Tuesday 23 April 2024

पुस्तकांची गोष्ट


हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झाल्यामुळे तेव्हा ती ब्लॉगवर घेतली नाही किंवा फेसबुकवरही टाकली नाही. व्हॉट्सॲपच्या एका गटावर मध्यंतरी प्रा. डॉ. निधी पटवर्धन ह्यांनी विचारलं होतं - गटातील सदस्यांपैकी कोणी पुस्तकांवर लिहिलेली कविता आहे का? किंवा अशी (इतर कोणाची) कविता माहीत आहे का?

एकदम आठवलं - आपण लिहिलेलं आहे खरं. पाठवून देऊ. डॉ. पटवर्धन ह्यांना ती कविता पाठवून दिली. मग त्यांनी कळवलं की, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या कला शाखेच्या मराठी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी दहा कविता निवडल्या आहेत. त्यात ही एक! कम्प्युटरमध्ये बंदिस्त असलेल्या ह्या रचनेचं भाग्य असं अचानक उजळलं. जागतिक पुस्तकदिनाचा मुहूर्त साधून ती आता इथे देत आहे.

--------

पुस्तकांचाही दिवस
साजरा केला जातो
वर्षातून एकदा कसाबसा
बेंदुराला नि श्रावणी पोळ्याला
‘सण एक दिन...’
कविता आठवावी अगदी तसा

















जागतिक ग्रंथ दिनानिमित्त
उजाडतं भाग्य पुस्तकांचं
उघडली जातात कपाटाची दारे
त्यातून निघतात पुस्तकांचे भारे
मिळते मोकळी हवा खायला
दाटीवाटीच्या इमारतींना चुकवून
आलेल्या प्रकाशाचा कवडसाही पाहायला
महिनोन् महिने त्यांनी वागवलेली
धूळ फडक्याने झटकली जाते
फोटोसाठी छान सजवले जाते

लिहिणारे, वाचणारे,
न वाचता लिहिणारे,
न लिहिता वाचणारे,
उत्साहाने सोशल मीडियावर
पुस्तकांवर लिहितात-बोलतात
मुहूर्त साधून केलेल्या खरेदीची
यादी आणि फोटो टाकतात
थोडं पुस्तकांचं, वाचनप्रेमाचं जादा
प्रदर्शन आयोजित करतात
अंगठे उठतात, बदाम मिळतात
सोशल मीडियाच्या चावडीवरचे
वाहवा वाचनवेड्यांची करतात

‘वाचन कमी झालंय हल्ली’
तबकडी जुनीपुराणी झिजते
दिवसभर तीच वाजत राहते
‘वाचायला वेळच कुठंय आता?’
कुणी तरी सहज विचारतो
मोबाईलमधून क्षणभरासाठी
का होईना तोंड वर काढतो

















पुस्तकं काय करतात?
पुस्तकं कुठं दिसतात?
पुस्तकं कुठं वसतात?
प्रशस्त दिवाणखान्याची
शोभा वाढवतात
कुटुंब ‘वेल रेड’ असल्याची
ठळक जाहिरात करतात

खरं तर ती तशी कुठंही राहतात
खास बनवलेल्या कपाटात
शिळ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीत
टेबल, खुर्ची, टिपॉय, माळ्यावर
आणि धान्याच्या कोठीतही क्वचित,
नांदत असतात न कुरकुरता
राहण्यापुरती जागा आहे ना
असं परस्परांना समजावतात

थोड्याशा जागेत दाटीवाटीने
चुरगाळलेल्या पानांच्या
दुखावलेल्या अवयवांसह
नशिबाचे भोग भोगत
आणि लेखकाला बोल लावत
जगतात बिचारी पुस्तकं

पुस्तकं कुठं मिळतात?
आडबाजूच्या दुकानांत
गाईड-वह्यांच्या पेठांत
रद्दीच्या दुकानांत
रस्त्याकडेच्या पथाऱ्यांवर
झगमगत्या मॉलमध्ये
प्रदर्शऩांच्या हॉलमध्ये

सुतळीने करकचून बांधलेल्या
रद्दीच्या गठ्ठ्यांमध्ये
बिचारी पुस्तकं
स्वस्तात दिसतात
कारण ती सहसा कुणी
वाचलेली नसतात

...हल्ली म्हणे पुस्तकं
किलोवरही विकली जातात
भेंडी, बटाटे, कांदे, वांगी
भाज्यांसारखं तागडीत तोलतात
पाणी शिंपडून ती ताजी टवटवीत
केलेली दिसत नाहीत, एवढंच!
चार-पाच किलोंचे ठोकळे
विकत घेतल्यावर
चाळीस-पन्नास पानांचं
पुस्तक तसंच देत नाही
विक्रेता, हेही खरं तेवढंच!

दिवस संपताच कपाटात
बंद केली जातात पुस्तकं
संपलेली असते पॅरोलची मुदत
बंदिस्त कप्प्यात, माळ्यावर
दिवसभर तिष्ठलेली वाळवी
वाटत पाहतच असते त्यांची
तिच्या भरण-पोषणाची
जबाबदारी पुन्हा वर्षभराची

पुस्तकं मनाची मशागत
करतात, हे निव्वळ ‘मिथ’
पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांकडे
परंपरेनं सोपवलेलं सफेद झूठ

कोणे एके काळी
पुस्तकांतून गोष्ट
सांगितली जायची
मुला-नातवंडांना,
आजूबाजूच्या मुलांना
आणि विद्यार्थ्यांना











उद्या बहुतेक
पुस्तकांची गोष्ट
सांगितली जाईल
कोणी ऐकायला
असलंच तर...
त्यासाठी शोधावं लागेल
निमित्त जागतिक ग्रंथदिनाचं.
.........
© सतीश स. कुलकर्णी

sats.coool@gmail.com

...........

#पुस्तके #जागतिक_पुस्तकदिन #पुस्तकांची_गोष्ट #लेखक

...........

ताजा कलम - ह्यातील खालची तीन चित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काढलेली आहेत.

(सौजन्य - www.bing.com)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...