रविवार, १७ मे, २०१५

निमित्त `साज`चं

ही गोष्ट बरोब्बर महिन्यापूर्वीची. दुपार होती. निवांत पसरलो होतो अस्ताव्यस्त. उकडत होतंच भरपूर. वाचण्यासारखं हाताशी काही नव्हतं. जे होतं, ते लगेच वाचावं असं वाटत नव्हतं. डोळा लागेल म्हणून वाट पाहत होतो. तेवढ्यात बायकोनं हाक मारून बाहेर बोलावलं. ''झी स्माईल'वर चांगला सिनेमा लागलाय. बघा! आवडेल तुम्हाला,' असं म्हणाली ती.

कुरकुरत, कंटाळा करतच उठलो. टीव्ही.समोर जाऊन बसलो. एकदा बसल्यावर उठवेना. सुरुवात थोडी चुकली होती. पण त्यानं फार काही बिघडलं नाही. पूर्ण सिनेमा पाहिला. फार दिवसांनी अगदी मन लावून. छान वाटलं.

'साज' होता तो. सई परांजपे यांचा. का बुवा आवडला हा सिनेमा एवढा? समीक्षकाच्या थाटात नाही स्पष्ट करता येणार ते. कुणी लिही म्हटलं, तर नाही लिहिता येणार त्यावर. पण त्यानं प्रसन्न अनुभव दिला. रजा त्या दिवशी सत्कारणी लागली, हे नक्की. एकदम साधा, सोपा आणि सुटसुटीत सिनेमा. त्यात चढ-उतार होते. सुख-दुःखं होतीच होती. पण त्या साऱ्याला एक लय आहे. एकदम टोकाचं असं काहीच नाही. सवंग, उथळ असं काही नाही. सर्वसामान्य माणसांसारखीच माणसं. तसेच राग-लोभ. प्रेमाची भावना. त्याग इत्यादी...

संगीतिका म्हणता येईल का 'साज'ला? नऊ-दहा गाणी आहेत त्यात; आणि ती किती छान! त्यातलं वैविध्यही केवढं! सुरेश वाडकरांचं एक गाणं तर थेट मन्ना डे यांची आठवण करून देत राहिलं. किती मोकळेपणानं गायिले आहेत सारे. भूपेन हजारिका, यशवंत देव, राजकमल आणि झाकीर हुसेन. असे चार-चार संगीतकार. आणि कुणीही कुणावर मात करताना दिसत नाही. लक्षात राहतात ते सूर आणि स्वर. सगळंच मनमोकळं, दिलखुलास असं.

चित्रपट पाहताना सारखी ही त्या दोन (प्रसिद्ध) बहिणींची कथा वाटत राहिली. विशेषतः बन्सीचं लग्न होतं तेव्हा आणि १५ ऑगस्टच्या गाण्याची कथा. (हे गाणंही आणखी एका प्रसिद्ध संगीतकाराची आठवण करून देतं.) आणि आणखी एका प्रसंगात पुन्हा त्याच दोघींची आठवण. तो तरुण देसाई आणखी एका प्रसिद्ध संगीतकाराची आठवण करून देतो. आपल्यापेक्षा वयानं मोठ्या गायिकेच्या प्रेमात पडलेला, नंतर तिच्याशी लग्न केलेला. या सिनेमात मात्र त्याचं काही बन्सीशी लग्न होत नाही.

बन्सीचा नवरा मारकुटा, बायकोच्या पैशावर जगू पाहणारा...पुन्हा एकदा त्या धाकट्या बहिणीच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देणारं. त्या दोन बहिणींची वेषभूषा, मानसीची एक वेणी, त्यात अडकविलेलं एक फूल, कोपरापर्यंतचं पोलकं... हे सगळं काही त्यांची आठवण करून देणारं आहे. पण तरीही दिग्दर्शक या नात्यानं सई परांजपे यांनी ते तद्दन फिल्मी होऊ दिलं नाही. त्याबद्दल त्यांना सलाम.


सगळ्याच कलावंतांनी आपल्या भूमिका फार मस्त केल्या आहेत. त्याचं श्रेय त्यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक बाईंनाही दिलं पाहिजे. एक दिलखूश संगीतकार म्हणून झाकीर हुसेनना पाहताना मजा वाटली. ते ज्यासाठी जगद्विख्यात आहेत, त्या त्यांच्या तबलावादनाचा एका दृश्यात मस्त उपयोग केलेला दिसतो. म्हणजे पाहणारेही खूश आणि आपली मूळ भूमिका मिळाल्याने तेही 'वाह उस्ताद!' म्हणाले असणार. अरुणा इराणी एकदम गृहिणी वाटतात. त्यागमूर्ती मोठी बहीण त्यांनी खरी वाटावी, अशी रंगवली आहे.

परदेशातील चित्रिकरणासाठी सेशेल्सची निवड केलेली आहे. हा खास सई परांजपे टच. तिथल्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी सभागृहात पळताना दिसणारा एक मुलगा मात्र अगदी भारतीयच वाटतो. डॉक्टर सामंतांना बन्सी तिथून पत्र लिहिते, त्यात दीड हजार श्रोत्यांचा उल्लेख आहे. पण सभागृहात तेवढी गर्दी वाटत नाही.

खरं तर हा चित्रपट फार जुना नाही. सतरा-अठरा वर्षांपूर्वीचा. तरीही तो नजरेतून कसा काय हुकला, हे लक्षातच येत नाही. म्हणजे मी सिनेमे फारसे बघत नाहीच. पण किमान काय आलंय, कसं चाललंय हे परीक्षणं वगैरे वाचून कळतंच. पण का कुणास ठाऊक, 'साज'बाबत असं झालंच नाही.

त्या दिवशी काय वाटलं कुणास ठाऊक. सिनेमा संपल्यानंतर पाचच मिनिटांत हे असं सगळं लिहिलं आणि सई परांजपे यांना इ-मेल पाठवून दिली. 'लोकसत्ता'मध्ये त्यांचं 'सय' सदर चालू होतं, तेव्हा ते आवडत असल्याचं कळवायचं राहूनच गेलं. तेही मग या इ-मेलमध्ये लिहिलं. इथं लिहिलं तसंच त्या इ-मेलमध्ये त्या दोन गायिकांचं नाव काही घेतलं नव्हतं. त्यांना एक प्रश्नही विचारला होता - 
'कुहूच्या पहिल्या गाण्यानंतर झालेल्या पार्टीतील दृश्यामध्ये तुम्ही स्वतः आहात का हो? पांढऱ्या फ्रॉकमधील एक प्रौढ महिला त्यात दिसते. त्या तुम्हीच आहात, असं मला वाटून गेलं.'

या प्रश्नाचं आणि अन्य अनेक प्रश्नांची उत्तरं मला काल-परवा मिळाली. त्या पार्टीच्या दृश्यात असलेली ती महिला म्हणजे सई परांजपे नसून यांची कन्या विनी आहे. तिचा उल्लेख 'प्रौढ महिला' असा केल्याने सई परांजपे यांना माझ्या दृष्टीबद्दल शंका आली नसली तरच नवल.

तर ही सगळी माहिती इंटरनेटवरून मिळाली. आणि अजून बऱ्याच गोष्टी समजल्या. 'साज'ची गणना सरसकट समांतर चित्रपटात करण्यात आली आहे. ज्यांची नावं लिहायला मी घाबरत होतो, त्या लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या नावाचा थेट उल्लेख चित्रपट झळकला त्याच वर्षी म्हणजे 
१९९७-९८मध्येच झाला होता. त्यावर आशा भोसले यांची प्रतिक्रियाही कुठं तरी आली होती. ही कथा लता आणि आशा यांचीच आहे, यावर बहुतेक सगळ्यांचं एकमत आहे. आणि मी मात्र काहीच माहिती नसल्यामुळं भोटपणे आडवळणं घेत होतो. ते वाचून सई परांजपे यांना केवढी मजा वाटली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.

सई परांजपे सध्या पुस्तकाच्या कामात गुंतल्या आहेत. 'सय'चं पुस्तक तयार होतंय आणि त्याची सगळी लगीनघाई उडालीय, असं त्यांनीच माझ्या इ-मेलल्या दिलेल्या छोट्या उत्तरात म्हटलं आहे. हे पुस्तक लवकरात लवकर पूर्ण व्हावं, असं मला वाटतंय. त्याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे ते सगळं एकत्रित वाचायचंय. आणि दुसरं म्हणजे त्या कामातून सई परांजपे मोकळ्या झाल्या म्हणजे मला लिहिणार आहेत. कारण उत्तरादाखल दिलेल्या इ-मेलमध्ये त्यांनी लिहिलं आहे -

Will reply to your v interesting take on Saaz when I get a little time.
Best,
Sai Paranjpye
...............


(छायाचित्र http://parallelcinema.blogspot.in यांच्या सौजन्याने)

1 टिप्पणी:

  1. वाचत होतो, तेव्हा हा सिनेमा आपल्याकडून कसा हुकला ते आठवत राहिलो. हा कधी आला आणि कधी गेला ते कळले नाही. त्या (सई परांजपे) जेव्हा नसिरुद्दीनला घेऊन `कथा` किंवा धर्मेंद्रला घेऊन कोणता तरी सिनेमा करत होत्या, तेव्हा `केसरी`त आल्या होत्या. माझ्याकडे तेव्हाचा फोटो आहे. असो! लेख आवडला. तेव्हाच्या माझ्या आवड विश्वात तो घेऊन गेला.
    - अरविंद व्यं. गोखले (पुणे)

    उत्तर द्याहटवा

आजोबा सांगतात, ‘ॲक्ट पॉझिटिव्ह’

  डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू ...