेव्हा गिरीशनं त्यांना काय झालं, कसं झालं याची सगळी माहिती
आणि सगळ्या वस्तूंसह त्यांच्या बंगल्याचा ताबा दिला. हे सगळं पाहून, अनुभवून तेही
चकित झाले. हे सगळं गिरीशनंच मला सांगितलं. आणखी बऱ्याच गोष्टी त्यानं सांगितल्या; त्या इथं देण्याचा मोह टाळलेला बरा. आपलं एवढं कौतुक झालेलं त्याला
कदाचित आवडणार नाही.
वयाच्या तेराव्या वर्षी
गिरीशनं एका विक्रेत्याकडं कामाला सुरुवात केली. महिना 40 रुपये पगारावर. तिथनं
पुढं तो या व्यवसायातली एक-एक खुबी शिकत गेला आणि पंचविशीतच त्याला सूर गवसला. त्यानं
कधीच मागं वळून पाहिलं नाही. तो अतिशय अभिमानानं सांगत होता, “एवढ्या वर्षांत एकही खाडा नाही,
सतीशराव. उन-वारा-पाऊस काही असलं, तरी रोजच्या रोज घरी पेपर पोहोच म्हणजे पोहोच!”
गिरीशनं गेल्या 20-22 वर्षांमध्ये स्वतःला फार
बदलवलंय. त्यानं पुढच्या 10 वर्षांचं आर्थिक नियोजन केलं
आहे. ‘एसआयपी’, ‘पीपीएफ’ आणि ‘म्युच्युअल फंड’ हे
त्याचे गुंतवणुकीचे, बचतीचे आवडते पर्याय. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक भेटीत
मला तो विचारतो, ‘एसआयपी चालू केली की नाही एखादी?’ त्याचं स्वतःचं असं आवडतं दैनिक आहे. (तिथे मी दीर्घ काळ काम केलंय.)
वृत्तपत्राच्या व्यवसायाबद्दल एवढ्या वर्षांनंतर त्याची काही मतं बनली आहेत. ती तो
मोकळेपणानं सांगतो. माणसं तो पटकन ओळखतो. त्याला वाचायला आवडतं. त्यामुळं
भेटल्यावर प्रत्येक वेळी तो `सध्या काय वाचताय?` आणि `नवीन वाचण्यासारखं काय आहे?` हे दोन प्रश्न आवर्जून विचारतो. (आता मला कटाक्षानं जाणवलं. माझं आलेलं
पहिलं पुस्तक त्याला द्यायलाच पाहिजे!)
पूर्वी एका
मुद्द्यावरून गिरीशबरोबर नेहमी वाद होई. महिन्याचं बिल! तो कधी तरी, आठवण करवून दिल्यावर, आठ-दहा महिन्यांनंतर उगवतो आणि पैसे घेऊन जातो. ठरावीक मासिक उत्पन्न
असलेल्या माझ्यासारख्याला चार-पाच दैनिकांचे आठ-दहा-बारा महिन्यांचे पैसे एकदम
द्यायला थोडं जडच वाटतं. त्यामुळे मी मागे त्याला म्हणालोही, ‘बाबा रे, तू आपला दोन-तीन महिन्यांनंतर पैसे नेत जा
बरं.’ त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘जाऊ
द्या राव. तुमचे पैसे कुठं जातात, सतीशराव? मला एकखट्टी पैसे
मिळाले, तर उपयोग होतो.’ एकदा तर
त्यानं तब्बल सव्वा वर्षाचे पैसे नेले. मी आता त्याच्यापुढं या मुद्द्यावर शरणागती
पत्करली आहे. चार-सहा महिन्यानंतर रस्त्यात भेटला की, त्याला
आठवण करून देतो.
असेच पैसे नेण्यासाठी तो
पाच-सात महिन्यांपूर्वी आला होता. या वेळी फार नाही, सात महिन्यांचेच पैसे होते. बोलता बोलता अनेक
विषय निघाले. तो म्हणाला, “माझा एका गोष्टीवर फार विश्वास
बसला. या धंद्यात भरपूर कष्ट आहेत. पण त्याला पर्याय नाही. प्रामाणिकपणा आणि ‘हार्ड वर्क’ एवढं पाळलं की, फार
फायदा होतो. रात्री पडलं की, मला पटकन झोप लागते.” पहाटे चार ते दुपारी बारा, ही त्याची कामाची वेळ.
संध्याकाळी पैसे वसूल करतो. तर ऐन तारुण्यात, 20-22 वर्षांपूर्वी तो तसा
नव्हता. हातात पैसा खुळखुळत होता. वय अगदीच पंचविशीच्या अल्याड-पल्याड होतं. वय,
भरपूर पैसे याचा परिणाम त्याच्यावर होऊ पाहात होता. कसं कुणास ठाऊक;
त्यानं स्वतःला सावरलं. ‘धंदा एके धंदा’
करायचं ठरवलं. उपनगरातले उच्चभ्रू ग्राहक त्यानं मिळविले. (त्यात एक
फायदा असा की, सहसा कुणी पैसे बुडवत नाही. मला एक पुढारी
माहिती आहेत. त्यांच्याकडे अंक टाकणारा मुलगा दर सहा-सात महिन्यांनी बदलायचा. कारण
ते रोज पाच-सहा अंक घ्यायचे आणि पैसे द्यायची वेळ आली की, टाळाटाळ
करायचे.)
पैसे कमावण्याचा
आणखी एक प्रामाणिक मार्ग गिरीशला गेल्या पाच-सहा वर्षांत सापडलाय. कोणत्याही
दैनिकाचा रोजचा अंक उघडला की, त्यातून किमान एक, कधी कधी दोन-तीन `पॅम्फ्लेट` पडतात. तर ते अंकात टाकण्याची जबाबदारी गिरीश घेतो. याच विषयावर
बोलताना त्यानं एका मित्राचं नाव घेतलं. हा आमचा मित्र थोडं-फार सामाजिक काम करतो.
‘फार सरळ आणि सज्जन माणूस आहे तो,’ असं
प्रमाणपत्र गिरीशनं त्याला देऊन टाकलं. तर त्या सज्जन माणसाला आपल्या
व्यवसायाविषयी काही ‘पॅम्फ्लेट’ या
माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायची होती. त्यानं ते काम सांगितलं नि पैशाबाबत
विचारलं. ‘तुमच्यासारख्या माणसाकडून कसले पैसे घ्यायचे राव?’,
असा प्रतिप्रश्न करीत गिरीशनं त्याचं काम मोफत केलं. याचंही एक कारण आहे,
आमच्या या मित्रानं 50 वर्षांपूर्वी
दुकानासाठी भाड्यानं घेतलेली जागा मालकाला ठरल्या मुदतीला स्वतःहून परत केली.
त्याबद्दल एका नया पैशाची अपेक्षा न ठेवता. भर बाजारपेठेतील ही जागा सोडण्याच्या
मोबदल्यात त्याला काही लाख रुपये तर सहज ‘कमावता’ आले असते. त्यानं तसं काहीच केलं नाही, याचं गिरीशला विलक्षण कौतुक वाटतं; त्यामुळं त्याच्याबद्दल आदरही वाटतो.
मग एका समव्यावसायिकाचा
किस्सा गिरीशनं सांगितला. हा माणूस अडचणीत असलेला; घरच्या काळज्यांनी
त्रस्त. पण महिनाभरापूर्वी त्याला सकाळच्या वेळी बसस्थानकावर एक तिशी-बत्तीशीचा
तरुण अत्यंत अल्प कपड्यात दिसला. तेव्हा थंडी भयानक होती. तर थंडीत कुडकुडणाऱ्या
त्या तरुणाला पाहून त्यानं अंगातलं नवं कोरं जर्कीन त्याला देऊन टाकलं. वर नाश्ता
करायला, चहा
प्यायला पैसेही दिले. त्याच्याबद्दल सांगताना गिरीशच्या बोलण्यातला
अभिमान आणि कौतुक लपत नव्हतं.
चांगल्याला चांगलंच
म्हणण्याचा गिरीशचा हा गुण
त्या भेटीत माझ्या (पुन्हा एकदा) लक्षात आला. निघता निघता तो पुन्हा म्हणाला, “चांगलं चाललंय आपलं. पैसे
मिळतात मनासारखे. पण कष्ट भरपूर घ्यावे लागतात. मी इथपर्यंत आलो ते असंच -
प्रामाणिकपणा आणि `हार्ड वर्क`. त्याला
तर काही पर्याय नाही ना!”
....
(नगरचा वृत्तपत्र विक्रेता गिरीश
काळे याला सचोटीनं केलेल्या व्यवसायाबद्दल रोटरी क्लबचा पुरस्कार मिळाला. नाव
बदलून त्याच्याबद्दल दीड वर्षापूर्वी एक छोटं टिपण लिहिलं होतं. ते फेसबुकवर टाकलं
आणि काही मित्रांना इ-मेलनं पाठविलं होतं. या पुरस्कारामुळं त्याच्याबद्दल लिहावं
वाटलं. म्हणून त्या मजकुरात थोडी भर घालून गिरीशचं खरं नाव टाकून लिहिलेला हा लेख.)