देव शुद्ध झाला!! आणि हो,
(पुन्हा) पवित्रही झाला!!
नेहमी स्वतःपुढे ‘पुरोगामी’ असं विशेषण आग्रहानं लावून घेणाऱ्या, ‘डाव्या
विचारांचा (एके काळचा) बालेकिल्ला’ मानल्या जाणाऱ्या नगर
जिल्ह्यातली गोष्ट आहे ही.
‘जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात॥’ असे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या नेवासे
तालुक्यातल्या शनिशिंगणापूरची चित्तचक्षुचमत्कारिक गोष्ट सांगतोय ही.
देवाचं पावित्र्य शनिवारी (२८ नोव्हेंबर) भंग पावलं होतं.
समस्त गावकऱ्यांनी रविवारी (२९ नोव्हेंबर) देवाला पुन्हा ते पावित्र्य मिळवून दिलं.
या दोन्हींचंही कारण ‘ती’ होती.
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एक मुलगी किंवा तरुणी
शनिशिंगणापुरातील मंदिरात होती. अंगात पँट आणि शर्ट. केसाचा एक शेपटा. गळ्यात
उपरण्यासारखी घेतलेली ओढणी. तिने पादत्राणे चौथऱ्याखाली सोडली. पायात मोजे तसेच
ठेवत चौथऱ्यावर चढली. तेलाने अभिषेक केला आणि लगेच खाली परतली. हा सारा प्रसंग अवघ्या २०-२५ सेकंदांचा. (पाहा : शनिशिंगणापूर देवस्थानातील सीसीटीव्ही
कॅमेऱ्यातील ही चित्रफीत.
या अवघ्या अर्ध्या मिनिटाच्या खेळामुळं सगळंच बिघडलं.
वर्षानुवर्षं पाळलेल्या रुढीची गढी ढासळली. जाणीवपूर्वक पाळलेल्या परंपरेचे चिरे
निखळून पडले.
त्या मुलीनं हे कृत्य हेतुतः केलं की, तिच्याकडून नकळत हे
घडलं, याचा उलगडा अजून झालेला नाही. येत्या एक-दोन दिवसांमध्ये तो होईल किंवा
होणारही नाही. असं काही करण्यामागं तिचा काही उद्देश होता की, केवळ श्रद्धेपोटी तैलाभिषेक
करण्यासाठी आणि रुढींची माहिती नसल्यानं ती चौथऱ्यावर चढली, हेही स्पष्ट व्हायचं
आहे. तसं ते होईलच याचीही खात्री नाही.
आपण काय ‘पराक्रम’ केला आहे, हे त्या मुलीला रविवारची वृत्तपत्रं वाचून कळलं असेल. आणि आता
सोमवारच्या अंकात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांनी तिला कदाचित घाबरायलाही होईल.
पण तिच्या हातून ते घडून गेलंय. वर्षानुवर्षांची एक परंपरा
तिनं त्या २० सेकंदांमध्येच मोडीत काढलीय.
ही मुलगी चौथऱ्यावर गेल्यामुळे सारं कसं ‘अपवित्र’ आणि ‘अशुद्ध’ झालं होतं. रुढी-परंपरा मोडल्यानं आलेला राग गावकऱ्यांनी रविवारी तीन तास
‘बंद’ पाळून व्यक्तही केला. ‘शुद्धिकरण’ म्हणून लोकप्रतिनिधी व गावकरी यांनी
देवाला पाणी, तेल व दूध याने अभिषेकही केला.
आपल्याला अभिषेकाबद्दल काही म्हणायचं नाही. कारण तो ‘श्रद्धेचा’ प्रश्न आहे. आपल्या घटनेनेच
प्रत्येकाला उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. घटनेनं समतेचं तत्त्वही सांगितलेलं आहे.
पण आपण त्याबद्दलही काही बोलणार नाही. कारण समतेवर विश्वास ठेवायचा नाही, असं
त्यांच्या उपासनेच्या पद्धतीत म्हटलेलं असेल, तर त्यांचं तेही घटनादत्त
स्वातंत्र्य आपण मान्य करायलाच हवं.
पाण्यानं आणि परंपरा मोडल्यामुळं झालेला दाह शांत
करण्यासाठी तेलानं अभिषेक करणंही आपल्याला पटतंय.
पण दुधानं अभिषेक कसा काय केला बुवा?
हे दूध गाय, म्हैस, शेळी, मेंढी... यांपैकीच एकीचं कुणाचं
तरी असणार ना? कारण बैल, बोकड, रेडा दूध देतो, हे
अधूनमधून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रीय चौकटींना मान्य असलं, तरी वस्तुस्थिती तशी
नाहीच. दूध फक्त ‘मादी’ देते ना?
चौथऱ्यावर चढून गेलेली ती मुलगी म्हणजे ‘मादी’च होती ना?
एका मादीमुळं अपवित्र झालेल्या स्थानाचं शुद्धिकरण दुसऱ्या
मादीच्या स्तन्यामुळं होतं तर?
म्हणजे सगळ्याच माद्या तेवढ्या अपवित्र नसतात तर?
गावकरी फक्त शुद्धिकरण करूनच बसलेले नाहीत. काहींनी
गावातल्या महिलांनाही ‘बोलतं’ केलंय.
रुढी-परंपरेच्या बाजूनंच.
तिथल्या एका बाईंनी सांगितलंय म्हणे की, ‘महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची पद्धत इथे नाही. ती रुढी आजपर्यंत
पाळली गेलीय. तो नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात परिसरातल्या महिला एकवटतील!’
काट्याने काटा काढावा, असा तर काही हा प्रकार नाही ना? बाईच्या विरोधात बाईलाच उभं करण्याची इथली सनातन परंपरा आहे. ‘बाईच बाईचा शत्रू असते,’ हे पुरुषी मनोवृत्तीनं सतत
सांगून मनीमानसी रुजवलेलं आहे. तेच पुन्हा सिद्ध करण्याचा हा खटाटोप.
पण असं काही पहिल्यांदाच घडतंय, असं मुळीच नाही. http://www.shanidev.com
या संकेतस्थळाला भेट द्या. त्या संकेतस्थळावर ‘Was injustice done to
women?’ या शीर्षकाचं एक पान आहे. त्याचं लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असलं,
तरी लेखकाचं नाव दिलं नाही. हेच पान मराठीतही आहे. त्याचं शीर्षक मात्र ‘श्री शनिदेवा संदर्भात महिलांचे आभिमत’ असं आहे.
त्यात दिलेलं महिलांचं म्हणणं मुळातून वाचण्यासारखं आहे.
xxxxx
आता या प्रकाराबद्दल परिसरातील पुरोगामी आणि पत्रकारप्रिय
पुढारी काही बोलतील, असं मुळीच नाही. ते नेहमीप्रमाणे पानाची गुळणी धरून बसतील.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आंदोलनाच्या वेळी तसा अनुभव आलेलाच आहे.
बरोबर १७ वर्षांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं
शिंगणापुरातील अंधश्रद्धेविरुद्ध मोहीम सुरू केली होती. काही वृत्तपत्रांनी तिचं
नामकरण ‘शिंगणापूरला चला, चोरी करायला’ असं करून काडी टाकण्याचं काम केलं होतं.
त्याच वेळी म्हणजे १९ व २० डिसेंबर १९९८ रोजी सोनईमध्ये सत्यशोधक समाजाचं अधिवेशन होणार होतं. (ते पार पडलं
की नाही, हे आता आठवत नाही.) त्या अधिवेशनात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या
अध्यक्षतेखाली ‘स्त्रियांच्या गुलामगिरीस धर्म व अंधश्रद्धा
कारणीभूत आहे’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं
होतं. (नंतर संयोजकांनी त्यांना दिलेलं निमंत्रणच रद्द करून आपली ‘जबाबदारी’ पार पाडली!)
एकविसाव्या
शतकातलं पहिलं दीड दशक संपल्यानंतरही त्याच विषयावर पुन्हा चर्चासत्र घेतलं तरी
चालेल, असंच आपला भवताल सांगतोय. पुरोगामित्व मिरवणाऱ्या पुढाऱ्यांनी त्याही वेळी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तोंडदेखलाही पाठिंबा दिला नव्हता. उलट राज्यमंत्री दिलीप
सोपल, आमदार शिवाजी कर्डिले यांनी निरर्गल शब्दांत डॉ. दाभोलकर, समिती यांच्यावर
टीका केली होती.
डॉ. दाभोलकर यांच्या प्रतिमेचं सोनईत दहन करून ‘दहावा’ घालण्यात आला; त्यांना
काळं फासण्याचा प्रयत्नही नगरमध्ये झाला.
म्हणूनच शंका येते; जे डॉ.
दाभोलकर यांच्या पाठीशी उघडपणे उभे राहिले नाहीत, ते आता या अनोळखी मुलीला काय
पाठिंबा देणार?
xxxxx
विशेष बातमी करण्यासाठी म्हणून मी एका शनिअमावस्येला (२ ऑगस्ट १९९७) जवळपास १० तास शनिशिंगणापूर येथे घालवले आहेत. त्याची बातमी दैनिक
लोकसत्तामध्ये ८ ऑगस्ट १९९७ रोजी ‘शनिशिंगणापूरचा
प्रवास आता मोठ्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने’ या शीर्षकाने
प्रसिद्ध झाली.
तिथे असतानाच चोरी झाल्याची तक्रार करणारा एक भाविक भेटला. दर्शनासाठी
रांगेत उभ्या असलेल्या संजय दिगंबर लोहारकर (देवगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक) ह्यांच्या खिशातील ५ हजार रुपये चोरीस गेले. पोलिसांनी त्यांची तक्रार अर्थातच घेतली
नाही. त्याचाही या बातमीत उल्लेख आहे.
शेवगाव परिसरात मुख्याध्यापक असलेल्या किसन
चव्हाण यांचं ‘आंदकोळ’ आत्मकथन
अलीकडेच ‘ग्रंथाली’नं प्रकाशित केलंय.
ते पारधी जमातीचे. लेखकाला लहानपणी ‘चोरी न होणाऱ्या
शिंगणापूरचं’ फार आकर्षण होतं. तोच ‘पिढीजात
व्यवसाय’ करणाऱ्या त्यांच्या वडिलांना मुलाला वाटणारं हे
आकर्षण ऐकल्यावर हसू आलं. त्यांनी म्हणे सांगितलं, ‘मी
सगळ्यात जास्त चोऱ्या तर तिथंच केल्या आहेत!’
त्या दिवशीच्या त्या १० तासांमध्ये बरंच काही पाहिलं,
ऐकलं. त्यानंतर पुन्हा शनिशिंगणापूरचं दर्शन घडलं ते क्रिकेटपटू राजेश चौहान ह्याच्याबरोबर.
भारतीय संघात पुनरागमन करण्याचं स्वप्न पाहणारा हा उमदा क्रिकेटपटू
ज्या श्रद्धेनं साईबाबांपुढे नतमस्तक झाला, त्याच श्रद्धेनं त्यानं शिंगणापूरला
सोवळं नेसून अभिषेकही केला. पुरोहितानं गोत्र विचारल्यावर त्यानं ते क्षणात ‘कश्यप’ असं सांगितल्याचं आजही आठवतंय.
xxxxx
गुलशनकुमारचा ‘सूर्यपुत्र
शनिदेव’ चित्रपट आणि अनुराधा पौडवाल यांच्या ध्वनिफिती या
समसमा संयोगामुळे शिंगणापूरची ख्याती वाढत गेली. शनिअमावस्येला तिथं चार-पाच लाख
भाविकांची गर्दी झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून नेहमीच झळकतात. जवळच शिर्डी
असल्यानं त्याचा फायदा शनिशिंगणापूरला होतो आहे.
त्या बातमीचा शेवट करताना लिहिलं होतं...
शिंगणापूर! भक्तांच्या कपाळी
गंध लावून पैसे कमावणारा चार वर्षांचा गुलाब फुलमाळी. प्रसाद विकत घ्या म्हणून
विनवणी करणारी ६ वर्षांची छाया आढाव. ‘ऐशी तैशी बत्तीशी’ असा फलक लावून आयुर्वेदिक औषधं विकणारा वैदू. माळा, झळाळते खोटे दागिने
विकणारे भटके लोक. ‘दया करा’ म्हणून
भीक मागणारे भिकारी.
...शिंगणापूरची, शनिशिंगणापूरची वाटचाल निर्विवादपणे एका
मोठ्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने चालू आहे!
xxxxx
शिंगणापूर याहूनही मोठं तीर्थक्षेत्रं अवश्य बनावं. फक्त अमावस्येलाच
नाही, तर रोज तिथं भाविक यावेत. त्यानिमित्तानं तिथल्या सामान्य माणसाला रोजगारही
मिळावा.
अपेक्षा एवढीच, तुमच्या श्रद्धेच्या डोलाऱ्याला थोडा
समतेचाही टेकू असावा!
.......
#शनिशिंगणापूर #शनिदेव #शनिअमावस्या #चौथरा #अंधश्रद्धा_निर्मूलन_समिती #अपवित्र #अशुद्ध
#अभिषेक #महिला #परंपरा #दुधाचा_अभिषेक #शुद्धिकरण
अंधश्रद्धा या शब्दाचा नक्की अर्थ कळला नाही. डोळस श्रध्दा असू शकते का?
उत्तर द्याहटवासोईस्कर धर्म परंपरा (!) अबाधित राहील यासाठी उच्च विद्या विभूषित मंडळी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असतात. आणि समाजातील जी जाणती म्हणवणारी मंडळी डोळे मिटून शांत असतात.
उत्तर द्याहटवातुम्ही वास्तव उजागर केलं तेही कालौघात समाजपुरुष विसरून जातो. सोईस्कर. बाई आजही जोखडातून बाहेर पडू नये हीच अपेक्षा या लोकांची, मानसिकताही.
आधुनिक काळातील स्त्रियांनी डोळस दृष्टिकोन ठेवून अशा अन्याय्य प्रथा-परंपरांच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी आग्रह धरावा. यासाठी पुन्हा एकवार सविनय सत्याग्रह चळवळ उभारावी. अशा स्त्री-पुरुष समानतेसाठी संवेदनशील पुरुषांनी देखील आपला सक्रीय सहभाग द्यावा, ही गरज आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अनेक प्रश्नांवर सातत्याने प्रबोधन होत राहण्याची आवश्यकता आहे.
उत्तर द्याहटवाया विशेष प्रश्नावर महिलांनी एकत्र येणे, आवश्यक आहे. समाजातील मोठ्या संख्यने महिला वर्ग जर अशा प्रश्नांवर एकत्र झाला तर लोकशाही असलेल्या आपल्या देशात त्याची त्वरेने दखल घेतली जाणे, शक्य आहे.
आवश्यक ते पुरावे देऊन चांगला लेख लिहिला आहे. आवडला.
उत्तर द्याहटवातैलाभिषेक करणाऱ्या मुलीच्या पेहरावाचे वर्णन पुष्कळ काही सांगून जात असल्याने ते वर्णन महत्त्वाचे आहे. लेखातून सूचित होणारा विचारही महत्त्वाचाच आहे. लेखनाची उपहासगर्भ, वक्रोक्तिपूर्ण भाषाशैली आवडली. अशा भाषेमुळे लेखातील विचार धारदार बनला आहे.
आपला,
- अरुण प्रभुणे
अतिशय मार्मिक. लेख आवडला.
उत्तर द्याहटवा- रवींद्र
चांगला लिहिलाय. भयंकरच आहे सगळं. कुठल्या जमान्या वावरतोय, हेच कळत नाही कधी कधी. तुमची 1997ची बातमीसुद्धा आता वाचायला हवी.
उत्तर द्याहटवा- अरुंधती जोशी
फार चांगल्या पद्धतीने आपण विचार मांडले आहेत - या वैचारिक स्पष्टतेची आज खरोखरच समाजात निकड आहे.
उत्तर द्याहटवाया लेखाचा दुवा काही मित्रांस पाठवत आहे.
- केशवचैतन्य कुंटे
अंधश्रद्धेवर आज तुम्ही लिहिलेले वरवरचे आणि तेच तेच वाटले नाही. ही बातमी वाचून आतून आलेल्या उमाळ्याने तुम्ही लिहित आहात असे वाटले. मी पुन्हा वाचले.
उत्तर द्याहटवा- मंगेश नाबर
खूप खरे आहे. आपण काय करू शकतो, हे सुचवावे.
उत्तर द्याहटवा- स्वाती वर्तक
नुकतंच नरेंद्र दाभोळकर यांचे, ‘ठरलं….डोळस व्हायचंच’ पुस्तक वाचले. त्या पार्श्वभूमीवर या लेखाची महत्ता जाणवली.
उत्तर द्याहटवाहा लेख शिंगणापूरच्या सश्रद्ध लोकांनी वाचायला हवा. ते स्त्रीला समान दर्जा कधीतरी देउ लागतील अशी आशा करू या.
- प्रियंवदा कोल्हटकर
चांगला झाला आहे. तुझी बातमी इतकी सविस्तर दिली नसती, तरी चाललं असतं.
उत्तर द्याहटवा- विनायक लिमये
मस्त लिहिलं आहे...खूप छान...
उत्तर द्याहटवा- प्राजक्ता धर्माधिकारी
सतीशजी नगरचे पुरोगामी नेते यावर काय भूमिका घेतात याची खरोखर प्रतीक्षा आहे.
उत्तर द्याहटवाआपला लेख वाचला. अतिशय चांगला आहे. मित्रांना पाठवून दिला आहे.
उत्तर द्याहटवा- गोपाळ आजगावकर
Very well written. It is a great pity that even in 21st Century we continue to
उत्तर द्याहटवाto be in 18th century in mind and spirit. Mr. Dabholkar would be very unhappy indeed! MORE POWER TO YOU!
- Suresh Deolalkar
खरंच धर्माच्या नावाखाली जुन्या कालबाह्य विचारांना, रुढी-परंपरांना किती काळ स्वत:भोवती गुंडाळून ठेवायचे? एकीकडे असे करायचे पाश्चात्य देशांचा विकास पाहून हुरळून जायचे आणि भारत कसा मागासलेला आहे असे रडत बसायचे. यातील विरोधाभास कधी लक्षात येणार आहे?
उत्तर द्याहटवा- पराग पुरोहित-
मार्मिक लेख. मात्र पुरोगामी बुरखा पांघरलेल्या ढोंगी आत्म्यांना "आई " चे महात्म्य केव्हा उमगणार ? समानता नव्हे विषमता जोपासणारे असेच करणार. याविरुद्ध " पुरुषांनी " पुढाकार घेण्याची गरज आहे.
उत्तर द्याहटवासुनील आढाव
छान. आणखी लिहायला हवे.
उत्तर द्याहटवाबऱ्याच दिवसांनी `खिडकी` उघडली. लेख चांगला वाटला. मुद्देसूद. काही तपशील नव्याने कळला. प्रत्यक्ष दृश्यही पाहता आले. ज्या चलाखीने मुलीने कार्यभाग उरकला, त्यावरून तिने हा प्रकार जाणूनबुजूनच केला असावा असे वाटते. एका किरकोळ मुलीच्या अर्ध्या मिनिटाच्या कृतीने किती लोक अस्वस्त, संतप्त झाले! मजा आहे ना? लोकांना कामाला लावून ती पसार झाली!
उत्तर द्याहटवा- माधुरी तळवलकर
Satishji ,
उत्तर द्याहटवाApla lekh wachla.nehmipramane jagalyachi bhumika tumhi paar paadlit...Nareetv n abhishek hehi uttam pratipadan kelet.purogamitlya dambhiktela kasa awar ghalnar ha kalicha mudda ahe.Tyamule tumhi vyakt keleli chinta rast aahe.1997 madhye tumhi kelele bhakit tumvhya drashtepanache dyotak aahe,mi swatah tya parisarat rahun tya gavcha alekh pahilay..Ajun pushkal mudde ahet.Samaksh charche anti bolu....Baki Utaamanjan ghalnare lekhan....