मंगळवार, २६ मे, २०१५

‘बाई’ आणि ‘भाई’

आपल्याला राजकारण कळतंय, असा (गैर)समज झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे बाई म्हणत. प्रेमाने, आदराने, भीतीने, उपहासाने, तुच्छतेने. असे म्हणण्यामागे काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने मारण्याच्या गंडाची.

आपल्याला राजकारणाचा कंटाळा आलाय, असा (पुन्हा) (गैर)समज झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे ‘भा म्हणतात. प्रेमाने, आदराने, भीतीने, उपहासाने, तुच्छतेने. असे म्हणण्यामागे काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने मारण्याच्या गंडाची.

आधी बाई आणि आता ‘भा. जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या (हे प्रत्येक वेळी सांगावंच लागतं!) या खंडप्राय देशाच्या (असाही उल्लेख आवश्‍यकच!) राजकीय रंगभूमीवरची ही दोन पात्रं. वेगवेगळ्या कालखंडात आलेली. झपाटून टाकलेली! सारं नाटक आपल्याभोवती फिरवत ठेवणारी पात्रं. इतरांना खाऊन टाकणारी पात्रं. सगळं फूटेज आपल्याचकडं खेचणारी नायिका किंवा नायक. महानायिका किंवा महानायक म्हणा हवं तर.

बाईंमध्ये अनेकांना आई दिसली, अम्मा दिसली. भाईंमध्ये अनेकांना आपला मोठा भाऊ दिसतो, वडीलधारा माणूस दिसतो. दोघांचेही चाहते उदंड. तेवढेच टीकाकारही.

देश चालवतात म्हणून बाईंचं केवढं कौतुक! तेवढं ते भाईंच्या वाट्याला यायचंय अजून.

ह्या दोघांनीही बघता बघता देशाच्या जनभावनेवर कब्जा केला. त्यांचं नाव घेतल्याशिवाय दिवस उजाडत नाही आणि मावळतही नाही. उठता-बसता त्यांच्या नावाचा जप करणारे अनेक. त्यांचे अनुयायी कैक. बाईंचे होते, त्यांना भक्त म्हणत. भाईंचे आहेत, त्यांना भगतगणम्हणतात. (नंतर काही काळातच त्याचं रूपांतर अंधभक्त’मध्ये झालं.) कारण काळ बदललाय ना. प्रवाही झालाय. त्यामुळं भाषाही प्रवाही झालीय. या दोघांच्या एंट्रीमध्ये ३० वर्षांचं, अडीच तपांचं अंतर आहे. त्यामुळे तेवढा तर बदल असणारच ना.

दोघांची एंट्रीमोठ्या झोकात झाली. म्हणजे एंट्रीतशी आधीच झालेलीच होती. पण प्रधानराणीकिंवा प्रधानराजाहे पद त्यांनी पादाक्रांत करण्याबाबत बोलतोय आपण. बाई केंद्रीय मंत्री होत्या. त्यांना दोन पिढ्यांचा समाजकारण-राजकारणाचा वारसा होता. त्यांचं (आड)नाव मोठं होतं. आल्या तेव्हा गूँगी गुडियाअशी त्यांची संभावना करण्यात आली होती. पण मग ह्याच बाहुलीनं साऱ्यांना कठपुतळी बनवलं, हा इतिहास आहे. भाई प्रधानसेवक होण्याआधी एका सुभ्याचे मुख्य होते. तेव्हापासूनच त्यांनी भगतगण आणि टीकाकार यांना जन्म दिलाय. प्रधानपदाच्या शर्यतीत उतरले, तेव्हा तर त्यांची संभावना वेगवेगळ्या प्रकारे होत राहिली. फेकूम्हटलं गेलं त्यांना.

त्या प्रधानपदावर दोघंही फार पद्धतशीर आले. त्या पदाची शपथ घेण्याआधीच त्यांनी बारकाईनं अभ्यास केला होता. कुठले अडथळे येतील, ते कसे दूर करावे लागतील इत्यादी इत्यादी. बाईंच्या वाटेत ज्येष्ठ काटेकुटे पेरण्याची शक्‍यता होती. मग त्यांनी कामराजनावाच्या काट्यानेच सारे काटे दूर केले. भाईंनीही ज्येष्ठांना असंच केलं. त्यांच्या त्यागाचे, कष्टाचे, नेतृत्वाचे गुणगान करीत ते सत्तेच्या परिघाबाहेरच राहतील, ह्याची योग्य काळजी त्यांनी घेतली.

बाईआणि भाई’... दोघंही दोन ध्रुवांवरचे. म्हणजे आपण जाहीरपणे राजकीय पक्ष, विचारसरणी, तत्त्वप्रणाली वगैरे असा जो विचार करतो, लिहितो ना, त्या दृष्टीने. पण बारकाईने पाहिलं, तर दोघं एकाच मुशीतून काढल्यासारखे. हिटलरइत्यादी विशेषणं दोघांनाही लावण्यात आली.

बाई काय किंवा भाई काय...ते फार चांगले वक्ते आहेत, असं सभांचा आनंद लुटणारे नाहीत म्हणणार. पण कंठाळी बोलण्यात पटाईत. समोरच्या श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्याची कला त्यांना फार अवगत. समूहाचा सरासरी बौद्धिक निर्देशांक फार कमी असतो, ह्याची दोघांनाही पुरेपूर जाणीव. त्याचा ते सभांमधून बरोबर फायदा उठवत. भावनेच्या लाटेवर हेलकावत ठेवतात ते. उचंबळून जातात ऐकणारे त्यांना. ‘ह्या सम हाच...अशी ऐकणाऱ्यांची खात्री पटून जाते.

दोघंही आत्मकेंद्रित. त्यांच्या बोलण्यात मी’, ‘मीचा जप असतो. अनुयायांना तो खटकत नाही. आणि टीकाकारांना ऐकवत नाही. बाईंना नेमक्‍या वेळी आपलं बाईपण आठवायचं. भाईंना मागच्या निवडणुकीत अगदी योग्य वेळी आपली नीची जातआठवली.

बाई चौकडीत अडकल्या होत्या. भाईंच्या आसपासही कोणायची फिरकायची हिंमत होत नाही. मंत्रिमंडळातील एकमेव पुरुषअसा बाईंचा कौतुकाने (आणि छद्मीपणानेही) उल्लेख व्हायचा. भाई तर पुरुषसिंहआहेत. छोटे सरदार! कामाचा एकमेव माणूस. तूच करता आणि करविता... शरण तुला नरेंद्रनाथा!

दोघंही कुणाला बोलू देत नाही. दोघांचंही सहकाऱ्यांवर (नको तेवढं) बारीक लक्ष असतं. अडवा आणि जिरवाचं कसब दोघांनाही साधून गेलं आहे.

बाईंनी गरिबांना श्रीमतं बनवण्याचं स्वप्न विकलं होतं. त्याची गरिबी नाही...गरीब हटावअशी टिंगल झाली. भाईंनी चांगल्या दिवसांचं स्वप्न विकलं. पण अजून झोपमोड व्हायचीय.

बाई टीव्ही.वर दिसायच्या. त्यांच ते झपाटल्यासारखं चालणं. आवेशानं बोलणं. भाई सोशल मीडियात दिसतात. आओ, ट्‌विट करे...म्हणत.

बाईंच्या बॉबचं कौतुक होतं. त्यांच्या धारदार नाकाचंही कौतुक होतं. त्यांनी ल्यालेल्या साड्या पाहून आयाबाया हुरळून जात.

भाईंच्या ५६ इंची छातीबद्दल छाती फुगवून बोलून झालंय. त्यांचा झब्बा आणि जाकीट म्हणजे फॅशन सिम्बॉल झालंय. स्वनामधन्य सूटवर मात्र पसंतीची मोहोर नाही उठली!

बाई मुलाबाळांच्या प्रेमात गुरफटल्या. घराणेशाहीबद्दल लोक कुजबुजू लागले.

भाईंची गोष्टच वेगळी. संसाराच्या मायाजालात नाहीतच ते. पण उद्योगशाही किंवा शाही उद्योगांबद्दल कधी तरी, कुणी तरी लिहून खर्च करतं शाई!

बाईंनी अनुशासन पर्वआणलं होतं. भाईंचं सध्या जे चालू आहे ते अनशासन पर्वच आहे. अमित आणि नरेंद्र ह्यांचं शासन!

सत्तेवर आल्याची दशकपूर्ती बाईंनी देशभर साजरी केली होती. त्यानंतरच आणीबाणी आली. भाई सत्तेवर आल्याची वर्षपूर्ती जोरात साजरी होतेय.

असो! बाई आणि भाई... त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. आणि बोलावं तेवढं थोडंच!!

एक नक्की. अजून अर्धशतकानंतर भारताच्या राजकीय इतिहासाबद्दल जो कोणी लिहील, त्याला ही दोन नाव टाळून पुढं जाताच येणार नाही - बाई आणि भाई!

असो!!

शुक्रवार, २२ मे, २०१५

महेंद्रसिंह आणि माधवराव

मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी जे काही बोलला, त्याबद्दल त्याला दंड करण्यात आला.

काय म्हणाला होता धोनी? पराभवाची कारणमीमांसा करताना `स्मिथला बाद देण्याचा पंचाचा (चुकीचा) निर्णयही आम्हाला भोवला`, असं काहीसं तो म्हणाला होता. मलिंगाचा तो चेंडू लेग स्टंपाच्या बाहेर होता; अगदी 110 टक्के! तमाम प्रेक्षकांनी नंतर ते पाहिलंय.

म्हणजे खरं बोलल्याबद्दल धोनीला दंड झाला.

त्यावरून एक जुनी गोष्ट आठवली. उच्च न्यायालयानं मागे एकदा सांगितलं होतं - `सत्य हा बचाव होत नाही.` त्यावर मग माधव गडकरी यांनी बरंच काही लिहिलं होतं.

सोमवार, १८ मे, २०१५

चूकभूल...

espncricinfo.com संकेतस्थळाच्या पारदर्शीपणाबद्दल फार म्हणजे फारच कौतुक वाटत होतं. वस्तुस्थिती मान्य करणं आणि ती अशी उघडपणे मांडणं, हे त्यांचं कर्तृत्व मला आवडून गेलं. त्याबद्दल त्यांच्या संपादकांना-संचालकांना इ-मेल पाठवून अभिनंदन करायचं ठरवलं होतं.

इ-मेल लिहायला घेण्यापूर्वी संकेतस्थळ पुन्हा एकदा बारकाइनं पाहिलं आणि माझीच गल्लत मला कळून आली.

या संकेतस्थळावर `Fixtures` असं एक पोटपान आहे.

मी बापडा मात्र सवयीनं ते `Fixers` असं वाचत होतो!
....
`अक्षरशत्रू` आम आदमी

रविवार, १७ मे, २०१५

निमित्त `साज`चं

ही गोष्ट बरोब्बर महिन्यापूर्वीची. दुपार होती. निवांत पसरलो होतो अस्ताव्यस्त. उकडत होतंच भरपूर. वाचण्यासारखं हाताशी काही नव्हतं. जे होतं, ते लगेच वाचावं असं वाटत नव्हतं. डोळा लागेल म्हणून वाट पाहत होतो. तेवढ्यात बायकोनं हाक मारून बाहेर बोलावलं. ''झी स्माईल'वर चांगला सिनेमा लागलाय. बघा! आवडेल तुम्हाला,' असं म्हणाली ती.

कुरकुरत, कंटाळा करतच उठलो. टीव्ही.समोर जाऊन बसलो. एकदा बसल्यावर उठवेना. सुरुवात थोडी चुकली होती. पण त्यानं फार काही बिघडलं नाही. पूर्ण सिनेमा पाहिला. फार दिवसांनी अगदी मन लावून. छान वाटलं.

'साज' होता तो. सई परांजपे यांचा. का बुवा आवडला हा सिनेमा एवढा? समीक्षकाच्या थाटात नाही स्पष्ट करता येणार ते. कुणी लिही म्हटलं, तर नाही लिहिता येणार त्यावर. पण त्यानं प्रसन्न अनुभव दिला. रजा त्या दिवशी सत्कारणी लागली, हे नक्की. एकदम साधा, सोपा आणि सुटसुटीत सिनेमा. त्यात चढ-उतार होते. सुख-दुःखं होतीच होती. पण त्या साऱ्याला एक लय आहे. एकदम टोकाचं असं काहीच नाही. सवंग, उथळ असं काही नाही. सर्वसामान्य माणसांसारखीच माणसं. तसेच राग-लोभ. प्रेमाची भावना. त्याग इत्यादी...

संगीतिका म्हणता येईल का 'साज'ला? नऊ-दहा गाणी आहेत त्यात; आणि ती किती छान! त्यातलं वैविध्यही केवढं! सुरेश वाडकरांचं एक गाणं तर थेट मन्ना डे यांची आठवण करून देत राहिलं. किती मोकळेपणानं गायिले आहेत सारे. भूपेन हजारिका, यशवंत देव, राजकमल आणि झाकीर हुसेन. असे चार-चार संगीतकार. आणि कुणीही कुणावर मात करताना दिसत नाही. लक्षात राहतात ते सूर आणि स्वर. सगळंच मनमोकळं, दिलखुलास असं.

चित्रपट पाहताना सारखी ही त्या दोन (प्रसिद्ध) बहिणींची कथा वाटत राहिली. विशेषतः बन्सीचं लग्न होतं तेव्हा आणि १५ ऑगस्टच्या गाण्याची कथा. (हे गाणंही आणखी एका प्रसिद्ध संगीतकाराची आठवण करून देतं.) आणि आणखी एका प्रसंगात पुन्हा त्याच दोघींची आठवण. तो तरुण देसाई आणखी एका प्रसिद्ध संगीतकाराची आठवण करून देतो. आपल्यापेक्षा वयानं मोठ्या गायिकेच्या प्रेमात पडलेला, नंतर तिच्याशी लग्न केलेला. या सिनेमात मात्र त्याचं काही बन्सीशी लग्न होत नाही.

बन्सीचा नवरा मारकुटा, बायकोच्या पैशावर जगू पाहणारा...पुन्हा एकदा त्या धाकट्या बहिणीच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देणारं. त्या दोन बहिणींची वेषभूषा, मानसीची एक वेणी, त्यात अडकविलेलं एक फूल, कोपरापर्यंतचं पोलकं... हे सगळं काही त्यांची आठवण करून देणारं आहे. पण तरीही दिग्दर्शक या नात्यानं सई परांजपे यांनी ते तद्दन फिल्मी होऊ दिलं नाही. त्याबद्दल त्यांना सलाम.


सगळ्याच कलावंतांनी आपल्या भूमिका फार मस्त केल्या आहेत. त्याचं श्रेय त्यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक बाईंनाही दिलं पाहिजे. एक दिलखूश संगीतकार म्हणून झाकीर हुसेनना पाहताना मजा वाटली. ते ज्यासाठी जगद्विख्यात आहेत, त्या त्यांच्या तबलावादनाचा एका दृश्यात मस्त उपयोग केलेला दिसतो. म्हणजे पाहणारेही खूश आणि आपली मूळ भूमिका मिळाल्याने तेही 'वाह उस्ताद!' म्हणाले असणार. अरुणा इराणी एकदम गृहिणी वाटतात. त्यागमूर्ती मोठी बहीण त्यांनी खरी वाटावी, अशी रंगवली आहे.

परदेशातील चित्रिकरणासाठी सेशेल्सची निवड केलेली आहे. हा खास सई परांजपे टच. तिथल्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी सभागृहात पळताना दिसणारा एक मुलगा मात्र अगदी भारतीयच वाटतो. डॉक्टर सामंतांना बन्सी तिथून पत्र लिहिते, त्यात दीड हजार श्रोत्यांचा उल्लेख आहे. पण सभागृहात तेवढी गर्दी वाटत नाही.

खरं तर हा चित्रपट फार जुना नाही. सतरा-अठरा वर्षांपूर्वीचा. तरीही तो नजरेतून कसा काय हुकला, हे लक्षातच येत नाही. म्हणजे मी सिनेमे फारसे बघत नाहीच. पण किमान काय आलंय, कसं चाललंय हे परीक्षणं वगैरे वाचून कळतंच. पण का कुणास ठाऊक, 'साज'बाबत असं झालंच नाही.

त्या दिवशी काय वाटलं कुणास ठाऊक. सिनेमा संपल्यानंतर पाचच मिनिटांत हे असं सगळं लिहिलं आणि सई परांजपे यांना इ-मेल पाठवून दिली. 'लोकसत्ता'मध्ये त्यांचं 'सय' सदर चालू होतं, तेव्हा ते आवडत असल्याचं कळवायचं राहूनच गेलं. तेही मग या इ-मेलमध्ये लिहिलं. इथं लिहिलं तसंच त्या इ-मेलमध्ये त्या दोन गायिकांचं नाव काही घेतलं नव्हतं. त्यांना एक प्रश्नही विचारला होता - 
'कुहूच्या पहिल्या गाण्यानंतर झालेल्या पार्टीतील दृश्यामध्ये तुम्ही स्वतः आहात का हो? पांढऱ्या फ्रॉकमधील एक प्रौढ महिला त्यात दिसते. त्या तुम्हीच आहात, असं मला वाटून गेलं.'

या प्रश्नाचं आणि अन्य अनेक प्रश्नांची उत्तरं मला काल-परवा मिळाली. त्या पार्टीच्या दृश्यात असलेली ती महिला म्हणजे सई परांजपे नसून यांची कन्या विनी आहे. तिचा उल्लेख 'प्रौढ महिला' असा केल्याने सई परांजपे यांना माझ्या दृष्टीबद्दल शंका आली नसली तरच नवल.

तर ही सगळी माहिती इंटरनेटवरून मिळाली. आणि अजून बऱ्याच गोष्टी समजल्या. 'साज'ची गणना सरसकट समांतर चित्रपटात करण्यात आली आहे. ज्यांची नावं लिहायला मी घाबरत होतो, त्या लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या नावाचा थेट उल्लेख चित्रपट झळकला त्याच वर्षी म्हणजे 
१९९७-९८मध्येच झाला होता. त्यावर आशा भोसले यांची प्रतिक्रियाही कुठं तरी आली होती. ही कथा लता आणि आशा यांचीच आहे, यावर बहुतेक सगळ्यांचं एकमत आहे. आणि मी मात्र काहीच माहिती नसल्यामुळं भोटपणे आडवळणं घेत होतो. ते वाचून सई परांजपे यांना केवढी मजा वाटली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

सई परांजपे सध्या पुस्तकाच्या कामात गुंतल्या आहेत. 'सय'चं पुस्तक तयार होतंय आणि त्याची सगळी लगीनघाई उडालीय, असं त्यांनीच माझ्या इ-मेलल्या दिलेल्या छोट्या उत्तरात म्हटलं आहे. हे पुस्तक लवकरात लवकर पूर्ण व्हावं, असं मला वाटतंय. त्याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे ते सगळं एकत्रित वाचायचंय. आणि दुसरं म्हणजे त्या कामातून सई परांजपे मोकळ्या झाल्या म्हणजे मला लिहिणार आहेत. कारण उत्तरादाखल दिलेल्या इ-मेलमध्ये त्यांनी लिहिलं आहे -

Will reply to your v interesting take on Saaz when I get a little time.
Best,
Sai Paranjpye
...............


(छायाचित्र http://parallelcinema.blogspot.in यांच्या सौजन्याने)

`त्यौहार` मस्ट गो अॉन...

चैत्र सुरू झाला की, गावोगावच्या यात्रा-उरूस सुरू होतात. असाच एक उरूस गेल्या आठ वर्षांपासून भारतात सुरू आहे. `आयपीएल` म्हणून ओळखला जातो तो. यात्रेला जत्राही म्हणतात. उरूस काय, यात्रा काय नि जत्रा काय - म्हणजे खा-प्या-मजा करा. `आयपीएल` म्हणजे पण जत्रा. कारण त्यात दर वर्षी दिसताहेत भानगडी सत्रा.

ही `आयपीएल` म्हणजे खेळापेक्षा मनोरंजन अधिक अशीच परिस्थिती बनलीय. चेंडूमागे झुकणारं हे किंवा ते पारडं, संभाव्य यशाचे वजन कधी या तागडीत, तर पुढच्याच चेंडूला त्या तागडीत. क्षणाक्षणाला ताणली जाणणारी उत्सुकता. आनंदाची लहर आणि दुःखाचा कहर. आशा-निराशेचे (कृत्रिम) हिंदोळे. त्यावर झुलणारे कोट्यवधी बघे. जल्लोषाचे चित्कार आणि अपेक्षाभंगाचे फुत्कार. सगळं काही सिनेमॅटीक. एखाद्या कुशल दिग्दर्शकाने गल्ल्यावर डोळा ठेवून साकारावं, अगदी तसंच नाट्य. मस्त रंगलेला रंगमचीय आविष्कार. साडेतीन-चार तासांचं नाटक. कातीव आणि बेतीव. `माहितीरंजन` (इन्फोटेनमेंट) असतं ना, तसं हे `क्रीडारंजन`!

पण खेळ तर मनोरंजनासाठीच असतात ना? प्रत्यक्ष खेळात सहभागी होणाऱ्यांनाच काय ते शारीरिक कष्ट करावे लागतात. व्यायाम त्यांचाच होतो आणि तंदुरुस्तीचा कस त्यांचाच लागतो. प्रेक्षक आलेले असतात ते त्यांचं क्रीडा-कौशल्य बघायला. त्यांना दाद द्यायला. त्यातून रंजन करून घ्यायला. मान्य आहे. पण ते तेवढंच असतं? प्रेक्षकांमध्ये काही नवोदित होतकरू खेळाडूही असतात, प्रतिस्पर्धीही असतात आणि त्या स्पर्धेत स्थान न मिळालेलेही खेळाडू असतात. मैदानात चाललेल्या घडामोडींपासून ते काही शिकत असतात, डावपेच आत्मसात करीत असतात. सगळेच काही केवळ रंजनासाठी जमलेले नसतात.

ढोल वाजवत, भुईनळे उडवत, रंग उधळत `ये है इंडिया का त्यौहार` गात नाचणं हे `आयपीएल`चं ब्रीद आहे. या स्पर्धेतला चोपनावा सामना शनिवारी, 16 तारखेला झाला. साखळीतले अखेरचे दोन सामने रविवारी आहेत. या स्पर्धेतल्या `प्ले-अॉफ`च्या टप्प्यात खेळणारे चारपैकी तीन संघ या शेवटच्या तीन सामन्यांमधून ठरले. केवढी ही चुरस, केवढं हे कौशल्य! बहुसंख्य संघ अगदी एकसारख्या ताकदीचे. शेवटच्या चारांमध्ये जागा मिळविण्यासाठी केवढी त्यांची धडपड. कागदावरचे निकाल पाहून असं वाटणं स्वाभाविक आहे. स्पर्धेतले सुरुवातीचे पाच सामने जिंकणारे राजस्तान रॉयल्स आणि पहिले चारही सामने हरणारा मुंबई इंडियन्स संघ, या दोन्ही संघांना `प्ले-अॉफ`मध्ये जागा मिळणार का नाही, हे त्यांच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात ठरावं. केवढा हा योगायोग! केवढी चित्तचमत्कारी अनिश्चितता!! त्याबद्दलचं जुनं समर्थन तयारच आहे - `Cricket is a game of glorious uncertainties!`

या अनिश्चिततेची जाऊ द्यात; पण चमत्कारांची अनेक उदाहरणं `आयपीएल`च्या वेगवेगळ्या टप्प्यात दिसली आहेत. संघातून स्थान गमावलेला एखादा खेळाडू 15-16 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून घेतला जातो. तो एखाद्याही सामन्यात चमकताना, संघाला जिंकून देताना दिसत नाही. तरीही त्याची किंमत एवढी? स्पर्धेच्या लिलावातला सर्वांत महागडा खेळाडू तो? एखाद्या स्टार खेळाडूला 22-23 कोटी रुपये देऊन लिलावातून आपल्या संघात खेचून आणलं जातं. आणि नंतर मग स्पर्धेतले 10-12 सामने त्याला खेळवलंच जात नाही. मग ही गुंतवणूक त्याच्या कौशल्यासाठी झालेली असते की आणखी कुठल्या कारणासाठी, हा प्रश्न उभा राहतोच ना. एखाद्या जिम्नॅस्टला लाजवील अशी कसरत करीत कोणी तरी अफलातून झेल घेतो आणि त्यानंतर दोन-तीन चेंडू झाल्यावर तोच महाभाग हातात आलेला लोण्याचा गोळा मातीमोल करताना दिसतो. `जिंकता जिंकता सामना कसा हरावा,` हे पूर्वी भारतीय संघाचं वैशिष्ट्य होतं. ते आता `आयपीएल`मधल्या कोणत्याही संघाला लागू पडतं. सामन्याच्या पहिल्या 15 षटकांमध्ये आपणच केलेल्या कामगिरीवर शेवटच्या पाच षटकांमध्ये बोळा फिरविण्याचं काम एखादा संघ हरेक सामन्यात करीत असेल, तर त्याचं हे `कर्तृत्व` `glorious uncertainties`मध्ये नक्कीच मोडत नाही.

याच स्पर्धेतील शुक्रवारचा सामना पाहिला. संघ होते सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर. या सामन्यावर पावसाचं पाणी पडलं. त्यामुळे तो काही ठरल्या वेळी सुरू झाला नाही. शेवटी त्याला मुहूर्त लागला तो रात्री साडेदहा वाजताचा. सामन्याची षटकं ठरली वीसऐवजी अकरा. मग पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव संपताना पुन्हा पाऊस आला. पाऊस पडत असताना सामना कसा सुरू ठेवता, अशी काहीशी तक्रारही बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीनं केली. पण पंचांनी तो डाव तसाच पुढं रेटला. मैदानात परतताना दिनेश कार्तिक एका पंचाशी तावातावानं बोलताना दिसला. त्याच्या रागाचं कारण बहुतेक हेच असावं. पावसाच्या सरी येतच राहिल्या. मग दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळूरचा डाव सहा षटकांचा करण्यात आला. म्हणजे चाळीस षटकांचा सामना झाला फक्त 17 षटकांचा.

सामना सुरू असताना मैदानाची स्थिती अतिशय खराब असल्याचं दिसत होतं. क्षेत्ररक्षक घसरत होते, टप्पा पडल्यावर चेंडू हळू जात होता, गोलंदाजाला प्रत्येक वेळी चेंडू नॅपकीननं पुसून घ्यावा लागत होता. पहिल्या डावातलं शेवटचं षटक टाकणाऱ्या स्टार्कचे हात पावसाच्या सरीमुळे ओले झाल्याचे टीव्ही.च्या पडद्यावरही स्पष्ट दिसत होतं. अशा परिस्थितीत सामना खेळवण्याचा अट्टहास कशासाठी, कुणासाठी होता?

प्रश्न एका सामन्याचा नाहीच मुळी. प्रश्न अनेक आहेत. या स्पर्धेमुळे निर्माण केलेले आणि त्यांची उत्तर न मिळालेले. किंबहुना या प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळच केली जात असल्याचं वारंवार दिसतंय. त्या ऐवजी मग आपल्याला थेट अमिताभ बच्चन मुंबईला मैदानात पाहायला मिळतो. राजस्तान रॉयल्सचे काही खेळाडू फिक्सिंगमध्ये थेट अडकल्याचं दिसल्यावर त्याच वर्षाच्या अंतिम सामन्यात त्या प्रकाराबाबत `ब्र`ही न उच्चारता `आयपीएल`चं गुणगान करणारा सचिन तेंडुलकर दिसतो.

मयप्पन, चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्तान रॉयल्सचे फिक्सिंगमध्ये अडकलेले खेळाडू, यंदा फिक्सिंगची अॉफर आल्याची तक्रार करणारा खेळाडू, ललित मोदी, शशी थरूर, सुनंदा पुष्कर, कोची टस्कर...ही यादी मोठी आहे. त्या प्रश्नांच पूर्ण निराकरण करणारी उत्तरं मिळाली नाहीत, कदाचित मिळणारही नाहीत.

तरीही `आयपीएल` सुरूच आहे. कारण `Show must go on...` अगदी त्याच चालीवर `त्यौहार मस्ट गो अॉन` कारण सोपं आहे. प्रश्न खेळाचा नाही. त्यातल्या हितसंबंधांचा आहे. मोठ्या बाजारपेठेचा आहे. जाहिरातदारांचा आहे आणि भांडवलदारांचा आहे. त्यात गुंतलेल्या पैशांचा आहे. पैसा मोठा नि खेळ खोटा!

शुक्रवार, १५ मे, २०१५

आयपीएलमधील मुंबई-कोलकाता लढत रंगतदार अवस्थेत होती. कोलकात्याला अजून 28 धावा हव्या असताना सूर्यकुमारने एक सणसणीत चौकार लगावला. त्या वेळी धावते समालोचन करणारा एक हिंदी वीर म्हणाला, `मी सांगतो, आता हा सामना मुंबईच्या हातून गेला आहे. कोलकाता जिंकणारच जिंकणार.` नवज्योतसिंग सिद्धूने त्याची लगेच री ओढली.

त्यानंतर दोन चेंडू पडले आणि नव्या षटकातील पहिल्याच चेंडूला सूर्यकुमारच्या बॅटीने चालविलेल्या यादवीचा अस्त झाला. पुढे पियूष चावलाच्या कृपेने (सात चेंडू नि एक धाव) मुंबईकर पाच धावांनी जिंकले आणि त्यांचे आव्हानही जिवंत राहिले.

समालोचक, अर्थात कॉमेंटेटर होण्यासाठीचा मूलभूत निकष काय आहे?

शंभर टक्के खोटं दोनशे टक्के आत्मविश्वासानं बोलणं, हाच?!

रविवार, १० मे, २०१५

रावी!





पुण्यात गेल्या महिन्याच्या शेवटी एक नवी मैत्रीण मिळाली. रात्रीच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात तिची ओळख झाली. ती बसली होती तिच्या आई-बाबांबरोबर गप्पा मारत. थोडंसं बाजूलाच खुर्चीवर मी होतो. पण ती काही माझ्याकडं ढुंकूनही बघत नव्हती. बाबा, तिची एक मैत्रीण, अधूनमधून येणारी-जाणारी आई यातच ती मग्न होती. तिचे हावभाव, गप्पांना देत असलेला ती प्रतिसाद सारंच फार आकर्षक होतं. ती जे काही बोलत होती, त्यापेक्षा तिचा चेहराच जास्त बोलत होता. म्हणूनच आखडूपणा सोडून तिची ओळख करून घेतली. ओळख म्हणजे काय, तर तिच्याशी थेट बोलायला सुरुवातच केली.

तिचं नाव रावी. वय असेल तीन-चार वर्षांच्या दरम्यान. त्यामुळंच कार्यक्रमात तिला रस नव्हता. ती आपली बाबांकडून गोष्ट ऐकत होती. ती ऐकता ऐकता प्रश्न विचारत होती, काही प्रतिक्रिया देत होती. हे सगळं मोठ्यानं, `अरे बाबाSS` अशी साद घालत. तिची व्यक्त होण्याची पद्धत वयाच्या मानाने फार विलक्षण होती. ते चित्रच लोभसवाणं होतं. असं असलं, तरी एक नक्की! आपण हिंदी सिनेमात बघतो तसं ते लाडावलेलं किंवा `ओव्हरस्मार्ट` लेकरू नव्हतं. एकदम निरागस!!

मग जेवायची पंगत बसली. एव्हाना रावी कंटाळली होती. पण तेव्हाच माझ्या हातात कॅमेरा आला. या नव्या मैत्रिणीची आठवण म्हणून काही `क्लिक` केल्या. त्यात मला आधी दिसलेली रावी कुठंच आली नाही. ती झोपाळली होती तेव्हा, आणि भूकही लागली होती तिला. तरीही तिसऱ्या छायाचित्रात तिची थोडी झलक दिसतेच आहे.

रावीला मैत्रीण म्हटलंय खरं, पण आमची पुन्हा भेट कधी होणार ते नक्की नाही. होईल तेव्हा मी तिला आठवणारही नाही. बाकी सगळं जाऊ देत... निरागसपणे अभिव्यक्त होण्याची वृत्ती कायम राहो, एवढ्याच रावीला तिच्या थोड्या काळच्या मित्राकडून शुभेच्छा.
च्या मारी... हे इंटरनेट आल्यापासून इतके `डे` बोकाळले आहेत ना! दिनविशेष नाही, असा 365 दिवसांतला एखादा तरी दिवस असेल का?
.
.
.
तसा तो असेलच तर `नथिंग डे` म्हणून साजरा केला पाहिजे!!
----------
`डे`वेडा आम आदमी
शप्पथ! अगदी खरं खरं,
एकदम प्रामाणिकपणे सांगतो,
आज `वर्ल्ड अॉनेस्टी डे` आहे,
हे मला माहीतच नव्हतं!

मंगळवार, ५ मे, २०१५

कन्फेशन

The end of confession is to tell the truth to and for oneself.
- J. M. Coetzee

Perhaps confession saves the soul
but it ruins the reputation.
- Thomas Dewar

उद्धट, बेमुर्वतखोर, माजोरडे, भाडं नाकारणारे, अडवणूक करणारे, अडवून दामदुप्पट उकळणारे, खोटं बोलणारे, लुबाडणारे... अगदी सगळ्याच नाही; पण बहुतांश रिक्षाचालकांबद्दलचं हे मत. पूर्वग्रहदूषित नाही! अनुभवातून आलेलं, इतरांच्या बोलण्या-अनुभवण्यातून बनलेलं हे मत. त्याला कधीकधीच तडा जातो.

रिक्षावाल्यांनी काहीही भाडं सांगावं आणि आपण ते (नाइलाजानं) मान्य करावं. एके काळी सोलापूरसारख्या शहरात मीटरप्रमाणेच रिक्षा धावे. गेल्या पाव शतकात त्यात मोठा बदल झालेलाय. बसण्याआधीच भाडं ठरवून घ्यावं लागतं. तिथं चार महिन्यांपूर्वी गेलो, तर `सीट'प्रमाणं वाहतूक करणाऱ्या रिक्षावाल्यानं सकाळी सकाळी 125 रुपये भाडं सांगितलं. त्यानंतर 15 मिनिटांनी मिळालेल्या रिक्षानं मी इच्छित स्थळी 15 रुपयांत गेलो. तरीही तिथं पोहोचल्यावर रिक्षावाल्यानं `तुमच्या खुशीनं द्या काही तरी' म्हणत जास्तीचे पाच रुपये उकळलेच. पुण्यात रात्री साडेदहा वाजता मंडईतून शिवाजीनगर बसस्थानकावर सोडून रिक्षाचालक उघडपणे दीडपटीनं भाडं घेतो आणि जणू आपल्याच अंगावर थुंकल्यासारखं गुटक्याची पिचकारी मारत वर सुनावतो, `करा काय करायचंय ते.' नगरमध्ये रात्री 12 वाजता दोन किलोमीटरसाठी रिक्षावाले 90 रुपये सांगतात आणि नंतर `सत्तरच्या खाली येणार नाही' असं खुशाल सांगतात.

अलीकडेच औरंगाबादला गेलो होतो. आम्ही तिघं होतो. बाबा पेट्रोलपंपाच्या थांब्यावर उतरलो. बसचं दार उघडून खाली पाय टाकेपर्यंत रिक्षाचालकांचा गराडा पडलेला. बसमधून उतरल्या उतरल्या रिक्षा करायला मला कधीच आवडत नाही. कारण हे रिक्षावाले गराडा घालून, जोरजोरात बोलून गोंधळवून टाकतात. काही जण तर अंगचटीला आल्याइतके जवळ येतात. आपण बसच्या गतीतून सावरून तिथल्या गतीशी जुळवून घेण्याआधीच ते नव्या चक्रात अडकवतात. बसमधून उतरावं, पाच-पन्नास मीटर चालत जावं आणि मग बस पकडावी किंवा रिक्षा करावी, असं मी तरी करतो. कारण तोवर अंदाज आलेला असतो.

पण त्या दिवशी तशी संधीच मिळाली नाही. बरोबरच्या दोघांनी एका रिक्षावाल्याशी बोलणी सुरूही केली. आधी 70 रुपये सांगून तो लगेच 60 रुपयांवर उतरला. त्या बरोबर मी 50 देण्याची तयारी दाखवली; ती भीतभीतच. कारण जायची जागा मला त्या वेळी नेमकी किती अंतरावर आहे, हे आठवत नव्हतं. ती रिक्षा नाकारून दोन पावलं पुढं आलो की, दुसऱ्यानं हटकलं. तेच स्थळ, तेच भाडं, तीच घासाघीस. पन्नास रुपयांचा हट्ट सोडून त्याचं 60 रुपये भाडं मान्य केलं. दूध डेअरीपासून वळून रोपळेकर हॉस्पिटलजवळ सोडायचं त्यानं मान्य केलं.

माझ्या बरोबर असलेल्या दोघांनाही नेमका पत्ता माहीत नव्हता. रिक्षा सुरू झाल्यावर दोन-पाच मिनिटांत त्यातल्या एकानं तिथं घरी नातेवाइकाला फोन करून पत्ता विचारला. तो रिक्षाचालकाला सांगितल्याबरोबर त्याचा सूर बदलला. "काय राव, एवढ्या आत जायचंय हो! आधी सांगायचं नाही का?'', अशी कुरकुर करीत तो हलक्या आवाजात काही तरी पुटपुटला. त्या बरोबर त्याला म्हणालो, "भाऊ, तुला नाही परवडत तर सोड इथं आम्हाला. घे रिक्षा लगेच बाजूला.'' मी वैतागलो होतो. एक तर तिथनं रिक्षा नको म्हणत असताना बरोबरच्या दोघांनी केली, त्याला नीट पत्ताही नाही सांगितला आणि आता अपेक्षेप्रमाणं रिक्षाचालकाची `दादागिरी.'

थांबायला सांगूनही चालकानं रिक्षा थांबवली नाहीच. तो चालवतच राहिला. तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत राहिला. आधी सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा गेल्यावर त्यानं मग नंतर सांगितलेल्या ठिकाणाकडं वळवली. उल्कानगरी वगैरे नाव होतं त्या भागाचं. त्या परिसरात गेल्यानंतरही घरी पोहोचण्यासाठी डावीकडं वळायचं की उजवीकडं, पहिल्या रस्त्यावरून आत घालायची रिक्षा की दुसऱ्या गल्लीतून, हे नक्की माहीत नव्हतं. माझे सोबतीही गोंधळलेले. ते म्हणत होते - `नाही, नाही. मागच्या वेळी याच गल्लीतून गेलो होतो.' `मला नक्की आठवतंय. पुढच्या रस्त्यानं आत गेलो होतो...'

एव्हाना रिक्षाचालक वैतागलेला आणि मी कावलेला. जोरात ओरडून म्हणालो, `फोन करून विचारून घ्या, नक्की कुठल्या रस्त्यानं वळायचं ते.'

एव्हाना सोबत्यानं फोन लावला आणि चालकानं रिक्षा थांबविली. मी खाली उतरलो, त्याच क्षणी रिक्षाचालक हळूच म्हणाला, "गरिबावर कुणीही जोरच करतं." आधी ते नीटसं ऐकू आलं नाही. म्हणून त्याला विचारलं, "काय म्हणालात दादा?"

तसाच मवाळ सूर ठेवत तो म्हणाला, "गरिबाला कुणीही जोरातच बोलतं दादा. तुमच्या माणसांनी पत्ता नीट सांगितला नाही. आणि तुम्ही लगेच रिक्षा थांबव म्हणालात, साहेब. उतरून चालला होता.''

आधी त्याच्याशी वाद घालायच्या बेतात होतो. पण त्याचं ते मवाळ बोलणं ऐकून म्हणालो, "बाबा रे, मी काही तुझ्यावर जोर नव्हता केला. तू कुरकूर करायला लागलास म्हणून म्हणालो, `तुला परवडत नाही, तर थांबव रिक्षा.' तू पोटासाठी रिक्षा चालवतोस माहितीय मला. तुझ्यावर मी काय जोर करणार? आणि जोर करायचाच म्हणलं तर अजून करून दाखवतो बघ. पण मला नाही जमत ते. परवडलं तर ने असंच माझं म्हणणं होतं.''

तेवढ्या एका मिनिटात नेमकी गल्ली समजली होती. त्या रिक्षावाल्याला माझा सोबतीही म्हणाला, ``भाऊ, जास्त पैसे देतो तुला. पण आता कुरकुरू नकोस.''

आमच्या सोबत्यांनी सांगितल्या ठिकाणापासून इच्छित स्थळ दीड-दोन किलोमीटर आत होतं. एकदाचं घर सापडलं. रिक्षा थांबली. खिशातून शंभराची नोट काढली. ती चालकाच्या हातात देत म्हणालो, ``तुला किती घ्यायचेत तेवढे पैसे घे दादा. नाराज नकोस होऊ.''

रिक्षाचालकानं खिसे चाचपले. तो 80 रुपये घेईल, असा अंदाज केला होता. आणि आता त्याबद्दल वादही घालायचा नव्हता. चूक आमचीच होती, हे मनानं मान्य केलं होतं. त्याबद्दलची नाराजी संबंधितांना चेहऱ्यावर कधीचीच दाखवून झाली होती. चालकानं शर्टाच्या खिशातून एक विसाची, एक दहाची नोट काढून दिली. मग पँटचे खिसे चाचपले आणि त्यातून काही नाणी काढली. ती रक्कम माझ्या हातात ठेवली.

मी विसाची नोट घेतली आणि बाकीचे पैसे रिक्षाचालकाकडं परत देत म्हणालो, ``दादा, एवढे नकोत. तूच सांग, तुला कमी पडले नाहीत ना? योग्य पैसे मिळाले ना तुला? नाराज नाहीस ना तू?" त्यानं मुकाटपणे ते परत दिलेले पैसे खिशात ठेवले.

अंगात खाकी कोट चढवललेल्या, दाढीचे खुंट वाढलेल्या त्या तरुण पोराचा चेहरा बघता बघता पडला. गालफाडं आत गेलेला त्याचा चेहरा कसनुसा दिसू लागला. त्याच्या पाठीवर थोपटत असतानाच त्याचे डोळे भरून आले. एवढ्या तरण्या पोराच्या डोळ्यांत सकाळी सकाळीच अश्रू? बघून कसं तरीच झालं. त्याला विचारलं, ``कमी दिले का पैसे? दादा, तू पोटासाठीच रिक्षा चालवतोस, हे मान्यंय रे बाबा. तुला नाराज करून बरं नाही वाटणार.''

डबडबलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला, ``पैशाचं काही नाही हो साहेब. बाकीची मजबुरी आहेच की. तुम्हाला तरी ती सांगून काय उपयोग!''

डोळ्यांतून पाणी गळत असतानाच चालकानं रिक्षा वळवली. तो निघून गेला. जाता जाता त्याच्या रिक्षाचा क्रमांक मनात टिपून ठेवला.

एक तरणाबांड रिक्षावाला रडतो? तेही आपल्यामुळं? बरं नाही वाटलं. हे काही पटलं नाही त्या दिवशी.

त्या गोष्टीला आता तीन आठवडे झाले. त्याच्या रिक्षाचा क्रमांक विसरून गेलो. आणखी एक इंग्रजी वचन - It's easier to say, "I don't remember" when you're wrong.

पण तीन आठवड्यानंतरही विसरला नाही तो त्याचा चेहरा - तो अजूनही दिसतो, खप्पड, खंगलेला, डोळ्यांतून पाणी येणारा. `मजबुरी आहे' असं सांगणारा त्याचा ओला -हळवा, दुबळा आवाज!


(जाता जाता आणखी एक - अगदी सुरुवातीला दोन आणि मजकूर संपता संपता एक, अशी तीन इंग्रजी उदधृतं आहेत. ती काही मला सहज आठवलेली नाहीत. या मजकुरासाठी इंटरनेटवरून ती प्रयत्नपूर्वक शोधली आहेत.)

रविवार, ३ मे, २०१५

ये कहना हमने ही, तूफाँ मे डाल दी कश्ती
कसूर अपना है, दरिया को क्या बुरा कहना...


(प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बोरकर यांनी पाठविलेल्या इ-मेलमधून साभार)

आपण सारे बैल..?



प्रत्येकाच्याच गळ्यात दावं अडकवलेलं असतं. काहींचं दिसतं, काहींचं अदृश्य असतं. तर हे दावं जेवढ्या परिघात फिरण्याची मोकळीक देतं, तेवढं तरी फिरलंच पाहिजे. दावं अडकवलंय म्हणून कुरकूर करण्यापेक्षा तसं फिरावं. चौकट लवचीक करायची म्हणजे दुसरं काय असतं? एका मोकळ्या माळावर `बांधलेला` हा बैल डिसेंबरअखेरीस कधी तरी कॅमेऱ्यामध्ये टिपला.


कळियांसी आला...

काही दिवसांपूर्वी, दीड-एक वर्षापूर्वी बायको एका नातेवाइकाच्या वास्तुशांतीला गेली होती लातूरला. त्यानं परतभेट म्हणून दोन रोपं दिली. त्यातलं एक मोगऱ्याचं. दुसरं असंच काही तरी; नेमकं आठवत नाही. मोगरा, निशिगंध, जाई-जुई, पारिजात...ही आवडती फुलं माझी. मंद दरवळणारी. त्यामुळे मोगऱ्याचं रोप पाहिलं आणि लगेच ताब्यात घेतलं. ते वाढवण्याची, फुलवण्याची जबाबदारी माझी, असं जाहीर केलं.

आमचं घर म्हणजे छोटा फ्लॅट. त्याला मागच्या बाजूला बाल्कनी आहे. काही कुंड्या वगैरे ठेवायच्या तर तिथंच. तिथं वर्षातले बाराही महिने उन्ह येत नाही. दक्षिणायनाच्या वेळी दुपारचा काही वेळ उन्ह पडतं. त्यामुळे की काय, कुणास ठाऊक, पण तिथं छोटी बाग फुलविण्याचा आमचा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही आजवर. तुळशीची दोन रोपंही चांगली वाढून मग जळून गेली.

बाल्कनीतल्या दोन-तीन कुंड्यांमध्ये काही तरी वाढवायचंच, असं या वेळी ठरवूनच टाकलं होतं. त्यानुसार आधी तुळशीच्या मंजिऱ्या चुरगाळून टाकल्या. एकाच कुंडीत दोन-चार रोपं आल्यावर, त्यातल्या एकाला दुसऱ्या कुंडीमध्ये अगदी निगुतीनं हलवलं. दोन्ही रोपं छान वाढली. त्यांच्या साथीनं आत्मविश्वासही. बंगल्यातल्यासारखी बाग फुलवणं काही शक्य नाही, पण आपल्यापुरती दोन फुलझाडं वाढवता येतील, असं वाटू लागलं.

आत्मविश्वास असा वाढलेला असतानाच हातात हा मोगरा आला. त्याची विधिवत कुंडीत प्रतिष्ठापना केली. प्लास्टिकचीच कुंडी. कारण मातीची जड कुंडी बाल्कनीच्या जाळीला अडकवणार कशी? मोगरा आणि आधी लावलेली तुळस कशी वाढवायची, याचं नियोजन केलं होतं. बायको रोज पाणी घालायचीच. मोगऱ्याला मात्र मी आठवणीने पाणी घालत होतो. त्याची जादा पानं खुडत होतो. तुळशीची पिकलेली-वाळलेली पानं तोडून ती मोगऱ्याच्या कुंडीत टाकायची. चहाचा गाळ आठवणीनं या दोन्ही कुंड्यांमध्ये टाकायचा. कारण त्याचं चांगलं खत होईल, असं मला (उगीचंच) वाटत होतं. चहाचा गाळ असा टाकण्यास बायकोचा विरोध. मग तिची नजर चुकवून तो टाकण्याचं काम आलंच.

चांगली वाढलेली  तुळशीची 
दोन्ही रोपं मधल्या काळात खंगली. त्यांची पानं झडू लागली. मग पुन्हा काळजी. आधीचा अनुभव लक्षात घेऊन मंजिरी काढून ठेवल्या होत्या. पण तो तेवढा आठवडा गेला आणि तुळशीची दोन्ही रोपं वाचली. व्यवस्थित.

बाजूच्या एका कुंडीत नुसताच चहाचा गाळ टाकत राहिलो. त्यात अशाच टाकलेल्या लिंबाच्या बियांतील दोन अंकुरल्या. त्याची आता चांगली फूटभर रोपं तयार झाली आहेत. त्यांच्या वाढत्या वयाला त्या छोट्याशा कुंडीत किती वाव मिळेल, याची थोडी शंकाच आहे. त्याचं एखादं पान तोडून कुस्करल्यावर एकदम प्रसन्न करणारा मंद आंबूस गंध येतो.

तर गोष्ट मोगऱ्याची सांगत होतो. मोगऱ्याचं ते बाळरोप कुंडीत रुजलं. चहाचा गाळ-फळांच्या सालींचे तुकडे-तुळशीची वाळलेली पानं असं खत त्याला देत होतो. नियमित पाणीही घालत होतो. पानांवरची धूळ जावी म्हणून कधीमधी सचैल स्नानही घातलं जाई त्या रोपाला. हळुहळू पानांच्या संख्येत वाढ होऊ लागली. उंचीही वाढू लागली. रोप जसजसं वाढत चाललं, तसतशी खालची पानं हळुवारपणे तोडून टाकू लागलो.

हिवाळा आला. थंडी कडाक्याची पडली. एक दिवस पाणी घालताना लक्षात आलं की, मोगऱ्याची चार-पाचच पानं तरतरीत आहेत. बाकीची सर्व कोमेजून गेली आहेत. ती तोडून टाकली. पाणी थोडंसंच घातलं. परत पुढच्या आठवड्यात पाहिलं, तर दोनच पानं टवटवीत. बाकीची तीन-चार पानं आधीसारखी कोमेजलेली. पाणी घालून दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यांनी मान टाकलेली.

आता शिल्लक दोनच पानं! ही दोन पानं गेली, तर रोप गेलं, हे लक्षात आलं. त्यामुळं काळजी घेतली. कुंडीतली माती थोडी भुसभुशीत केली. पाणी बेताबेतानंच घातलं.

अजून एक आठवडा गेला. कुंडी खाली घेतली, तर दिसलं, ती उरलीसुरली दोन्ही पानं कोमेजलेली. रोपाची अवस्था एखाद्या वाळल्याखडंग काटकीसारखी. निव्वळ काटकीच. पानं झडलेली. दुर्मुखलेली. आयुष्य संपलेली काटकी. एवढी काळजी घेऊनही मोगरा काही वाचलाच नाही! वाईट वाटलंच. जड मनानं तीही पानं तोडून टाकून दिली. आणखी एका स्वप्नावर माती लोटल्यासारखं...

तुळशीच्या रोपांना पाणी घालता घालता सवयीनं मोगऱ्याच्या कुंडीतही पाणी टाकत राहिलो. ते वठलेलं रोप जीव धरणार नाही, हे पुरतं कळलं असूनही. मग कधी तरी महिन्याने ती (नसलेल्या) मोगऱ्याची कुंडी खाली घेतली. आणि बघतो तर काय? त्या वाळलेल्या काटकीला दोन चिमुकली पानं फुटलेली! अरे व्वा!!

पुन्हा पानं फुटल्याचं पाहून लॉटरी लागल्याचाच आनंद. मनानं सांगितलं, हे रोप आता जगणार! वा रे पठ्ठे!! पुन्हा चहाचा गाळ, भाज्यांची थोडी देठं वगैरे आणि नियमित पाणी. पानांची संख्या अगदी हळुहळू वाढू लागली. त्या वाळक्या काटकीनं थोडी हिरवाई अंगी ल्यालेली.

गावाला गेलो होतो दोन दिवसांपूर्वी. काल संध्याकाळी परतलो. एवढ्या कडक उन्हात रोपं तहानलेली असतील, हे लक्षात आलं. त्यामुळं पाणी घालण्यासाठी कुंडी खाली घेतली. आनंदाश्चर्याचा धक्काच. त्या इवल्याशा रोपाला सगळ्यात खाली एक कळी आली होती. टपोरी कळी. पांढऱ्याशुभ्र मोगऱ्याची कळी. त्याच क्षणी तो मोगऱ्याचा धुंद वास आला. थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यासारखं वाटलं. आज सकाळी पुन्हा पाहिलं तर त्या कळीला जोडून अजून एक छोटी कळी आलेली...

मी वाट पाहिली. आता अजून वाट पाहणार आहे. दोन-चार दिवसांनी त्या कळ्या फुलतील. एक फूल देवाजवळ जाईल आणि दुसरं माठात. कालपासून मी फार खूश आहे!
---------------

`फुललेला` आम आदमी
(चोवीस/एप्रिल/पंधरा)

पानगळ...

भिरकावून द्यावीत
वादळाने हवेवर
किंवा तुटून पडावीत
अलगद फांदीवरून पाने
कधी जून झाली म्हणून,
कधी आयुष्य संपले म्हणून
अलगद गळून पडतात
पाने कुणाच्या नकळत
दिसतो मग फक्त पाचोळा,
क्वचित हिरव्यागार आठवणी


कळत नाही कसे
अगदी तशीच
निसटून-तुटून-सुटून
जातात माणसे आयुष्यातून?
एक नवे वादळ उठवून
किंवा तुम्हालाच जून ठरवून!

वाट पाहावी लागते दीर्घ,
पुन्हा पालवी फुटण्याची

हल्ली शिशिर फारच लांबलाय?
की वसंत यायचाच थांबलाय?
----------------------
`पानगळीतला` आम आदमी
(बावीस/एप्रिल/पंधरा)

अपेक्षित अपेक्षाभंग

यादव आणि भूषण
त्यांनाच देती दूषण
ओठ चावती आपले दात
धोंडा पायावर आपले हात
अपेक्षाभंग जुनाच, होता अपेक्षित

दिल्लीत नव्या सारे खाविंद
त्याचीच भर दिसे अरविंद
विरोधी सुरांची बोलती बंद
मफलरशाही ही नवी बेबंद
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

पीडीपीची 'कलम-शाई'
इतिहास नवा लिहिला जाई
तीनशे सत्तरावे कलम
तूर्त तयावर पट्टीमलम
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

संसदेतले भाषण
विरोधकांवर 'रेशन'
तेच मुद्दे, तोच आवेश
भक्तांनाही जुनाच जोश
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

आणू आणू काळा पैसा
आश्‍वासने बोलू तैसा
असे काही होत नसते
सत्ता तेच सांगत असते
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

आमुचा राजू का रुसला?
विपश्यनेला का बसला?
राजकारणी येऊन फसला?
सांगा कोणी, जर दिसला
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

खुर्चीवरी बसता बसता
म्हणे 'उठा', 'उठा' आता
ना धरवेना, ना सोडवेना
तरी गर्जायचे थांबविना
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

वाजली होती शिट्टी मोठी
गाडीत भलती दाटीवाटी
दवडली तोंडची सारी वाफ
सारे कसे झाले साफ साफ
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

कोणी तरी काही आणा
अरे, यहाँ मैं हूँ ना!
टोपी प्रसिद्धीची डोई
पालखीला नवे भोई
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

आधी पत्रातुनी स्तुती
मग वाग्बाण सोडिती
कोणी भेटाया येईना
उपोषण सुटता सुटेना
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

काळरात्रीची आठवण
माहितीपटात साठवण
पुन्हा प्रतिक्रिया बेबंद
तेच तेच सारे झापडबंद
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

पुन्हा पाऊस, पुन्हा गारा
कोणी कोणाला देईना थारा
सदाचीच अवकाळी अवदसा
अंधारून आल्या दाही दिशा
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।
.
.
.
हताश जनता
बेफिकीर सत्ता
पर्यायच नसता
काय करता?
...अपेक्षाभंग, असे अपेक्षित।

...........
'उपेक्षित' आम आदमी
...........
(गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाहताहेत अपेक्षाभंगाचे वारे. बोचणारे, टोचणारे, सर्दावणारे, थरथर कापवणारे. "प्रतिकूल तेच घडेल' हा एका स्वातंत्र्यसेनानीचा सावधगिरीचा सल्ला विसरून "अनुकूल तेच घडेल' अशी अपेक्षा बाळगल्याचे हे परिणाम! यातून काही मिळेल, हे मोठ्या अपेक्षेने वाचणाऱ्याचा येथेही अपेक्षाभंग ठरलेलाच आहे! आमेन!!)
(सहा/मार्च/पंधरा)

स्वागत!

आवडीनं वाचणाऱ्या
सगळ्यांना
'खिडकी'तून डोकावून
पाहण्यासाठी आमंत्रण
आणि
 मनापासून स्वागत!

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!

सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️ जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना ...