कधी
तरी मध्य प्रदेशात जायचं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे नवा प्रदेश
पाहायचा. मराठी माणसांनी जिथं आपला ठसा उमटविला, जिथं ते चिकटून राहिले, अशा भागाला भेट द्यायला पाहिजे, असं (उगीचच) वाटत
राहतं. वडोदऱ्याच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, ते हेच
मनात ठेवून. तिथं बरंच काही नव्यानं समजलं, ऐकायला मिळालं.
सुधीर परब सरांसारखी माणसं आपली झाली. मध्य प्रदेशाची मोहिनी पडली, ती गो. नी. दांडेकर यांचं परिक्रमेवरचं पुस्तक वाचून. त्यात भर पडली कुंटे
यांचं 'नर्मदेss हर हर!' वाचण्यात आल्यानं. इंदूरमधून सुमित्रा महाजन खूप
वेळा लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांचं थेट भाषण ऐकण्याची संधी एकदाच मिळाली.
नगरमध्ये झालेल्या पत्रकारांच्या अधिवेशनाला खास पाहुण्या म्हणून त्या आल्या
होत्या. ‘अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस. टी.च्या आरामबसची सोय मिळावी, प्रवासाचे किलोमीटर वाढवून मिळावेत...’ आदी मागण्या
काही पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. सुमित्राताई भाषणाला उठल्या आणि त्यांनी या
मागण्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. पत्रकारांनी अशा मागण्या कराव्यात? तर ते असो... अहल्याबाईंचं आणि सुमित्राताईंचं इंदूर पाहायचं आहे हे खरंच.
पुण्यात
खूप वर्षांपूर्वी एका ठिकाणी इंदौरी फरसाण मिळायचं – ‘खट्टा-मीठा’. मग नगरच्याच एका मिसळच्या दुकानातील पाटीवर ‘इंदुरी
पोहे’ असं वाचून त्याची चव घेतली. इंदूरच्या ‘सराफा’विषयी बऱ्याच वर्षांपासून वाचतो आहे आणि
तोंडाला सुटलेलं पाणी आवरतो आहे. अभय बर्वे फेसबुकवर ज्या इंदुरी भाषेत लिहितात
आणि तिथल्या पदार्थांचं ज्या प्रकारे वर्णन करतात, त्याचा
मोह पडला आहे. थोडक्यात पाहण्यासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त, असं इंदूरला, मध्य प्रदेशात जायचं आहे.
तो
योग येईल तेव्हा येईल. मागच्या रविवारी मध्य प्रदेश परिवहनच्या बसनं प्रवास करण्याचा
योग आला. जे आतापर्यंत जमलं नव्हतं, ते साधलं. खरं तर मध्य प्रदेशाच्या एस.
टी.नं प्रवास करण्याचं तसं काही कारण नाही. राहुरीच्या स्थानकावर होतो. रात्र झाली
होती. मिळेल ती गाडी पकडायची नि नगर गाठायचं, असं ठरलं होतं.
आपल्या महामंडळाची एक गाडी उभी होतीच गेलो तेव्हा. ती खचाखच भरलेली. उभं राहूनच
जावं लागलं असतं. प्रवास पस्तीस-चाळीस किलोमीटरचाच. पण जिवावर आलं होतं. तेवढ्यात
फाटकात मध्य प्रदेशची निळी बस दिसली. म्हणून आपल्या गाडीला टाटा केला.
बस
इंदूरहून आली होती नि पुणेमुक्कामी चालली होती. तरीही चालकाला विचारलं आणि शिरलो
गाडीत. हीही भरलेलीच. जागा मिळणार नाही, असं वाटत असतानाच चालकानं पुकारलं.
त्याच्या मागं तीन प्रवासी बसतील असं सीट. बहुतेक ती राखीव चालकाची झोपण्याची
हक्काची जागा असावी. तिथल्या प्रवाशाला त्यानं मला जागा द्यायला सांगितलं.
गाडी
दणक्यात सुरू झाली. पिपाणीसारखा हॉर्न. त्या नॅशनल परमिट मिरवत
रोरावत जाणार्या ट्रकांसारखा. एक फेरीवाला बसमध्ये अडकलेला. चालक काही थांबत
नव्हता. स्थानकाच्या बाहेर पडता पडता बसचा वेग थोडा कमी झाल्याचा फायदा घेत तो
उतरला; हातातल्या वडा-पावचा ट्रे संभाळत. तेवढ्या वेळात चालकानं एकदाही मागं वळून
काही पाहिलं नाही. फेरीवाला बरोबर उतरेल, याचा अंदाज असणार
त्याला.
तेवढ्यात
एक उमदा माणूस आला. हल्ली शोभणारा शर्ट. चिनॉस. टक्कल पडू लागल्यानं विस्तारलेलं कपाळ. एखाद्या दिवसाची
दाढी वाढलेला. कपाळावर छोटासा काळा पट्टा – ‘छाप’ बहुतेक. प्रवासी वाटला,
म्हणून मी थोडं सरकून त्याला जागा देऊ केली. जागा मिळविण्यासाठी तो
काही इच्छुक दिसला नाही. त्यानं मलाच विचारलं - कुठं जायचं, नगर
ना?
प्रश्नामुळं
लक्षात आलं की, तो वाहक होता!
कसं
ओळखणार त्याला? तिकिटाचं यंत्र हातात नाही नि गळ्यात पैशाची चामडी पिशवी नाही. कुठं जायचं
ते सांगितल्यावर त्यानं डायरीवजा पुस्तिकेतून चिटोरं फाडून दिलं. गावाचं नाव व
भाडं लिहिलेलं. सहज पाहिलं - कार्बन होता वहीत.
गाडी
चांगली होती. चालक वयस्क. निवृत्तीला आलेला. रात्रीमुळं काहीसा कावलेला. त्याला
अजून किमान चार तास गाडी चालवायची होती. मध्येच मोबाईल वाजला आणि त्यानं तो घेतला.
मोबाईलवर बोलत, सावधपणे गाडी चालवत होता.
हे
चालक-वाहक फारच सौजन्यशील दिसत होते. ‘हात दाखवा नि बस थांबवा’ आणि ‘थाप मारा नि उतरून जा’ पद्धतीने
सगळा कारभार चाललेला. नगर जवळ आलं तसं थांबे वाढले. आपल्याला तर काय घराजवळ गाडी
आलेली चांगलं! आधी नागापूर, मग
सावेडी...
थांबा
येण्याच्या आधी वाहक ओरडे. बसची दोन्ही दारं सताड उघडी होती. 'क्लीनर'सारखा मदतनीस उघड्या दारातच उभा. उतारूंना मदत करण्यासाठी आणि संभाव्य
प्रवासी हेरण्यासाठी. मध्येच कुणी तरी हात केला आणि चालकानं थांबता थांबता पुन्हा
गती दिली. ‘अरे ठैरो, ठैरो... उसे आना
हे...’ असं वाहक ओरडला. त्या प्रवाशाला घेऊनच बस
मार्गस्थ झाली.
एका
तरुण प्रवाशाला तारकपूर स्थानकाच्या थोडं पुढं चौकात उतरायचं होतं. चौकातला सिग्नल
लाल; पण हिरवा होण्यासाठी तीनच सेकंद बाकी. त्यामुळं बस थांबली नाही. वेग थोडा
कमी झाला. बस उजवीकडे वळता वळताच त्या तरुणानं खाली उडी मारली.
वाहक
चिडला. ओरडू लागला. म्हणाला, ‘पढ़े-लिखे गँवार साले!’
‘सुशिक्षित अडाणी’ असं का म्हणाला तो? वाटलं की, चालत्या बसमधनं हा प्रवासी उतरल्यामुळं तो
चिडला असणार. परराज्यात, तिथल्या प्रवाशाला चुकून काही झालं, तर
नसती आफत! म्हणून तो चिडला असेल, तर ते स्वाभाविकच होतं की.
पण ते
तसं नव्हतं. काही क्षणांत त्याच्याच तोंडून ते कळालं.
प्रवासी
अवैधरीत्या, धावत्या बसमधून उतरल्याचा त्याला राग नव्हता. तो अवैज्ञानिकरीत्या
उतरल्यानं त्याचा संताप झाला होता.
सीटवरची
मांडी बदलत वाहक म्हणाला, ‘‘गाडी पुढे जात असताना हा मागच्या दिशेनं उतरतोय. पडला बिडला तर? बस धावते आहे, त्याच दिशेनं उतरून दोन-चार पावलं
पुढं गेलं पाहिजे ना. बसचा स्पीड थोडा मुरवला पाहिजे अंगात. एवढंही कळत नाही,
ह्या शिकलेल्यांना!’’
गतीचा
नियम न पाळल्यामुळेच चिडलेला वाहक शिवी देता झाला -
‘पढ़े-लिखे गँवार साले...’
….
(ती
बस ही नव्हे. छायाचित्र प्रातिनिधिक)
फारच मस्त लिहिलयं. तुमच्या बरोबर प्रवास केल्यासारखे वाटले.
उत्तर द्याहटवानमस्कार , छान लिहिलाय जिवंत अनुभव. मध्य प्रदेशात जरुर जा. माझा जवळचा शाळेतील मित्र राजन बिवलकर देवासमधील बँक नोट प्रेसमधे 32/35 वर्षे नोकरी करुन निवृत्त झाला. त्याच्याकडे माझं चार पाच वेळा जाणं झालं. बराच फिरलो. इंदोर शहर खूप छान आहे. सराफा मधे संध्याकाळ नंतर विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. विशेषतः रबडी आणि खट्टामीठा पदार्थ यांची. पोट भरलं तरी अजून खावंसं वाटतं. उज्जैन च्या महांकालेश्वर मंदिर आणि अवतीभोवतीची अनेक मंदिरे पाहण्यासारखी आहेत. काही कि.मी. अंतरावर काळभैरव मंदिर आहे जिथे मूर्ती च्या तोंडाला दारुची बाटली लावतात. दारु आत जाते. तोच नैवेद्य मानतात. काही संशोधकांनी भवताली खणून पाहिले की मद्यांश सापडतो कां...पण काही सापडले नाही. असो. इदोरपासून थोड्या दूरवर भेडाघाट हा संगमरवरांच्या कडेकपारींचा घाट आहे. प्राण जाए पर वचन न जाए नावाच्या जुन्या हिंदी सिनेमाच्या क्लायमँक्सचे शूटिंग इथे घेण्यात आले होते. आपण जरुर एम.पी.मधे जा. मजा येईल. बाय द वे , इंदोरी फरसाण आजही पुण्यात अलका टाँकिज चौकाच्या अलिकडे जोंधळे चौकातील एका दुकानात मिळते. तुमच्या लेखामुळे माझ्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाकायदा पाळा गतीचा ।काळ मागे लागला।
उत्तर द्याहटवाधावत्याला शक्ती येई ।आणि रस्ता सापडे।।
Khidaki blog khup mast.
उत्तर द्याहटवाआहा..! क्या बात है. वेगळा विषय, बसएतक्याच ओघवत्या शैलीत, छान जमला आहे.
उत्तर द्याहटवापूर्वी एकदा मी शिर्डीवरून पुण्यात मध्य प्रदेश परिवहनच्या बसने आलो होतो. सतत त्रासलेल्या चेहऱ्याच्या महाराष्ट्र राज्य एस. टी. वाहकांच्या तुलनेत मध्य प्रदेशाच्या एस. टी.चे वाहक खूपच चांगल्या वर्तणुकीचे होते. प्रसंगी स्वतःची बसण्याची जागा प्रवाशांना देण्याचे औदार्य त्यांच्यात होते.
'खिडकी'तून डोकावताना ती आठवण जागी झाली... मस्त लेख. खिडकीतून येणाऱ्या हळुवार वाऱ्याच्या झुळुकेसारखा.... हवाहवासा!
-प्रबोधचंद्र सावंत, पुणे
लेख मस्त जमलाय...
उत्तर द्याहटवा- स्वप्निल जोशी, ओरंगाबाद
सतीश, या प्रवासात मीही तुझ्याबरोबरच होतो! इतकं आपलंसं व सहज शैली असलेलं वर्णन.
उत्तर द्याहटवा- रवींद्र चव्हाण, पुणे
नेहमीप्रमाणेच सुरेख लयीत येतं तुमचं लेखन. माझी सून इंदूरचीच आहे!
उत्तर द्याहटवा- डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण.
एकदम मस्त...
उत्तर द्याहटवाThe Lander should never get detached itself from the Orbiter in this fashion!
- मुकेश देशपांडे, पुणे
सुंदर लेख. इंदूरला होतो एक आठवडा.
उत्तर द्याहटवासराफा हे एक निव्वळ मिथक आहे. पोहे तर बेचव. पण शहर खरोखरच स्वच्छ. बऱ्यापैकी एलिट भागात प्रयत्नपूर्वक आहे. श्रेय बहुदा सुमित्राताईंना असावे...
आणि गाव नावाने मध्य प्रदेशात अन् मराठीच आहे. साड्या बऱ्या मिळतात. साड्यांचा छोटासा स्वतंत्र बाजार आहे.
बाकी, घटना, प्रसंग टिपण्याचे अन् नेमके मांडण्याचे कौशल्य लाजबाब!
- श्रीनिवास भोंग
सतीश, खूप छान.
उत्तर द्याहटवा- अनिल कोकीळ, पुणे
मस्तच रे. आज ट्विस्ट छान घेतलास.
उत्तर द्याहटवा- राजेंद्र बागडे, कोल्हापूर
भारी मजेशीर लिहिलंत. मध्य प्रदेशात जाऊन या एकदा तरी. बघण्यासाठी खूप काही आहे.
उत्तर द्याहटवा- सीमा मालानी, संगमनेर
सुंदर वर्णन. नेहमीप्रमाणेच...
उत्तर द्याहटवा- दिनेश भंडारे
छान लेख! तुझ्या लेखामुळे मी परत मध्य प्रदेशात जाऊन आलो. अशा बसने आम्हालाही प्रवास करायचा होता. पण नाही जमल.
उत्तर द्याहटवा- चंद्रशेखर रामनवमीवाले, करमाळा
मस्तच लिहिलंय. व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहतात.
उत्तर द्याहटवा- चंद्रकांत कुटे, मुंबई
मस्तच. सराफ्याला नक्की जाऊ आपण मिळून.
उत्तर द्याहटवा- आदित्य नाडगौडा, पुणे
ललित लेखनातून वैज्ञानिक संदेश... छानच!
उत्तर द्याहटवा- करण नवले, श्रीरामपूर
Great observation.
उत्तर द्याहटवा- जगदीश निलाखे, सोलापूर
वाचताना आपण जणू बसमध्ये आहोत, असं वाटत होतं. प्रभावी आणि मोठ्या ताकदीने लेखन.
उत्तर द्याहटवा- हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)
मस्त किस्सा. आवडला.
उत्तर द्याहटवा- संजय आढाव, नगर
फारच सुंदर आणि अगदी वास्तव.
उत्तर द्याहटवा- प्रा. सुरेश जाधव, नांदेड
इंदूर येथे असतानाच हे क्लासिक वाचायला मिळाले. इथे जी माणसातील घट्ट वीण आहे, त्याचे अप्रुप वाटते. समाजातील कोणताही थर असो, हा जिंदगी जगतो आणि हसतमुख असतो. तेही नवीन!
उत्तर द्याहटवानाही तर आपल्या इकडे - कुत्तरओढ स्पष्ट दिसणारी. भाज्या महाग, कमी घेतील. त्या स्वस्त, तुटून पडतील.
पोहे, मोजून-मापून नाही देत. पानवाला, तुम्ही त्याच्याकडे पहिल्यांदा गेलात, तर स्वतःच्या हाताने आ वगैरे करायला लावून तोंडात तो लगेच विरघळणारा ऐवज देणार.
अत्युत्तम स्वच्छता. असो.
आपण छान लिहिलेत. एक प्रसंग कथेत परावर्तित करण्याची हातोटी आज-काल दुर्मिळ झालीय. कथाच राहते की नाही, असा आता प्रश्न आहे. परत एकदा असो...
- प्रदीप रस्से, जळगाव
सूंदर लेख. वाचकाच्या मनाची पकड घेणारे लेखन.
उत्तर द्याहटवागाडी पुढे जात असताना त्याच दिशेनं उतरून दोन-चार पावलं पुढं गेलं पाहिजे. बसचा स्पीड थोडा मुरवला पाहिजे अंगात. - हे बाकी खरंय ! उतरणाऱ्यालाच माहित त्याला कसली घाई असते.. पण अशी घाई बरेचदा अपघाताला निमंत्रण देते. पुण्यात पीएमटीने प्रवास करण्याचे माझे असे अनेक किस्से आहेत. एकदा बसच्या दिशेनेच उतरण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने अचानक स्पीड वाढवला. जमीनीवर पाय टेकताच पळण्याचा प्रयत्न केला, पण सपशेल तोंडावर फरफटत गेलो.. चांगलेच खरचटले होते. पुन्हा कधीही हिंमत केली नाही..
उत्तर द्याहटवा