छत्रपती शिवराय केसरी स्पर्धा. प्रेक्षकांना दर्शन महाराजांचे आणि खेळाचेही. |
विजेत्याला लक्षाधीश करणारी, तब्बल अर्ध्या किलोची सोन्याची गदा बहाल करणारी छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा नगरमध्ये आजपासून सुरू झाली. वाडिया पार्क मैदानावर सुरू झालेल्या ह्या स्पर्धेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आखाड्याशेजारी बसलेले हौशी निवेदक वारंवार सांगत होते. स्पर्धेत साडेआठशे मल्ल सहभागी झाल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमातील भाषणात सांगून टाकलं. म्हणजे संख्या लक्षणीय आहे, हे नक्की.
राज्यातील सत्ताधारी युतीने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, जिल्हा तालीम संघ ह्यांनी ही घवघवीत बक्षिसांची स्पर्धा आयोजित केली आहे. वाडिया पार्क मैदानात दोन्ही पक्षांचे झेंडे एका आड एक लागलेले असले आणि इथे तरी फडफडण्याचे समान वाटप झाले असले, तरी उद्घाटन समारंभावर वर्चस्व होतं ते भा. ज. प.चंच. उद्घाटक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रमुख पाहुणे श्री. विखे पाटील व त्यांचे खासदार-पुत्र डॉ. सुजय आणि पक्षाचेच प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी. शिवसेनेची उपस्थित होती ती सगळी स्थानिक मंडळी. उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांना कार्यबाहुल्यामुळे खेळाच्या उद्योगाकडे यायला वेळ मिळाला नसावा.
खेळ आणि राजकारण
खेळ आणि राजकारण ह्या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी. त्या कधी एकमेकांच्या पायात पायही घालतात. त्यातही कुस्तीचं आणि राजकारणाचं नातं अधिक जवळचं. कुस्तीसारखाच राजकारणाचा आखाडा असतो. डाव-प्रतिडाव, खडाखडी, नुरा, चितपट, लोळविणे, मातीला पाठ लावणे, दंड थोपटणे... हे सारे शब्दप्रयोग कुस्तीएवढेच राजकारणातही चलतीचे आहेत. स्वाभाविकच कुस्ती स्पर्धेतील भाषणात राजकारण येणार!
आपलं छोटेखानी भाषण संपविता संपविता श्री. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी हळूच राजकारणाला स्पर्श केला. कबड्डीतील एखादा कसबी चढाईपटू कळेल ना कळेल अशा पद्धतीने निदान रेषेला स्पर्श करतो तसं. ‘उद्याच्या सर्व कुस्त्या आम्ही चितपट करू,’ असं ते म्हणाले, तेव्हा त्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्याही डोळ्यांपुढे आल्या त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका ह्या निवडणुका. त्याही पुढच्या ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘हिंद केसरी’ अर्थात विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यांच्या मनात असणारच. त्या ओठांवर आल्या नाहीत, एवढंच.
नगर राजकारणाकरिता प्रसिद्ध, तेवढाच कोणे एके काळी कुस्तीसाठी. पालकत्र्यांनीच त्याची आठवण करून दिली. तालमींकरिता प्रसिद्ध असलेला हा जिल्हा आणि शहर मागे पडलं, अशी खंत व्यक्त करताना ते म्हणाले की, कुस्तीचं आकर्षण ग्रामीण भागात आजही कायम आहे. ते टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गरज आहे ती राज्य सरकारने आश्रय देण्याची गरज. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ सहकाऱ्याची, ज्यानं मुख्य आणि उपमुख्यमंत्र्यापाठोपाठ शपथ घेतली त्या ज्येष्ठाची. स्वाभाविकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या साथीनं रविवारी सोन्याची गदा विजेत्याला देताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना त्याबद्दल काही तरी आश्वासन द्यावंच लागेल. ते रेवड्यांचं असणार नाही, अशी अपेक्षा आपण करू. जत्रेतल्या कुस्त्या पूर्वी रेवड्यांवर खेळल्या जात आणि ‘रेवडी-संस्कृती विकासासाठी घातक आहे,’ असं मा. नमो नमो ह्यांनी पूर्वी सांगितलेलं आहेच. अगदी ठासून!
कुस्ती महाराष्ट्राचं वैभव आहे. कुस्तीवरच्या प्रेमामुळे नागपूरहून नगरला (उद्घाटनासाठी) आलो, असं श्री. बावनकुळे ह्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलं. पण नंतर लगेच त्यांची गाडी राजकीय आखाड्याकडे वळली. दोन्ही पक्षांचे झेंडे (सारख्याच) डौलाने मैदानात फडकत असल्याबद्दल खुशी व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘आखाड्याच्या माध्यमातून युतीचं उत्कृष्ट प्रदर्शन घडत आहे!’’
भिस्त तुमच्यावरच!
तूर्त भिस्त पुडीतल्या शेंगदाण्यावरच बुवा. |
उद्घाटनाच्या कार्यक्रमात सर्वांत मोठं भाषण झालं श्री. बावनकुळे ह्यांचंच. त्यात त्यांनी सर्वच मुद्द्यांना स्पर्श केला. ऑलिंपिकमध्ये भारताला पहिलं व्यक्तिगत पदक जिंकून देणाऱ्या खाशाबा जाधव ह्यांची आठवण त्यांनीच काढली. मागच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (२०१८) भारतानं आतापर्यंतची सर्वाधिक पदकं जिंकली, हे अभिमानानं सांगताना त्यांनी त्याचं श्रेय अर्थात पंतप्रधानांना दिलं. अगदी ‘मोदी है तो मुमकिन है’ असा सूर त्यांनी लावला नाही; पण त्यांच्यामुळे खेळाला चांगले दिवस आले, असं त्यांचं म्हणणं होतं. महाराष्ट्र सरकारनं क्रीडा खात्यासाठी अंदाजपत्रकात पाचशे कोटींहून अधिक तरतूद केल्याचं त्यांनी अगदी आठवणीनं सांगितलं. त्यातला मोठा वाटा छत्रपती संभाजीनगरला आणि उपराजधानी नागपूरकडं वळणार आहे, हे सांगायला विसरले असतील.
टोलेबाजीनंतर तत्त्वज्ञान!
‘एकनाथराव व देवेंद्रभाऊ रोज उत्तम फलंदाजी करीत आहेत. एका मागोमाग एक छक्के आणि चौके लगावत आहेत,’ असं खुशीत सांगताना श्री. बावनकुळे ह्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे ह्यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात शिवसेनाही आहे, हे जाहीर झालं. एवढी सगळी टोलेबाजी करून झाल्यावर प्रदेशाध्यक्षांना एकदम त्या जागतिक तत्त्वाची आठवण झाली - खेळात राजकारण नको! मग ते म्हणाले, ‘‘हा खेळ आहे. ह्यात पक्षीय भूमिका नाही. कुणी तरी एकानं आयोजनासाठी पुढाकार घ्यावा लागतो म्हणून युतीनं ही स्पर्धा आयोजित केली. त्यामुळे इथं कुस्त्या पाहायला सर्व पक्षाच्या मंडळींनी यावं!’’
भा. ज. प.चा ठसा उमटलेल्या ह्या कार्यक्रमामुळं शिवसेनेचे पदाधिकारी आता समारोपाच्या कार्यक्रमाची वाट पाहत असतील. त्या दिवशी आपले नाथ, अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार टोलेबाजी करतील, ह्यावर त्यांची भिस्त आहे. नुसते फडफडते झेंडे समान असून चालत नाही. छापही तशीच समसमान उमटावी लागते. कुस्ती काय नि राजकारण काय; संघ समान असला, तरी पुढच्या वाटचालीसाठी आपापले डाव टाकणं भागच असतं!
जाता जाता महत्त्वाचं - उद्घाटन समारंभ चारऐवजी सहा-सव्वा सहा वाजता सुरू झाला. पण पाहुण्यांची वाट पाहत खेळ थांबला नाही. संयोजक आणि प्रत्यक्ष स्पर्धेची सूत्रं हाती असलेल्या तांत्रिक समितीनं ठरल्या वेळीच लढती चालू केल्या होत्या. एकाच वेळी तीन ठिकाणी कुस्त्या चालू होत्या. तिसरा पुकार होता क्षणीच हजर नसलेल्या खेळाडूला बाद करण्याचा निर्णय घेतला जाई. उद्या आणि परवा तांत्रिक समिती ह्याच पद्धतीनं स्पर्धा पुढे नेईल. मानाच्या गदेची कुस्ती निकाली होईपर्यंत आहे. त्या दिवशी खडाखडी किती होते, ते पाहावं लागेल.
#छत्रपती_शिवराय_केसरी #कुस्ती #सोन्याची_गदा #नगर #वाडिया_पार्क #भाजप_शिवसेना #चंद्रशेखर_बावनकुळे #राधाकृष्ण_विखेपाटील #खासदार_विखेपाटील #खेळ_राजकारण