देव शुद्ध झाला!! आणि हो,
(पुन्हा) पवित्रही झाला!!
नेहमी स्वतःपुढे ‘पुरोगामी’ असं विशेषण आग्रहानं लावून घेणाऱ्या, ‘डाव्या
विचारांचा (एके काळचा) बालेकिल्ला’ मानल्या जाणाऱ्या नगर
जिल्ह्यातली गोष्ट आहे ही.
‘जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात॥’ असे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या नेवासे
तालुक्यातल्या शनिशिंगणापूरची चित्तचक्षुचमत्कारिक गोष्ट सांगतोय ही.
देवाचं पावित्र्य शनिवारी (२८ नोव्हेंबर) भंग पावलं होतं.
समस्त गावकऱ्यांनी रविवारी (२९ नोव्हेंबर) देवाला पुन्हा ते पावित्र्य मिळवून दिलं.
या दोन्हींचंही कारण ‘ती’ होती.
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एक मुलगी किंवा तरुणी
शनिशिंगणापुरातील मंदिरात होती. अंगात पँट आणि शर्ट. केसाचा एक शेपटा. गळ्यात
उपरण्यासारखी घेतलेली ओढणी. तिने पादत्राणे चौथऱ्याखाली सोडली. पायात मोजे तसेच
ठेवत चौथऱ्यावर चढली. तेलाने अभिषेक केला आणि लगेच खाली परतली. हा सारा प्रसंग अवघ्या २०-२५ सेकंदांचा. (पाहा : शनिशिंगणापूर देवस्थानातील सीसीटीव्ही
कॅमेऱ्यातील ही चित्रफीत.
या अवघ्या अर्ध्या मिनिटाच्या खेळामुळं सगळंच बिघडलं.
वर्षानुवर्षं पाळलेल्या रुढीची गढी ढासळली. जाणीवपूर्वक पाळलेल्या परंपरेचे चिरे
निखळून पडले.
त्या मुलीनं हे कृत्य हेतुतः केलं की, तिच्याकडून नकळत हे
घडलं, याचा उलगडा अजून झालेला नाही. येत्या एक-दोन दिवसांमध्ये तो होईल किंवा
होणारही नाही. असं काही करण्यामागं तिचा काही उद्देश होता की, केवळ श्रद्धेपोटी तैलाभिषेक
करण्यासाठी आणि रुढींची माहिती नसल्यानं ती चौथऱ्यावर चढली, हेही स्पष्ट व्हायचं
आहे. तसं ते होईलच याचीही खात्री नाही.
आपण काय ‘पराक्रम’ केला आहे, हे त्या मुलीला रविवारची वृत्तपत्रं वाचून कळलं असेल. आणि आता
सोमवारच्या अंकात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांनी तिला कदाचित घाबरायलाही होईल.
पण तिच्या हातून ते घडून गेलंय. वर्षानुवर्षांची एक परंपरा
तिनं त्या २० सेकंदांमध्येच मोडीत काढलीय.
ही मुलगी चौथऱ्यावर गेल्यामुळे सारं कसं ‘अपवित्र’ आणि ‘अशुद्ध’ झालं होतं. रुढी-परंपरा मोडल्यानं आलेला राग गावकऱ्यांनी रविवारी तीन तास
‘बंद’ पाळून व्यक्तही केला. ‘शुद्धिकरण’ म्हणून लोकप्रतिनिधी व गावकरी यांनी
देवाला पाणी, तेल व दूध याने अभिषेकही केला.
आपल्याला अभिषेकाबद्दल काही म्हणायचं नाही. कारण तो ‘श्रद्धेचा’ प्रश्न आहे. आपल्या घटनेनेच
प्रत्येकाला उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. घटनेनं समतेचं तत्त्वही सांगितलेलं आहे.
पण आपण त्याबद्दलही काही बोलणार नाही. कारण समतेवर विश्वास ठेवायचा नाही, असं
त्यांच्या उपासनेच्या पद्धतीत म्हटलेलं असेल, तर त्यांचं तेही घटनादत्त
स्वातंत्र्य आपण मान्य करायलाच हवं.
पाण्यानं आणि परंपरा मोडल्यामुळं झालेला दाह शांत
करण्यासाठी तेलानं अभिषेक करणंही आपल्याला पटतंय.
पण दुधानं अभिषेक कसा काय केला बुवा?
हे दूध गाय, म्हैस, शेळी, मेंढी... यांपैकीच एकीचं कुणाचं
तरी असणार ना? कारण बैल, बोकड, रेडा दूध देतो, हे
अधूनमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रीय चौकटींना मान्य असलं, तरी वस्तुस्थिती तशी
नाहीच. दूध फक्त ‘मादी’ देते ना?
चौथऱ्यावर चढून गेलेली ती मुलगी म्हणजे ‘मादी’च होती ना?
एका मादीमुळं अपवित्र झालेल्या स्थानाचं शुद्धिकरण दुसऱ्या
मादीच्या स्तन्यामुळं होतं तर?
म्हणजे सगळ्याच माद्या तेवढ्या अपवित्र नसतात तर?
गावकरी फक्त शुद्धिकरण करूनच बसलेले नाहीत. काहींनी
गावातल्या महिलांनाही ‘बोलतं’ केलंय.
रुढी-परंपरेच्या बाजूनंच.
तिथल्या एका बाईंनी सांगितलंय म्हणे की, ‘महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची पद्धत इथे नाही. ती रुढी आजपर्यंत
पाळली गेलीय. तो नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात परिसरातल्या महिला एकवटतील!’
काट्याने काटा काढावा, असा तर काही हा प्रकार नाही ना? बाईच्या विरोधात बाईलाच उभं करण्याची इथली सनातन परंपरा आहे. ‘बाईच बाईचा शत्रू असते,’ हे पुरुषी मनोवृत्तीनं सतत
सांगून मनीमानसी रुजवलेलं आहे. तेच पुन्हा सिद्ध करण्याचा हा खटाटोप.
पण असं काही पहिल्यांदाच घडतंय, असं मुळीच नाही. http://www.shanidev.com
या संकेतस्थळाला भेट द्या. त्या संकेतस्थळावर ‘Was injustice done to
women?’ या शीर्षकाचं एक पान आहे. त्याचं लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असलं,
तरी लेखकाचं नाव दिलं नाही. हेच पान मराठीतही आहे. त्याचं शीर्षक मात्र ‘श्री शनिदेवा संदर्भात महिलांचे आभिमत’ असं आहे.
त्यात दिलेलं महिलांचं म्हणणं मुळातून वाचण्यासारखं आहे.
xxxxx
आता या प्रकाराबद्दल परिसरातील पुरोगामी आणि पत्रकारप्रिय
पुढारी काही बोलतील, असं मुळीच नाही. ते नेहमीप्रमाणे पानाची गुळणी धरून बसतील.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आंदोलनाच्या वेळी तसा अनुभव आलेलाच आहे.
बरोबर १७ वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं
शिंगणापुरातील अंधश्रद्धेविरुद्ध मोहीम सुरू केली होती. काही वृत्तपत्रांनी तिचं
नामकरण ‘शिंगणापूरला चला, चोरी करायला’ असं करून काडी टाकण्याचं काम केलं होतं.
त्याच वेळी म्हणजे १९ व २० डिसेंबर १९९८ रोजी सोनईमध्ये सत्यशोधक समाजाचं अधिवेशन होणार होतं. (ते पार पडलं
की नाही, हे आता आठवत नाही.) त्या अधिवेशनात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या
अध्यक्षतेखाली ‘स्त्रियांच्या गुलामगिरीस धर्म व अंधश्रद्धा
कारणीभूत आहे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं
होतं. (नंतर संयोजकांनी त्यांना दिलेलं निमंत्रणच रद्द करून आपली ‘जबाबदारी’ पार पाडली!)
एकविसाव्या
शतकातलं पहिलं दीड दशक संपल्यानंतरही त्याच विषयावर पुन्हा चर्चासत्र घेतलं तरी
चालेल, असंच आपला भवताल सांगतोय. पुरोगामित्व मिरवणाऱ्या पुढाऱ्यांनी त्याही वेळी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तोंडदेखलाही पाठिंबा दिला नव्हता. उलट राज्यमंत्री दिलीप
सोपल, आमदार शिवाजी कर्डिले यांनी निरर्गल शब्दांत डॉ. दाभोलकर, समिती यांच्यावर
टीका केली होती.
डॉ. दाभोलकर यांच्या प्रतिमेचं सोनईत दहन करून ‘दहावा’ घालण्यात आला; त्यांना
काळं फासण्याचा प्रयत्नही नगरमध्ये झाला.
म्हणूनच शंका येते; जे डॉ.
दाभोलकर यांच्या पाठीशी उघडपणे उभे राहिले नाहीत, ते आता या अनोळखी मुलीला काय
पाठिंबा देणार?
xxxxx
विशेष बातमी करण्यासाठी म्हणून मी एका शनिअमावस्येला (२ ऑगस्ट १९९७) जवळपास १० तास शनिशिंगणापूर येथे घालवले आहेत. त्याची बातमी दैनिक
लोकसत्तामध्ये ८ ऑगस्ट १९९७ रोजी ‘शनिशिंगणापूरचा
प्रवास आता मोठ्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने’ या शीर्षकाने
प्रसिद्ध झाली.
तिथे असतानाच चोरी झाल्याची तक्रार करणारा एक भाविक भेटला. दर्शनासाठी
रांगेत उभ्या असलेल्या संजय दिगंबर लोहारकर (देवगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक) ह्यांच्या खिशातील ५ हजार रुपये चोरीस गेले. पोलिसांनी त्यांची तक्रार अर्थातच घेतली
नाही. त्याचाही या बातमीत उल्लेख आहे.
शेवगाव परिसरात मुख्याध्यापक असलेल्या किसन
चव्हाण यांचं ‘आंदकोळ’ आत्मकथन
अलीकडेच ‘ग्रंथाली’नं प्रकाशित केलंय.
ते पारधी जमातीचे. लेखकाला लहानपणी ‘चोरी न होणाऱ्या
शिंगणापूरचं’ फार आकर्षण होतं. तोच ‘पिढीजात
व्यवसाय’ करणाऱ्या त्यांच्या वडिलांना मुलाला वाटणारं हे
आकर्षण ऐकल्यावर हसू आलं. त्यांनी म्हणे सांगितलं, ‘मी
सगळ्यात जास्त चोऱ्या तर तिथंच केल्या आहेत!’
त्या दिवशीच्या त्या १० तासांमध्ये बरंच काही पाहिलं,
ऐकलं. त्यानंतर पुन्हा शनिशिंगणापूरचं दर्शन घडलं ते क्रिकेटपटू राजेश चौहान ह्याच्याबरोबर.
भारतीय संघात पुनरागमन करण्याचं स्वप्न पाहणारा हा उमदा क्रिकेटपटू
ज्या श्रद्धेनं साईबाबांपुढे नतमस्तक झाला, त्याच श्रद्धेनं त्यानं शिंगणापूरला
सोवळं नेसून अभिषेकही केला. पुरोहितानं गोत्र विचारल्यावर त्यानं ते क्षणात ‘कश्यप’ असं सांगितल्याचं आजही आठवतंय.
xxxxx
गुलशनकुमारचा ‘सूर्यपुत्र
शनिदेव’ चित्रपट आणि अनुराधा पौडवाल यांच्या ध्वनिफिती या
समसमा संयोगामुळे शिंगणापूरची ख्याती वाढत गेली. शनिअमावस्येला तिथं चार-पाच लाख
भाविकांची गर्दी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून नेहमीच झळकतात. जवळच शिर्डी
असल्यानं त्याचा फायदा शनिशिंगणापूरला होतो आहे.
त्या बातमीचा शेवट करताना लिहिलं होतं...
शिंगणापूर! भक्तांच्या कपाळी
गंध लावून पैसे कमावणारा चार वर्षांचा गुलाब फुलमाळी. प्रसाद विकत घ्या म्हणून
विनवणी करणारी ६ वर्षांची छाया आढाव. ‘ऐशी तैशी बत्तीशी’ असा फलक लावून आयुर्वेदिक औषधं विकणारा वैदू. माळा, झळाळते खोटे दागिने
विकणारे भटके लोक. ‘दया करा’ म्हणून
भीक मागणारे भिकारी.
...शिंगणापूरची, शनिशिंगणापूरची वाटचाल निर्विवादपणे एका
मोठ्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने चालू आहे!
xxxxx
शिंगणापूर याहूनही मोठं तीर्थक्षेत्रं अवश्य बनावं. फक्त अमावस्येलाच
नाही, तर रोज तिथं भाविक यावेत. त्यानिमित्तानं तिथल्या सामान्य माणसाला रोजगारही
मिळावा.
अपेक्षा एवढीच, तुमच्या श्रद्धेच्या डोलाऱ्याला थोडा
समतेचाही टेकू असावा!
.......
#शनिशिंगणापूर #शनिदेव #शनिअमावस्या #चौथरा #अंधश्रद्धा_निर्मूलन_समिती #अपवित्र #अशुद्ध
#अभिषेक #महिला #परंपरा #दुधाचा_अभिषेक #शुद्धिकरण