Thursday 17 August 2017

पतेती आणि पारशी

कुठल्या निमित्तानं कुठून कुठं जाता येतं, याची कल्पना आज आली. निमित्त फेसबुकचं. निमित्त पतेतीचं... अर्थातच पारशी नववर्षदिनाचं. निमित्त झालं फेसबुकवरील एका टिपणाचं. निमित्त दिलं प्रदीप रस्से यांनी...

जळगावकर रस्से यांनी आपल्या पारशी मित्राला पतेतीच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुकवर छोटं टिपण लिहिलं. त्यात त्यांचा लाडका बेहेराम काँट्रॅक्टर डोकावून गेलाच... तर त्यांचा तो छोटा परिच्छेद आवडून गेला. त्यावर प्रतिक्रिया लिहायला बसलो आणि हा लेख प्रसवता झालो. म्हणजे हा प्रवास लाईकच्या अंगठ्यापासून, प्रतिक्रियेपासून स्वैर लेख लिहिण्यापर्यंत. हा प्रवास फेसबुकपासून खिडकीपर्यंत!

विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, आपल्याला पारशी समाजाबद्दल तशी फारशी काही माहिती नाही. त्यांच्याबद्दल फार काही वाचलंही नाही. पारशी म्हटल्यावर सर्वांत आधी आठवतात टाटा. शाळेच्या इतिहासात शिकलेले दादाभाई नवरोजी नंतर. पारशी माणसं भेटली नाहीत; भेटली असली तरी आठवणीत नाहीत. पण पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेली `वल्ली` आणि असंच काहीबाही वाचून त्यांच्याबद्दल आपुलकी मात्र वाटू लागली. `अंतर्नाद`मध्ये काही वर्षांपूर्वी मुंबईतील पारशांबद्दल दीर्घ लेख प्रसिद्ध झाला. तो बहुतेक किशोर आरस यांनी लिहिला होता. तो वाचून आपल्यालाही त्या समाजातील काही मित्र असावेत, असं वाटलं खरं; पण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं.

अत्यल्पसंख्य असलेला हा समाज कुठं नाही? तो राजकारणात होता, क्रिकेटच्या मैदानावर होता, विज्ञान-संशोधनात होता, समाजकारणात होता, कलाक्षेत्रातही होता-आहे. उद्योगविश्वात तर तो आहेच आहे. अढळपणे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाशी या समाजाचं नातं आहेच.

टाटाहे नाव पारशी समाजाबद्दल आदरभावना कैक पटीने वाढविण्यास कारणीभूत ठरलं. मूलभूत उद्योग उभारणाऱ्या टाटांनी देशातल्या मूलभूत सोयी उभ्या करण्यातही मोठा वाटा उचलला. त्याबद्दल देशानं त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजं आणि सर्वसाधारणपणे सामान्य जनांमध्ये टाटांबद्दल तीच आपुलकीची-आदराची भावना आहे. म्हणून तर टाटांनी जग्वार, लँडरोव्हर यांसारखे जागतिक ब्रँड आपल्या पंखाखाली घेतल्या, तेव्हा सर्वसामान्य भारतीयाला मनापासून आनंद झाला होता. अंबानींनी जिओ फुकट जाहीर केल्याहून अधिक!

डाव्यांच्या कवनात, भाषणात, निवडणुकीतील प्रचारात भांडवलशाहीचं प्रतीक म्हणून आणि यमक साधण्यासाठी म्हणून `बाटा`बरोबर `टाटा` नावही येत राहिलं. पण तसं ते कोणी फार मनावर घेतलेले दिसले नाही. फार पूर्वी स्वामी अग्निवेष यांचं निवडणूक प्रचारसभेतील भाषण ऐकलं होतं. भांडवलशाहीचं साम्राज्य समजावून सांगताना, त्यावर टीका करताना स्वामी म्हणाले होते - इस देश का सब से बडा चमार कौन है? बाटा! इस देश का सबसे बडा लुहार कोन है? टाटा!तर ते असो... अशी टीका होऊनही टाटांबद्दल जनमत फारसं वाईट नाही, असं वाटतं. पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये `नॅनो` प्रकल्पाला झालेला कडवा विरोध, हे गेल्या दशकातील अपवादात्मक उदाहरण. तसंच जुनं उदाहरण म्हणजे मावळातील टाटांच्या धरणांविरुद्ध सामान्य मावळवासीयांचं सेनापती बापट यांनी केलेलं संघटन. अर्थात त्यांचा मूळ उद्देश या माणसाला ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघटित करण्याचाच होता, हे नक्की.

अग्निपूजक असलेले पारशी या भूमीत बाराशे-तेराशे वर्षांपूर्वी आले. आपला समाजही अग्निपूजक असल्याने त्यांना इथं जुळवून घेणं फार जड गेलं नसावं. आणि त्यांच्या आगमनाच्या कथेत सांगितलं जातं, तसं ते दुधातल्या साखरेप्रमाणे भारतीय समाजात विरघळून गेले. इथलेच आणि आपलेच झाले ते. सर रिचर्ड बर्टन यांनी मूळ `अरेबियन नाईट्स` इंग्रजीत जसंच्या तसं आणलं. त्याचा गौरी देशपांडे यांनी केलेला (अर्थातच अफलातून!) अनुवाद वाचताना `अग्निपूजक` समाजाचा तिकडे किती तीव्रपणे धिक्कार होत असे, हे कळतं.

श्रीधर व्यंकटेश  केतकर यांनी या समाजाबद्दल महाराष्ट्रीय ज्ञानकोशमध्ये लिहिलं आहे - पारशी लोकांत जशी जूट दिसून येते तशी हिंदुस्थानांतील दुसर्‍या कोणत्याहि जातींत नाहीं. स्वबांधवांनां मदत करण्याकरितां श्रीमान पारशी लोक नेहमीं तयार असतात. त्या समाजांत निरनिराळे धर्मार्थ फंड आहेत व त्यांचा विनियोग उत्तम प्रकारें केला जातो. जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी  हा दुवा अवश्य पाहावा : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-29/9748-2013-02-28-08-30-13 

आपण झोराष्ट्रीयन म्हणून जो धर्म ओळखतो, तो जरथुश्त्री धर्म आहे, असं मराठी विश्वकोश सांगतो. या धर्माचा संस्थापक म्हणजे झोरोऑस्टर (झोरोआस्ट्रस). पारशी समाजाबद्दल विश्वकोशातील नोंद आहे - वैयक्तिक आचारविचारांच्या बाबतीत पारशी धर्मात ऋजुता, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा ह्या गुणांना प्राधान्य आहे. द्रोह किंवा कपटाने वागणे ह्याला जरथुश्त्राचा कडवा विरोध होता. एक सामाजिक कर्तव्य म्हणून ज्यांना जरूर आहे; त्यांना दान देणे आणि पाहुण्याचा आदरसत्कार करणे, ह्यांना ह्या धर्मात गौरवाचे स्थान आहे. भटक्या जीवनाचा त्याग करावा, अहुर मज्दाची मानवाला मिळालेली गाय ही श्रेष्ठ देणगी असल्यामुळे तिचा वध न करता पशुपालन करावे आणि शेतीभाती करावी ह्या गोष्टींना जरथुश्त्राने सर्वोत्तम मानले आहे. (विश्वकोशातील सविस्तर माहिती वाचण्यासाठी  :
https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand9/?id=9585)

मिनू मसानी, पिलू मोदी, फिरोज गांधी ही राजकारणातली अपरिहार्य नावं. पण सुरुवात होते ती पितामह दादाभाई नवरोजी आणि भिकाजी कामा यांच्यापासून. मिनू मसानी स्वतंत्र पक्षाचे खंदे नेते. पिलू मोदी आणि फिरोज गांधी म्हणजे अस्सल पारशी व्यक्तिमत्त्वाचे नमुने. सीआयएचा एजंट अशी (देशद्रोहाची) उपाधी विरोधकांना लावण्याची फॅशन होती, तेव्हा पिलू मोदी संसदेत मी सीआयएचा एजंट आहे असा फलक लावून आले होते. इंदिरा गांधींना त्यांनी तुम्ही पीएम असाल, पण कायमचा पीएम (पिलू मोदी) आहे!’ असं विनोदानं सुनावलं होतं.  प्रसिद्ध व्यक्तीचा नवरा म्हणून आपण फिरोझ टोपणनाव घेतलं, असं प्रसिद्ध लेखक फिरोझ रानडे यांनी लिहून ठेवलं आहे. तो उल्लेख अर्थातच इंदिरा गांधी-फिरोझ गांधी या दाम्पत्याकडं अंगुलनिर्देश करणारा.

भारतीय क्रिकेटचा इतिहास चौरंगी-पंचरंगी लढतींचा आहे. त्यात पारशी जिमखाना होताच. या समाजातले डझनभर क्रिकेटपटू भारताकडून खेळले आहेत. रुस्तूम (रुसी) मोदी, पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर, केकी तारापोर, रुसी सुरती, फारुख एंजिनीअर ही त्यातली काही ठळक नावं. त्यातला नरी काँट्रॅक्टर प्रसिद्ध झाला तो कारकीर्द अर्ध्यावर सोडावी लागल्याने. वेस्ट इंडिजमध्ये चार्ली ग्रिफीथचा एक तोफगोळा त्याच्या कवटीच्या मागंच बसला.  अष्टपैलू रुसी सुरती आपल्याकडे गरिबांचा गॅरी सोबर्स म्हणून ओळखला जाई! फारुख इंजिनीअर गमतीदार स्वभावामुळे प्रसिद्ध. टिपिकल पारशी. सुनील गावसकरनं सनी डेजमध्ये त्याच्याबद्दल बरंच काही लिहिलं आहे. अनेक वर्षं भारताबाहेर राहूनही हा माणूस चांगलं मराठी बोलतो, असा अनुभव सुनंदन लेले यांनी अलीकडेच घेतला. क्रीडा क्षेत्रातली अलीकडची गाजलेली नावं म्हणजे अॅथलेट आदिल सुमारीवाला आणि क्रिकेटपटू डायना एडलजी.

हिंदी चित्रपटसृष्टीचा उल्लेख पारशी समाजातील माणसांशिवाय पूर्ण होतच नाही. सोहराब मोदी यांच्यापासून ते अलीकडच्या अगदी बोमन इराणी-जॉन अब्राहमपर्यंत; वाडिया मूव्हीटोन, बलसारा, डेझी इराणी, दिन्यार काँट्रॅक्टर,  अरुणा इराणी आदींच्या मार्गे. शिमाक दावर आणि झुबीन मेहता ही नावंही कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग बनलेली. चित्रपटांमध्ये पारशी व्यक्तिरेखा सहसा विनोदासाठी वापरल्या गेल्या. पण अशोककुमार आणि मंडळींच्या खट्टा-मीठाची गोष्टच वेगळी. त्याची मजा औरच. या चित्रपटातली सगळी पात्रं होमी मिस्त्री, पिलू मिस्त्री, फिरोज सेठना, झरीन, फ्रेनी सेठना, रुसी मिस्त्री अशी अस्सल पारशी आहेत. अलीकडेच संपलेल्या (आणि फार अपेक्षाभंग केलेल्या) `दिल दोस्ती दोबारा` मालिकेमध्ये पारशी बावाजींचे (न दिसणारं, पण जाणवणारं) पात्र होतंच. त्यांचा मुलगा `सायरस` अगदी पारशी वृत्तीचा वाटला.

डॉ. होमी भाभा, रुसी तल्यारखान, आदी सेठना, फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, फली नरीमन, जमशेदजी जिजीभॉय, गोदरेज, बलसारा... अशा अनेक नावांनी भारतीय समाजजीवन समृद्ध केलं आहे. अगणित नावं. प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणारं नाव.

आणखी एक ऐकलं ते असं की, पारशी व्यावसायिक अतिशय सचोटीनं, नीतिमत्तेनं आपला व्यवसाय करतात. (याला काही अपवाद असतीलही कदाचीत...) त्यांच्याकडे बनवेगिरी, फसवेगिरी असं काही नसतं म्हणे! मुंबई-पुणे याबरोबरच अन्य काही शहरांतही व्यवसायानिमित्त पारशी विखुरले आहेत. पण ते कधी दाखवेगिरी, चमकोगिरी करताना दिसत नाहीत. त्यांचे सण-उत्सवही शांततेने पार पडतात.

भाषा, चालीरीती याबाबत पारशी दुराग्रही असतात का? जाहीरपणे तरी तसं काही जाणवत नाही. मोडकंतोडकं का होईना, पण मराठी बोलण्याबाबत पारशांना कोणता गंड जाणवत नसावा. `पन्नास वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी येत नाही,` असे 50 हजार मराठी जनांसमोर चित्रपट क्षेत्रातील एका दिग्गजानं कबूल केलं होतं. त्यात फारशी खंत वा खेद काही जाणवला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर पारशांचं मराठी कानाला (आणि मराठी मनालाही) फार गोड वाटतं.

समाजातील आपलं अस्तित्व फारसं जाणवू न देण्याबाबत ते आग्रही असतात का? कदाचीत त्यामुळंच आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्यांच्याबद्दल कुतुहल वाटत राहतं आणि ते फारसं पूर्ण न होताच विरून जातं. त्यातूनच `टॉवर ऑफ सायलेन्स`बद्दल काही भीतिदायक आख्यायिका पसरत असाव्यात. गिधाडे वगैरे... पण या समाजाने अंत्यसंस्काराची पद्धत बदलण्याबाबत विचार सुरू केल्याची बातमी अलीकडेच वाचण्यात आली. काळानुरूप बदलणे म्हणतात ते हेच का?

विलक्षण बुद्धिमत्ता आणि तेवढाच विलक्षण विक्षिप्तपणा, ही पारशी समाजाची वैशिष्ट्यं माहीत झाली आहेत. केकी मूस त्यापैकीच एक ना?

मेहेरबाबा नगरचे. त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात नगरचं नाव जागतिक पातळीवर नेलं. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी क्रिकेटपटूंच्या नव्या पिढ्यांचे पॉलीकाका, पॉली उम्रीगर नगरला नियमित येत, असं ऐकलं होतं. त्यांना जाऊन भेटावं, असं तेव्हा फार वाटलं नाही आणि क्वचित कधी वाटलं, तर मार्ग  दिसला नाही. आता हळहळ वाटून काय उपयोग! याच नगरच्या अगदी भरवस्तीत वाडिया कुटुंबानं खेळासाठी 20 एकरांचं विस्तीर्ण मैदान दिलं.

एक-दोन गमतीशीर आठवणी...

क्रीडांगणमध्ये काम करताना नगरच्या एका वाचकाची पत्रं नियमित येत. त्याच्या पत्त्यामध्ये पारशी आग्यारीसमोर असा उल्लेख असे. पण इथं इतक्या वर्षांत ती आग्यार काही पाहिली नाही.

दोन दशकांपूर्वी साप्ताहिक सदर लिहीत होतो. म्हणजे रतीबच घातला तब्बल सहा वर्षं. त्या सदरासाठी टोपणनाव घेतलं. त्यातलं आडनाव पारशी वाटणारं. एका सहकाऱ्याकडे एका वाचकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया होती - `किती सुंदर मराठी लिहितो हा माणूस. पारशी वाटतच नाही!` तो लेखक (म्हणजेच अस्मादिक) वृत्तीनं, बुद्धिमत्तेनं पारशी नव्हताच. असताच तर त्यानं बेहेराम काँट्रॅक्टरसारखं `अ-क्षर`वाङ्मय प्रसवलं असतं की!

या अल्पसंख्य समाजाबद्दल काही पाहिलं, ऐकलं, वाचलं म्हणजे `सामाजिक समरसता` काय असते ती कळते!!

(माहिती आणि छायाचित्रं आंतरजालावरील विविध संकेतस्थळांच्या सौजन्यानं.)

21 comments:

 1. खूपच सुंदर शब्दांकन ... पारसी समाज म्हणजे
  खरोखरीची सामाजिक समरसता हे आपले मत अगदी मान्य ...लेखासाठी धन्यवाद ...
  महेश घोडके

  ReplyDelete
 2. Laxmikant Deshmukh18 August 2017 at 08:33

  सतीश छान लेख, पारशी समाजाबद्दल खरंच प्रत्येक देशप्रेमी भारतीयाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असं त्यांचं contrubution भारताच्या विकासात आहे. Tata Steel ची एक जुनी ad आठवली त्यात शेवटी "We also make Steel" असे वाक्य आहे, ते बरेच काही सांगून जाते. छान लेखाबद्दल अभिनंदन.

  ReplyDelete
 3. सांगोपांग आढावा. अप्रतिम लेख.
  - संजय आढाव

  ReplyDelete
 4. `खिडकी`तून डोकावलो. मस्तच लिहिलंय...
  - मंगेश कुलकर्णी, पुणे

  ReplyDelete
 5. फारच सुंदर लेख. मला पारशी समाज आणि इतिहास यांबद्दल खूप माहिती आहे. मी स्वतः पारशी विचारवंतांबरोबर खूप काम केलं आहे. पारशी भारतात कुठून, कसे आले, कसे स्थिरावले आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्व क्षेत्रांत त्यांनी अत्यंत अमूल्य योगदान कसं दिलं, याचा प्रवास अधोरेखित करणाऱ्या महत्त्वाच्या इतिहास ग्रंथांवर मी मोठ्या लेखकांच्या बरोबर वर्षानुवर्षं काम केलं आहे. मला या समाजाविषयी विशेष आत्मीयता वाटते.
  - मृदुला जोशी

  ReplyDelete
 6. व्वा! सुंदर माहिती दिलीत, या दुर्मिळ होत चाललेल्या समाजाबद्दल. त्यांना जपायला हवं, आपल्या भल्यासाठी!!
  - उमेश घेवरीकर

  ReplyDelete
 7. नेहमीप्रमाणेच सुंदर लेख...
  - जगदीश निलाखे

  ReplyDelete
 8. अप्रतिम...
  - भरत वेदपाठक

  ReplyDelete
 9. छान! एक-दोन नावंच पटकन आठवत होती. पण इथं तर रतीबच घातला गेलाय पारशी नावांचा... हो, पण त्यात एक नाव राहिल्यासारखं वाटतंय. जुने अभिनेते डेव्हिड (`नन्हे मुन्ने बच्चे...` - `बुट पॉलिश`) यांचे. मला वाटतं ते पारशीच होते.

  ... आणि ते पारशी आडनावाचे लेख याऊ द्यात की परत; प्रासंगित असले तरीही.
  - विवेक विसाळ

  ReplyDelete
 10. वाचला लेख, मस्त आहे! `वाडिया` नावाबाबत विचार करत होतो. पण आज कळलं... 25 वर्षांनी की, नगरला मिळालेली ती देणगी पारशी माणसाची आहे!
  - अमित काळे

  ReplyDelete
 11. `खिडकी`त डोकावलो...छान!
  - पावलस मुगुटमल

  ReplyDelete
 12. अभ्यासपूर्ण आणि माहितीचा खजिना. खूप सुंदर. टाटा, क्रिकेट, फिल्म जगातील पारशी कळले.
  - हरिहर धुतमल

  ReplyDelete
 13. Very very nice... and deep study..I remember one of my parsi professor Mr. Mehernosh Mehta.

  ReplyDelete
 14. नेहमीप्रमाणेच मस्तच आहे. पारशी लोक आंतरधर्मीय लग्न स्वीकारत नाही, असे म्हणतात; अगदी दुसऱ्या धर्माची स्त्रीही. हा समाज अत्यल्प होत जाण्याचे तेही एक कारण.
  डहाणूचे चिकू प्रसिद्ध आहेत. तेथील बऱ्याच बागा पारशांच्या मालकीच्या आहेत. संगमनेरचे डी. एम. पेटिट विद्यालय 100 वर्षांहून जुने आहे. ते नावही पारशीच. नानी पालखीवाला, सोली सोराबजी हेही त्याच समाजातील धुरिण.
  - प्रकाश टाकळकर

  ReplyDelete
 15. आपला आजचा लेख **** असा आहे.
  योगायोगाने आठवलं की मला पाहिलं वहिलं character certificate देणारे माझ्या वडिलांचे मित्र श्री. रांदेरिया पारशी (दादरच्या पारशी कॉलनीमध्ये राहणारे ) होते. ते अजूनही माझ्यापाशी ठेवलेलं आहे.
  - मंगेश नाबर

  ReplyDelete
 16. 'खिडकी'ची भेट बऱ्याच दिवसानंतर होते आहे. छान वाटलं.
  - सुरेश जाधव

  ReplyDelete
 17. खिडकीच्या मेलसाठी धन्यवाद.वरच्या लेखात काजोलची मराठीतली भंबेरी वाचली आणि या लेखातली सनी डेज मधली फारुख इंजिनियरची आठवण वाचली हीच खरी ओळख आहे पारशी समाजाची. चाळीसगावच्या केकी मूस या अवलिया फोटोग्राफरची कहाणीही खूप सुंदर आहे कधी जमलच तर नक्की जा चाळीसगावला.

  ReplyDelete
 18. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 19. 'पतेती आणि पारशी' हा मार्मिक लेख वाचला. विविध जाती-धर्माचा आपला देश. तो चालविणारेही तसेच. कसा चालला या विषयी बोलालं तेवढे थोडेच. अशा गढूळ पाण्यातून आपण नेमके गंगाजलाच अस्तित्व हेरून बाजूला काढलं. केवळ काढलंच नाही; तर त्या विषयीचे आपले विचार, लेखन इतकेच नव्हे तर आपणही खरोखर `पारशीमय` झालात.

  या अत्यल्पसंख्यांक समाजाने देशाला विविध क्षेत्रांत खूप मोठी, निस्पृह, त्यागी माणसं दिली. एवढं असूनही हा समाज आरक्षण मागत नाही, मोर्चे काढत नाही, उपोषण करत नाही. एवढा तरी आदर्श या देशातील अन्य समाजाने घ्यायला काय हरकत आहे?

  - श्रीराम वांढरे

  ReplyDelete
 20. खरं तर इतक्या उशिरानं पोच द्यायला शरम वाटतेय...
  तरीही...
  पतेती हा शब्द एक सरकारी सुटी एवढ्यापुरतंच आमचं महाज्ञान! त्या निमित्ताने आपण घातलेलं अंजन खाडकन डोळे उघडायला लावणारे...
  तसं तर माणूस आपापल्या परिप्रेक्ष्यापलीकडे जायला धजावत नाही किंबहुना जाऊच शकत नाही. कारण तितकी मिजास राहिली नाही. मात्र आपल्या खिडकीचे डोळे हर्बलचे...
  आपले लेखन आवडतंच... आवडण्याहून अधिक पटण्याची ताकद असते त्यात...
  आभार...

  ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...