Tuesday 31 December 2019

'खिडकी' ठरली नंबर एक!



'खिडकी' सताड उघडली, त्याला साडेपाच वर्षं झाली आता. लोकसभेच्या मागच्या निवडणुकीनंतर कधी तरी. लिहिण्याची कोंडी होत होती, तेव्हा आपलं असं काही हक्काचं सुरू करावं वाटलं. त्या काळात छोटी-मोठी टिपणं/लेख, 'पद्यासारखं वाटणारं गद्य' शीर्षकाखाली आम आदमीच्या कविता असं अधूनमधून लिहीत होतो. ते मित्रांना, ओळखीच्या मंडळींना इ-मेलने पाठवलं जाई. 'अहो दादा! हे तुम्ही छापत का नाही? असं वाया जाऊ देऊ नका', असा सल्ला एका लेखक-कवीनं आपलेपणानं दिला होता. वर्तमानपत्रात काम करीत असूनही छापण्याची अडचण येते, हे कारण काही त्याला पटलं नाही.

सामाजिक माध्यमाचं व्यासपीठ तोवर चांगल्या प्रमाणात खुलं झालं होतं. (जाता जाता : 'सोशल मीडिया'चं भाषांतर 'समाज माध्यम' असं करणं चुकीचं आहे, हे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कधी तरी लिहिलं होतं. 'सामाजिक माध्यम' असा शब्द त्यांनी सुचविला आहे.) फेसबुक नियमित उघडतो. पण तिथं दीर्घ कुणी वाचतं का नाही, हे कळत नव्हतं. तिथं 'मित्रां'ची संख्या मर्यादित. त्यामुळे मोठ्या संख्येनं वाचकांपर्यंत कसं जायचं, हा प्रश्नच.

अशात एकदा मधुकर टोकेकर यांची इ-मेल पाहिली. आपल्याला वाचायला, ऐकायला जे जे काही आवडलं आहे, ते ओळखीच्या मंडळींना इ-मेलने पाठवायची त्यांची सवय. त्यांच्याशी अजून तशीही ओळख झालेली नाहीच. तर त्यांच्या एका इ-मेलमध्ये 'मैत्री २०१२' ब्लॉगचा दुवा आला. ('मैत्री'ची संपादक मंडळी ब्लॉगचा उल्लेख आवर्जून अनुदिनी करतात.) त्या अनुदिनीला भेट दिली. तिथं मोठी मंडळी आणि वैविध्यपूर्ण साहित्य होतं. धाडस करून संपादक मंडळातील श्री. मंगेश नाबर यांना एक टिपण (बहुतेक पद्यासारखं वाटणारं गद्य!) पाठविलं. त्यांनी ते लगेच प्रसिद्धही केलं.

'मैत्री'चे वाचक दूरदूरचे; वयानं, शिक्षणानं, अनुभवानं आणि ज्ञानानंही मोठे. त्यांना आपण लिहिलेलं आवडत आहे, हे प्रतिक्रियांवरून समजलं. मग तिथेच लिहू लागलो. आम आदमीच्या एक-दोन कविता तर खास श्री. नाबर यांच्या सांगण्यावरून लिहिल्या. तिथं लिहीत असतानाच जाणवलं की, आपल्याला हवं ते माध्यम हे आहे.

'ब्लॉग'बद्दल अगदी अडाणी नसलो, तरी फार माहितीही नव्हती. तो सुरू करणं तसं सोपंच आहे. पण तांत्रिक बाबींचा बागुलबुवा करण्याची सवय नडली. त्यामुळं ते काम पुढं ढकलत राहिलो. शेवटी एकदाचं धाडस केलं. तरुण पत्रकार केदार भोपे मदतीला आला आणि त्यानं तासाभरात ब्लॉग सुरू करून दिला. ब्लॉग सुरू करावा असं वाटण्याचं श्रेय 'मैत्री'ला काही प्रमाणात निश्चित जातं.

मग लिहीत राहिलो. काही जुनं त्यावर टाकत राहिलो. पण हे वाचकांपर्यंत पोहोचणार कसं? इ-मेलने कळवू लागलो. ज्यांना इ-मेल पाठवत होतो, त्यातले खूप जण अनोळखी होते. त्यातल्या काहींचा नंतर चांगला (इ-)परिचय झाला; काहींशी फोनवर बोलणंही झालं. 'अशा इ-मेल यापुढे पाठवू नका,' 'तुमच्या मेलिंग लिस्टमधून माझं नाव काढून टाका' असं काहींनी कळवलं. (त्यांना पुढे कधीच इ-मेल जाणार नाही, याची काळजी घेतली.) पण बऱ्याच जणांनी हा इ-मेलचा मारा सहन केला; भले ते ब्लॉगला भेट देत असोत वा नसोत! काही वाचकांनी 'आपली ओळख आहे का? माझा इ-मेल कुठून मिळाला?' असंही विचारलं. कळविल्यावर मग त्यांची काही तक्रार राहिली नाही. पुढे मग व्हॉट्सॲपचा वापर करीत नव्या लेखनाचे दुवे पाठवित राहिलो.

मध्यंतरी एका सणकीत ब्लॉग सहा महिने बंद ठेवला. त्याची गंमत 'पासवर्डपायी परवड!' लेखात लिहिली आहेच. (khidaki.blogspot.com/2018/09/password.html) त्यातून बाहेर पडलो आणि नव्यानं लिहिणं चालू केलं. या ब्लॉगमुळं अनेक मोठ्या माणसांपर्यंत, चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचता आलं. त्यांची दादही मिळाली. असे वाचक बरेच आहेत. 'चांगलं मराठी लिहीत असल्याबद्दल' काहींनी कौतुकही केलं. वाचक देत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल एका मित्रानं कौतुकमिश्रित आश्चर्य व्यक्त केलं! अशा सगळ्याच वाचकांचं नाव घेणं शक्य नाही. वृत्तपत्रात काम करीत असताना बातमीतील नावांबद्दल आग्रह धरणाऱ्यांना सांगत असे - ज्यांची नावं आली त्यांना त्यात फारसं स्वारस्य नसतं; पण चुकून एखाद्याचं नाव विसरलं, तर तो खट्टू होतो!

तर वर्ष संपताना हे पाल्हाळ लावण्याचं खास कारण आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 'खिडकी'नं दोन टप्पे गाठले. हे दोन्ही टप्पे गाठता आले, ते ब्लॉग वाचणाऱ्या तुम्हा सगळ्यांमुळेच.

'एबीपी माझा' दूरचित्रवाणी वाहिनी मराठी ब्लॉगरसाठी दर वर्षी 'ब्लॉग माझा' स्पर्धा घेते. या स्पर्धेत भाग घेण्याचं एका मैत्रिणीनं दोन वर्षांपूर्वी सुचविलं. स्पर्धेत भाग कसा घ्यायचा, हे शोधलं. आहे की अजून मुदत, असं म्हणून लगेच प्रवेशिका भरायचा कंटाळा केला. पुन्हा लक्षात आलं तेव्हा त्याची मुदत संपली होती. त्यानंतर मागच्या वर्षी अचानक या स्पर्धेची आठवण झाली. शोधाशोध केल्यावर कळलं की, स्पर्धेत भाग घ्यायची मुदत कालच संपली!

दोन वर्षांचा हा अनुभव असल्यानं यंदा ऑक्टोबरच्या शेवटी, नोव्हेंबरच्या सुरुवातीला स्पर्धेची घोषणा पाहत होतो. पण काहीच सापडलं नाही. यंदाही गाडी चुकली, असं समजून गप्प राहिलो.

मुलानं २ डिसेंबरला स्पर्धेची माहिती कळविली. त्यानं दिलेला दुवा उघडून पाहिला, तर स्पर्धेत भाग घेण्याचा तो शेवटचा दिवस होता. हुश्श वाटलं! त्याच दिवशी ऑनलाईन नोंदणी केली.

त्यानंतर अवघ्या १० दिवसांनी, म्हणजे दि. १२ डिसेंबरच्या रात्री 'एबीपी माझा'मधून फोन आला - 'अभिनंदन! 'ब्लॉग माझा' स्पर्धेत तुमच्या ब्लॉगला पहिला क्रमांक मिळाला...' मुंबईच्या 'कोर्टयार्ड मॅरियट'मध्ये १९ डिसेंबरला पारितोषिक वितरण झालं. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारलं. बाकीचे तरुण विजेते पाहिल्यावर वाटलं की, आपण शिंगं मोडून वासरांत शिरलो की काय!

'खिडकी नंबर एक' ठरल्याची बातमी तुम्हाला सांगायलाच हवी ना! त्यासाठी तर वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा मुहूर्त निवडला.

आणखी एक, याच आठवड्यात ब्लॉगच्या वाचकांच्या संख्येनं तीस हजारांचा टप्पा ओलांडला. पाच वर्षांतील पाऊणशे लेखांसाठी ही संख्या फार मोठी नाही, हे तसं खरं आहे. पण यातले बहुसंख्य वाचक नियमित आहेत, हेही खरं. ते मनापासून वाचतात. दूरदेशी असलेले भारतीयही 'खिडकी' उघडून डोकावतात, याचा आनंद वाटतो.

'तुम्ही थोडं अनियमित लिहिता. प्रमाण वाढवलं पाहिजे,' अशी 'तक्रार' एका ज्येष्ठ वाचकानं अलीकडेच केली. त्यात तथ्य आहेच. पण ज्या विषयांवर मोठ्या प्रमाणात लिहिलं जातं, ते विषय टाळतो. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल, महाराष्ट्रात महिनाभर रंगलेलं राजकीय नाट्य यावर इच्छा असूनही लिहिलं नाही. त्यात फार वेगळं काही असणार नाही, हे जाणूनच ते केलं.

संकल्प वगैरे नाही. पण नव्या वर्षात अधिक लिहिण्याचा, चांगलं लिहिण्याचा, वेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न नक्की करणार!

'खिडकी' उघडल्यावर हवेची सुखद झुळूक आली पाहिजेच ना!!

Thursday 12 December 2019

अस्वस्थ ते आश्वस्त!



जागतिकीकरण झालं, खुली अर्थव्यवस्था आली आणि त्या पाठोपाठ कार्यालयीन कामकाजात संगणक आले. त्यानं खूप काही घडवलं आणि बिघडवलं. ठिकठिकाणची कार्यालये 'स्मार्ट' झाली. तिथली कामाची पद्धत बदलली, माणसांची गरज कमी झाली. असणारी माणसं या साऱ्याला अनुरूप असतीलच असं नाही. तसं त्यांनी असायला हवं, हे खरं. काम करणारी माणसंही 'स्मार्ट' असणं गरजेचं झालं. नव्या, आधुनिक व्यवस्थेशी जुळवून घेण्यास कुरकुर करणारी, ते न जमणारी माणसं बाहेर फेकली गेली. व्यवस्थेतून काही जण स्वतःहून बाहेर पडले, काही जण बाहेर काढले गेले आणि काहींना 'गोल्डन हँडशेक' देऊन निरोप देण्यात आला. असं सारं बदलत असतानाही नव्या व्यवस्थेत स्वतःला कुठेच बसविता न येणारी आणि तरीही 'चुकून' टिकून राहिलेली माणसं असतातच. त्यांचं काय होतं? या बदलामुळे अस्वस्थ असलेले, तरीही चाकोरी सोडता न येणारे कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, साहेब काय करतात?

प्रसिद्ध पत्रकार-चित्रकार-लेखक प्रकाश बाळ जोशी अशाच एका मोठ्या अधिकाऱ्याची कथा सांगतात. ती असते त्याची लढाई - नोकरीची, ती टिकवून ठेवण्याची, त्या जगातील अस्तित्वाची. 'प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा' शीर्षकाचा २९ कथांचा ३५८ पानांचा हा दगणदणीत संग्रह आहे. 'भाष्य प्रकाशन'ने २७ मार्च २०१५ रोजी तो प्रकाशित केला. त्यातील कथा १९७३ ते १९९९ या कालावधीत लिहिलेल्या. बऱ्याच विविध अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि काही अप्रकाशित. त्यातीलच ही 'विनयभंग' कथा.

मुंबईत मुख्यालय असलेल्या सेमटेल कंपनीत 'डीके' अधिकारी आहेत. त्यांचं आडनाव 'रंगाचारी' असल्याचा उल्लेख फार नंतर येतो. नव्या जमान्यात त्यांच्याही कंपनीनं कात टाकलेली, कार्यालय बदललेलं. डीके चांगल्या पदावर - विभागीय व्यवस्थापक आणि चांगला पगार घेणारे. अडचण एकच - सध्या काम नाही. नुसतं बसून पगार घ्यायला त्यांना छान वाटतं. पण त्याच वेळी नोकरी टिकविण्याची धास्तीही मनात. अशा अडनिड्या वयात चांगलं बसलेलं रुटीन सोडून दुसरी, कमी पगाराची नि जास्त कामाची नोकरी कोण शोधणार? आणि कशासाठी? काम नसलेल्या डीके यांना मग नकोशा गोष्टी जाणवतात. उदाहरणार्थ कार्यालयात येणारा कुबट वास. त्याची तक्रार केल्यावर बॉस उडवून लावतो. सहकाऱ्यांकडे बोलावं, तर ते लक्ष देत नाहीत. रंगनाथन मात्र फटकळपणे बोलतो, 'तुम्हाला काही कामधंदा नाही. त्यामुळे हे असलं सुचतं. काही तरी काम लावून घ्या...' हे बोलणं लागट असलं, तरी खरं असतं. त्यामुळे हिरमोड होतो त्यांचा.

सगळं बदललं आहे, नवीन व्यवस्थापन आलं आहे, साहेबांसकट सगळ्यांना हजेरीसाठी कार्ड पंच करावं लागतं. एवढ्या साऱ्या बदलात आपल्याला कुणी हात लावलेला नाही, याची जाणीव डीके यांना आहेच. नवीन जबाबदारी अंगावर पडेपर्यंत आहे हेच ढकलत न्यावं, हे त्यांनी मनोमन मान्य केलं आहे. अशाच एका संध्याकाळी साहेब सांगतात, 'जाताना भेटून जा.' काही तरी काम मिळणार, या भावनेनं डीके सुखावतात. त्याच वेळी दुसरीकडे शंका - 'कशासाठी बोलावलं असेल? आपला नंबर लागतो की काय?'

बॉस थोडक्यात काम सांगतात. कंपनीच्या औरंगाबाद कार्यालयातील एका मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनं घोळ घालून ठेवलेला असतो. त्यानं 'न्यू ईयर इव्ह'ला पार्टीत मित्राच्या पत्नीचाच विनयभंग केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल असते. त्याची बातमी स्थानिक दैनिकांमध्ये प्रसिद्ध होते. नेमकं त्याच काळातं अजिंठा-वेरूळ पाहायला गेलेल्या कंपनीच्या एका संचालकाच्या कानावर हे सारं येतं. अस्वस्थ होऊन ते कंपनीच्या जनरल मॅनेजरकडं बोलतात. हा जो बदलापूरकर नावाचा एमआर आहे, त्याला काढूनच टाका नोकरीतून, असं फर्मान कंपनीच्या चेअरमनसाहेबांनी काढलेलं. पण असं एकदम करता येत नाही. व्यवस्थेचे म्हणून काही नियम असतात. त्या नियमांनुसार जाऊन, अंतर्गत चौकशी करूनच निर्णय घ्यावे लागतात. न्याय होतो की नाही, ही बाब वेगळी; पण न्यायाची प्रक्रिया पार पाडली गेली, हे दाखवावं लागतं.

आणि बॉस डीके यांच्यावर नेमकी हीच जबाबदारी टाकतात. 'कंपनी काही तरी करते आहे,' हे दाखविण्याची जबाबदारी डीके यांची. 'माझा लेबर-लॉचा काही अभ्यास नाही,' असं डीके सांगतातही. मग एकदम त्यांच्या मनात येतं - कधी नाही ते आपल्याला काही काम सांगितलं जात आहे आणि आपण ते आडवळणाने टाळण्याचा प्रयत्न करतो आहे, असं दिसणं काही बरोबर नाही. काम नाही, ते मिळालं आहे. म्हणजे कंपनीसाठी आपलं अस्तित्व आहे. ही संधी सोडायला नको. बॉसने बजावलेलं असतंच - महत्त्वाचं आहे काम; अजून काही घोळ वाढायला नको.

डीके यांना बदलापूरकर आठवतो. औरंगाबाद विभाग त्यांनी पूर्वी संभाळलेला आहे. तिथली माणसंही ओळखीची आहेत. बॉसनं दिलेली फाईल ते बारकाइनं वाचतात. फार काही नसतं त्यात - गुन्ह्याच्या बातमीचं कात्रण. काही मुद्दे काढतात. मग एका वकील मित्राला फोन करतात - अशा प्रकरणाची चौकशी कशी करायची हे विचारण्यासाठी. विरंगुळा म्हणून दुसरा मित्र सुधाकरबरोबर 'बार'मध्ये बसल्यावर डीके म्हणतात, जाऊन येतो औरंगाबादला. एक-दोन दिवसांत मिटवून टाकतो प्रकरण. आलेलं काम पटकन संपवावं आणि मोकळं व्हावं, असा त्यांचा विचार.

सुधाकर म्हणतो, ''जेवढी लांबवता येईल, तेवढी चौकशी लांबव. नाही तरी तुला दुसरं काही काम नाही. या वयात कुठं नोकरी शोधणार?'' डीके कार्यालयात बसून दिवसभर फाईल वाचतात. काय करायचं याचे नेमके मुद्दे एका कागदावर काढतात - 'लिप्टन'मधील पारशी साहेबाने लावलेली सवय.

चौकशीसाठी डीके यांचा औरंगाबाद दौरा. बॉसची रीतसर परवानगी घेऊन. विमानाने जाणे, थ्री-स्टार हॉटेलमध्ये राहणे. कोंदट वास येणाऱ्या कार्यालयापेक्षा बरं वाटतं त्यांना हे. औरंगाबादच्या कार्यालयात थेट जाणं टाळतात. तशी कल्पनाही दिलेली नसते त्यांनी. ओळखीच्या आमदाराकडून पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याशी संपर्क साधलेला असतो. दरम्यानच्या काळात बदलापूरकरविरुद्ध ज्यानं फिर्याद दिलेली असते, त्या धनराज नहारशी संपर्क साधतात डीके. मिटवता येतं का, ते पाहायला. काम केल्याचं त्यांनाही दाखवायचं असतंच की.

पोलिस इन्स्पेक्टर जामकर डीके यांना भेटायला थेट हॉटेलात येतात. सगळी केस व्यवस्थित समजावून सांगतात. बदलापूरकर आणि नहार मित्र. नव्या वर्षाच्या स्वागताच्या रात्री बायकासंह पार्टीला जातात. तिथे यथेच्छ बीअर पितात. बदलापूरकरचं एका वेटरशी भांडण झाल्यावर चौघेही नहारच्या घरी जातात. तिथे पुन्हा पेयपान. अशातच काही तरी गडबड होते आणि नहारची बायको बदलापूरकरविरुद्ध विनयभंगाची फिर्याद देते भररात्री. तिला दुजोरा द्यायला बदलापूरकरचीच बायको! आरोपीची बायको फिर्यादीच्या बाजूने असल्याने पोलिसांना गुन्हा नोंदविणं भागच पडतं. आपण काय घोळ घातला, हे तिच्या दुसऱ्या दिवशी लक्षात येतं आणि वकिलाकरवी ती सुधारित प्रतिज्ञापत्र देते.

एफआयआर वाचून डीके यांच्या फार काही लक्षात येत नाही. ते संध्याकाळी औरंगाबाद विभागीय कार्यालयात जातात. व्यवस्थापक इनामदार आश्चर्यात पडतात. डीके अचानक, काही न कळवता-सांगता इथे कसे? आणि आधी ऑफिसात न येता, हॉटेलात उतरून. इनामदार अस्सल अधिकारी असतात. खालचे वर काही कळू द्यायचे नाही आणि वरच्यांशी खालचे कोणी संपर्कात येऊ द्यायचे नाही. आपले महत्त्व कसे अबाधित राहिले पाहिजे. आपल्याला विचारल्याविना खालची-वरची साखळी सांधली जाणे अशक्य व्हावे, ही त्यांची कार्यपद्धती. 'बदलापूरकरचं प्रकरण काय आहे?' असं डीके यांनी विचारल्यावर इनामदारांना नाही म्हटले तरी धक्काच बसतो. हेडऑफिसपर्यंत हे प्रकरण गेले? तोवर त्यांना विश्वास असतो की, इथल्या इथे मिटून जाईल हे प्रकरण. म्हणून तर त्यांनी मुख्य कार्यालयाला त्याबाबत काही कळवलेले नसते. पण चेअरमन, संचालक यांनी यात कसे लक्ष घातले आहे, हे सूचकपणे सांगून डीके त्यांना हादरवतात.

डीके चौकशीला आल्याची बातमी दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध होते. कशी काय आली बुवा बातमी, असा प्रश्न त्यांना पडतो. इन्स्पेक्टर जामकर त्यांना भेटलेले असतात. बातमीचा स्रोत तोच असावा. त्याच बातमीमुळे बदलापूरकर त्यांना भेटायला पत्नीसह हॉटेलात येतो. नोकरी वाचवा असं सांगतो. गयावया करतो. त्याची बायकोही चूक झाल्याचं मान्य करते. 'बायकोसमोर कोणता नवरा दुसऱ्या बाईचा विनयभंग करील?', असा तर्कशुद्ध वाटणारा प्रश्नही विचारते. चौकशी अधिकाऱ्याच्या भूमिकेत जाऊन डीके बदलापूरकरला आवश्यक त्या गोष्टी सांगतात.

औरंगाबादचे काम संपले. आता फक्त कार्यालयात जाऊन बदलापूरकरचा अधिकृत जबाब घेणे आणि तिथून विमानाने परत मुंबई. हॉटेलात सकाळी सांगितलेलीच कथा बदलापूरकर पुन्हा ऐकवतो. त्यातून डीके यांना अधिक काही कळत नाही. 'प्रकरण फारच गुंतागुंतीचं झालंय आता,' असं सांगून ते इनामदार यांना जोराचा धक्का देतात.

विमानात बसल्यावर सवयीने डीके नोटबुक काढतात. दौऱ्याचं फलित मुद्द्यांच्या स्वरूपात लिहू लागतात. एवढी मोठी घटना वरिष्ठ कार्यालयाला न कळवल्याबद्दल इनामदारांची बदली, बदलापूरकरला सस्पेंड करून एप्रिलपर्यंत चौकशी पूर्ण करायची आणि तिसरा मुद्दा त्याची नाशिकला 'पनिशमेंट ट्रान्सफर'.

चौथाही मुद्दा डीके यांच्या मनात असतो. तो नोंदवत मात्र नाहीत ते. धनराज नहार फिर्याद मागे घेईल, असं बदलापूरकरला वाटत असतं. या असल्या प्रकरणामुळे कंपनीची बदनामी होते, हे माहीत असल्याने आल्या आल्या डीके यांनीही त्याच्याशी संपर्क साधलेला असतोच.

पण धनराज नहार माघार घेणार नाही, तडजोड करणार नाही आणि चौकशी चालूच राहील, याची काळजी घेणं हा डीके यांनी न लिहिलेला चौथा मुद्दा असतो. चौकशी चालू राहिली, तरच त्यांच्या कंपनीतील अस्तित्वाला अर्थ असणार होता. त्यासाठी अनुषंगिक गोष्टी करणे भाग आहे. त्यासाठी त्यांना औरंगाबादला वारंवार यावे लागणार. तशी तरतूद त्यांनी करून ठेवलेली असते. दिवसभर कार्यालयात नुसतं बसून काय करायचं, या प्रश्नाला त्यांनी उत्तर शोधलेलं आहे. त्यासाठी त्यांना बदलापूरकर, इनामदार, बॉस आणि अस्वस्थ झालेले कंपनीचे संचालक-चेअरमन यांची मोठीच मदत झालेली.

प्रकाश बाळ जोशी यांची ही दीर्घकथा छापील २६ पानांची आहे. त्यात त्यांचे एक अमूर्त रेखाटणही आहे. त्याची कथेशी नाळ जुळलेली आहे, असं मात्र वाटत नाही. कथानायक डीके यांची अस्वस्थता सुरुवातीच्या भागातून फार छान व्यक्त झाली आहे. बदलती व्यवस्था, त्यातून मध्यमवयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आलेली अस्वस्थता त्यांच्या शब्दांतून पुरेपूर जाणवते. शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका अन्य कथांप्रमाणेच येथेही दिसतात. घडणाऱ्या प्रसंगांनुसार वाचकांना आपल्याबरोबर नेण्यात, उत्सुकता कायम ठेवण्यात ही कथा यशस्वी होते.

आधी काम नाही म्हणून अस्वस्थ असणारे डीके, नंतर काही काम सांगितलं जात आहे, हे समजल्यावर सहज प्रवृत्तीनुसार ते टाळू पाहणारे डीके, पडलीच आहे जबाबदारी तर उरकून टाकू चटकन असं वाटणारे डीके, नंतर या साऱ्याचा अर्थ कळलेले आणि ते आपल्या कंपनीतल्या अस्तित्वाशी किती निगडीत आहे, हे जाणवणारे डीके. हळुहळू बदलत जातात ते. त्यांना आवश्यकच असतं ते. हे सारं बदलतं चित्र लेखकानं अतिशय छान पद्धतीने साकारलं आहे.

आधी काही घडत नाही आणि जेव्हा काही घडू लागते, तेव्हा त्याचे दान आपल्या बाजूने पाडण्यात डीके सारी बुद्धी पणाला लावतात. इनामदार आणि बदलापूरकर यांचा वापर करून ते आपल्या अस्तित्वाला, नोकरीतील आपल्या आवश्यकतेला अर्थ देऊ पाहतात. त्याबद्दल त्यांचा राग येत नाही किंवा त्यांच्या वृत्तीचा तिरस्कारही वाटत नाही. नव्या व्यवस्थेतील अक्राळविक्राळ चक्रात त्यांचे जे काही स्थान आहे, ते भक्कम करण्यासाठी, किमान ते टिकून राहण्यासाठी ते या साऱ्या प्रकरणाचा वापर करून घेऊ पाहतात. रिकामे बसून पगार घेण्यापेक्षा काही तरी काम करतो आहोत, असे कंपनीला दाखवून (आणि मनाला भासवून) डीके आपल्या अस्तित्वाला अर्थ देत राहतात. भावनांचा शब्दबंबाळ आविष्कार, शैलीतील नाट्यमयता असं काहीही नसताना 'विनयभंग'चे नायक डीके अस्वस्थ करून सोडतात, हे नक्की!

(ग्रंथाली कथा परीक्षण स्पर्धेसाठी पाठविलेला हा लेख. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.)

Monday 28 October 2019

थोडं चाखू, थोडं राखू... बाकीचं पुढे ढकलून टाकू!

कोजागरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी व्हॉट्सपवर संदेश आला. बहुतेक फॉरवर्ड केलेलाच असावा. पण वाचण्यासारखा. वाचून गालातल्या गालात हसण्यासारखा. त्यात म्हटलं होतं - ‘दसऱ्यानिमित्त आलेली झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं आता कुठं मोबाईलमधून काढून टाकली. थोडं साफसुफ वाटतंय तेवढ्यात मसाला दुधाचे ग्लास आणि चंद्राची गर्दी झाली.

हा संदेश पूर्ण वाचणं काही जड गेलं नाही. दोन-तीन ओळींचाच होता तो म्हणून. वाचल्यानंतर पुढे पाठवण्याचा मोह झाला क्षणभर. पण आवरला. कारण तो फार फिरणार असं वाटलं होतं. ते खरं ठरलं. दिवसभरात अजून दोन-तीन ठिकाणांहून आला तो.

दिवस सणांचे आहेत. उत्सवाच्या उत्साहाचे आहेत. या उत्साहावर यंदा पावसानं चांगलं धो धो पाणी टाकलं, हे खरं. त्यामुळं की काय, दिवाळीच्या अगदी दोन-तीन दिवस आधीपर्यंत बाजारपेठेत उत्साह कमी दिसत असेल कदाचितपण मोबाईलमध्ये तो कधीचा ओसंडून वाहायला लागला होता. अशा उत्साही संदेशांनी व्हॉट्स फसफसून वाहतंय. बऱ्याचदा हे फसफसणं विटण्यापर्यंत जाऊन पोहोचतं, ही बाब वेगळी.

दिवाळी चालू झालीच आहे. अगदी मुहुर्तावर शुभेच्छा देण्यात काय मजात्या तर सगळेच देतात. आपण त्यात आघाडीवर असलंच पाहिजे, म्हणून मग काही व्हॉट्सॅपवीर आठवडाभर आधीच सुरुवात करतात. त्यांच्याकडे स्टॉक असतोच. गेल्या वर्षीचा, त्याच्या आदल्या वर्षीचा. शुभेच्छांमध्येच म्हटलेलं असतं सगळ्यांच्या आधी आणि एक (किंवा दोन) दिवस) आधी शुभेच्छा मीच दिल्या(याच धर्तीवर आम्ही यंदा वर्षाअखेरीस २०२१ या वर्षाच्या आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी २०२२साठी शुभेच्छा देणार आहोत!)

वसुबारसेपासून शुभेच्छांचा 'ताप' (फीव्हर हो) वाढत जातो आणि पाडव्यादिवशी तो १०४ वगैरे होतो. तो उतरणीला लागल्याची लक्षणं भाऊबीजेपासून जाणवू लागतात. त्या दिवशी ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ फॉर्मात असते. त्यानंतरही अधूनमधून कुणाला तरी हुक्की येतेच. आलेल्यातला एखादा मेसेज तो फॉरवर्ड करून टाकतो बसल्या बसल्या. फॉरवर्ड तर फॉरवर्डत्यातून शुभेच्छा दिल्याचं आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याचं समाधान. त्यानं दिवाळीच्या आनंदावर तृप्तीची कशी जाड साय येते.

एव्हाना लाडू, चकल्या, चिवडा, फटाके, रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्या... हे सारं पचवताना मोबाईलला अजीर्ण होऊन जातं. क्वचित कधी तरी त्याला याचा हँगओव्हरही येतो आणि तो लडखडायला लागतो. अशा वेळी एकच उपाय असतो लंघन करणं. सरसकट सगळे संदेश उडवून टाकत व्हॉट्स एकदम स्वच्छ करून बंद ठेवायचं. यानं तुमच्या अँड्रॉईडची किंवा अन्य कुठल्याही स्मार्ट फोनची प्रकृती पूर्वपदावर येण्यास मदत होते.

दिवाळीच्या शुभेच्छा म्हटलं की, काही गोष्टी अनिवार्य असतात. घरावर लखलखीत लायटिंग केलं असलं तरी इथं इवलीशी (आणि शक्यतो मिणमिणती!) पणती आवश्यक असते. प्रकाशाची अंधारावर मात, उडणारे बाण आणि भुईनळे, कानठळ्या बसविणारे हिरवे टमबाँब, अंगालाच मुंग्या लागतात की काय, अशी शंका येणारे पाकात मुरवून ठेवलेले गोग्गोड शब्द इत्यादीही असतंच. एरवी असंस्कृत भासणाऱ्या या जगात दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारी संस्कृत वचनं आणि श्लोक पाहिले की, या देववाणीला आपण उगीच अभ्यासातून हद्दपार केलं असं वाटतं. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ या संतश्रेष्ठांचे अभंग-ओव्याही शुभेच्छांमधून आढळतात. अलीकडच्या काही वर्षांत शुभेच्छांसाठी ज्ञानदेवांच्या ‘मी अविवेकाची काजळी। फेडुनी विवेकदीप उजळी।’ ओवीला फार मागणी आहे. ही काजळी दिवाळीपुरती काढली म्हणजे भागलं, असंच आपली विवेकबुद्धी सांगत असावी, बहुतेक!

आणखी काही शुभेच्छांमध्ये दिवाळीचा फराळही आवर्जून असतो. दगडासारखा कडक लाडू, वातड चकली, चिवट कडबोळी, खवट करंजी याचे जुनाट ('स्वराज्य'छाप) विनोद त्यात असतात. ‘छायाचित्र हजार शब्दांहून बोलकं असतं’ या उद्धृताला जागून बरेच जण फराळाच्या ताटांचे फोटोच पाठवतात. साधारण सहा-सात वर्षांपासून फॉरवर्ड होत असलेल्या या पदार्थांना वास कसा येत नाही किंवा ते तेवढे जुने आहेत, याचा वासही फॉरवर्ड करणाऱ्यांना येत नाही, ही तशी आश्चर्याचीच गोष्ट. पण आपल्याला कुठे वाचायचंय/पाहायचंय, फॉरवर्ड तर करायचंय ना, अशी संबंधितांची स्थितप्रज्ञ भूमिका असते. त्यातून ते फिरत राहतात.

तसाही फराळ आणि फॉरवर्ड यांचा संबंध जुनाच आहे. ‘गेले ते दिन गेले...’ आळवणाऱ्यांना आणि ‘आमच्या काळी असं होतं...’ असे कढ काढणाऱ्या वयोगटातल्या ('सोशल') मंडळींना हे लगेच पटेल. पूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून फराळाची ताटं शेजारच्या घरोघर पोहोचवण्याची पद्धत होती. घरातला बंड्या बेसनाचा लाडू खाण्यासाठी हट्ट धरून बसला असला, तरी तो आधी शेजारच्या खंड्याच्या घरी कसा पोहोचता होईल, यावर त्याच्या प्रेमस्वरूप आईचा कटाक्ष असे. ‘त्या खंड्याच्या आईचा फराळ येण्याआधी आपला त्यांच्या घरी जाऊ दे रे,’ असं बंड्याच्या भावाला किंवा बहिणीला सांगतानाच सोबत ‘उगीच नको त्या मेलीचा तोरा...’ असा थेट शब्दांत न दिला जाणारा संदेशही असायचा. बोलण्याची पट्टी कमी करत असल्याचा आभास करीत आपल्या ह्यांना नेमकं ऐकू जाईल, अशा पद्धतीनं ‘खंडूच्या बाबांना माझ्या चकल्या भारी आवडतात. म्हणून लवकर नेऊन दे जा...’ अशी पुष्टीही जोडली जायची. व्हॉट्सच्या मेसेजचंही असंच असतं नात्याचा मेसेज यायच्या आधी माझा मेसेज गेलेला बरा!

(घरच्या) फराळाची ताटं भरून शेजारीपाजारी देण्याचं काम पहिले दोन दिवस उत्साहाने चालायचं. तोपर्यंत शेजारूनही फराळाची ताटं आलेली असत. मग सुरू होई फॉरवर्डचं काम. घरची चकली खमंग झाली असली, तर ती न पाठवता पाटलांची किंवा जोश्यांची वातड चकली द्यायच्या ताटात जाई. ‘बेसन कसं नि किती भाजायचं कळतच नाही, कुलकर्णीबाईंना’ असा उद्धार करीत त्यांचे लाडू जाधवांच्या किंवा गायकवाडांकडे पाठवायच्या ताटात जात. दिवाळीतला चिवडा भाजक्या पोह्यांचाच. पण एखाद्या घरातून चुरमुऱ्याचा चिवडा आलेला असेल, तर नाकं मुरडत त्याची चवही न पाहता तो तसाच्या तसा कुणाकडे तरी लगोलग फॉरवर्ड केला जाई. आपण कसं थोडे चांगले मेसेज सरसकट फॉरवर्ड न करता जवळच्या मित्रांना (आणि शक्यतो मैत्रिणींनाच!) पाठवतो, तसं फराळाचंही असे. आत्या-मामा-काका यांच्यासाठी डब्यात घरचेच फराळाचेच पदार्थ भरण्याची दक्षता घेतली जाईल. क्वचित कोणा जळकुट्या जाऊबाईंच्या डब्यात एखाद-दुसरा पदार्थ फॉरवर्डेड असायचा.

नाना पाटेकर आणि विश्वास नांगरे ह्यांचे ब्लॉग वाचण्यासारखे असतात, असं सोशल मीडियाच्या दुनियेत बहुतेकांना (न वाचताच) मान्य आहे. त्यामुळे व्हॉट्सवर (त्यांच्या नावाचं लेबल लेऊन) आलेला आणि सात-आठ वेळा स्क्रोल करत पाहावा लागणारा मेसेज सरसकट पुढे ढकलला जातो. काही खानदानी कुटुंबांचं तसंच असतं. त्यांच्याकडून येणारी फराळाची ताटं किंवा चार पुड्यांचे दोन-दोन डबे नाना पदार्थांनी गच्च भरलेले असतात. ते सारेच चविष्ट असतात, असं सगळ्यांना (ऐकून ऐकूनच) मान्य असतं. हे डबे पाहूनच दडपून जायला होईल. त्यामुळे चव घेण्याऐवजी त्यातील पदार्थ तुकड्यातुकड्यांमध्ये फॉरवर्ड केले जात. त्यातूनही थोडं काही राहिलंच तर कामवाल्या मावशी मदतीला येतातच.

व्हॉट्सवर आलेले सगळेच्या सगळे मेसेज वाचणं या जन्मात तरी कुणाला शक्य नाही. हीच शक्यता पूर्वीच्या जमान्यात वेगळ्या बाबतीत होती. घरात आलेले सगळेच्या सगळे पदार्थ चाखणं एकदम अशक्य गोष्ट. पण काही जणांचे मेसेज वाचण्यासारखेच असतात, हे जसं अनुभवानं ध्यानात येतंतसंच फराळाचंही होतं. काहींचे काही पदार्थ चाखण्यासारखेच असतात, असं घरच्या मंडळींचं मत असे आणि कुटुंबकर्तीला ते नाइलाजानं मान्य करावं लागे. विशेषतः मोतिचूर लाडू, खमंग अनारसे, खुसखुशीत चकल्या असा ऐवज फॉरवर्ड न करता राखून ठेवला जाई आणि चाखून पाहिला जाई.

कितीही काळजी घेतली, तरी हे गणित बिघडे. कोणता लाडू देशपांडे काकूंचा आणि कुठला चिवडा शिंदे मावशींचा, चकली चाकोत्यांकडची आहे की अनारसे आढावांकडचे आहेत, याचा सगळा गोंधळ होऊन जाई. त्यामुळे एक-दोन दिवसांतच ते लक्षात ठेवण्याचा नाद सोडून द्यावा लागे. त्यातही फॉरवर्डची कल्पना यथावकाश सगळ्यांनीच अमलात आणलेली असे. त्यामुळे एखाद्या राजूने पवार आजींकडचा रव्याचा लाडू चांगला असतो म्हणून मागितला, तर आई रागानं वाटी त्याच्यापुढे आदळे. एक तुकडा खाऊन राजू तोंड वाकडं करत म्हणे, ‘‘आई, हा पवार आजींकडचा लाडू नाही गं. तू घरचाच दिलास चुकून. वास येतोय...’’ तेव्हा मग आईच्याही लक्षात येई की, हा लाडू चार घरी फिरून पुन्हा ‘बनविल्या घरीच तू सुखी राहा...’ म्हणत आपल्याकडे आलेला आहे. राजूच्या आईचा अनुभव अस्मादिकांनाही एसएमएसच्या जमान्यात आला आहे. पत्रकारदिनाच्या शुभेच्छा देणारा हा संदेश एवढा फिरला की, सोलापूरच्या एका पत्रकाराकडून तो आम्हाला आला. ‘हा माझाच मेसेज तुम्ही मलाच कसा काय पाठवलात?’ असं विचारल्यावर त्या पॉवरबाज पत्रकारानं माझं नावच फोनबुकमधून उडवून टाकलं.

पूर्वीसारखं आता कुणी घरी फराळाचं सगळंच्या सगळं बनवत नाही. काही इकडून मागवतात, काही तिकडून बनवून घेतात. शुभेच्छांची पत्रही आता कुणी हातानं लिहीत नाही. काही इ-मेलवरून उचलतात आणि व्हॉट्स बऱ्याच जणांच्या मदतीला आलेलं असतं. एकूणच फराळ काय नि व्हॉट्स मेसेज काय, त्यांचा संदेश पूर्वीपासून तोच आहे थोडं चाखू, थोडं राखू... बाकीचं आपलंच म्हणून पुढे ढकलून टाकू!

(छायाचित्रं इंटरनेटवरून साभार.)

Friday 6 September 2019

‘पढ़े-लिखे गँवार..!’

कधी तरी मध्य प्रदेशात जायचं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे नवा प्रदेश पाहायचा. मराठी माणसांनी जिथं आपला ठसा उमटविला, जिथं ते चिकटून राहिले, अशा भागाला भेट द्यायला पाहिजे, असं (उगीचच) वाटत राहतं. वडोदऱ्याच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, ते हेच मनात ठेवून. तिथं बरंच काही नव्यानं समजलं, ऐकायला मिळालं. सुधीर परब सरांसारखी माणसं आपली झाली. मध्य प्रदेशाची मोहिनी पडली, ती गो. नी. दांडेकर यांचं परिक्रमेवरचं पुस्तक वाचून. त्यात भर पडली कुंटे यांचं 'नर्मदेss हर हर!' वाचण्यात आल्यानं. इंदूरमधून सुमित्रा महाजन खूप वेळा लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांचं थेट भाषण ऐकण्याची संधी एकदाच मिळाली. नगरमध्ये झालेल्या पत्रकारांच्या अधिवेशनाला खास पाहुण्या म्हणून त्या आल्या होत्या. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस. टी.च्या आरामबसची सोय मिळावी, प्रवासाचे किलोमीटर वाढवून मिळावेत...आदी मागण्या काही पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. सुमित्राताई भाषणाला उठल्या आणि त्यांनी या मागण्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. पत्रकारांनी अशा मागण्या कराव्यात? तर ते असो... अहल्याबाईंचं आणि सुमित्राताईंचं इंदूर पाहायचं आहे हे खरंच.

पुण्यात खूप वर्षांपूर्वी एका ठिकाणी इंदौरी फरसाण मिळायचं – खट्टा-मीठा. मग नगरच्याच एका मिसळच्या दुकानातील पाटीवर इंदुरी पोहेअसं वाचून त्याची चव घेतली. इंदूरच्या सराफाविषयी बऱ्याच वर्षांपासून वाचतो आहे आणि तोंडाला सुटलेलं पाणी आवरतो आहे. अभय बर्वे फेसबुकवर ज्या इंदुरी भाषेत लिहितात आणि तिथल्या पदार्थांचं ज्या प्रकारे वर्णन करतात, त्याचा मोह पडला आहे. थोडक्यात पाहण्यासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त, असं इंदूरला, मध्य प्रदेशात जायचं आहे.

तो योग येईल तेव्हा येईल. मागच्या रविवारी मध्य प्रदेश परिवहनच्या बसनं प्रवास करण्याचा योग आला. जे आतापर्यंत जमलं नव्हतं, ते साधलं. खरं तर मध्य प्रदेशाच्या एस. टी.नं प्रवास करण्याचं तसं काही कारण नाही. राहुरीच्या स्थानकावर होतो. रात्र झाली होती. मिळेल ती गाडी पकडायची नि नगर गाठायचं, असं ठरलं होतं. आपल्या महामंडळाची एक गाडी उभी होतीच गेलो तेव्हा. ती खचाखच भरलेली. उभं राहूनच जावं लागलं असतं. प्रवास पस्तीस-चाळीस किलोमीटरचाच. पण जिवावर आलं होतं. तेवढ्यात फाटकात मध्य प्रदेशची निळी बस दिसली. म्हणून आपल्या गाडीला टाटा केला.

बस इंदूरहून आली होती नि पुणेमुक्कामी चालली होती. तरीही चालकाला विचारलं आणि शिरलो गाडीत. हीही भरलेलीच. जागा मिळणार नाही, असं वाटत असतानाच चालकानं पुकारलं. त्याच्या मागं तीन प्रवासी बसतील असं सीट. बहुतेक ती राखीव चालकाची झोपण्याची हक्काची जागा असावी. तिथल्या प्रवाशाला त्यानं मला जागा द्यायला सांगितलं.

गाडी दणक्यात सुरू झाली. पिपाणीसारखा हॉर्न. त्या नॅशनल परमिट मिरवत रोरावत जाणार्‍या ट्रकांसारखा. एक फेरीवाला बसमध्ये अडकलेला. चालक काही थांबत नव्हता. स्थानकाच्या बाहेर पडता पडता बसचा वेग थोडा कमी झाल्याचा फायदा घेत तो उतरला; हातातल्या वडा-पावचा ट्रे संभाळत. तेवढ्या वेळात चालकानं एकदाही मागं वळून काही पाहिलं नाही. फेरीवाला बरोबर उतरेल, याचा अंदाज असणार त्याला.

तेवढ्यात एक उमदा माणूस आला. हल्ली शोभणारा शर्ट. चिनॉस. टक्कल पडू लागल्यानं विस्तारलेलं कपाळ. एखाद्या दिवसाची दाढी वाढलेला. कपाळावर छोटासा काळा पट्टा – छापबहुतेक. प्रवासी वाटला, म्हणून मी थोडं सरकून त्याला जागा देऊ केली. जागा मिळविण्यासाठी तो काही इच्छुक दिसला नाही. त्यानं मलाच विचारलं - कुठं जायचं, नगर ना?

प्रश्नामुळं लक्षात आलं की, तो वाहक होता!

कसं ओळखणार त्याला? तिकिटाचं यंत्र हातात नाही नि गळ्यात पैशाची चामडी पिशवी नाही. कुठं जायचं ते सांगितल्यावर त्यानं डायरीवजा पुस्तिकेतून चिटोरं फाडून दिलं. गावाचं नाव व भाडं लिहिलेलं. सहज पाहिलं - कार्बन होता वहीत.

गाडी चांगली होती. चालक वयस्क. निवृत्तीला आलेला. रात्रीमुळं काहीसा कावलेला. त्याला अजून किमान चार तास गाडी चालवायची होती. मध्येच मोबाईल वाजला आणि त्यानं तो घेतला. मोबाईलवर बोलत, सावधपणे गाडी चालवत होता.

हे चालक-वाहक फारच सौजन्यशील दिसत होते. हात दाखवा नि बस थांबवा आणि थाप मारा नि उतरून जापद्धतीने सगळा कारभार चाललेला. नगर जवळ आलं तसं थांबे वाढले. आपल्याला तर काय घराजवळ गाडी आलेली चांगलं! आधी नागापूर, मग सावेडी...

थांबा येण्याच्या आधी वाहक ओरडे. बसची दोन्ही दारं सताड उघडी होती. 'क्लीनर'सारखा मदतनीस उघड्या दारातच उभा. उतारूंना मदत करण्यासाठी आणि संभाव्य प्रवासी हेरण्यासाठी. मध्येच कुणी तरी हात केला आणि चालकानं थांबता थांबता पुन्हा गती दिली. अरे ठैरो, ठैरो... उसे आना हे...’ असं वाहक ओरडला. त्या प्रवाशाला घेऊनच बस मार्गस्थ झाली.

एका तरुण प्रवाशाला तारकपूर स्थानकाच्या थोडं पुढं चौकात उतरायचं होतं. चौकातला सिग्नल लाल; पण हिरवा होण्यासाठी तीनच सेकंद बाकी. त्यामुळं बस थांबली नाही. वेग थोडा कमी झाला. बस उजवीकडे वळता वळताच त्या तरुणानं खाली उडी मारली.

वाहक चिडला. ओरडू लागला. म्हणाला, ‘पढ़े-लिखे गँवार साले!

सुशिक्षित अडाणीअसं का म्हणाला तो? वाटलं की, चालत्या बसमधनं हा प्रवासी उतरल्यामुळं तो चिडला असणार. परराज्यात, तिथल्या प्रवाशाला चुकून काही झालं, तर नसती आफत! म्हणून तो चिडला असेल, तर ते स्वाभाविकच होतं की.

पण ते तसं नव्हतं. काही क्षणांत त्याच्याच तोंडून ते कळालं.

प्रवासी अवैधरीत्या, धावत्या बसमधून उतरल्याचा त्याला राग नव्हता. तो अवैज्ञानिकरीत्या उतरल्यानं त्याचा संताप झाला होता.

सीटवरची मांडी बदलत वाहक म्हणाला, ‘‘गाडी पुढे जात असताना हा मागच्या दिशेनं उतरतोय. पडला बिडला तर? बस धावते आहे, त्याच दिशेनं उतरून दोन-चार पावलं पुढं गेलं पाहिजे ना. बसचा स्पीड थोडा मुरवला पाहिजे अंगात. एवढंही कळत नाही, ह्या शिकलेल्यांना!’’


गतीचा नियम न पाळल्यामुळेच चिडलेला वाहक शिवी देता झाला -

पढ़े-लिखे गँवार साले...
….
(ती बस ही नव्हे. छायाचित्र प्रातिनिधिक)


Friday 26 July 2019

शरण तुला, दलाला!


राज्याच्या राजकारणाचा शकट जिथून हाकला जातो, त्या इमारतीला पूर्वी सचिवालय म्हणत. लाल दिव्याला ते नापसंत होतं. नामांतर केलं. राजधानीतील ती इमारत मंत्रालय म्हणून ओळखली जाऊ लागली.

नामांतर झालं. पण तिथले सत्ताधीश बदलले का? उत्तर नाहीच असं आहे. दाम मोजून घेऊन काम करवून देणाऱ्या एजंटांचा, दलालांचा सत्तेच्या वर्तुळातील बुजबुजाट कायम आहे. एक नाही, अनेक. ही जमात राहते आमदार निवासात, खाते-पिते पंचतारांकित हॉटेलांत. आणि काम? बढती, बदली, निलंबन, लिकर परमिट, आश्रमशाळांची परवानगी. सगळी कामं करतात ही मंडळी. मंत्रालयाशी संधान साधून असल्यामुळे आलेली पावर. कोणत्याही अडचणींवरचा उड्डाणपूल म्हणजे ही जमात.

हे मत एका एजंटाचंच. त्याचं नाव-गाव-जात-धर्म विचारू नका. तो ते सांगणार नाही. तसं स्पष्ट केलंय त्यानं. आमदार निवासात पोपटराव म्हणून विचारा; कोणीही घालून देईल त्याची गाठ. कोणी त्याला मिठ्ठूमिया म्हणून साद घालतं, तर कोणी राघोबादादा पेशवे म्हणतं. पत्रकारमित्र रघुनाथ जोशी त्याला पप्पूशेठ म्हणतो. पोपटरावांचा मुक्काम आमदार निवासात.

आमदार निवास रूम नं. १७५६ ही कादंबरी पुरुषोत्तम बोरकर यांची. पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनानं या कादंबरीची पहिली आवृत्ती १३ डिसेंबर १९९९ रोजी प्रकाशित केली. या ८६ पानांच्या कादंबरीची किंमत ७५ रुपये आहे. अवचित कधी तरी घेतलेलं हे पुस्तक परवा परवा वाचण्यात आलं.

आई-वडील परलोकी आणि बहीण नवऱ्याघरी गेल्यामुळे पोपटराव एकटा पडलेला. ग्रेज्युएट्स ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी आर नॉट अॅप्लीकेबलच्या शेऱ्यांनी घायाळ! राजधानीत येतो स्वप्नं डोळ्यांत घेऊन. ती तुकड्या-तुकड्यांनी विरत जातात. ठरतो एक नि:संग एजंट. पैसा फेको, काम देखो.

खोली आमदाराची आणि राज्य पोपटरावचे. त्याचा संचार कुठं नाही? त्याच्या ओळखी कुणाशी नाहीत? अफाट भ्रष्टाचारानं पद गमावलेला माजी राज्यमंत्री कागदराव गगनबावडेकर त्याच्याकडे येतो – सत्तेचं वलय पुन्हा लाभावं यासाठी त्याला त्याच्या बाबावर सिनेमा काढायचाय. पोपटराव दिग्दर्शक गाठून देतो.

खान्देशातील बाबासाहेब तुपटाकळीकर पन्नाशीत पोहोचलेले. त्यांचं राजकीय स्वप्न भव्य होतं...सेंट्रेल हॉलमध्ये तैलचित्र किंवा मंत्रालयाच्या आवारात पुतळा! जेमतेम एकदा ग्रामपंचायतीत निवडून आले. वारुणीचा चषक पुढे असला की, त्यांच्या स्वप्नांचे तुकडे अधिक झळाळते होतात. बाथ, वॉश, डिनर, लंच, ड्रिंक्स अशा शब्दांचे त्यांना वेड. तूर्त ते पोपटरावांच्या संगतीनं दलाली करतात.

शिक्षणमहर्षी म्हणवून घेण्यासाठी नागपूरचा पुढारी आसुसलेला. आता त्याला फक्त आश्रमशाळा हवी. त्यासाठी १० लाख नगद मोजण्याच्या तयारीनिशी पोपटरावांकडे आलेला. अडचण नको म्हणून मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डनलाही त्यानं सोबत आणलेलं आहे.

पुसदचा भावी आमदार बिक्कनसिंग राठोड. त्याला त्याच्या आमदाराला नडायचं आहे. पोपटरावशी खल करतो. मार्ग सापडतो. रघुवीरचा मित्र प्रेमानंद भुसावळकर. निर्लज्जम् सदा सुखी असं बोधवाक्य घेऊन पिवळी पत्रकारिता करणारा. तो लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन दिवसांत डझनभर बातम्यांचा अंक बिक्कनसिंगला देतो. आमदार देशमुखांची पुरती बदनामी करणारा.

समाजसेवा करणारी किन्नरी तारापोरवाला, अय्याशी राजकारणी फैज अहमद बुखारी, कारकुनाचा मुलगा हृषीकेश ऊर्फ रॉकी, आमदार निवासातल्या खोल्यांमध्ये केवळ उजव्या हाताच्या अंगठ्यावरून भविष्य पाहणारे होराभूषण बाबा अमरनाथ, जनमहाकवी खग्रास सूर्यभेदी! अशी अनेक माणसं भेटतात इथं. किडनी विकणारा दुबेही इथंच राहायचा.

या कादंबरीला सलग असं एक कथानक नाही. तुकड्या-तुकड्याने ती पुढं सरकत राहते. पण या प्रत्येक तुकड्याला सांधणारा दुवा म्हणजे पोपटराव. हा प्रत्येक तुकडा अस्वस्थ करणारा. आपल्या लोकशाहीबद्दल आणि पिळवणूक करणाऱ्यांबद्दल संताप निर्माण करणारा. वांझ संताप.

खादीशुभ्र, अटारणे असे शब्द; मंत्रालय ते आमदार निवास हाच खरा दलाल स्ट्रीट अशी विधानं. भाषा वेगळी, भन्नाट. मंत्रालयाचा अख्खा परिसर उभा राहतो डोळ्यांपुढे. ग़म तो इसका है, ज़माना है कुछ ऐसा खरिदरा। एक मुज़रिम दुसरे मुज़रिम को कहता है बुरा..., शुक्रिया ऐ मेरे कात़िल, ऐ मसिहा मेरे। जहर जो तूने दिया, वो दवा हो बैठा... अशा पानापानावरच्या ओळी. नायकाची मन:स्थिती दाखवतात त्या. शि. द. फडणीस यांचं मुखपृष्ठ बेफाम. टोकाचा उपहास हसवतो आणि दगड झालेल्या मनावर एकेक ओरखडाही उठवत राहतो.
...
(पूर्वप्रसिद्धी : दि. २० जून २०१०)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...