Sunday 3 October 2021

द. मा. - पाहिलेले, ऐकलेले


'परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोकांच्या जीवनात माझ्या लेखनामुळे आनंद निर्माण करावा, हीच माझी इच्छा आहे...'

...आपल्या हजारो, लाखो चाहत्यांना हळहळ करायला लावीत, ह्या जगाचा काल निरोप घेतलेल्या प्रसिद्ध लेखक प्रा. द. मा. मिरासदार ह्यांचे हे म्हणणे आहे. नगरमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. तिचा समारोप करताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली.

द. मा. मिरासदार आपल्या अनेकांचे आवडते लेखक. लहानपणी कधी तरी त्यांच्या कथांची ओळख झाली. बहुतेक जुन्या मॅट्रिकच्या (अकरावीला) मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची नागू गवळीची कथा होती. मी ऐकलेली-वाचलेली त्यांची ती पहिली कथा. आपल्या म्हशींवर लेकरांप्रमाणे प्रेम करणारा, कुंभकर्णी झोपेतच दोन-तीन चोरांना लोळवणारा नागू फार आवडला. मग संधी मिळेल, तेव्हा करमाळ्याच्या ज्ञानेश्वर वाचनमंदिरातून त्यांची पुस्तके आणून वाचू लागलो. भोकरवाडी आणि नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, आनशी, महादा, ज्ञानू वाघमोडे ह्या त्यांच्या पात्रांच्या प्रेमात पडलो.

'नावेतील तीन प्रवासी' ही लघुकादंबरी खरं तर द. मा. ह्यांच्या धाटणीतली नव्हती. ती मला बेहद्द आवडलेली. पुस्तकांची खरेदी सुरू केल्यावर त्यांची बरीच पुस्तकं घेतली. पण हे 'तीन प्रवासी' सापडेपर्यंत चैन पडत नव्हतं. जेरोम के. जेरोम ह्यांच्या गाजलेल्या 'थ्री मेन इन ए बोट' पुस्तकाचं हे रूपांतर. स्वैर रूपांतर. तीन प्रवाशांची ही कथा मराठीत आणताना ती अनुवादित वाटणार नाही ह्याची काळजी त्यांनी घेतली आणि पूर्ण कथेलाच मराठमोळा साज चढवला. त्यांनी मनोगतात म्हटलं नसतं, तर हा अनुवाद वा रूपांतर आहे, हे आपल्यासारख्या सामान्य वाचकाच्या कदाचीत लक्षातही आलं नसतं.
आवडू लागलेल्या ह्या लेखकाला पहिल्यांदा ऐकण्याची संधी शाळकरी वयात मिळाली. करमाळ्याच्या नगरपालिकेत त्यांचं व्याख्यान झालं. पालिकेची ती सुबक, ठेंगणी, आटोपशीर इमारत. पुढे मोकळ्या जागेत फरशा टाकलेल्या. त्या फरशांवर बसून त्यांचं ते किस्सेवजा भाषण ऐकलं. कोणत्याही मोठ्या माणसाचं आणि अर्थात लेखकाचं ऐकलेलं ते पहिलं भाषण. लेखक कसा असतो, हे प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचा आनंद वेगळाच होता. द. मा. मूळचे पंढरपूरचे हे कळल्यावर तर भयानक आश्चर्य वाटलं होतं. कारण मोठी, प्रसिद्ध माणसं आपल्या आसपास नसतात, असा तेव्हा समज होता. पंढरपूर तर आमच्याच सोलापूर जिल्ह्यातलं. त्या भाषणात त्यांनी रोजच्या जीवनातल्या विसंगतीवर बोट ठेवणारे भरपूर किस्से सांगितले आणि जमलेल्या आम्हा पाच-पन्नास श्रोत्यांना मनमुराद हसवलं, एवढंच आता आठवतं. केळाच्या सालावरून घसरलेला कोणी एक असामी आधी कसा खजिल होतो, मग उठण्याऐवजी तो आपली फजिती कोणी पाहिली नाही हे आधी बघतो. तसं घडलेलं नाही, हे समजल्यावर उठून कपडे झाडत 'काही झालंच नाही' अशा थाटात कसा ऐटीत चालू लागतो, हे त्यांनी साभिनय सांगितलं होतं.

ह्या भेटीला बरीच वर्षं लोटली. दरम्यान त्यांची पुस्तकं वाचत होतोच. 'केसरी'मध्ये नोकरी सुरू केली. रविवारच्या पुरवणीत द. मा. ह्यांचं सदर चालू होतं. ती अर्थातच मेजवानी वाटायची. 'केसरी'च्या गणेशोत्सवात कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. द. मा. आणि शंकर पाटील त्यासाठी आले होते. व्यंकटेश माडगूळकर नव्हते. त्यांची तब्येत तेव्हा ठीक नसावी बहुतेक. नगरमध्ये 'कौन्सिल हॉल' म्हणून ओळखला जातो, त्या नगरपालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. फार काही गर्दी झाली नव्हती. दोघांनी कोणत्या कथा सांगितल्या, ते आता लक्षातही नाही. लक्षात राहिलं ते नंतरचं.

ह्या दोन पाहुण्यांच्या मुक्कामाची व जेवणाची सोय 'हॉटेल संकेत'मध्ये केली होती. कार्यक्रम संपल्यावर त्यांचं जेवण चालू होतं. आवडत्या लेखकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही काही उपसंपादक-वार्ताहर मंडळी उत्साहानं वाढत होतो. शंकर पाटील ह्यांचं त्या दिवशी काही तरी बिघडलेलं होतं. कार्यक्रम बहुतेक त्यांच्यासारखा मनासारखा रंगलेला नव्हता. 'वेटर' समजून ते आमच्यावर ओरडत होते, पोळ्या गरम नाहीत किंवा 'मला तेल लावलेली चपाती चालत नाही म्हणून सांगितलं ना...' असं कुरकुरत होते. द. मा. त्यांना शांतपणे समजावत होते. डोळ्यांनी खुणा करीत आम्हालाही दिलासा देत होते. काहीसे हिरमुसले होऊनच आम्ही आमच्या जेवणाकडं वळालो. तेव्हा दिसले होते सगळ्यांनाच समजून घेणारे द. मा.

नगरला १९९७मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. आदल्या वर्षी नाकारलेलं आमंत्रण आणि दशकापूर्वी रद्द झालेलं प्रवरानगरचं संमेलन ह्या पार्श्वभूमीवर संमेलनाबद्दल फार मोठा उत्साह होता. मी पाहिलेलं, अनुभवलेलं हे पहिलंच संमेलन. उपसंपादक असलो, तरी संमेलनाच्या वार्तांकनात आघाडीवर होतो. कार्यक्रम निवडण्याची संधी मिळाली, तेव्हा संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होणारी द. मा. मिरासदार ह्यांच्या मुलाखतीची जबाबदारी उत्साहानं घेतली.



संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ४ जानेवारी रोजी ही मुलाखत झाली. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांची सुरुवातच मुळी तिनं झाली. ना. वा. टिळक मुख्य मंडपात दीड तास रंगलेल्या मुलाखतीला मोठी गर्दी होती. मंगला गोडबोले, बाळकृष्ण कवठेकर व प्रा. निशिकांत ठकार ह्यांनी द. मा. ह्यांना बोलतं केलं. मुलाखत कशी असावी, ह्याचं हे उत्तम उदाहरण ठरलं. कुणी कुणावर कुरघोडी करायचा प्रयत्न केला नाही. अनेकदा असं होतं की, प्रश्न लंबेचवडे असतात आणि उत्तरं थोडक्यात. द. मा. मनापासून बोलले. काही प्रश्न त्यांनी हळुवारपणे, कळेल-नकळेल अशा पद्धतीनं सोडून दिले. मुलाखतीची वेळ होती सकाळी नऊची. ती सुरू झाली तासभर उशिराने. 'कार्यक्रम तासभर उशिरा सुरू झाला. त्याची कुणी खंत बाळगण्याचं कारण नाही', असा षट्कार ठोकूनच द. मा. ह्यांनी सुरुवात केली.

विविध दैनिकांमध्ये आज प्रसिद्ध झालेल्या द. मा. ह्यांच्या निधनाच्या बातम्यांमध्ये त्यांनी प्रारंभी गंभीर व वेगळ्या विषयांवर लेखन केल्याचे उल्लेख दिसतात. खरंच त्यांनी असं काही गंभीर लेखन केलं होतं का? असेल तर नंतर त्या वाटेकडे त्यांनी दुर्लक्ष का केलं? गंभीर साहित्य लिहिण्याकडे दुर्लक्ष केल्याची हळहळ वाटत नाही का, असा नेमका प्रश्न मंगला गोडबोले ह्यांनी त्यांना विचारला.

समोरचे श्रोते काय ऐकायला आले आहेत, आपल्याकडून त्यांची काय अपेक्षा आहे ह्याची पूर्ण जाणीव असलेल्या द. मा. ह्यांना तो प्रश्न टाळणं किंवा विनोदी अंगानं काही तरी उत्तर देऊन वेळ मारून नेणं शक्य होतं. तसं न करता त्यांनी 'प्रवाहपतित' झाल्याचं प्रांजळपणे सांगितलं. ते म्हणाले होते, ''गंभीर कथा लिहायची इच्छा मला आजही आहे. मला ती लिहिता येईल, असा आत्मविश्वासही आहे. पण लोकांना जे आवडतं, तेच मी लिहीत गेलो. तो माझा दुबळेपणा आहे. मी प्रवाहपतित झालो!'' लोकांना काय आवडतं, ह्याचं दडपण न बाळगता लेखकानं मनाला पटेल ते लिहायला हवं, असंही ते म्हणाले. त्यांनी कोणे एके काळी लिहिलेल्या 'कोणे एके काळी' शीर्षकाच्या गंभीर कथेचा प्रवासही त्यांनी सांगितला. त्यांच्या ह्या वक्तव्यानं मला बातमीचा (मनाजोगता) 'लीड' दिला होता!

संमेलनाचा पहिला दिवस गाजवला होता तो गिरीश कार्नाड ह्यांनी. तेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं. राज्यात मात्र युतीचं सरकार होतं. त्यामुळेच कार्नाड ह्यांनी सांगितलेली 'सैनिकांची गोष्ट' खूप जणांना शिवसेनेवर केलेली टीका वाटली. तथापि त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच होता. संमेलनाध्यक्ष म्हणून ना. सं. इनामदार ह्यांची झालेली निवडही अनेकांना रुचलेली नव्हती. कारण ते 'उजवे' मानले जात. मुलाखतीत ठकार ह्यांनी विचारलं की, '(संघ) परिवारात एवढी विनोदाची सामग्री आहे. पण तुम्ही सदरात, कथेमध्ये ते कधी लिहिले नाही...' तो काळ 'उजवे' असणे जाहीरपणे मिरवण्याचा नव्हता. ह्या प्रश्नालाही बहुतेक आदल्या दिवशीच्या भाषणाची पार्श्वभूमी असावी. उत्तर देताना द. मा. म्हणाले, ''मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, याचा अभिमान आहे. लेखनात मी राजकीय मते, तत्त्वप्रणाली आणत नाही. पण परिवारावर कधी लिहिले नाही. कारण आपल्याच बापाची टिंगल करणे मला जमणार नाही!''
कवितांकडे कधी वळला नाहीत का, ह्या प्रश्नावर द. मा. ह्यांनी 'नाही. कविता करण्याचा वाईट नाद मला लागला नाही!' असं उत्तर दिलं होतं. आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी ह्या आवडत्या लेखकांबद्दलही ते मनापासून बोलले. प्राध्यापक म्हणून आपले अनुभव फारसे सुखाचे नसल्याची खंत व्यक्त केली. इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा ध्यास पालकांनी सोडला नाही, तर मराठीचे भवितव्य वाईट आहे, असंही ते म्हणाले होते. ही मुलाखत ऐकून तृप्त झालो. त्या वेळी वाटलं होतं, हे सगळंच्या सगळं बातमीत लिहिता आलं तर... पण तसं शक्य नव्हतं. त्या मुलाखतीच्या टिपणाची नोंदवहीही आता कुठे तरी पडली आहे. ती सापडायला हवी.

ह्याच संमेलनाच्या निमित्ताने साधारण वर्षभरानंतर द. मा. मि. ह्यांच्यासह अनेक दिग्गजांना पुन्हा ऐकण्याची संधी आली. त्याला 'संमेलनाचं मावंदं' म्हणण्यात आलं. त्या कार्यक्रमात संमेलनाचा पूर्ण आढावा घेणाऱ्या 'संवाद'चं प्रकाशन झालं. द. मा. ह्यांनी मिश्कील भाषण करीत कवींची खिल्ली उडवली. आचार्य अत्रे, पु. भा. भावे ह्यांचे किस्से सांगून सहकार सभागृहात हास्याची कारंजी उसळवली.

साहित्य संमेलन आणि द. मा. अशी हॅटट्रिक महिनाभरातच जुळून यायची होती. परळी वैजनाथ संमेलनाचे अध्यक्ष म्हणून द. मा. ह्यांची निवड झाली. तेव्हाचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे स्वागताध्यक्ष होते. ह्या दोघांचं नातं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून. त्यामुळेच हे संमेलन आधीपासूनच माध्यमांनी, विशेषतः मुंबईतील काही वृत्तपत्रांनी लक्ष्य केलं होतं. 'संमेलन भगवं होणार,' असा त्यांचा मुद्दा होता. प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. संमेलनाचा आढावा घेणाऱ्या लेखात मग मी लिहिलंही, 'पुस्तक प्रदर्शनाची फित कापण्यासाठी असलेल्या कात्रीची मूठ सोडली, तर संमेलनात भगवं काही दिसलं नाहीच!'
'संमेलनाला कोणता रंग येणार याचे तर्क-कुतर्क लढविले जात होते,' अशी खंत मुंडे ह्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली. तो संदर्भ घेत द. मा. मि. ह्यांनी समारोपाच्या भाषणात टीकेचा उचित समाचार घेतला - 'टीकेला बिचकायचे कारणच नाही. कितीही चांगले झाले तरी टीका करणारे त्यात उणे-दुणे काढतातच. परळीचे संमेलन उत्तम झाले!'

'मी अध्यक्ष असतो, तेव्हा मुंडे मंत्री असतात,' असं द. मा. उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले होते. त्याचा संदर्भ अ. भा. वि. प.चा होता. समारोपाला आलेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशी ह्यांनीही तो पकडत मुंडे ह्यांना कोपरखळी मारली - 'माझ्या कार्यक्रमाचे पर्मनंट अध्यक्ष आणि पर्मनंट उपमुख्यमंत्री!' संमेलनाध्यक्षाची निवडणूक होऊ नये, असं द. मा. मि. समारोपाच्या भाषणात म्हणाले होते. 'तशी ती मुख्यमंत्रिपदासाठीही होऊ नये. सध्याचाच मुख्यमंत्री कायम राहावा,' अशी टोलेबाजी पंतांनी केल्याचं लक्षात आहे. त्या संमेलनाच्या बातम्यांची फारशी कात्रणं माझ्याकडे नाहीत. शोध घेऊन टिपणंही सापडली नाहीत. त्यामुळे अध्यक्षीय भाषणात द. मा. मि. ह्यांनी कोणते मुद्दे मांडले होते, ते लक्षात नाही. संमेलनाच्या उद्घाटनावर सावट होतं, ते त्या पहाटे परळी रेल्वेस्थानकावर झालेल्या भीषण अपघाताचं. पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अस्मादिक द. मा. व मुंडे ह्यांच्या इतके जवळ होते की, प्रयत्न केला असता, तर एक-दोन फोटोंमध्ये चमकताही आलं असतं!

मिरासदारांची बरीच पुस्तकं संग्रहात आहे. अचानक ती कधी तरी हाती येतात. मग दोन-अडीच तास मस्त मजेत जातात. मागच्या वर्षी 'पंचायत' वेब सीरिज पाहताना उत्तररात्रीच त्यांच्या 'भुताचा जन्म' कथेची आठवण झाली. त्या मालिकेतील एक भाग ‘भूतिया पेड’ अगदी द. मा. ह्यांच्या कथेच्या वळणानं जातो. त्यांना हे कुणी सांगितलं होतं का?

विंदा - बापट - पाडगावकर ह्या त्रयीनं कविता गावोगावी नेली. माडगूळकर - शंकर पाटील - मिरासदार ह्यांनी कथाकथनाचे कार्यक्रम केले. येत्या होळीला जाहीर कथाकथनाच्या पहिल्या कार्यक्रमाला सत्तावन वर्षं पूर्ण होतील. पहिला कार्यक्रम नागपूरला झाल्याची आठवण द. मा. ह्यांनी मुलाखतीत सांगितली होती. शंकर पाटील अगदी रंगून कथा सांगत, मिरासदारांची धाटणी वेगळीच होती. 'कवितेचे बघे निर्माण केले', असा आरोप ज्येष्ठ कवींवर झाला होता. अशी काही टीका ह्या तिघांवर झाली होती का? तसं काही वाचल्याचं आठवत नाही.

मिरासदारांच्या कथा आता वाचताना बऱ्याच वेळा वाटतं की, आजच्या काळात ते लिहीत असते आणि तशाच कथा त्यांनी लिहिल्या असत्या, तर त्याचं किती स्वागत झालं असतं? त्यातल्या 'जातिवाचक उल्लेखांनी' किती जणांच्या भावना दुखावल्या असत्या? सामाजिक माध्यमांतून त्यांचा कसा उद्धार झाला असता? अन्य कोणत्याही संमेलनाप्रमाणे परळीच्या संमेलनातही समारोपाच्या कार्यक्रमात डझनभर ठराव मंजूर झाले. त्यातल्या एका ठरावात म्हटले आहे, 'ज्ञानाच्या निकोप वाढीसाठी मराठी जनतेने उदार मनोवृत्तीचा स्वीकार करावा.' खुद्द संमेलनाध्यक्ष सूचक असलेला बारावा ठराव आहे - 'संशोधनाच्या व विचाराच्या क्षेत्रात साधार 'सत्य' हेच सर्वश्रेष्ठ मूल्य असते. एखाद्या संशोधकाने/विचारवंताने आधार व प्रमाणे देऊन केलेले विवेचन/मूल्यमापन कुणास पटले नाही,तर त्याचा प्रतिवाद वैचारिक पातळीवरच केला पाहिजे. दुर्दैवाने मराठी विचारविश्वात अनेकदा असहिष्णू वृत्ती दिसून येते.'

खळखळून हसायला लावणाऱ्या आवडत्या लेखकाला मी एवढंच पाहिलं नि ऐकलं.
---------
(छायाचित्रं - व्हॉट्सॲपच्या विविध गटांवर आलेली.)

#दमामि #द.मा. #साहित्य_संमेलन #नगर_संमेलन #परळी_संमेलन #कथाकथन #मिरासदार #DaMaMi #Mirasdar #MarathiAuthor 


पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...