शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी नाही. बरंच काही निकाली निघत आहे, ह्या स्वच्छता मोहिमेत. ‘मोह मोह के पन्ने...’ एक तर रद्दीत जात आहेत किंवा फाडून कचऱ्याच्या डब्यात.

बरेच अंक, वर्तमानपत्रांची पानं, कातरणं जपून ठेवलेली. काही नियतकालिकांचे पहिले अंक. काहींचे शेवटचे अंक. त्याच बरोबर काही डायऱ्या आणि कार्यक्रमांच्या नोंदवह्या. ह्या नोंदवह्या फेकून देण्याचं धाडस ह्या वेळीही झालं नाही. त्यात बरंच काही काही आढळतंय. त्यातून नव्याने लिहिण्यासारखंही बरंच आढळलं. पण ते नंतर...

ह्या सगळ्या आवराआवरीत मदत करायला एकाला बोलावलेलं. त्याच्या मुली शाळेत शिकतात. कोऱ्या डायऱ्या, एखाद-दुसरंच पान खरडलेल्या वह्या त्याच्या मुलींसाठी आवर्जून देतोय. पुस्तकं झटकून परत ठेवली जात आहेत. पुन्हा कधी तरी उघडली जातील, ह्या आशेनं.

पुस्तकांचा एक भला मोठा गठ्ठा समोर आला. त्यात ‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ - १० पुस्तकं. ‘त्याच्या मुलींना देऊन टाका वाचायला...’ असं बायको म्हणाली. आणि एका तिरप्या (पण भोळ्या नव्हे!) कटाक्षाची मानकरी ठरली.

जुनी डायरी सापडली
पुस्तकांवरची धूळ झटकून ठेवताना एक डायरी हातात आली. खूप जुनी. पण अगदी नव्यासारखी. कारण ती फारशी वापरलेलीच नाही. जाड आवरण. आतला कागद स्वच्छ पांढरा. ती रद्दीत कशाला द्यायची?

त्या मुलींसाठी म्हणून डायरी देत होतो. पुन्हा एकदा चाळताना दोन-चार पानांवर काही तरी लिहिलेलं दिसलं. म्हणून आवर्जून परत पाहिली.

दोन पानांवर इंग्रजीत तीन पत्ते लिहिलेले दिसले. प्रत्येक पत्ता वेगळ्या अक्षरात लिहिलेला. ही धावती लिपी माझी नक्कीच नाही. पाहिलं, लक्षात आलं आणि साडेतीन दशकं मागे गेलो.

क्रिकेटपटूंनी लिहून दिलेले पत्ते
त्यातले दोन पत्ते पंजाबातील आहेत आणि एक दिल्लीचा. पंजाबमधील पत्तेही दोन वेगळ्या शहरांचे - जालंदर आणि पतियाळा (पटियाला). हे त्या काळातील बऱ्यापैकी प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी लिहून दिलेले पत्ते आहेत. त्यातले दोघे भारताकडून खेळलेले.

आपापल्या घरचा व्यवस्थित पत्ता लिहून देणारे हे क्रिकेटपटू म्हणजे गुरुशरण सिंग, राजिंदरसिंग घई आणि महेशइंदरसिंग (सोढी). त्यांनी त्या डायरीत लिहून दिल्यानंतर बहुदा काल-परवा पहिल्यांदाच ती पानं पाहिली गेली असावीत. त्यांच्याशी कधी पत्रव्यवहार केला नाही. त्यांच्या शहरातही जाणं झालं नाही.

ते अक्षर, ते पत्ते पाहताच सगळं काही लख्ख आठवलं. सन १९८७च्या डिसेंबरमधील ते लेखन आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कर्णधार विव्हियन रिचर्ड्स. त्या काळात पाहुण्या संघाला सरावासाठी सामने खेळायला मिळायचे. एखादा सामना रणजी विजेत्या संघाबरोबर असे. काही सामने पूर्व, पश्चिम, मध्य, उत्तर, दक्षिण विभागाच्या संघाशी असत.

पाहुण्यांचा उत्तर विभागाविरुद्धचा तीन दिवसांचा सामना पुण्यात होता. नेहरू स्टेडियममध्ये. त्या वेळी मी ‘क्रीडांगण’मध्ये काम करत होतो. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना साक्षात खेळताना पाहायला मिळणार होतं. क्रिकेटचं वेड आणि अफाट माहिती असलेला गंगाप्रसाद सोवनी हौस म्हणून कार्यालयात नेहमी यायचा.

अंकाचं काम थोडं अगोदर आटोपून मी आणि गंगाप्रसाद तिन्ही दिवस सामना पाहायला गेलो. उत्तर विभागाचं नेतृत्व मोहिंदर अमरनाथ करीत होता. काही करून त्याला भेटायचं आम्ही ठरवलं. सेलिब्रिटी म्हणावा असा एकटाच तो. पाहुण्यांचा संघ तेव्हा पुण्यातल्या एकमेव तारांकित ‘ब्लू डायमंड’मध्ये उतरलेला. उत्तर विभागाची सोय ‘हॉटेल अजित’मध्ये केलेली.

मोहिंदरचा स्वच्छ नकार
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर आम्ही दोघं ‘अजित’वर धडकलो. खालीच मोहिंदर अमरनाथ दिसला. आम्ही दोघांनी गप्पा मारण्यासाठी वेळ द्यायची विनंती केली. मी जेमतेम तेविशीचा आणि गंगाप्रसाद विशीतलाच. एकूण अवतार बघून आमच्यावर वेळ खर्च करणं मोहिंदरला मान्य नसावं. त्यानं अगदी थोडक्यात आणि सौम्यपणे नकार दिला.

शिकाऊ होतो तरी ‘पत्रकार’ असल्याची नशा दोघांनाही होती. अल्पपगारी मी आणि बिनपगारी तो. पण पूर्ण अधिकारी! सरळ मोहिंदरच्या खोलीचं दार वाजवलं. पुन्हा आमचे चेहरे बघून तो चिडला. अधिकच लालबुंद झाला. ‘एकदा नाही म्हणून सांगितलं ना...’ असं काही तरी इंग्रजीत बोलत त्यानं दार धाडकन बंद केलं.

हिरमसून खाली आलो. पाहिलं तर उत्तर विभागाचे तीन खेळाडू निवांत गप्पा मारत बसले होते. मोहिंदरकडून अपमान(!) होऊनही आम्ही निगरगट्टपणे त्यांच्याशी बोलायला गेलो. ते होते मधल्या फळीतला शैलीदार फलंदाज गुरुशरण (पंजाबीत गुरशरण) सिंग, मध्यमगती गोलंदाज राजिंदरसिंग घई आणि फिरकी गोलंदाज महेशइंदरसिंग.

तीन सरदारजी
त्या तीन सरदारजींना काय वाटलं कोणास ठाऊक, पण त्यांनी आम्हाला पत्रकाराचा मान दिला. अर्धा तास आम्ही गप्पा मारत बसलो. इकडच्या तिकडच्या. खरं तर पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीन फलंदाजांनी - गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स आणि रिची रिचर्ड्सन - उत्तर विभागाच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली होती. ‘नेहरू स्टेडियमची खेळपट्टी अशीच पाटा आहे,’ असं (ऐकीव) सांगून आम्ही घई आणि महेशइंदर ह्यांची समजूत घातली. 😀

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा हॉटेलात. त्या तिघांनी आम्ही मित्र असल्यासारखंच स्वागत केलं. आठवतंय की, घईनं खायला ‘पनीर पकौडे’ मागवले होते. पुण्यातही पंजाबी आतिथ्याला जागत त्यानं आम्हाला खायचा आग्रह केला. तेव्हा पनीर वगैरे काही माहीत नव्हतं. ‘हे शाकाहारी आहे ना?’, असं विचारून त्यातल्या एका पकौड्याची चव घेतली.


घई तोपर्यंत भारताकडून सहा एक दिवशीय सामने खेळला होता. कारकिर्दीतला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना तो खेळून चुकला होता. पण तेव्हा ते त्यालाही माहीत नव्हतं आणि आम्हालाही. पुन्हा संघात येण्याचं स्वप्न तो पाहत होता.

पहिल्या डावात सव्वाशेहून अधिक धावा मोजून एकही बळी न मिळालेला घई पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावाचा विचार करीत होता. कोणत्या बाजूने गोलंदाजी केली तर फायदेशीर ठरेल, खेळपट्टी तिसऱ्या दिवशी कशी राहील, असे प्रश्न तो आम्हाला विचारत होता. आम्ही त्याबाबत ठार अज्ञ! तरी गंगाप्रसाद काही काही सांगत राहिला. दुसऱ्या डावात त्याला नक्की यश मिळेल, असा दिलासा आम्ही दिला.

त्या तीन दिवसांच्या सामन्यात दुसऱ्यांदा गोलंदाजी करण्याची संधी काही घईला मिळाली नाही. तीन दिवसांत मिळून फक्त १३ फलंदाज बाद झाले. हा मध्यम उंचीचा आणि सडपातळ चणीचा मध्यमगती गोलंदाज कसा काय, हा प्रश्न तेव्हा पडला. माझ्याहून जेमतेम एखादा-दीड इंच उंच असावा तो.

कुलकर्णी आणि राजू!
राजू कुलकर्णी की राजू घई, अशी स्पर्धा तेव्हा होती. आडनाव ऐकून राजूशी माझं काही नातं आहे का, माझी नि त्याची ओळख आहे का, असंही घईनं विचारलं होतं.

‘कपिलदेव आणि श्रीनाथ ह्यांच्यापेक्षा घई वेगवान होता,’ असं काही तरी विधान मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धू ह्यानं केलं होतं. स्वाभाविकच तो ट्रोल झाला! घईलाही ते काही पटलं नसणार.


गुरुशरण बहुतेक फलंदाजीला यायचा होता. तिसऱ्या दिवशी किती वेळ खेळायला मिळेल, ह्याची चिंता त्याला होती. तोही तसाच दिसणारा. फारसा उंच नाही आणि धिप्पाडही नाही. मधल्या फळीतला फलंदाज म्हणून त्यानं ठसा उमटवलेला. भारतीय संघातून खेळण्याचं स्वप्न पाहत होता तो. ते पुढे चार वर्षांनी साकार झालं.

एक कसोटी आणि एक दिवसाचा एकच सामना गुरुशरणच्या वाट्याला आला. उत्तर विभाग, दिल्ली आणि नंतर पंजाबकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळलेल्या त्याच्या वाट्याला तेवढंच आलं. पुढे दिल्लीऐवजी पंजाबकडून खेळताना त्यानं संघाला रणजी करडंक विजेतेपद मिळवून दिलं.

धिप्पाड आणि रुबाबदार
ह्या तिघांमध्ये ‘सरदार’ वाटावा असा महेशइंदरसिंग एकटाच. धिप्पाड, रुबाबदार आणि हसतमुख. त्यानं दिलखुलासपणे हातात हात मिळवला, तेव्हा जाणवला त्याचा पंजा. भला मोठा. माझे दोन्ही हात मावतील एवढा रुंद, दांडगा. चेंडू वळवून बोटांना घट्टे पडलेले.


हा ऑफ स्पिनर काही भारताकडून खेळायचं स्वप्न पाहत नसावा. त्या सामन्यात पावणेदोनशे धावांचं मोल मोजून त्यानं ग्रीनिज आणि फिल सिमन्स हे बळी मिळवले होते. त्याच्या एकट्याच्याच बोलण्यात क्रिकेट सोडून इतर सटरफटर विषय होते. महेशइंदर ह्यानं न पाहिलेलं स्वप्न त्याचा मुलगा रीतिंदरसिंग सोढी ह्यानं पूर्ण केलं.

दुसऱ्या दिवशी गप्पा संपवून निघताना कसं कोणास ठाऊक पण त्या तिघांनीही माझ्या डायरीत आपापल्या घरचे पत्ते लिहून दिले. बहुतेक आगावूपणे मीच मागितले असावेत. त्या सामन्याचा वृत्तान्त असलेला अंक पाठवून देण्याचं आश्वासनही दिलं असेल कदाचित.

हे लिहिण्यासाठी म्हणून ह्या तिन्ही सरदार खेळाडूंची माहिती इंटरनेटवर शोधली. त्यांची चांगली छायाचित्रंही मिळत नाहीत. महेशइंदरसिंगचं तर छायाचित्र नावालाही दिसत नाही.

ह्या सामन्याच्या निमित्तानं बऱ्याच गमतीजमती आम्ही अनुभवल्या. तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना उपाहाराच्या थोडं आधी विव्ह रिचर्ड्स थेट पत्रकार कक्षात आला. तो त्या सामन्यात खेळत नव्हता. रॉजर हार्पर संघाचं नेतृत्व करीत होता.

साक्षात रिचर्ड्सला पाहून सगळेच पत्रकार धास्तावले. तो आला आणि थेट आमच्या जवळ बसला. ‘स्पोर्ट्सस्टार’चे आर. मोहनही त्याच्यापासून चार हात लांबच राहिले. एका कोणी तरी ज्येष्ठ पत्रकारानं ‘त्याच्याशी उगीच बोलायला जाऊ नका हं’ असं कानात कुजबुजत सावधही केलं होतं.

रिचर्ड्सशी संवाद
गंगाप्रसाद फार धीट. त्यानं रिचर्ड्सशी संवाद साधायला सुरुवात केली. मग मीही. आम्ही अंकात वाचकांसाठी स्पर्धा आयोजित करीत होतो. त्यात १९७८-७९मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील चार खेळाडूंचे फोटो होते. प्रश्न अर्थातच होता - ‘ओळखा पाहू हे कोण?’ रिचर्ड्सच्या हाती अंक दिल्यावर त्यानं तो चाळला. ते खेळाडू कोण, हेही सांगितलं. त्याचे ते कॅरेबियन शैलीतले उच्चार कळायला अवघडच होतं. सुपाएवढे कान करून आम्ही त्याला ऐकत राहिलो.

एखाद्या वाघानं रुबाबात गुहेतून बाहेर यावं, त्याच्या नुसत्या दर्शनानंच जंगल चिडीचूप व्हावं. काही न करता त्यानं इकडे तिकडे रेंगाळावं आणि डरकाळीही न फोडता गुहेत परत जावं... अगदी तसंच. पाच-सात मिनिटं बसून रिचर्ड्स पुन्हा पॅव्हिलियनकडं परतला. तो दृष्टीआड होताच ‘काय म्हणत होता, काय म्हणत होता?’ असं विचारत बऱ्याच पत्रकारांनी आम्हा दोघांभोवती कोंडाळं केलं!

त्या वेळी पत्रकार कक्षात कोणीही छायाचित्रकार नव्हता. तसं कोणी असणंही अपेक्षित नव्हतं. त्यामुळे रिचर्ड्स आणि आम्ही दोघं, असा काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाला नाही. आठवण मात्र तेव्हाच जेरबंद झालेली.

पिल्लेचा रडका चाहता
दिल्लीकडून खेळणारा के. भास्कर पिल्लाई (किंवा पिल्ले) त्या वेळी भलत्याच फॉर्मात होता. रणजी स्पर्धेत धावांचा रतीब घालूनही भारतीय संघाचं दार काही त्याच्यासाठी उघडलं नाही. त्याचा एक चाहता दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हॉटेलवर आला होता. पिल्ले त्या सामन्यात १२ धावा करूनच बाद झाला.

मोक्याच्या सामन्यात आपला लाडका पिल्ले अपयशी ठरल्याचं अनावर दुःख चाहत्याला झालं. ‘तुम्हे कब चान्स मिलेगा?’, असं विचारत तो रडायलाच लागला. त्यामुळं पिल्लेच बिचारा कानकोंडा झाला. ह्या चाहत्याची समजूत काढता काढता त्याची पुरेवाट झाली.

नेहरू स्टेडियमवरच्या त्या सामन्यात काही शिकावू पंच व्यवस्था पाहायला होते. त्यातल्याच कोणी तरी डेसमंड हेन्स ह्याला भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा खाऊ घातल्या. त्याला त्या इतक्या आवडल्या की, दुसऱ्या दिवशी खेळ संपल्यावर त्यानं थेट पाच किलो शेंगा मागवल्या. त्या घेऊन तो ‘ब्लू डायमंड’कडे रवाना झाला.

तो सामना संपला. रटाळ झाला. त्यानंतर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात नरेंद्र हिरवाणी ह्यानं कमाल केली. दोन्ही डावांत मिळून त्यानं १६ गडी बाद केले. स्वाभाविकच ‘क्रीडांगण’च्या मुखपृष्ठावर तो झळकला. मी तयार केलेला तो शेवटचा अंक. आणि बहुतेक ‘क्रीडांगण’चाही!

...किती तरी वर्षं न उघडलेली, पुस्तकांच्या ढिगाऱ्यात लपून राहिलेली डायरी अशी अचानक हाती आली. बऱ्याच आठवणींचा खजिनाच तिनं उघडून दिला.
....
#डायरीतील_पाने #क्रिकेट #गुरुशरणसिंग #राजिंदर_घई #महेशइंदर_सिंग #विव्हियन_रिचर्ड्स #वेस्ट_इंडिज #नेहरू_स्टेडियम #गॉर्डन_ग्रीनिज #डेसमंड_हेन्स #पत्ता #मोहिंदर_अमरनाथ

२९ टिप्पण्या:

  1. तुमच्या 'खिडकी'तून डोकावून पाहिलं की खूप काही नवीन दिसतं. 'डायरीची चाळता पाने' तून हा खजिना सापडल्यावर ते बघून तुम्हाला जो आनंद झाला, तो तुमच्या लेखनातूनही डोकावला. या आठवणी तुमच्य वैयक्तिक जरी असल्या तरी त्या वाचायला आवडतात.

    उत्तर द्याहटवा
  2. वा..👌 काही आठवणी खूप छान असतात..!

    उत्तर द्याहटवा
  3. साधी सोपी परंतु मनाला भावनारी लेखणी तुमची.

    खिडकीतला कवडसा हिवाळ्यात उबदार भासतो, उन्हाळ्यात थंडावा देतो आणि पावसाळ्यात नको नको म्हणत भिजवताना देखील हवाहवासा भासतो असे काही तुमची लेखनखिडकी उघडताना होते खरे.

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच छान लेख . लेखनाची शैली खूप सुंदर आहे. वाचता वाचता मलाही त्या आठवणींमध्ये रमता आले. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  5. मस्लत लिहिलयस. गुरूवर्य चांगला फलंदाज होता . फिरकीवर टॉप खेळायचा . निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा लाडका होता . दिल्लीत मी त्याला अनेकदा भेटलो होतो. त्याला पप्पी म्हणायचे. पुण्यात आला की माझ्याघरी यायचा . नंतर ज्यूनिअर क्रिकेट निवड समितीत होता तेव्हा महाराष्ट्रातही खूप सामने बघायला यायचा . वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजी समोर तो उभा राहू शकला नाही.मग तो क्रिकेटमधून बाहेर फेकला गेला .

    उत्तर द्याहटवा
  6. सुखद आठवणींचं छान शब्दांकन. 👌🏼👌🏼👍🏻👍🏻
    - जगदीश निलाखे,. सोलापूर

    उत्तर द्याहटवा
  7. अतिशय सुंदर लेख. खूप आठवण्याचा प्रयत्न केला पण महेश इदरसिग नाही आठवत बाकी दोघे सरदार माहीत होते. तुझ्या लेखामुळे एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या व असे वाटले की जो भुली दास्ता लो फिर याद आ गई...
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    - विकास पटवर्धन, नगर

    उत्तर द्याहटवा
  8. जवळजवळ ३८ वर्षांनी एवढं लख्ख आठवलं... कमाल आहे...
    सुंदर आठवणी....👌
    - अनिल कोकीळ, पुणे

    उत्तर द्याहटवा
  9. फारच सुंदर आठवणी. 🙂
    - हृषीकेश जोशी

    उत्तर द्याहटवा
  10. सुरेख!
    - पंकज कुरुलकर, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  11. खूप छान लिहिले आहे तुम्ही. असेच लिहित रहा; पुढे त्याचे काय होईल याचा विचार करू नका! (तुम्हाला नक्कीच आनंद मिळणार आहे आणि तुमच्याबरोबर आम्हाला!)

    नवीन लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏
    - प्रल्हाद जाधव, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  12. मस्त, छान अनुभव लिहिलास. 👌👍
    - प्रशांत देशमुख, पुणे

    उत्तर द्याहटवा
  13. सर, खरंच जुन्या आठवणीतले, त्यातल्या त्यात क्रिकेटच्या कागदपत्री आठवणी असेल तर असे होते फेकून देऊ का नको, काय करायचे संभाळून परत माणूस म्हणतो नको राव राहुन दे म्हणून परत आपल्या आठवणीत ठेवून देतो.

    जुन्या पत्रकारितेमधील खूपच छान आठवणी. विव्हियन आला एखाद्या वाघाने रुबाबात गुहेतून बाहेर यावे .त्याच्या दर्शनाने जंगल चिडीचुप व्हावे , काहीच न करतात ईकडे तिकडे रेंगाळावे तथा गुहेत निघुन जाणे हे वाक्ये अगदी भारीच . हेन्स पाच किलो भुईमूग शेंगा मागवल्या.. 😃
    👍👌👌
    - अजय कविटकर, नगर

    उत्तर द्याहटवा
  14. आवडलं.
    मस्त लिहिलंय.
    हे कोणी मला आठवत नाहीयेत,पण टिपिकल सरदारजी.
    रांगडे,पण मोकळ्या स्वभावाचे.
    पुरुषांनी सहज बोलायला जायला हरकत नाहीच.
    मजा वाटली.
    खरे वेस्ट इंडीजचे खेळाडू पण दिलदार म्हणूनच प्रसिद्ध. पण चाहते फारच वैताग आणत असणार.
    - प्रा. लीना पाटणकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  15. खूप छान interesting आहेत आठवणी! सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं! तुमच्या लेखणीची ताकद!! 👍
    - सविता काळे, नगर

    उत्तर द्याहटवा
  16. क्रिकेटमधलं फारसं काही समजत नाही मला. पण तुमच्या लेखनाच्या पार्श्वभूमीवर जे जुनं पुणं दिसत राहतं,जाणवत राहतं त्यामुळे मॅचेस चालू असताना नेहरू स्टेडियम जवळच्या वातावरणाची आठवण झाली.

    डायरीत नोंदी करण्याचं महत्व आणि त्यातली मजा आजच्या पिढीला कळणार नाही कधी. एखादंच वाक्य,त्रोटक नोंदी सुध्दा आपल्याला जुन्या काळात घेऊन जातात.

    तुमच्या पत्रकार-जीवनातल्या सुरुवातीच्या काळात मोठ्या खेळाडूंबरोबर झालेल्या भेटीचे वर्णन खूप छान वाटले.

    आमच्या सदाशिव पेठेतल्या वाड्यात पुरुषोत्तम पांडव नावाचे एक रणजी प्लेअर राहत असत. त्यामुळे लहानपणी क्रिकेटविषयक चर्चा कानावर पडायच्या.
    - विद्या सहस्रबुद्धे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  17. फारच सुंदर. जो काळ खूप दूरवर निघून गेला त्या काळातील हे क्षण म्हणजे अवचित गवसणारे मोती ! आठवणी तुमच्या पण वाचताना मी तिथे आहे असे वाटले कारण तुमचे ओघवते लेखन. खूप आनंद झाला वाचून. लिहिते रहा.

    उत्तर द्याहटवा
  18. खरोखरच हा अनुभव म्हणजे 'स्मृतींची चाळता पाने' आहे. जुन्या वस्तू आवरताना काहीतरी नवं त्यात मिळतं! जुन्या स्मृतींना उजाळा मिळतो. हे सगळं वाचायला मजा आली.

    उत्तर द्याहटवा
  19. खिडकी म्हणजे एक प्रकारे आजीबाईचा बटवा. हा बटवा म्हणजे ज्ञानाचा आणि अनुभवाचा खजिना. हा बटवा आपणास लिहतं करतो आणि बटव्यातील ज्ञान आणि अनुभव लेखणीला धार चढवतात जायोगे एक सुंदर लेख तयार होतो.

    धन्यवाद.

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहिल्यानगर.

    उत्तर द्याहटवा
  20. अशाच सगळ्या पानात आठवणी दडलेल्या असतील. त्याही लिहा. मजा येतेय वाचायला.

    सुप्रिया

    उत्तर द्याहटवा
  21. जुन्या आठवणी...👍👍👍छान.
    - डॉ. वसु भारद्वाज

    उत्तर द्याहटवा
  22. छंद जोपासण्यासाठी चा संघर्ष छान व्यक्त केला आहे
    ......

    उत्तर द्याहटवा
  23. क्रिकेट मधे खूप सारा इंटरेस्ट नसून सुध्दा पूर्ण लेख वाचला कारण सहज सुंदर ओघवती भाषा!!!!!!!!
    स्वाती लोंढे

    उत्तर द्याहटवा
  24. 'खिडकी'तून आलेले हे हवे हवेसे किरण छान ऊब देऊन गेलेत. धन्यवाद

    तुमची तल्लख स्मरणशक्ती बघून कौतुक वाटले...किती बारीक सारीक गोष्टींची नोंद ठेवता तुम्ही. हाडाचे पत्रकार आहात!

    नेहरू स्टेडियमची खेळपट्टी अशीच पाटा आहे, पनीर वगैरे काय हे माहीत नव्हतं ...हे क्रिकेट या खेळ आणि खेळाडूंबद्दल सांगत असताना खुसखुशीत शेवेसारखी लहान वाक्ये हसवून जातात.

    माझ्या नणंदेला हा लेख फॉरवर्ड करीत आहे. त्यांना आवडेल असे वाटते. वासू परांजपे यांच्या सुविद्य पत्नी असल्याने या खेळात रुची आहे त्यांना.
    - स्वाती वर्तक

    उत्तर द्याहटवा
  25. खूपच मस्त आठवण.
    जिंदगी के सफर में गुजर जाते है
    जो मुकाम वो फिर नही आते
    या गाण्याची आठवण आली. आयुष्यात आलेले क्षण निघून जातात, पण ठसे कुठे तरी शिल्लक राहतात. हे स्मरणरंजन (nostalgia) छान असते. आपण अशा व्यवसायापासून दूर होतो, तेव्हा तरुणपणच्या या आठवणी अधिक गोड वाटतात. पनीरचा किस्साही भन्नाट. आपल्या मराठी मध्यमवर्गीयांना पनीर, चीज, ब्रोकोली, बेबी कॉर्न, किवी, अवाकाडो, ड्रॅगन फ्रुट, टँगरिन हे प्रकार आणि नावं खूप उशीरा माहीत होतात.😃

    उत्तर द्याहटवा
  26. खूपच मस्त आठवण.
    जिंदगी के सफर में गुजर जाते है
    जो मुकाम वो फिर नही आते
    या गाण्याची आठवण आली. आयुष्यात आलेले क्षण निघून जातात, पण ठसे कुठे तरी शिल्लक राहतात. हे स्मरणरंजन (nostalgia) छान असते. आपण अशा व्यवसायापासून दूर होतो, तेव्हा तरुणपणच्या या आठवणी अधिक गोड वाटतात. पनीरचा किस्साही भन्नाट. आपल्या मराठी मध्यमवर्गीयांना पनीर, चीज, ब्रोकोली, बेबी कॉर्न, किवी, अवाकाडो, ड्रॅगन फ्रुट, टँगरिन हे प्रकार आणि नावं खूप उशीरा माहीत होतात.😃
    उत्तर द्या. संजीव साबडे

    उत्तर द्याहटवा
  27. डायरीतल्या तीन छोट्या नोंदी! त्यांनी आठवणींच्या किती खिडक्या उघडल्या! तुम्हालाच नाही तर आम्हालाही त्या खिडक्यांबाहेरच्या नजाऱ्याने खुश केलं. अशाच आठशे खिडक्या नऊशे दारं तुमच्यासाठी उघडत राहोत 🙏

    उत्तर द्याहटवा

डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी ना...