Wednesday 23 August 2017

अथर्वची अडचण

नांदेडला झालेल्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अभिनेत्री काजोल आमंत्रित होती. तिला मग दोन शब्द’ बोलण्याची विनंती झाली. तिच्या मराठीपणाचा आणि मराठी कुळाचा अभिमानाने उल्लेख करण्यात आला.

काजोल बोलायला उठली आणि मराठीत बोलताना गडबडू लागली. तिनं त्याच गडबडीत अक्षरशः दोन शब्द संपवले. तिला सावरून घेताना लफ्फेदार साडीतील सूत्रसंचालिका तेव्हा म्हणाली होती
, ‘काजोलचा की नैमराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे!

नेमका हाच प्रॉब्लेम आमच्या अथर्वचा होता. फक्त भाषा बदलती. त्याला इंग्रजीची अडचण होती.

आईचा आग्रह असतानाही अथर्वच्या बाबांनी त्याला जाणीवपूर्वक मराठी शाळेत घातलं होतं. पहिलीपासून इंग्रजी असूनही अथर्वला त्यात गती नव्हती.
 रेन रेन गो अवे’ आणि हम्प्टी डम्प्टी’ याच्या पलीकडे त्याची इंग्रजीची गाडी पुढं सरकत नव्हती. एकदा तर त्यानं आईला लाज आणली. दुसरीतल्या अथर्वचं मैत्रिणींपुढं कौतुक करताना ती म्हणाली होती, ‘‘आमचा अथ्थू एका दमात ए टू झेड आणि वन टू हंड्रेड म्हणतो.’’ मग तिनं त्याच कौतुकभरल्या नजरेनं अथर्वला खुणावलं होतं. तिने सांगितल्याप्रमाणे त्यानं खरंच एका दमात ए टू झेड’ आणि वन टू हंड्रेड’ एवढे सहाच शब्द उच्चारले!

तर ते असो. यथावकाश अथर्व पुढच्या इयत्तेत जात राहिला. इंग्रजीत पासापुरते मार्क मिळवित राहिला. आता तो आठवीत गेला. आईनं त्याच्या बाबांचं काही न ऐकता त्याला हट्टानं सेमी-इंग्लिशच्या तुकडीत टाकलं. गणित-विज्ञान इंग्रजीतून शिकताना अथर्व बिचारा घायकुतीला आला.

तसा अथर्व चांगला मुलगा. आज्ञाधारकगृहपाठ नियमित पूर्ण करणाराकाही खेळात भाग घेणारास्नेहसंमेलनात छोट्या नाटुकल्या करणाराहिंदी गाण्यांवर सामूहिक नाचणारा... इंग्रजीच्या सरांना त्याची थोडी दया आली. यू इज द गुड टीचरर’ हे अथर्वचं इंग्रजी त्यांच्या पचनी पडत नव्हतं. त्याचं इंग्रजी सुधारायचंचअसा त्यांनी चंग बांधला. वाघिणीचं दूध त्याला पचवायला लावायचंचअसा निश्चय करून त्यांनी आठवड्यातले दोन तास त्यासाठी खास खर्च करायचं ठरवलं.

दोन-तीन आठवड्यानंतर अथर्वचं इंग्रजी आधीपेक्षा थोडं बरं झालंअसा सरांचा समज झाला. त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी वर्गात दाखवायचं ठरवलं. तास सुरू झाल्यावर त्यांनी अथर्वला एका कोपऱ्यात उभं केलं आणि स्वतः दुसऱ्या कोपऱ्यात उभे राहिले. सर म्हणाले, ‘‘अथर्वतू मला तुझ्याकडे बोलव पाहू...’’

अथर्वनं एकदा घसा खाकरला आणि म्हणाला, ‘‘सरप्लीज कम हिअर...’’

खूश झालेल्या सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांकडे अभिमानाने पाहिलं आणि अथर्वकडे जाऊन म्हणाले, ‘‘आता तू मला त्या कोपऱ्यात जायला सांग बघू...’’

अथर्व क्षणभर गोंधळला आणि लगेच तरातरा पलीकडच्या कोपऱ्यात गेला. तिथनं म्हणाला, ‘‘सरप्लीज कम हिअर!!’’

सरांची बोलतीच बंद झाली. त्यांनी मग खूप विचार केला. एके दिवशी ते अथर्वला म्हणाले, ‘‘अथ्थूतुझं इंग्रजी नक्कीच चांगलं होईल. त्यासाठी एक कर... तू स्वप्नंही इंग्रजीतच पाहत जा.’’

सरांच्या या सांगण्यावर अथर्वनं विचार केला. दोन दिवसांनंतर तो मधल्या सुटीत सरांना भेटला आणि म्हणाला, ‘‘सरतुम्ही म्हणता तसं झालं हं. मला काल इंग्रजीतनंच स्वप्न पडलं.’’

उत्तेजित झालेल्या सरांनी विचारलं, ‘‘वावा. काय स्वप्न पडलं?’’

‘‘मी एका मोठ्या सभागृहात उभा होतो सर. खूप लोक होते तिथं. सगळे जोरजोरात एकमेकांशी इंग्रजीत बोलत होतेइंग्रजीतच हसत होते,’’ अथर्वनं सांगितलं.

अरे वा!’, असं म्हणत सरांनी विचारलं, ‘‘काय बोलत होती ही सगळी मंडळी?’’

पडेल चेहऱ्यानं अथर्व म्हणाला, ‘‘आता ते मला कसं कळणार सरते सगळे तर इंग्रजीतच बोलत होते...’’

... त्याचंच तर टेन्शन!

विकासला गेल्या रविवारी तसा थोडा उशीरच झाला. ठरलेल्या हॉटेलात गेलाथोडं इकडं-तिकडं पाहिलं आणि एका कोपऱ्यात अजय दिसला. कुठे तरी शून्यात बघत असल्यासारखा. त्याला वाटलं आपली वाट बघून कंटाळलेला दिसतोय.

भरलेली टेबलं आणि बशा घेऊन फिरणाऱ्या वेटरना चुकवत विकास टेबलाजवळ गेला. तो खुर्चीत बसलातरी अजयचं लक्ष काही गेलं नाही. तो आपला भकास चेहऱ्यानं कुठं तरी नजर लावून बसलेला. चुटक्या वाजवत विकासनं त्याची तंद्री मोडली. ‘‘कसल्या विचारात आहेस रे बाबामी येऊन बसलोतरी तुझं लक्ष नाही...’’

अजयनं विकासकडं पाहिलंपण काही बोलला नाही. त्या ऐवजी त्यानं एक सुस्कारा टाकला. विकास चमकला. ‘‘काय झालं रेकसलं टेन्शन आहेएकदम गप्प गप्प..?’’

टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलून अजयनं एका दमात रिकामा केला. म्हणाला, ‘‘तसं म्हणशील तर टेन्शन नाही काही. पण आहे थोडंसं...’’

विकासच्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह ओळखून आणि ते तोंडातून बाहेर पडायच्या आधीच त्याला हातानं 'थांबथांबअसं खुणावत अजय बोलू लागला. ‘‘मागच्या वेळी आपण भेटलो नात्याच्या दोन-तीन दिवसांनंतरची गोष्ट. त्या दिवशी मी दांडी मारून घरीच पडलो होतो. दुपारच्या वेळी एक इंटरनॅशनल कुरीअरवाला आला. त्याच्याकडं माझ्या नावाचं मोठं पाकीट होतं. परदेशातून आलेलं. त्यानं आयडी प्रूफफोन नंबर अशी सगळी माहिती घेऊनदोन-तीन कागदांवर सह्या घेऊन ते पाकीट दिलं.’’

‘‘पाकीट उघडून बघितलंतर त्याच्या आत एक पाकीट. त्यात एक पत्र. आमच्या पिताश्रींचे एक लांबचे चुलत मावस मामेभाऊ होते. ते अगदी तरुणपणीच झांबियाला गेले आणि तिकडेच राहिले. मी त्यांना कधी पाहिलेलं नाही. बाबांनी दोन-तीन वेळा त्यांच्याबद्दल थोडं काही तरी सांगितलेलंतेवढंच,’’ अजय सांगत होता.

‘‘... तर त्या चुलतमावसमामे काकांचं पत्र होतं ते दोन पानी. ‘हे पत्र तुला मिळालंयाचा अर्थ मी आता या जगात नाही. तशी सूचना मी वकिलांना देऊनच ठेवली होती,’’ अशी सुरुवात केलेल्या त्या पत्रात बरंच काही काही होतं. पत्राला जोडूनच एक ड्राफ्ट होता. तीन लाख रुपयांचा! माझ्या नावानं!!’’

अजयचं बोलणं ऐकून विकासनं ‘’ वासला. ‘‘अरे वा! मी तर अशा आफ्रिकेतल्या काका-मामांबद्दल आतापर्यंत फक्त पुस्तकातच वाचलं होतं. एवढी आनंदाची बातमी आणि अशा रड्या तोंडानं काय सांगतोस?’’, विकासनं विचारलं. आणि मग त्याला एकदम जाणीव झाली - अजयचे काका गेले आणि आपण त्याला ‘आनंदाची बातमी’ म्हणतोय. तो थोडा ओशाळला.

पुन्हा एकदा थांबण्याची खूण करून अजयनं बोलणं सुरू केलं, ‘‘एवढी मोठी रक्कम एकदम आल्यानं मी गोंधळून गेलो रे. आधी वाटलं कुणी तरी टिंगल केली. तो ड्राफ्ट खरा का खोटाअशीही शंका येत होती. पण तो बँकेत भरला आणि पैसे खात्यात जमाही झाले.’’

टाळी देण्यासाठी हात उचलत विकास म्हणाला, ‘‘चलपार्टी दे आता. ‘‘ आणि मग पुन्हा एकदा ‘काका गेल्याचं’ आठवून तो सर्दाळला. ‘‘म्हातारं माणूस. जाणारच कधी तरी. काका म्हणून तुला दुःख होणं स्वाभाविक आहे...’’ असं सांत्वनपर बोलू लागला.

विकासचं बोलणं संपण्याच्या आधीच अजय म्हणाला, ‘‘त्यानंतरच्या आठवड्यातली गोष्ट. सकाळी कामाला जायची घाई असताना पुन्हा एकदा तो कुरीअरवाला आला. पुन्हा एक परदेशातलं कुरीअर. पुन्हा त्यानं सगळे आयडी प्रूफ घेतलेया वेळी चार कागदांवर सह्या घेतल्या आणि एक भलं थोरलं पाकीट दिलं. दक्षिण अमेरिकेतूनपेरूमधून आलं होतं ते. आमचा एक लांबचा मावसभाऊ तिथं होता. आमच्या बाबांपेक्षा चार-पाच वर्षांनी लहान असेलपण नात्यानं भाऊच. तो तर नशीब काढायला घरातून पळून गेला आणि पुन्हा कधी आलाच नाही घरी. त्याचीही तीच कथा. त्यानं माझ्या नावानं चांगले 10 लाख रुपये पाठवून दिले. तसंच... त्याच्या मृत्यूनंतर ही रक्कम मला मिळावीअशी इच्छा व्यक्त करीत. तोही ड्राफ्ट गेल्या आठवड्यात बँकेत टाकलापैसे जमा झाले आणि म्युच्युअल फंडात गुंतवूनही टाकले!’’

विकासला आता मात्र राहावलं नाही. त्यानं उठून अजयला जवळ जवळ मिठीच मारली. ‘‘मजा आहे गड्या तुझी. हे तुझं सुतक संपलं कीपार्टी पाहिजेच. मी काही ऐकणार नाही. लकी आहेसतू लकी अज्या!’’

विकासच्या या उत्साहाला आवर घालत अजय म्हणाला, ‘‘कशाचा लकी अन् कशाचा काय! इजा-बिजा-तिजा होईल म्हणून या आठवड्यात रजा काढून घरीच थांबलो. पण या आठवड्यात एक कुरीअरवाला फिरकला नाही घराकडं आणि त्यानं काही पाकीटही आणलं नाही. त्याचंच टेन्शन आहे रे सध्या मला...’’


Thursday 17 August 2017

पतेती आणि पारशी

कुठल्या निमित्तानं कुठून कुठं जाता येतं, याची कल्पना आज आली. निमित्त फेसबुकचं. निमित्त पतेतीचं... अर्थातच पारशी नववर्षदिनाचं. निमित्त झालं फेसबुकवरील एका टिपणाचं. निमित्त दिलं प्रदीप रस्से यांनी...

जळगावकर रस्से यांनी आपल्या पारशी मित्राला पतेतीच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुकवर छोटं टिपण लिहिलं. त्यात त्यांचा लाडका बेहेराम काँट्रॅक्टर डोकावून गेलाच... तर त्यांचा तो छोटा परिच्छेद आवडून गेला. त्यावर प्रतिक्रिया लिहायला बसलो आणि हा लेख प्रसवता झालो. म्हणजे हा प्रवास लाईकच्या अंगठ्यापासून, प्रतिक्रियेपासून स्वैर लेख लिहिण्यापर्यंत. हा प्रवास फेसबुकपासून खिडकीपर्यंत!

विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, आपल्याला पारशी समाजाबद्दल तशी फारशी काही माहिती नाही. त्यांच्याबद्दल फार काही वाचलंही नाही. पारशी म्हटल्यावर सर्वांत आधी आठवतात टाटा. शाळेच्या इतिहासात शिकलेले दादाभाई नवरोजी नंतर. पारशी माणसं भेटली नाहीत; भेटली असली तरी आठवणीत नाहीत. पण पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेली `वल्ली` आणि असंच काहीबाही वाचून त्यांच्याबद्दल आपुलकी मात्र वाटू लागली. `अंतर्नाद`मध्ये काही वर्षांपूर्वी मुंबईतील पारशांबद्दल दीर्घ लेख प्रसिद्ध झाला. तो बहुतेक किशोर आरस यांनी लिहिला होता. तो वाचून आपल्यालाही त्या समाजातील काही मित्र असावेत, असं वाटलं खरं; पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं.

अत्यल्पसंख्य असलेला हा समाज कुठं नाही? तो राजकारणात होता, क्रिकेटच्या मैदानावर होता, विज्ञान-संशोधनात होता, समाजकारणात होता, कलाक्षेत्रातही होता-आहे. उद्योगविश्वात तर तो आहेच आहे. अढळपणे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाशी या समाजाचं नातं आहेच.

टाटाहे नाव पारशी समाजाबद्दल आदरभावना कैक पटीने वाढविण्यास कारणीभूत ठरलं. मूलभूत उद्योग उभारणाऱ्या टाटांनी देशातल्या मूलभूत सोयी उभ्या करण्यातही मोठा वाटा उचलला. त्याबद्दल देशानं त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजं आणि सर्वसाधारणपणे सामान्य जनांमध्ये टाटांबद्दल तीच आपुलकीची-आदराची भावना आहे. म्हणून तर टाटांनी जग्वार, लँडरोव्हर यांसारखे जागतिक ब्रँड आपल्या पंखाखाली घेतल्या, तेव्हा सर्वसामान्य भारतीयाला मनापासून आनंद झाला होता. अंबानींनी जिओ फुकट जाहीर केल्याहून अधिक!

डाव्यांच्या कवनात, भाषणात, निवडणुकीतील प्रचारात भांडवलशाहीचं प्रतीक म्हणून आणि यमक साधण्यासाठी म्हणून `बाटा`बरोबर `टाटा` नावही येत राहिलं. पण तसं ते कोणी फार मनावर घेतलेले दिसले नाही. फार पूर्वी स्वामी अग्निवेष यांचं निवडणूक प्रचारसभेतील भाषण ऐकलं होतं. भांडवलशाहीचं साम्राज्य समजावून सांगताना, त्यावर टीका करताना स्वामी म्हणाले होते - इस देश का सब से बडा चमार कौन है? बाटा! इस देश का सबसे बडा लुहार कोन है? टाटा!तर ते असो... अशी टीका होऊनही टाटांबद्दल जनमत फारसं वाईट नाही, असं वाटतं. पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये `नॅनो` प्रकल्पाला झालेला कडवा विरोध, हे गेल्या दशकातील अपवादात्मक उदाहरण. तसंच जुनं उदाहरण म्हणजे मावळातील टाटांच्या धरणांविरुद्ध सामान्य मावळवासीयांचं सेनापती बापट यांनी केलेलं संघटन. अर्थात त्यांचा मूळ उद्देश या माणसाला ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघटित करण्याचाच होता, हे नक्की.

अग्निपूजक असलेले पारशी या भूमीत बाराशे-तेराशे वर्षांपूर्वी आले. आपला समाजही अग्निपूजक असल्याने त्यांना इथं जुळवून घेणं फार जड गेलं नसावं. आणि त्यांच्या आगमनाच्या कथेत सांगितलं जातं, तसं ते दुधातल्या साखरेप्रमाणे भारतीय समाजात विरघळून गेले. इथलेच आणि आपलेच झाले ते. सर रिचर्ड बर्टन यांनी मूळ `अरेबियन नाईट्स` इंग्रजीत जसंच्या तसं आणलं. त्याचा गौरी देशपांडे यांनी केलेला (अर्थातच अफलातून!) अनुवाद वाचताना `अग्निपूजक` समाजाचा तिकडे किती तीव्रपणे धिक्कार होत असे, हे कळतं.

श्रीधर व्यंकटेश  केतकर यांनी या समाजाबद्दल महाराष्ट्रीय ज्ञानकोशमध्ये लिहिलं आहे - पारशी लोकांत जशी जूट दिसून येते तशी हिंदुस्थानांतील दुसर्‍या कोणत्याहि जातींत नाहीं. स्वबांधवांनां मदत करण्याकरितां श्रीमान पारशी लोक नेहमीं तयार असतात. त्या समाजांत निरनिराळे धर्मार्थ फंड आहेत व त्यांचा विनियोग उत्तम प्रकारें केला जातो. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी  हा दुवा अवश्य पाहावा : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-29/9748-2013-02-28-08-30-13 

आपण झोराष्ट्रीयन म्हणून जो धर्म ओळखतो, तो जरथुश्त्री धर्म आहे, असं मराठी विश्वकोश सांगतो. या धर्माचा संस्थापक म्हणजे झोरोऑस्टर (झोरोआस्ट्रस). पारशी समाजाबद्दल विश्वकोशातील नोंद आहे - वैयक्तिक आचारविचारांच्या बाबतीत पारशी धर्मात ऋजुता, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा ह्या गुणांना प्राधान्य आहे. द्रोह किंवा कपटाने वागणे ह्याला जरथुश्त्राचा कडवा विरोध होता. एक सामाजिक कर्तव्य म्हणून ज्यांना जरूर आहे; त्यांना दान देणे आणि पाहुण्याचा आदरसत्कार करणे, ह्यांना ह्या धर्मात गौरवाचे स्थान आहे. भटक्या जीवनाचा त्याग करावा, अहुर मज्दाची मानवाला मिळालेली गाय ही श्रेष्ठ देणगी असल्यामुळे तिचा वध न करता पशुपालन करावे आणि शेतीभाती करावी ह्या गोष्टींना जरथुश्त्राने सर्वोत्तम मानले आहे. (विश्वकोशातील सविस्तर माहिती वाचण्यासाठी  :
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand9/?id=9585)

मिनू मसानी, पिलू मोदी, फिरोज गांधी ही राजकारणातली अपरिहार्य नावं. पण सुरुवात होते ती पितामह दादाभाई नवरोजी आणि भिकाजी कामा यांच्यापासून. मिनू मसानी स्वतंत्र पक्षाचे खंदे नेते. पिलू मोदी आणि फिरोज गांधी म्हणजे अस्सल पारशी व्यक्तिमत्त्वाचे नमुने. सीआयएचा एजंट अशी (देशद्रोहाची) उपाधी विरोधकांना लावण्याची फॅशन होती, तेव्हा पिलू मोदी संसदेत मी सीआयएचा एजंट आहे असा फलक लावून आले होते. इंदिरा गांधींना त्यांनी तुम्ही पीएम असाल, पण कायमचा पीएम (पिलू मोदी) आहे!’ असं विनोदानं सुनावलं होतं.  प्रसिद्ध व्यक्तीचा नवरा म्हणून आपण फिरोझ टोपणनाव घेतलं, असं प्रसिद्ध लेखक फिरोझ रानडे यांनी लिहून ठेवलं आहे. तो उल्लेख अर्थातच इंदिरा गांधी-फिरोझ गांधी या दाम्पत्याकडं अंगुलनिर्देश करणारा.

भारतीय क्रिकेटचा इतिहास चौरंगी-पंचरंगी लढतींचा आहे. त्यात पारशी जिमखाना होताच. या समाजातले डझनभर क्रिकेटपटू भारताकडून खेळले आहेत. रुस्तूम (रुसी) मोदी, पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर, केकी तारापोर, रुसी सुरती, फारुख एंजिनीअर ही त्यातली काही ठळक नावं. त्यातला नरी काँट्रॅक्टर प्रसिद्ध झाला तो कारकीर्द अर्ध्यावर सोडावी लागल्याने. वेस्ट इंडिजमध्ये चार्ली ग्रिफीथचा एक तोफगोळा त्याच्या कवटीच्या मागंच बसला.  अष्टपैलू रुसी सुरती आपल्याकडे गरिबांचा गॅरी सोबर्स म्हणून ओळखला जाई! फारुख इंजिनीअर गमतीदार स्वभावामुळे प्रसिद्ध. टिपिकल पारशी. सुनील गावसकरनं सनी डेजमध्ये त्याच्याबद्दल बरंच काही लिहिलं आहे. अनेक वर्षं भारताबाहेर राहूनही हा माणूस चांगलं मराठी बोलतो, असा अनुभव सुनंदन लेले यांनी अलीकडेच घेतला. क्रीडा क्षेत्रातली अलीकडची गाजलेली नावं म्हणजे अॅथलेट आदिल सुमारीवाला आणि क्रिकेटपटू डायना एडलजी.

हिंदी चित्रपटसृष्टीचा उल्लेख पारशी समाजातील माणसांशिवाय पूर्ण होतच नाही. सोहराब मोदी यांच्यापासून ते अलीकडच्या अगदी बोमन इराणी-जॉन अब्राहमपर्यंत; वाडिया मूव्हीटोन, बलसारा, डेझी इराणी, दिन्यार काँट्रॅक्टर,  अरुणा इराणी आदींच्या मार्गे. शिमाक दावर आणि झुबीन मेहता ही नावंही कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग बनलेली. चित्रपटांमध्ये पारशी व्यक्तिरेखा सहसा विनोदासाठी वापरल्या गेल्या. पण अशोककुमार आणि मंडळींच्या खट्टा-मीठाची गोष्टच वेगळी. त्याची मजा औरच. या चित्रपटातली सगळी पात्रं होमी मिस्त्री, पिलू मिस्त्री, फिरोज सेठना, झरीन, फ्रेनी सेठना, रुसी मिस्त्री अशी अस्सल पारशी आहेत. अलीकडेच संपलेल्या (आणि फार अपेक्षाभंग केलेल्या) `दिल दोस्ती दोबारा` मालिकेमध्ये पारशी बावाजींचे (न दिसणारं, पण जाणवणारं) पात्र होतंच. त्यांचा मुलगा `सायरस` अगदी पारशी वृत्तीचा वाटला.

डॉ. होमी भाभा, रुसी तल्यारखान, आदी सेठना, फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, फली नरीमन, जमशेदजी जिजीभॉय, गोदरेज, बलसारा... अशा अनेक नावांनी भारतीय समाजजीवन समृद्ध केलं आहे. अगणित नावं. प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणारं नाव.

आणखी एक ऐकलं ते असं की, पारशी व्यावसायिक अतिशय सचोटीनं, नीतिमत्तेनं आपला व्यवसाय करतात. (याला काही अपवाद असतीलही कदाचीत...) त्यांच्याकडे बनवेगिरी, फसवेगिरी असं काही नसतं म्हणे! मुंबई-पुणे याबरोबरच अन्य काही शहरांतही व्यवसायानिमित्त पारशी विखुरले आहेत. पण ते कधी दाखवेगिरी, चमकोगिरी करताना दिसत नाहीत. त्यांचे सण-उत्सवही शांततेने पार पडतात.

भाषा, चालीरीती याबाबत पारशी दुराग्रही असतात का? जाहीरपणे तरी तसं काही जाणवत नाही. मोडकंतोडकं का होईना, पण मराठी बोलण्याबाबत पारशांना कोणता गंड जाणवत नसावा. `पन्नास वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी येत नाही,` असे 50 हजार मराठी जनांसमोर चित्रपट क्षेत्रातील एका दिग्गजानं कबूल केलं होतं. त्यात फारशी खंत वा खेद काही जाणवला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर पारशांचं मराठी कानाला (आणि मराठी मनालाही) फार गोड वाटतं.

समाजातील आपलं अस्तित्व फारसं जाणवू न देण्याबाबत ते आग्रही असतात का? कदाचीत त्यामुळंच आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्यांच्याबद्दल कुतुहल वाटत राहतं आणि ते फारसं पूर्ण न होताच विरून जातं. त्यातूनच `टॉवर ऑफ सायलेन्स`बद्दल काही भीतिदायक आख्यायिका पसरत असाव्यात. गिधाडे वगैरे... पण या समाजाने अंत्यसंस्काराची पद्धत बदलण्याबाबत विचार सुरू केल्याची बातमी अलीकडेच वाचण्यात आली. काळानुरूप बदलणे म्हणतात ते हेच का?

विलक्षण बुद्धिमत्ता आणि तेवढाच विलक्षण विक्षिप्तपणा, ही पारशी समाजाची वैशिष्ट्यं माहीत झाली आहेत. केकी मूस त्यापैकीच एक ना?

मेहेरबाबा नगरचे. त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात नगरचं नाव जागतिक पातळीवर नेलं. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी क्रिकेटपटूंच्या नव्या पिढ्यांचे पॉलीकाका, पॉली उम्रीगर नगरला नियमित येत, असं ऐकलं होतं. त्यांना जाऊन भेटावं, असं तेव्हा फार वाटलं नाही आणि क्वचित कधी वाटलं, तर मार्ग  दिसला नाही. आता हळहळ वाटून काय उपयोग! याच नगरच्या अगदी भरवस्तीत वाडिया कुटुंबानं खेळासाठी 20 एकरांचं विस्तीर्ण मैदान दिलं.

एक-दोन गमतीशीर आठवणी...

क्रीडांगणमध्ये काम करताना नगरच्या एका वाचकाची पत्रं नियमित येत. त्याच्या पत्त्यामध्ये पारशी आग्यारीसमोर असा उल्लेख असे. पण इथं इतक्या वर्षांत ती आग्यार काही पाहिली नाही.

दोन दशकांपूर्वी साप्ताहिक सदर लिहीत होतो. म्हणजे रतीबच घातला तब्बल सहा वर्षं. त्या सदरासाठी टोपणनाव घेतलं. त्यातलं आडनाव पारशी वाटणारं. एका सहकाऱ्याकडे एका वाचकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया होती - `किती सुंदर मराठी लिहितो हा माणूस. पारशी वाटतच नाही!` तो लेखक (म्हणजेच अस्मादिक) वृत्तीनं, बुद्धिमत्तेनं पारशी नव्हताच. असताच तर त्यानं बेहेराम काँट्रॅक्टरसारखं `अ-क्षर`वाङ्मय प्रसवलं असतं की!

या अल्पसंख्य समाजाबद्दल काही पाहिलं, ऐकलं, वाचलं म्हणजे `सामाजिक समरसता` काय असते ती कळते!!

(माहिती आणि छायाचित्रं आंतरजालावरील विविध संकेतस्थळांच्या सौजन्यानं.)

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...