डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.
-------------
-------------
साधारण दहा-अकरा वर्षांचा नातू आणि (कागदोपत्री तरी!) पंचाहत्तरी पार केलेले आजोबा. त्यांचा दर आठवड्याचा प्रवास ठरलेला आहे. दोन टप्प्यांचा प्रवास. आजोबांच्या हातात काठी नाही. उलट त्यांचंच बोट धरून नातू असतो. अनुभवी आणि आश्वासक हातात कवळेपण.
हे असं खूप दिवसांपासून चाललेलं आहे. अंदाजे किती दिवस, आठवडे व महिने असं विचारायला नको. आजोबांकडे हिशेब आहे - आतापर्यंत सलग ११४ आठवडे त्यांनी हा प्रवास केला आहे. आताशी कुठे तो मध्यावर आलेलाय.
‘पॉझिटिव्ह थिंकिंग’चा डोस पाजणाऱ्या कोणत्याही खपावू पुस्तकापेक्षा अगदी थेट व्यावहारिक अनुभव आज मिळाला. कृपा ‘लाल परी’ची! तिच्यामुळे होत असलेल्या आरामदायी प्रवासाची.
नगरहून काल जाताना एस. टी. बस जेवण्यासाठी थांबली नाही. सगळे थांबे व्यवस्थित घेऊनही वेगाने धावली. तो सुखद धक्का जेमतेम पचनी पडत होता. परतताना मात्र बस थांबलीच. नगर २५ किलोमीटर राहिलेलं असताना. घरचं जेवण वाट पाहत असताना. रुई छत्तिशीजवळच्या थोडंस पुढे (चिंचोली कोयाळ फाटा?) असलेला हा ढाबा आता बहुतेक सर्व एस. टी. बससाठी हक्काचा थांबा बनला आहे.
‘जेवणासाठी गाडी १५-२० मिनिटं थांबेल,’ अशी घोषणा करून विसावा घेणारी ही बस तिसाव्या मिनिटाला पुन्हा फुरफुरू लागली. त्याच वेगाने इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी.
बस सुरू होता होता आजोबा आणि नातू प्रवेश करते झाले. बरेच प्रवासी आधीपासून उभे होते. ढाब्यापासून प्रवासी कसे काय घेतले, हा प्रश्न पडला. आजोबा नातवाला सांभाळून, जपून आणत होते. तो आजारी असावा, चालताना त्रास होत असल्याचं दिसलं.
पांडुरंगाचं दर्शनानं खूश होऊन कोल्हारला परत चाललेल्या मावशी शेजारी होत्या. त्यांची परवानगी गृहीत धरून ह्या मुलाला आमच्या मधली जागा देऊ केली. (कारण त्याच्या पाच मिनिटंच आधी त्यांनी आपल्या गाववाल्या शेजारणीला तिच्या आसनावर एका तरुण मुलीची सोय करून द्यायला बजावलं होतं.) ‘ओ पैलवान, ये बस इथं’, असं म्हणाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली.
मुलगा आजारी दिसत असला, तरी त्याचे कपडे एकदम व्यवस्थित होते. अंगात जीन्ससारखी पँट. पूर्ण बाह्यांचा सदरा. त्या बाह्या छान दुमडून किंचित वर घेतलेल्या. गोबरे गाल, वाटोळा चेहरा; पण त्यावर उदासवाणा भाव. वयाच्या मानाने चेहऱ्यावर असलेल्या पोक्तपणा जाणवणारा. कोवळेपणा कायम ठेवूनही.
आजोबांनी मला उठायला सांगितलं आणि आपल्या नातवाला हळूच तिथं बसवलं. ‘पलीकडं सरकून बस थोडं, बाबांना जागा दे बरं...’, असं मग ते नातवाला म्हणाले. तिकीट काढून झालं आणि आजोबांच्या गप्पा चालू झाल्या. अपंग म्हणून नातवाला ७५ टक्के सवलत आणि आजोबा पंचाहत्तरीपुढचे म्हणून मोफत. हे झालं नगरपर्यंतचं. मग तिथून पुढचा पुण्यापर्यंतचा प्रवास किती रुपयांना पडतो, हे त्यांनी सांगितलं. बस साधी नसेल, तर जास्त पैसे लागतात. पण आम्ही मिळेल त्या बसने जातो, अशी पुष्टी जोडली.
शेजारच्या मावशींनी मुलाद्दल विचारलं आणि जणू त्याचीच वाट पाहत असल्यासारखे आजोबा सांगू लागले, ‘‘पुण्याला चाललोय. दीनानाथ मंगेशकरमध्ये. दर सोमवारी जातोय. ११४ आठवडे झाले. सलाईन द्यावे लागतेत चार-पाच. आज जायचं आणि उद्या परत यायचं.’’
त्या छोट्या मुलाचे कमरेखालचे स्नायू दुबळे होते. काही तरी मोठा आजार होता. त्या साठी दर आठवड्याला ह्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. दसरा नाही, दिवाळी नाही आणि शिमगा नाही... उपचार सुरू झाले तेव्हापासून आजोबांनी एकदाही खाडा केला नाही त्याला तिथं नेण्यात. ‘फक्त एकदाच त्याला त्याचा बाप घेऊन गेल्ता,’ आजोबांनी प्रांजळपणे सांगितलं.
आमचा प्रवास जेमतेम अर्धा तास बाकी होता. तेवढ्या वेळात हा मुलगा, आजोबा आणि त्यांचं कुटुंब ह्यांची संपूर्ण माहिती मिळाली. ह्या कोवळ्या मुलाच्या आजारावर अजून उपचार सापडलेले नाहीत. एक अमेरिकी संस्था त्याबाबत संशोधन वा अभ्यास (आजोबांच्या भाषेत ‘रीसर्च’!) करीत आहे. त्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मदत घेतली जात असावी. ह्या उपचारांसाठी अशा दहा-बारा रुग्णांची निवड केलेली आहे. ते उपचार मंगेशकर रुग्णालयात होतात.
‘पांडुरंगाची कृपा!’, आजोबा कृतज्ञपणे म्हणाले आणि पुढं सांगू लागले, ‘‘आपल्याला काय परवडतंय हे न्हाई तर. किती खर्च असंल ह्याचा?’’, असा प्रश्न विचारून त्यांनीच पुढच्या क्षणाला उत्तर दिलं - १२ कोटी रुपये!
‘उमेश सरांची कृपा!’ नातवाला मिळत असलेल्या उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आजोबा अजिबात सोडत नव्हते. सर म्हणजे डॉक्टर हे लक्षात आलं. डॉ. उमेश कलाणे. बालकांच्या न्यूरोलॉजीचा विशेष अभ्यास असलेले डॉक्टर.
उपचारांबद्दल आजोबा म्हणाले, ‘‘उमेश सरांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, एकदा यायला सुरुवात केली की, मधूनच सोडून चालणार नाही. नाही तर आमची सगळी मेहनत गेली बघा वाया. मी म्हणालो, ‘तुम्ही सांगान तवा येईल.’ तेव्हापासून दर आठवड्याला जातोय बघा. एकदा तर लक्ष्मीपूजन करून रात्री निघालो.’’
खंड पडू न देता दोन वर्षांहून अधिक काळ रुग्णाला नियमित आणणाऱ्या आजोबांचं उमेश सरांनी स्वाभाविकच कौतुक केलं. ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ ही माहिती देऊन मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. म्हणजे आपण समजून घ्यायचं की, शिरेतून विशेष औषधे दिली जात असावीत. दुपारपर्यंत औषधयोजना संपते. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. हमरस्त्यापासून काही किलोमीटरवर हे गाव. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.
आणि ही दगदग, हा प्रवास ११४ आठवड्यांपासून चालू आहे. असं अजून किमान ९४ आठवडे त्यांना करायचं आहे. कारण ह्या उपचाराचा कालावधी चार वर्षांचा आहे.
ह्या दगदगीबद्दल आजोबांच्या बोलण्यात खेद, खंत, त्रास असं काही डोकावत नसतं. अतिशय शांतपणे, हसतमुखाने ते सांगत असतात. ‘बाकी काही नाही हो. ह्यो आपला गडी धडधाकट झाला पाहिजे. बघू त्या पांडुरंगाच्या मनात काय आहे ते,’ असं म्हणत ते पांडुरंगावर भार सोडून देतात.
नातवाचं कौतुक करताना आजोबा रंगतात. ‘‘तिथं हॉस्पिटलात चार-पाच वेळा सुया टोचतात सलाईनसाठी. गडी कधी हं की चूं करत नाही. रडायचं तर सोडाच! नर्सबाई पण लई कौतुक करताते ह्याचं.’’
आजोबांचा नातू चौथीत आहे. इंग्रजी शाळेत घातलाय त्याला. ‘लय हुशार बघा. प्रत्येक विषयात तीसपैकी २८-२९ मार्क मिळवतोय. त्याच्या बाईपण खूशयेत त्याच्यावर.’ मग ते त्याच्या शाळेच्या बसचा खर्च, शाळेची फी सांगतात. चांगल्यापैकी रक्कम आहे ही. गावापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आपला दुबळा नातू तिथंच शिकला पाहिजे आणि उभा राहिला पाहिजे, ही आजोबांची इच्छा. नातू शाळेत अजिबात त्रास देत नाही, असं कौतुकाने सांगतात आणि हळूच म्हणतात, ‘हां, आता घरी आमाला देतो अधनंमधनं तरास. पण चालायचंच...’
एवढी सगळी कहाणी मस्त सांगत असताना आजोबांचा एकदाही कणसूर लागत नाही. परिस्थितीचं रडगाणंही ते गात नाहीत. कारण परिस्थिती तशी नाहीचंय मुळी. ते म्हणाले, ‘‘तसं बरं आहे आपलं. देवानं बरं चालवलंय. शेती आहे. दुधाचा धंदा आहे. सात-आठ गाया आहेत. ह्येचा बाप बघतो दुधाचा धंदा. परवाच त्याला ट्रॅक्टर घेऊन दिला. पांडुरंगाची कृपा...’’
गळ्यात तुळशीमाळ, आणिक कसल्या तरी एक-दोन बारीक मण्यांच्या माळा असणाऱ्या आजोबांचा पांडुरंगावर फार विश्वास. त्याला ते बोलण्यात घेऊन येतातच. पोराची आजी आता चार धाम यात्रेला चाललीये, असं ते शेजारच्या मावशीला सांगतात. ‘‘आलो परवाच १५ हजार रुपये भरून यात्रेचे. चांगले धा-बारा दिवस आहे. तिला म्हणलं, पाय चालतेत तोवर ये फिरून, बघून.’’
मग मावशींच्या कपाळीचा टिळा पाहून ‘कसं झालं पांडुरंगाचं दर्शन?’ विचारून आपल्या पंढरीच्या वारीचं वर्णन सांगतात. पुढे पुस्ती जोडतात, ‘‘आता एवढ्यात न्हाई गेलो. आता बघा ना आमचे दोन दिवस पुण्याला येण्या-जाण्यातच जातात. मग आठवड्याचे राहिले पाच दिवस. त्यात किती तरी कामं करायची असतात बघा...’’
मावशी आणि माझ्यामध्ये बसलेला नातू सगळं ऐकत असतो. पण गप्पगप्प. आजोबा ज्याला त्याला काय हे पुराण सांगतात उगीच, असा काही भाव त्याच्या चेहऱ्यावर नसतो. दहा वाक्यं आपण बोलावीत, पाच प्रश्न विचारावेत तेव्हा तो एखाद्या शब्दाचं उत्तर देतो. आवडीचा विषय इंग्रजी आहे असं सांगतो. त्याच्या सुंदर शर्टचं कौतुक केल्यावरही तो लाजत नाही किंवा चेहऱ्यावर कसलेही भाव उमटू देत नाही. त्यानं शर्टाच्या बाह्या खरंच फार छान दुमडलेल्या असतात. ते ऐकून आजोबांच्या मनात कौतुकाची नवी लाट येते, ‘त्याला हाप शर्ट आजिबात आवडत नाहीत. सगळेच्या सगळे फुल्ल बाह्यांचे आहेत.’
पुण्याच्या एवढ्या आठवड्यांच्या प्रवासात आलेला एक अनुभव आजोबा आवर्जून सांगतात, ‘‘गाडीला कितीबी गर्दी असूं द्या; आमच्या गड्याला कुणी ना कुणी बसायला जागा देतोच. ह्या पठ्ठ्याला एकदाबी उभं राहावं लागलं नाही. पांडुरंगच त्या जागा देणाऱ्याला तशी बुद्धी देत असंल बघा. आज नाही का तुम्ही बोलावलं चटसरशी, तसंच.’’
प्रवास संपतो. उतरणाऱ्यांना घाई असते. आजोबा, त्यांचा नातू ह्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्यांना एखादा धक्का बसतोच घाईचा. आजोबाच सांगतात त्याला, ‘बाळा, बाजूला राह्य बरं थोडा. त्यांना उतरूंदे.’
माळीवाड्याच्या स्टँडवर उतरल्यावर आजोबांना लाडक्या नातवाला घेऊन पुण्याची गाडी पकडण्याकरिता पाचशे मीटरवरच्या दुसऱ्या स्टँडकडे जावं लागणार आहे. नातवाला चालता येईल ना? ते म्हणतात, ‘सपाट जागा असली ना, आमचा गडी दोन किलोमीटरबी चालतोय.’
दोघांमध्ये इवलीशी जागा दिल्याबद्दल आजोबा दिलखुलास हसून माझे आभार मानतात. म्हणतात, ‘आपले तर प्रयत्न चालूयेत. यश द्यायचं त्या पांडुरंगाच्या हाती.’
पांडुरंग तुमच्या पदरात यश टाकणारच, असं कितव्या तरी वेळा सांगून निरोप घेतो. हार न मानणाऱ्या आजोबांची एक अतिशय सकारात्मक गोष्ट मनात रुजवून!
.......
.......
(छायाचित्रं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने.)
आजोबा आणि नातवाची ही कहाणी मनाला भिडणारी आहे. प्रवासात अशा भेटलेल्या माणसांबद्दल छान शब्दांत मांडणी केली आहे.
उत्तर द्याहटवामनस्वी ....विश्वासाची शक्ति नक्कीच काम करेल...
उत्तर द्याहटवाकाय बोलणार यावर,रुग्णालय खर्च दिवसेंदिवस वाढत असून उपचारही बर्याच वेळा पुर्ण होत नाही. जगण्याची उमेद असेल तर वय नक्कीच आजाराला हरवते.आजोबांची नातवासाठीची धडपड स्पष्ट दिसतेय.यात महामंडळाचाही हातभार म्हणावा लागेल कारण ७५ वर्षावरुन लोकांना त्यांनी मोफत प्रवास केलाय,बाकी हे सर्व वाचता पांडुरंगाची कृपा दिसतेच आहे.
उत्तर द्याहटवाप्रवासात भेटलेल्या आजोबा व नावाचे यथार्थ वर्णन मनाला भिडते. आजोबांचा आयुष्ये पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व पांडुरंगावरील श्रद्धा आपल्याही मनाला ऊभारी देऊन जातात.
उत्तर द्याहटवालेख नेहमी प्रमाणेच मस्त
एकच नंबर
उत्तर द्याहटवाआजोबा आणि नातू यांचे यथार्थ वर्णन वाचून आयुष्य किती सकारात्मक जगता येऊ शकते असा विश्वास बसला.
सतिश असे अनुभव तू ब्लॉग वर खुप छान लिहितोस.धन्यवाद.
पांडुरंग पांडुरंग!
उत्तर द्याहटवाकौतुक त्या आजोबांचं
छान लेख.
लेकरु बरं व्हावं ही पांडुरंगापाशी मागणी!
- चंद्रशेखर रामनवमीवाले, करमाळा
लेख छान आहे. लेकरू बरं व्हाव ही पांडुरंगापाशी मागणी.
उत्तर द्याहटवा- प्रतिभा जोशी देशपांडे, नगर
तुम्ही खुप छान लिहिलीय सर्व वस्तुस्थिती. 🙏
उत्तर द्याहटवासकारात्मक विचार नेहमीच चांगले घडवतात. एरवी हे व्रत अखंड पणे चालणे सोपे आहे का? आजोबांचा नातू नक्कीच या आजारातून बरा होईल याची खात्री आहे
- अरविंद दळवी, नगर
‘खिडकी’तून वार्याच्या झुळुकी बरोबर पॉझिटिव्ह एनर्जी आली.
उत्तर द्याहटवा- स्वाती लोंढे, मुंबई
खुपच सुंदर. डोळ्याच्या कडा पाणावल्या.
उत्तर द्याहटवापांडुरंग १००% यश देणारच! 🙏🏻🙏🏻🙏🏻
- शैलेश बोपर्डीकर, पुणे
लेख खूप चांगला लिहिला आहे व वास्तववादी प्रसंग असल्यामुळे, प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. पंचाहत्तरीनंतरचे आजोबासुद्धा ‘सकारात्मक’ वाटतात के कदाचित ‘पांडुरंगाच्या’ कृपेनेच! 👌👍🙏🙏
उत्तर द्याहटवा- सच्चिदानंद साखरे, करमाळा
व्वा... आज आजोबा आणि नातू ह्यांच्यामधला संवाद हरवला आहे.
उत्तर द्याहटवामला माझ्या आजोबांची आठवण आली.
- विकास पांढरे, मुंबई
Speechless..👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवा- Shruti Kulkarni, Ahilyanagar
छान...सुरेख!
उत्तर द्याहटवाआजोबा आणि नातू डोळ्यापुढे उभे राहिले. पुस्तकी गोष्टींपेक्षा असे जिवंत अनुभव आपल्याला अधिक सकारात्मक ठेवतात.
छान अनुभव वाचायला मिळाला. धन्यवाद...❤️
- विनय गुणे, संगमनेर
मनस्वी...
उत्तर द्याहटवाविश्वासाची शक्ती नक्कीच काम करील... 🙏
- अनिल कोकीळ, पुणे
Very touchy...
उत्तर द्याहटवाआजोबा आणि नातवाचं नातं वेगळंच असतं. तिथे त्रास, कष्ट यांची मर्यादा नसतेच. असतो तो फक्त एकमेकांवरचा प्रचंड जीव...
- प्रबोधचंद्र सावंत, पुणे
👍
उत्तर द्याहटवाअंतर्मुख होऊन विचार प्रवृत्त करणारा अनुभव आहे! धन्यवाद.
- सौ. सविता काळे, अहिल्यानगर
किती अप्रतिम लिहिले आहे तुम्ही! आपण एखादा चित्रपट पाहत आहोत असे मला वाटले...
उत्तर द्याहटवालेखक जे सांगतो त्यापेक्षा त्याने काय सांगितले नाही हे समजून घेण्याविषयी वाचक जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा ते लेखन फार वरच्या दर्जाचे झालेले असते. (असे माझे स्वतःचे आकलन आहे...)
खूप खूप अभिनंदन!
- प्रल्हाद जाधव, मुंबई
खूप छान, हृदयस्पर्शी लेख.
उत्तर द्याहटवाछोट्या गावात राहणारे प्रगल्भ,विचारी, आशावादी आणि सश्रद्ध आजोबा आणि त्यांचा लहानगा, कोवळ्या वयाचा समंजस नातू यांची सत्यकथा.नातवाच्या असाध्य आजारावर एक अमेरिकन संस्था काही प्रयोग, संशोधन करीत आहे.त्याचा उपयोग नातवाला नक्की होईल या भावनेनं,सलग चार वर्षे दर आठवड्याला एसटी ने प्रवास करून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोचणारे , नातवाला संभाळून नेणारे आजोबा !
कर्म करीत राहणारे, पांडुरंगावर सारं काही सोपवून निष्ठेने काम यशस्वी होईलच असा गाढ विश्वास मनात बाळगून कृती करणारे आजोबा आणि सारे उपचार संयमाने घेत राहणारा मितभाषी नातू - दोघांच्या जिद्दीला, प्रयत्नांना विनम्र अभिवादन. 🙏
फारच सुंदर लिहिले आहे तुम्ही. 👌
त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो ही सदिच्छा.
- विद्या सहस्रबुद्धे, पुणे
हेलावून टाकणारा प्रसंग आहे. माणसं परिस्थितीला धीराने सामोरं जात राहतात, हे दिसतंही अधूनमधून. मुलगा लवकर बरा होईल, अशी आशा.
उत्तर द्याहटवाअवधूत
सुरेख आणि यथार्थ वर्णन , सामर्थ आहे ...... तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।। या समर्थ वचनाचा अर्थ नव्याने कळला .
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवामन हेलावून टाकणारी ही घटना. कुणावरही अशी वेळ येऊ नये ही तळमळ. अर्थात मनःशक्ती व विज्ञान यातील ही लढाई आहे. नियतीच्या कृपेने कोणीही जिंको, पण हा गोंडस मुलगा स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहील हीच सदिच्छा व पांडुरंग चरणी प्रार्थना.
उत्तर द्याहटवाश्रीराम वांढरे, भिंगार, अहिल्यानगर (अहमदनगर)
लेख सुंदर लिहिला आहे.
उत्तर द्याहटवा- गार्गी लिमये
छान आहे हा लेख.
उत्तर द्याहटवा- अनिल कुलकर्णी
अतिशय मर्मग्राही, हद्य शब्दचित्र उभे केले आहे तुम्ही...
उत्तर द्याहटवाखरोखर आपल्या अवतीभवतीच किती तरी वंदनीय अशा व्यक्ती आपणास भेटतात; पण त्यांचे असे जिवंत रेखाटन तुम्हीच करू शकता!
- स्वाती वर्तक
धन्य आहे ..नमस्कार
खूप छान, हृदयस्पर्शी
उत्तर द्याहटवाअफलातून!
उत्तर द्याहटवाकाही गोष्टी शब्दापलीकडच्या असतात. पण शब्दांत मांडल्यावरच हजारो-लाखोंपर्यंत पोहचतात.
खूप 😍
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
- हेमंत जोशी, मुंबई
अगदी लहान-सहान गोष्टींना आपण वैतागतो किंवा कंटाळतो. आणि इथे आजोबांनी द्रविडसारखी इनिंग्स चालू ठेवली आहे. त्यांच्या नातवाला ह्यातून फार मोठी शिकवण पण मिळतेय.
उत्तर द्याहटवाछान लिहिलं आहे.
- अभय बर्वे, पुणे
प्रेरणादायक
उत्तर द्याहटवावेगळ्ययाच प्रकारे टिपलेल्या संवेदना आहेत ह्या कथनात... 👌👍🌹
उत्तर द्याहटवाछान. प्रेरणादायी...
उत्तर द्याहटवा- दीपाली वैद्य
लेख छानच आहे.
उत्तर द्याहटवा- उज्ज्वला केळकर, सांगली
संवेद्य आविष्कार.
उत्तर द्याहटवासंवेदनशील
लेखक, लेखन...
- प्रा. एकनाथ पगार