आपल्याला राजकारण कळतंय, असा (गैर)समज
झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे ‘बाई’ म्हणत. प्रेमाने, आदराने, भीतीने,
उपहासाने, तुच्छतेने. असे म्हणण्यामागे
काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने मारण्याच्या
गंडाची.
आपल्याला राजकारणाचा कंटाळा आलाय, असा (पुन्हा)
(गैर)समज झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे ‘भाई’ म्हणतात. प्रेमाने, आदराने, भीतीने, उपहासाने, तुच्छतेने.
असे म्हणण्यामागे काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने
मारण्याच्या गंडाची.
आधी ‘बाई’ आणि आता ‘भाई’. जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या (हे
प्रत्येक वेळी सांगावंच लागतं!) या खंडप्राय देशाच्या (असाही उल्लेख आवश्यकच!)
राजकीय रंगभूमीवरची ही दोन पात्रं. वेगवेगळ्या कालखंडात आलेली. झपाटून टाकलेली!
सारं नाटक आपल्याभोवती फिरवत ठेवणारी पात्रं. इतरांना खाऊन टाकणारी पात्रं. सगळं फूटेज
आपल्याचकडं खेचणारी नायिका किंवा नायक. महानायिका किंवा महानायक म्हणा हवं तर.
‘बाईं’मध्ये अनेकांना आई दिसली, अम्मा दिसली. ‘भाईं’मध्ये
अनेकांना आपला मोठा भाऊ दिसतो, वडीलधारा माणूस दिसतो. दोघांचेही
चाहते उदंड. तेवढेच टीकाकारही.
देश चालवतात म्हणून बाईंचं केवढं कौतुक! तेवढं ते भाईंच्या वाट्याला
यायचंय अजून.
ह्या दोघांनीही बघता बघता देशाच्या जनभावनेवर कब्जा केला. त्यांचं नाव घेतल्याशिवाय
दिवस उजाडत नाही आणि मावळतही नाही. उठता-बसता त्यांच्या नावाचा जप करणारे अनेक.
त्यांचे अनुयायी कैक. बाईंचे होते, त्यांना ‘भक्त’ म्हणत. भाईंचे आहेत, त्यांना
‘भगतगण’ म्हणतात. (नंतर काही काळातच त्याचं रूपांतर ‘अंधभक्त’मध्ये झालं.) कारण काळ बदललाय ना.
प्रवाही झालाय. त्यामुळं भाषाही प्रवाही झालीय. या दोघांच्या ‘एंट्री’मध्ये ३० वर्षांचं,
अडीच तपांचं अंतर आहे. त्यामुळे तेवढा तर बदल असणारच ना.
दोघांची ‘एंट्री’ मोठ्या झोकात झाली.
म्हणजे ‘एंट्री’ तशी आधीच झालेलीच
होती. पण ‘प्रधानराणी’ किंवा ‘प्रधानराजा’ हे पद त्यांनी पादाक्रांत करण्याबाबत बोलतोय
आपण. बाई केंद्रीय मंत्री होत्या. त्यांना दोन पिढ्यांचा समाजकारण-राजकारणाचा
वारसा होता. त्यांचं (आड)नाव मोठं होतं. आल्या तेव्हा ‘गूँगी
गुडिया’ अशी त्यांची संभावना करण्यात आली होती. पण मग ह्याच बाहुलीनं
साऱ्यांना कठपुतळी बनवलं, हा इतिहास आहे. भाई प्रधानसेवक होण्याआधी
एका सुभ्याचे मुख्य होते. तेव्हापासूनच त्यांनी भगतगण आणि टीकाकार यांना जन्म
दिलाय. प्रधानपदाच्या शर्यतीत उतरले, तेव्हा तर त्यांची संभावना
वेगवेगळ्या प्रकारे होत राहिली. ‘फेकू’ म्हटलं गेलं त्यांना.
त्या ‘प्रधान’पदावर दोघंही फार
पद्धतशीर आले. त्या पदाची शपथ घेण्याआधीच त्यांनी बारकाईनं अभ्यास केला होता.
कुठले अडथळे येतील, ते कसे दूर करावे लागतील इत्यादी
इत्यादी. बाईंच्या वाटेत ज्येष्ठ काटेकुटे पेरण्याची शक्यता होती. मग त्यांनी ‘कामराज’ नावाच्या काट्यानेच सारे काटे दूर केले. भाईंनीही
ज्येष्ठांना असंच केलं. त्यांच्या त्यागाचे, कष्टाचे,
नेतृत्वाचे गुणगान करीत ते सत्तेच्या परिघाबाहेरच राहतील, ह्याची योग्य काळजी त्यांनी घेतली.
‘बाई’ आणि ‘भाई’... दोघंही दोन ध्रुवांवरचे. म्हणजे आपण जाहीरपणे राजकीय पक्ष, विचारसरणी, तत्त्वप्रणाली वगैरे असा जो विचार करतो,
लिहितो ना, त्या दृष्टीने. पण बारकाईने पाहिलं,
तर दोघं एकाच मुशीतून काढल्यासारखे. ‘हिटलर’
इत्यादी विशेषणं दोघांनाही लावण्यात आली.
बाई काय किंवा भाई काय...ते फार चांगले वक्ते आहेत, असं सभांचा आनंद लुटणारे नाहीत म्हणणार. पण कंठाळी बोलण्यात पटाईत.
समोरच्या श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्याची कला त्यांना फार अवगत. समूहाचा
सरासरी बौद्धिक निर्देशांक फार कमी असतो, ह्याची दोघांनाही
पुरेपूर जाणीव. त्याचा ते सभांमधून बरोबर फायदा उठवत. भावनेच्या लाटेवर हेलकावत
ठेवतात ते. उचंबळून जातात ऐकणारे त्यांना. ‘ह्या सम हाच...’
अशी ऐकणाऱ्यांची खात्री पटून जाते.
दोघंही आत्मकेंद्रित. त्यांच्या बोलण्यात ‘मी’,
‘मी’चा जप असतो. अनुयायांना तो खटकत नाही. आणि
टीकाकारांना ऐकवत नाही. बाईंना नेमक्या वेळी आपलं ‘बाई’पण आठवायचं. भाईंना मागच्या निवडणुकीत अगदी योग्य वेळी आपली ‘नीची जात’ आठवली.
बाई चौकडीत अडकल्या होत्या. भाईंच्या आसपासही कोणायची फिरकायची हिंमत
होत नाही. मंत्रिमंडळातील ‘एकमेव पुरुष’ असा बाईंचा
कौतुकाने (आणि छद्मीपणानेही) उल्लेख व्हायचा. भाई तर ‘पुरुषसिंह’
आहेत. छोटे सरदार! कामाचा एकमेव माणूस. तूच करता आणि करविता... शरण
तुला नरेंद्रनाथा!
दोघंही कुणाला बोलू देत नाही. दोघांचंही सहकाऱ्यांवर (नको तेवढं)
बारीक लक्ष असतं. ‘अडवा आणि जिरवा’चं कसब दोघांनाही
साधून गेलं आहे.
बाईंनी गरिबांना श्रीमतं बनवण्याचं स्वप्न विकलं होतं. त्याची ‘गरिबी
नाही...गरीब हटाव’ अशी टिंगल झाली. भाईंनी चांगल्या दिवसांचं
स्वप्न विकलं. पण अजून झोपमोड व्हायचीय.
बाई टीव्ही.वर दिसायच्या. त्यांच ते झपाटल्यासारखं चालणं. आवेशानं
बोलणं. भाई सोशल मीडियात दिसतात. ‘आओ, ट्विट करे...’ म्हणत.
बाईंच्या बॉबचं कौतुक होतं. त्यांच्या धारदार नाकाचंही कौतुक होतं.
त्यांनी ल्यालेल्या साड्या पाहून आयाबाया हुरळून जात.
भाईंच्या ५६ इंची छातीबद्दल छाती
फुगवून बोलून झालंय. त्यांचा झब्बा आणि जाकीट म्हणजे फॅशन सिम्बॉल झालंय.
स्वनामधन्य सूटवर मात्र पसंतीची मोहोर नाही उठली!
बाई मुलाबाळांच्या प्रेमात गुरफटल्या. घराणेशाहीबद्दल लोक कुजबुजू
लागले.
भाईंची गोष्टच वेगळी. संसाराच्या मायाजालात नाहीतच ते. पण उद्योगशाही
किंवा शाही उद्योगांबद्दल कधी तरी, कुणी तरी लिहून खर्च
करतं शाई!
बाईंनी ‘अनुशासन पर्व’ आणलं होतं. भाईंचं
सध्या जे चालू आहे ते ‘अनशासन पर्व’च
आहे. अमित आणि नरेंद्र ह्यांचं शासन!
सत्तेवर आल्याची दशकपूर्ती बाईंनी देशभर साजरी केली होती. त्यानंतरच
आणीबाणी आली. भाई सत्तेवर आल्याची वर्षपूर्ती जोरात साजरी होतेय.
असो! बाई आणि भाई... त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच. आणि बोलावं
तेवढं थोडंच!!
एक नक्की. अजून अर्धशतकानंतर भारताच्या राजकीय इतिहासाबद्दल जो कोणी
लिहील, त्याला ही दोन नाव टाळून पुढं जाताच येणार नाही - बाई
आणि भाई!
असो!!
आपण आज "बाई आणि भाई" हा विषय निवडला आणि नेमके व टोकदार लिहून या लेखाची वाचनीयता वाढवलीत असे मी म्हटले तर कोणालाही वावगे वाटणार नाही. आमच्या वेळी बाई म्हणजे पाणीवाली बाई आणि भाई म्हणजे कॉमरेड डांगे होते, ते आता केव्हाच सर्वांचा नजरेआड झाले आहेत तरी तुमच्या लेखाच्या शीर्षकाने त्यांची आठवण चाळवल्यासारखी झाली या दोघांचे गुणविशेष वेगवेगळे हे आपल्याला सांगायला नको.
उत्तर द्याहटवामंगेश नाबर
खिडकी मधील दृश्ये अतिशय मोहक आहेत. सर्व लेखांमध्ये वास्तवावर केलीली मिश्किल टिप्पणी अतिशय सहज पण मनाला भिडणारी आहेत. ब्लोग च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाअनशासन पर्व.. व्वा ! सर, आम्हाला 'बाई'चे पर्व माहिती नाही. तुमच्यामुळेच खुप काही गोष्टी माहिती होतात...
उत्तर द्याहटवाभाईंचे अनाशासन पर्व हे 'शौचालय मिषन' आहे असे टीव्हीवर सतत दिसणाऱ्या भारत स्वच्छता 'मिषन'च्या जाहीरातीवरून वाटते (हे 'मिषन' पूर्वी अभियान किवा मोहीम या नावानेही ओळखले जायचे). तसे बाईंचे मिशनही स्वच्छता मिशनच होते ज्यात चांगल्या, वाईट सगळ्याच विरोधकांचा सुपडा साफ करून टाकण्यात बाई यशस्वी झाल्या होत्या. भाई त्यांच्या मिशनमध्ये यशस्वी होतात की त्यांच्या हाती लोटा येतो ते बघण्यासारखे असेल.
उत्तर द्याहटवावा,अप्रतिम लेख. अगदी माझ्या मनातल्या भावना आपण अतिशय समर्पकपणे व्यक्त केल्या आहेत.
उत्तर द्याहटवाVery accurate observation, and real too.
उत्तर द्याहटवाI also agree with this article.